.
writing

कलंदर


एकोणिसशे सत्तर- ऐंशीच्या दशकात भारतातील सर्व द्रुकश्राव्य माध्यमे पूर्णपणे सरकारच्या ताब्यात होती.एक विविध भारती ही वाहिनी सोडली तर आकाशवाणी व दूरदर्शन ही सरकारी माध्यमे, दिल्लीला तयार झालेल्या, अत्यंत रट्याळ व नीरसवाण्या कार्यक्रमांचा रतिबच रोज लावत असत व दुसरा कांही पर्यायच नसल्याने हेच कार्यक्रम लोकांना बघावे लागत. त्याच वेळी बांगला देशचे युद्ध संपले होते व दोन्ही देशांमधे सांस्कृतिक आवाण देवाण चालू झाली होती. या निमित्ताने, बांगला देशाची एक प्रख्यात व सुंदर गायिका ‘रूना लैला’ भारताच्या दौर्‍यावर आली आणि लोकांना एक सुखद आश्चर्याचा धक्का देत दूरदर्शनने चक्क तिचा एक ‘Live Performance’ प्रक्षेपित केला. या गायिकेचा आवाज, तिची अदाकारी यांची सर्वांवरच त्यावेळी मोहिनी पडली होती. त्या वेळी तिने गायलेले सिंधी भाषेतले ‘ दमा दम मस्त कलंदर ’ हे गाणे अतिशय गाजले होते.

माझ्या एका सिंधी मित्राला त्या वेळी मी या गाण्याबद्दल विचारणा केली होती. व हे गाणे सिंधी मनात अढळ स्थान मिळविलेल्या संत झुलेलाल यांच्याबद्दल असल्याचे मला समजले होते. मराठीमधे कलंदर या शब्दाचा अर्थ ‘ स्वत:च्या धुंदीत व कैफात, बेफिकिर व बिनधास्त आयुष्य जगणारा माणूस ’ असा मला माहित असल्याने, एका संताला ही विशेषणे कशी काय लावली आहेत? हे मला पडलेले एक कोडेच होते.

मागच्या महिन्यात, ‘Little Champs’ नांवाचा एक लहान मुलांच्या गाण्यांचा कार्यक्रम बराच लोकप्रिय झाला होता. या कार्यक्रमात एका  लहान मुलीने हेच गाणे परत गायले होते व ते गाणे अजूनही तितकेच लोकप्रिय असल्याचे दर्शविले होते, हे गाणे ऐकल्यावर माझ्या मनात परत एकदा ‘कलंदर’ उगीचच रेंगाळत राहिला. पण परवाच एका पुस्तकांत या कलंदर शब्दाचा संदर्भ सापडला व जुन्या एका कोड्याचा उलगडा झाला.

कलंदर ह्या शब्दाचे मूळ खरे म्हणजे फारसी किंवा इराणी आहे आणि त्याच्या उगमाबद्दल एक गंमतीदार कथा आहे. इ.स 1232च्या आसपास इराणमधील ‘साव्हे’ (Saveh) या गांवात ‘जलाल्लुद्दिन’ नावाचा, साधुवृत्तीचा व कडक ब्रम्हचर्य पाळणारा एक, तरूण रहात होता. त्याच्या मर्दानी सौंदर्यावर भुलून एका श्रीमंत तरूणीचे त्याच्यावर मन जडले. काहींतरी कारणाने तिने त्याला स्वत:चा घरी बोलावले व त्याला आपल्याशी लग्न करण्यासाठी अडकवून ठेवले. बिचारा ‘जलाल्लुदिन’ मोठ्या धर्मसंकटात सापडला. त्याने स्वच्छ्तागृहात जाण्याची परवानगी मागितली व तो जेंव्हा बाहेर आला तेंव्हा त्याने आपल्या शरिरावरचे सर्व केस सफाचाट केले होते. त्याला पाहून ती श्रीमंत तरूणी अक्षरश: किंचाळली व जलाल्लुद्दिनची या संकटातून सुटका झाली.

तो मुळचाच साधुवृत्तीचा असल्याने त्याने आता सर्वसंगपरित्याग करून एखाद्या संताचे जीवन जगण्यास सुरवात केली. त्याला त्याच्या विचारसरणीचे आणखी शिष्य मिळाले व त्याने ‘कलंदरिया’ (Qalandariyya) हा एक नवाच सुफी पंथ चालू केला. कोणत्याही प्रकारची स्थिरता व सुखोपभोग ने घेता सतत फिरत रहाणे हे या पंथाचे मुख्य ब्रीद होते व त्यामुळेच हा पंथ ‘दर्विश’ (Dervish) म्हणूनही ओळखला जातो. ब्रम्हचर्य, स्वत:च्या शरिराची उपासमार व हाल आणि पूर्ण दारिद्र्यात, भिक्षा मागूनच् उदरभरण व सर्व प्रकारचे समाजाला न रुचणारे विचित्र व विक्षिप्त वर्तन  ही या पंथियांची जीवनपद्धती असे. अस्तित्वात असलेल्या सर्व सामाजिक रीतीभाती, परमेश्वराची प्रार्थना करणे वगैरे सर्व  गोष्टींचे या पंथियांना संपूर्ण वावडे होते. फारसी भाषेतील कलंदर शब्दाचा अर्थ कुरुप किंवा न रुचणारे असाच आहे. सतत फिरत रहाण्यामुळे ही चळवळ हळूहळू दमास्कस, जेरुसलेम आणि इजिप्तमधील दामिएट्टा येथपर्यंत चांगलीच फोफावली. Encyclopedia of Islam, कलंदरपंथियांची, Hippies बरोबरच तुलना करतो. इ.स. 1360 पर्यंत या पंथियांचे प्रस्थ इतके वाढले की इजिप्तच्या सुलतानाने त्यांना फटके मारून हाकलून लावण्याचे फर्मान काढले.

असे असले तरी या पंथियांना समाजात अतिशय मानाने व आदराने वागवले जाऊ लागले. आणि कलंदर हा शब्द अतिशय आदरानेच वापरला जाऊ लागला. म्हणूनच बहुदा संत झुलेलाल यांना सिंधी बांधव आदराने मस्त कलंदर म्हणत असावेत.

मराठीत मात्र आपण कलंदर हा शब्द अगदी निराळ्याच अर्थाने वापरतो. सिंध आणि महाराष्ट्र यांच्यात काही शेकडो मैलांचेच अंतर आहे पण शब्दाचा अर्थ मात्र खूपच बदलला आहे. शब्दार्थाने पूर्ण कोलांटी उडी मारली आहे.

28 मे 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: