.
Roots

शोध


कोकणातल्या एका आडरस्त्याला असलेल्या ‘आपटे ‘ नावाच्या गांवाचा व माझा काही ऋणानुबंध आहे हे मला बऱ्याच उशिरा जाणवले. अगदी लहानपणी व नंतरसुध्दा हे माझ्या आजोळचे मूळ गांव एवढेच काय ते कानावर पडले होते. तेथे माझे आजोबा, आजी वगैरे कोणीच व कधीच रहात नसल्याने जास्त चौकशी करावी असेही कधी वाटले नाही. नाही म्हणायला दोन पांच वेळा आमच्या आईची एक विधवा, चुलत आजी आमच्याकडे राहून गेल्याचे मला स्मरते. तिच्या पाया पडताना कुतुहलापेक्षा गंमतच जास्त वाटल्याचे आठवते. त्या सरस्वती आजीची अखंड बडबड, तिचे लाल अलवणी लुगडे व माझ्या आईला दिलेले अनाहूत सल्ले हे सगळे माझ्या बालपणीच्या जगाच्या इतके बाहेरचे होते की ही आजी मला माझ्या कुटुंबियांपैकी सुध्दा कधी वाटली नाही.

बऱ्याच वर्षांनंतर, आईच्या आग्रहाने, तिला ‘आपटे ‘ गांवाला किंवा तिच्याच भाषेत आपटयाला घेऊन जाण्याचा प्रसंग माझ्यावर आला. प्रथमदर्शनी त्या गांवात आवडण्यासारखे मला काहीच दिसले नाही. धुळीने माखलेले रस्ते, पडकी मोडकी घरे, छोटीशी बाजारपेठ व वरच्या अंगाला असलेली ब्राम्हण आळी असे स्वरूप असलेल्या या गांवात, भावण्यासारखे काही नव्हतेच. नाही म्हणायला गावाच्या वायव्य दिशेस असलेला कर्नाळयाचा डोंगर व थोडेफार पाणी असलेली पाताळगंगा नदी, यांनी थोडी फार रमणीयता गांवाला जरूर आणली होती. पण उत्तर कोकणांतले रणरणते व चटक़े देणारे ऊन व प्रचंड उकाडा यामुळे तिथे पोहोचल्याबरोबर कधी एकदा परत फिरतो असे वाटू लागले होते. त्या रखरखीत उन्हातून व धुळीतून, फिरत फिरत, आम्ही गावाच्या मध्यभागी असलेल्या एका ओढयाच्या काठी जाऊन थांबलो. समोर दिसणारे, एक मोडकळीस आलेले देऊळ व देवळाच्या शेजारी दिसत असलेल्या, एका घराच्या जोत्याच्या उरलेल्या खुणा, एवढेच माझ्या आजोळच्या या घराचे अवशेष आता उरले होते. त्या देवळाच्या सावलीत मग मी आणि आई जरा विसावलो. तसे आजूबाजूला बघण्यासारखे फारसे कांही नव्हतेच. पश्चिमेला असलेल्या डोंगरीच्या बाजूस रानटी झाडे, झुडपे व एक मोठे झाड (बहुदा फणसाचे असावे.) दिसत होते.

तिथे, तसे बसून, आजूबाजूला नजर फिरवताना कुठेतरी सांधा जुळतो आहे हे मला जाणवले. आई तिच्याच नादात होती व जुन्या आठवणी सांगत होती. माझ्या धमन्यात वाहणाऱ्या रक्ताच्या थोडयाफार अंशावर तरी आपला अधिकार सांगणारी माणसे येथेच रहात होती; आपल्या सुख-दुखा:चे असिम क्षण त्यांनी येथेच अनुभवले होते; पुत्रजन्माचा आनंद,वैधव्याचे उर फुटणारे दुख:, या सर्वांना हीच जागा साक्षीदार होती. हे सगळे त्या क्षणी मला जाणवले. पूर्वजांचे वैभव याच जागेने बघितले होते व नंतर झालेल्या वाताहातीला सुध्दा हीच जागा साथीला होती. त्या क्षणी तरी मी माझे पुण्यातले जग विसरलो होतो व आडवळणाच्या एका गांवी कधी काळी रहात असलेल्या एका धनिक कुटुंबाचा भाग झालो होतो.

त्या गांवामधे आईची जी काय कामे होती ती तिने उरकली. आम्ही पुण्याला घरी परतलो व आमच्या नेहेमीच्या आयुष्यात बुडून गेलो. पण आता एक बदल निश्चित जाणवत होता. ‘ आपटे ‘ या गावाशी एक नवीन नाते आता निर्माण झाले होते. आधी निरर्थक वाटणाऱ्या लहान सहान गोष्टी, चिठया चपाटया आता मी रस घेऊन बघू लागलो होतो. जुन्या कागदपत्रांतून मिळणारे संदर्भ मी मनात जुळवत होतो व ते आपसूकच लक्षात रहात होते. नंतरच्या काळात जेंव्हा जेंव्हा आपटयाला जाण्याचा योग येत होता त्या प्रत्येक वेळी या गांवाचे व माझे नाते आधिक आधिक जवळचे होते आहे हे मला जाणवत होते. माझी आई, तिच्या बहिणी, मामा, यांच्या तोंडून क्वचित निघणाऱ्या ऐकीव गोष्टी मनात कोठे तरी चपखल बसत होत्या. एखाद्या मोठया जिग-सॉ-पझल मधल्या तुकडयांसारखे हे तुकडे माझ्या मनात योग्य जागी जाऊन बसत होते व या सगळयांतून काही अस्पष्ट व धूसर चित्रे मनातल्या मनात उलगडत होती.

पहिले चित्र अगदीच अस्पष्ट व अपूर्ण आहे. काळ 1875 च्या आसपासचा आहे. ‘गुळसुंद व आपटे ‘ या गावांच्या परिसरात, पंचक्रोशीत बाजी गणेश ही व्यक्ती चांगलीच प्रतिष्ठित आहे. तालेवार आहे. खोतीचा व्यवसाय करून बाजींनी चांगलाच जम बसवला आहे. स्वत:चे राहते दुमजली व चौसोपी घर, निरनिराळया ठिकाणी खंडाने दिलेली सत्तर एेंशी एकर भातशेती व खोतीचे उत्पन्न यामुळे बाजींचा कुटुंब कबिला चांगलाच सुखावला आहे. बाजींना तीन मुलगे आहेत. मोठा महादेव आता लग्नाला आला आहे. मधल्या वासुदेवला लिहिण्या-वाचण्यांत रस आहे. धाकटा गणेश मात्र अजून रांगतोच आहे. आपल्या श्रीमंतीतून, गांवच्या दैवतासाठी व गांवासाठी काही ना काहीतरी करण्याची बाजींची धारणा आहे. गावातल्या पाताळगंगा नदीवर त्यांनी एक बंधारा बांधून दिला आहे. दिवासमोर दिवा लागावा म्हणून एक दीपमाळ बांधून देवाची खातरजमा त्यांनी केली आहे. बाजी तसे भाविक आहेत. धार्मिक आहेत. रोज सिध्देश्वराच्या देवळात दर्शनाला जाण्याचा त्यांचा परिपाठ आहे. त्या शिवाय त्यांना चैन पडत नाहीये.

पुढचे चित्र दहा,बारा वर्षांनंतरचे आहे. ते थोडे जास्त स्पष्ट आहे. बाजी आता थकल्यासारखे झाले आहेत. तसे त्यांचे वय कांही फारसे झालेले नाही. पण ते आता अगदी खचल्यासारखेच झाले आहेत. बाजींच्या हातून खोती आता पूर्वीसारखी होत नाहीये. पण शेतीचे उत्पन्न भरपूर असल्याने कुटुंब खाऊन पिऊन सुखी आहे. पण बाजींच्या मनाला आता एक नवीनच टोचणी लागली आहे व ती त्यांना अक्षरश: पोखरून काढते आहे. बाजी हताश होऊन बघण्याशिवाय कांहीही करू शकत नाहीयेत. एवढा समर्थ माणूस विधिलिखिताला शरण जाण्याशिवाय दुसरे काहीही करू शकत नाहीये. बाजींचा मोठा मुलगा महादेव हा दिवसेंदिवस व्यसनाच्या विळख्यात गुरफटत चालला आहे. बाजींनी, तो लग्नानंतर सुधारेल म्हणून त्याचे लग्नही मध्यंतरी करून दिलेले आहे. पण एका निष्पाप व निराधार मुलीचा बळी फक्त गेला आहे. याला आपणच जबाबदार आहोत या कल्पनेने बाजी अक्षरश: हादरलेले आहेत. मधून महादेव सुधारल्यासारखा वागतो आहे पण परत येरे माझ्या मागल्याच चालू आहे. हाता तोंडाशी आलेला मुलगा असा वाया जातो आहे. घरची खोती, कुळे यांकडे कोण बघणार हे बाजींना समजतच नाहीये. मधला मुलगा वासुदेव याला लिहिण्या वाचण्याची आवड आहे पण त्याची बुध्दी अगदीच सुमार आहे आणि वृत्तीही कांहीतरी विचित्र व कुपमंडुक अशी आहे. आपण व आपले यांच्या पलीकडे तो जाणार नाही हे बाजींना स्पष्ट दिसते आहे. धाकटा तर अजून अज्ञानच आहे. आपल्या कुटुंबावर येणाऱ्या संकटाची स्पष्ट जाणीव बाजींना होते आहे. असे असले तरी एका बाजूला कुटुंबरहाटी चालूच आहे. वासुदेवचे लग्न करावयाचे आहे. अनेक खर्च उभे रहाणार आहेत. पण बाजींचे मन संसारातून हळूहळू उडू लागले आहे. आपल्या पश्चात आपले मुलगे ही स्थावर जंगम सांभाळू शकणार नाहीत हे त्यांना शिलालेखासारखे स्पष्ट दिसते आहे. एवढा समर्थ माणूस हताश व दीन झाला आहे. आता त्यांना आधार फक्त सिध्देश्वराचाच वाटतो आहे. ते मंदिरात रोज जास्तीत जास्त वेळ जाऊन बसत आहेत. या काळज्यांनी म्हणा किंवा इतर आणखी कशाने तरी त्यांची तब्येत खालावत चालली आहे. रोज सिध्देश्वराच्या दर्शनालाही जाणे जमेल किंवा नाही असा संदेह मनात निर्माण झाला आहे.

बाजी मग एक निर्णय घेतात. ते आपल्या राहत्या घराच्या दक्षिण बाजूस असलेल्या मोकळया जागेत सिध्देश्वराची देऊळ बांधून प्रतिष्ठापना करण्याचे ठरवितात. बाजींची पत्नी, मुलगे, नातलग व मित्र या निर्णयाने एखाद्या स्फोटासारखे हादरले आहेत. सिध्देश्वर म्हणजे शंकर ! तो तर मसणवटीत राहणारा देव ! त्याला का कोणी घरात आणून बसविते ? सर्वजण बाजींना त्यांच्या या निर्णयापासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. त्यांनी हा वेडेपणा करू नये. सापाच्या शेपटीवर मुद्दाम पाय देऊ नये व मुलाबाळांनी भरलेल्या घरावर शाप ओढवून घेऊ नये असे ते बाजींना वारंवार सांगतात व बाजींची आर्जवे करतात. पण बाजी एकटे पडले असले तरी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. ते कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. ते सिध्देश्वराची प्रतिष्ठापना तर करतातच पण शेतजमिनीचा एक तुकडा देवाच्या नावाने करून देवापुढे दिवाबत्ती तहहयात लागेल याचीही व्यवस्था करतात.

पुढचे चित्र 1890 च्या आसपासचे आहे. बाजी निर्वतले आहेत. मोठा मुलगा महादेव हा असून नसल्यासारखाच आहे. खरे म्हणजे तो काही काळाचाच सोबती आहे. वासुदेव मामलतदार कचेरीसमोर लिहिण्याचे काम करतो आहे. त्याचा संसार चांगलाच फुलला आहे. त्याला दोन मोठे मुलगे आहेत. धाकटा गणेश मात्र अजून अज्ञानीच आहे. वासुदेवला मिळणाऱ्या चार पैशांवरच एवढे मोठे घर चालते आहे. खाण्यापिण्याची जरी ददात नसली तरी मध्यंतरीच्या काळात प्रचंड खर्च झालेला आहे व कुटुंबाला अडीच हजार रुपयांचे कर्ज झालेले आहे व ते फक्त वासुदेवच फेडतो आहे. हे सर्व त्याच्या कुवतीबाहेरचे आहे व चारी बाजूंनी त्याची कोंडी होत चालली आहे. घरावर एक प्रचंड सावट, एक झाकोळ येऊ घातली आहे. शेवटचा उपाय म्हणून म्हणून घराच्या व जमिनीच्या वाटण्या करून घेण्याचे वासुदेव ठरवितो आहे. व्यसनाच्या तारेत असणारा मोठा भाऊ; आई व अज्ञानी धाकटा भाऊ त्याला समजाविण्याच्या परिस्थितीत नाहीत. बाजींच्या एवढया मोठया घराची आता तीन घरे झाली आहेत. वासुदेवचा संसार आणखी फुलतो आहे. त्याचे घर मुलाबाळांनी गजबजले आहे. वाटणीमुळे महादेवच्या हातात चार पैसे खुळुखुळु लागले आहेत. तो तांदुळाचा व्यापार करण्याचे म्हणतो आहे. बाजींच्या मोठया सुनेला तर स्वर्गसुख मिळाल्यासारखे वाटते आहे. सावत्र आईच्या हाताखाली वाढलेली व लहानपणीच वडिलांचे छत्र हरविलेली ही मुलगी आयुष्यांत प्रथमच सुखाचे क्षण अनुभवते आहे. तिला पुत्रप्राप्ती झाल्यामुळे दुधात साखर पडल्यासारखे वाटते आहे. एकूण परिस्थिती पालटणार अशी आशा निर्माण झाली आहे.

नंतरचे चित्र दोन तीन वर्षांनंतरचे आहे. बाजींच्या थोरल्या सुनेचे सुखाचे क्षण केंव्हाच हरपले आहेत. वडिलांचा असलेला थोडा फार धाकही नाहीसा झालेला महादेव, व्यसनाच्या गर्तेत आधिक आधिक खोल शिरून सगळयांना सोडून गेला आहे. त्याची पत्नी गंगाबाई व वर्षा-दीड वर्षाचा मुलगा विनायक यांच्यावर तर आभाळच कोसळले आहे. घरातला एकमेव मिळवता पुरुष वासुदेव हा आता निराळाच झाला आहे. गंगाबाईला घरांतले किडुकमिडुक विकून कर्जाचा वाटा फेडण्याशिवाय गत्यंतरच नाही. तिच्या सर्व वाटा बंद झाल्या आहेत. दीन व अगतिक होऊन आपल्या चुलत भावांकडे आश्रयास जाणे एवढेच तिच्या हातात आहे. बाजी गणेशांचा वारस असलेला त्यांचा थोरला नातू एक आश्रित म्हणूनच वाढणार आहे.

शेवटचे चित्र तीस, पस्तीस वर्षांनंतरचे आहे. महादेवची पत्नी गंगाबाई, वासुदेव, त्याची पत्नी यमुनाबाई व त्याला झालेली सात, आठ मुले , गणेश हे सर्व या ना त्या कारणाने हे जग सोडून गेलेले आहेत. गणेशला झालेली एकुलती मुलगीही देवाघरी गेलेली आहे. वासुदेवची एक मुलगी फक्त वाचली आहे व तिच्या विधवा काकूने तिचे लग्न करून दिलेले आहे. बाजी गणेशांचा थोरला नातू जेमतेम शिक्षण संपवून कुठेतरी कारकुनी करतो आहे. त्याचे लग्न झालेले आहे पण त्यालाही फक्त मुलीच आहेत. वाटण्या झालेल्या बाजी गणेशांच्या घरात फक्त एक बोडकी विधवा, घरची भांडी-कुंडी विकून आला दिवस घालवते आहे. बाजी गणेशांचा संपूर्ण निर्वंश झाला आहे. फक्त त्यांचा सिध्देश्वर मात्र पडŠया घराजवळ, ओसाड माळावर शांत आहे व सर्व पाहतो आहे. त्याला दिवा-बत्ती मात्र रोज होते आहे.

कालचक्राच्या या फेऱ्याचे जेंव्हा मला संपूर्ण आकलन झाले तेंव्हा मनाला एक प्रकारचा सुन्नपणा आला. तर्कशुध्द विचार केला तर सिध्देश्वराची प्रतिष्ठापना व कुटुंबाची वाताहात या संपूर्ण निराळया घटना आहेत. त्यांचा एकमेकाशी बादरायण सुध्दा संबंध नाही. कोणत्याही तर्कसंगतीने बाजी गणेशांना त्यांच्या पश्चात झालेल्या घटनांना जबाबदार धरता येणार नाही. मुलीच फक्त वारस राहिल्या म्हणजे निर्वंश कसा काय झाला? मग मी व माझी मुले कोण आहोत? आमच्याही रक्तात बाजी गणेशांचा थोडा फार अंश आहेच. हे सगळे विचार कोणालाही पटतील. पण हे सगळे विचार शहरात रहाणाऱ्या व सुधारक घराण्यातल्या माझे आहेत आणि मुख्य म्हणजे एकविसाव्या शतकाच्या उंबरठयावरचे आहेत.हे असे कांहीही असले तरी काळ, कांही व्यक्तींवर एवढा प्रचंड अन्याय कां करतो? बाजींच्या सुनांनी असा काय गुन्हा केला होता की त्यांच्या वाटयाला असे आयुष्य यावे? या प्रश्नाला ‘ कालाय तस्मै नम: ‘ या शिवाय उत्तर नाही.

हे सर्व जरी विचारात घेतले तरी मुख्य प्रश्न निराळाच आहे. एकोणिसाव्या शतकात कोकणांतल्या एका आडगावी रहाणाऱ्या व धार्मिक वृत्ती असलेल्या बाजी गणेशांना हे विचार सुचले असल्याची शŠयता फार कमी आहे. एकतर त्या काळात कोकणातले समाज जीवन, भुतेखेते, देवाचा कोप प्रकोप व कौल, असल्या वेडगळ समजुतींच्यात इतके गुरफटलेले होते की त्याच्या पलीकडे जाऊन विचार करणे बाजी गणेश काय किंवा त्या काळातल्या इतर कोणालाच शŠय झाले असते असे वाटत नाही. बाजींच्या एकूण विचारसरणीकडे पहाता आपण केलेल्या या कृत्याचे काय परिणाम होऊ शकतील याची बाजींना पूर्ण कल्पना असणार. पत्नी, मुले व नातलग त्यांना परोपरीने हे न करण्याबद्दल सांगत असणार. तरीसुध्दा बाजींनी हे असे का केले? स्वत:च्या पायावर स्वत: का कुऱ्हाड मारून घेतली? बाजी असे का वागले? हे सगळे प्रश्न माझ्या मनात अनुत्तरितच राहिले. रोजच्या धकाधकीत मग बाजी गणेश हळू हळू विस्मृतीच्या पडद्यामागे गेले.

दोन,पांच दिवसांमागे परत कोठेतरी आपटयाचा विषय निघाला व बाजी गणेश व त्यांचा अनुत्तरित प्रश्न परत माझ्या मनात रेंगाळू लागले. या मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. माझी मुले आता मोठी व कर्ती सवरती झाली आहेत. त्यांच्या यशाने व कर्तबगारीने आम्हाला जो आनंद, जे सुख मनाला मिळाले आहे त्याची बरोबरी दुसऱ्या कशानेही , मग तो पैसा असो किंवा कोणताही ऐषाराम असो, होणार नाही याची खात्री मनाला पटली आहे.मधल्या काळात माझे स्नेही, नातलग व मित्र यांच्याही सुखदुखा:त सहभागी होण्याची वेळ आली आहे. मुलांचा मूर्खपणा,व्यसनाधीनता किंवा सुमार बुध्दी यामुळे आईबापांना किती पीडा सहन करावी लागते व त्यांचे उर्वरित आयुष्य कसे अंधकारमय होऊन जाते याचेही अनुभव आले आहेत. कदाचित या अनुभवांच्या शिदोरीवर, बाजी गणेश असे का वागले याचे उत्तर माझ्या मनाने दिले असले पाहिजे.

बाजी गणेश अतिशय व्यवहारी, समंजस व विचारी असले पाहिजेत. सुमार बुध्दीची व व्यसनी असलेली आपली मुले आपण मिळविलेले सर्व वैभव धुळीस मिळवणार हे त्यांच्या पूर्ण लक्षात आले असले पाहिजे. त्यामुळे ते अतिशय बैचैन झालेले असणार. हे सर्व कुठेतरी संपविले पाहिजे अशी त्यांच्या मनाची ठाम धारणा झालेली असणार. या नालायक मुलांनी आपला वारसा चालवावा अशी त्यांची अजिबात इच्छा नसणार. अतिशय धार्मिक वृत्तीचे असल्याने त्यांनी सिध्देश्वराला सांकडे घातलेले असणार व त्यांना मिळालेल्या कौलाप्रमाणे त्यांनी सिध्देश्वराला जाणून बुजून घरात आणलेले असणार व आपल्या पश्चात तो तिथेच रहावा म्हणून दिवाबत्तीची सोय करून ठेवलेली असणार. बाजींच्या वागण्याला दुसरे उत्तरच नाही.

आईवडीलांनी पै पै साठवून, कष्ट करून बांधलेल्या त्यांच्याच घरात मजा करावयास पुरेशी जागा नाही म्हणून त्यांन दुसरीकडे किंवा वृध्दाश्रमात पाठविण्याचा विचार करणारी मुले, एक दमडी मिळविण्याचे कर्तृत्व नसलेली व बापाच्या पैशावर चैन करून त्यालाच जीव नकोसा करून सोडणारी मुले व अशा मुलांच्या बेताल वागण्याने रात्र रात्र झोप न येणारे, डोळयांचे पाणी न खळणारे व यापेक्षा आपण निपुत्रिक राहिलो असतो तर बरे असे म्हणणारे आईबाप जेंव्हा आजूबाजूला दिसतात तेंव्हा मला बाजी गणेशांची हमखास आठवण होते. पण बाजी गणेशांनी त्यांच्यापरीनी जी उपाययोजना केली ती योग्य, अयोग्य कां अघोरी हा प्रश्न मनात अनुत्तरितच रहातो.

15 नोव्हेंबर 1999

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “शोध

  1. सुपर्ब.. मस्तंच लिहिलंय…

    Posted by Mahendra Kulkarni | मार्च 20, 2009, 9:08 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: