.
Travel-पर्यटन

किनारा मला पामराला !


पेनांगला आम्ही पोचलो तेंव्हा सकाळचे दहा साडेदहाच वाजले होते. घरून सकाळी पाच वाजता निघाल्याने प्रवासाचा शीण वगैरे येण्याचे खरे म्हणजे काही कारण नव्हते. पण मला केंव्हा एकदा हॉटेलवर पोचतो असे झाले होते. आम्हाला न्यायला जी गाडी आली होती त्याचा चालक मात्र आम्ही जाता जाता रस्त्यावरच असलेल्या काही जागा बघितल्याच पाहिजेत असा आग्रह सारखा करत होता. शेवटी त्याच्या आग्रहाला बळी पडून स्नेक टेंपल मधले अस्तावस्त पडलेले साप बघण्यात व जॉर्जटाउनमधे फेरफटका मारण्यात आम्ही दोन तीन तास, माझ्या मते अगदी वाया, घालवले. आमचे हॉटेल, पेनांग बेटाच्या उत्तरेला असलेल्या किनार्‍यावर होते त्यामुळे बेटाला संपूर्ण वळसा घालण्यामधे आणखी वेळ गेला. फिरंगी बीचवरच्या आमच्या हॉटेलमधे शेवटी आम्ही जेंव्हा पोचलो तेंव्हा दुपारचा एक वाजला होता. स्वागत कक्षावर पोचल्यावर हे समजले की चेक इनची वेळ दुपारी एकचीच आहे. आमचा चालक आम्हाला उशिर व्हावा याचा प्रामाणिक प्रयत्न कां करत होता यातले इंगित तेंव्हा आमच्या लक्षात आले.

आमच्या खोलीत शिरताना माझ्या डोक्यात असे विचार होते की आता जरा वेळ लोळावे व मगच जेवण करण्याचा विचार करावा. पण मी खोलीचे दार उघडले आणि समोर जे काही दिसले ते बघितल्यावर हातातली बॅग खाली ठेवण्याचेही विसरलो.

माझ्या हॉटेलमधल्या खोलीच्या उत्तर दिशेला, भिंतीऐवजी एक संपूर्ण काचेची खिडकीच होती. या खिडकीतून जे दृष्य दिसत होते ते एखाद्या पिक्चर पोस्ट कार्डवर असते तसे सुंदर होते. इतके सुंदर दृष्य मी आतापर्यंत कधी बघितलेच नव्हते. पेनांगचा फिरंगी किनारा इतका नयनमनोहर असेल असे मला कधी स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. आधीचे सर्व विचार विसरून मी घाईघाईने कपडे बदलेले आणि फ्लिप्फ्लॉप्स पायात चढवत बीचकडे पळालोच.

थोडीशी लालसर छटा असलेल्या वाळूचा एक स्वच्छ पट्टा, त्याच्या मागे पांढर्‍याशुभ्र फेसाळणार्‍या लाटा आणि त्या मागे लाटांच्यावर डुलणारी एक अथांग निळाई बघून माझे मन अक्षरश: हरखून गेले. उजव्या बाजूला नजरेच्या टप्यापर्यंत हाच वाळूचा पट्टा असाच पसरला होता. डाव्या बाजूला गालबोट लावावे तसे काही खडक पाण्यात थोडेसे आतपर्यंत गेले होते. त्यांच्या मागे एक हिरव्यागार वृक्षराईंनी नटलेली टेकड्यांची रांग पार क्षितिजापर्यंत पोचल्यासारखी वाटत होती. ही टेकड्यांची रांग, सूर्य डोक्यावर होता तरी निळसर हिरवी आणि थोडीशी धूसर वाटत.होती. सर्वसाधारणपणे, समुद्र किनारा म्हटले की त्यावर प्लॅस्टिकच्या पिशव्या, भेळेचे फेकून दिलेले कागड आणि शहाळ्यांची टरफले यांनी तो घाण केलेला असलाच पाहिजे या आतापर्यंतच्या माझ्या समजुतीला तडा गेला होता. एवढा मोठा किनारा इतका स्वच्छ कसा? असे मला सारखे वाटत राहिले. पुढचे दोन तीन दिवस या किनार्‍यावर मनमुराद भटकलो तेंव्हा पेनांगच्या सहलीचे अगदी चीज झाल्यासारखे वाटले.

कधीही सहलीला जाण्याचा काही बेत ठरवायचा असला तर माझी पहिली आवड समुद्र किनार्‍यावर जाण्याचीच असते. पण पेनांगच्या फिरंगी बीच सारखे किनारे फार थोडेच. बालीला जायचे ठरल्यावर मी नेट वर बराच शोध घेऊन तिथला कुटा किनारा पर्यटकांमध्ये बराच प्रसिद्ध  असल्याचे शोधून काढले. हा किनारा आहे खूपच विशाल आणि समुद्र पण अतिशय शांत वाटतो. पण मला तरी हा किनारा मुंबईच्या चौपाटी सारखाच वाटला. बीचच्या मागचा मोठा रस्ता व त्यावरची दुकाने हे सगळे तिथलीच आठवण करून देतात. बालीला मला खरा आवडला तो ऊलवाटूच्या मंदिरातून दिसणारा भव्य देखावा. सर्व बाजूंनी दोन तीन हजार फूट खाली सरळ रेषेत तुटलेला कडा व त्याच्या खाली खडकाळ किनार्‍यावर आघात करून फुटणार्‍या व फेसाळणार्‍या भव्य लाटा तुमच्या नजरेचे पारणे फेडतात. या मंदिरातून आसपास बघितले की आपण हवेत तरंगत आहोत असेच वाटायला लागते. या किनार्‍यावर पण काही धाडसी पर्यटक सर्फिंग करतात म्हणे.

भारतातल्या किंवा दक्षिणपूर्व एशियामधल्या कोणत्याही समुद्र किनार्‍यावर सहल करताना हवा दमट आणि उष्णच असते. त्यामुळे समुद्र किनार्‍यावर जाताना गरम कोट घालून कधी जावे लागेल असे स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. सॅन फ्रान्सिस्को जवळच्या पॅसिफिका किनार्‍यावर जाताना मात्र गरम कोटाबरोबर कानटोपी, मफलरसुद्धा वापरावे लागले. कॅलिफोर्नियाच्या पश्चिम किनार्‍याला लागून कॅलिफोर्निया 1 हा एक मोठा निसर्गरम्य रस्ता जातो. या रस्याच्या जवळच पॅसिफिका हे गाव व हा समुद्र किनारा आहे. टेकड्यांच्या रांगा अगदी किनार्‍यापर्यंत येत असल्याने हा संपूर्ण परिसर फारच निसर्गरम्य आहे. पण अतिशय बोचरे थंड वारे सतत वहात असल्याने त्यांच्यापासून स्वत:चे संरक्षण करतच इथे थांबावे लागते. या किनार्‍यावरून समुद्रात बरेच आतपर्यंत जाण्यासाठी एक जेट्टी बांधलेली आहे. त्यावरून आम्ही चालत जाऊन टोकाला उभे राहिलो. खोल समुद्रात बोटीवर उभे राहण्यासारखेच हे होते. तिथून किनार्‍याकडे नजर टाकल्यावर आपल्यापासून लांब जाऊन  फुटणार्‍या लाटा बघणॆ हा मला तर एक अभूतपूर्व असा अनुभव वाटला.

काही काही वेळा मात्र एखादा किनारा माझी निराशा करतो. गोव्यातल्या किनार्‍यांनी अशीच माझी निराशा केली. दोना पावला आणि मिरामार हे दोन किनारे तर पणजी शहरातच असल्याने मुंबईची चौपाटी किंवा चेन्नईचा मरिना यापेक्षा फारसे निराळे वाटत नाहीत. कळंगुट, वागातोर किंवा कोळवा हे किनारे सृष्टिसौंदर्याबद्दल प्रसिद्धच आहेत. पण ते माणसांनी इतके लगडलेले असतात की त्यावर मनमुराद असे भटकताच येत नाही. टॅटू काढणारे, पॅरासेलिंग, मसाज करणारे असे अनेक प्रकारचे लोक तिथे आपला धंदा करत असतात. त्याच्यातच किनार्‍याच्या एका भागावर आडवे पहुडता येईल अशा आरामखुर्च्या टाकून, त्या खुर्च्यांच्यावर झोपून, आपली कातडी राबविणार्‍यांना, नाना प्रकारची खाद्यपेये पुरविणार्‍या झोपड्या दर शे दोनशे फुटावर दिसतात. कमीत कमी कपडे घालून या आरामखुर्च्यांवर पडलेल्या गौरांगना व ते दृष्य पहाण्यासाठी फिरणारे आंबटशौकी यांच्या भाऊगर्दीत किनार्‍यांचे सृष्टिसौंदर्य कोठेतरी हरवूनच जाते.

असे असले तरी काही काही किनारे मात्र मनात ठसतात. पोंडिचेरीचा फ्रेंच टाउनजवळचा किनारा किंवा महाबलीपुरमचा किनारा हे मला असेच आवडलेले किनारे आहेत. पण मला सर्वात जो किनारा आवडतो तो तर महाराष्ट्रातच म्हणजे अर्थातच कोकणात आहे. दापोली गावातून पश्चिमेकडे आसुद किंवा हर्णै बंदराकडे जाणारा एक रस्ता आहे. या रस्त्याने बारा पंधरा किलोमीटर गेल्यावर डावीकडे मुरुडचा फाटा लागतो. मागच्या वेळी मी गेलो होतो तेंव्हा या फाट्यावर पळसपांगार्‍याची झाडे इतकी मस्त फुलली होती की त्यांच्या केशरी लाल फुलोर्‍यांच्याकडे बघतच रहावे. या फ़ाट्य़ावरून पुढे गेले की एक रस्ता खाली मुरुड गावात जातो. दुसर्‍या थोड्याश्या चढणीच्या रस्त्याने पुढे गेले की डावीकडे डोंगरी आणि उजवीकडे गर्द झाडी याशिवाय काही दिसत नाही. पण ऐकू यायला लागतो एक धीर गंभीर आवाज. एखाद्या ब्रम्हवृंदाने मंत्रपठण केल्यासारखा. समुद्राची ही गाज मग काही आपली पाठ सोडत नाही. तसेच थोडे पुढे गेले की झाडी एकदम संपतेच आणि नजरेत येतो एक विशाल किनारा. मऊ रुपेरी वाळू, फेसाळणार्‍या लाटा आणि अरबी समुद्राचे अथांग पाणी तुम्हाला मंत्रमुग्ध करते. या किनार्‍याच्या अगदी समोर दोन मोठी छान हॉटेल्स आहेत. समुद्राकडच्या बाजूला असलेल्या बाल्कनीत आरामखुर्चीत बसून, ती धीरगंभीर गाज ऐकत, एखादे पुस्तक वाचण्याची मजा काही औरच आहे. सकाळ झाली की ऊठून या कर्द्याच्या किनार्‍यावर मनमुराद भटकावे. सी-गल्स पक्षांचे मोठे थवे तुमच्या डोक्यावरून फिरतात ते बघावे. शंख-शिंपले किंवा स्टार फिश उचलून हातात घ्यावे. किंवा बोटीतून डॉल्फिन मासे बघायला जावे. वेळ त्या किनार्‍यावरच्या रुपेरी वाळू सारखाच हातातून निसटत जातो.

कोकणातले इतर काही किनारे सुद्धा असेच मोठे सुंदर आहेत.पण प्रत्येकाचा साज आणि बाज हा स्वतंत्र आहे. मालवणला, सिंधुदुर्गाकडे बोटीतून जाताना जर मागे वळून पाहिले तर अर्धचंद्राकृति आकाराचा एक मोठा किनारा दिसतो तारकर्लीचा हा किनारा सुद्धा असाच मोठा सुंदर आहे. या किनार्‍यावरून संध्याकाळी सिंधुदुर्गाच्या मागे जात मावळणारा सूर्य बघणे म्हणजे नयनांचे पारणे फेडण्यासारखे आहे.

कवी कुसुमाग्रजांची ‘कोलंबसाचे गर्वगीत’ म्हणून कविता आहे. या कवितेत कोलंबस मोठ्या गर्वाने म्हणतो “अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा, किनारा तुला पामराला!” परंतु मला तर या कोलंबसाला सारखे सांगावेसे वाटते की ‘’हो रे हो बाबा ! किनारा नक्कीच मला पामराला.

14 जून 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: