.
History इतिहास

सत्तांतर


इ.स. 1713 मधे छत्रपति शाहू महाराजांनी, बाळाजी विश्वनाथ भट यांची पंतप्रधान पेशवा म्हणून नियुक्ती केली व श्रीवर्धनाच्या भट घराण्याकडे, छत्रपति शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या, हिंदवी स्वराज्याची सूत्रे आली. भट किंवा पेशवा घराण्याच्या पांच पिढ्यांनी हे राज्य वाढावे म्हणून स्वत:च्या जिवाची पर्वा न करता जे प्रयत्न केले तो इतिहास आपणा सर्वांस ज्ञात आहेच. या घराण्यातील पेशवा पदावर नियुक्त झालेले बाजीराव रघुनाथराव यांना 1817 मध्ये इंग्रजांबरोबरच्या लढाईत शेवटी पराजित व्हावे लागले व हे हिंदवी राज्य इंग्रजांच्या घशात गेले हा या इतिहासाचा शेवटचा कटू अध्याय आहे.

श्रीमंत बाजीराव रघुनाथ पेशवे यांच्या नावाची जेवढी निंदा नालस्ती झाली आहे तेवढी मराठी राज्याशी संबंधित कोणत्याही व्यक्तीची झालेली नसेल. कोणी इतिहासकार त्यांना पळपुटे बाजीराव म्हणतो तर कोणी क्रूरकर्मा. कोणी त्याने इंग्रजांच्या आहारी जाउन त्यांना राज्याचे दान दिले असे म्हणतात. पानिपतच्या युद्धात, मराठी सैन्याला बाजीरावांच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा पराभव पत्करावा लागला होता आणि ते सैन्य रणांगणात अक्षरश: विरले होते. त्यातल्या कोणा सेनानीला कोणी पळपुटे  म्हणाले नव्हते. मराठ्यांच्या इतिहासामधल्याच एका प्रसिद्ध व्यक्तीने अनेक क्रूरकर्मे केल्याची इतिहासात नोंद आहे. त्याला कोणी क्रूरकर्मा म्हणल्याचे ऐकिवात नाही. मग बाजीरावांच्याच वाट्याला ही सर्व विशेषणे कां यावीत?

थोरले बाजीराव, नानासाहेब किंवा थोरले माधवराव पेशवे यांच्या पंक्तीला बाजीराव रघुनाथराव या पेशव्यांना नेउन बसवावे असे कोणीही इतिहासप्रेमी कधीच म्हणणार नाही. आपल्या वडीलांच्या व स्वत:च्या अपकर्मांचे ओझे या पेशव्याच्या खांद्यावर सतत होतेच. बाजीरावाचे वडील रघुनाथराव यांच्या आज्ञेवरून झालेला नारायणरावाचा खून, मराठ्यांच्या राजकारणात त्यांनीच इंग्रजांना दिलेला प्रवेश, सवाई माधवराव पेशव्यांनी केलेल्या आत्महत्येनंतर, गादीवर येण्यासाठी इंग्रजांची स्वत: बाजीरावाने घेतलेली मदत व दौलतराव शिंद्यांनी त्याच्या नावावर केलेले अत्याचार या सगळ्या घटना त्याच्या विरूद्धच जातात.

1796 मधे सवाई माधवराव पेशव्यांनी केलेल्या आत्महात्येनंतर, नाना फडणवीसांचा पुण्याच्या कारभारावरचा प्रभाव हळूहळू कमी होत गेला व 1799 मधे त्यांचे देहावसान झाले. यानंतर पुढची 20 वर्षे या पेशव्याने स्वत:च्या हिंमतीवर मराठ्यांचे शासन चालवले ही गोष्ट विचारात घेतलीच पाहिजे. एलफिस्टन सारख्या अतिशय मुरब्बी आणि धोरणी नेत्यामुळे, इंग्रजांची पुण्याच्या राजकारणात सतत वाढत चाललेली लुडबुड आणि अरेरावी, घरभेदी आणि आपसात भांडत रहाणारे सरदार आणि खर्च न पेलवल्यामुळे आलेला कर्जबाजारीपणा व सावकार्‍यांची अरेरावी या सगळ्यांनी मराठ्यांचे शासन पोखरून गेले होते. या सर्व गोष्टींना या पेशव्याने आपल्यापरीने तोंड दिले होते ही गोष्ट मान्य केलीच पाहीजे. मराठ्यांचे राज्य राखण्यासाठी त्याने शर्थीचे प्रयत्न केले, अनेक कारस्थाने केली, दुखावलेल्या मराठी सरदारांना परत वळविण्याचे आटोकाट प्रयत्न केले. मराठी आरमार परत सुस्थितीत आणण्याचा त्याने प्रयत्न केला. इंग्रजांबरोबरचे संबंध, त्यांच्या प्रमाणाच्या बाहेरील अरेरावीने, जेंव्हा नको तितके ताणले गेले तेंव्हा, आपल्या बापू गोखले या अतिशय शूर अशा  सेनानीच्या मदतीने, इंग्रजांच्या विरूद्ध युद्ध पुकारण्याचे धाडसही याच बाजीरावाने दाखविले व यासाठी, खालावलेल्या आर्थिक परिस्थितीतसुद्धा, त्याने 1 कोट रुपये सैन्य उभारणीसाठी आपल्या सरदारांना दिले. प्रत्यक्ष लढाईत, त्याचा सेनापति त्याने दूर जावे म्हणून विनंति करत असतानासुद्धा, तो आपल्या सैनिकांच्या समवेतच राहिला.

या पार्श्वभूमीवर, या पेशव्याच्या वाट्यालाच एवढी निंदानालस्ती का आली याचे मला नेहमीच कुतुहुल वाटत आलेले आहे. जालावर मध्यंतरी मला काही संदर्भग्रंथ सापडले. त्यातून मिळालेल्या माहितीमुळे थोडाफार खुलासा होतो असे मला वाटते आहे.

प्रसार माध्यमाचा प्रभावी उपयोग

इ.स 1800च्या आसपास युरोपमधे जाहिरनामे (Political Manifesto) काढून लोकांची मने आपल्याकडे वळवून घेण्याची पद्धत चांगलीच रूढ झाली होती. 1814 मधे इंग्रजांनी टॅलिरॅन्ड या फ्रेंच फितुर मुत्सद्याला आपल्याकडे वळवून, नेपोलियनच्या विरूद्ध एक जाहिरनामा काढून घेतला होता. या जाहिरनाम्याने फ्रेंच लोकांचे मत नेपोलियनच्या विरूद्ध जाण्यास बरीच मदत झाली होती. त्या काळचे हे एक प्रसार माध्यमच होते असे म्हणता येईल. शत्रूबद्दल यथेच्छ निंदानालस्ती करणे, त्याच्यावर खोटेनाटे आरोप ठेवणे व त्याला अनेक दुर्गुण चिकटवणे या साठी हे जाहिरनामे विशेष उपयोगी होते. युरोपमधले हे शस्त्र इंग्रजांनी बाजीरावाविरुद्ध  फेब्रुवारी 1818 मधे प्रथम  वापरले. इंग्रजांबरोबरचे संबंध पूर्ण बिघडल्यावर पुण्यात रहाणे धोकादायक आहे याची जाणीव झाल्यावर बाजीराव पुणे सोडून गेला. या संधीचा फायदा घेऊन हा जाहिरनामा इंग्रजांनी प्रसिद्ध केला. 11 फेब्रुवारी 1818 रोजी प्रसिद्ध केलेल्या या जाहिरनाम्यावर कंपणी सरकारचा शिक्का असून पॉटिंजर नावाच्या अधिकार्‍याची सही आहे. या जाहिरनाम्यात बाजीरावाविरूद्ध अनेक आरोप आहेत. त्यातील काही असे आहेत.

1.बाजीरावांच्या राज्यात सतत बंडे, बखेडे होत राहिले. ते न मिटविता बाजीराव पळून गेले. पुढे केवळ कंपणी सरकारच्या मैत्रीमुळे त्यांचा हुकुम जारी झाला व सर्व बंडे व दुष्काळ मिटून आबादी झाली.

2. आबादीमुळे महसुल खूप जमा होऊ लागला. पण तो सरकारात जमा न करता स्वत:च्या खर्चाकरता व ऐषारामासाठी वापरला.

3.गंगाधरशास्त्र्यांचा, त्रिंबकजी डेंगळे याचे मार्फत खून घडवून आणला व नंतर कंपणी सरकारने मागितल्यावर त्रिंबकजीला त्यांचे ताब्यात देण्यास नकार दिला.

4. बाहेरील सरदारांना पत्रे पाठवून सैन्ये तयार ठेवण्यास सांगितले व कंपणीकडून मिळालेला पैसा त्यांना या साठी पाठवला.

5.पेंढार्‍यांचा बीमोड करण्यासाठी कंपणीच्या सैन्याला बाहेर जाणे भाग पाडले व ही संधी साधून स्वत:चे सैन्य तयार केले, इंग्रज छावणी व अधिकार्‍यांचे बंगले जाळले.

6. मुंबईहून येणार्‍या दोन इंग्रज सरदारांना मारले.

7. कंपणी सरकारचा असा निश्चय झाला आहे की बाजीराव मराठी राज्याच्या उपयोगाचे नाहीत व या साठी मोठी इंग्रजी फौज त्यांचे मागे पाठविली आहे.

यानंतर जाहिरनाम्यात, आता कंपणी सरकारचा अंमल चालू झाला असून कोणीही बाजीरावाच्या पक्षात जाऊ नये व गेल्यास कडक सजा होईल वगैरे ताकीद देण्यात आलेली आहे.

त्यावेळच्या मराठी सरदारांनी व मातबरांनी या जाहिरनाम्याकडे फारसे लक्ष दिले नाही. कारण कंपणी अंमल म्हणजे मराठी राज्याची अखेर व पारतंत्र्य याची पूर्ण जाणीव त्यांना होती. पण दुर्दैवाने, बाजीरावाच्या मराठी शासनाकडे या जाहिरनाम्याला समर्थपणे सडेतोड उत्तर तयार करून दुसरा जाहिरनामा काढू शकेल अशी काही यंत्रणाच नव्हती. त्यामुळे या जाहिरनाम्याला काही जाहिर उत्तरच दिले गेले नाही व फक्त या आरोपपत्राचा, जुन्या कागदपत्रांत एक महत्वाचा कागद, म्हणून समावेश झाला.  यानंतर 4 एप्रिल 1818 रोजी सातार्‍याच्या महाराजांकडून असाच एक जाहिरनामा इंग्रजांनी काढून घेतला, या जाहिरनाम्याप्रमाणे बाजीरावाचे पेशवे पद काढून घेण्यात आले होते व त्याला बंडखोर घोषित करण्यात आले होते. या नंतर ब्रम्हावर्तास बाजीरावाकडून इंग्रजांनी 4 जून 1818 रोजी शरणागती लिहून घेतली. या सर्व कागदपत्रांचा बाजीरावाची निंदा नालस्ती करण्यासाठी इंग्रज इतिहासकारांनी भरपूर वापर करून घेतला.

इतिहासात बाजीरावाची जी छबी निर्माण झाली त्याचे हे एक प्रमुख कारण असावे अशी शक्यता वाटते.

सातार्‍याचे प्रतापसिंह महाराज

शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ, भट घराण्याने मराठी राज्याचे पंतप्रधान पेशवे म्हणून राज्याची सूत्रे चालवली. जरी त्यांच्या हातात खरी सत्ता असली तरी ती सत्ता एका सांकेतिक अधिष्ठानातूनच आलेली होती. राज्याचे राजप्रमुख पद हे छत्रपति शिवाजी महाराजांच्या एका वंशजाकडेच असे. या राजप्रमुखाच्या इच्छेनुसार, पेशवेपद भट घराण्याकडे असे. कोणताही पेशवा या सांकेतिक चौकटीच्या बाहेर कधीच गेला नाही. इंग्लंडचा बादशहा व पंतप्रधान यांच्यातल्या संबंधासारखेच काहीसे हे संबंध होते. फक्त इंग्लंडचा पंतप्रधान लोकानियुक्त असे आणि येथे पेशवेपद वंशपरंपरेने चालून येत होते. बाजीराव रघुनाथराव यांच्या कालखंडात प्रतापसिंह महाराजांच्याकडे हे राजप्रमुख पद होते.

इ.स. 1818 च्या सुरवातीला बाजीरावांचे इंग्रजांबरोबरचे संबंध बिघडले. परंतु याच्या दोन ते तीन वर्षे आधीपासून प्रतापसिंह महाराज व इंग्रज यांच्यात, बाजीरावांच्या अपरोक्ष, गुप्त खलबते होत होती. रंगो बापुजी, नरसु काकडा या सारख्या, स्वत:च्या पोळीवर तूप ओढून घेउ इच्छिणार्‍या, काही मंडळींच्या मार्फत, माउंट स्टुअर्ट एलफिस्टन व महाराजांचे कारभारी, यांच्यात ही बोलणी चालत. बाजीरावांना याची कल्पना अर्थातच होती पण या बाबतीत थोडीफार असहाय्यता त्यांना जरूर असावी. युद्ध अटळ आहे हे ध्यानात आल्यावर बाजीराव पुणे सोडून निघून गेले व त्यांनी एक अतिशय उत्कृष्ट धोरणात्मक डावपेच आखला. प्रतापसिंह महाराजांची भेट घेऊन त्यांनी महाराजांना गळ घातली की आपणच आपल्या सैन्याचे नेतृत्व करावे व तसे शक्य नसल्यास बाजीरावांना पेशवे पदावरून मुक्त करावे. महाराजांना नाइलाजाने मराठी सैन्याला जाउन मिळावे लागले. यामुळे बाजीरावांची आपल्या सैनिकांचे मनोधैर्य उंचावेल ही अपेक्षा पूर्ण झाली पण महाराजांची इंग्रजांबरोबरची गुप्त खलबते चालूच राहिली.

बाजीराव आणि त्यांचे सेनानी बापू गोखले यांनी पुढच्या महिन्याभर इंग्रजांच्या 3 फौजांशी शर्थीची लढाई केली. पंढरपूर जवळच्या अतिशय निकराच्या युद्धात बापू गोखले मृत्युमुखी पडले व मराठी सैन्याची बरीच हानी झाली या वेळेपर्यंत प्रतापसिंह महाराज बाजीरावाच्या सैन्याबरोबरच होते. या युद्धात पराभव पत्करावा लागल्याने बाजीरावांनी फौजेसह तेथून कूच केले. बाजीराव जातीने महाराजांना बरोबर घेउन जाण्याचा प्रयत्न करीत राहिले परंतु लढाईच्या हातगर्दीत महाराज व त्यांचे थोडे साथीदार तेथून निसटले व इंग्रजांची वाट पहात स्वस्थ बसून राहिले. इंग्रज तुकडीने त्यांना घेरल्यावर त्यांची ओळख पटवून घेतली व रणांगणावरील त्या जागीच नंतर प्रतापसिंह महाराज व जनरल स्मिथ आणि बिलमोअर हे दोन इंग्रज अधिकारी, यांची बैठक झाली व सर्वानुमते खालील गोष्टी मान्य झाल्या.

प्रतापसिंह महाराज

1. आपली एलफिस्टनना भेटण्याच्या आधी भेट झाली. बाकी फौजेने कूच केले तसे आम्हीही करू शकलो असतो. परंतु आपल्या पूर्वसंकेताप्रमाणे तुमची फौज दिसल्यावर बाजीरावांच्या हातून निसटून आम्ही स्वस्थ बसून राहिलो.

2 बाजीराव आपणाशी पाहिजे तसा तह करील परंतु आपण आम्हाला वचन दिले आहे त्याप्रमाणे आम्हाला बाजीरावाच्या हातात देऊ नये.

3. आमचे बोलणे तुम्ही एलफिस्टनला नीट कळवावे.

जनरल स्मिथ यांची उत्तरे

1.बाजीराव यांचे हाती आपणाला आमचा प्राण गेल्याशिवाय देणार नाही एवढे आमचे वचन पक्के आहे.

2 एलफिस्टनची त्वरित भेट घेण्यासाठी सर्वांनी पुण्याकडे कूच करावे.

3.आम्ही शिपाई गडी असल्याने आपले बोलणे एलफिस्टनना आम्ही बरोबरच सांगू. काही फरक करणार नाही.

प्रतापसिंह महाराज आणि इंग्रज यांच्यात काय गुप्त करारनामा झाला होता त्याची पूर्ण कल्पना या बैठकीच्या मुद्यांवरून (Minutes of Meeting) येते. हे लक्षात घेतले पाहिजे की प्रतापसिंह महाराज काही कोणी सामान्य राजे नव्हते. छत्रपति शिवाजी महाराजांच्या गादीवर असलेल्या या राजप्रमुखाचे, महाराष्ट्राच्या जनमानसात त्या वेळी काय स्थान होते हे सांगण्याची आवश्यकताच नाही. अशा व्यक्तीने आपणहून शत्रूच्या स्वाधीन होणे हे दुसर्‍या महायुद्धात, चर्चिल आणि त्यांचे मंत्रीमंडळ  हिटलरशी जीवन मरणाचा लढा देत असताना, इंग्लंडचा राजाने हिटलरबरोबर गुप्त करारनामा करून एका छोट्याश्या जहागिरीसाठी  त्याच्या स्वाधीन होण्यासारखेच होते. प्रतापसिंह महाराजांच्या या कृत्याने, महाराष्ट्रातल्या जनतेचे अक्षरश: कंबरडेच मोडले. जवळजवळ 200 वर्षे स्वराज्यात घालविलेल्या या जनतेला पारतंत्र्यातले जीवन अपरिहार्य असले तरी असह्य वाटणे स्वाभाविकच आहे. इंग्रजांना या मराठी मानसिकतेची चांगलीच कल्पना असल्याने, रायगड, शिवनेरी वगैरे किल्ले आणि शनिवारवाडा हा पूर्णपणे उध्वस्त करून त्यांनी मराठ्यांच्या वैभवाच्या सर्व खुणा मिटवून टाकण्याचा प्रयत्न केला. प्रतापसिंह महाराजाना आपण खूप मोठे राजकारण केले असे कदाचित वाटले असेल. परंतु त्यांची जहागिर जेमतेम 15 ते 20 वर्षेच टिकली. इंग्रजांनी या नंतर त्यांना पदच्चुत करून गंगाकिनारी पाठवून दिले.

प्रतापसिंह महाराजांनी थोड्याच दिवसात, इंग्रजांच्या सांगण्याप्रमाणे, म्हणजे 4 एप्रिल 1818 रोजी एक जाहिरनामा प्रसिद्ध केला व बाजीरावाला पेशवे पदावरून दूर करून एक बंडखोर म्हणून जाहिर केले. यापुढच्या बाजीराव आणि इंग्रज यांच्यामधल्या युद्धाला किंवा तहाला तसे काही महत्व नाही. बाजीरावाशी एकनिष्ठ राहिलेले त्याचे सैन्य आणि इंग्रज फौज यांच्यामधला तो एक लढा केवळ उरला.

काही जुन्या संदर्भांच्यात मिळालेली माहिती संकलन करण्याचा हा माझा एक प्रयत्न आहे. बाजीरावांच्या झालेल्या निंदानालस्तीला किंवा नंतर झालेल्या सत्तांतराला खरे जबाबदार कोण वगैरे प्रश्नांची उत्तरे, मी इतिहासतज्ञ नसल्याने, मला देणे शक्य नाही. पण इंग्रज इतिहासकारांनी जर कोणावर जाणूनबुजून अन्याय केला असेल तर तो दूर करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे असे मला वाटते.

3 जुलै 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

10 thoughts on “सत्तांतर

 1. “पण इंग्रज इतिहासकारांनी जर कोणावर जाणूनबुजून अन्याय केला असेल तर तो दूर करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे असे मला वाटते.”
  अगदी बरोबर …

  विषय अत्यंत योग्य रितीने मांडलाय….

  सवाई माधव राव याबद्दल मी जास्त काही वाचलेले नाही … मराठी मधे काही आहे का लिहिलेला त्यांवर …

  Posted by harshal | जुलै 3, 2009, 3:02 pm
 2. १६७१ मध्ये मराठा साम्राज्याला पानीपत नंतर लागलेली घर-घर थोरले माधवराव पेशवे, महादजी शिंदे आणि इतर जणांनी सावरण्याचा बऱ्याच प्रमाणात यशस्वी प्रयत्न केला पण रघुनाथराव याने कधी इंग्रजांची तर कधी निजमाची मदत घेउन पेशव्याला विरोध केला. बापाचे कर्ज मुलाला फेडावे लागते असे म्हणतात ना … तसे दुसऱ्या बाजीरावला ते फेडावे लागले … असो. म्हणुन १८०० पासून त्याने केलेल्या चूकांकड़े दुर्लक्ष्य करून चालणार नाही. त्यात सर्वात महत्वाचा १८०२ चा तह आणि शिन्द्यांबरोबर हात मिळवून होळकरला केलेला विरोध … !!!

  Posted by rohan | जुलै 3, 2009, 3:11 pm
  • आपण म्हणता ते अगदी योग्य आहे व माझ्या लेखात मी त्याचा उल्लेखही केलेला आहे.

   Posted by chandrashekhara | जुलै 3, 2009, 3:18 pm
 3. छत्रपति प्रतापसिंह हे फ़क्त नाममात्र होते आणि पूर्णपणे इंग्रजांच्या आहारी होते. ते काम ‘एलफिस्टन’ चा उजवा हात ‘ग्रांट डफ’ याने बरोबर पार पाडले. खडकीच्या लढाईमध्ये मराठा फौज स्वस्थ न बसता पूर्ण ताकदीने हल्ला करत असती तर इंग्रज हरले असते पण त्यांनी वेळ निरर्थक दवडला. बाजीराव दूसरा याच्याकड़े निर्णायक निर्णयशक्ती निश्चित कमी होती हे नक्की…

  असो .. मराठेशाही / पेशवेशाहीला १७८३ पासून लागलेली घर-घर कधी-न-कधी संपायचीच होती. दुसऱ्या आंग्ल – मराठा युद्धात ते दिसलेच होते.

  Posted by rohan | जुलै 3, 2009, 3:25 pm
 4. atishay sundar lekh !! bajiravabaddal ek navin drushtikon milala.
  apala rajya apan sarvani milun ghalavala … ekta peshwa jababdar nahi tyala
  he patala.
  dhanyavaad!!

  -koustubh,

  Posted by sundar lekh | जुलै 10, 2009, 11:52 सकाळी
 5. atishay sundar lekh. attaa paryant Baajiraav peshavyaane(2) maraathi raajya budavale yevadhech maahit hote. pan te budataanaa to peshavaach navataa he aapalyaa lekhaamule kalaale. tyaach barobar baakichaa itihaasahi kalaalaa…
  thank you very much.

  Prasad

  Posted by prasad | जुलै 10, 2009, 2:58 pm
 6. 1 number lekh lihila aahe.sarv lokana he kalale pahije je ki Bajirao peshva (2) la palpute bajirao mahnatat.
  mi pan hech mahanat hoto.
  thank you so much.

  Posted by Abhijit Malkhare | सप्टेंबर 30, 2009, 11:30 pm
 7. 1 number lekh lihila aahe.sarv lokana he kalale pahije je ki Bajirao peshva (2) la palputa bajirao navata.
  mi pan hech mahanat hoto.
  thank you so much.
  mi mahanato sarv marathi ekch britist sarkar ne tyanchi mane valavali
  hoti,aamish dakhun.
  chuka manasakadun nahi honar tar mag konakadun honar,

  Posted by Abhijit Malkhare | सप्टेंबर 30, 2009, 11:34 pm
 8. Dusrya Bajirao baddal tumhala marathit kahi wachaiche asel tar n. s. Inamdar chi “Mantravegla” hi kadambari aahe. Pan tyat khara itihas kami an itar masala thoda jast aahe.
  Prastut lekhat lekhkane mhatle ki tyanni 20 varsh satta chalavli, pan itithasik purave baghta, britishanni tevdhe diwas wat baghitli. Tyanni saglya bajune aapla shikanja haluhalu kasat anla.
  Bajirao la yachi kalpana hothi, tya pramane lekhkane sangitle tase tyane prayatn dekhik kele pan to paryant wel nighun geli hothi. Kolkatta, Madras ithe Engrajanni apla majbut basthan basavle hothe. Tyanchi army adhunik arms sobat sajj hothi, an marathani shashtranchya babtit kadhich parrashtransobat vyawahar kela nahi. Tyamule britishanchya modern arms shi mukabla karnyachi marathyanchi takat navhti.

  Posted by Amol Sande | मार्च 15, 2011, 4:36 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 385 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: