.
Pen Sketch

आमचा तुकाराम


तुकाराम जोरी या व्यक्तीचे, गेल्या जन्मीचे काहीतरी देणे आम्ही लागत असलो पाहिजे. नाहीतर त्याला माळीकाम करण्यासाठी आम्ही कां ठेवून घेतले असावे या कोडयाचे उत्तर सापडणे फार कठिण आहे. त्याच्याकडे कोणी नुसती एक नजर टाकली असती तरी हा इसम, माळीकामव काय तर इतर कोणतेच काम करू शकणार नाही हे सहज लक्षात आले असते. तरीसुध्दा तुकाराम आमच्याकडे माळीकाम करण्यासाठी म्हणून कामाला लागला आणि पुढची तब्बल चार पांच वर्षे तो कामाला येत राहिला.

जेमतेम पांच फुटापर्यंत पोहोचणारी उंची, जोराच्या वाऱ्याचा रपाटा बसला तर पांच पंचवीस पावले भेलकांडत जाईल, अशी शरीरयष्टी, खोल गेलेली गालफडे, हातापायाच्या काडया, सदोदित चेहऱ्यावर, वाढलेल्या दाढीचे खुंट आणि अत्यंत दीन व बापुडवाणा भाव, तुकारामचे असे दर्शन पाहणाऱ्याला फारसे भावणारे नसे. त्याने अंगावर चढविलेली कापडं पण त्याला साजेशीच असत. तळाला उसवलेली व अनंत ठिगळे लावलेली विजार, त्याच्या तिपटीने दांडगट असणाऱ्या बाप्याच्या मापाचा सदरा, पायाची तीन चार बोटे बाहेर डोकावताहेत असे कोणत्याही मापाचे बूट व जिचा मूळचा रंग संशोधनाचा विषय होऊ शकेल अशी टोपी, असे त्याचे ध्यान असे. भरीत भर म्हणून तो एक अत्यंत कळकट फडके खांद्यावर टाकून ते पडू नये म्हणून एका हाताने घट्ट धरून ठेवत असे. त्याचे कपडे सुधारण्याचे आम्ही बरेच प्रयत्न केले. त्याला त्याच्या मापाचे कपडे, बूट दिले. परंतु आम्ही दिलेले कपडे त्याच्या अंगावर सहसा कधीच दिसले नाहीत. तो त्याच्या मूळ कपडयांच्यातच कामाला येत राहिला. दर गुरवारी तो त्याचे हे कपडे धूत असे व सुकेपर्यंत उन्हात वाळवत असे. कपडे वाळत घालण्यासाठी स्वच्छ जागेची वगैरे त्याची अपेक्षा नसे व कुठेही, वाळूवर, चिखलात त्याचे कपडे वाळताना दिसत. बऱ्याच वेळा एक अर्धी चड्डी घालून तो स्वत:लाही वाळवताना दिसे. हे असे मळकट कपडे घालण्याबद्दल त्याची कारण मीमांसा अगदी सरळ असे. काम करताना नाहीतरी कपडे मळणारच तेंव्हा मळकेच कपडे घातले की ते आणखी मळण्याचा प्रश्नच उरत नाही. थंडीवाऱ्याच्या दिवसात तो कोठून तरी पैदा केलेले पायमोजेही घालत असे. घरांत वावरताना, साहेबी थाटाने तो बूट काढून ठेवून मोज़े घालून वावरत असे. जमीन पुसताना सुध्दा त्याचे ते मोजे पायातच असत. अर्थातच मोजे पाण्याने भिजले किंवा धुळीने मळले तरी त्याची त्याला फारशी पर्वा नसे. मोज्यांमुळे पायाला थंडी वाजू नये एवढीच त्याची अपेक्षा असे. मात्र कोणाच्या लग्नाला जावयाचे असले की त्याच्या कपडयांत पूर्ण बदल होत असे. पांढरे शुभ्र धोतर व गुलाबी सदरा हा त्याचा लग्नाला जाण्याचा वेष असे. त्यावेळेस तो दाढीही करून येत असे. अर्थात अशा वेळा इतक्या कमी असत की या वेषांत त्यला ओळखणेही कठिण असे.

तुकाराम कामाला येऊ लागल्यावर थोडयांच दिवसांत आमच्या हे लक्षात आले की त्याला माळीकामाचा गंध सुध्दा नाही. त्यामुळे आपोआपच त्याला माळीकाम सांगणे बंद झाले व तो पडेल ते काम करणारा सांगकाम्या झाला. परंतु खरे म्हणजे त्याला दोनच कामे चांगली जमत. एक तर अंगण स्वच्छ झाडून घेणे व घराचा केर काढून फरशी पुसून घेणे. या दोन कामांच्या व्यतिरिक्त सांगितलेले कोणतेही काम तो अत्यंत नाइलाजाने व निरुत्साहाने करत असे. तुकाराम सकाळी कामाला आला की अंगण झाडताना दिसे व त्याच्यानंतर तो गायब होत असे. कोणतेही काम त्याला सांगायचे म्हणजे प्रथम त्याला शोधून काढणे हे काम असे. बसण्यासाठी त्याने आडोशाच्या अनंत जागा शोधून ठेवलेल्या असत. वळचणीला, कानाकोपऱ्याला तो इतक्या बेमालूमपणे मिसळून जाऊन डुलक्या घेत असे की त्याला शोधून काढण्यासाठी हाका मारणे हा एवढाच पर्याय असे. वीस ते पंचवीस हाका कानावर पडेपर्यंत तो बाहेर दिसणे शक्यच नसे. त्यामुळे पुष्कळ वेळा त्याला शोधून काढण्यापेक्षा काम स्वत:च करून टाकावे असे वाटण्याची वेळ येई. या शिवाय कारखान्याच्या आवारात फिरून काडया कुडया जमवणे, कोपऱ्यावरच्या भाजीवाल्याशी, पानतंबाखूवाल्याशी संधान बांधून कुजकी, नासकी भाजी फुकटात मिळवणे किंवा फुकट मिळालेली तंबाखूची चिमूट दाढेखाली दडपणे व कारखान्यातील कामगारांच्या मागणीनुसार त्यांना पान तंबाखू पुरविणे, त्यांची लॉटरी तिकिटे आणणे व त्या लॉटरीचा निकाल शोधून काढणे ही कामे तो आनंदाने करत असे व त्याचा पैसा दोन पैशाचा मोबदलाही मिळवत असे. या गोष्टींबद्दल कोणीही कितोही रागावले तरी तो फारसे लक्ष देत नसे.

तुकारामची इतरांशी संभाषण साधण्याची पध्दत स्वतंत्र होती. तो जेंव्हा भाषेच्या माध्यमातून इतरांशी बोलण्याचा प्रयत्न करी तेंव्हा त्याचा स्वर गेंगाणा येई व तो इतके हेल काढून बोलत असे की त्याला काय सांगावयाचे आहे हे कळतच नसे. यासाठी तो मुख्यत: खाकरून खोकरून दुसऱ्याचे लक्ष वेधून घेई व नंतर प्रचंड पाल्हाळ लावीत आपले म्हणणे हेल काढीत काढीत सांगण्याचा प्रयत्न करी.

तुकाराम कामाला लागल्यावर तीन चार महिन्यांनी एक दिवस संध्याकाळी त्याच्या परिचित खाकरण्याचा आवाज आला. काय रे ? म्हणून त्याला घरातूनच विचारल्यावर तो गप्पच राहिला. जरा वेळाने परत खाकरण्याचा आवाज आल्याने उठून बाहेर जावेच लागले. बाहेर तुकाराम एका टोपपदराची साडी नेसलेल्या चांगल्या फटाकडया बाईबरोबर उभा होता. त्याला परत काय रे ? म्हणून विचारल्यावर तो चक्क लाजला व आपली मानसं तुमच्याकडे आल्याचे त्याने सांगितले. एवढी ओळख झाल्यावर करकरीत आवाजात त्याच्या बायकोने पाल्हाळ लावत लावत तिचे काम सांगितले. तिच्या बोलण्याचा सारांश एवढाच होता की तुकारामला कामावर ठेवताना, काम बघून नंतर पगार वाढवून देऊ असे सांगितले होते व ती वेळा आता आलेली होती. तुकारामला कोणतेच काम नीट येत नाही त्यामुळे त्याला पगारवाढ देणे शक्य नाही हे कळल्यावर तिला फारसे वाईट वाटलेले दिसले नाही. आहे तो पगार चालू राहील यांतच तिला समाधान असावे. पुढच्या चार पांच वर्षात जेंव्हा जेंव्हा तुकारामला आमच्याशी संवाद साधावा वाटला तेंव्हा तेंव्हा तो आपल्या बायकोला घेऊन येत असे. बायकोच्या नथीतून तीर मारणारा असा दुसरा पुरुष बघावयास मिळणे दुरापास्तच आहे.

तुकाराम नेहमी पैशाच्या अडचणीत असे. पैशा दोन पैशाची तंबाखू सुध्दा स्वत:च्या पैशांनी आणणे त्याला जमत नसे. याबाबत त्याला विचारल्यावर लक्षांत आले की पगार झाला रे झाला की त्याची बायको सर्व पैसे काढून घेत असे व उरलेल्या महिन्याभर हा माणूस अगदी पैशा पैशा साठी लाचार होऊन कोणाचेही काहीही काम करण्यास तयार असे. एवढे असूनसुध्दा त्याला कोणतीही वस्तू बाजारातून आणण्यासाठी काही पैसे दिले तर त्या पैशांचा हिशोब तो चोख देत असे. त्याचप्रमाणे घरात पडलेली चवली पावली तो इतक्या प्रामाणिकपणे उचलून ठेवत असे की त्याच्या या प्रामाणिकपणाच्या गुणामुळे इतर कमीपणांकडे सहज डोळेझाक करावी असे वाटे.

हा अर्धवट वाटणारा माणूस प्रसंगी इतकी माणुसकी व प्रसंगावधान दाखवत असे की शहाण्यांनी तोंडात बोटे घालावी. घरातले आजोबा देवाघरी गेले तेंव्हा आजी घरांत एकटयाच आहेत हे जाणून त्याने पळत पळत जाऊन कोपऱ्यावरच्या इमारतीमधे काम करणाऱ्या त्यांच्या भाच्याला बोलावून आणले. कारखान्यातल्या पोरी सोरी आपली चेष्टा, टिंगल करतात ते तुकारामला आवडत नसे व आपला अपमान झाल्यासारखा त्याला वाटे. अशा वेळी एकटाच लांबवर बसून तो रागारागाने बडबडत असे व आपला अपमान गिळून टाकत असे.

तुकाराम पुष्कळ बाबतीत वेडसरपणाच्या लक्षमणरेषेवर आहे असे आम्हाला वाटे. त्याला कोठेही एखादे कापडाचे फडके दिसले की तो खुष होत असे व थोडयात वेळात ते फडके नाहिसे होत असे व काही दिवसांनंतर ते फडके तुकारामच्या खांद्यावर विराजमान झालेले दिसत असे. त्याचे फडक्यांचे वेड नंतर एवढे वाढले की आमच्या चारचाकीच्या चालकाला सुध्दा गाडी पुसण्याची फडकी तुकारामच्या नजरेआड ठेवावी लागत.

तुकाराम आमच्याकडे रुळल्यावर त्याची बरीचशी माहिती आम्हाला समजली. या माणसाचे आयुष्य म्हणजे खरोखरच एक शोकान्तिका ठरावी. हा माणूस मुंबईच्या मालधक्यावर काम करणारा एक बलदंड मजूर होता हे सांगून सुध्दा खरे वाटले नसते. सिमेंट वगैरेच्या गोणी उचलण्याच्या कामावर तो असे व त्याला या कामासाठी भरपूर पगार मिळत असे. चांगली बायको, मुले असा त्याचा सुखी संसार होता. परंतु कोणत्यातरी दुर्धर आजाराने त्याला पार ग्रासले व हळुहळु त्याचा सुखी संसार मिटत गेला. बायकोच्या माहेरच्या नातेवाइकांच्या मदतीने मग त्याने पुण्यात बस्तान बसविले. पण येथेही दुर्दैवाने त्याची पाठ सोडली नाही. त्याचा मोठा मुलगा ठार वेडा झाला व त्याला वेडयांच्या इस्पितळांत ठेवावे लागले. दुखा:त सुख एवढेच होते की बाकीची मुले चांगली होती व मुलीला चांगले ठिकाण मिळाले होते. पुढे त्याचा हा वेडा मुलगा इस्पितळातच वारला. त्याचे शव बेवारशी म्हणून जाळले जाईल या भितीने तुकाराम वेडापिसा झाला. त्याने पाण्यासारखा पैसा खर्च केला व मुलाचे शव ताब्यात घेऊन सर्व क्रियाकर्म यथासांग पार पाडले. कोणीतरी त्याला विचारले की या वेडयासाठी तूं एवढी धावपळ कां करतो आहेस? तेंव्हा तुकारामने दिलेले उत्तर मोठे समर्पक होते. मुलगा वेडा असला म्हणून काय झाले? त्याचा जीवच होता ना? मग त्याचे सर्व क्रियाकर्म यथासांग केलेच पाहिजे.

तुकाराम दिवसेदिवस थकत चालला आहे हे आम्हाला दिसत होते. त्याचे एकटे बसून बडबड करणेही वाढले होते. तो फारसे कामही करत नसे. पण त्याला कामावरून काढण्याचे धैर्य आमच्यात नव्हते. तो या नंतर बरेच दिवस कामाला येतच राहिला. तो आमच्या येथे तसा सुखी होता पण प्रपंचाचा त्याच्यावर बहुदा खूपच तणाव येत असावा. एक दिवस संध्याकाळी घरी न जाता तो थांबून राहिला. त्याची विचारपूस केल्यावर आपण हे काम सोडत असल्याचे त्याने सांगितले. पुढे काय करणार हे विचारल्यावर थक्क होण्याची पाळी आमची होती. दिवसांसुध्दा पूर्णवेळ जागे न राहू शकणाऱ्या या फाटक्या वेडसर इसमाला रात्रपाळीचा गुरखा म्हणून नवी नोकरी मिळाली होती.

19 ऑगस्ट 1999

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: