.
Pen Sketch

आजी


काही माणसे दुसर्‍यांना कांहीना काही देत रहाण्यासाठीच बहुदा जन्म घेतात. आजींचे काहीसे असेच असावे. आजींनी आयुष्यभर दुसर्‍यांना भरभरून दिले व देत राहिल्या. त्यांचा हात नेहमी उपडाच व मिटलेलाच राहिला. त्यांनी हाताची ओंजळ कधीच पसरली नाही. मुले, नातवंडे,बहिणी,भाचरे यांना तर त्यांनी दिलेच पण परिचित आणि अगदी घरचा विश्वासू गडी माणूस सुध्दा त्या कधी विसरल्या नाहीत. त्यामुळेच की काय त्यांची झोळी परमेश्वराने कधीच रिकामी ठेवली नाही. आजी आयुष्यभर दुसर्‍यांना देत गेल्या पण त्यांनी घेणार्‍याला कधी कमीपणा वाटू दिला नाही. गरजू असो किंवा संपत्तीच्या राशीवर लोळणारा असो, त्याला नेहमीच ” हे मला आजींनी दिले.” हे अभिमानानेच सांगता आले. कोणाला गरज आहे हे आजींना बरोबर उमगे. कोणाचा विमा थकलेला असो, कोणाला नवीन धंदा चालू करण्यासाठी बीज भांडवल हवे असो किंवा नातवाला उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्यासाठी मदत हवी असो, आजींनी कधी गरज भागवली नाही असे झाले नाही.

आजी आयुष्य ताठ मानेने आणो ताठ कण्याने जगल्या. वयाची साठ पासष्ठ वर्षे झाल्यावर त्या परत एकटया पडल्या. पण खंबीरपणे त्यांनी आपले स्वतंत्र आयुष्य परत उभे केले. त्यांना कधी दुसर्‍या कोणाची मदत लागली नाही की कधी त्यांना दुसर्‍याकडे काही मागावयाला जावे लागले नाही. उरलेल्या तुटपुंज्या शिलकीवर कसेतरी रडत खडत आयुष्य घालविणे किंवा मुलांच्यावर भार होऊन जगणे वगैरे त्यांना कधी रुचले नसावे. त्यांनी स्वतंत्रपणे आपला अर्थार्जनाचा मार्ग शोधून काढला व मोठया टेकीत आपले उर्वरित आयुष्य त्या जगल्या.

उतार वयात मागे लागलेल्या दुर्धर रोगाने आजींची शरीरयष्टी बारकुडी झाली होती. पण त्यांचे मन इतके खंबीर होते की शरीराचा अशक्तपणा व आजारीपणा यांना त्यांनी पूर्णपणे एका बाजूल ठेवले होते. एका अर्थाने आजी राजयोग़ीच होत्या. त्या विरक्त वगैरे कधीच झाल्या नाहीत. आयुष्यातील सर्व आनंद त्यांनी भरपूर लुटला व त्यात इतरांनाही सहभागी करून घेतले. चांगली चुंगली रेशमी वस्त्रे, हिऱ्यामोत्यांचे दागिने, कशाचेच आजींना वावडे नव्हते. पण एकदा मनात आल्यावर हे दागिने मुलांना वाटून टाकले. अर्थात नवीन फॅशनचे नवे दागिने परत स्वत:साठी करायला त्या विसरल्या नाहीत.

निरनिराळया प्रकारचे खाण्याचे चविष्ट पदार्थ करून ते इतरांना खाऊ घालणे हा तर आजींचा सर्वात आवडीचा विषय. नंतर नंतर मुले मोठी झाली व त्यांचा आहार पण पूर्वीसारखा राहिला नाही याची आजींना मोठी हळहळ वाटे. घरी कोणी कधी पाहुणा आला व त्याला कांही खाण्यापिण्याला देता आले नाही तर आजींना मोठे अपमानास्पद वाटे. मुलाचे मित्र,सहकारी,व्याही मंडळी, सर्वांचा आजींनी भरपूर पाहुणचार केला. त्यांच्याकडे कधीही गेले तरी साबुदाण्याची खिचडी किंवा थालीपीठे तयार कशी असत हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय होऊ शकेल. अगदी शेवटच्या आजारपणापर्यंत मुलाच्या आवडीच्या आल्याच्या वडया आणि तांदुळाच्या पिठाचे लाडू करून तो जगभर कोठेही असला तरी त्याच्यापर्यंत पोचवायला आजी विसरल्या नाहीत. भाजी खरेदी हा तर आजींच्या आवडीचा आणखी एक एक विषय. आजी दिल्लीला रहात असताना घरावरून जाणार्‍या जवळ जवळ प्रत्येक भाजीवाल्याकडून त्या कांही ना कांही भाजी घेत. दिल्लीला मिळणारी चविष्ट भाजी हा त्यांच्या मोठया कौतुकाचा विषय असे. त्या स्वत: तर सुगरण होत्याच पण नवीन पध्दतीचा कांही पदार्थ त्यांच्या खाण्यात आला व त्यांना आवडला नाही असे क्वचितच होत असे.मुलगी पिझ्झा करायला शिकली तेंव्हा तिने भीतभीतच एक तुकडा आजींना खाण्यास दिला. आजींना तो इतका आवडला की पुढे मुलीने परत कधीही पिझ्झा केला की एक तुकदा तरी आपल्या आईसाठी वगळून ठेवायला विसरत नसे.

आजींची बुध्दी अतिशय कुशाग्र व स्मरणशक्ती अतिशय तीव्र होती. सुतावरून त्या केंव्हाच स्वर्गाला पोचत. पण दुसर्‍याच्या अडचणीचा त्यांनी कधी गैरफायदा घेतला नाही. कोणाबद्दल कधी वावडी उठवली नाही. कुठलीही माहिती आजींच्याकडे नेहमी एकेरी मार्गासारखी जात असे. त्यांच्या मनातच ती राही. आजींचे शिक्षण मॅट्रिकपर्यंतच झाले होते पण इंजिनीयर असलेल्या आजोबांच्यावर, स्क्रॅबलच्या खेळात त्या बरोबरीच काय पण कुरघोडीही करत. आजोबांना कुरकुरत का होईना, आजींची हुषारी मान्य करावीच लागे. त्या म्हातार्‍या झाल्या तरी त्यांचा जगण्यातला उत्साह कधी कमी झाला नाही. गाण्याच्या मैफिली, नवीन नाटके या सर्वांत आजींना रस होता. नातीचे लग्न ठरल्यावर नवीन नातजावई आपल्या जुन्या झालेल्या सोफासेटवर कसा बसणर म्हणून आजींनी प्रथम काय केले असेल तर हॉलला नवीन पडदे व सोफासेटला नवीन कव्हर्स करायला घेतली.

आजींची आयुष्यातील प्राधान्ये सरळ होती. मुलांच्या अडचणींना त्यांनी सर्वात महत्व दिले. मुलाच्या अभ्यासासाठी त्या एकटया सर्व मुलांना घेऊन पुण्यात राहिल्या. कोणाचे आजारपण, ऑपरेशन, कांहीही असो, हातातले सर्व टाकून त्या धावत येत असत. कुठल्याही अडचणींना त्या कधीच घाबरल्या नाहीत. आजोबा दूर देशी नोकरीत अडकलेले असताना त्यांनी एकटीने लेकी सुनांच्या दिवाळसणांपासून ते बाळंतपणापर्यंतच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या व सर्व संभाळले. आजोबांची उणीव कधी कोणाला जाणवू दिली नाही. पण मुले आता स्वतंत्र झाली आहेत व त्यांना आता आपली गरज नाही हे लक्षात आल्याबरोबर त्या सरळ पुण्यातले आपले घर बंद करून आजोबांच्या दूरगांवाला निघून गेल्या. पण मुलीला उत्तर हिंदुस्थानातील अगदी आडगांवी नवीन संसार थाटायचा आहे हे समजल्यावर त्या तिच्या मदतीला त्या कानाकोपर्‍यातही धावून गेल्या. त्यावेळी आपण बाईमाणूस ! एवढा लांबचा व जिकिरीचा प्रवास एकटीने कसा करणार ? वगैरे विचार त्यांच्या मनाला शिवलेही नाहीत. त्या एकटयाच मोठया खंबीरपणे प्रवास करून लेकीकडे गेल्या व तिच्या संसाराचे बस्तान बसवून दिल्यावरच परत एकटयाच आजोबांच्या गावाला परतल्या.

आजींना प्रवासाची विलक्षण आवड होती. साठी उलटल्यावर त्यांना एकदा तरी परदेश प्रवास करावा असे वाटू लागले. आजोबांनी नेहमीप्रमाणे द्रव्याची अडचण सांगून बघितली. आजींना याची बहुतेक आधीच कल्पना असावी. त्यांनी या अडचणीतून असा मार्ग शोधून काढला की आजोबांना पुढे काही बोलताच आले नाही. आजी,आजोबा मग अमेरिकेला गेले. सर्व काही बघून, मनासारखी खरेदी करून, मोठया मजेने ही सफर करून आले. भारतातल्या भारतात प्रवास करण्यासाठी मात्रा आजी कोणांसाठी अडून राहिल्या नाहीत. यात्रा कंपनी, कोणी मैत्रिणी. जमेल तसा त्यांनी प्रवास केला. काश्मिर ते कन्याकुमारी,सौराष्ट्र ते बंगाल. सर्व काही बघितले. एवढे झाल्यावर सुध्दा त्यांचा प्रवासाचा उत्साह कमी झाला नाही. मुंबईची नात पुण्याला आल्यावर तिला पुणे दाखवायला स्पेशल टॅक्सी करून त्या फिरल्या. नातींना घेऊन गोव्याला जाण्याचे बेत त्यांच्या मनात होतेच.

आजींची नातवंडांच्यावर अपार माया होती. त्या दिल्लीला रहात असताना कोणीही पुण्या मुंबईला येणारे मिळाले की नातवंडांच्यासाठी खाऊ,खेळ,कपडे पाठवायला त्या विसरल्या नाहीत. नातवंडांना काही दुखले खुपले तर त्या नेहमीच धावून जात असत. पण नातीचे लग्न ठरल्यावर तिला सासरी वागावे कसे याबद्दल चार परखड शब्द सांगायला त्या विसरल्या नाहीत.

आजींच्या मनाचा एक कोपरा मात्र त्यांच्या मुलासाठी पूर्ण आरक्षित होता. मुलाची हुशारी, त्याने निरनिराळया परीक्षात मिळविलेले यश, पुढील आयुष्यात त्याला मिळालेले मानसन्मान व त्याच्या कार्यक्षेत्रात त्याने गाठलेली यशोशिखरे याचा आजींना मनस्वी अभिमान होता. शाळेपासूनची त्याची वह्या-पुस्तके, सर्टिफिकेट्स आजींनी सर्व जपून ठेवले होते. पण हा अभिमान आजींच्या चालण्याबोलण्यात कधी अहंभाव, गर्वाच्या स्वरूपात प्रगट झाला नाही. फक्त चार समवयस्क मैत्रिणींच्या बरोबर पत्ते खेळताना मात्र मुलाचे भरपूर कौतुक चाले आणि आपल्या मुलाचा सहवास आपल्याला पुरेसा मिळत नाही या विषादाची लहर त्यांच्या बोलण्यात जरूर उमटत असे.

आजोबा गेल्यावर उणीपुरी पंधरा वर्षे आजींनी सर्व संभाळले. एवढे मोठे घर, पै पाहुणा कधी कुठे काही उणे पडले नाही. मुलांच्या घरची कार्ये, त्यांच्या अडचणी, आजी सगळीकडे समर्थपणे मागे उभ्या राहिल्या. तब्येत साथ देत नव्हती तरी मनाची उभारी,खंबीरपणा तसाच राहिला. पण या सगळयात आजी आता थकल्या आहेत, त्यांना हे सर्व संभाळणे कठीण जात आहे हे कधी कोणाच्या लक्षातच आले नाही. अर्थात आजींनी कधी तक्रार केली नाही की वैताग व्यक्त केला नाही. त्या सर्व सांभाळतच राहिल्या.

पण शेवटी तब्येतीनेच साथ सोडली व आजी परावलंबी झाल्या. आपण आजारी आहोत व दुसरे कोणीतरी आपली शुश्रुषा करते आहे हे खरे म्हणजे आजींना स्वप्नात सुध्दा मान्य झाले नसते. पण नियतीपुढे त्यांना मान झुकवावी लागली. एकदा मुलगी त्यांना म्हणाली की ” आई तुला जरा बदल होईल ! तू माझ्या घरी रहायला चल.” पण, स्वत:चे घर सोडून आजारी अवस्थेत मुलीकडे जाणे त्यांना नामंजूर होते. त्यांनी साफ नकार दिला. आजी अंथरूणावर परावलंबी अवस्थेत पडून राहिलेल्या असताना सुध्दा त्यांची स्वतंत्र वृत्ती कधी कमी झाली नाही.. स्वत:च्या आजारपणाचा कोणताही भार मुलांवर पडू नये असे त्यांना सारखे वाटत राही. भेटायला आलेल्या पाहुण्यांचा नीट पाहुणचार करता येत नाही याचे त्यांना सारखे वैषम्य वाटत राही. मुलगा भेटायला आला तर त्याच्या आवडीच्या आल्याच्या वडया कोणाकरून कशा करून घेता येतील याच्याकडेच त्यांचे लक्ष असे. त्या तशा अवस्थेत सुध्दा नातीच्या लग्नात तिला काय द्यावयाचे याचे मनसुबे त्या करीत रहात.

काही माणसे दुसर्‍यांना काहीना काही देत रहाण्यासाठीच जन्म घेतात. आजींचे काहीसे तसेच असावे.

19 जुलै 2000

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “आजी

  1. Ashi ajji parat bhetnar nahi

    Posted by Smita M Dhumal | फेब्रुवारी 16, 2012, 2:26 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 385 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: