.
Science

ज्ञानेश्वर- आद्य शास्त्रीय वाड़मयकार

एका संस्कृत सुभाषितात नाटयशास्त्राचे विवेचन करताना ‘ नाटय शास्त्र विनोदेन ‘ असा उल्लेख आहे. परंतु नाटयशास्त्र सोडले तर काव्य आणि शास्त्र यांचा कोणताही संबंध दुरान्वयानेही लावणे कठीण आहे. कोणतेही शास्त्र काही सिध्दांतांवर आधारित असते. या सिध्दांतांच्या संदर्भावर बसविलेली प्रमेये असतात व या प्रमेयांच्या चौकटीत राहून निरिक्षणे करावयाची असतात व या निरिक्षणांवर काही विश्लेषणे करून हे सिध्दांत बरोबर आहेत किंवा नाहीत हे सिध्द करावयाचे असते. या उलट काव्याला कोणतीच सीमा नसते. काव्याला सीमा असते ती फक्त कवीच्या प्रतिभेची. कवीची प्रतिभा जर असीम असेल तर काव्यही असीमच ठरते आणि जेंव्हा हा कवी ज्ञानेश्वरांसारखा असामान्य असतो तेंव्हा ते काव्यप्रतिभा, केवळ त्रिखंडे, तिन्ही लोक यांच्यापुरतीच मर्यादित न रहाता ती अखिल विश्वात अगदी अनादी ते अनंत कालापर्यंत विहरते. ज्ञानेश्वरीमधील अकरावा अध्याय म्हणजे एक असेच काव्य आहे. ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेला आलेला हा एक बहरच आहे. अद््भूत व रौद्र या दोन रसांचे ज्ञानेश्वरांनी या अध्यायात असे काही मिश्रण केले आहे की या थोर कवीराजांच्या प्रतिभेपुढे आपण लीन होऊन जातो. ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेचा एक अप्रतिम अविष्क़ार या अध्यायात रंगछ्टांच्या एका वर्णनात सापडतो. विषयांतर करण्याचा दोष पत्करूनही या काही ओव्या नजरेखालून घालण्याचा मोह आवरत नाही. प्रसंग असा आहे की अर्जुनाच्या विनंतीवरून भगवंतांनी त्याला आपली अनेक रूपे दाखविली. या अनेक रूपांतली कांही रूपे अनेक रंगछटा दर्शविणारी होती. गीतेमधले हे मूळ बीज ज्ञानेश्वरांनी कसे विस्तारले आहे हे पहाण्यासारखे आहे.

एक तातले साडेपंधरे/ तैसी कपिलवर्णे अपारे/ एके सरागें जैंसे सेंदुरें/ डवरले नभ// एके सावियाचि चुळुकी/ जैंसे ब्रम्हकटाह खचिलें माणिकी/ एके अरूणोदयासारखी कुंकुमवर्णें// एकें शुध्द स्फटिकसोवळें/एकें इंद्रनीलसुनीळें/ एकें अंजनाचल सकाळें/ रक्तवर्ण एकें// एकें लसत्कांचन पिवळीं/ एके नवजलश्यामळीं/ एकें चांपेगौरी केवळीं/ हरितें एकें// एकें तप्तताम्रतांबडी/ एकें श्वेतचम्द्र चोखडीं/ ऐसीं नानावर्णे रूपडी/ देख माझी//

कांही तावून काढलेल्या उत्तम सोन्यासारखी,त्याचप्रमाणे पिंगट रंग असलेली अनेक रूपें, आणि कांही ज्याप्रमाणे शेंदराने माखलेले आकाश असावे त्याप्रमाणे,शेंदरी रत्नांनी ब्रम्हांड जडविल्यामुळे ते जसे चमकत असावे, तशा प्रकारची अनेक रूपे स्वाभाविक सौंदर्यानें चमकणारी होती व कित्येक अरुणोदयाच्या केशरी वर्णाप्रमाणे होती. काही शुध्द स्फटिकाप्रमाणे शुध्द असलेली, काही इंद्रनीलमण्याप्रमाणे सुनीळी असलेली,काही काजळाच्या पर्वताप्रमाणे अतिशय काळी असलेली काही तांबडया रंगाची,काही तेजदार सोन्याप्रमाणे पिवळया रंगाची,काही मेघाप्रमाणे काळया सावळया वर्णाची,काही केवळ चांफ्याप्रमाणे गोरी असलेली आणि काही हिरव्या रंगाची. काही तापलेल्या तांब्यासारखी तांबडी तर काही चंद्राप्रमाणे शुध्द, अशी माझी नाना रंगांची रूपे तूं बघ.

अशा या अकराव्या अध्यायाचे वाचन करित असताना, त्यातल्या ओव्यांचा अर्थ समजावून घेत असताना, मनाला सारखे वाटत राहिले की हे वर्णन कुठेतरी वाचले आहे. प्रथम संदर्भ लक्षात येईना व वाचलेल्या ओव्या तशाच मनाच्या कोपऱ्यात रेंगाळत राहिल्या. मध्यंतरी विश्वाची उत्पत्ती व जडण घडण यासंबंधी काही लेख वाचनात आले व मनाच्या कोपऱ्यात रेंगाळणाऱ्या अकराव्या अध्यायातील ओव्या परत बाहेर आल्या. अवकाश, विश्वाची उत्पत्ती ज्यामुळे झाली आहे असे समजतात तो महाविशाल स्फोट> (BIG BANG), विश्वाचे स्वरूप व कृष्णविवरे या सर्वांविषयी असलेल्या शास्त्रीय संकल्पना आणि या ओव्या यामधील साम्यस्थळे जास्त जास्त लक्षात येऊ लागली व या थोर कवीच्या प्रतिभेचे कसे वर्णन करावे तेच कळेनासे झाले. ज्ञानेश्वरांना विश्वउत्पत्तीशास्त्राच्या, विसाव्या किंवा एकविसाव्या शतकातील विचारप्रणाली आधीच अवगत होत्या, असे काही दावे करणे हा अंधश्रध्देच्या पडद्यामागे लपलेला आपलाच अडाणीपणा होईल असे वाटत राहिले आणि त्यापेक्षा ही साम्यस्थळे जाणून घेऊन या थोर कवीच्या प्रतिभेचा रसास्वाद घेणे हे कितीतरी जास्त सयुक्तिक व रम्य ठरेल. अवकाशयानात बसून व पृथ्वी सोडून, अंतराळात जाणाऱ्या अंतराळवीरांना अवकाश कसे दिसते याची आपणाला बऱ्यापैकी कल्पना आहेच. एवढेच काय, तर पुढील काळात जर एखादे अवकाशयान सूर्यमालेच्या बाहेर गेले तर त्यात बसलेल्या अंतराळवीरांना काय दृष्य दिसेल याचीही कल्पना आपण आता करू शकतो. श्रीकृष्णांनी दाखविलेले विश्वरूप अवलोकित असताना अर्जुनाची काय अवस्था झाली होती याचे वर्णन करताना ज्ञानेश्वर म्हणतात.

दिशांचे ठावही हारपले/ अधोर्ध्व काय नेणो जाहले/ चेइलिया स्वप्न तैसे गेले लोकाकार// नाना सूर्यतेजप्रतापे/सचंद्र तारागण जैसे लोपे/ तैसीं गिळिलीं विश्वरूपें/ प्रपंचरचना// हे असो स्वर्ग पाताळ/ की भूमि दिशा अंतराळ/ हे विव्आ ठेली सकाळ/ मूर्तीमय देखतसे//

पूर्वादिक दिशांचे मागमूसही राहिले नाहीत. वर खाली कोण जाणे हे कोठे गेले. जागे झाल्यावर ज्याप्रमाणे स्वप्न नाहिसे होते त्याप्रमाणे सृष्टीचा आकारही नाहीसा झाला. अथवा सूर्याच्या तेजाच्या सामर्थ्याने चंद्रासह सर्व नक्षत्रांचा समुदाय लोपून जातो त्याप्रमाणे या विश्वरूपाने ही सृष्टीची रचना गिळून टाकली. हा सूर्य हे पाताळ किंवा ही पृथ्वी व हे आकाश असे बोलण्याची सोय राहिली नाही. सर्वच विश्वरूपाने भरलेले मी पहात आहे.

सूर्यमाला सोडून बाहेर जाणाऱ्या अंतराळवीराला ज्ञानेश्वरांनी वर्णिलेल्या दृष्याशिवाय दुसरे काही दिसेल का ? आणि त्याची अवस्था दुसरी काही होईल का?या विश्वाचे स्वरूप आहे तरी कसे ? सध्याच्या प्रचलित माहितीप्रमाणे आपला सूर्य, आकाशगंगा या दिर्घिकेतील (Gallaxy) एक सामान्य प्रतीचा तारा आहे. एका दिर्घिकेत असे खर्व, निखर्व सूर्य असतात आणि अशा कोटयावधी दिर्घिका या विश्वात पसरलेल्या खगोल शास्त्रज्ञांना आढळून आल्या आहेत. ज्ञानेश्वर अकराव्या अध्यायात भगवंतांच्या विश्वरूपाचे वर्णन करताना म्हणतात.

आणि वाताचेनि प्रकाशे/ उडतां परमाणुं दिसती जैसे/ भ्रमत ब्रम्हकटाह तैसें अवयवसंधी//

आणि ज्याप्रमाणे वाऱ्याने उडणारे धूलिकण प्रकाशात दिसतात त्याप्रमाणे विश्वरूपाच्या एकेका सांध्यात किंवा भागात अनेक ब्रम्हांडे भ्रमताना दिसतात.

पदार्थ विज्ञान शास्त्राच्या अभ्यासकांना ज्ञात असलेल्या, डॉपलरच्या सिध्दांतावरून, हे आता सिध्द झाले आहे की अवकाशात पसरलेल्या दिर्घिका एका जागी स्थिर नसून एक तर त्या आपल्या दिशेने प्रवास करताना दिसतात किंवा आपल्या पासून दूर जात असताना दिसतात. त्यामुळे वरील वर्णन विश्वाच्या स्वरूपाचे वर्णन तर चपखलपणे करतेच आणि त्या शिवाय दिर्घिकांच्या चलना-वलनाचीही नोंद घेते. खगोल शास्त्रज्ञांना एक गोष्ट ज्ञात आहे ती म्हणजे या विश्वाचे अवलोकन करण्यासाठी, विश्वाच्या पसाऱ्याच्या बाहेर जाऊन विश्वाकडे पहाण्याची गरज नसते. कुठल्याही कानाकोपऱ्यातून पाहिले तरी विश्वाचा पसारा पूर्णपणे लक्षात येतो. तसे म्हणले तर आपली सूर्यमालासुध्दा विश्वाच्या एका कोपऱ्यातच आहे. विश्वरूपाचे वर्णन करताना हीच गोष्ट ज्ञानेश्वर अशी सांगतात.

एथ एकैकाचिया प्रदेशी/ विश्व देख विस्तारेंशी/ आणि विश्वाही परौतें मानसी/ जरी देखावे वर्तें// तरी तियेही विषयींचे कांही/ एथ सर्वथा सांकडे नांही/ सुखे आवडे ते माझ्या देही/ देख तूं//

या विश्वरूपाच्या एकएक भागावर तू संपूर्ण विस्तारासह विश्व पहा. आणि तुझ्या मनात जर विश्वाच्याही पलीकडे पहावे असे वाटत असेल तर त्याविषयींही येथे मुळीच तोटा नाही.

ही ओवी वाचल्यावर एका महत्वाच्या शास्त्रीय संकल्पनेकडे वळणे आवश्यक आहे. जेंव्हा आपण रात्री आकाशाकडे बघतो तेंव्हा आकाशातील काही तारे मंद दिसतात तर काही तेजस्वी. मंद दिसणारे तारे दोन कारणांमुळे कमी तेजस्वी दिसू शकतात. एक तर त्यापैकी काही तारे कमी प्रतीचेच(तेजस्वितेचे) असल्याने अर्थातच मंद दिसतात. परंतु बहुतांशी तारे खूप लांब अंतरावर असल्याने आपल्याला मंद दिसतात. जेंव्हा आपण दुर्बिणीतून किंवा अवकाशात पाठविलेल्या ‘ हबल ‘ सारख्या दुर्बिणीतून आकाशाकडे पहातो तेंव्हा आपण अतीमंद तारेही बघू शकतो. हे मंद किंवा अतीमंद तारे आजमितीला जसे दिसत असतील तसे आपणाला दिसत नाहीत तर कोटी अब्ज किंवा त्यापेक्षाही जास्त कालापूर्वी जसे होते तसे आज आपल्याला दिसतात. ताऱ्याची तेजस्विता जितकी कमी तेवढी ती आपणाला भूतकालात जास्त मागे घेऊन जाते. त्यामुळे खरे म्हणजे जेंव्हा आपण आकाशात बघतो तेंव्हा आपण त्रिमितीमधील अवकाश बघत नसून चतुर्मितीच्या अवकाश-काल या अक्षांत बघत असतो. याच पध्दतीने जर आपण आणखी अतीमंद अशा ताऱ्यांचा शोध घेऊ शकलो किंवा अवकाश-कालात आणखी मागे जाऊ शकलो तर उत्पती होण्याच्या क्षणी किंवा विश्व ज्यांत निर्माण झाले तो अवकाश-काल कसा होता ते दिसण्याची एक तर्क-शक्यता आहे. त्यामुळेच वरच्या ओवीतील विश्वाच्या बाहेर बघण्याची ज्ञानेश्वरांची मनीषा ही कवी कल्पना नकीच नाही. आकाशात दिसणारे तारे काही अमर नाहीत. त्यांनाही त्यांचा असा आयुष्यक्रम आहे. जन्म, वृध्दी, व विनाश यातून तारेही जातात. ज्ञानेश्वरांनी ही कल्पना मोठी विचाराने मांडली आहे.

जेथ उन्मीलन होत आहे दिठी/ तेथ पसरतीआदित्यांचिया सृष्टी/ पुढती निमिलनी मिठी/ देत आहाती//

ज्या ठिकाणी या विश्वाची दृष्टी उघडते त्या ठिकाणी सूर्यांच्या सृष्टय्ा पसरतात व जेथे ही दृष्टी मिटते तेथे त्या सूर्यांच्या सृष्टय्ा मावळतात.

प्रसरण पावणारे विश्व या कल्पनेला आता बहुतेक शास्त्रज्ञ पाठिंबा देतात त्यामुळे वरील ओवीमधील वर्णन मोठे अद््भुतरम्य असले तरी सत्यही आणि शक्यही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. भगवंतांच्या विश्वरूपाच्या तेजाचे वर्णन करताना ज्ञानेश्वर म्हणतात.

तिये अंगप्रभेचा देवा/ नवलावों काएसयासारिका सांगावा/ कल्पाम्ती एकुचि मेळावा/ द्वादशादित्यांचा होय//

देवाच्या त्या तेजाची अपूर्वता कशासारखी होती म्हणून सांगावी ? प्रलयकाळी बारा सूर्यांचा जो एकत्र मिलाफ होतो तशी.

प्रथम ही ओवी वाचली तेंव्हा एक अदभुतरम्य वर्णन म्हणून सोडून दिली. पण नंतर कोण जाणे मनातून जाईना. 1994 साली ‘ शूमेकर-लेव्ही ‘ या धूमकेतूचे 21 तुकडे गुरू ग्रहावर आदळले होते तेंव्हाची ‘हबल ‘ दुर्बिणीने काढलेली छायाचित्रे पाहिली होती ती आठवली. त्या छायाचित्रात, धूमकेतूची ही शकले गुरूच्या पृष्ठभागावर आदळण्याच्या आधी, गुरूच्या आकाशात अनेक सूर्य उगवल्यासरखेच दिसत होते. आणि नंतर त्यातल्याच फक्त एका शकलाच्या आघाताने जवळ जवळ 6 कोटी मेगॅटन एवढी ऊर्जा निर्माण झाल्याची नोंद शास्त्रज्ञांनी केल्याची वाचल्याचेही स्मरले. गुरू ग्रहावर समजा जर त्या वेळी कोणी सजीव अस्तित्वात असते तर त्यांना तो काल, प्रलयकाळच भासला असता. किंवा साडेसहा कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर असाच अशनिपात होऊन डायनॉसॉरस सारखे महाकाय प्राणी नष्ट झाले होते तो प्रलयकाळच, नाहीतर दुसरे काय होते. म्हणूनच ज्ञानेश्वरांच्या वर्णनाप्रमाणे , प्रलयकाळी उगवणारे बारा सूर्य ही कवी कल्पना खासच नव्हे. पण अशा या प्रलयकाळाचे वर्णन ज्ञानेश्वरांच्या शब्दातच ऐकणे जास्त रम्य वाटेल.

आघवयाचि विजूंचा मेळावा कीजे/ आणि प्रळयाग्नीची सर्व सामग्री आणिजे/ तेवींची दशकुही मेळविजे महातेजांचा//

सर्वच विजांचा समुदाय एकत्र केला व प्रळयकालाच्या अग्निची सर्व साहित्ये गोळा केली. तसेच दहाही महातेजे एकत्र मिळविली.

हे विश्व निर्माण झाले कसे याविषयी आता बहुतांशी शास्त्रज्ञ महाविशाल स्फोटाची शक्यता मानतात. असे समजले जाते की काही खर्व वर्षांपूर्वी झालेल्या या महास्फोटात वस्तू,उर्जा व काल हे निर्माण झाले. असेही मानले जाते की या महास्फोटात एवढी उर्जा निर्माण झाली होती की स्फोटानंतर एक सेकंद नंतर विश्वाचे तपमान दहा अब्ज सेल्सियस एवढे होते. अशा या महातेजाचे वर्णन करणे ज्ञानेश्वरांशिवाय दुसऱ्या कोणाला करणे शक्य तरी आहे का ? ज्ञानेश्वर म्हणतात.

तैसे ते दिव्यसूर्य सहस्त्रवरी/ जरी उपजतीकां एकेचिं अवसरी/ तरी त्या तेजाची थोरी उपमूं नये// तऱ्ही तिये अंगप्रभेचे नि पाडें/ हे तेज कांही होईल थोडे/ आणि तयाऐसें कीर चोखडें/ त्रिशुध्दी नोहें//

तसे ते हजारो सूर्य जर एकाच वेळेस उगवले, तरी त्या विश्वरूपाच्या तेजाच्या प्रभावाच्या उपमेला ते सूर्य येणार नाहीत.(याखेरीज प्रलयकाळच्या विजांचे तेज व प्रळयाग्नीची साहित्ये) यांत एकत्र केली तरी त्या सर्वांचे एकत्र केलेले तेज त्या विश्वरूपाच्या तेजाच्या बरोबरीला काही अल्पस्वल्प मानाने आले तर येईल. पण ते त्यासारखे शुध्द तर खासच असणार नाही.

ज्ञानेश्वर पुढे म्हणतात.

एथचिहि दिठी करपत/ सूर्य खद्योतु तैसे हारपत/ ऐसे तीव्रपण अद््भुत तेजाचे यया// हो काजो महातेजांचा महार्णावीं/ बुडोनी गेली सृष्टी आघवी/ की युगान्त विजूंचा पालवी/ झाकले गगन//

येथे विश्वरूपाच्या तेजात दृष्टी करपून जाते व सूर्य काजव्याप्रमाणे या तेजात झाकाळून जातात. असे या तेजाचे तीव्रपण अद््भुत आहे. जणु काय या महातेजाच्या महासमुद्रात सर्व सृष्टी बुडून गेली आहे अथवा आकाश तर प्रळयकाळच्या विजेच्या पदराने झाकून गेले आहे.

अलबर्ट आइनस्टाइन या जगविख्यात शास्त्रज्ञाने 1916 या साली आपला सापेक्षतावादाचा सर्वसाधारण सिध्दांत मांडला. हा सिध्दांत सर्व सामान्यांना समजणे अतिशय अवघड जाते याची प्रमुख कारणे म्हणजे आपल्या डोक्यात भिनलेली युक्लिडची भूमिती व आपला सर्वसाधारण पोंच किंवा कॉमन सेन्स. अगदी पाळण्यात झोपलेल्या बाळाला सुध्दा आपण त्रिकोण, चौकोन व गोल या आकारांच्या स्वरूपातच जगाकडे बघायला शिकवितो. आपल्या डोक्यात भिनलेल्या या त्रिमितीतील भूमितीचा, चर्तुमितीतील अवकाश-काल अक्षांवर आधारलेला सिध्दांत समजताना फारच अडसर होतो. याचप्रमाणे अवकाशाकडे बघत असताना जर आपण त्रिकोण,चौकोन,गोल या आकारांत अवकाश बसवू लागलो तर ज्ञानेश्वरांनी वर्णिलेल्या अर्जुनाच्या स्थितीप्रमाणेच आपली गत होणार नाही कां ? ज्ञानेश्वर म्हणतात.

तुजवीण एकादिचियाकडे/ परमाणुंहि एकला कोडें/ अवकाशु पाहतसे परि न सांपडे/ ऐसे व्यापिले तुंवा// परि या तुझिया रूपाआंतु/ जी उणीव एक असे देखतु/ जे आदि मध्य अंतु/ तिन्ही नांही// एवं आदिमध्यांतर रहिता/ विश्वेश्वरा अपरिमिता/ तूं देखलासि जी तत्वतां/ विश्वरूपां//

तुझ्याशिवाय एखाद्याकडे परमाणुएवढी तरी जागा सांपडेल म्हणून मी कौतुकाने शोधत आहे, पण सापडत नाही असे तूं सर्वत्र व्यापले आहेस्. परंतु या तुझ्या रूपात जो एक कमीपणा मी पहात आहे तो हा की अमुक ठिकाणी तुझा प्रारंभ झाला, अमुक ठिकाणी तुझा मध्य आहे व अमुक ठिकाणी तुझा शेवट आहे असे पाहू लागलो असता हे तिन्ही तुझ्या ठिकाणी नाहीत. ही आरंभ, मध्य व शेवट नसलेल्या अमर्याद त्रैलोक्यनायका, विश्वरूपा, मी याप्रमाणे तुला खरोखरच पाहिले.

आणि या विश्वाचे पुढे काय होणार ? हे असेच विस्तारत जाणार की परत आकुंचन पावून नष्ट होणार ! याबाबत अजून तरी शास्त्रज्ञांत एकमत नाही. पण तारे व ग्रहांचे पुढे काय होणार याचा अंदाज मात्र शास्त्रज्ञांना बऱ्यापैकी आलेला आहे. आपल्या सूर्याच्या जवळपास आकार असलेले तारे, इंधन संपल्यावर श्वेत बटू तारे म्हणून अश्वथाम्यासारखे आकाशात तरंगत राहतात. सूर्याच्या तीन पटीपर्यंत वस्तुमान असलेले तारे न्यूट्रॉन तारे बनतात व त्याच्यापेक्षा मोठे तारे ज्यांना महाविशाल तारे म्हणता येईल, दोन मार्गांनी नष्ट पावतात. एक तर त्यांचा प्रचंड विस्फोट (सुपर नोव्हा ) होतो किंवा दुसरा मार्ग म्हणजे गुरुत्वाकर्षणाने ताऱ्याचे सतत आकुंचन होते. शेवटी शेवटी या ताऱ्याचे गुरुत्वाकर्षण एवढे प्रचंड होते की याच्या पृष्ठभागावरून प्रकाश किरणही बाहेर पडू शकत नाहीत व तारा आपल्या दृष्टीने अदृष्य बनतो. ताऱ्याच्या या अवस्थेलाच कृष्ण विवर असे म्हणतात. पृथ्वीसारख्या ग्रहाचे कृष्ण विवर झाले तर त्याची त्रिज्या 10 सें.मी. पेक्षा जास्त असणार नाही. असे निर्माण झालेले कृष्ण विवर जर एखाद्या महाराक्षसी ताऱ्याभोवती भ्रमण करीत असेल तर त्याच्या अत्युच्य गुरुत्वाकर्षणाने ताऱ्यावरील वस्तुकण आपल्याकडे खेचून घेऊ लागते. प्रथम हे वस्तुकण कृष्ण विवराभोवती फेर धरून भ्रमण करू लागतात व त्यांचे एक प्रचंड कडे निर्माण होते. परंतु काही काळातच कृष्ण विवर त्यांना गिळंकृत करून टाकते. ही क्रिया लक्षावधी वर्षे चालू रहाते व त्यामुळे त्या महाराक्षसी ताऱ्याचे वस्तुमान कमी होत जाते व कृष्ण विवराचे वाढत जाते. अकराव्या अध्यायात ज्ञानेश्वर विश्वरूपाच्या मुखाचे वर्णन करताना म्हणतात.

या आघवियाचि सृष्टि/ लागलिया आहानि वदनाचां वाटी/ आणि हा जेधिंचिया तेथ मिठी देतसे उगला// जैसे महानदीचे वोघ/ वाहिले ठाकती समुद्राचे आंग/ तैसे आघवांचिकडूनि जग/ प्रवेशत मुखी// काय सागराचां घोंटु भरावा/ की पर्वताचा घांसु करावा/ ब्रम्हकटाहो घालवा आसकाचि दाढे// दिशा सगळया गिळावया/ चांदिणिया चाटुनी घ्यावया/ ऐसे वर्तत आहे साविया/ लौल्य बा तुज// जैसे तक्षकां विष भरले/ हो कां जें काळरात्री भूत संचरले/ की अग्नेयास्त्र परजिले वज्राग्नि जैसे// मग म्हणे हे काई/ जन्मलिया आत मोहरचि नाही/ जग आपैसेंचि वदनडोही संचारताहे//

या सर्वच सृष्टय्ा मुखाच्या वाटेस लागल्या असून हे विश्वरूप उगीच जागच्या जागी त्यांस गिळून टाकत आहे. ज्याप्रमाणे मोठया नद्यांचे प्रवाह मोठया वेगाने समुद्रास येऊन मिळतात त्याप्रमाणे सर्व बाजुंनी हे जग त्याच्या मुखात शिरत आहे. सर्व समुद्रच पिऊन टाकावा की काय ? किंवा पर्वतच गट्ट करून टाकावा की काय ? अथवा हे संपूर्ण विश्व दाढेखाली घालावे की काय ? सगळया दिशांच गिळून टाकाव्या अथवा चांदण्या चाटुन पुसुन घ्याव्यात अशी ही देवा तुला साहजिक हांव दिसत आहे. तक्षकाच्या तोंडात विष भरावे किंवा अमावास्येच्या रात्री पिशाच्चांचा संचार व्हावा किंवा वज्राग्नि हा जसा स्वभावाने अत्यंत दाहक असून त्याने आणखी अग्निअस्त्र धारण करावे हे काय ! जन्माला आलेल्या प्राण्याला दुसरी गतीच नाही. सर्व जग आपोआप विशेश्वराच्या मुखरूपी डोहात जात आहे.

कृष्ण विवराच्या भोवतालची परिस्थिती याहून जास्त समर्पकरित्या कोणी वर्णन करू शकेल असे वाटत नाही. अकराव्या अध्यायातील अद््भुतता आणि रौद्रता यांची वरील कांही उदाहरणे म्हणजे एक चुणुक आहे. सगळा अध्यायच मोठा अद््भुतरम्य आह्रे. ज्ञानेश्वर महाराज ज्या महातेजाचे वर्णन करतात त्या महातेजाच्या जवळपास जाऊ शकणारे तेज फक्त ज्ञानेश्वरांचे बुध्दितेज आहे याबद्दल काही शंकाच नाही. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात, ज्यूल्स व्हर्ने, आर्थर सी क्लार्क यांसारख्या शास्त्रज्ञ व लेखकांनी एक नवाच वाड़मयप्रकार उदयास आणला असे आपण मानतो. या शास्त्रीय वाड़मय किंवा सायन्स फिक्शनच्या उदयानंतर पुष्कळ वेळा असे घडले आहे की या वाड़मयात वर्णन केलेली उपकरणे किंवा इतर गोष्टी नंतर प्रत्यक्षात आल्या आहेत. ज्यूल्स व्हर्नेचे चंद्राभोवती एक सफर हे पुस्तक याचे उत्तम उदाहरण आहे. ज्ञानेश्वरीचा अकरावा अध्याय वाचून म्हणावेसे वाटते की शास्त्रीय वाड़मयाचे आद्य लेखक ज्ञानेश्वरच आहेत आणि कोणास ठाऊक त्यांच्या कल्पनाविलासातल्या कोणकोणत्या गोष्टी भविष्यांत ग्राह्य धरल्या जाणार आहेत. आपल्या हातात हा अलौकिक ग्रंथ तर आहे आणि त्याचा रसास्वाद आपण मन मानेल तेवढा घेऊ शकतो आहे. हे ही भाग्य काही थोडके नाही.

विजयादशमी 26-10-2001

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

One thought on “ज्ञानेश्वर- आद्य शास्त्रीय वाड़मयकार

  1. Very Good information.. Good work,keep it up.

    Posted by Mahendra Kulkarni | फेब्रुवारी 20, 2009, 9:58 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 387 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: