.
Pen Sketch

वर्दे गुरुजी


माझी मोठ्या आत्याबाई, एका प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून काम करत असत. शिक्षकांना रहाण्यासाठी, संस्थेने आवाराच्या एका कोपर्‍यातच, एक चाळवजा दगडी इमारत बांधलेली होती. त्याला शिक्षक चाळ असे म्हणत. प्रत्येक बिर्‍हाड, आगगाडीच्या डब्यांसारख्या जोडलेल्या, तीन खोल्यांचे असे. माझ्या आत्याचे बिर्‍हाड अगदी कोपर्‍यातले होते. मे महिन्याच्या सुट्टीत मी पुष्कळ वेळा आत्याकडे रहायला जात असे. ही संस्था तशी गावापासून बरीच लांब असल्याने दिवस रात्र तसा शुकशुकाटच असे. रात्री रातकिड्यांच्या किरकिरण्याशिवाय दुसरे फारसे आवाज कधी ऐकू यायचे नाहीत. मी असाच एकदा आत्याकडे रहायला गेलो असताना, रात्री अतिशय सुमधुर अशा गाण्याचे स्वर ऐकू येऊ लागले. गंमतीची गोष्ट म्हणजे तेच गाणे चार पाच वेळा परत परत ऐकायला मिळाले. आत्याला विचारल्यावर ती म्हणाली “गुरुजी गाणे बसवत असतील शाळेच्या कार्यक्रमाचे, म्हणून फोनो घरी आणला असेल.” मग नंतर काही गाणे ऐकू आले नाही आणि मी झोपून गेलो.

दुसर्‍या दिवशी सकाळी आत्याची परवानगी घेऊन मी व माझी आतेबहिण असे दोघेही शेजारच्या बिर्‍हाडात गेलो. शेजारच्या बिर्‍हाडात रहाणारे वर्दे गुरुजी, त्यांच्या पत्नी माणिकताई, घरीच होते. रात्री लावलेले गाणे मला खूप आवडले होते असे माझी बहिण म्हणाल्याबरोबर, गुरुजींनी मला ते परत ऐकायचे आहे का विचारले आणि एक पेटी बाहेर काढली. त्यांनी त्या पेटीवर मध्यभागी एक काळी तबकडी ठेवली. बाजूला असलेल्या एका किल्लीने त्या पेटीला घड्याळासारखी किल्ली दिली आणि एक नागमोडी दिसणारी नळी त्या फिरणार्‍या तबकडीवर ठेवली. मी आश्चर्यांने बघतच राहिलो. कारण काल रात्रीचा तोच सुमधुर आवाज त्या पेटीतून उमटू लागला होता. त्या दिवशी माझी तोंडओळख बर्‍याच नवीन गोष्टींशी झाली. एक तर ते गाणे, ‘आला खुषीत समिंदर’, दुसरे म्हणजे ज्योस्नाबाई भोळ्यांचा तो अफलातून आवाज आणि तिसरी म्हणजे ती जादुची पेटी किंवा फोनो.

वर्दे गुरुजींची आणि माझी ओळख अशी झाली. गुरुजी माझ्यापेक्षा पंधरा एक वर्षांनी मोठे असावेत. पण मला ते नेहमी एखाद्या मित्रासारखेच वागवत. डोक्याला काळी टोपी, रेघा रेघांचा हाफ शर्ट व खाली पांढरा पायजमा असा त्यांचा नेहमी वेष असे. शाळेत गायन या विषयाचे ते शिक्षक असल्याने, शाळेत किंवा कोठेही बाहेर जाताना ते एक काळा कोट परिधान करत. गुरुजी रंगाने मात्र गोरेपान होते आणि बघायला गेले तर ते थोडेसे तसे जाडगेलेच वाटत. त्यांचा आवाज अतिशय मृदु होता. या अशा आवाजात ते वर्गाला कसे शिकवत असतील? याचे मला नेहमीच कोडे वाटे. गुरुजी बोलताना सुद्धा, स्पष्ट कधी बोलत नसत. त्यांचे बोलणे ओठातल्या ओठात, पुटपुटत, अडखळत, अस्पष्ट असे. खूप लक्ष देऊन ऐकावे लागे. मधून मधून ते काही क्षण शून्यातच बघत रहात. नंतर एकदा आमच्या मातोश्रींच्या मनात आले की मला कोणतीच कला अवगत नाही. मी तबला तरी शिकावा असे ठरले. आणि गुरुजींची मला शिकवणी सुरू झाली. आठवड्यातून दोन तीनदा तरी बिचारे गुरुजी सायकल मारत मारत आमच्या घरी येत. त्यांना तबल्यापासून सतारीपर्यंत सर्व वादने वाजवता येत. त्यामुळे ते तबला, हार्मोनियम, व्हायोलिन, सतार, जलतरंग, फ्ल्यूट काय म्हणाल ते शिकवू शकत. गंमत म्हणजे मी त्यांना गाताना कधीच ऐकले नाही. दुसर्‍याला गाणे शिकवताना काय ते गाऊन दाखवत तेवढेच. मी कलोपासक या दृष्टीने एकदम ढ दर्जाचा विद्यार्थी ठरलो व थोड्याच दिवसात गुरुजींची शिकवणी बंद झाली. त्यांनी शिकविलेला त्रिताल तेवढा लक्षात राहिला आहे.

गुरुजींच्या पत्नी माणिकताईंना कधीही बघितले की वाटे, या कोठेतरी बाहेरच निघाल्या असाव्यात. सदाकाळ इतक्या टापटीपीने रहाणारी स्त्री विरळाच. साधीच पण अतिशय टापटीपीने नेसलेली साडी, वर घट्ट अंबाडा, त्यावर फुलांची वेणी आणि मोठे लाल कुंकू असा त्यांचा वेष नेहमी असे. त्यांना बघितले की बालगंधर्वकालीन स्त्रीचा फोटो बघितल्यागत वाटायचे. याचे कारण मला नंतर उमगले. माणिकताईंचे वडील गंधर्व नाटक मंडळीत बालगंधर्वांना साथ संगत करत असत. माणिकताईंचे माहेर असे संगीतमय होते. बालगंधर्वांची तर त्यांच्या घरी जवळपास पूजाच होत असे. मी माणिकताईंना बघितले तेंव्हा त्यांच्या, गुरुजींशी झालेल्या लग्नाला, सात आठ वर्षे तरी झालेली  असावीत. पण कोणी गुरुजींचे नाव काढले की त्या नवोढेसारख्या लाजत. गुरुजींना हाक मारणे, बोलावणे त्यांना प्रचंड अवघड वाटे. त्यांच्या बोलण्यात पण एक वयाला न शोभणारा बालिशपणा होता. कळण्याचे वय नव्हते तरी मला ते जरा विचित्रच वाटे.

गुरुजी आणि माणिकताई नंतर माझ्या आत्याच्या कुटुंबाच्या खूप जवळ आले. माझी आत्या निवृत्त झाली आणि पुण्यात स्थायिक झाली. तिच्या घरी जाता येताना नेहमी गुरुजी किंवा माणिकताई दिसत. काही कारणांनी गुरुजींनी शाळेची नोकरी सोडून दिली होती व ते शिकवण्या करून गुजराण करत होते. मी नंतर पुण्याच्या बाहेर पडलो आणि गुरुजी व माणिकताईंचा तसा संबंधच संपला.

काही वर्षांनी मी पुण्याला परत आलो व मला एक अतिशय वाईट बातमी समजली गुरुजींना पोटाचा कॅन्सर झाला आहे म्हणून. एकदोनदा भेट झाली पण त्या दोघांना बघून इतके गलबलल्यासारखे झाले की फारसे काही बोलताच आले नाही. नंतर त्यांच्या पोटावर शस्त्रक्रिया झाली व एक दिवस अचानक त्यांचा मला फोन आला की त्यांना आता खूप बरे वाटते आहे आणि मला भेटण्यासाठी त्यांना माझ्या घरी यायचे होते. मी अतिशय आग्रहाने त्या दोघांना या म्हणून सांगितले. त्याप्रमाणे ते आलेही. जुन्या गप्पा झाल्या.मी त्या वेळी पं.जसराजजींची नवीन एल.पी रेकॉर्ड आणली होती ती लावू का म्हणून विचारले. लाव म्हणून सांगितल्यावर ती सुरू केली. पांचच मिनिटात गुरुजी म्हणले, “बंद कर, सोसत नाही.” माझ्या मनात तेंव्हाच शंकेची पाल चुकचुकली. नंतर कळले की शस्त्रक्रियेत कॅन्सरची वाढ एवढी दिसली होती की डॉक्टरांनी पोट फक्त परत शिवून टाकले होते.

आता काय! फक्त वाट बघणे बाकी होते. वर्षा ऋतूतल्या अशाच एका उदासवाण्या संध्याकाळी मला फोन आला की गुरुजी गेले. पाउस मी मी म्हणत होता. आम्ही दोन चार जणच जमलो आहेत हे लक्षात आल्यावर विद्युतदाहिनीवर घेऊन जावे असा विचार झाला. पण गुरुजींच्या ऐंशी वर्षांच्या सासरेबुवांनी पूर्ण नकार दिला. त्या पावसात मग आम्ही भिजत भिजत ओंकारेश्वरांवर गेलो. गुरुजींचे दुसरे कोणी नातलगच नव्हते. सासरेबुवांनीच जावयाचे सर्व विधी केले व गुरुजींनी पोचवून आम्ही घरी आलो.

काही दिवसांनी आत्याकडे गप्पा गोष्टी चालू असताना, गुरुजींचा विषय निघाला. त्या दिवशी आमच्या न बोलणार्‍या आत्याबाई सहजपणे एक वाक्य बोलून गेल्या. “या माणिकचे तर सर्व आयुष्यच नासून गेले!  कशी ती या  नामर्दाबरोबर राहिली कोण जाणे?” एखादी वीज चमकावी तसे मला झाले. केवढी प्रचंड शोकांतिका आमच्या डोळ्यांसमोर घडत होती. आणि आम्हाला पत्ता पण कधी लागला नाही. गुरुजींचे ते शून्यात बघत राहणे, अस्पष्ट व पुटपुटल्यासारखे बोलणे आणि माणिकताईंचे ते अनैसर्गिक लाजणे, वयाला न शोभणारे बालिश् बोलणे, एखाद्या लोकरीच्या गुंड्यातून धागा सरसर उलगडावा तशा आठवणी येत राहिल्या. कशासाठी एवढा प्रचंड त्याग या बाईने केला? वडिलांच्या प्रतिष्ठेसाठी? निदान एखादे अनाथ बालक का नाही दत्तक म्हणून घेतले? पण या आमच्या मनातल्या प्रश्नांना उत्तर कोणीच देणार नव्हते. माणिकताई तर कधीच नाही.

आता कधीही ज्योस्नाबाईंचा आवाज कानावर पडला की “आला खुषीत समिंदर” आठवते. गुरुजी आठवतात. माणिकताई आठवतात. पण हे ही मनाला खुपत रहाते की गुरुजी आणि माणिकताई यांचा समिंदर कधी खुषीत आलाच नाही. फेसाळणार्‍या लाटा सोडाच पण त्याला कधी भरतीही आली नाही.

28 जून 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

5 thoughts on “वर्दे गुरुजी

  1. वाईट वाटले. आयुष्य किती गुंतागूंतीचे असते नाही? जे दिसते, जाणवते ते नेहमीच सत्य नसते. असो.

    Posted by bhaanasa | जून 28, 2009, 11:36 pm
  2. vachun man ekdam udas zale. pan chchan lihile ahet.

    Posted by sdgorhe | एप्रिल 17, 2013, 3:34 pm
  3. अंगावर काटा आला वाचून. प्रत्येक आयुष्य म्हणजे एक कहाणीच वाटते, नाही?

    Posted by Mohana | जून 13, 2013, 7:37 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: