.
Science

आम्ही असू लाडके


कृष्णाजी केशव दामले किंवा केशवसुत या कवींना एक युगप्रवर्तक कवी असे मानले जाते. आपल्या एका सुप्रसिद्ध कवितेत, केशवसुत, कवींच्या सर्जनशीलतेबद्दल गौरवोद्गार काढताना म्हणतात.

“आम्ही कोण म्हणूनि काय पुससि आम्ही असू लाडके”

परंतु केशवसुतांनी जेंव्हा या काव्यपंक्ती लिहिल्या तेंव्हा त्यांच्या स्वप्नातसुद्धा हे कधी आले नसेल की पुढच्या शतकात झालेल्या शास्त्रीय प्रगतीमुळे, हेच वर्णन, पृथ्वीतलावरील सर्व आधुनिक मानवजातीचे, म्हणूनही करता येणे शक्य आहे.

तसे पहायला गेले तर लाडके असण्याची ही कल्पना काही नवीन नाही. अलेक्झांडरचा एक सेनानी, क्लॉडियस टॉलेमी (Claudius Ptolemy) याने इ.स. 100 च्या आसपास असे विचार मांडले की पृथ्वी ही विश्वाच्या मध्यभागी असून बाकी ग्रह, सूर्य व तारे हे पृथ्वीच्याच मध्याभोवती फिरत असलेल्या सात मोठ्या गोलकांच्यावर(Spheres) ठेवण्यात आले असावेत व त्यामुळे ते पृथ्वीभोवती सतत फिरत रहातात. हा विचार तेंव्हा सर्वमान्य झाला व सर्वात प्रबळ अशा रोमन कॅथॉलिक चर्चने सुद्धा त्याला मान्यता दिली. अर्थातच या मागचे कारण असे होते की टॉलेमीच्या सिद्धांताप्रमाणे सर्वात बाहेरच्या गोलकाबाहेर(ज्यावर तार्‍यांना ठेवण्यात आलेले होते) अश्या जागेची कल्पना करता येत होती जिथे परमेश्वरांचे वसतिस्थान असू शकेल. य़ा संकल्पनेमध्ये ही गोष्ट अध्यारृत होती की विश्वाच्या मध्यभागी असलेल्या पृथ्वीवरील मानवजात ही विश्वामधे काहीतरी विशेष अशी होती व परमेश्वराची लाडकी होती.

चर्चने अधिकृतरित्या मान्यता दिलेल्या या विश्वरचनेच्या संकल्पनेला पहिला धक्का बसला इ.स. 1543 मध्ये. स्विर्ट्झलॅंड मधील बासेल या गावामधे ‘De revolutionibus orbium coelestium’ या नावाचे एक पुस्तक प्रकाशित झाले. दुर्दैवाने या पुस्तकाचा लेखक, निकोलस कोपर्निकस हा हे पुस्तक प्रसिद्ध होण्याआधीच कालवश झाला होता व आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम कार्य पूर्णत्वाला गेलेले बघणे त्याचा नशिबात नव्हते. कोपर्निकसने या पुस्तकात असा सिद्धांत मांडला होता की पृथ्वी ही विश्वाच्या मध्यभागी नसून पृथ्वीतलावरील आपण मानव हे कोणत्याही विशेष जागी नसून विश्वाच्या एका कानाकोपर्‍यातच आहोत. हळूहळू कोपर्निकसचा सिद्धांत जगमान्य झाला व मानवजात काही विशेष आहे किंवा लाडकी आहे की कल्पना मागे पडत गेली. गॅलिलिओ, न्यूटन व नंतर आईंस्टाइन यांनी मांडलेल्या सिद्धांतांच्यामुळे, विश्वरचनेचे रहस्य समजावून घेण्यात आपणाला बर्‍यापैकी यश मिळाले. अर्थात रोमन कॅथॉलिक चर्चला ही विश्वरचना मान्य करण्यासाठी बराच काल लागला आणि तोपर्यंत त्यांच्या मान्यतेला व अमान्यतेला तसा काहीच फारसा अर्थ उरला नव्हता. जर पृथ्वीवरील मानवजात ही विशेष नसेलच् तर आपल्यासारखेच दुसरे मानव या विश्वात कुठेतरी असलेच् पाहिजेत असे मानले जाऊ लागले.

गेल्या काही शतकांच्यात आणि विशेषेकरून मागच्या शंभर वर्षांत, आपले शास्त्रीय ज्ञान जवळ जवळ विस्फोटक अशा गतीने वाढले आहे. पदार्थविज्ञानातील परिमाणे व अपरिवर्तनीय स्थिर संख्या(Physical Parameters and constants) यांचे मोजमापन करण्यासाठी आवश्यक अशी मापन उपकरणे आता कित्येक पटींनी जास्त अचूक व संवेदनाक्षम झाली आहेत. तसेच या विश्वातील सर्व पदार्थ ज्या अणूंपासून बनलेले आहेत त्या अणूंचे अंतरंग व अंतरंगात असलेले सूक्ष्म कण यांची कितीतरी जास्त माहिती आपल्याला ज्ञात झालेली आहे. या सर्व अचूक माहितीमुळे अनेक नवीन निरिक्षणे करणे आपल्याला शक्य झाले आहे. या निरिक्षणांमुळे काही विलक्षण व आश्चर्यजनक गोष्टी प्रकाशात आल्या आहेत.

पृथ्वीच्या पाठीवर अनेक उलथापालथी होऊन सुद्धा आपल्या जैव क्षेत्रात (Biosphere) असलेले सरासरी तपमान, वातावरणात असलेले प्राणवायूचे प्रमाण (Oxygen level)आणि समुद्रांच्यात असलेले क्षारांचे प्रमाण (Average Salinity) या परिमाणांच्यात गेल्या अनेक कोटी वर्षांत काहीही फरक दिसून आलेला नाही. अभियांत्रिकी आणि विज्ञानाच्या अभ्यासकाना उष्मप्रवेग विज्ञानातील (Thermodynamics) मूळ सिद्धांत चांगलाच परिचित असतो. या नियमाप्रमाणे कोणतीही प्रणाली स्थिर अवस्थेकडेच नेहमी जाण्याचा प्रयत्न करत असते. आपली पृथ्वी मात्र याला अपवाद आहे असे दिसते. गेल्या हजारो कोट्यावधी वर्षांपासून पृथ्वीवर सतत बदल आणि घडामोडी चालूच आहेत. न्यूटनने शोधलेले गुरुत्वाकर्षणाचे बल व मॅक्स्वेलने शोधलेले विद्युत-चुंबकीय बल आपल्या परिचयाचे व रोजच्या अनुभवातील आहे. या शिवाय अणुच्या अंतरंगातील सूक्ष्म कणांमधील तीव्र आण्विक बलमंद आण्विक बल ही दोन बले धरून चार मूलभूत बलांचे पदार्थविज्ञानशास्त्रज्ञांनी वर्गीकरण केले आहे. या चार बलांची तौलनिक ताकद इतकी विलक्षण संतुलित आहे की त्याचा विचार सुद्धा आश्चर्यकारक वाटतो. गुरुत्वाकर्षणाचे बल अफाट अंतरावर सुद्धा जाणवते. विद्युत-चुंबकीय बल त्या मानाने काही सें.मी एवढ्या अंतरावर आपला परिणाम दर्शविते. आण्विक बले अणूच्या अंतरंगातील नॅनो अंतरांच्यावरच परिणामी असतात. उन्हाळा हिवाळा हे ऋतु खरे तर गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळेच येतात. आपल्या रोजच्या वापरातील विद्युत शक्ती आपल्याला विद्युत-चुंबकीय बलामुळेच मिळते. जगातील सर्व अणूंचे सांगाडे (Structure) केवळ तीव्र आण्विक बलानेच आपल्या स्वरूपात टिकून आहेत. हे बल नसते तर जगात कोणतेही धातू, प्लॅस्टिक्स ही अस्तित्वातच आली नसती. आणि सर्वात मुख्य म्हणजे आपले जीवन ज्या सौर शक्तीवर अवलंबून आहे ती शक्ती सूर्याच्या अंतरंगात असलेल्या अणूंच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या मंद आण्विक बलामुळेच तयार होते.

ही व अशी अनेक परिमाणे व बले यांचा तोल अतिशय बारकाईने आणि नाजुकपणे, आपल्याला सुखकररित्या जगणे शक्य होईल असाच सांभाळला जातो. यात जरा जरी विसंवाद आला तरी हे जग व त्याबरोबर आपण पूर्णपणे नष्ट होऊ शकतो. त्यामुळेच कोणाच्याही मनात हा प्रश्न ऊद्भवणे साहजिकच आहे की हा तोल संभाळतो तरी कोण? याचा मुख्य नियंत्रक कोण? याचे एक उत्तर अगदी साधे आहे जे एखादा अडाणी माणूसही सुचवेल. हा सर्व भार परमेश्वरावर सोपवला म्हणजे झाले. पण परमेश्वर ही काही शास्त्रीय संकल्पना नाही व त्यामुळेच शास्त्रज्ञांना व जे तर्कशुद्ध विचार करतात त्यांना हे उत्तर मान्य होण्यासारखे नाही.

1973 मध्ये कोपर्निकसच्या 500 व्या जंन्मदिनानिमित्त आयोजित केलेल्या एका सभेत ब्रॅंडन कार्टर (Brandon Carter) या शास्त्रज्ञाने एक नवाच सिद्धांत मांडला. हा सिद्धांत आता आम्हासाठीच आमचे विश्व, सिद्धांत (Anthropic Principle) या नावाने ओळखला जातो. या सिद्धांताप्रमाणे आपले विश्व हे एकच नसून प्रत्यक्षांत त्यांची संख्या अफाट आहे (ही संख्या 10 चा 229वा वर्ग, किंवा 229th Power of 10 एवढी आहे ). या अफाट संख्येंच्या विश्वांपैकी आपले विश्व एक असून यातील सर्व परिमाणे व बले आपल्यासाठीच स्थापित ( Set Up) असल्याने आपल्याला सोईस्कर आहेत व त्यामुळे मानवजातीचे याच विश्वात फक्त वास्तव्य आहे.

मला तरी हा सिद्धांत फारच ओढून ताणून आणलेला वाटतो. पण या शिवाय दुसरा तरी कोणता खुलासा शास्त्रज्ञांना अजून तरी सापडलेला नाही. यातील काही परिमाणे कदाचित, स्वनियंत्रित सहाय्यक यंत्रणेच्या (Self Regulating Servo Mechanisms) सहाय्याने स्थिर राहू शकत असतील. परंतु प्रथम ती कोणी स्थापली व त्यांचे समायोजन कोण (Set Up & Adjust) करते हा प्रश्न रहातोच. रिचर्ड फेनमन हा शास्त्रज्ञ, विश्वाच्या संस्थापकाला निसर्ग (Nature) म्हणतो तर ज्ञानेश्वर माऊलींनी यालाच चैतन्य असे मोठे सुंदर नाव दिले आहे.

पृथ्वीच्या इतिहासाचा अर्वाचीन भाग जरी अभ्यासला तरी दोन अशा घटनांकडे आपले लक्ष जाते की मानवजातीचेच अधिष्ठान या पृथ्वीवर रहावे यासाठीच जणू काय त्या घडविल्या गेल्या असाव्या. सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर डायनॉसॉरस या अतिभयानक अशा प्राण्यांचे राज्य होते. त्यांच्यापैकी टी-रेक्स हा डायनॉसॉरस तर अतिशय बुद्धिमान व संहारक होता. त्यांच्या राज्यात मानवजातीची ऊत्क्रांती होणे जवळजवळ अशक्यच होते. परंतु याच वेळी मेक्सिकोच्या आखातात एक महाकाय अशनिपात झाला व त्यानंतर झालेल्या प्रलयात सर्व डायनॉसॉरसचा संपूर्ण विनाश झाला. या नंतरच्या कालात हलूहळू सस्तन प्राणी व शेवटी मानव अशी ऊत्क्रांती झाली. परंतु आधुनिक मानवाशिवाय (Homo sapiens) दुसरेही मानव (Homo neanderthalensis, Homo erectus, Homo floresiensis) बर्‍याच ठिकाणी वस्ती करून होते. सुमारे 75000 वर्षांपूर्वी इंडोनेशिया देशामधील टोबा या ज्वालामुखीचा एक महाकाय स्फोट झाला आणि पुढील 1000 वर्षांत आधुनिक मानव (Homo sapiens) सोडला तर बाकी इतर सर्व मानव (Homo neanderthalensis, Homo erectus, Homo floresiensis) नष्ट झाले. या घटना योगायोगाने घडल्या की कोणी घडवून आणल्या हे सांगणे मानवी कुवतीच्या बाहेर आहे असे मला वाटते.

ह्या विश्वाची आणि जगाची निर्मिती कशी झाली? त्याचा कारभार कसा चालतो? वगैरे प्रश्न आपण तत्ववेत्ते आणि शास्त्रज्ञ यांच्याकडेच सोपवावे हे सर्वात श्रेयस्कर. रिचर्ड फेनमनचे निसर्गाबद्दल असे मत आहे की, असे कां? हे विचारत बसण्यापेक्षा निसर्गाच्या विलक्षण आश्चर्यचकीत करणार्‍या या अदभूत शक्तीला समजावून घेऊन आपले जीवन समृद्ध करण्यातच शहाणपणा आहे. आकाशात दिसणारे तारे व ग्रह, आपले जैव क्षेत्र आणि आपले वसतिस्थान असलेली ही वसुंधरा या सर्वाँनी आपल्याला एक अतिशय सुंदर आणि समृद्ध असे जीवन प्रदान केले आहे.

एका घड्याळे बनविणार्‍या कंपनीने केलेली एक जाहिरात मला आठवते. ही कंपनी म्हणते की आमच्या घड्याळांचे तुम्ही कधीच मालक होऊ शकत नाही. तुम्ही ही घड्याळे पुढच्या पिढीला देण्यासाठी म्हणून केवळ संभाळता. आपले जग, आपले पर्यावरण आणि आपले जैव क्षेत्र या सर्वांबद्दल आपली वृत्ती अशीच असणे आवश्यक आहे.

या विश्व्वात आपणच फक्त आहोत का आपल्यासारखेच आणि कोणी, दुसर्‍या कुठल्या कानाकोपर्‍यात आहेत? हे आता तरी सांगता येणे कठिण आहे. पण एवढे मात्र नक्की की आपली वसुंधरा, आपले पर्यावरण व आपले जैव क्षेत्र यांचे मात्र आपण अतिशय लाडके आहोत. म्हणूनच या सर्वांचे, व्यक्ती किंवा समाज या दोन्ही पातळ्यांच्यावर संवर्धन करणे हे आपले परम कर्तव्य आहे.

25 मार्च 2009

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: