.
अनुभव Experiences

प्रथम ग्रासे !


सिंगापूरच्या चांगी विमानतळावर माझे विमान उतरले तेंव्हा मला कल्पनाही नव्हती की या फेरीला, माझे स्वागत एवढ्या जबरदस्त झटक्याने होणार आहे. म्हणजे त्या दिवशी तसे काहीच घडले नाही. मी घरी आलो व दुसर्‍या दिवसांपासून माझ्या नेहेमीच्या दिनक्रमाला सुरवात केली. आमच्या घरासमोरच, समुद्राचे भरतीचे पाणी आत येण्यासाठी आणि पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाण्यासाठी म्हणून, एक कालवा बांधलेला आहे. हा कालवा थेट सिंगापूर आणि मलेशिया यांच्यामधल्या खाडीपर्यंत जातो. याच कालव्याच्या एका बाजुच्या बांधावर एक सुंदर पदपथ बांधलेला आहे. पदपथाच्या दोन्ही बाजूंना सुरेख झाडे आणि झुडपे लावून हा सर्वच परिसर मोठा रमणीय केलेला आहे. या रस्त्यावर रोज सकाळी फिरायला जाण्याचा माझा परिपाठ आहे.

आल्यानंतर तीन चार दिवसांनी, फिरून परत येत होतो. पहाटेच जोरदार पाऊस झाल्याने हवेत मोठा सुखद असा गारवा होता आणि जमीन पण ओली होती. आमच्या घराच्या प्रवेशद्वाराजवळच रस्त्याला एक छोटासा उतार आहे. या उतारावर वाळूचे छोटे दगड कॉंन्क्रीटमधे मिसळून थोडा खडबडीत असा रस्ता केलेला आहे. कडेला आधारासाठी म्हणून लोखंडी कठडाही लावलेला आहे. रस्त्याचा हा भाग ओला राहिल्यामुळे त्याच्यावर बुरशी येऊन म्हणा किंवा इतर कांही कारणाने मी त्या दिवशी या उतारावर पाऊल टाकले तेंव्हा काही क्षण मला आपण एखाद्या ‘स्केटिंग रिंक’ मधे शिरत असल्याचा आभास झाला व पुढचे काही क्षण मी हे जग हरवलो. जेंव्हा मला आजुबाजुचे जग परत दिसू लागले तेंव्हा माझ्या डाव्या हाताच्या मनगटातून असह्य वेदना होते आहे आणि मी जोरात खालच्या कॉन्क्रीटवर आपटलो आहे ह्याची संवेदना मला होऊ लागली. हाताकडे नजर टाकल्यावर माझा पंजा व मनगट हे सरळ रेषेत न दिसता, एखाद्या नवशिक्या शिल्पकाराने चुकीच्या पद्धतीने ते जोडावे तसे विचित्र कोनात दिसत होते. माझ्या पत्नीच्या मदतीने तिच्याच ओढणीचा एक कामचलाऊ फासा बनवला व त्यात हात अडकवून कसाबसा घरी परतलो. परिस्थितीचा एकंदर आढावा घेतल्यावर इस्पितळात जाण्याशिवाय तरणोपाय नाही हे लक्षात आले. व आमची सगळ्यांची वरात इस्पितळाकडे निघाली.

सिंगापूरला एखाद्या इस्पितळात प्रवेश घेणे हे प्रकरण जरा गंमतीदारच आहे. रोग़ी कितीही आजारी असला तरी त्याला या चक्रातून सुटका नाही. आम्हाला इस्पितळाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरच थांबवून धरण्यात आले. प्लॅस्टिकचा पारदर्शी पावसाळी कोट व मुख- नासिका मुखवटा घातलेल्या एका परिचारिकेने( तो परिचारकही असू शकतो) आपल्या हातातील एका यंत्रामधून माझ्या कपाळाचे निरिक्षण केले. हे यंत्र, डोळ्याचा नंबर काढणारे डॉक्टर, ज्या एका यंत्रामधून तुमच्या डोळ्याकडे बघतात तत्समच काहीसे होते. त्यातून बघितल्यावर तिने 35.8 अशी घोषणा केली. तत्परतेने दुसर्‍या एका पारदर्शी (कोट आणि मुखवटा घातलेल्या) परिचारिकेने एक चिठ्ठी माझ्या खांद्यावर चिकटविली. माझ्या अत्यंत दु:खी अवस्थेत सुद्धा हे काय आहे हे विचारण्याचा मोह मला झाला. हे माझ्या शरिराचे तपमान आहे ही नवीनच माहिती मला कळली. आमच्या लहानपणी मला ताप यायचा त्यावेळी तो शंभर, दीड, अडीच आणि फार फार म्हणजे साडे तीन असे. त्यामुळे हा आकडा ऐकल्यावर क्षणभर माझे हात पाय गळालेच. पारदर्शी परिचारिकेस विचारणा केल्यावर तिने अलीकडे शरीराचे तपमान एवढेच असते अशी माहिती पुरवली. पण माझ्या मदतीला माझी मुलगी धावून आली व हा सेंटीग्रेड, फॅरनहाईटचा गोंधळ असल्याचा खुलासा झाला.

मी अपघातग्रस्त म्हणून इस्पितळात आलो असलो तरी माझ्याबरोबर आलेल्या माझी पत्नी व मुलगी यांचेही तपमान घेण्यात आले व त्यांच्याही खांद्यावर तशा चिठ्या आल्या. हे सगळे झाल्यावर आमचे तिघांचेही नमुना अर्ज भरून घेण्यात आले. यांत नाव पत्ता, ओळखीचा पुरावा हे तर होतेच पण या शिवाय आम्ही गेल्या 7 दिवसात कुठे परदेशी जाउन आलो आहोत का? आम्हाला गेल्या 7 दिवसात परदेशाहून आलेली कुठली व्यक्ती भेटली आहे का? व भेटली असल्यास ती कोणत्या देशातून आली होती? वगैरे उपयुक्त माहितीही होती.

एव्हांना माझा हात चांगलाच ठणकायला लागला होता. यानंतर, रासायनिक युद्धात लढणार्‍या सैनिकांसम दिसणार्‍या दोन परिचारिकांनी आमचे तपमान व नमुना अर्ज यांची छाननी केली व आम्ही मुख्य हॉलमधे जाण्यास लायक असल्याचे ठरविले व आम्हाला एक प्रवेश क्रमांकही दिला. आम्ही प्रतिक्षा गृहात जाऊन स्थानापन्न झालो आणि आमचा क्रमांक येण्याची वाट पाहू लागलो.. काही कमनशीब इच्छुकाना दुसर्‍या एका खोलीत पाठविण्यात आले होते. त्या खोलीला ‘आयसोलेशन वॉर्ड’ अशी पाटी असल्याचे मला नंतर लक्षात आले. म्हणजे या मंडळींना, स्वत:ची किंवा बरोबरच्या रुग्णाची तपासणी करून घेण्याची आपली लायकी सिद्ध करण्यासाठी, परत एकदा इस्पितळाच्या जास्त सखोल अशा परिक्षांना तोंड देणे आवश्यक होते.

माझा क्रमांकाची घोषणा झाली. सिंगापूर ज्यासाठी प्रसिद्धच आहे अशा एका अतिशय कार्यक्षम कार्यप्रणालीने आता माझा ताबा घेतला व माझ्या चांचण्या सुरू झाल्या. माझी क्ष-किरण चित्रे काढली गेली. मला वेदना शामक औषध देण्यात आले. प्राथमिक चाचणी झाल्यावर विशेष हाडतज्ञाकडे माझी रवानगी झाली.

हाडतज्ञाने माझा हात तपासल्यावर, हाताचे हाड, बाह्य उपचाराने(म्हणजे ओढून ताणून) जागेवर आणणे किंवा शस्त्रक्रियेने जागेवर आणणे या दोन उपचारांपैकी एक पर्याय मला निवडायला सांगितला. शस्त्रक्रिया केल्यास मला पुढे ‘गॉल्फ’ सारख्या खेळांमध्येसुद्धा भाग घेता येणार होता. आयुष्यांत अजूनतरी ह्या खेळाची दांडी मी कधी हातातही घेतलेली नसल्याने, पुढे हा खेळ मला खेळता येणार नाही याचे फारसे दु:ख मला वाटले नाही व मी शस्त्रक्रिया न करण्याचा निर्णय घेतला.(अर्थातच हा पर्याय बराच स्वस्तही होता.) एकदा हा निर्णय घेतल्यावर माझ्या दुखणार्‍या हाताला भूल देण्यात आली.हाड नीट बसविण्यात येऊन त्यावर प्लास्टरचे आवरण घालून मला घरी पाठविण्यात आले. मूठभर वेदनाशामक गोळ्याही मला देण्यास डॉक्टर विसरले नाहीत.

पुढचे काही आठवडे आता मुक्काम घरच्या घरीच ठेवणे हे ओघाने आलेच होते. अनेक गोष्टी एका हाताने करणे केवळ अशक्य आहे हे मला आता जाणवते आहे. बुटांची नाडी बांधणे, दांतांना फ्लॉस करणे आणि ब्रशला टूथ पेस्ट लावणे या गोष्टी आता माझ्या आवाक्याबाहेरच्याच आहेत. एक गोष्ट मात्र नक्की आहे. यापुढे कोणतीही शारिरिक दुर्बलता आलेल्या व्यक्तीकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन खूपच सहृदय राहील. काही आठवडे का होईना मी त्यांच्यातलाच एक झालो आहे.

माझ्या खोलीची खिडकी उघडली की निसर्गाने उधळलेला पांचूचा खजिना नेहमीच माझ्या नजरेसमोर येतो. आता त्याकडे बघत बसताना एक नवीनच आनंद मी अनुभवतो आहे.

5 जून 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “प्रथम ग्रासे !

  1. आवडले

    Posted by अनिकेत | जून 5, 2009, 3:54 pm
  2. एकदम सही.. हसावे की सहानुभुती दाखवावी कळत नाहि….:-)

    Posted by Prasad | जून 5, 2009, 10:03 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: