.
Travel-पर्यटन

असे प्रवासी


मागच्या वर्षी, माझ्या दोन बहिणी सिंगापूर बघण्यासाठी म्हणून मुद्दाम आल्या होत्या. त्या इकडे तिकडे फिरत असताना, त्यांच्याबरोबर मीही, मला प्रिय असलेल्या इथल्या एक दोन प्रेक्षणीय स्थळांना परत भेट देण्याची संधी घेतली होती. त्यापैकी एक स्थळ होते इथले प्रसिद्ध बोटॅनिकल गार्डन. तो टूरिस्ट हंगाम असल्याने, बोटॅनिकल गार्डनमधे बरीच गर्दी होती. बस भरभरून टूरिस्ट येत होते. बोटॅनिकल गार्डनमधे फिरत असताना, मुख्यत्वे चार देशांचे प्रवासी ग्रूप्स तिथे येताना दिसत होते. ऑस्ट्रेलियन, जपानी, चिनी व आपले देशी. आपला देशी लोकांचा ग्रूप येतो आहे हे लांबून सुद्धा ओळखता येत होते. सिंगापूरच्या गरम आणि दमट हवेत, डेनिमसारख्या जाड कापडाच्या जीन्स व त्यावर डेनिमचीच जॅकेट्स, भर दुपारच्या उन्हात, फक्त भारतीयच घालू जाणेत. बहुतेक मोठे पुरुष, पोट सुटलेले, अंगावर अतिशय महागाचे पण त्यांना अजिबात न शोभणारे, सिंथेटिक कापडाचे कपडे घातलेले असेच दिसत होते. बहुतेक बायका बेढब, जाड आणि फेंगड्या चालणार्‍या दिसत होत्या. त्यांनी घातलेले अघळपघळ कपडे, प्रवास, बसमधून चढणे, उतरणे किंवा चालत कुठे जाणे या साठी अजिबातच योग्य वाटत नव्हते. सगळ्यांची तोंडाने मोठमोठ्याने बडबड चालूच होती. पुरुषांच्या तोंडात पान, मुलांच्या हातात पोटॅटो चिप्सचे भले थोरले पुडे, तोंडात च्युइंग गम, गळ्यात महाग कॅमेरे आणि पायात फ्लॅशी बूट. सगळी अगदी ध्याने दिसत होती. लोकांची नजर चुकवून थुंकणे, हातातल्या कागदाचा बोळा करून रस्त्यावरच टाकणे हे प्रकार चालूच होते. बरोबरचा गाईड काहीतरी माहिती सांगत असताना या ग्रूपमधल्या बायका आपापसात, बहुदा कुठे काय स्वस्त मिळते, याची चर्चा करत असलेल्या दिसत होत्या. या बायका प्रेक्षणीय स्थळे पहायला न येता, फक्त शॉपिंग करून का परत जात नाहीत असे मला नेहमी वाटते. त्या दिवशी, माझ्या जस्ट पुण्याहून आलेल्या बहिणींना सुद्धा राहवले नाही. “आपले लोक किती बावळट दिसतात नाही इथे? मान खाली घालाविशी वाटते अगदी! ” अशी कॉमेंट त्यांनी केलीच.

भारतीय लोक, उपखंडाच्या बाहेर, एखाद्या ग्रूप मधे असले की असेच दिसतात, हा माझा जुनाच अनुभव आहे. त्यामुळे मी काहीच बोललो नाही. 1975 साली मी अशाच एका, पण फक्त पुरुषांच्या, ग्रूपमधून युरोपप्रवास केला होता. रोमच्या विमानतळावर उतरून आमच्या साठी आलेल्या एका झकपक बसमधे आम्ही शिरलो होतो. तेंव्हाच आम्हाला प्रथम, प्रगत देशांमधली शिस्त आणि स्वच्छता यांची जाणीव, आमच्या बसच्या चालकाने परखड शब्दात करून दिली होती. बसमधे प्रत्येक आसनाच्या ओळीत प्लॅस्टीकच्या बादल्या ठेवलेल्या होत्या त्यातच कचरा टाकणे. दिवसभराच्या बसप्रवासात आपल्याला लागणारे सर्व सामान हातातल्या पिशवीत ठेवणे. (कारण बाकीचे सामान खाली असलेल्या जागेत ठेवले जाते व एक बॅग काढण्यासाठी 40 ते 50 बॅग़ा काढाव्या लागतात.) जागा दिसली की न थुंकणे याबाबतच्या त्याच्या सूचना अपमानास्पद वाटल्या तरी आपल्या गचाळ सवयींमुळे देणे आवश्यकच होते. भारतात असताना, कुठल्याही प्रसंगानुरुप व हवामानास योग्य व इतके छान दिसणारे  कपडे वापरणारे भारतीय, बाहेर देशात गेले की असे विचित्र कपडे का घालतात? हे मला तरी अजूनही न सुटलेले कोडे आहे.

विमान प्रवासांत सुद्धा देशी प्रवासी लगेच ओळखू येतो. पुरुष असला, तर फुक़ट मिळते म्हणून प्रमाणाबाहेर दारू पिणे. मोठमोठ्याने गप्पा मारणे हा आपला विमानप्रवासातला जन्मसिद्ध हक्क आहे असेच तो मानतो. या उलट स्त्री प्रवासी असली की तिला जेवण सर्व्ह झाले की बघावे. प्रत्येक गोष्टीला ती इतकी नाक मुरडत जेवते की ती घरून डबा घेऊन का आली नाही असे वाटत राहते. आपली मुले सुद्धा विमानात इतकी रडारड, हट्ट आणि पळापळ करतात की विचारू नका. मी एवढ्या केलेल्या विमान प्रवासात कधीही चिनी, आफ्रिकन किंवा गोरी मुले असा दंगा करताना बघितलेली नाहीत.

या सगळ्या कारणांमुळेच भारतीय प्रवासी ग्रूप, जगातले सर्वात वाईट प्रवासी असणार, असे माझे प्रामाणिक मत होते. दोन दिवसांपूर्वी TNS Infratest या आंर्तराष्ट्रीय सर्व्हे करणार्‍या एका संस्थेने जगातील सर्वात वाईट आणि सर्वात चांगले प्रवासी कोण आहेत या त्यांच्या सर्व्हेचे निकाल जाहिर केले तेंव्हा माझी खात्रीच होती की भारतीय प्रवासी सगळ्यात शेवटच्या स्थानावर असणार.

माझा अंदाज पूर्णपणे चुकीचा ठरला. या सर्व्हेप्रमाणे जगातले सर्वात खराब प्रवासी फ्रेंन्च लोक आहेत. फ्रेन्च प्रवासी, आपलेच घोडे पुढे ढकलणारे, चिकट, उद्धट आणि तक्रारखोर असतात. ते कुठल्याही प्रकारची अडचण सोसण्यास तयार नसतात आणि फक्त फ्रेंच भाषेतच बोलत रहातात. फ्रेंन्च लोकांच्या या बाबतीतील तोडीस तोड लोक हे स्पॅनिश आणि ग्रीक आहेत. अमेरिकन प्रवासी या यादीत आठव्या स्थानावर येतात. हे जरी खर्चाच्या बाबतीत उदार असले तरी ते अत्यंत आरडा ओरडा करणारे, गबाळे, सर्वात तक्रारखोर आणि सगळ्यात खराब वेषात नेहमी असतात.

या उलट सर्वात चांगले प्रवासी, जपानी असतात. ते शांततेने अणि सभ्यपणे वागणारे, कमीतकमी तक्रारी करणारे आणि स्वच्छताप्रिय असतात. कॅनेडियन, जर्मन आणि स्विस प्रवासी हे जपानी लोकांच्या खालोखाल चांगले प्रवासी आहेत. ऑस्ट्रेलियन लोक सहाव्या क्रमांकावर येतात.

या सर्व्हेचे पहिले दहा क्रमांक आणि शेवटचे तीन क्रमांक, फक्त प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यात भारतीय व चिनी प्रवासी कुठेच नाहीत. त्यामुळे ते मधेच कुठेतरी असले पाहिजेत. पहिल्या दहा क्रमांकात(यात 13 देश आहेत) देशी मंडळी नाहीत हे फारसे आश्चर्य करण्यासारखे आहे असे मला वाटत नाही. पण ती शेवटच्या तीन क्रमांकांत नाहीत, ‘हे ही नसे थोडके’ असेच म्हणावेसे वाटते.

13 जुलै 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “असे प्रवासी

 1. खरे आहे…म्हणजे मी काही परदेश प्रवास केलेला नाहीय पण आपले लोक कसे वागत असतील त्याची कल्पना करता येऊ शकेल. आणि जीन्स म्हणजे काही आधुनिकतेची ’परमावधी’ नाही. थोडक्यात ’लाऊड’ , भडक, आक्रस्तळेपणा करणारी मंडळी म्हणजे ’भारतीय’ असा समज व्हायला नको इतरांचा!

  Posted by आरती | जुलै 13, 2009, 6:17 pm
 2. चंद्रशेखरजी,
  आपलं भारतीय लोकांबद्द्लचं हे निरीक्षण अगदी सही न सही बरोबर आहे.शिस्त तर नाहीच नाही पण परदेशी गेले की जणू फारच मोठी लढाई जिंकल्याच्या थाटात ही लोकं वावरत असतात.रेस्टॉरंटमध्ये बुफे असेल तिथे हावरटासारखे जेवढे म्हणून पदार्थ डिशमध्ये भरुन घेता येतील तेवढे घ्यायचे भले मग कचर्यांत टाकावे लागले तरी बेहत्तर हे तर नेहेमीच दिसणारं दृष्य! अमेरीकेसारख्या देशांत बौध्दीक क्षेत्रांत आपल्या लोकांनी इतकं नांव कमावलं असलं तरी रोजच्या काही सवयी मात्र कुत्र्याच्या शेपटासारख्या वाकडया त्या वाकड्याच्…किंवा झाड दिसलं कि जसा आपसुक कुत्रा तिकडे वळतो तसंच आपल्यापैकी अनेक लोकांच होतं असं म्हणायला हरकत नाही.

  Posted by anjali | जुलै 14, 2009, 3:52 सकाळी
 3. बर झाल, जे – जे परदेशी, ते – ते चांगल हा समज दूर व्हायला ह्या ब्लोग्ची मदत होइल. परदेशी लोक दिवसें दिवस अनघोळ देखिल करत नाहित हे मी पाहिल आहे … शिवाय आपल्या भाषेचा पराकोतीचा अभिमान (गर्व?) …

  http://asachkahitari.wordpress.com/

  Posted by inkblacknight | जुलै 16, 2009, 1:47 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 385 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: