.
Pen Sketch

नानामामा


नानामामाचे एका शब्दात वर्णन करणे एकदम सोपे आहे. जगन्मित्र हा शब्द बहुदा मामासाठीच बनविलेली असावा. समवयस्क भाचेजावई असोत, पंचविशीतील नातवंडे असोत किंवा समोर राहणारा चार पांच वर्षाचा ओंकार असो, मामाची सर्वांशी मैत्री. मामा समवयस्कांबरोबर राजकारणावर बोलेल. तरुणांच्या बरोबर सिनेमा व क्रिकेटवर बोलेल तर ओंकार बरोबर सचिनने मारलेल्या ‘ फोर ‘ चे कौतुक करेल. यामुळेच की काय मामाच्या शब्दकोशात पणजोबा, आजोबा वगैरे नाती नसावीतच. सर्वांचा तो नानामामाच आहे. नानामामाची मैत्री फक्त माणसांपर्यंतच मर्यादित नाही. तो आला की आमची लॅसी कुत्री धावत येणार व त्याच्याकडून थोपटून घेणार. आमचा बोका मान उंचावून बघणार व मामाच तर आहे म्हणून परत कुशीत डोके खुपसून निद्राधीन होणार.

आडमाप सहा फूट उंची, गोरापान रंग व सडपातळ बांधा असलेला मामा गेली चाळीस वर्षे आहे तसाच आहे. नाही म्हणायला माथ्यावरचे विरळ केस आता पांढुरके झाले आहेत व थोडासा बाक आल्यासारखा वाटतो आहे. पण उठून मामा ताडताड चालावयाला लागला की मामाचे वय विसरायलाच होते आणि जेंव्हा केंव्हा संभाषणाची गाडी पुढारी, राजकारण, भ्रष्टाचार व महागाई या सारख्या मध्यमवर्गाच्या जिव्हाळयाच्या विषयांवर येते तेंव्हा मामा अशा तडफेने बोलतो की आपण एखाद्या तरुण क्रांतिकारकाशीच बोलतो आहेत असे वाटू लागते. नानामामाचा मूळचा स्वभाव खूपच तापट व रागीट. घरातले सर्व त्याला वचकून असत. पण हा राग कांही क्षणांचाच. मग आतला प्रेमळ, वात्सल्यपूर्ण स्वभाव परत उभारून येणार.

पुण्या-मुंबईच्या मध्यम वर्गाचा प्रातिनिधीक असलेल्या आमच्या मामाला कधी प्रापंचिक अडचणी आल्या,  नव्हे ,आल्या असतीलच,  तरी त्या कोणाला कधी दिसल्या नाहीत. कोणाचीही अडचण असो, मामा सदैव हजर व मनापासून मदत करण्याची तयारी. रात्री अपरात्रीच्या प्रवासासाठी  कोणाला सोबत हवी असली तरी मामा सदैव तयार. भाचीच्या लग्नाच्या प्रयत्नांत खीळ बसते असे वाटल्यावर याच्या डोळयात पाणी. भाचेजावयांना पुण्याला जागा घ्यावयाची असे कळल्यावर त्यांना योग्य तो माणूस गांठून देण्यात मामा पुढे. पण नंतर कोणतीही अपेक्षा नाही.

नानामामा खरे म्हणजे आमचा आजोबा. पण आईच्या आईला कधीच न बघितल्यामुळे नानामामाचे मुंबईचे घरच आम्हा नातवंडांचे खरे आजोळ होते. उन्हाळयाच्या सुट्टीत मुंबईला गेल्यावर आमचे लाड पुरवावे नानामामानेच. चौपाटीवर जाऊन मनसोक्त भेळ कोणी खाऊ घातली असेल तर त्यानेच. नानामामाला प्रत्येक गोष्टीचा प्रचंड उत्साह. घरी भेळ करावयाची ठरली तर चुरमुरे आणण्यापासून ती कालवण्यापर्यंत सर्वात नानामामा हवाच. परत कामाचा उरक प्रचंड. नातवाच्या मुंजीत शंभर सव्वाशें पानाच्या पंक्तीसाठी श्रीखंड गाळायला बसला नानामामाच. गणपती आले की आरत्या म्हणायला व विसर्जनासाठी चौपाटीच्या समुद्रात जाताना त्याचाच पुढाकार. आपली एकुलती एक बहीण, लवकर तरुण वयातच गेल्यामुळे की काय, भाच्यांच्यावर अपार माया, प्रेम व जिव्हाळा. पण प्रदर्शन बघायला गेलेल्या भाच्या तेथेच रमल्या व त्यांना परतायला उशीर झाला म्हणून वडीलांसारखा धाक दाखवून रागावणारा नानामामाच. त्यामुळेच बहुदा याच भाच्या आता सत्तरीच्या झाल्या तरी मनातून कुठेतरी मामाचा धाक बाळगूनच असतात. आम्हा नातवंडांना मात्र मिळाले मामाचे प्रेम, अकृत्रिम जिव्हाळा व त्याच्यापेक्षाही त्याची मैत्री.

नानामामाची नंतर पुण्याला बदली झाली व सुरवातीला तो आमच्या घरीच पाहुणा म्हणून राहू लागला. त्याचा मुक्काम नातवाच्या खोलीत, त्यामुळे हा आजोबा कॉलेजात जाणार्‍या    आपल्या नातवाचा मित्रच झाला. सिनेमाला जाण्यापासून ते गप्पागोष्टींपर्यंत मामाचा सहभाग असे. कांही दिवसांनी मग मामा आपल्या स्वत:च्या घरांत रहायला गेला पण नातवाला मात्र मित्र दुरावला. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर नातवाने स्कूटर घेतली व पुणे-मुंबई प्रवास स्वत:च्या वाहनाने करण्याची गंमत अनुभवली. पण गंमतीची गोष्ट म्हणजे या प्रवासात सुध्दा मागच्या सीटवर होता नानामामाच.

नानामामाचे बोलणे निर्भिड व स्पष्ट. तो पांढर्याला   पांढरे व काळयाला काळेच म्हणणार. राजकारणी धूर्तता त्याच्याजवळ नाही. नातीच्या घरभरणीला गेल्यावर जेवणाचा बेत न आवडला तर तिला तसे सांगण्याचा स्पष्टवक्तेपणा फक्त नानामामाच करू जाणे. परंतु बोलणे पूर्ण पारदर्शी, कुठलाही हेतू मनात न धरता केलेले, त्यामुळे त्यावेळी अप्रिय वाटले तरी नंतर कोणी मनात ठेवणे शक्य नाही. कुठल्याही समारंभाला किंवा भोजन समारंभाला मामाची पसंतीची पावती मिळाली की तो कार्यक्रम उत्कृष्ट रित्या पार पडलेला असणारच.

नानामामा तसा खरा खवैय्याच. भेळ, पाणीपुरी, बिरडयांची उसळ किंवा थालीपीठे, सर्व अगदी आवडीने खाणार. पण आपण पाटावर बसून हुकुम सोडावयाची त्याची मानसिकता नाही. अजूनही मंडईत जाऊन भाचीसाठी लोणच्याच्या कैर्‍या     आणण्याची त्याची तयारी. वेळ आली तर पाककलेतही तो आपला हात चालवतो. सर्व गोष्टी व्यवस्थित रीतसर पार पाडल्याच पाहिजेत हा हेका. पणतीच्या लग्नात नीट केळवण करता येत नाही म्हणून त्याला केवढी रुखख.

नानामामा अलीकडे थकल्यासारखा वाटतो. बोलताना मधून मधून विषादाची एखादी लहर उमटते. पण ती तात्पुरतीच असते. कांही क्षणांतच त्याच्या मनातला प्रचंड उत्साह परत जागा होतो. परवां त्याची पणती अमेरिकेला जाऊन आली. ती परत आल्यावर तिचे प्रवास वर्णन सर्व बारकाव्यांसकट कोणी ऐकले असेल तर नानामामानेच. नंतर तिला एका संगणकप्रणाली बनविणार्‍या     उद्योगांत नोकरी मिळाली. मामाला त्यातही पूर्ण रस. पणतीला खूपच आश्चर्य वाटले. पण खरे तर त्यात नवल असे काहीच नाही. उद्या नानामामाला त्याची खापर पणतवंडे नक्की भेटतील. मामा त्यांना त्यांच्याच पध्दतीने ‘ हाय ‘ म्हणेल व ती पण आपल्या खापर पणजोबांना नानामामा म्हणूनच हाक मारतील व त्यांची मैत्री क्षणांत जुळेल.

6 ऑगस्ट 1999

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

One thought on “नानामामा

  1. छान जमलाय लेख. अगदी जिवंत चिर डॊळ्यापुढे उभं केलंय.

    Posted by Mahendra Kulkarni | मे 16, 2009, 7:47 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: