.
Pen Sketch

डबेबाटलीवाला


संध्याकाळी फिरून परत येत असताना काहीतरी बारीक सारीक खरेदी करावयाची म्हणून ‘एल कमिनो’ वरून येत होतो. रस्त्याच्या कडेला सहज लक्ष गेले. एक व्यक्ती, कुंपण म्हणून लावलेल्या झाडांच्या मध्ये एक लांब काठी घालून काहीतरी खुडबुड करताना दिसली. थोडे जवळ गेल्यावर लक्षात आले की त्या काठीला पुढे एक आंकडा बसविलेला आहे. त्या व्यक्तीने मोठ्या  सफाईदारपणे त्या आंकडयाच्या मदतीने कुंपणात पडलेले शीतपेयाचे दोन डबे बाहेर काढले. बुटाखाली चिरडून व दाबून सपाट केले आणि रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या आपल्या सायकलच्या मागे बसविलेल्या एका डब्यात टाकले. प्रथम वाटले की हा नगरपालिकेचा सफाई कामगारच असावा पण आणखी थोडे जवळ गेल्यावर पटकन ओळख पटली की हा तर आपल्या पुण्याच्या रस्त्यांवर भेटणारा डबेबाटलीवाला.

तसे पाहिले तर पुण्याच्या आणि सनीव्हेल मधे भेटलेल्या या डबेबाटलीवाल्यांत शारीरिक  साम्य असे कांही नव्हतेच. जवळ जवळ साडेसहा फूट ऊंची व आडदांड शरीरयष्टीचा हा माणूस पोलीस खात्यांत जास्त शोभला असता. त्याने अंगावर घातलेले कपडे सुध्दा त्याच्या लालबुंद रंगाला शोभत होते. मूळ निळया रंगाची असावी अशी शंका यावी पण आता फक्त मळकट दिसणारी जीन्स व तशाच कापडाचा कोट आणि डोक्याला बेसबॉल खेळाडू घालतात तशी टोपी असा त्याचा वेष होता. पायात, जुन्या जमान्यात कोणीतरी कधीतरी खरेदी केलेले व आता टाकून दिलेले, मूळ पांढर्‍या     रंगाचे बूट होते. पण एकूण कळकटपणा आणि मळकटपणा मात्र पुण्याच्या रस्त्यांवर भेटणार्‍या     याच्या भाईबंदांसारखाच होता. त्याची सायकल मात्र एक प्रेक्षणीय वस्तू होती. सायकलच्या सर्व बाजूंना त्याने निरनिराळया प्रकारचे डबे व टोपल्या मोठया सृजनशीलतेने बांधल्या होत्या. बांधलेले हे सर्व डबे व टोपल्या, असंख्य आकाराच्या आणि अनेक  प्रकारच्या पेयांच्या बाटल्या व डबे यांनी पूर्णपणे भरलेले होते. इतके दिवस माझी अशी प्रामाणिक समजूत होती की सायकल वरून जास्तीत जास्त सामान नेण्याच्या बाबतीत पुण्याच्या लोकांचा कोणीच हात धरू शकणार नाही. धान्याची भरलेली पोती, गॅसचे सिलिंडर, लोखंडी लांब लांब नळया, तेलातुपाचे डबे असले विचित्र आकाराचे सामान पुण्याचा सायकलवाला लीलयेतेने आपल्या वाहनांवरून घेऊन जाताना दिसतो.पण हा कॅलिफोर्नियाचा डबेबाटलीवाला तर त्यांच्याहून कांकणभर जास्त सरसच वाटत होता. इतके विचित्र आकाराचे व प्रकारचे सामान एकाच वेळी सायकलवरून नेणे किती सहज शक्य आहे हे त्याच्याकडे नुसता एक दृष्टीक्षेप टाकला तरी कळत होते.

पुण्याच्या रस्त्यांवर याचे अनेक भाईबंद पाहिले होते. खांद्यावर एक मोठे पोते टाकून रस्त्याकडे काकदृष्टीने बघणारा व कोठेही डबा बाटली किंवा तत्सम वस्तू पडलेली दिसली की क्षणांत ती आपल्या पोत्यांत टाकून अदृष्य करणारा भंगारवाला इतका नेहमी दिसतो की परत वळून किंवा लक्ष देऊन बघण्यासारखे, विचार करण्यासारखे त्यात काही आहे असे वाटतच नाही. पण कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर, झगमगत्या दुकानांच्या समोर आणि माशांसारख्या सुळकन जाणार्‍या   मोटारींच्या मधे भेटलेला हा त्यांचाच जातभाई मात्र स्मरणांत पक्का राहिला आहे.

18 फेब्रुवारी 2000

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “डबेबाटलीवाला

  1. अखादा फोटो काढायचा ना, मज्जा वाटली असती बघायला 🙂

    Posted by अनिकेत | मे 27, 2009, 8:32 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: