.
People व्यक्ती

जिगसॉ पझल


मी लहान असताना, सुप्रसिद्ध लेखिका इरावतीबाई कर्वे या आमच्या घरासमोरच असलेल्या त्यांच्या बंगल्यात रहात असत. एकतर त्या वेळी एरंडवण्याच्या माळावर असलेल्या आमच्या वस्तीत, फारशी घरे अशी नव्हतीच आणि दुसरे म्हणजे, कर्वे कुटुंब तसे आमच्या नात्यातलेच होते. त्यामुळे कर्व्यांच्या घरात माझे जाणे येणे बरेच असे. एकदा इरावतीबाई काही कामासाठी अमेरिकेला गेल्या. परत येताना त्या 5000 तुकड्यांचे एक भले थोरले जिगसॉ पझल किंवा कोडे घेऊन आल्या. सामान आणण्यावरचे वजनाचे निर्बंध त्या वेळी खूपच कडक असत. त्यामुळे ते पझल सुटे करून एका पिशवीतून ते तुकडे त्यांनी आणले होते. घरी आल्यावर एक मोठ्या लाकडी टेबलावर त्यांनी आमचा मुलांचा कॅरम बोर्ड ठेवून त्यात या सगळ्या तुकड्यांचा ढिगारा केला होता. त्या तुकड्यांतून कोणते चित्र निर्माण होणार आहे? कोणता तुकडा कडेचा आहे? आणि कोणता तुकडा कोणत्या तुकड्याला जोडला जाईल? हे सर्व सांगणे केवळ अशक्य होते. घरातले, लहान मोठे, आले गेले सर्व जण या तुकड्यांवर अगदी दहा पंधरा मिनिटांचा वेळ असला तरी आपला हात चालवून बघत. प्रथम प्रथम काहीही कल्पना न येणारे ते चित्र जसजसे दिवस गेले तसतसे स्पष्ट होऊ लागले. काळपट असणारे तुकडे जमिनीचा भाग असतील असे आधी वाटले होते पण नंतर ते एका झाडाचा भाग निघाले. नक्की आकाशाचे म्हणून काही निळसर तुकडे आम्ही बाजूला काढले होते ते तर समुद्राचे निघाले. जे तुकडे एकमेकाला जोडले जातील असे वाटले होते ते प्रत्यक्षांत विरुद्ध कोपर्‍यांतले निघाले. महिना दोन महिन्यांनंतर जेंव्हा ते चित्र पूर्ण झाले तेंव्हा आमच्या कल्पनेतल्या चित्रापेक्षा संपूर्ण निराळेच असे चित्र आमच्या नजरेसमोर आले होते.

परवा सहज विचार करताना माझ्या लक्षात आले की अरे! आपले आयुष्य पण एक जिगसॉ पझलच आही की.! उमज आलेल्या वयापासून आपण त्याचे तुकडे लावण्याचा प्रयत्न करतो आहोत. एक तुकडा जागेवर बरोबर बसला की वाटते की पुढचे चित्र आपल्याला उमगले आहे पण प्रत्यक्षात नंतर तयार होणारे चित्र काही निराळेच होते आहे. आई,वडील, भाऊ व  नंतरच्या काळात, पत्नी, मुले, नातवंडे यांची चित्रे, सलग अशा बर्‍याच तुकड्यांनी मिळून बनलेली आहेत.पण काही काही माणसे व त्यांच्या आठवणी ही एखाद- दुसर्‍याच तुकड्यावरच आहेत. ती परत कधीच या जिगसॉ पझलमधे दिसलेली नाहीत. पण ती माणसे असलेले पझलचे तुकडे जेंव्हा मी लावत होतो तेंव्हा ती माझ्या आयुष्याचा महत्वाचा भाग होती हे तितकेच खरे.

या जुळविलेल्या कोड्यावर एक नुसती नजर टाकली तरी डाव्या बाजूला तळाच्या तुकड्यावर चित्र दिसते आहे, माझ्या लहानपणातली अगदी घट्ट असलेली माझी मैत्रिण, गौरीचे. इरावतीबाई कर्व्यांची ही धाकटी मुलगी. मी रहात असलेल्या एरंडवण्याच्या माळावर आमची वस्ती चार पाच घरांची असल्याने लहान मुले अशी कितीशी असणार? चार पाच वर्षे वयापासून पुढची सात,आठ वर्षे आमची दोघांची मैत्री अभेद्य राहिली होती. रोज सकाळ संध्याकाळ, सुट्टीच्या दिवशी आणि मे महिन्यात तर दिवसभर आम्ही खेळत असू आणि हुंदडत असू. दिवाळीत किल्ला करणे, गणपतीची आरास करणे या सर्वात तिचा भाग असे. गौरी माझ्यापेक्षा वयाने थोडी मोठी त्यामुळे आम्हा मुलांच्या कोणत्याही भांडणात गौरी नेहमी माझी बाजू घेत असे. पुढे वय वाढले तेंव्हा मला सर्वात जवळची एक मैत्रिण आहे हे इतर मित्रांना सांगण्याची मला लाज वाटू लागली व आमची मैत्री दुरावत चालली. आठवी नववी पासून गौरी साड्या नेसू लागली आणि ती आपल्या मैत्रिणींच्यातच जास्त रमू लागली. मॅट्रिक झाल्यावर ती आई वडीलांच्या बरोबर अमेरिकेला गेली व आमची मैत्री पूर्ण दुरावली आपल्या शाळेतल्या, नोट्स काढलेल्या वह्या आठवणीने मला देणारी, कोणी शाळेत डोंगरी आवळा दिला तर चिमणीच्या दाताने त्याचा तुकडा माझ्यासाठी रुमालात आठवणीने आणणारी ही माझी मैत्रिण मला आयुष्यांत परत कधी भेटलीच नाही. परवा तिचे नंतरच्या आयुष्यांतले फोटो इंटरनेटवर सहज बघायला मिळाले आणि अक्षरश:पोटात कालवले. त्या फोटोतली व्यक्ती माझी कधी मैत्रिण होती हे स्वप्नात सुद्धा मला खरे वाटले नसते.

या चित्राच्या थोड्या वरच्या बाजूच्या चित्रात आहेत, महर्षि अण्णासाहेब कर्वे. माझ्या चित्रात असलेले अण्णा त्यावेळी नव्वदी ओलांडून केंव्हाच गेलेले होते. रोज सकाळी त्यांची ती कृश व ठेंगणी मूर्ती आमच्या घरी टाइम्स वाचायला येत असे. त्या वयात सुद्धा त्यांचे बोलणे अगदी स्पष्ट व खणखणीत असे. एकदा ते पेपर वाचत असताना मी तो उगीचच काढून घेण्याचा प्रयत्न केल्याने घरातल्या सर्वांचीच प्रचंड बोलणी खाल्ली होती. मॅट्रिक झाल्यावर मी एक छंद म्हणून व्हॉल्व्ह रेडिओंची जुळणी करत असे. अणांना असाच एक रेडिओ मी करून दिला होता. व पुढची काही वर्षे, त्यावरचे कार्यक्रम ते नियमित ऐकत असत. त्यांनी शंभरी पार केल्यावर, मुंबईला ब्रेबॉर्न स्टेडियमवर त्यांचा एक भव्य सत्कार झाला होता. याच वेळी त्यांनी जवाहरलाल नेहरूंच्या उपस्थितीत, संयुक्त महाराष्ट्र झालेला आपल्याला पहायला आवडेल हे सांगितले होते. हा कार्यक्रम व त्याच वेळी झालेले इतर काही कार्यक्रम मला जवळून बघायला मिळाले होते हे मी नेहमीच माझे परम भाग्य समजतो.

या चित्राच्या जवळपासच एक चित्र आहे अधटराव सरांचे. आठवीनंतर, तांत्रिक अभ्यासक्रम निवडल्यामुळे, मी तांत्रिक विद्यालयात जाऊ लागलो. तिथे अधटराव सर आमचे मुख्याध्यापक होते. या आधी, पुण्याच्या इंजिनीयरिंग कॉलेजात, वर्कशॉपचे मुख्य असलेले अधटराव सर, या नवीन जबाबदारीवर बढती मिळून आले होते. अक्षरश: शून्यापासून सुरवात करून सरांनी फक्त तीन वर्षांत, पुण्यामधे घोले रस्त्यावर तांत्रिक विद्यालयाची दुमजली भव्य इमारत, सुसज्ज वर्कशॉपसकट उभारली होती. आणि याच वेळी आठवी ते अकरावीचे वर्ग, त्यांची प्रॅक्टीकल्स हे सर्व चालू ठेवूनच हे शक्य केले होते. सरकारी लाल फितीत यापैकी कोणताही प्रकल्प कधीच अडकला नव्हता. सुतारकामात मोर्टिस व टेनन जॉइंट पासून सुरवात करून त्यांनी आमच्याकडून डोव्हटेल जॉइंटपर्यंत सर्व काम पक्के करून घेतले होते. सुतारकाम, स्मिथी, फिटींग, टर्निंग, ड्रॉइंग जे म्हणाल ते त्यांनी आमच्याकडून इतके पक्के करून घेतले होते की पुढे आयुष्यांत मला कोणताही जॉब कसा करायचा याचा दुसर्‍यांदा विचार करायला लागला नाही. त्या काळी खाष्ट सासूची भूमिका निभाविण्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री, इंदिरा चिटणीस या त्यांच्या पत्नी. शाळेच्या सहलींना त्या काहीतरी गंमतीदार गोष्टी सांगून आम्हाला हसवित असलेल्या मला आठवतात. कोणताही प्रकल्प कसा उभारायचा याचे एक प्रत्यक्ष शिक्षणच अधटराव सरांनी आम्हाला त्या चार वर्षांत दिले.

कॉलेजात जाऊ लागल्यावर, एका परिक्षेत आलेल्या थोड्या अपयशाने, आपला गणिताचा पाया जरा कच्चाच आहे याची जाणीव मला झाली.मित्रांशी बोलताना एका अफलातून व्यक्तीचे नांव मला कळले. मी दुसर्‍याच दिवशी बादशाही बोर्डिंगच्या समोरच्या बाजूस असलेल्या एका वाड्यामधे गेलो. एका अंधारलेल्या खोलीत एका कॉटवर ही व्यक्ती झोपलेली होती. मी भीतभीतच त्यांना माझ्या येण्याचे कारण सांगितले. माझे ग्रह त्या वेळी फारच उच्चीचे असावेत कारण गो.म.जोशी सरांची मला लगेच उद्यापासून शिकायला ये म्हणून अनुमती मिळाली. गो.म इतका हुशार आणि तर्कट माणूस मी परत कधी बघितला नाही.एकाच वेळी इंटर सायन्स, गणितात एम.ए.करणारा व संस्कृत शिकणारा अशांना ते सहज शिकवित. खोलीच्या एका बाजूला गो.म. कॉटवर झोपलेले आणि आम्ही आठ दहा जण खाली जाजमावर बसलेले असा आमचा क्लास चाले. कोणत्याही दिवशी अचानक चाचणी घेणे, दुसराच भाग शिकविणे वगैरे क्लुप्त्यांनी त्यांनी माझा गणिताचा पाया इतका पक्का करून घेतला की दुसर्‍याच वर्षी आमच्या कॉलेजात मला सर्वाधिक गुण मिळाल्याचे स्मरते. गो.म. बोलण्यात प्रचंड फटकळ ! एक मुलगी एक दिवस स्कर्ट घालून आल्याने तिची जात कोणती व तिचा वेष कोणता यापर्यंतचा सर्व उद्धार त्यांनी केल्याचे मला स्मरते. अर्थात वर्गातील बसण्याच्या जागेत एक मुलगी स्कर्ट घालून बसली तर बाकीच्यांना खूपच अडचणीने बसावे लागेल हे त्यांच्या रागविण्याच्या मागचे मुख्य कारण असावे. वर्गात त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर न येणे हा तर अक्षम्य असाच गुन्हा असे. त्यामुळेच आमचा अभ्यास इतका तयार असे की आम्ही परिक्षा कधीही देऊ शकत होतो. मी घिसाड्याचा अभ्यासक्रम उगीच निवडला आहे असे त्यांचे प्रामाणिक मत होते.

अशाच एका दुसर्‍या उल्लेखनीय व्यक्तीचे चित्र, माझ्या पझलमधे एका तुकड्यावर आहे. ते म्हणजे आमच्या इन्स्टिट्यूटमधल्या आमच्या इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख असलेले प्रो.चंद्रशेखर अय्या यांचे. जाडगेली व बुटकी शरीरयष्टी, डोक्याला टक्कल, असे दिसणारे प्रो अय्या यांच्री, प्रथमदर्शनी फारशी छाप पडत नसे. उच्च शिक्षणार्थी विद्यार्थी आणि आमचे उच्च पदवीविभूषित प्राध्यापक यामुळे आमच्या इन्स्टिट्यूट मधील वातावरण एकंदरीत वरच्या हवेतच असे. या वातावरणात घट्ट जमिनीवर पाय रोवलेले प्रो. अय्याच असत. त्यामुळे आम्हाला मिळणारे शिक्षण, प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात उपयुक्त होईल की नाही हे ते मोठ्या कटाक्षाने बघत. भारत इलेक्ट्रॉनिक्स, नॅशनल एअरॉनॉटिकल प्रयोगशाळा येथे विद्यार्थ्यांना नेणे. संशोधनासाठी किंवा प्रकल्पांसाठी कोणतेतरी जडबंबाल विषय न निवडता पुढे उपयुक्त ठरतील असेच विषय आम्हाला ते निवडण्यास सांगत. त्यांची विषय सोपा करून सांगण्याची हातोटी मोठी विलक्षण होती. प्रो.अय्यांकडून शिकलेल्या अशा अनेक खुब्यांचा मला नंतर खूपच उपयोग झाला.

मी कॉलेजात शेवटच्या वर्षाला शिकत असताना, नेदरलॅंडमधील फिलिप्स कंपनीने एक स्कॉलरशिप देउ केली होती. या स्कॉलरशिपसाठी मी अर्ज केला होता. त्याचाच परिणाम म्हणून काही दिवसांनी एका बड्या हॉटेलमधे असलेल्या मुलाखतीसाठी मला बोलावणे आले. मुलाखत उत्कृष्ट झाली होती. फिलिप्स कंपनीमधील ज्या बड्या अधिकार्‍याने माझी मुलाखत घेतली होती त्या अधिकार्‍याच्या व्यक्तिमत्वाची तर माझ्यावर खूपच छाप पडली होती. ती स्कॉलरशिप अखेरीस मला काही मिळाली नाही व ती मुलाखत मी नंतर विसरूनसुद्धा गेलो होतो. पदवीधर झाल्यावर मी नोकरीच्या शोधात होतो. एका अत्यंत बड्या उद्योगसमुहाचे एक वरिष्ठ अधिकारी आमच्या परिचयाचे होते. त्यांना मी भेटलो व त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर माझा अर्ज पाठवून दिला होता. काही दिवसांनी मला मुलाखतीसाठी बोलावणे आले. मुंबईच्या फोर्ट भागातल्या एका टोलेजंग इमारतीतील एका वातानुकुलीत खोलीत माझी मुलाखत झाली. मी त्या खोलीत भीतभीतच शिरलो होतो. समोर सात आठ सुटाबुटातले वरिष्ठ अधिकारी होते. मी डावीकडे नजर टाकली आणि आश्चर्य म्हणजे फिलिप्स कंपनीतील ज्या अधिकार्‍याने माझी मुलाखत घेतली होती तोच तिथे बसला होता. मला एकदम बळ आले. माझी मुलाखत छानच झाली व मला ती नोकरी मिळाली. या अधिकार्‍याचे नाव होते के.पी.पी. नंबियार आणि पुढची काही वर्षे त्यांच्या हाताखालीच काम करण्याची संधी मला मिळाली.अतिशय धडाकेबाज रित्या, के.पी.पी. कोणतीही अडचण सोडवत असत. कोणत्याही नवीन प्रकल्पाचा आराखडा करणे, लागणार्‍या सर्व गोष्टींची जुळणी करणे हे काम अत्यंत तडफदारपणे ते करत. हे गृहस्थ पुढे केलट्रॉन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक झाले व त्या नंतर भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे ते सचीव होते.

माझे जिगसॉ पझल आता खरे म्हणजे खूपच भरत आले आहे. अनेक व्यक्ती आणि प्रसंगाच्या चित्रांनी ते भरून गेले आहे तरी आणखी एक चित्र मला दिसते आहे तात्या फाटकांचे. फाटकी शरीरयष्टी, अंगात स्वच्छ पांढरा बुशकोट घातलेले तात्या अतिशय सौहार्द्रपूर्ण स्वभावाचे होते. पुण्यातून पौडकडे जाणार्‍या रस्त्यावर असलेल्या वनाझ इंजिनीयर्स या कंपनीचे तात्या एक संस्थापक. एल.पी.जी. गॅस सिलिंडर्सना जो एक रेग्युलेटर लागतो त्याचे भारतात प्रथम उत्पादन यांनीच चालू केले होते. त्या वेळी मी एक नवीन उपकरण विकसित केले होते. तात्या असेच मला एकदा भेटले. सध्या काय चालले आहे अशी पृच्छा त्यांनी केली. नवीन विकसित केलेल्या उपकरणांबद्दल मी त्यांना माहिती दिली. त्यावर बाकी फारशी चौकशी न करता उद्या ऑफिसमधून ऑर्डर घेऊन जा एवढेच ते म्हणाले. नवीन विकसित उत्पादनाला पहिली ऑर्डर मिळविणे अतिशय कठिण असते. त्यामुळे नवीन उत्पादनाला प्रोत्साहन देण्याची तात्यांची ही पध्द्त मला फारच आवडली आणि पुढे जेंव्हा जेंव्हा शक्य झाले तेंव्हा इतरांना अशीच मदत करण्याचा मी प्रयत्न केला.

मला अशीच मदत करणारे, भाऊ जोशी यांचे चित्र तर अतिशय स्पष्ट आहे. धंद्यात भाऊ खरे म्हणजे माझे प्रतिस्पर्धी. पण मला कसलीही अडचण आली की मी भाऊंकडे धाव घेत असे. मशिनरी खरेदी, कच्च्या मालाच्या अडचणी, कामे करून घेण्याचे ठेकेदार, भाऊंनी मला नेहमीच मदत केली. उत्पादनाच्या रूक्ष धंद्यात असलेल्या या गृहस्थाला खरा रस होता छोट्या खेळातल्या आगगाड्या जमविण्याचा. पुढे जेंव्हा शक्य झाले तेंव्हा त्यांनी आपल्या कारखान्याच्या गच्चीवर, या आगगाड्यांचे एक संग्रहालयच उभारले. आजमितीलाही ते चालू आहे आणि खूप लोकप्रिय आहे.

मी आहे तोपर्यंत माझे हे जिगसॉ पझल मी लावतच रहाणार आहे. ते खूप भरले असले तरी आणखी किती तुकडे लावायचे आहेत? आणखी किती चित्रे तयार होणार आहेत? हे मला किंवा कोणालाच माहिती नाहीये. पण सगळ्यात गंमतीची गोष्ट म्हणजे मी शेवटचा तुकडा बसवला की माझ्याबरोबरच हे जिगसॉ पझल पण अदृष्यांत विरणार आहे, परत कोणालाच कधीच न दिसतां.

9 जून 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

11 thoughts on “जिगसॉ पझल

 1. आवडले 🙂

  Posted by अनिकेत | जून 9, 2009, 3:59 pm
 2. “पण सगळ्यात गंमतीची गोष्ट म्हणजे मी शेवटचा तुकडा बसवला की माझ्याबरोबरच हे जिगसॉ पझल पण अदृष्यांत विरणार आहे, परत कोणालाच कधीच न दिसतां.”
  मनाला विशेष भावले…

  हे खेळण्यातल्या आगगाड्यांचे म्युझियम कुठे आहे. कसे जायचे? अधिक माहिती मिळू शकेल का.
  धन्यवाद.

  आल्हाद

  Posted by आल्हाद alias Alhad | जून 9, 2009, 5:08 pm
  • कर्वे रस्त्यावर कोथरूडच्या दिशेने जाताना संगम प्रेस कडे जाण्यासाठी डावीकडे वळा. प्रेसनंतर लगेच हे म्युझियम आहे.

   Posted by chandrashekhara | जून 29, 2009, 10:24 सकाळी
 3. जिगसॉ खूप आवडले. फार छान लिहीता आपण. लिहीत रहा.
  आत्ताशी तर एकसुद्धा कोपरा भरला नाही. इतक्यात कुठे शेवटचा तुकडा बसवता?
  परिपूर्तीतली गाजवणारी गौरी आठवली, आणि समोरच्या घरातला चंदू इरावतीबाईंनी २-३ दा तरी उल्लेखिलेला आठवला. ते आपणच का ?

  Posted by Raina | जून 9, 2009, 5:23 pm
 4. चंद्र्शेखरजी,

  आयुष्याच्या या ‘जिगसॉ’पझलबद्द्ल आपण केलेलं चिंतन मनाला खुप भावलं…खरंच प्रत्येकाचं स्वतःचं असं एक कोडं असतंच ज्याचं उत्तरं शोधण्यासाठी, जो तो ऊर फाटेस्तो धावत राहतो,आणि शेवटी फारच कमी व्यक्ती अगदी सर्वार्थाने हे कोडं सोडवण्यांत यशस्वि होतात.किति व्यक्ति आयुष्याच्या अखेरीस असं म्हणतं असतील- “बस! मी आता खुप सुखी आहे…मला जे जे हवं होतं ते सर्व काही मिळालं आहे” आनंद सिनेमातल्या गाण्याच्या ओळी आठवतायत ‘जिंदगी कैसी है पहेली हाय्…कभी ये हसाऍ,कभी ये रुलाऍ’

  Posted by nimisha | जून 9, 2009, 6:18 pm
 5. तुमचे हे पोस्ट अगदी अंतर्मुख करणारे आहे. सुंदर पोस्ट आहे .

  Posted by Mahendra Kulkarni | जून 9, 2009, 8:32 pm
 6. खूप सुंदर लिहिले आहे.
  तुमचे जिग सॉ पझल पूर्णपणे भरायला खूप खूप वेळ लागो, हीच शुभेच्छा.

  Posted by yashodharaa | जून 10, 2009, 3:05 सकाळी
 7. Awesome!!!

  Posted by Abhijeet | जून 13, 2009, 4:40 pm
 8. atishy sundar lekh. apan parvatibai athvale yanche natu kinwa koni natewaik ahat ka? me karve samsthet kam karate mhanun utsukata vatli mhanun vicharle pl. ragau naye.

  Posted by sdgorhe | एप्रिल 17, 2013, 5:10 pm
  • sdgorhe
   रागावण्याचा प्रश्नच येत नाही. पार्वतीबाई आठवले या माझ्या पणजी व आपल्या आयुष्यात त्यांनी केलेल्या कार्याचा मला नेहमीच अभिमान वाटत आलेला आहे व राहील.

   Posted by chandrashekhara | एप्रिल 18, 2013, 7:33 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: