.
अनुभव Experiences

काही गडद काही पुसट


मल्लेश्वरमचा भाग म्हणजे  त्या काळातल्या  बंगलूरु शहराचे  एक टोक होते. शहराच्या मध्यवर्ती भागातल्या केम्पगौडा सर्कल पासून एक सरळ रस्ता  फिफ्थ क्रॉसला येत असे. तिथे एखादा टेकडीवर जाण्याचा रस्ता असावा असा चढ असलेला थर्ड मेन समोर दिसायचा. या रस्त्याने पायी येणारे तर धापा टाकतच हा रस्ता चढत. पण  रिक्षा सुध्दा अगदी मेटाकुटीला आल्यासारख्या आवाज काढत , कण्हत कुथत , हा रस्ता पार करत. या रस्त्याच्या पार टोकाला सेवेन्टीन्थ क्रॉस लागे. बस सेवा या पुढे येत नसे. या रस्त्याने आणखी थोडे पुढे गेले की डाव्या बाजूला ज्युवेल फिल्टर्सच्या घुमटया दिसत. त्या ओलांडल्या की समोरच पिवळट लालसर दगडाची एक लांबलचक काम्पाउंडची भिंत लागे. बंगलूर कॅन्टोनमेन्ट कडून यायचे ठरवले तर गॉल्फ  कोर्स वरून सरळ येत , पॅलेस ऑर्चर्डची भिंत डावीकडे टाकली आणि सॅन्की तलाव ओलांडला की हीच  कांपाउंडची भिंत लागे. या भिंतीलगत उभे राहून समोर बघितले की एक खूप मोठे ग्राउंड दिसे. डाव्या उजव्या बाजूंना , जवळ जवळ समांतर जाणारे आणि गुलमोहोरांच्या झाडांच्या मधे लपलेले दोन रस्ते दिसत आणि समोर लांबवर ,कोणातरी वास्तुविशारदाने आपले सर्व कौशल्य ओतून चिंतलेली  व पिवळट लालसर दगडात  बनवलेली , एक प्रचंड मोठी  कौलारू  इमारत दिसे. सतत वाहणार्‍या     वार्‍यावर     झुलणारी,  सभोवतालची गर्द हिरवीगार झाडी, पायाखालची लालचुटुक माती आणि निळेभोर आकाश या पार्श्वभूमीवर तर एकूण देखावा एखाद्या पिक्चर पोस्ट कार्डवर असतो  तसा वाटे. या रस्त्याने जाणार्‍या     एखाद्या पांथस्थाच्या मनात, हे दृष्य बघून,  ही इमारत कसली आहे ? असा प्रश्न उभा राहिला  तर  त्याच रस्त्याने जाणार्‍या   दुसर्‍या     एखाद्या पांथस्थाला विचारण्याशिवाय  मार्गच नसे. कारण कोणताही नामफलक किंवा पाटी कुठेच लावलेली नसे. अर्थात त्या काळी बंगलूरु शहराच्या रहिवाश्यांना ही  टाटा इन्स्टिटयूटची इमारत म्हणजे शहराचा एक मानबिंदू वाटे आणि नामफलकाची उणीव किंवा गरज कधीच भासत नसे.

या संस्थेमधे मला माझ्या आयुष्यातली काही वर्षे घालवण्याची संधी मिळाली. या कालात मौज मजेचे  व ताण तणावाचे अनेक क्षण आले आणि गेले पण इतक्या वर्षांनंतर मात्र  मनात रेंगाळतात , त्या फक्त सुखद स्मृती. तसे बघायला गेले तर या आधीचे माझे शिक्षणही चांगल्या प्रसिध्द शाळा कॉलेजांच्यातच झाले होते. पण या संस्थांशी माझे कधी नाते जमलेच नाही. या संस्थांत घालवलेल्या वर्षांच्या आठवणी का कोणास ठाउक पण फक्त कटूच वाटतात. कदाचित या कालात मला जे करायचे होते ,जे गाठायचे होते ,त्यात अपयश आले म्हणा किंवा ‘ बॅड लक ‘ म्हणा पण या आठवणी नकोशाच वाटतात.

बंगलूरु शहराचे रहिवासी जरी टाटा इन्स्टिटयूट म्हणत असले तरी आमच्या इन्स्टिटयूटचे खरे नाव होते , ‘ इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स.’ 1909  साली जमसेटजी टाटा यांच्या कल्पनेतून उभी राहिलेली ही संस्था  नंतर सुरु झालेल्या  सगळया  ‘आय. आय. टी ‘  या संस्थांची गंगोत्री होती असे म्हणले तर वावगे ठरू नये. त्या कालच्या प्रसिध्द ब्रिटिश  वास्तु विशारदांनी तयार केलेला ,  संस्थेचा परिसर ,  त्या वास्तूला शोभणारा तर होताच पण नंतर जेंव्हा  अमेरिकेत, वॉशिंग्टन डी.सी. मध्ये कॅपिटॉल हिलचा परिसर बघण्याची संधी मिळाली तेंव्हा पहिली आठवण  झाली होती   आमच्या इन्स्टिटयूटच्या परिसराची. जवळ जवळ साडेचारशे एकरांचा हा परिसर निसर्गरम्य तर  होताच पण तिथे पहिले पाऊल टाकले की , उच्च शिक्षण किंवा संशोधन  यासाठी आवश्यक ती नीरवता  जाणवू लागे. मेन बिल्डिंग व डायरेक्टरांचा प्रचंड बंगला या दोन टोकांच्या मधे एक सदा हिरवेगार असे लांबलचक मैदान होते. या मैदानाच्या दोन्ही बाजूंना  गुलमोहोरांनी आच्छादित असे दोन रस्ते होते. या रस्त्यांच्या कडांना सिनियर प्रोफेसरांचे बंगले व त्याच्या मागे निरनिराळे विभाग अशी ही रचना होती. एवढा लांबरूंद परिसर आम्हाला रोज किमान दोन वेळा तरी चालावा लागेच. एका टोकाला असलेले होस्टेल ते इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन डिपार्टमेंट या मधले अंतर किमान चार वेळा तरी पार करावे लागे. या शिवाय संध्याकाळी पोहायला जाण्याचा किंवा मल्लेश्वरममधे किरकोळ खरेदी करण्याचा बेत झाला तर दिवसाला सात आठ मैल चालणे आरामात होई.

आमच्या इन्स्टिटयूटचे होस्टेल ही तर एक एक मोठी अजब वसाहत होती. हजार ते बाराशे वस्तीचे ते एक गांवच होते. इतर होस्टेल मध्ये असतात त्या प्रकारचे कोणतेही नियम व कायदे कानू , या होस्टेलमधे नसत. या मागची भूमिका साधी होती. संशोधन करणार्‍याला     रात्री दोन वाजता त्याच्या विभागात जाऊन काही नवीन कल्पना प्रत्यक्ष अंमलात आणावीशी वाटली किंवा लायब्ररीत जावेसे वाटले तरी जाता येत असे. या होस्टेलला  जंटलमेन्स होस्टेल म्हणत  कारण  इतर अशा होस्टेल्समध्ये चालणार्‍या     रॅगिंग सारख्या प्रकारांचा येथे पूर्णपणे अभाव असे. होस्टेल मधले सर्व सिनिअर्स ही परंपरा चालू राहील याची काळजी घेत. पदवी परिक्षेसाठीच्या कोर्सपासून सुरवात करून पोस्ट डॉक्टरल संशोधन करणारे काही सिनिअर्स असत. त्यांचे या होस्टेलमधले वास्तव्य सहज सात आठ वर्षे असे. मला आठवते की एका वर्षी काही उत्तर हिंदुस्थानी विद्यार्थ्यांनी नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचे रॅगिंग करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु सिनिअर्सच्या कानावर ही गोष्ट गेल्याबरोबर त्या सर्वांची चांगलीच कानउघाडणी झाली होती. वेळी अवेळी आरडा ओरडा  किंवा दंगा करणे वगैरे प्रकार क्वचितच होत. अगदी नवीन आलेले प्रथम वर्षाचे विद्यार्थी सोडले तर बाकी सर्वांना सिंगल रूम्स मिळत. मग आपआपल्या कल्पनेप्रमाणे आणि बजेटप्रमाणे रूम सजवली जात असे. एका वेताच्या टोपलीत पांढरा कागद चिकटवून ती विजेच्या दिव्याखाली टांगण्याची प्रथा सर्वमान्य होती. सगळया भिंतीना व छताला चुना फासलेला असल्याने इनडायरेक्ट प्रकाशयोजना होई. बहुतेकांच्या खोल्यांच्यातून रेडियो हे असतच. त्यावेळी ट्रांन्झिस्टर हा प्रकार अगदी नवीन असल्याने एक व्हॉल्व्ह असलेले जनता रेडियो असत. तेच बहुतेकांना परवडत. माझ्याकडे , होस्टेल मधल्या पहिल्या वर्षी , रेडियो  नव्हताच. सर्व विद्यार्थ्यांसाठी म्हणून एक रेडियो रूम असे. त्यात दर बुधवारी रात्री जाऊन बिनाका गीतमाला आम्ही ऐकत असू. दक्षिण भारतीय विद्यार्थी तेंव्हा हिंदी चित्रपट संगीत ऐकत नसत त्यामुळे या रेडियो रूम मधे उत्तर भारतीयांचीच बहुदा गर्दी असे. नंतर मला पदार्थविज्ञानशास्त्रामधे विशेष प्राविण्य मिळाल्याबद्दल दोन अडीचशे रुपयाचे एक बक्षिस मिळाले . त्यामधून मी एक ट्रान्झिस्टर रेडिओचे किट आणून रेडिओ तयार केल्याचे स्मरते. अर्थात रेडिओवर विविध भारती व रेडिओ सिलोन एवढी दोनच स्टेशन्स ऐकण्यासारखी असत. तीसुध्दा शॉर्ट वेव्हवर असल्याने आवाज सारखा कमी जास्ती होई.आकाशवाणीच्या बंगलूरु केंद्रावर एकदा आशा भोसले यांनी गायलेले “ मी मज हरपून गेले ग ”  हे  मराठी गाणे  एकदा लागले होते. ते ऐकल्यावर आम्हा मराठी मुलांना घरी गेल्यासारखे काही क्षण वाटले होते.

तीन चार टेनिसची कोर्टस , टेबल टेनिसची टेबले वगैरे सर्वसामान्य सुविधा तर विद्यार्थ्यांना उपलब्ध होत्याच पण बिलियर्ड किंवा स्नूकर खेळण्याची सुविधाही उपलब्ध असे. माझ्या सारख्या बहुतेकांनी बिलियर्डचे टेबल चित्रात सुध्दा बघितलेले नसल्याने हा खेळ शिकणे आम्हाला खूपच थ्रिलिंग वाटे. काही दिवसातच क्यू, ब्रेक वगैरे संज्ञा आम्हाला तोंड पाठ झाल्या व बिलियर्ड खेळण्याचा अर्धा तास आमच्या रूटीनचा भाग बनून गेला. होस्टेलची एक जिमखाना लायब्ररी असे. शास्त्रीय विषय सोडून  बाकी विषयांवरील पुस्तके आणि मुख्यत्वे इंग्रजी कादंबर्‍या     या लायब्ररीत मोठया प्रमाणात होत्या. मी  या लायब्ररीत विपुल  वाचन केले. मारी करोलीचे व्हेन्डेटा , हाऊ ग्रीन वॉज माय व्हॅली, दाफने दु मॉरियेचे रेबेक्का, कितीतरी नावे डोळयासमोर येतात. संपूर्ण वूडहाऊस मी याच लायब्ररीत वाचला. जीव्हस आणि वूस्टर यांच्या सहवासातील हे क्षण विसरणे कठीण आहे. काही  विद्यार्थी, तत्वज्ञानासारख्या विषयांवरील  पुस्तकेही वाचत. भाटीया नावाचा एक विद्यार्थी मला एकदा  ‘ काँस्टिटयूशन ऑफ इंडिया ‘ वाचताना दिसला होता. अर्थातच मी त्याला या वाचनाचे कारण विचारले होते. त्याने दिलेले उत्तर  ” आमच्या कुटुंबातील एक जण,  म्हणजे मी किंवा माझा भाऊ , पुढे नक्की पंतप्रधान होणार आहोत. म्हणजे तशी भविष्य वाणीच आहे, त्यामुळे मी तयारी करतो आहे.”  हे विक्षिप्तपणाची एक परिसीमाच ठरावी. अर्थात हा भाटिया वेडगळ असल्याची ख्यातीच असल्याने त्याच्याकडे कोणी फारसे लक्ष देत नसे. होस्टेलमधे  सर्व व्यायाम प्रकारांची उपकरणे असलेला जिम्नॅशियमही असे. मधून मधून वारे संचारल्यासारखा त्याचाही वापर होई.

होस्टेल मधे रहात असणार्‍या  ,  विशी पंचवीशीतील, हजार बाराशे तरूणांना खाऊ घालण्याचे कठिण कार्य करण्यासाठी शाकाहारी व मांसाहारी असे  दोन भले थोरले मेस होते.  हे मेस मात्र ठराविक वेळाच उघडे असत. त्या वेळा चुकल्या तर यशवंतपुरमला जाउन कॉफीवर भूक भागवावी लागे. एका वेळेस तीनशे ते साडेतीनशे विद्यार्थी एका मेसमधे जेवण करू शकत. भली थोरली लांबलचक टेबले व प्रत्येक टेबलाभोवती वीस पंचवीस खुर्च्या   अशी व्यवस्था प्रत्येक मेस मधे असे. स्टेनलेस स्टीलच्या थाळया, वाटया व चमचे मांडलेले असत. खाद्य पदार्थ मध्यभागी ठेवले जात. पोळया मात्र गरम गरम वाढल्या जात असत. बहुतेक दक्षिण भारतीय विद्यार्थी शाकाहारी असल्याने , शाकाहारी व मांसाहारी मेस, दक्षिण  व उत्तर भारतीय असे आपोआपच मानले जात. आम्ही मराठी मुले मात्र कधी शाकाहारी तर कधी मांसाहारी , खिशाच्या गरमीप्रमाणे , बनत असू. शाकाहारी मेसचे महिन्याचे बिल साठ रुपयाच्या व मांसाहारी मेसचे बिल नव्वद रुपयाच्या आसपास येई. दिवसातून चार वेळा भरपूर जेवण ,एवढया कमी बिलात कसे मिळत असे याचे आता खूपच आश्चर्य वाटते. मेस मध्ये टेबल मॅनर्स पाळण्याचे शिक्षण पुष्कळ वेळा नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना देण्याचे कार्य सिनिअर्सना करावे लागे. आपल्या थाळीत ,टोस्ट्स, जॅम किंवा लोणी याची भली थोरली रास काही नवीन विद्यार्थी करत. एक दोन दिवसात हा नवखेपणा सिनिअर्स घालवत.

जेवणाचा मेन्यू भरभक्कम असे. न्याहरीला, टोस्ट , ऑमलेट , जॅम या शिवाय  उपमा किंवा उथप्पा असे. जेवणात  एक मांसाहारी पदार्थ ,दोन भाज्या ,कोशिंबिर, चटणी ,गरमा गरम पोळया , डाळ , सांबार , रसम व अर्थातच भात ( दोन तीन प्रकारचा ) असे. बुधवार आणि रविवार  चिकन मिळे. त्याच वेळी बहुदा जेली किंवा आइसक्रीम अशी स्वीट डिश  असे. दुपारच्या चहाबरोबर इडली, डोसे, फ्रेन्च टोस्ट असे काहीतरी मिळे. दुपारी साधारणपणे प्रॅक्टीकल्स असत. एखादा थिअरीचा वर्ग  दुपारी असला तर अशा भरभक्कम जेवणानंतर कोणालाच झोप आवरत नसे व व्याख्याता मुकाटयाने आपले व्याख्यान सकाळच्या वेळी बदलून घेई. दणकून भूक लागण्याचेच ते वय असल्यामुळे पंधरा वीस इडल्या किंवा पाच सहा उथप्पा सहजपणे खाल्या जात. विचित्र भाजांची कॉम्बिनेशन्स करण्यात आमच्या मेसचा कोणी हात धरू शकत नसे. गाजर-रताळे, बीट-पालक अशा भाज्या काही वेळेस असत. शनिवार रवीवार संध्याकाळी बुफे जेवण असे. या वेळी आधी मिश्रण करून ठेवलेला दही भात किंवा सांबार भात मिळे. दक्षिण भारतीय मुलांना हा फार प्रिय असे. आम्हाला मात्र कधी तो फारसा रुचला नाही. घरून मनी ऑर्डर आलेली असली तर मल्लेश्वरमला जाउन काही खाता येई. इतर वेळी मात्र हाच भात खावा लागे.  होस्टेलचा एक दवाखाना होता. तिथे फळीवर मोठया बुदल्यांच्यात निरनिराळया रंगांची रसायने ठेवलेली दिसत. प्रत्येक वारासाठी एकच  बुदला ठरविलेला असतो अशी सर्वसाधारण समजूत असे .  सोमवारी गेलेल्या सर्व पेशंट्सना ,काहीही तक्रार असली तरी सोमवारचा म्हणून ठरविलेल्या बुदल्यातलेच औषध देण्यात येत असे. बर्‍याच  च   विद्यार्थ्यांना , आपल्याला काय होते आहे हे  इंग्लिशमधे डॉक्टरना सांगणे अवघड जाई. ” डॉक्टर! आय हॅव हेडएक इन माय स्टमक ”  सारखे विनोद त्यामुळेच बरेचदा होत. होस्टेलची  काही विशेष  शब्द संपत्ती असे. टोपो ( कॉपी), ग्लास टोपो (ग्लास ट्रेसिंग), गून्क (मूर्ख ) , लू (टॉयलेट) , लूनी बिन (होस्टेलमधली खोली) आणि सुपर बोअर हे  शब्द अजुनही आठवतात. याशिवाय बर्याच व्याख्यात्यांना टोपण नावे असत. मस्ताना ( M.S.T.Narayan),  बिगशिट(Dikshit), बिन्नी (B.N.Ayyangara)  वगैरे नावे अजुनही आठवतात. मेस मधील सांबारभाताला ब्लॅक गू म्हणायची प्रथा असे.

इन्स्टिटयूट मधे प्रवेश देताना मेरीट बरोबरच , भारताच्या सर्व प्रांतांतील विद्यार्थ्यांना प्रवेश  मिळेल हेही बघितले जाई. माझ्या वर्गात त्यामुळे पार काश्मिर ते कन्याकुमारीपासून आलेले सहध्ययी होते. याचा एक फार मोठा फायदा मला झाला. सगळया प्रांताच्यातले मित्र तर मला मिळालेच पण आधी सर्व शिक्षण पुण्यातच घेतल्यामुळे मनाला जो एक संकुचितपणा आला होता तो पार गेला व बाकी प्रांतातील लोकांकडे पण किती चांगल्या , शिकण्यासारख्या गोष्टी आहेत हे जाणवू लागले. इतक्या वर्षांनंतर सुध्दा , काश्मिर म्हणजे कुंदनलाल सोपोरी, पंजाब म्हणजे रामलाल वर्मा किंवा खुराना, आन्ध्र म्हणजे  वेंकटेश्वरलू किंवा चंद्रकलाधरराव ,  कर्नाटक म्हणजे व्ही. जयंत किंवा पार्थसारथी आणि केरळ म्हणजे वेंकटरमण ही समीकरणे डोक्यात पक्की आहेत. होस्टेलमधे रूम देताना तो विद्यार्थी  कोणत्या पदवी साठी अभ्यास करतो आहे हे न बघता त्याची सिनियॉरिटी फक्त बघत त्यामुळे बॅचलर्स किंवा मास्टर्स करणार्‍या   पासून, पोस्ट डॉक्टरेट संशोधन करणार्‍या   पर्यंत सर्वांची सरमिसळ असे. त्यामुळे तुमचा शेजारी कोणत्या प्रांतातला आहे किंवा त्याची शैक्षणिक पात्रता काय आहे  हे कधी सांगता येत नसे. असे असले तरी त्या त्या प्रांतातल्या विद्यार्थ्यांची अर्थातच  जास्त मैत्री असे. एकत्र गप्पा मारत बसणे , चित्रपटाला जाणे हे जास्त करून पुणे  ,मुंबई किंवा नागपूरच्या मित्रांबरोबरच  होत असले तरी बाकी मित्रांबरोबरही जाणे येणे  भरपूर असे. पण सिनेमाला जायचा मित्र निराळा , रविवारी मल्लेश्वरमला चक्कर टाकायचा मित्र निराळा असे बहुतेकांचे ठरलेले असे. वैयक्तिक पातळीवर जरी सर्व प्रांतातले मित्र असले ,तरी दक्षिण भारतीय-उत्तर भारतीय असा एक अंर्तप्रवाह असे. उत्तर भारतीय मुले दक्षिण भारतीयांना सौदी म्हणत. उत्तर भारतीय ,साजरे करत असलेल्या होळी, दिवाळी वगैरे सणांपासून दक्षिण भारतीय स्वत:ला अलग ठेवत. मराठी, गुजराती मुले मधेच लटकत रहात. वैयक्तिक  रित्या मला दक्षिण भारतीय मित्र जास्त जवळचे वाटत. ते जास्त सिनसिअर वाटत. उत्तर हिंदुस्थानी मित्र जरा या बाबतीत थोडे कमी वाटत. उत्तर भारतीय विशेषकरून पंजाबी मुले, जास्त डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत. असे प्रयत्न मात्र बाकी सर्व जण एकत्र येऊन हाणून पाडत. चहाच्या कपातील वादळे लगेच शमत .

माझ्या इन्स्टिटयूट मधील वास्तव्यात मला खूप मित्र मिळाले. बहुतेक जण साधे सरळ होते. काही मात्र अत्यंत विचित्र व स्वार्थीपणे वागत. कोणत्याही परिक्षेचा निकाल लागला की आमचा एक सहध्ययी, काहीही करून तो निकाल स्वत: प्रथम जाणून घेई व नंतर त्या परिक्षेत ज्या कोणाला कमी गुण मिळाले असतील त्यांच्या रूमवर जाऊन त्यांना हे वर्तमान देत असे. याबरोबरच स्वत:ला मिळालेल्या गुणांबद्दल बढाई मारण्यास तो विसरत नसे. तो आला की प्लेगची साथ आली असे म्हणण्याची प्रथा पडली होती. एका परिक्षेत या मित्राला बरेच कमी गुण मिळाले होते व त्यामुळे तो कोणाकडे गेला नव्हता हे लक्षात आल्यावर ,आमचा जवळ जवळ सर्व  वर्ग त्याच्या खोलीवर त्याला कसे कमी गुण मिळाले आहेत हे सांगण्यासाठी एकदा गेल्याचे मला स्मरते. बहुदा धसका घेऊन यानंतर या मित्राने आपली ही सवय सोडूनच दिली होती.

आमच्या बरोबर कुलभूषण नावाचा एक हरियाणी सहध्यायी होता. हा मुलगा म्हणजे एक अजब रसायन होते.घरची परिस्थिती बरीच  बरी असल्याने नेहमीच चार पैसे याच्या खिशात खुळखुळत असत.व कोणतीही गोष्ट पदरात पाडून घेण्यासाठी भला बुरा कोणताही मार्ग स्वीकारण्याचे त्याला काहीच सोयर सुतक नसे. मेस मधे एखादा स्पेशल पदार्थ लिमिटेड असला तर जास्त मिळवणे, दुसर्‍याने     रिझर्व्ह केलेले पुस्तक ग्रंथालयातून चिरिमिरी देऊन आपल्यालाच  इश्यू करून घेणे  वगैरे त्याचे उद्योग नेहमीच चालत.बहुतेक सहध्ययी अगदी सरळ साधे असल्याने स्वत:ची काहीतरी करूण कहाणी सांगून स्वत:चे  काम  त्यांच्या कडून करून घेण्याची अजब करामत त्याच्या अंगात  होती. या कुलभूषणला अभ्यासात गती जरा कमीच होती. मशीन ड्रॉइंग हा विषय तर त्याला अगदी संकट प्राय असे. त्याने काढलेले ड्रॉइंग शीट्स बहुधा रिजेक्ट होत. त्यामुळे त्याने दोन सरळ स्वभावाच्या मित्रांना भूलथापा देऊन व त्यांना  काहीतरी पैशांचे आमिष दाखवून त्याने शीट्स काढून घेतलेले मला आठवतात. इन्स्टिटयूट एक ऍटॉनॉमस बॉडी असल्याने परिक्षा वगैरे अंतर्गतच असत. प्रत्येक विषयाचा व्याख्याता परिक्षा घेई. यामुळे खूप वेळा त्या व्याख्यात्याच्या एखाद्या विद्यार्थ्याबद्दलच्या मताचाही त्याला मिळलेल्या गुणांवर परिणाम होई. याचाच कुलभूषणने प्रचंड फायदा करून घेतलेला मला आठवतो. प्रथम वर्षाच्या परिक्षेत जवळ जवळ सर्व विषयात आपण अयशस्वी होणार हे याच्या लक्षात आले होते. त्यामुळे सुट्टीत घरी न जाता हा होस्टेल मधेच राहला होता. व प्रत्येक व्याख्यात्याकडे जाऊन फक्त त्याच्याच विषयात कमी गुण मिळाल्यामुळे आपले वर्ष  कसे फुकट जाईल याची करूण कहाणी सांगून अखेरीस तो चक्क  परिक्षा उत्तीर्ण झाला होता.

शर्मा नावाचा कपाळाला गंध लावणारा व अत्यंत साधेपणे रहाणारा उत्तर प्रदेशीय कायस्थ मुलगा आमच्या बरोबर होता. त्याच्या इतका कुशाग्र विद्यार्थी मी कधी व कुठेही बघितला नाही. कोणतीही अभ्यासातील अडचण सोडविण्यासाठी अखेरचे ऑप्शन म्हणून आम्ही त्याचा वापर करत असू. सर्व विषयात  असलेली त्याची गती आश्चर्यजनक होती.त्याचा पदवीचा स्ट्रीम निराळा असल्याने तो नंतर दुसरीकडे गेला. तो असे पर्यंत वर्गात ,  कोणत्याही विषयात ,  सर्वात आधिक गुण  दुसर्‍या     कोणाला मिळणे जवळ जवळ अशक्य होते. एअरॉनॉटिक्सला शिकणारा देशपांडे नावाचा मित्र नेहमी पार्शल डिफरिअन्शियल समीकरणे सोडवताना दिसे. त्याला आम्ही पार्शल देशपांडेच  म्हणत असू. मागच्या वर्षी राष्ट्रपती अबदुल कलाम यांचे ‘अग्नीपंख’ हे पुस्तक वाचताना त्यांना रॉकेट्ससाठी लागणारी काही गणिते देशपांडेनी सोडवून दिली होती हे वाचले व मोठी मजा वाटली. भौतिकी मधे संशोधन करणारा गंभीर नंतर काही वर्षांनी मला ‘इसरो’ मधे भेटला होता. भारताच्या स्वत:च्या उपग्रहांची वेगवेगळया अवस्थांखाली चांचणी करण्याच्या विभागाचा तो त्यावेळी प्रमुख होता.

इन्स्टिटयूट मधल्या प्रथम वर्षी , युनिव्हर्सिटी पेक्षा इथली अभ्यास पध्दती निराळी आहे ही कल्पना येण्यास सर्वांनाच वेळ लागे. त्यातच  बहुतेक विषयांचा सारखा गृहपाठ असे. हा गृहपाठ प्रथम सर्वजण स्वत: करण्याचा प्रयत्न करत. पण थोडयाच दिवसात हे अशक्य असल्याचे लक्षात येत असे. तोपर्यंत वर्गातील बहुतेकांशी मैत्री झालेली असे. मग सिनिअर्सचा सल्ला घेतला जाई व प्रत्येक गृहपाठ त्या विषयाची रुची असलेले एक दोन जण प्रथम पूर्ण  करीत. मग रात्र भर गृहपाठाची वही होस्टेलभर फिरे आणि सकाळी सर्व वर्गाचा गृहपाठ सबमिट होई. एका रात्रीत अशा प्रकारे चार ते पाच गृहपाठ सुध्दा करावे लागत. व्याख्यात्यांना सुध्दा या कॉपी पध्दतीची पूर्ण माहिती असल्याने ते सहसा एकच उत्तर पत्रिका तपासत. अंतर्गत परिक्षा पध्दतीमुळे व्याख्याते आणि विद्यार्थी यांच्यातील संबंध फार महत्वपूर्ण असत. दुसर्‍या     वर्षापर्यंत  ही सर्व प्रणाली माझ्या चांगलीच परिचयाची झाली. तुम्हाला यश मिळवायचे असले तर फक्त अभ्यास करून चांगले पेपर सोडवणे एवढेच पुरेसे नव्हते. तुम्ही सर्व व्याख्यात्यांना , हुशार म्हणून माहिती असण्याचीही गरज होती. मला इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंग मधले काही विषय चांगले समजत. मी त्याचाच फायदा करून घ्यायचा ठरवले. त्या एक दोन विषयांच्या मिड टर्म टेस्ट्स मध्ये मी झटून अभ्यास केला व इतरांना दुर्बोध अशा त्या विषयांत जवळ जवळ पूर्ण गुण मिळवण्यात यशस्वी झालो. यानंतर जादू घडावी तसा माझ्या हुशारीचा इंडेक्स वर गेला. इतर मित्र तर माझ्याकडे जरा आदराने बघू लागलेच पण वर्गात सुध्दा व्याख्यात्यांची माझ्याकडे बघण्याची दृष्टी बदलते आहे हे माझ्या लक्षात आले. त्यानंतर मला मागे बघावे लागलेच नाही. व्याख्याते , गृहपाठाचीच वही फक्त बहुदा माझीच तपासतात  हेही नंतर माझ्या लक्षात येऊ लागले. अणि प्रथम वर्षी साधारण दर्जाचा असणारा मी,  दुसर्‍या     वर्षानंतर एकदम वरच्या पातळीचा विद्यार्थी झालो. प्रॅक्टीकल्स व प्रॉजेक्ट वर्क यात अक्षरश: स्वप्नात मिळावे तसे गुण मला मिळत गेले व पदवी परिक्षेत आमच्या स्ट्रीम मधे सर्वाधिक गुण मिळवण्यात मी यशस्वी झालो. पदवीपरिक्षेनंतर , सरळ डॉक्टरेटला प्रवेश, ही सहसा कोणाला न मिळणारी संधी   मला नंतर मिळाली पण शैक्षणिक क्षेत्रात पुढे न जाण्याचे मी आधीच ठरविले होते त्यामुळे मी त्याचा फायदा घेऊ शकलो नाही.

त्या वेळी आमची इन्स्टिटयूट ही शास्त्रीय संशोधनाच्या क्षेत्रात अग्रगण्य मानली जाई. नंतरच्या काळात स्पेस व रॉकेटरी मुळे प्रसिध्द झालेले सतिश धवन हे  त्यावेळी आमचे डायरेक्टर होते. सी.व्ही.रामन, एच.जे.भाभा, विक्रम साराभाई व जे.सी.घोष यांच्यासारख्यांचा इन्स्टिटयूटशी निकटचा संबंध असे.  मी प्रथम वर्षाला असतानाची एक आठवण मनातून पुसली जाणे शक्य नाही. कोणतेतरी व्याख्यान सुरु असताना ,खोलीच्या दारावर टक टक झाली होती व अत्यंत खणखणीत आवाजात  ” मे आय कम इन सर ? ” अशी विनंती, एका व्यक्तीकडून करण्यात आली होती. कर्नाटकी पध्दतीचा फेटा , कोट व धोतर असा त्या व्यक्तीचा वेष होता. आमच्या व्याख्यात्यांनी जवळ जवळ लोटांगण घेण्याच्या अवस्थेत  ”ऑफ कोर्स ,ऑफ कोर्स ” असे म्हणत ती व्यक्ती म्हणजे प्रसिध्द शास्त्रज्ञ सी.व्ही.रामन असल्याचे आम्हाला संगितले होते. कोणत्याही वस्तूचा रंग म्हणजे प्रत्यक्षात काय असते या संबंधी त्यांचे संशोधन चालू होते. व त्या संबंधांत एक प्रश्नमालेका ते अनेकांकडून  सोडवून घेत होते. तीच प्रश्नमालिका आमच्याकडून त्यांनी सोडवून घेतली होती. आमची  ” वेल बॉइज ! व्हॉट आर यू  स्टडीइंग ?”  वगैरे चौकशी करून ते निघून गेले होते .एवढया जगप्रसिध्द शास्त्रज्ञाचे जवळून घेतलेले हे दर्शन मला कधीच विसरता येणार नाही. आमच्या इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन्स इंजिनीअरिंग डिपार्टमेंटचे  हेड ,  प्रोफेसर चंद्रशेखर अय्या होते. या विषयातील एक तज्ञ म्हणून ते ओळखले जात. ज्याला ‘ कटिंग एज टेक्नॉलॉजी ‘ म्हणतात तसा हा विषय असल्याने आपल्या विद्यार्थ्यांना अगदी नवीन तंत्रज्ञानाची तोंडओळख व्हावी यावर त्यांचा कटाक्ष असे. त्यामुळेच अभ्यासक्रमात ‘सॉलिड स्टेट डिव्हायसेस ‘ .’डिजिटल व ऍनालॉग कॉम्प्यूटींग ‘ यासारखे विषय असण्यावर त्यांचा कटाक्ष असे. याशिवाय भारत इलेक्ट्रॉनिक्स मधील ट्रान्झिस्टर उत्पादन विभाग, नॅशनल एअरॉनॉटिक्स लॅब मधील डिज़िटल कॉम्प्यूटर व रेडार  यांसारख्या गोष्टींची माहिती होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या अभ्यास सहली नेहमीच आयोजित केल्या जात. अकाउस्टिक्स, मायक्रोवेव्ह्स , प्रिन्टेड सर्किट्स , सॉलिड स्टेट डिव्हायसेस फॅब्रिकेशन यांसाठीच्या  आमच्या प्रयोगशाळा अतिशय अद्यावत ठेवल्या जात. प्रोफेसर अय्यांशी कधीही केलेली चर्चा इतकी नवीन माहिती देऊन जात असे की आम्ही सर्व जण त्या संधीची नेहमीच वाट बघत असू.

इन्स्टिटयूटच्या अभ्यासक्रमात दर वर्षी दोन अभ्यास सत्रे असत. मे महिन्यात वार्षिक परिक्षा होई. यानंतर दोन महिने प्रॅक्टीकल ट्रेनिंगसाठी जावे लागे. पहिल्या वर्षी हे ट्रेनिंग मी मुंबईला ‘ बेस्ट ‘ च्या बस रिपेअर शॉप मधे घेतले होते. दुसर्‍या   वर्षी काश्मिर मधील गांधरबल पॉवर हाऊस मधे तर शेवटच्या वर्षी बंगलूर मधेच ‘इलेक्ट्रॉनिक्स रिसर्च व डेव्हलपमेंट लॅबोरेटोरी’ या संरक्षण मंत्रालयाच्या विभागात मी काम केले. या तिन्ही अनुभवातून बरेच शिकता आले व जेंव्हा मी प्रत्यक्ष कामाला लागलो तेंव्हा फार नवखेपणा जाणवला नाही.

होस्टेलमधे एवढया सुविधा असल्या तरी वीक एन्ड्सना आम्ही बंगलूरु शहरात खूप भटकत असू. बंगलूरु शहराच्या आसपास अनेक तलाव होते. या तलावांच्या बाजूंना विंड ब्रेकर्स म्हणून सुरूची खूप झाडे लावलेली असत. त्यामुळे शहराच्या बाहेरील भाग मोठा निसर्गरम्य वाटे. कधीतरी सायकली घेऊन फिरण्याचा मूड असला तर मोठी मजा येत असे. अल्सूर तलावावर बोटींगची सोय होती तेथेही एक दोनदा आम्ही गेलो होतो. लाल बाग जवळ असलेल्या  ‘मावळी टिफिन रूम’ मधला किंवा ब्रिगेड रोड वरच्या  ‘कौशीज ‘ मधला मसाला डोसा खाणे  , केम्पगौडा सर्कलवरच्या ‘नापोली ‘ मधली एक्स्प्रेसो कॉफी पिणे हा वीक एन्ड्स चा अनिवार्य  भाग असे.   हे शहर तेंव्हापासूनच अतिशय कॉस्मॉपॉलिटन असल्यामुळे ,कॅन्टोन्टमेंट भागातील सिनेमा थिएटरांत ,नवीन नवीन इंग्रजी सिनेमे  दर आठवडयाला येत असत.त्यामुळे जवळ जवळ प्रत्येक शनिवारी संध्याकाळी सिनेमा व नंतर बाहेरच जेवण असा कार्यक्रम असे.  महिना अखेरीला  खिसा हलका असला की याला अपवाद असे  व ब्लॅक गू वरच  शनिवार संध्याकाळ काढावी लागे. अशा वेळी जेवण झाल्यावर यशवंतपुरमला जाऊन गप्पा मारत कॉफी पिण्याचा कार्यक्रम हमखास ठरत असे. इन्स्टिटयूटमधल्या वर्षांत मी उत्तम उत्तम असे अनेक इंग्रजी चित्रपट बघितले. लॉरेन्स ऑलिव्हर यांचा ‘माय फेअर लेडी ‘ , ऍन्थनी क्वीन चा ‘बिहोल्ड अ पेल हॉर्स ‘ ,एलिझाबेथ टेलरचा  ‘सॅन्ड पायपर ‘ अनेक नावे अजून आठवतात. सिनेमाचा जर सेकंड शो असला तर पुष्कळ वेळा गप्पा मारत कॅन्टोन्टमेंट पासून आम्ही चालत येत असू. तसे हे अंतर खूपच होते. पण गप्पांत दोन अडीच तास कसे जात ते कळत नसे. मोरारजीभाईंच्या कृपेने , पुण्याला व महाराष्ट्रात  त्या काळात संपूर्ण दारूबंदी होती. बंगलूरु शहर तेंव्हा ‘ वेट ‘ म्हणून प्रसिध्दच होते.  दारूची चव  काय असते ही जिज्ञासा आम्हाला  त्या काळात खूपच होती. आमच्या एका मित्राचे  वडील नेव्ही मधे असल्याने त्याला या विषयातले बरेच कळते असे आम्हाला वाटत असे. त्याच्या सकट आम्ही चार मित्रांनी ही चव चाखण्याचा बेत एकदा आखला . ब्रिगेड रोड वरच्या एका बार मधे जाऊन आम्ही एक बीअरची बाटली  व चार ग्लासची ऑर्डर भीत भीत दिली होती. आम्ही तिघांनी जेमतेम बोटे बुडतील एवढी बीअर घेतली होती. आमच्या तज्ञ मित्राने मात्र बाकीची बाटली संपवली होती. खोकल्याच्या औषधातून जातो त्यापेक्षाही कमी मद्यार्क बहुदा तेंव्हा आमच्या पोटात  गेला असावा. बीअर व चार ग्लास आणून देणारा तो वेटर आमच्याकडे बघत  ,गालातल्या गालात तेंव्हा का हसत होता याचा उलगडा आम्हाला बराच नंतर झाला होता.

या सगळयात ,इन्स्टिटयूट मधली वर्षे कधी सरली ते कळलेच नाही. जसजसे दिवस संपत आले तसतसे आयुष्यात पुढे काय करायचे याचे बेत आखण्यात सर्व गुंतू लागले. बरेच जण लगेचच , किंवा मास्टर्स करून मग  ,परदेशी जाण्याच्या मागे लागले. थोडया लोकांनी सैन्यात किंव सरकारी नोकरीत प्रवेश घेतला.माझ्या सारख्या थोडया जणांना इंडस्ट्री मधे जायचे होते ते नोकरी शोधण्याच्या मागे लागले. आज इतक्या वर्षांनी सुध्दा आठवण झाली की मन ,क्षणार्धात चाळीस वर्षे मागे जाते. इन्स्टिटयूटचे दिवस परत आठवतात. अजूनही होस्टेलमधली माझी खोली आठवते. वेडयासारखी रात्र रात्र जागून केलेली सबमिशन्स आणि अभ्यास आठवतो. आईच्या पत्रांची आतुरतेने बघितलेली वाट आठवते. आणि मित्रांच्या सहवासात घालवलेले ते स्वच्छंद क्षण आठवतात. इन्स्टिटयूटचे दिवस केंव्हाच सरले पण  त्या दिवसांच्या काही गडद काही पुसट अशा आठवणी मनात अजूनही रेंगाळतात .

5 सप्टेंबर 2003

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “काही गडद काही पुसट

  1. शिर्षक आवडलं, लेखही छान.मला कधीच घर सोडून राहायला न मिळाल्याने तुम्हा लोकांचा नेहमीच हेवा वाटतो.:)

    Posted by Bhagyashri | जून 19, 2009, 9:41 pm
  2. मी तर या मताचा आहे की प्रत्येकाने कधी ना कधी होस्टेल मधे रहायलाच पाहिजे

    Posted by chandrashekhara | जून 29, 2009, 10:22 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: