.
Roots

जादुचे दिवस


एकोणिसशे  पन्नासच्या सुमारास,  पुणे  म्हणजे जवळपास,   थोडेफार  सुधारलेले असे एक खेडेगावच होते..  बहुतेक  ठिकाणी,  कधी  काळी डांबरीकरण केलेले व आता पूर्णपणे दुर्दशा झालेले खड्डेवजा रस्ते,  मिणमिणते  दिवे व रस्त्यावर मुख्यत्वे सायकली व टांगे यांची वर्दळ,  यामुळे  शहरीकरणाचे वारे फारसे कोठे दिसत नसत.   नाही  म्हणायला कसबा, रवीवार  वगैरे काही पेठा आणि मुख्यत्वेकरून कँपाचा भाग मात्र शहरी वाटत असे.  भांबुर्डा  स्टेशनवरून टांगा केला की ” जंगली  महाराज रस्त्यावरून घे.”  असे  पुणेकर मोठया अभिमानाने सांगत असत. . कारण  हा एकच रस्ता तेंव्हा जरा लांब व रूंद असा होता.  तुमचा  टांगा,  डेक्कन  जिमखान्यावरची पांढरपेशी वस्ती ओलांडून पुढे लकडी पुलापाशी आला की नदीकाठाने उजवीकडे जाणारा,  जेमतेम  एक मोटर गाडी जाईल एवढा रूंद व प्राचीन कधी काळी डांबरीकरण झालेला असा एक रस्ता दिसे.  या  रस्त्याने जाण्यास टांगेवाले बहुधा नाखुष असत कारण परतीचे गिर्‍हाईक    मिळणे दुरापास्तच असे.  मिनतवारीने  एखादा गरजू टांगेवाला मिळालाच तरी त्याच्या टांग्यातून या रस्त्याने जाताना फारसे दृष्टीसुख असे वाटत नसे.  डाव्या  बाजूला नदीचे पात्र व त्यात कपडे धूत असणारी माणसे दिसत.  उजव्या  बाजूला असणारी थोडीफार घरे एकदा मागे पडली की पुढे दोन्ही बाजूंना शेते लागत.  दिवसा  उजेडी सायकलस्वारांची थोडी फार वर्दळ येथे असे पण संध्याकाळचे सहा सात वाजल्यानंतर हा रस्ता निर्मनुष्य होई. त्याचप्रमाणे  म्युन्सिपालिटीचे,  येथे  दिवा आहे हे ओळखता येईल इतपतच प्रकाश देणारे मिणमिणते दिवे आणि किर्र किर्र आवाजात ओरडणारे रातकिडे यामुळे हा रस्ता खूपच भितीदायक वाटे . कचरे  पाटीलांच्या विहिरीपासून पाऊण एक मैल पुढे आल्यवर,  ऊजव्या  बाजूला एक फाटा फुटलेला दिसे.  या  फाटयाचे तेंव्हा डांबरीकरण झालेलेच नव्हतेच पण फाटयावरच असलेल्या एका खांबावर,  एक  तुतारी वाजविणार्‍या    बाईचे चित्र व खाली ‘प्रभातनगरकडे’  असा  मजकूर असलेली पाटी लावलेली असे.  प्रसिध्द  प्रभात फिल्म कंपनीकडे हा रस्ता जात असल्याने,  थोडी  फार वर्दळ या रस्त्यावर दिवसा उजेडी नक्कीच दिसे.  प्रभातनगरकडे  जाणार्‍या   या रस्त्याला थोडे पुढे आले की एक वस्ती नजरेत येई.  तीन  चार दगडी बंगले व आसपास थोडी बैठी घरे असे या वस्तीचे स्वरूप असे.  प्रभात  फिल्म कंपनीकडे जाणारे कोणी या वस्तीकडे परत वळून पहात असेल असे काही वाटत नसे पण तिथेच रहाणार्‍या    आम्हा मुलांना मात्र एरंडवण्याच्या माळावरची ही वस्ती म्हणजे सर्वस्व होते.  कधी  कोठे दुसर्‍या   गांवाला गेले तरी केंव्हा एकदा येथे परत येतो असे आम्हाला होत असे.

मुठा  नदीचा डावा  कालवा , तेंव्हा प्रभातनगरकडे जाणार्‍या या  रस्त्याला छेदून वहात असे.  या  कालव्याला लागून चांगल्या दीड एक एकर प्लॉटवर असलेले आमचे घर म्हणजे एक जादूनगरीच  आम्हा मुलांना वाटत असे.  भरभक्कम  दगडी रचना, तीन  मजले व त्यावर ऐसपैस गच्ची,  आजूबाजूला  भरपूर मोक़ळी जागा,  कुठल्याही  बाजूला नजर टाकली तरी हिरवीगार वनश्री आणि सतत वहणारे कालव्याचे पाणी,  यामुळे  अशा ठिकाणी बालपण घालविण्यास मिळाले ही किती भाग्याची गोष्ट होती याची जाणीव पुढे काही दिवस जेंव्हा मुंबईला एका खुराडेवजा ब्लॉक मधे रहाण्याची वेळ आली तेंव्हा प्रकर्षाने जाणवली होती.

वर्षातला  प्रत्येक ऋतु किंवा काल,   तेंव्हा  आपली खूण वैशिटये घेऊनच येत असे.  कुडकुडायला  लावणारी थंडी, कानशिले  गरम करणारा उन्हाळा आणि रबरबाट व चिखलाचे साम्राज्य आणणारा पावसाळा,  असा  प्रत्येक ऋतु तेंव्हा आपला ठसा मनावर उमटवूनच जाई.  सात  जूनला,  शाळेत  जाण्याच्या पहिल्या दिवशीच पाऊस का पडावयास लागतो हे तेंव्हा मला कधीही न उलगडलेले कोडे होते.  आधीच  उन्हाळयाच्या सुट्टीमुळे शाळा,गृहपाठ, अभ्यास  या सगळयांची सवय गेलेली असे.  दिवसभर  हुंदडण्याची सवय झालेली असल्याने शाळेच्या पहिल्या दिवशी प्रचंड कंटाळा येई आणि बरोबर त्याच दिवशी पावसाची रिपरिप सुरू होई.  मग  दप्तराबरोबर रेनकोटाचे ओझे घेऊन मैल,  दीड  मैल अंतरावर असलेल्या शाळेत चिखलातून चालत जाणे म्हणजे एक दिव्यच वाटे.  आई  वडीलांनी दुचाकीवरून किंवा चार चाकी मधून मुलांना नेणे आणणे वगैरे प्रथा त्या वेळी प्रचलित नव्हत्या.  या  वेळी आणि नंतर म्हणजे गणपती येण्याच्या वेळी मात्र मला गांवात म्हणजे नारायण, सदाशिव  वगैरे पेठांत राहणार्‍या    मुलांचा खूप हेवा वाटे.  बहुतेकजण  पावसाळयात छत्री, रेनकोट  वगैरे काहीही न घेता शाळेत येत व त्यामुळे मला रेनकोटाचे ओझे जास्त जास्त जड वाटे.  यांतल्या  बहुतेक मुलांना छत्री किंवा रेनकोट घेऊन देणे त्यांच्या पालकांच्या ऐपतीच्या बाहेरचे होते व म्हणून ती शळेत तशी येत असत ही बाब मात्र बर्‍याच   उशीरा माझ्या लक्षात आली होती.  ही  एक शाळेला जाण्याची गोष्ट सोडली तर पाऊस म्हणजे एक मजा असे.  प्रथम  प्रथम खूप अंधारून येई.  शाळेत  दिवे, पंखे  वगैरे आधुनिक उपकरणे लावण्याची तेंव्हा प्रथा नसे त्यामुळे आकाश झाकोळले की वर्गात दिसेनासे होई व अभ्यासाला सुट्टी मिळे.  मग  वर्गातल्याच कोणत्या तरी मुलाला गोष्ट सांगण्यासाठी मास्तर बोलावत.  माझा  यात खूप पुढाकार असे.  वाचन  भरपूर असल्याने वर्गात गोष्टी सांगण्यात माझा हातखंडा असे.  तसेच  पाऊस सुरू झाला की व्यायाम, खेळ  वगैरे प्रकारांना आपोआप बंधन येई व मला या सर्व प्रकारांमधे फारसा रस नसल्याने पाऊस नेहमीच पडत रहावा असे मला वाटे.

असा  हा पाऊस स्थिरावला की नदीला मधून मधून पूर येणे सुरू होत असे.  मुठा  नदीचा पूर ही तेंव्हा पुणेकरांच्या जीवनातील एक मोठी थ्रिल होती. ” आज मस्य बुडाले”,” आज कमानीला पाणी लागले’’ अशा फक्त पुणेकरांनाच समजणार्‍या    बातम्या पसरत आणि अखिल पुणे पुराचे पाणी बघायला लकडी किंवा नव्या पुलावर धावे.  आमची  शाळा नदीजवळ असल्याने,  मधल्या  सुट्टीत,  पाणी  बघायला आम्ही खूप वेळा जात असू.  कांही  उत्साही पैलवान अशा वेळी पुलावरून नदीत उडया ठोकीत.  मग  बघ्यांच्या गप्पांना उधाणच येत असे.  पूर्वी  कोण कसा पुरात पोहला, कोण  बुडला याची जोरात चर्चा चाले.  या  गप्पा ऐकता ऐकता सुट्टी संपल्याची घंटा पण ऐकू येत नसे व मास्तरांची बोलणी खाण्याचा प्रसंग बर्‍याच   वेळा येई.

पावसळयातील  रात्री मात्र मोठया सुखद असत.  ओल्या  दमट अंधारात, पांघरूणात  गुरफुटून, घराच्या  शेजारून वाहणार्‍या    कालव्याच्या काठाला चालणारी बेडकांची खर्जातली ओरडणी व रातकिडयांची तारसप्तकातली किर्रकिर्र यांची जुगलबंदी ऐकताना झोप कधी लागे ते कळतही नसे.  पावसाळयातली  सकाळही मोठी प्रसन्न असे.  नुकतीच  एखादी पावसाची सर पडून गेलेली असल्याने, पानांवरून  घरंगळणार्‍या    थेंबांचा टप टप असा आवाज येत राही.  घरातली  मोठी माणसे आस्वाद घेत असलेल्या गरमगरम चहाच्या कपातून निघणार्‍या   वाफा पहाण्यास सुध्दा मजा वाटे.  आमच्या  घराच्या बाजूला एक गुलाबाचा वेल होता.  त्याला  वेडयासारखी फुले येत.  त्याला  आम्ही वेडा गुलाबच म्हणत असू.  या  गुलाबाच्या पाकळया जमिनीवर सगळीकडे विखरत व बुंध्याजवळची सर्व जमीन पांढरट गुलाबी होत असे.  शाळा  नुकतीच सुरू झालेली असल्याने म्हणा किंवा त्या वेळेला आजच्या सारखे स्पर्धायुग नसल्याने म्हणा, अभ्यास, परीक्षा  वगैरेचे फारसे ओझे मनावर नसेच आणि अशा वेळी गणपती येणार असल्याची चाहूल लागे.  गांवातल्या  पेठांत रहाणारी मुले या बाबतीत सर्वात पुढे असत.  कुठे  काय रोषणाई करणार आहेत ?  कुठे  कोणते कार्यक्रम आहेत ?  याची  चर्चा वर्गात जोरात चाले.  मला  मात्र या बाबतीत खूपच अनभिज्ञता वाटे.  एकतर  मला या पेठांमधील गल्लीबोळांची फारशी माहिती नव्हती आणि रात्री चालणार्‍या    या कार्यक्रमांना जाणे शक्यच नव्हते.  त्यामुळे  वर्गात रंगणार्‍या   या गप्पा फक्त ऐकणे याशिवाय मला पर्याय नसे. आमच्या  एरंडवण्याच्या माळावर मात्र जी पंधरा वीस घरे होती त्यांत आमचे मुलांचे गणपती जोरात असत.  गणपती  बसविणे, आरास, रोषणाई  हे सर्व आम्ही मुलेच करत असू.  घरातल्या  मोठया माणसांनी कधी या सर्वात भाग घेतलेला मला आठवत नाही.  आमच्या  सर्वांच्या आया मात्र मोठया उत्साहाने प्रसादाच्या खिरापती तयार करत.  आठवले  मग कर्वे मग गाडगीळ आणि शेवटी जावडेकर असे एका पाठोपाठ प्रत्येकाच्या घरी जाऊन आरत्या म्हणणे व नंतर खिरापतीचा आस्वाद घेणे म्हणजे या दहा दिवसांची आनंदपर्वणीच वाटे.  गणपतीच्या  या दिवसांत, घराच्या  शेजारून वाहणार्‍या   कालव्याकाठी असलेल्या मोकळया जागेत, कोकणी  बाले, गणपतीसमोरच्या  नाचाची कधीकधी तालिम करत.  रात्रीच्या  नीरव शांततेत त्यांच्या घुंघरांचा आणि हातातील काठयांचा आवाज मोठा गूढ वाटे.  एरंडवण्याच्या  आमच्या भागात फारसे सार्वजनिक गणेशोत्सव तेंव्हा नसत त्यामुळे गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांना फारसे गेल्याचे मला स्मरत नाही.

गणपतीच्या  या दिवसांच्या आसपास पुण्याची हवा मोठी छान असे.  मधूनच  पडणारे ऊन,  आणखी  एखाददुसरी पावसाची सर यामुळे वातावरण आल्हादकारक वाटे पण नंतर एखाद्या दिवशी एकदम उकडू आणि गदमदू लागे.  दुपारी  दक्षिणेच्या बाजूने काळीकुट्ट झाकोळ येई व बघता बघता तुफान पाऊस सुरू होई.  हत्तीच्या  पावलासारखा पडणारा हा पाऊस हस्त नक्षत्राच्या आगमनाचे शिंग वाजवी.  हस्त  भरपूर पडले की पुढच्या पावसाळयापर्यंत पाऊस पडला नाही तरी चालत असे.  एकदा  हस्ताचा पाऊस सुरू झाला की पुढचे आठ पंधरा दिवसांची निश्चिंती असे.  दिवसभर  उकडहंडी आणि संध्याकाळी बदाबदा पाऊस या चक्रातून सुटका कधी होणार असे वाटू लागे.  मग  एकदम एका दिवशी सकाळी उठून बाहेर बघितले की बाहेर सर्व धुरकट दिसू लागे.  अशा  दाट धुक्यातून सायकल चालवायला औरच मजा येई.  धुके  पडणे म्हणजे पावसाळा संपल्याची खूणगाठ असे आणि या दिवसात सकाळी का होईना,  थंडीची  थोडीशी चाहूलही लागे.

हवामानातल्या  या बदलाबरोबर, दिवाळीची  सुट्टी जवळ आली असल्याचे सर्व मुलांच्या लक्षात येई.  सुट्टीत  काय काय करायचे याचे बेत आखायला सुरवात होत असे.  पण  अजून एका मोठा अडसर मधे असे.  बहुतेक  वेळा सहामाही परिक्षा दिवाळीच्या सुट्टीच्या आधी असे व त्यामुळे सुट्टीचे बेत मोकळेपणे आखता येत नसत.

अलीकडे  मुलांच्या परिक्षांचा त्यांच्या पालकांना आलेला ताण बघितला की गंमत वाटते.  आमच्या  पालकांनाच काय, तर  आम्हाला सुध्दा कधी परिक्षेचा ताण आलेला मला आठवत नाही.  परिक्षा  आहे म्हणून खूप असा अभ्यास तेंव्हा करावा लागतच नसे.  रोजचाच  अभ्यास परिक्षा पार करण्यासाठी पुरत असे.  मुख्य  म्हणजे आपला पाल्य सर्व विषयांत उत्तीर्ण होतो आहे एवढी माहिती किंवा गोष्ट पालकांना पुरत असे.  त्यामुळे  परिक्षा येत व संपून जात.  शेवटचा  पेपर टाकला की आम्ही मुले मोकळया व निश्चिंत मनाने येणार्‍या   सुट्टीचे बेत करत असू.  दिवाळीच्या  साठी अनेक गोष्टी करायच्या असत.  दिवाळीचा  किल्ला आणि आकाशकंदिल यांसाठी तर खूपच नियोजन लागे.  एकतर  प्रथम किल्ला कुठे करायचा ते ठरत नसे.  जागा  ठरविली की त्या जागेसाठी मंजूरी घ्यावी लागे.  बहुदा  आमच्या आजीला ती जागा मान्य नसे.  त्यामुळे  आई किंवा आत्या यांचा वशिला लावावा लागे. विटा,  माती  वगैरे सामान आजीला बागेतच हवे असल्याने तेही असाच कोणाचा तरी वशिला लावून किंवा आजीच्या नकळत माळयाला सांगून मिळवावे लागे.  एकदा  सामान मिळाले की किल्ला कसला करायचा ते लवकर ठरत नसे.  डोंगरी  का भुईकोट,  खंदकात  पाणी कसे सोडायचे ?  अशी  बरीच चर्चा चाले.  समोर  गांव करायचा की नाही हा ही वादाचा मुद्दा असे.  अखेरीस  प्रत्यक्ष बांधकामास सुरवात होई.  डोंगरी  किल्ला, समोर  खंदक आणि त्याच्या पलीकडे गांव अशी रचना बहुतेक असे.  किल्ल्यला  टेहेळणीचा आणि कडेलोटाचा बुरुज नक्कीच असे.  एक  मावळा कोणाचा तरी कडेलोट करतो आहे असे चित्र मांडणे तर केवळ अनिवार्य होते.  किल्ला  पूर्ण होत आला की कोणीतरी मित्र येऊन कांहीतरी नवीन कल्पना देई.  असे  होत होत शेवटी किल्ला एकदाचा पूर्ण होत असे.  मग  तो हिरवागार दिसण्यासाठी त्याच्यावर अळीवाचे बी पेरीत असू.  किल्ला  पूर्ण झाला की त्याच्यावर मांडण्यासाठी चित्रे व घरे आणण्यासाठी आईच्या मागे बरीच भुणभुण करावी लागे.  चित्रे  आणायला तुळशीबागेपाशी जावे लागत असे.  त्यावेळी  पुण्यात वाणीसामान आणण्यासाठी बहुतेक लोक मंडई जवळ जात.  त्यामुळे  दिवाळीच्या आसपास आई व आजी तिथे जाणार असतच.  ती  संधी साधून तुळशीबागेजवळ जाता आले तर नवीन चित्रे आणणे जमे.

किल्याच्या  मानाने आकाशकंदिल करणे खूपच सोपे असे.  आमच्या  समोर रहाणारे इरूकाकू व दिनूकाका ( श्रीमती  इरावती कर्वे व श्री.  दिनकर  कर्वे)  हे  कॉलेजला दिवाळीची सुट्टी पडली की आकाशकंदिल बनविण्याचा कारखानाच चालू करत.  असंख्य  प्रकारचे कंदिल, काका, काकू  आणि आम्ही मुले मिळून करत असू.  सेलोफेनच्या  कागदाचे, रंगीत  दुधी कागदाचे,गोल, अष्टकोनी, पायलीचे  फिरती चित्रे असलेले असे अनेक प्रकारचे कंदिल बनत व एरंडवण्याच्या माळावरच्या घरांच्यात दिमाखाने झळकत.  कंदिलांच्या  सांगाडयांसाठी बांबूच्या काडया तासून त्या गुळगुळीत करून देण्याचे काम कर्व्यांच्या भागू माळयाचे असे.  मंडईच्या  मागच्या बाजूस असलेल्या दुकानांतून यासाठी बांबू खरेदी होई.  हा  सर्व खटाटोप काका, काकू  स्वत: च्या  खिशातून करत.  आकाशकंदिल  ही तेंव्हा स्वत:  बनविण्याची  गोष्ट असे.  एकतर  आजच्यासारखे  बाजारात सगळीकडे कंदिल मिळत नसत आणि कंदिल विकत आणून लावावा लागला ही नामुष्कीची गोष्ट वाटे.

दिवाळीचे  दिवस जवळ येऊ लागले की वडील शोभेची दारू कधी आणतात असे होई.  बाकी  मित्र मैत्रिणींच्या घरी शोभेची दारू आली ही बातमी लगेच पसरे.  आईच्या  मागे  भुणभुण करणे एवढेच हातात असे.  शेवटी  एकदाचे वडील तयार होत व मोटर सायकल वरून आम्ही दारूच्या स्टॉलवर पोचत असू.  या  वेळी वडील बहुदा हात आखडता घेत नसत व भरपूर खरेदी होई.  एकदा  दारू खरेदी झाली की दिवाळीच्या चार दिवसांसाठी तिचे वाटे होत व नंतर ती सरदून जाऊ नये म्हणून उन्हात ठेवावी लागे.

दिवाळी  जवळ आली की पाऊस परतून येई.  दिवाळीच्या  दिवसांत पाऊस पडलाच नाही असे फार क्वचित होई.  पावसाच्या  झडीने मोठया कष्टाने केलेला किल्ला,  आकाशकंदिल  भिजून जात व उत्साहाचा विरस होई.  एका  दिवाळीत तर इतका पाऊस झाला की खूपसे आकाशकंदिल परतच बनवावे लागले होते हे मला अजूनही स्मरते.  दिवाळी  येई आणि आली आली म्हणता पटकन जाई.  दिवाळीच्या  गप्पा मात्र शाळा सुरू होईपर्यंत पुरत.

दिवाळी  संपली की बहुदा थंडीची चाहुल लागे.  पुण्यातली  त्या वेळची थंडी मात्र कडाक्याची असे.  थंडीचे  दिवस आले की सकाळी,  अतिरिक्त  वर्ग, एन.सी. सी  च्या परेड्स यांना जसा कांही ऊत येई.  सकाळी  अंथरूणातून उठणे सुध्दा जीवावर येई.  कसेतरी  उठून सकाळच्या वेळी थंडीत सायकल चालविणे म्हणजे एक दिव्य वाटे.  आमच्या  शाळेच्या समोर एक अमृततुल्य टी शॉप असे.  त्याच्याकडे  मिळणारा वाफाळणारा चहा आणि खारी बिस्कीटे या वेळी स्वर्गसुखाचा आनंद देत.  अर्थात  हा चहा वारंवार पिणे शक्य नसे.  एकतर  तेंव्हा शाळेत जाणार्‍या   मुलांना पॉकेट मनी वगैरे देण्याची प्रथा नसे त्यामुळे आईशी वशिला लावूनच आणा दोन आणे मिळवावे लागत.  त्यामुळे  रोज बहुदा स्टोव्हवर उकळणार्‍या   चहाच्या वाफांकडे बघूनच समाधान मानावे लागे. थंडीचे  दिवस आले की आमचे टेकडीवर फिरायला जाण्याचे बेत ठरू लागत.  आमच्या  घराच्या वायव्य दिशेला एक छोटया टेकडयांची रांग सुरू होई.  ही  रांग पार पाषाण बावधन गांवांपर्यंत जात असे.  या  टेकडयांवर बर्‍यापैकी   दाट झाडेझुडपे असत.  अनेक  प्रकारचे पक्षी,ससे, साप  आणि कधीमधी एखादे हरीण सुध्दा दिसे.  ऊन  जरा ऊतरले की टेकडीवर जाण्यात मोठी गंमत येत असे.  एखादा  मोठा पक्षी दिसला की तो गरूडच असावा असे आम्हाला वाटे.  परंतू  एवढया वर्षांत गरूड काही आम्हाला कधी बघायला मिळाल्याचे स्मरत नाही.  क्वचित  मोठया आकाराची ब्राम्हणी घार मात्र दिसे.  पावसाच्या  साचलेल्या पाण्यात विरोळे जातीचे साप आणि खडकांच्या मध्ये फुरशी मात्र नेहमी दिसत.  एका  करवंदांच्या जाळीत बसलेले एक मोठे घुबड मात्र एकदा बघितल्याचे स्मरते.  वेताळ  टेकडीच्या पायथ्याशी एक गुंजेचे झाड असे.  या  दिवसात या झाडाच्या शेंगा फुटत आणि झाड लालभडक गुंजांनी भरून जात असे.  टेकडीवर  फिरण्याचे दिवस अगदी वार्षिक परीक्षा हातातोंडावर येईपर्यंत चालू राहत.

माझ्या  पणजीने,  मोठया  कष्टाने,  आमच्या  घराच्या आसपास मोठी बाग फुलवली होती.  आंब्याची  सात आठ कलमे, शेंदरी  आंबा,पेरू,फणस,सिताफळ,रामफळ,चिक्कू,पोपई,रायआवळे, डोंगरी  आवळे आणि तुती असे कोणते म्हणाल ते फळ घरात पिके.  घरातल्या  या फळांचा माझी पणजी आणि आजोबा यांना फार अभिमान असे.  तरूण  वर्गाला मात्र ही फळे तितकीशी आवडत नसत.  आजच्या  काळात रोज फळांसाठी पनास शंभर रूपये खर्च करताना,  त्या  वेळची,  झादावर  चढून पाहिजे ती फळे खाण्याची मजा आता तर स्वप्नवतच वाटते.  घराभोवती  रातराणी,मोगरा,शेवंती,जाई,जुई,  अबोली  यांची फुलझाडे आणि वेल तर होतेच पण गुलाब,डेलिया,ऍस्टर, झिनिया  वगैरेच्या कुंडया डझनानीच मोजाव्या लागत. मोठी  झाडे तर खूपच होती. चांफा,बकुळ, हिरवा  चाफा, गुल  मोहर,ऍकेशिया,  झॅकरांडा  यांचे मोठे सुंदर वृक्ष माझ्या पणजीने लावले होते.  बाकी  शोभेची, लाल  केशरी पानांची व सुरू वृक्षाची झाडे तर होतीच पण त्या शिवाय फुले न येणारी,  सावलीतच  वाढणारी लाजाळू सारखी झाडे पण मला आठवतात.  फक्त  एका बाबतीत मात्र माझ्या पणजीला फारसे यश कधी मिळाले नाही.  ते  म्हणजे फळ भाज्यांचे पीक. घेवडा,वांगी, दोडकी  वगैरे भाज्या लावण्याच्या प्रयत्नात ती नेहमी असे.  पण  मुरमाची जमीन आणि उंदीर, घुशी  यांचा अनिर्बंध संचार यामुळे फळभाज्या खूप आल्याचे मला आठवत तरी नाही.  मधे  एकदा आमच्या समोर रहाणाऱ्या इरावतीबाई कर्वे अमेरिकेची वारी करून आल्या.  येताना  त्या बर्‍याच   प्रकारचे निवडुंग बरोबर घेऊन आल्या.  त्यामुळे  त्यांच्या बागेबरोबर आमच्याही बागेत निवडुंगांचे अनेक प्रकार दिसू लागले.  पुढे  पुढे पणजीला वयोमानानुसार फारसे कष्ट होईनात आणि पानशेतचे धरण फुटल्यानंतरच्या काळात आमच्या घराशेजारच्या कालव्याला पाणी येण्याचे प्रमाण खूपच कमी झाले व कारणपरत्वे जमिनीखालची पाण्याची पातळी पण खूप कमी झाली.  आमच्या  बागेची हळुहळु रयाच गेली.  शोभेची  झाडे प्रथम नाहीशी झाली व हळुहळु बागेच्या खुणाच फक्त ऊरल्या.

एकदा  वार्षिक परीक्षा हातातोंडावर आली की आमचे सर्व उपक्रम बासनात गुंडाळून ठेवावे लागत.  संध्याकाळचे  टेकडीवरचे फिरणे केंव्हाच बंद झालेले असे.  समोरच्या  बखळीत आम्ही बहुदा बेस बॉल खेळत असू तो ही बंद होई आणि थोडेफार दिवस तरी अभ्यास एके अभ्यास अशी अवस्था मुलांची होई.  एव्हांना  थंडी केंव्हाच पळालेली असे व एप्रिल महिन्यातल्या पुण्याच्या कडकडीत उन्हाने आसमंत भाजून काढायला सुरवात केलेली असे.

परीक्षेचा  शेवटचा पेपर टाकून घरी आलो की बहुदा आकाश झाकोळलेले असे.  विजांचा  कडकडाट  आणि मेघांच्या गडगडाटात वळवाचा पहिला पाऊस जोरदार पडे.  पुढचे  दोन चार दिवस तरी हवा मोठी आल्हादकारक राही.  परीक्षा  संपली की एक मोठे सुखद असे रिकामपण मनात भरून येई.  आयुष्यांत  हे रिकामपण परत कधी अनुभवण्यास मिळाले नाही आणि एप्रिल महिन्यातला पुण्याचा पहिला वळवाचा पाऊस आता केंव्हाच लुप्त झाला आहे.  आमच्या  घरासमोर स्पॅथोडियाचे एक मोठे झाड होते.  या  झाडाच्या शेंगा याच सुमारास फुटत आणि खाली पडत.  अर्धी  शेंग हुबेहुब एखाद्या होडीच्या आकाराची असे.  या  होडीत मेणाच्या सहाय्याने डोलकाठी व शीड उभारून ती होडी आमच्या घराशेजारच्या हौदात सोडून खेळणे हा या दिवसातला माझा आवडता खेळ असे.  पुढच्या  दोन पांच दिवसात,  सर्व  मित्र मैत्रिणींच्या परीक्षा संपत व खर्या अर्थाने उन्हाळयाची सुट्टी सुरू होई.  उन्हाचा  कडाका एव्हांना जबरदस्त झालेला असे त्यामुळे बाहेर काही खेळणे किंवा भटकणे शक्यच नसे.  अशा  वेळी पत्यांचा अड्डा दिवसभर चाले.  दहा  अकरा वाजेपर्यंत आईच्या मागे लागून कधी एकदा चार घास पोटात घालतो असे होई.  त्या  नंतर जेवणखाण कशाची शुध्द नसल्यासारखे पत्ते चालत ते संध्याकाळपर्यंत.  सध्या  सुट्टीच्या दिवसात निरनिराळया संस्कार शिबिरांना,  अभ्यास  वर्गांना,  आणि  छंदवर्गांना जाणारी मुले बघितली की मला अक्षरश:  त्यांची  दया येते.  आम्हाला  या सर्व गोष्टींची कधीच गरज भासली नाही की आमच्या आईवडिलांना आपला मुलगा सुट्टीत नुसता वेळ दवडतो आह्रे याबद्दल कधी वाईट वाटल्याचे आठवत नाही.  तेंव्हा  संस्कार घरातच होत असत आणि मित्रांच्या गप्पगोष्टीतून नवे छंद आणि नवा अभ्यास याच्या कल्पना मिळत.  या  शिवाय,  घरी  दारी व आसपास,  माझे  आजोबा नानासाहेब आठवले ,  थोर  समाजसेवक अण्णासाहेब कर्वे,  इरावतीबाई  कर्वे आणि अर्थशास्त्रज्ञ धनंजयराव गाडगीळ यांच्या सारखी ख्यातन्याम व्यक्तीमत्वे सतत डोळयासमोर असल्याने आदर्शांचीही कधी वानवा भासली नाही.

सुट्टीच्या  या कार्यक्रमाला आम्ही जरा रूळतो न रूळतो तोच आईचा मुंबईला जाण्याचा कार्यक्रम ठरे.  माझे  आजोबा ( आईचे  वडील)  तेंव्हा  कल्याण गांवात रहात असत.  उघडी  गटारे,माशा, मातीने  सारवलेली घरे यामुळे मला कल्याण अजिबात आवडत नसे.  तिथले  मचूळ पाणी तर मला अजिबात पिववतच नसे.  नातू  घरी रहावा म्हणून माझे आजोबा फिरकीचा एक मोठा पितळी तांब्या तेंव्हा कल्याण स्टेशनवरून कामावरून परत येत असताना भरून आणत.  आजोबांच्या  मनस्थितीची तेंव्हा मला कधीच कल्पना आली नाही आणि आता त्याची भरपाई करायला फारच उशीर झाला आहे.  नाही  म्हणायला माझ्या दोन मावश्या माझ्यापेक्षा दहा बारा वर्षांनीच मोठया होत्या त्यांच्या बरोबर खेळायला मजा येत असे.  मग  काही दिवसांनी आमचा मुक्काम कल्याणहून मुंबईस आईच्या आजोळी हले.  या  मुक्कामात चौपाटीवरची भेळ,  नाना  चौकातले जयहिंदचे आईसक्रीम व तिरंगी कुल्फी हे कार्यक्रम अपरिहार्य असत. पुण्याला  परततो तो पर्यंत एव्हांना मित्र मंडळींची जरा पांगापांग झालेली असे.  पण  दिवसभराचे हुंदडणे व मनमुराद वाचन यात खंड पडत नसे.  या  दिवसात मग हिंगण्याला रहायला जाण्याचा बूट निघे.  त्या  वेळी  हिंगण्याला माझी मोठी आत्या आणि मावस आजी संस्थेच्या नोकरीत असल्याने रहात.  आत्या  संस्थेत शिक्षिका असल्याने किंवा कशामुळे,  मोठी  कडक आणि शिस्तप्रिय असे.  त्यामुळे  माझा मुक्काम बहुदा आजीकडेच असे.  हिंगण्याच्या  शाळेचे वाचनालय ही माझ्या दृष्टीने एक अनमोल देणगी होती.  त्या  वाचनालयात मी अमाप वाचन केले. नाथमाधव,ह.ना.आपटे,भा.रा. भागवत  यांची जवळ जवळ सर्व पुस्तके मी हिंगण्याला वाचली पण या शिवाय आयव्हॅनो, रॉबिन  हुड, ट्रेझर  आयलंड सारख्या पुस्तकांची मराठीतील भाषांतरे,  कृष्णशास्त्री  चिपळूणकर ( विष्णुशास्त्र्यंचे  वडील)  यांनी  भाषांतरित केलेली शेक्सपियरची सर्व नाटके,  जे  वाचनालयात मिळेल ते वाचत गेलो.  कितपत  समजले ते माहित नाही.  पण  त्या वाचनालयाच्या ग्रंथपाल बाईंनी एकदा माझी चांचणी घेतल्याचे मला आठवते.  मी  काय उत्तरे दिली ते मला आता आठवत नाही पण त्यांनी नंतर मला हवे ते पुस्तक देण्यास कधीच कांकूं केली नाही.  हिंगण्याला  बाकीचा वेळ हुंदडणे,  पोहणे  शिकण्याचा प्रयत्न करणे आणि आत्तेबहिणींबरोबर खेळण्यात केंव्हाच संपत असे.

बघता  बघता उन्हाळयाची सुट्टी संपत येई. शाळेचे, नव्या  पुस्तक वह्यांचे वेध लागत आणि हिंगण्याचा मुक्काम संपून जाई.  याच  वेळी आकाशात प्रथम प्रथम पांढरे भुरकट ढग पश्चिमेकडून येताना दिसू लागत आणि एकदम एका दिवशी संध्याकाळी आकाश काळेकुट्ट होई.  पावसाळा  आणि शाळा सुरू होण्याची ती नांदीच असे.

हे  जादुचे दिवस केंव्हाच तर संपले .  आमचे  घर आहे तसेच आताही उभे आहे पण शेजारून वाहणार्‍या  कालव्याऐवजी,  काळा  धूर ओकणार्‍या   बेढब वाहनांनी भरलेला,  एक  डांबरी रस्ता सहन करते आहे.  बागेतील  झाडे केंव्हाच मेली आहेत.  घर  कृत्रिम फुले आणि फुलझाडे यांनीच सजवावे लागते आहे.  टेकडीवर  फिरायला जाण्यासाठी चारचाकी बाहेर काढावी लागते आहे.  एरंडवण्याचा  माळ आता सिमेंट कॉन्क्रिटच्या जंगलाने भरून गेला आहे.

जादुचे  दिवस तर केंव्हाच संपले.

25 मार्च 2002

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

7 thoughts on “जादुचे दिवस

 1. अतिशय सुंदर चित्र उभं केलंय.. त्या काळच्य़ा पुण्याला नेउन फिरवुन आणलंत.. 🙂

  Posted by Mahendra Kulkarni | जून 2, 2009, 7:02 pm
  • महिंद्रजी आभारी आहे. आपण प्रथम पासूनच माझ्या लेखांना खूपच प्रोत्साहन दिले आहेत्. तसेच या पुढेही चालू ठेवा हीच विनंति.

   Posted by chandrashekhara | जून 4, 2009, 10:19 सकाळी
 2. आई शप्पथ खूप मस्त लिहिलं आहे.मला असं वाटत होतं जणू काही मी तुमच्या जादुई घरात आणि बाहेरच्या बागेत फिरत आहे.
  अंदाजे हे तुमचं घर नक्की BMCC च्या आसपास असणार आहे.
  असं पुणे आज का नाहीये?

  Posted by mipunekar | जून 2, 2009, 11:45 pm
 3. फारच छान..

  Posted by Prasad | जून 3, 2009, 4:34 सकाळी
 4. चंद्रशेखरजी,

  अक्षरशः सगळं चित्रं जणू डोळ्यांसमोर उभं केलंत!
  मी मुंबईकर असल्यामुळे आणि माझा जन्म १९७०च्या दरम्यानचा असल्यामुळे, हे मोठ्या,ऐसपैस घरांचं आणि त्यासभोवतालच्या सुंदर बागेचं वर्णन वाचलं की एखाद्या वेगळ्याच जगाबद्द्ल वाचत असल्यासारखं वाटतं.काही प्रमाणांत मात्र माझ्या आजोळी म्हणजे विदर्भात चंद्रपूरला जेंव्हा दिवाळी कींवा उन्हाळ्याच्या सुट्टीत जाणं व्हायचं तेंव्हा मात्र अशीच् धमाल आम्हीहि करत असू! प्रत्येकाच्या लहानपणींच्या आठवणी अश्याच हळव्या असतात्.

  सोनाली

  Posted by sonali | जून 7, 2009, 8:11 pm
 5. नमस्कार! जादुचे दिवस वाचून खूप छान वाटलं. सुमारे ३१ वर्षांपूर्वी शनिवार पेठेतील भाड्याचे घर सोडून कर्वेनगरात रहायला आलो तिथपासूनचा सगळा प्रवास डोळ्यांपुढे उभा राहिला. १९७८ मधे सुद्धा गावापासून खूप दूर वाटायचे. सायकलने शाळेत जाणे म्हणजे एक प्रवासच असायचा!डांबरी रस्ते, वीज, कॉर्पोरेशनचे पिण्याचे पाणी ह्या गोष्टी तेंव्हाही अप्राप्यच होत्या! असो, आता पुण्याचा विस्तार अफाट झालेला आहे!

  तुमचा ब्लॉगही आवडला. खूप छान लिहीता.

  शुभेच्छा.

  Posted by मी पुण्याचा | जून 30, 2009, 8:07 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: