.
ताज्या घडामोडी Current Affairs

गोस्ट पन रस्त्यांची!


आमचा बाप मला शालत रोज हाकायचा तवाची गोस्ट आहे. एक दिवस बाप म्हनला की पोरा तुज्या शालत एक नवा मास्तर आला आहे त्याची तुला शिकवनी लावली आहे स्पेश्यल. त्याच्याकडे आज जा. गंमत म्हनजे तो मास्तर होता मिल्ट्रीतला. त्याला आम्ही पोरे, एनसीसी मास्तरच म्हणायचो. त्याची शिकवणी म्हणजे नुसती हडेलहप्पी असायची. आता आमाला ती आवडायची ही गोस्ट निराली. शालला सुट्टी पडली की तो मास्तर आमाला क्यांपला घेऊन जायचा. क्यांप म्हनजे नुसता दंगा. पन तो मास्तर आमाला शरम्दानाला घीऊन जायचा. शरम्दान म्हनजे दुसर्‍यांच्या पोरांकडन फुकाट काम करून घ्यायाच. आता आमी धा बारा वर्साची पोरे काय काम करनार? मंग मास्तर आमाला रस्ता करायला लावायचा.

आता रस्ता करयाचा म्हनजे एकदम इझी (सोपं) काम. मास्तर जिमिनीवर चुन्याच्या फक्कीच्या दोन लाइनी मारायचा. आमी पोरे त्या लाइनीमधे एक दीड फूट खोल खनायचो. मंग त्या खड्यात दगडं,धोंडं जमवायची आणि वरच्या अंगाला, खनलेला मुरुम परत भरायचा. झाला रस्ता. या रस्त्याने गणपत पवार त्याची बैलगाडी नेवून बघायचा. पाउसपान्यात वरचा मुरुम खाली बसायचा. मग परत शरम्दानानी दुसर्‍या जागेतली माती, मुरुम आणून टाकयाचा. दोन पांच वर्से असेच केले की एकदम ब्येस रस्ता तयार.

आता तुम्हाला एक शिक्रेट सांगतो. आपल्या कोल्हापूर,सांगली,सातार्‍यापासून पार पुन्यापर्यंतच्या म्युंशिपालट्या असाच रस्ता बनवतात. मी सताच्या दोल्यांनी पायलेले आहे. आता त्यांना रस्त्यावरून मोटरगाड्या पन पलवायच्या असतात. ते पन इझी आहे. चार लाकड पेटवायची आनि त्यावर डांबर उकलवायचं. रस्त्यावर दगडाची बारीक खडी टाकायची आनि त्यावर डांबर वतायचं. ब्येस मोटर गाड्या धावतात यावरनं. पान्यानं खड्डं पडल तर परत खडी टाकायची आनि परत डांबर टाकायच. आमी या रस्त्यांना बैलगाडी छाप रस्तेच म्हनतो. आपल्याकडे सगले रस्ते असेच असतात.

पुन्याच्या वरच्या अंगाला, औंध गावाजवल, मुला नदी आहे. या नदीवर गोर्‍या साहिबांनी एक पूल बांधला होता. हा पूल एकदम कंडम. नदीला पानी आले रे आले की पानी पुलावर. मंग पुढच्ये थेरगावकडचं पब्लिक वाट बघत बसायचं. मंग आपल्या बॉम्बेच्या शासनानं या पुलाच्या आधीच्या बाजुला एक आणखी झ्याकपाक पुल बांधला. त्याला लाल पिवला रंग दिला. तो पुल बघायला पेपरवाल्यांना बोलावलं त्यांनी फोटु काढले. पन पुन्याचेच पेपरवाले ते, पुल बघायच्या ऐवजी पीडब्ल्युडीच्या साहेबालाच विचारायला लागले साहेब या पुलावर जायाचं कसं? आता पुलावर जायचा रस्ता पीडब्ल्युडीसाहेब थोडाच बनवणार. ते काम ग्रामपंचायतीचं. मंग पब्लिक जुन्याच पुलावरून जायाच. भरकन दोन पांच् वर्सात ग्रामपंचायतीनं पुलाच्या दोन्ही अंगाना आपले बैलगाडी छाप रस्ते बनवले. चांगलं डांबर खडी टाकली. पन आता दुसरीच गोची झ्याली. पुन्याचं ट्रॉपिक लै भारी आनि पुलावरनं एका वेली ज्येमतेम दोन मोटरगाड्या जायाच्या. सारखं ट्रॉपिक जाम व्हायाला लागलं. लोकं पीडब्ल्युडीसाहेबाच्या नावानं बोंब मारू लागलं. असा कसा बनवला पुल म्हनुन. मंग पीडब्ल्युडीसाहेबानं जाहिरच करून टाकलं ‘ आता शासन नवीन पूल बांधणार आहे. निविदा काढणार आहेत.’ झालं पेपरवाल्यांचा विषयच संपला.

आता चार दिवसांपूर्वी आपल्या सोनिया मॅडमनी, बॉम्बेला एक ‘शी लींक’ म्हनुन पुल चालू केला ना! वांदृयापासुन वरलीला जायाला. एकदम ब्येस पुल आहे. आपल्या वालचंद शेटजींनी बांधला म्हनतात. एका वेली आठ मोटरगाड्या जा ये करनार म्हनतात. मी अजुन बघितलेला नाही पन आमचा अर्जुन रहातो ना वरलीनाक्याला, तो सांगत होता. आपलं अशोकजी चव्हान आहेत ना बॉम्बेचं, मुख्य मंत्री हो! त्यांची पन एक पीडब्ल्युडी आहे म्हनं. या पीडब्ल्युडीचा एक साहेब वालचंदशेटजींचा पुल बघायला गेला होता म्हनं. तो पन पुल बघुन खुष झाला. पन त्याचं असं मत पडलं की एका वेली आठ मोटरगाड्या धावणार म्हनजे केवढं पेट्रोल लागणार आनि पर्यावरनाची केवढी हानी. म्हनुन त्यानं एकदम ब्येस आयडिया काढली. वरलीनाक्यावर पुलाकडून जाणारा रस्ता त्यानं ज्येमत्येम दोन गाड्या जातील एवढाच ठेवला. बाकी सगल्या गाड्या हाजी अली पर्यंत गप उभ्या. केवढी पेट्रोल बचत आणि पर्यावरनाची हानी तरी किती कमी! पीडब्ल्युडीचे काम एकदम ब्येस बरकां.

आता तुमी म्हनाल की हे रस्त्याच भारुड मी तुम्हाला कशाला सांगत बसलो आहे? कारन याचा दिल्लीशी डायरेक्ट संबंध आहे. अलीकडे सगल्या गोस्ठींचा दिल्लीशी संबंध असतो. दिल्लीच्या मेट्रोचं एक दोन पुल परवा पडलं तर आमचं पुन्याच नगरसेवक म्हनायला लागल की पुन्यातली मेट्रो नको. असा दिल्लीचा संबंध असतो प्रत्येक गोस्ठीत. तर काय आहे की आपले मनमोहनसिंहजी आहेत ना, प्रैम मिनिस्टर हो! त्यांच्या मंत्रीमंडलांत एक एकदम भारी मानूस आहे. म्हनजे तशी खूप भारी मंडली आहेत, पन हे कमलनाथजी आहेत ना ते लैच भारी आहेत.

हे कमलनाथजी विलेक्शनच्या आधीच्या मंत्रीमंडलात पन होते कॉमर्स मंत्री म्हनजे वानिज्य मंत्री हो! त्यांनी म्हने त्या युरोप-अमिरिकेच्या सरकारला ठनकावून दिले की तुम्ही तुमच्या देशातल्या शेतकर्‍यांना पैशाची मदत करता व त्यांचा शेतमाल आमच्या देशात स्वस्तात पाठवायला बघता. आमाला आमचे शेतकरी मारायचे नाहीत. तुमी शेतकर्‍यांची मदत बंद करा आनि मगच शेतमाल आमच्या देशात पाठवा. थोडक्यात म्हनजे कमलनाथजींनी या देशांचा सगला प्लान उधलूनच लावला की. असा स्ट्रॉंग मानूस आहे कमलनाथजी. आता थोड्याफार शेतकर्‍यांनी त्या नागपुरकडे आत्महत्या केल्या म्हनतात. पन त्यात कमलनाथजींचा काय संबंध?

तर नवीन मंत्रीमंडल केले ना मनमोहनसिंहजींनी, तेंव्हा त्यांनी कमलनाथजींना विचारले की तुम्हाला कोनते काम देऊ. कमलनाथ तयार गडी. त्यांनी असा पेच टाकला की विचारू नका. ते म्हनले की मला कोनतेतरी अशक्य काम द्या. आता आला का प्रैम मिनिस्टरपुढे प्रॉब्लम? पन मनमोहनसिंग त्यांच्याहून सवाई. ते म्हनले “तुमी असे म्हनाल असे मला वाटलेच होते. मी तुमाला रस्ते बांधायचा मंत्री बनवतो”. आता तुमी म्हनाल यात कठीन काय आहे? पन हे काही बैलगाडी छाप रस्ते बनवायचे काम नाही. तुमी पुन्याहून बॉम्बेला त्या गडकरीसाहेबांनी बनवलेल्या रस्त्याने गेले का कधी? एकदम ब्येस रस्ता आहे. प्वाटातलं पानी सुद्धा नाही हलत. कमलनाथजींचे हे सगले नवे रस्ते असे शिमेटचे, खूप ठिकानी हवेतून जानारे आणि एकदम कडक असे रस्ते होणार आहेत. मुख्य म्हनजे गेल्या पन्नास वर्षात हे रस्त्यांचे एवढ्या मोठ्या प्रमानातले काम कोनत्याच मंत्र्याला पन करता आलेले नाही.

या लै भारी मानसानं दोन महिन्यातच आपला प्लान पन जाहिर केला की. पुढच्या वर्सभरात दहा हजार कोटी रुपये, म्हंजी एकावर किती झीरो हो? खर्च करून 12 हजार किलोमीटर रस्ते बनवणार म्हनतात कमलनाथजी. पैशाचा काही प्राब्लेम नाही पन म्यानिजर लोकांची कमी पडल असं वाटत त्यांना.

कमलनाथजी बनवा तुम्ही जरूर रस्ते! आपला देश लै दिवस गरीब राहिला आहे. पण म्या आपल्या अडानी मानसाची एक कालजी सांगू तुम्हाला. तुमची नवीन रस्त्यांची जाली तुमी म्हनता तशी तुमी तयार कराल हो! पन हे सगले रस्ते आमच्या बैलगाडी छाप रस्त्यांना झ्याक जोडले जातील हे बघा. आमच्या पुन्याबॉम्बेच्या पीडब्ल्युडीसाहेबांसारखे नका करू. नाहीतर तुमची रस्त्याची जाली राहील हवेतच् आणि आमी आपले जात राहू आमच्या बैलगाडी छाप रस्त्यांवर, खडम! खडम!

14 जुलै 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: