.
History इतिहास

श्रीमंत बाजीराव पेशवे (दुसरे)


मुंबईच्या फोर्ट भागामधे सरकारी टांकसाळेवरून एक रस्ता नेव्हीच्या लायन गेट कडे जातो. या रस्त्यावर आपले जुनेपण जपणारी भव्य इमारत आहे. ही इमारत अजूनही तिच्या टाऊन हॉल या जुन्याच नावाने ओळखली. जाते. या इमारतीत मुंबईच्या प्रसिद्ध एशियाटिक सोसायटीचे वाचनालय आहे. ही सोसायटी इ,स, 1804 मध्ये हॉन. सर. जेम्स मॅकिनटॉश यांनी स्थापन केली होती. मॅकिनटॉश हे गृहस्थ त्या वेळेस मुंबईच्या रायटर्स कोर्टचे (या कोर्टाला नंतर मुंबईचे सुप्रिम कोर्ट व आता हाय कोर्ट असे संबोधण्यात येते.) मुख्य न्यायाधीश होते. इ.स. 1805 मध्ये बाजीराव पेशवे यांच्या पुणे दरबारी असलेले ब्रिटिश रेसिडेंट कर्नल क्लोज यांच्या निमंत्रणावरून मॅकिनटॉश यांनी पुण्याला अधिकृत भेट दिली होती. कंपनी सरकारच्या एका बड्या अधिकार्‍याची ही अधिकृत भेट असल्याने सर्व औपचारिकता पाळण्यात आली होती. या भेटीचा, मॅकिनटॉश यांच्याच शब्दातला हा वृत्तांत.

सरहद्दीवरचे स्वागत

आम्ही सकाळचे सात वाजेपर्यंत ‘चिनचोड’ (चिंचवड) सोडू शकलो नाही. आम्ही घोड्यांवरून प्रवास करतो होतो तरीही आमचा प्रवास धीम्या गतीनेच चालला होता. साधारणपणे निम्मे अंतर गेल्यानंतर आम्ही एका नदीपाशी पोचलो. कर्नल क्लोज आणि मुंबईचे इतर काही लोक आमची वाट पहात येथे थांबले होते. या ठिकाणीच आमच्या पार्टीला आणखी तीन महत्वाच्या व्यक्ती येऊन मिळाल्या. मी या व्यक्तींच्या बरोबर पूर्वी कधीच प्रवास केलेला नसल्याने या व्यक्तींची वैयक्तिक उपस्थिती माझे ‘लॉर्ड चॅन्सेलर’ अश्वमहाशय यांना कितपत रुचेल व त्यांच्या मनाची शांतता भंग तर होणार नाही ना? या विचाराने सुरवातीला मी बराच साशंक होतो. या तीन व्यक्ती म्हणजे पुण्याच्या रेसिडेन्सीचे तीन दरबारी गजराज होते. अंदाजे दोन मैलाची दौड केल्यावर आम्ही ‘गणेश कॅंडी’ नावाच्या एका टेकडीपाशी पोचलो. या ठिकाणी आमच्या स्वागताची जंगी तयारी मराठा सरदारांनी केलेली दिसत होती. जवळ जवळ हजार तरी घोडेस्वार सैनिक, रस्त्याच्या दोन्ही बाजूला खडे होते. मी त्यांच्याकडे जरा कुतुहलानेच बघत होतो. कारण ज्या घोडदलाने हिंदुस्थानाचा विस्तिर्ण भूभाग पादाक्रांत करून आपल्या अंमलाखाली आणला होता, त्या घोडदलाचेच हे घोडेस्वार सैनिक प्रातिनिधिक होते. सिडनहॅमकडे मी या बाबतीत चौकशी केल्यावर त्या शूर सैन्याचा हा एक खराखुरा व योग्य नमुना आहे हे त्यानेही मान्य केले. त्या सैनिकांची मुद्रा आणि चर्या उग्र अणि दहशत वाटावी अशीच होती. त्यांची शरीरयष्टीसुद्धा बाकी हिंदुस्थानी लोकांपेक्षा जास्त मजबूत आणि दणकट वाटत होती. त्यांचे कपडे (त्यांना कोणताच गणवेश नव्हता) व हत्यारे मात्र दुर्लिक्षतच वाटत होती. त्यांच्या मांडीखालचे घोडे मात्र रानटी आणि अस्सल वाटत होते. दिखाऊ अजिबातच नव्हते.

या सैनिकांच्या तुकडीच्या साधारण मध्यभागी एक गालिचा अंथरण्यात आलेला होता. त्या गालिच्याजवळ आम्ही पोचलो तेंव्हा तुतार्‍या आणि पडघम यांच्या गजराने मराठ्यांचे सरदार येत असल्याची आम्हाला सूचना मिळाली. आम्ही व मराठे एकाच वेळी घोड्यावरून उतरलो. मला मिळालेल्या सूचनांप्रमाणे मी प्रथम सरदारांच्या हाताखालच्या तीन चार सरदारांना अभिवादन केले. पेशव्यांनी त्यांच्या राज्याच्या राजधानीला मी भेट देत असल्याने माझे स्वागत करण्यासाठी म्हणून जे एक प्रतिनिधी मंडळ पाठविले होते त्या मंडळाच्या प्रमुखाला मी यानंतर आलिंगन दिले. यानंतर खाली अंथरलेल्या गालिच्यावर आम्ही मांडी घालून बसलो. कपडे शिवण्याचे शिक्षण मला कधीच न मिळाल्याने दुसर्‍या कोणीतरी शिवलेली, घोडे चालविण्याची कातडी विजार मी घातली होती त्या विजारीत खाली बसण्याची प्रक्रिया फारशी सुखकारक नसल्याने मांडी घालून बसण्याची पद्धत मला फारशी रुचली नाही.

आम्ही स्थानापन्न झाल्यावर मराठ्यांचे मंत्री किस्तनजी (कृष्णाजी), कर्नल क्लोज़ यांच्या मार्फत मला म्हणाले की या प्रवासानंतर माझी तब्येत उत्तम असेल अशी त्यांना आशा वाटते. मी ती उत्ताम असल्याचे कर्नल क्लोज यांच्या मार्फत सांगितले. यावर मराठा मंत्री म्हणाले की माझे स्वागत् इतमामाला साजेसे व दर्जेदार व्हावे या बाबतीत पेशवे अतिशय आग्रही आहेत. यावर मी उत्तर दिले “ श्रीमंत पेशव्यांनी माझ्याबद्दल दाखविलेल्या कळकळीने मी अत्यंत भारावून गेलो आहे.” यावर मंत्री म्हणाले की “आपल्यासारख्या वरिष्ठ दर्जाच्या इंग्लिश गृहस्थाच्या भेटीने आपल्या दोन्ही सरकारांमधील जवळचे संबंध आणखी दृढ होतील.”

या संभाषणानंतर मी त्या प्रतिनिधी मंडळाच्या सर्व सभासदांना पानात गुंडाळलेली दोन सुपार्‍यांची पुरचुंडी दिली, त्यांच्या हातावर दोन लहान चमचे गुलाबाचे ऑट्टर (अत्तर) टाकले व त्यांच्या डोक्यावर गुलाब पाणी ओतले. या भेटीच्या वेळी ही मंडळी माझे पाहुणे समजले जात होते. व या देशातील रीतीरिवाजांप्रमाणे, या औपचारिकतेने  मी त्यांना नम्रपणे सुचवत होतो की ते आपली भेट आता आटोपती घेऊ शकतात. युरोपमध्ये ही प्रथा बोअर मंडळींना घालवून देण्यासाठी उत्तम आहे. परंतु युरोपमधे अशा भेटी, संभाषणाने आनंद वाढावा म्हणून होत असल्याने, पाहुण्यांना हे सांगणे गरजेचे असते की त्यांच्याबरोबरचे संभाषण, हा आनंद आम्हाला आता देऊ शकत नाही. एशियामधील भेटी या  फक्त औपचारिक व यजमानाचे महत्व वाढविण्यासाठी होत असल्याने, यजमान कोणताही वाईटपणा अंगावर न घेता पाहुण्यांना भेट संपली असे सांगू शकतो.

पेशव्यांची प्रतिक्षा

साधारण साडेचार वाजता आम्ही, आमच्या उंट, घोडे व हत्ती यांच्या तांड्यासह, पेशव्यांची प्रतिक्षा करण्यासाठी निघालो. हिंदुस्थानमधील एतद्देशीय लोकांच्या शहरांमधे, सर्वोत्तम म्हणून जे ओळखले जाते त्या शहरात, आम्ही पताकांनी सजविलेल्या एका मोठ्या रस्त्यावरून सुमारे अर्धा मैल गेलो. पेशव्यांच्या घराला जरी भाडा (वाडा) म्हणत असले तरी या शब्दाचा अर्थ महाल असा घेता येत नाही कारण पूनाह (पुणे) शहरातील इतर मराठा सरदारांच्या घरासाठीही हाच शब्द उपयोगात येतो. परंतु पेशव्यांच्या बाबतीत मात्र महाल हाच शब्द शोभून दिसेल. सॉमरसेट हाऊसची स्ट्रॅन्डच्या दिशेने जेवढी लांबी आहे जवळ जवळ तेवढीच लांबी पेशव्य़ांच्या या महालाच्या दर्शनी भागाची आहे. आम्ही एका दरवाजातून आत शिरून वाड्याच्या मध्यभागी असलेल्या चौकात आलो. या चौकाच्या चारी बाजूस असलेल्या भिंती, हिंदू पुराणांच्या कथातील चित्रांनी रंगविलेल्या होत्या. या अतिशय देखण्या दिसणार्‍या चौकाच्या एका कोपर्‍यात आम्हाला वर जाण्यासाठी जिना होता. या जिन्याच्या वरच्या टोकास दरबार महालाचे प्रवेशद्वार होते. कर्नल क्लोज याने मला आधीच देऊन ठेवलेली व अतिशय सुंदर भरतकाम केलेली माझी पादत्राणे मी या द्वाराजवळ काढून ठेवली. या दरबार महालाची लांबी परळ येथील व्हरांड्याएवढी( परळ येथील  गव्हर्नरांचे घर) साधारण होती पण रूंदी मात्र त्याहून जास्त होती. या महालाच्या मध्यभागी, ओक किंवा तत्सम लाकडाच्या व मोठ्या देखण्या दिसणार्‍या, खांबांच्या दोन ओळी आधारासाठी बसविलेल्या होत्या. या खांबांच्या ओळीच्या मधील अंतराच्या, साधारण निम्मे अंतर लांब असलेल्या महिरपी, खांबांच्या दोन्ही बाजूंना बसविलेल्या होत्या. जमिनीवर गालिचा अंथरलेला होता व आम्ही आत शिरलेल्या द्वाराजवळ असलेल्या महालाच्या टोकाजवळ एक पांढरी शुभ्र चादर व तीन उशा ठेवलेल्या होत्या. ही पेशव्यांची मसनद किंवा सिंहासन होते.

श्रीमंत बाजीराव पेशवे

या जागेजवळ पोचल्यावर आमच्या लक्षात आले की पेशवे आम्हाला भेटण्यासाठी पुढे येत आहेत. पेशवे अतिशय राजबिंडे असलेले हिंदू आहेत. अत्यंत रूपवान असलेले पेशवे साधारण चौतीस वर्षाचे असावेत. त्यांची रहाणी व वागण्याची पद्धत संपूर्णपणे एखाद्या सभ्य गृहस्थासारखीच आहे. त्यांच्या अंगावर पांढर्‍या शुभ्र मलमलीचा वेष होता. ते कोंकण ब्राम्हण या जातीचे असल्याने, या जातीतील सर्वसाधारण लोकांप्रमाणे ते गौरवर्ण आहेत. त्यांची उघडी पावले, अभ्यंगस्नान करून बाहेर आलेल्या एखाद्या उच्चवर्णीय स्त्रीच्या हातांपेक्षाही जास्त स्वच्छ होती. त्यांचा थाटाचा दबदबा न वाटता ते प्रौढ पण उमेदीचे वाटत होते. ते नरमीने जरी वागत नसले तरी त्यांचा आदब मराठ्यांच्या मुख्यासारखा मला वाटला नाही. त्यांची दरबारात वागण्याची पद्धत मला सौम्य व अजिबात हेकेखोर वाटली नाही. एखाद्या उच्च कुलात जन्माला आलेल्या व अतिशय वरिष्ठ पदाला रूळलेल्या व्यक्तीशिवाय इतर कोणातही ही अशी वागण्याची पद्धत मी अजून तरी बघितलेली नाही. मी आतापर्यंत तीन अतिशय वरिष्ठ राजप्रमुखांच्यासमोर( तिसरे जॉर्ज, नेपोलियन आणि बाजी राव), त्यांच्या दरबारात सादर झालेलो आहे. पण वागण्याची पद्धत आणि थाट याच्यात मी या मराठी पेशव्यांनाच पसंत करीन. पेशवे यानंतर पुढे झाले व त्यांनी मला आलिंगन दिले. आम्ही एकमेकांना सलाम केले व यानंतर पेशवे मसनदीवर बसले. मी व कर्नल क्लोज़ त्यांच्या समोर बसलो. पेशव्यांचे दिवाण माझ्या उजव्या बाजूल पेशव्यांच्या जवळ बसले. या दरबारची अशी पद्धत आहे की कुजबुजीपेक्षा मोठा आवाज दरबारात कोणीही काढावयाचा नाही. त्यामुळे पेशव्यांनी माझ्या तब्येतीची चौकशी दिवाणांच्या जवळ, त्यांनी कर्नल क्लोज जवळ व कर्नल क्लोजनी माझ्याजवळ कुजबुजीच्या आवाजात केली. मी माझे उत्तर याच रस्त्याने परत पाठवले. यानंतर श्रीमंतानी माझ्याबरोबर काही संभाषण एकांतात करण्याची इच्छा व्यक्त केली. यासाठी त्यांचे तीन मंत्री, मी व कर्नल क्लोज पेशव्यांच्याबरोबर शेजारीच असलेल्या एका खोलीत गेलो. या खोलीत पेशव्यांची मसनद व तीन उशा यांशिवाय दुसरे काहीच नव्हते.

आम्ही दरबारात परत आल्यावर दिवाणांनी माझ्या टोपीत एक शिरपेच खोचला, माझ्या गळ्यात एक हिर्‍यांचा हार घातला व सोन्या चांदीची जरदारी वस्त्रे आणि मलमलीची कापडे मला पेश केली. यापैकी कापडे कौसाजी या नोकराकडे देण्यात आली. बाकीचे दागिने माझ्या अंगावरच राहिले. पान-सुपारी, अत्तर आणि गुलाबपाण्याचे औपचारिक विधी यानंतर पार पाडण्यात आले आणि आम्ही पेशव्यांची रजा घेतली.

23जून 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

11 thoughts on “श्रीमंत बाजीराव पेशवे (दुसरे)

 1. Khupach sahi…. Ultimate…

  Posted by mipunekar | जून 23, 2009, 10:17 pm
 2. chhan lihile aahe. kuthe milale he?

  Posted by देविदास देशपांडे | जून 24, 2009, 1:23 pm
 3. सुंदर लिहलय….

  Posted by ajayshripad | जून 25, 2009, 8:01 सकाळी
 4. thanx. baghato ata nivantpane.

  Posted by devidas deshpande | जून 30, 2009, 12:52 pm
  • बाजीराव पेशव्यांना पळपुटे बाजीराव वगैरे अपशब्दांनी पुष्कळ वेळा उल्लेखले जाते. काही संदर्भ याच्या बरोबर उलट दर्शवितात. या बाबत एल केख लिहिणे मनात आहे. बघू कसे जमेल ते !

   Posted by chandrashekhara | जून 30, 2009, 12:57 pm
 5. pahile Bjirao peshve mahnaje janu satyat utarleli aag.tyani pram kele,tyala nibhavale ani te jinkalehi.tyani pram kele mahnaje kay zale.aaj Raau mhatale ki dolyasamor ubhi rahate ti mastani.pan te etke shoor hote ki delli torlye maharajapeksha jomane jinali…………….

  Posted by abhijit | सप्टेंबर 24, 2009, 5:41 pm
 6. My village Pimpri Pendhar, Tal-Junnar.

  Posted by Sudhir Barku Devgire | सप्टेंबर 3, 2010, 12:56 pm
 7. sundar lihile aah. ajun kahi, dusare bajarao vishayi vachayala aavadel

  Posted by SACHIN GAWADE | ऑक्टोबर 24, 2010, 5:27 pm
 8. मस्त !

  Posted by जयंत | मे 19, 2011, 7:14 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: