.
Science

टोबाचे तांडव


कुकडी ही नदी, पश्चिम महाराष्ट्रात, घाटमाथ्यावर उगम पावून पूर्वेकडे वहात जाणाऱ्या अनेक नद्यांपैकी एक. कल्याण जवळच्या नाणेघाटात तिचा उगम. पुढे जुन्नरच्या जवळून वहात जाऊन ती भीमा नदीला मिळते. जुन्नरच्या थोडे पुढे, या नदीच्याच काठांवर बोरी खुर्द व बोरी बुद्रुक अशी दोन अगदी सर्व सामान्य खेडेगावे आहेत. या गावांच्या जवळ असलेले कुकडीचे पात्र मात्र मोठे वैशिटयपूर्ण आहे. या ठिकाणी असलेले पात्र, एका खडकाळ अशा दरीतून वहाते. पात्राची खोली फारशी नसली तरी पात्र भरपूर रूंद मात्र आहे.नदीच्या दोन्ही काठांना ‘बॅसॉल्ट’ प्रकारच्या खडकांचे उभे सरळ रेषेत तुटलेले कडे आहेत. 1960 च्या आसपास या गावाच्या आसपास असलेल्या नदीच्या पात्राजवळ अष्मयुगातील मानवी हत्यारे सापडल्यामुळे उत्खननशास्त्रज्ञांचे या जागेकडे लक्ष होतेच. पण 1986-1988 च्या आसपास नदीच्या काठांना असलेल्या उभ्या कडयांच्यामधे ‘ टेफरा’ या घन पदार्थाचे 2 मीटर किंवा 6 फूट जाडीचे थर भूगर्भशास्त्रज्ञांना आढळून आले व बोरी गावाचा परिसर आंर्तराष्ट्रीय शास्त्रज्ञ समुदायात एका वेगळयाच कारणासाठी प्रसिध्दिझोतात आला.

पृथ्वीच्या पृष्ठभागावर सतत घडामोडी होत असतात. पाउस व वितळणारा बर्फ यांनी सतत जमिनीची धूप होत असते तर उलट सुलट वाहणाऱ्या वाऱ्यांनी पृष्ठभागावरील धूळ सगळीकडे पसरत असते. पावसाचे पाणी नद्या नाल्यांमधून वहाते व नदी काठच्या सखल भागात वहात आणलेला चिखल पसरते. ही प्रक्रिया वर्षानुवर्षे चालूच राहते. लाखो वर्षानंतर या साठलेल्या धुळीचे कठिण असे दगड बनतात. कालांतराने या पैकी एखादा समुद्र तळ हिमालया सारखा किंवा मध्य अमेरिकेसारखा वर उचलला जातो. तर नद्यांमुळे ग्रॅन्ड कॅनियन सारखी खोल दरी तयार होते. भूकंपामुळेही कडे कोसळतात व एखादा दोन तीन मैल उंचीचा उभा कडा उभा रहातो. या सर्व घडामोडींमुळे पृथ्वीचा इतिहास ज्यावर उभा छेद घेऊन आलेखित केला आहे असे कडे पृथ्वीवर बऱ्याच ठिकाणी आढळतात. या कडयांच्या तळापासून ते वरच्या थरापर्यंत पृथ्वीच्या इतिहासातील एका मोठया कालखंडाचा आलेख मोठया अचूकपणे नोंदला जातो.

एखाद्या ज्वालामुखीचा जेंव्हा उद्रेक होतो तेंव्हा त्याच्या मुखातून राखेसह अनेक घन पदार्थ फेकले जातात. ही राख व हे घन पदार्थ कांही कालाने परत जमिनीवर जमा होतात. पांदरट रंगाच्या या घन पदार्थांच्या थरांना शास्त्रीय परिभाषेत ‘टेफरा’ (Tephra) असे नाव आहे. नदीच्या काठी असलेल्या उभ्या कडयांच्या छेदात जर ‘टेफरा’ घन पदार्थाचे थर आढळून आले तर कधीतरी तो भूभाग ज्वालामुखीने फेकलेल्या घन पदार्थांचे आवरणाखाली झाकला गेला होता हे सप्रमाण सिध्द होते. बोरी गावाजवळ आढळून आलेल्या ‘टेफरा’ घन पदार्थाच्या थराचा उत्खननशास्त्रज्ञांनी अभ्यास करून त्यांनी ते थर बऱ्याच जुन्या काळातील ( 15 लक्ष वर्षांपूर्वीचे)असावेत असे अनुमान काढले होते व त्यांच्या दृष्टीने ते थर आदिमानव कालाच्या फारच पूर्वीचे असल्याने फारसे महत्वाचे नव्हते.

1995 मधे युनिव्हर्सिटी ऑफ टोरॉन्टो च्या भूगर्भशास्त्र विभागात काम करत असलेले Phil Shane व त्यांचे इतर सहकारी, John Westgate, Martin Williams and Ravi Korisettar यांनी या ‘टेफरा’ मधे आढळून आलेल्या सूक्ष्म कांच कणांचे पृथ:करण रसायनशास्त्राच्या मदतीने केले व असे मत मांडले की हे घन पदार्थ सुमारे 75000 वर्षांपूर्वीचे असावेत. महाराष्ट्रात डेक्कन ट्रॅप या नावाने सुपरिचित असा ‘बॅसॉल्ट’ दगडांचा खडकमाथा सगळीकडे दिसतो. या खडकांच्यामुळे भूगर्भशास्त्रज्ञांना संशोधनासाठी उपयुक्त अशा फार थोडया जागा महाराष्ट्रात उपलब्ध आहेत.बोरी गांवाजवळचा हा शोध म्हणूनच महत्वाचा होता.

बोरी गावाजवळ सापडलेल्या ‘टेफरा’ थ्रराप्रमाणेच असलेले ‘टेफरा’चे थर भारतीय उपखंडात इतर ठिकाणीही पसरलेले आहेत हे शास्त्रज्ञांना ज्ञात होतेच.या सर्व थरांचे भूगर्भशास्त्रज्ञांनी परत विश्लेषण करण्यास सुरवात केली. बंगालमधील ‘बोगडा’ व ‘बडाकड’ नदीचे खोरे. ओरिसा मधील ‘महानदी’ व ‘वंशधारा’ नद्यांची खोरी, बिहार व उत्तर प्रदेश यांच्यामधले ‘शोण’ नदीचे खोरे, मध्य प्रदेशातील नर्मदेचे खोरे आणि आंध्र प्रदेशातील ‘सागिलेरू’ नदीचे खोरे या जागी कमी जास्त जाडीचे ‘टेफरा’ थर सापडतात. या थरांचे विश्लेषण केल्यावर एक विलक्षण गोष्ट शास्त्रज्ञांना आढळून आली. एवढया दूरदूर अंतरावर पसरलेले हे ‘टेफरा’ थरही बोरी येथील थरांप्रमाणेच अंदाजे 75000वर्षांपूर्वीचेच होते.या सर्व गोष्टी विचारात घेउन 1998 साली निरनिराळया देशातील, John A. Westgate , A. Philip, A. R. Shaneb, Nicholas J. G. Pearcec, William T. Perkinson, Ravi Korisettar, D. Craig A. Chesnere, Martin A. J. Williams आणि Subhrangsu K. Acharyy या भूगर्भशास्त्रज्ञांच्या गटाने एक शोध निबंध सादर केला व असे मत मांडले की भारतीय उपखंडात आढळून येणारे सर्व ‘टेफरा’ थर हे 75000 वर्षांपूर्वीचेच असून ते निर्विवादपणे एकाच ज्वालामुखीच्या व एकाच उद्रेकातून निर्माण झालेले आहेत व हा सध्य्या निद्रिस्त असलेलाज्वालामुखी, बंगालच्या उपसागराच्या पूर्वेला असलेल्या ‘सुमात्रा’ बेटावरचा ‘टोबा’ हा आहे. भूगर्भशास्त्रज्ञांचा हा शोध दोन अत्यंत दूरगामी असे परिणाम निश्चितपणे दर्शवित होता. प्रथम म्हणजे संपूर्ण भारतीय उपखंड 75000 वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या या उद्रेकातून फेकले गेलेल्या ‘टेफरा’, ‘प्यमिस'(Pumice- एक कांचस्वरूप घन पदार्थ ) व राख यांच्या कित्येक फूट जाड आवरणाखाली झाकला गेला होता व त्यामुळे अर्थातच त्या काली भरतखंडांत अस्तित्वात असलेले सर्व सजीव बहुतांशी नष्ट झाले होते.

टोबाचा जलाशय

बंगालच्या उपसागराच्या पूर्वेला असलेला ‘इंडोनेशिया’ हा देश 17508 द्वीपांचा बनलेला असून त्या देशाला एक खरा खुरा द्वीपसमुह (Ararchipelago) असे म्हणता येते. ही द्वीपे, सिंगापूरच्या पश्चिमेला असलेल्या सर्वात मोठया सुमात्रा बेटापासून ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला असलेल्या न्यू गिनी द्वीपापर्यंत साखळीच्या स्वरूपात पसरलेली आहेत. भारताच्या अग्नेय दिशेला असलेल्या सुमात्रा बेटाचे क्षेत्रफळ जवळ जवळ 5 लाख क़ि.मी. आहे.या बेटांवर असलेल्या प्रमुख शहरांच्यापैकी ‘मेदान’ हे एक आहे. या मेदान शहराच्या दक्षिणेला 100 कि.मी लांब, 30 कि.मी रूंद व 400 मीटर खोल आणि लंबगोल आकाराचा विस्तीर्ण ‘ टोबा’जलाशय आहे. मेदान पासून बसने सुमारे आठ तासात टोबा जलाशयापर्यंत जाता येते. या जलाशयाच्या मध्यभागी सामोशिर नावाचे एखाद्या किल्याप्रमाणे असलेले बेट आहे. हा सर्वच परिसर अतिशय रमणीय व निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. प्रवाशांना आवश्यक अशा सुख सोयी येथे मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने जगभराच्या प्रवाशांचे हे एक आवडते विश्रांतिस्थान आहे. या परिसराचे सौंदर्य अनुभवताना प्रवाशांच्या मनात कल्पनाही येणार नाही की या जलाशयाचा परिसर म्हणजे एक जागृत ज्वालामुखीचे स्थान आहे व 3 ते 4 लाख वर्षांनंतर तो आपले रौद्र स्वरूप एकदा तरी दाखवतो. या ज्वालामुखीने आपले रौद्र रूप सुमारे 73000 वर्षांपूर्वी शेवटचे दाखवले होते व पृथ्वीचरील मानवी किंबहुना सर्व सजीवांच्या गेल्या लाख वर्षांच्या इतिहासातील सर्वात वाईट कालखंड असेच त्या उद्रेक कालाला म्हणावे लागेल.

एखाद्या ज्वालामुखीचा जेंव्हा उद्रेक होतो तेंव्हा तो उद्रेक शमल्यावर ज्वालामुखीचे मुख खोलगट बशी प्रमाणे होते याला ‘कालड्रा'(Caldera) असे संबोधतात. टोबाच्या उद्रेकानंतर तया झालेला कालड्रा, टोबा जलाशयाच्या आकाराचा असल्याने हा उद्रेक किती भयानक आणि भव्य होता हे समजते. या कालड्रामधे कालांतराने परत पृथ्वीच्या पोटातून येणाऱ्या दाबाने मध्य भूभाग उचलला जातो. टोबा जलाशयाच्या मध्यभागी असलेले सामोशिर बेट याच प्रकारे तयार झालेले आहे. टोबा ज्वालामुखीच्या तयार झालेल्या ‘कालड्रा’वरून त्याच्या उद्रकाबद्दल अनुमान बांधता येते.

या उद्रेकात, टोबा ज्वालामुखीने 2500 ते 3000 घन किलोमीटर (घट्ट घनतेच्या खडकाचे घनफळाएवढा) उकळता लाव्हा रसासारखा घनपदार्थ आकाशात हेकून दिला होता. म्हणजे प्रत्यक्षात या रसाचे आकारमान कितीतरी जास्त असले पाहिजे. 50 ते 150 मीटर जाड असा लाव्हा रसाचा थर सुमात्रा बेटाच्या पूर्व ते पश्चिम किनाऱ्याच्या मधे पसरला होता. त्याचेच अंदाजलेले वस्तुमान 1000 घन किलोमीटर होते, या लाव्हा रसाचे तपमान 750 डिग्री सेल्सस एवढे होते. 800 घन किलोमीटर राख टोबाने फेकून दिली होती. या राखेचे सुमारे 15 सें.मीटर जाड आवरण सबंध पृथ्वीभोवती जमा झाले होते. 10^10 टन सल्फ्युरिक ऍसिड टोबाने आकाशात फेकले होते. हे पदार्थ टोबाने दर सेकंदाला 80 लाख टन या गतीने बाहेर फेकले होते.

टोबाने फेकून दिलेली राख, सिंगापूरच्या पूर्वेला असलेल्या ‘साउथ चायना’ समुद्रातही आढळून आली आहे. या वरून असे स्पष्टपणे दिसते की टोबाचा उद्रेक जून जुलै महिन्यात झाला असला पाहिजे. या महिन्यांच्यात दक्षिण पूर्व अशिया खंडात मान्सूनचे वारे वहात असतात. या वाऱ्यांनी टोबाने फेकून दिलेले सर्व घन पदार्थ भारतीय उपखंडाभर लीलया पोचविले. मध्य भारतात एका जागेवर या घन पदार्थाचे सहा मीटर जाडीचे थर आढळले आहेत. मलेशियाचा बहुतेक भाग, अंदमान बेटे, श्री लंका, भारतीय उपखंडाचा बहुतेक भाग या राखेच्या आवरणाखाली संपूर्ण झाकला गेला.

अंधारकाल

टोबाने आकाशात फेकून दिलेला राख व इतर पदार्थांचा लोळ तीस ते पस्तीस मैल उंचीपर्यंत पोचला असावा. आकाशातील या राखेमुळे सूर्य प्रकाश अडवला गेला आणि भारतीय उपखंड व मलेशियावर अंधाराचेच साम्राज्य पसरले. ही राख पुढच्या दोन ते तीन महिन्यात या सर्व भूभागावर पसरली गेली. टोबाने या राखेशिवाय गंधकही बऱ्याच प्रमाणात फेकले.या गंधकापासून सल्फ्युरिक ऍसिड तया र झाले व ते आकाशात पुढची काही वर्षे राहिले. या कणांनी सूर्य प्रकाश अडविल्यामुळे पुढची सहा वर्षे उन्हाळा आलाच नाही व पृथ्वीवर हिवाळा हा एकच ऋतु राहिला. एवढेच नाही तर या धक्यामुळे पृथ्वीवर एका नवीन हिमयुगाची सुरवात झाली व हे हिमयुग पुढची एक सहस्त्र वर्षे तसेच टिकून राहिले. साउथ चायना समुद्राचे तपमान एक डिग्री सेल्सस ने खाली आले तर उत्तर गोलार्धातील तपमान पाच डिग्रीने खाली आले. उत्तर धृवाजवळच्या ग्रीनलॅन्ड्चे तपमाने सोळा डिग्रीने उतरले. जगभरच्या समुद्रातील पाण्याची पातळी खाली गेली. उन्हाळयातील तपमान सुध्दा बारा डिग्रीने खाली आले.

हवामानातील या बदलाचा परिणाम साहजिकच सूर्यप्रकाशाची आवश्यकता असल्याने सर्व वनस्पतींच्यावर झाला. दक्षिण पूर्व अशिया मध्ये बहुतेक सर्व वनस्पती व त्यावर अवलंबून असलेले सर्व सजीव नष्ट झाले. अती थंड हवामानामुळे उत्तरेकडच्या वनस्पती व त्यावर अवलंबून असलेले सजीवही हळूहळू नामशेष झाले. युरोप व उत्तर चीन येथे वसाहत केलेले मानव अती शीत हवामानामुळे पूर्णपणे नष्ट झाले.इतकेच नाही तर असेही म्हणता येईल की सबंध पृथ्वीवरचीच जीवसृष्टीच नष्ट होण्याच्या अगदी जवळ आली.

प्रलयकाळातील मानव

पृथ्वीचा इतिहास अनेक अब्ज किंवा खर्व, निखर्व वर्षांचा आहे. या प्रदीर्घ कालात अनेक महा भयंकर ज्वालामुखींनी आपल्या मुखातील आग अवनीतलावर फेकली असली पाहिजे.मग टोबा ज्वालामुखीच्या या उद्रेकाला एवढे महत्व कां? असा प्रश्न मनात येणे साहजिकच आहे. टोबाच्या या उद्रेकाला अनन्यसाधारण महत्व आहे कारण हा भयावह कालखंड आधुनिक मानवाच्या (Homo sapiens ) अस्तित्वकालामधेच येतो. असे मानले जाते की आधुनिक मानव आफ्रिका खंडातून साधारणपणे 130000 वर्षांपूर्वी प्रथम या खंडाच्या बाहेर पडला. त्यामुळे टोबाच्या प्रलयकाळात आधुनिक मानव ही सर्वात नवीनतम अशी जीवजाती होती व कोणत्याही पर्यावरणातील फरकांना तोंड देण्याची त्यांची कुवत खूपच कमी होती. आधुनिक मानवाला या उद्रेकाचे अत्यंत महा भयंकर परिणाम साहजिकच भोगावे लागले व पृथ्वीवरच्या मानवांची संख्या काही सह्स्त्र एवढीच उरली. या महाभयंकर संकटातून जे थोडेसे मानव उरले सुरले ते विषुव वृत्ताजवळील आफ्रिका खंडामध्ये काही जागांवर कसे बसे तग धरून राहिले. आधुनिक मानवासाठी हा सर्वात कठिण असा काल होता व त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले होते.

मानवी उत्क्रांतीच्या अभ्यासकांना दोन विरोधाभासी निरिक्षणांचे समाधान देता येईल असे स्पष्टीकरण या आधी कधीच देता आले नव्हते. एक तर आधुनिक मानवांच्यात डी.एन.ए.मधील विविधता फारच कमी (virtually identical DNA.) आहे. साठ कोटी मानवांच्या समुहाच्या डी.एन.ए मधील विविधता ( genetic diversity) ही चिम्पॉन्झीच्या एखाद्या लहान समुहापेक्षाही आश्च्रयरित्या कमी आहे. याच्या उलटपक्षी जर आधुनिक मानव आफ्रिका खंडातून एकाच प्रयत्नात बाहेर पडला असे मानले तर आफ्रिका खंडाच्या बाहेर रहाणारे आपण सर्व आफ्रिका खंड रहिवाश्यांप्रमाणे कां दिसत नाही? सर्व मानव जातीत एवढी वरकरणी विविधता ( superficial diversity)कां दिसते?

युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय मधील मानव वंश शास्त्र विभागात काम करणारे प्रोफेसर स्टॅनले ए. ऍम्बरोज यांनी 1998 साली ‘जर्नल ऑफ ह्युमन एव्होल्युशन’ या मासिकात आपला या विषयातला ( Human population bottlenecks, volcanic winter, and differentiation of modern humans) हा शोध निबंध प्रसिध्द केला व आधुनिक मानवी इतिहासातील या कोडयाचे उत्तर समर्थपणे दिले. टोबा ज्वालामुखीच्या या उद्रेकाचा आधुनिक मानवाच्या उत्क्रांतीवर कसा परिणाम झाला हे पाहणे लक्षवेधी आहे.

प्रोफेसर ऍम्बरोज यांच्या सिध्दांताप्रमाणे टोबाच्या उद्रेकामुळे व नंतर आलेल्या शीतयुगामुळे पृथ्वीवरील आधुनिक मानवांची संख्या 2000 पर्यंत कमी झाली होती व हे उरले सुरले मानव अत्यंत एकाकी अशा जागांच्यावर तग धरून राहिले होते. या लोकसंख्या कमी होण्याच्या प्रक्रियेला ते मानवी गळचेपी म्हणतात. या गळचेपीमुळे पृथ्वीच्या पाठीवर आजमितीला असलेले 60 कोटी मानवांचे हे फक्त 2000 मानवच पूर्वज आहेत. इतक्या कमी संख्येच्या व अतिशय एकाकी अशा गटातून मानव जातीची ही संख्यावाढ मागच्या फक्त 65000 वर्षात झालेली असल्याने आधुनिक मानवांच्यात जनुकांतील वैविध्य (genetic variation) अतिशय कमी प्रमाणात आढळते.

एक सहस्त्र वर्षांनंतर पृथ्वीचे हवामान परत एकदा समशीतोष्णझाले व आतापर्यंत ‘लोकसंख्या गळचेपी’ झालेली मानवजात परत एकदा आफ्रिकाखंडातून व दक्षिण पूर्व अशियाच्या विषुव वृत्तिय भागातून बाहेर पडली. एखाद्या स्फटिकावर पांढरा शुभ्र प्रकाश पडल्यावर त्या प्रकाशाचे जसे सात रंगात पृथ:करण होते व ते सात रंग जसे स्पष्टपणे निरनिराळे दिसतात. त्याच पध्दतीने या गळचेपीतून बाहेर आलेल्या मानव जातीची एखाद्या विस्फोटाप्रमाणे 65000 वर्षात प्रचंड वाढ झाली व त्यामुळे त्यांच्यातील विविधता प्रकर्षाने जाणवू लागली. पण ही विविधता केवळ वरकरणी आहे आणि अतिशय जलद अशा वेगाने ही वाढ झालेली असल्याने ती आपल्याला जाणवते हे लक्षात घेतले पाहिजे. याच कारणामुळे आपण आफ्रिकन लोकांपेक्षा वरकरणी निराळे दिसतो. अंतर्यामी आपण सगळे एकच आहोत. एकाच मायेची लेकरे आहोत ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.

जर टोबाचा उद्रेक झाला नसता तर आधुनिक मानवांशिवाय (Homo sapiens) इतर काही जातीचे मानव सुध्दा (Homo neanderthalensis,Homo erectus,Homo floresiensis)कदाचित अस्तित्वात राहिले असते. तसेच आधुनिक मानवांच्यात सुध्दा जनुक वैविध्य (genetic variation)कदाचित खूपच जास्त प्रमाणात राहिले असते. या सर्व जातीमध्ये सतत प्रचंड युध्दे होत राहिली असती व जगण्यासाठी विनाश हेच सूत्र मुख्यत्वे राहिले असते. मानवी विकास हे केवळ एक स्वप्नच राहिले असते.

टोबाचा उद्रेक हा मानवजातीच्या एकात्मतेचे प्रमुख कारण आहे. त्यामुळेच टोबाचा हा उद्रेक एक शाप होता की मानवजातीला मिळालेले वरदान होते हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.

5 मार्च 2009

toba1-pic1toba-2-pictoba3-pictoba-4-pic

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

अद्याप प्रतिक्रिया नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: