.
History इतिहास

जबरदस्त किंमत


चीन हा देश, जगातील एक महासत्ता म्हणून आज मानला जातो. औद्योगिक प्रगतीबरोबरच सैन्यदले व हत्यारे यांच्याबाबतीत सुद्धा चीन अतिशय प्रबळ असे राष्ट्र आहे. ही महासत्ता बनण्याच्या दृष्टीने चीनने  1964 सालच्या 16 ऑक्टोबरलाच पहिला अणुस्फोट घडवून आणून पहिले पाऊल टाकले होते. तेंव्हापासून 1996 सालापर्यंत, जवळ जवळ चाळीस अणुस्फोट, चीनने आपल्या शिंजियांग प्रांतातल्या लोप नुर वाळवंटात घडवून आणले होते. यापैकी बहुतेक (हायड्रोजन बॉम्बच्या स्फोटासह) जमिनीच्या पृष्ठभागाच्यावर म्हणजे हवेत घडवले गेले होते.

china_test

चीनमधील कम्युनिस्ट सरकारने या स्फोटांमुळे शिंजियांग प्रांतात रहाणार्‍या उघिर लोकांवर काही दुष्परिणाम झाले असण्याची शक्यताच सतत नाकारली आहे व हे सगळे प्रकरण पूर्णपणे दडपण्यात आले आहे. 2008 साली प्रथम, चिनी सरकारने या स्फोटांच्या कार्यक्रमात, ज्या सैनिकांनी प्रत्यक्ष रित्या भाग घेतला होता त्यांना आर्थिक मदत देत असल्याचे मान्य केले व या अणुस्फोटामुळे सर्वसामान्य नागरिकांच्यावर दुष्परिणाम झाले असण्याच्या शक्यतेला एक प्रकारची अप्रत्यक्ष मान्यताच दिली. अर्थात कोणत्याच नागरिकाला कसलीच आर्थिक मदत कधीही मिळाली नाही.

Lup_Nur

डॉक्टर अन्वर तोहती हे शिंजियांग प्रांतातल्या उघिर लोकांपैकी एक वैद्यकीय डॉक्टर आहेत. 1973 साली ते प्राथमिक शाळेत होते. त्यांना चांगले आठवते की तेंव्हा तीन दिवस वार्‍याचा किंवा वादळाचा मागमूस सुद्धा नसताना सतत नुसती धूळ हवेतून जमिनीवर पडत होती. आकाशात चिटपाखरू सुद्धा दिसत नव्हते. सूर्य, चंद्र हे ही दिसत नव्हते. आपल्या शिक्षिकेकडे त्यांनी जेंव्हा विचारणा केली होती तेंव्हा, शनी या ग्रहावरील वादळामुळे असे होते आहे हे उत्तर त्यांना मिळाले होते व अर्थातच त्यांचा त्या उत्तरावर विश्वास पण बसला होता. यानंतर कुमार वयात तोहती यांना आपल्या देशाने आपल्या प्रांताचा इतकी महत्वाची प्रगती करण्यासाठी उपयोग केला होता ही गोष्ट अतिशय अभिमानाची वाटली होती. आपल्या डोक्यावर पडलेली धूळ ही आपल्याच प्रांतात घडविलेल्या गेलेल्या अणुस्फोटामुळे उडालेली रेडियोऍक्टिव्ह धूळ आहे, ही गोष्ट त्यांच्या लक्षात येण्यास आणखी बरीच वर्षे जावी लागली होती.

अन्वर तोहती जेंव्हा मेडिकल डॉक्टर झाले तेंव्हा त्यांच्याकडे येणार्‍या रुग्णांमधे, गंडमाळा, फुफ्फुसांचा कर्करोग, रक्ताचा कर्करोग, डिजनरेटिव्ह डिसऑर्डर्स आणि व्यंगदोष घेउन जन्माला येणारी बालके यांचे प्रमाण इतके जास्त होते की या विषयावरची आपली मते त्यांना बदलावीच लागली. त्यांच्याबरोबरच्या बहुतेक डॉक्टरांनाही हे सर्व अणुस्फोटांमुळेच होत असावे असे वाटत होते परंतु या विषयावर काहीही संशोधन करण्यास पूर्ण बंदी घालण्यात आलेली होती.

डॉक्टर तोहती 1998मधे तुर्कस्तानला स्थायिक झाले व त्यानंतरच त्यांना या विषयावर आरोग्यविषयक संशोधन करण्यास मुभा मिळाली. प्रथम त्यांनी चीनमधे प्रवासी म्हणून गेलेल्या काही ब्रिटिश डॉक्युमेंटरी चित्रपट बनविणार्‍या लोकांची मदत घेऊन शिंजियांग प्रांतामधल्या आरोग्यविषयक नोंदीचे गुप्तपणे चित्रिकरण केले. यात अतिशय धक्काजनक माहिती उघडकीस आली. चीनच्या सरासरीपेक्षा शिंजियांग प्रांताची कर्करोग्यांची सरासरी, 30 ते 35 टक्के आधिक होती.

जपानमधल्या सोपोरो मेडिकल विद्यापीठात कार्य करणारे डॉ. जुन टाकाडा यांनी 1990 मधेच कझाकस्तानमधील सरकारच्या मदतीने सोव्हिएट अणुस्फोटांच्या वेळी जमा केलेल्या माहितीच्या आधारे, चिनी अणुस्फोटांमुळे काय परिणाम झाले असावेत याचे एक मॉडेल संगणकावर तयार केले होते. या मॉडेलप्रमाणे शिंजियांग प्रांताची लोकसंख्या व त्याचा विस्तार व व्याप्ती याचा विचार करून कमीत कमी 194000 माणसे मृत्युमुखी पडली असावी. तसेच 12 लाख लोकांना प्रमाणाच्या बाहेर असलेल्या रेडियोऍक्टिव्ह उत्सर्जनाला तोंड द्यावे लागल्याने कर्करोग, ल्युकेमिया व अर्भकांना आलेली जन्मजात व्यंगे यांचे शिकार व्हावे लागले असावे असा अंदाज केला होता. चिनी सरकार या बाबतीतली कोणतीही माहिती प्रसिद्ध करण्यास कधीच तयार नसल्याने प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे हे समजणे अशक्य आहे. डॉक्टर तोहतींच्या मते या लोकांना कसलीच मदत कधीच मिळालेली नाही. व ते सर्व येणार्‍या मृत्युची वाट बघण्याशिवाय दुसरे काहीही करू शकत नाहीत.

डॉक्टर तोहती आणि डॉक्टर टाकाड यांनी आता सोपोरो विद्यापीठात हे दुष्परिणाम तपासण्यासाठी लोप नुर प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाचे यश त्यांना कितपत खरी माहिती मिळते यावरच अवलंबून आहे.

हुकुमशाही शासनात निरपराध नागरिकांचा कसा बळी जातो व ते कसे हतबल असतात याचे हे आणखी एक उदाहरण अतिशय बैचैन करणारे आहे.

11 जुलै 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: