.
Books- पुस्तके

आरामखुर्चीतला प्रवासी


काही दिवसांपूर्वी, एकत्र कॉफीचा आस्वाद घेत असताना, माझा एक मित्र मला सहज म्हणाला की तो काही कामानिमित्त चीनला चालला आहे व त्याच वेळी तिथल्या काही प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्याचा त्याचा विचार आहे. तो शांघाय आणि बिजिंगला जाणार होता व तिथेच, ‘ग्रेट वॉल’(Great Wall) व भाजलेल्या मातीच्या पुतळ्यांचे सैन्य (Terracotta Army)  तो बघणार होता. मी एका पुस्तकात वाचलेले होते की बिजिंगजवळ असलेली ही प्रेक्षणीय स्थळे, अस्सल नसून, जुन्या जमान्यातील खरीखुरी स्थळे ही ‘शियान’ या शहराजवळ आहेत. मी माझ्या मित्राला सुचविले की त्याने शियानला जाण्याचा विचार करावा आणि शक्य असेल तर तिथून, एका दिवसात बघून येणे शक्य आहे अशा, ‘डुनहुआंग’ येथील हजार बुद्धांच्या गुंफा बघण्याचाही त्याने विचार करावा. याच वेळी मी त्याला चीन मधे या वेळी हवा कशी असेल, खाण्यापिण्याचे कितपत हाल होतील आणि भारतीय लोकांना खाता येईल असे कोणते अन्न उपलब्ध असू शकेल यासंबंधी थोडी माहिती दिली. माझा मित्र आता ट्रिपहून परत आला आहे. माझ्या सांगण्यावरून तो शियान आणि डुनहुआंगला भेट देऊन आला. तिथे त्याने जे काय बघितले त्याने तो बराच प्रभावित झालेला दिसला. परत आल्यावर त्याने माझे विशेष आभार मानले. त्याचे आता स्पष्ट मत आहे की जरी मी नाकारत असलो, तरी चीनमधे मी खूप फिरलेलो आहे.

हॉंग कॉंग ला घालविलेली एक रात्र सोडली तर मी चीनच्या भूमीवर पाऊल सुद्धा कधी ठेवलेले नाही. त्यामुळे माझे मलाच नंतर आश्चर्य वाटत राहिले की मी माझ्या मित्राला चीनमधल्या प्रवासाबद्दल एवढ्या खात्रीपूर्वक कसे सांगू शकलो? नंतर माझ्या एकदम लक्षात आले की भले! मी प्रत्यक्षात चीनमधे प्रवास केलेला नसेलही पण या भूमीवर, अगदी एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत मी माझ्या लेखकमित्रांच्या सोबत मनसोक्त भटकलेलो आहे.  विसाव्या शतकाच्या सुरवातीच्या काळातले सुप्रसिद्ध पुराणवस्तूसंशोधक, सर. ऑरल स्टीन् यांच्याबरोबर, मी भारतापासून सुरू होऊन चीनपर्यंत पोचणार्‍या मध्ययुगीन रेशीम वाटेचा (Silk Route) शोध घेतला आहे. टाकलामाकन आणि लॉप-नॉरची भयाण व अफाट वाळवंटॆ, शिंजियांग प्रांत आणि चिनी तुर्कीस्तान मधला माझा प्रवास सुखरूप व्हावा म्हणून माझी लेखक मैत्रिण ऍनाबेल वॉकर हिने अथक: परिश्रम घेतले आहेत. शियान शहराच्या उत्तरेला असलेल्या ह्युआंगलिंग या जागी असलेल्या पीतसम्राटाच्या(Yellow Emperor) मंदिरापासून सुरवात करून उत्तर रेशीम वाटेने काशगरपर्यंत व तेथून उझबेकीस्तानमधील समरकंदपर्यंतचा माझा प्रवास मी माझा एक लेखक मित्र, कॉलिन थब्रॉन याच्याच मदतीने पार पाडला आहे. असाच एक दुसरा महाप्रवास मी शांघायपासून सुरू होणार्‍या रूट 312 वरून पार उत्तरेला असलेल्या चांदणदरी (Starry Gorge) व गोबी वाळवंट या पर्यंत पार पाडलेला आहे. आधुनिक चीनची औद्योगिक प्रगती, भयानक प्रदूषण करणार्‍या नद्या व रूट 312वरची इतर शहरे मी पाहू शकलो आहे. हे सर्व, माझा आणखी एक लेखक मित्र रॉब गिफर्ड याच्याच मदतीने मी करू शकलो आहे. ऑरल स्टीन बरोबर पाहिलेल्या, डुनहुआंगच्या हजार बुद्धांच्या गुंफा आणि ग्रेट वॉल, आधुनिक कालात कशा दिसत आहेत हे पाहण्याची संधी याच मित्राने मला आणून दिली आहे.

अशाच पद्धतीने केलेला जगभराचा एवढा सारा प्रवास मी पार पाडल्याने, पटकन कोणाला प्रवेश न मिळणार्‍या एका गटाचा मी आपोआपच सभासद झालो आहे. हा गट आहे माझ्यासारख्या आरामखुर्चीतील प्रवाश्यांचा. मला माझ्या प्रवासाचा एक पैसा सुद्धा खर्च येत नाही. मला रेल्वे, आगबोटी,विमाने किंवा बसचे सुद्धा आरक्षण करावे लागत नाही. कोणत्याही देशाचा व्हिसा मला लगेच मिळतो. तरीसुद्धा माझा प्रवासाचा अनुभव अतिशय वैविध्यपूर्ण आणि श्रीमंत आहे. चेरीच्या फुलांचा बहर जपानमधे प्रथम दक्षिणेला फुलतो व तो हळूहळू उत्तर दिशेला पसरत जातो. मी या बहराबरोबरच संपूर्ण जपान दक्षिणेपासून सुरवात करून उत्तरेच्या टोकापर्यंत फिरलो आहे. मंगोलिया मधले गोबी वाळवंट मी दोन उंटांना बरोबर घेऊन पायाखाली घातलेले आहे. तिथल्या स्थानिक भटक्य़ा लोकांच्या बरोबर मी त्यांच्या गिर (Gir) या तंबूवजा घरात राहिलो आहे. जगभरच्या मोठमोठ्या नद्यांच्यातून मी मोठे प्रवास केले आहेत. बर्फाच्छादित सायबेरिया मधल्या लेना नदीमधून मी प्रवास केला आहे तर नाईल नदीतून, लेक व्हिक्टोरिया पासून ईजिप्तच्या लक्झॉरपर्यंत मी फिरलो आहे. दक्षिण चीन मधल्या युनान प्रांतापासून सुरवात करून मी, मेकॉंन्ग नदीतून, लाओस,कंबोडिया व व्हिएटनामचा दौरा केला आहे. युद्धाने उध्वस्त झालेल्या अफगाणिस्थान मधुन मी पायी फिरलो आहे. कैलाश पर्वताची परिक्रमा मी केली आहे. कझागस्तान या देशाला लागून असलेल्या अरल समुद्रात, री-बर्थ आयलंड म्हणून एक बेट आहे. तिथे रासायनिक युद्धातील, ऍन्थ्रॅक्स या रसायनाचे अतिशय दुष्ट असे प्रयोग सोव्हिएट रशियाने, असंख्य माकडांच्यावर केले होते. त्या री-बर्थ आयलंडवरही मी जाऊन आलो आहे.

आंर्तजाल किंवा इंटरनेटच्या आगमनानंतर तर माझ्यासारख्या आरामखुर्चीतील प्रवाश्यांना नवनवीन सुसंधीच घरबसल्या चालून येऊ लागल्या आहेत. नुकतेच मी दक्षिण भारतातल्या अनेक प्रेक्षणीय स्थळांचे वर्णन असलेले ‘ब्राम्हिन्स ऍन्ड बंगलोज’ या नावाचे एक पुस्तक वाचले. या पुस्तकात, भारताच्या पश्चिम किनार्‍यावरच्या कारवार जवळच असलेल्या ‘देवबाग’ या नावाच्या बीच रिसॉर्टची माहिती सापडली. मला त्याचे एकंदरीत वर्णन आवडले व लगेच ‘गूगल अर्थ’ वर ती जागा मी शोधून काढली. त्याचे फोटो बघितले. हा एक अतिशय सुंदर असा बीच आहे. घनदाट जंगलाचा एक भाग अगदी समुद्राजवळपर्यंत आला आहे. आकाशातून ही जागा, मोठी निसर्गरम्य दिसते आहे. प्रवाशांना रहाण्यासाठी झोपड्या येथे मिळतात. सर्वसाधारणपणे माहिती नसलेले असे हे एक सुट्टी घालविण्याचे स्थान आहे. याच पद्धतीने मी आता कोणतेही पुस्तक वाचत असताना ‘गूगल अर्थ’ वरून त्या प्रवासाचा मागोवा घेत राहतो.

काही वेळेस या आरामखुर्चीतल्या सफरी इतिहासातल्या सफरी सुद्धा होतात. एखादा लेखक, मोगल सम्राट ‘बाबुर’ याने अफगाणिस्थानमधून केलेला प्रवास, त्याच्याच मार्गाने, परत करतो. हा प्रवास इतिहासातलाच तर असतो. या उलट कंबोडिया किंवा व्हिएटनाम मधला प्रवास, युद्धाचे काय भयानक दुष्परिणाम त्या भागातल्या निर्दोष नागरिकांना भोगावे लागतात, याचे मोठे विदारक चित्र आपल्यासमोर उभे करतो. हुकुमशाही असलेल्या देशांच्या, काही भागांतील निरपराध नागरिकांना, त्यांच्या शासनांनी घेतलेल्या निर्दयी निर्णयांची, केवढी आणि किती पिढ्यांपर्यंत, किंमत मोजावी लागते याचे एक भयानक चित्र, सायबेरिया मधल्या भटक्या जमातींचे वर्णन वाचताना माझ्यासमोर आले. सोव्हिएट रशियाने, सायबेरिया प्रथम जेंव्हा ताब्यात घेतला तेंव्हा त्यांच्या कोझॅक सैनिकांनी या गरीब लोकांची जीवनपद्धती आणि अर्थार्जनाची सर्व साधने नष्ट केली. सोव्हिएट राज्यपद्धतीप्रमाणे ह्या लोकांना प्रत्येक गोष्टीसाठी मॉस्कोवरच अवलंबून रहावे लागू लागले. सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतर सायबेरिया प्रजासत्ताक झाले आहे व या लोकांना मिळणारा सर्व सरकारी आधार काढून घेण्यात आला आहे. आता हे लोक अतिशय दुख:द परिस्थितीतून जात आहेत. अर्थार्जनाचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. भविष्यात काय होईल ते सांगता येत नाही. तरूण पिढी मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी आणि दारूचे व्यसन याकडे वळते आहे. हे असे अनुभव कुठल्याही व्यवस्थेखालील, ती यात्रा कंपनी असो किंवा वैयक्तिक व्यवस्था असो, प्रवासात येऊच शकणार नाहीत.

माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना तर, हा आरामखुर्चीतला प्रवास म्हणजे एक वरदानच आहे.

26 जून 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “आरामखुर्चीतला प्रवासी

 1. चंद्र्शेखरजी,
  आपण वाचकांना आपल्या सुंदर शैलीने अगदी गुंगवून टाकता. कृपा करून आपल्याला आवडलेल्या पुस्तकांची नावे आपण आम्हाला सांगाल का? कारण ज्या पुस्तकांचे उल्लेख आपण केलेत ती निश्चीतच उत्तम असणार असं वाटतं.

  Posted by nimisha | जुलै 9, 2009, 4:23 सकाळी
  • काही स्मरणात आहेत त्यांची नावे देत आहे.
   Out of Eden by Stephan Oppenheimer
   Small wonder by Barbara Kingsolver
   Pioneer of Silk Road by Annabel Walker
   River of white nights by Jeffrey Taylor
   Hitching rides with Buddha by Will Ferguson
   आवडतात का ते बघा.

   Posted by chandrashekhara | जुलै 11, 2009, 7:40 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: