.
Science

एका युगान्ताच्या शोधात


सोव्हिएट रशियाच्या सायबेरिया प्रांतामधील, टूनगूस्का नदीच्या परिसरात रहाणाऱ्या, वासिली व ल्युबरमन या दोन साध्या सुध्या माणसांवर , 30 जून 1908 या दिवशी काळाने झडप घातली. अगदी सामान्य जीवन जगणारे हे दोघे , शिकार आणि गुरे राखणे यात आपला दिनक्रम घालवत असत. त्यांचा मृत्यू मात्र अत्यंत विचित्र आणि अनपेक्षित रित्या झाला. हे दोघेजण व इतर काही खेडूत त्या दिवशी गुरे चारत होते. अचानक त्यांना उत्तर क्षितिजावर एक अत्यंत तेजस्वी अग्नीगोल दिसू लागला. काही सेकंदातच ,डोळे दिपवून टाकणारा लखलखाट करणारा व कानठळया बसविणारा एक स्फोट झाला व आगीचा एक प्रचंड लोळ आकाशभर पसरला. या स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की हे खेडूत लांबवर वेडेवाकडे फेकले गेले व त्यातच या दोघांचा मृत्यू झाला. या दोघांचा मृत्यू जरी अशा विचित्र रित्या झाला असला तरी इतिहासात उल्लेखली जावी अशी ही गोष्ट खचितच नव्हती. परंतु त्यांना दिसलेला आगीचा लोळ हा पृथ्वीवर पडणाऱ्या एका उल्केचा होता हे जेंव्हा ज्ञात झाले तेंव्हा त्यांचा मृत्यू हा पृथ्वीच्या इतिहासाचाच एक भाग बनला. उल्कापातामुळे, पृथ्वीतलावर , अब्जावधी वर्षांपासून नष्ट होत असलेले प्राणी, जीव जंतू व वनस्पती यांच्या, मानवाला अज्ञात अशा एका लांबलचक यादीत, वासिली व ल्युबरमन या दोघांची नावे लिहिली गेली. मात्र या यादीत असलेले व मानवाला सध्या माहिती असलेले असे हे दोघेच बळी असल्याने त्यांच्या मृत्यूला अनन्यसाधारण महत्व आले. टूनगूस्का नदीजवळचा हा उल्कापात तसा अगदी लहान प्रमाणातलाच होता. पडणारी उल्का हवेतच जळून गेली होती. तरी सुध्दा 70 किलोमीटर अंतरावरच्या व्हारानोव्हा या गावात, स्फोटाने घरांच्या कांचा फुटल्या होत्या व माणसे जमिनीवर फेकली गेली होती. स्फोटाचा आवाज 600 किलोमीटरवरही एक घरघर या स्वरूपात ऐकू आला होता. आणि उल्कापाताच्या 30 किलोमीटर परिसरात, झाडाझुडपांसह सर्व गोष्टी पूर्णपणे नष्ट झाल्या होत्या. शास्त्रज्ञांनी केलेल्या हिशोबा प्रमाणे ही उल्का 50 ते 60 मीटरपेक्षा जास्त मोठी नव्हती व ती निर्जन परिसरात पडल्याने फारशी हानीही झाली नव्हती.

अशा प्रकारच्या उल्कापातांना पृथ्वीच्या इतिहासात फार महत्व आहे. सध्याच्या अनुमानाप्रमाणे पृथ्वीचे वय अदमासे चारशे पन्नास ते चारशे साठ कोटी वर्षे तरी असावे. या प्रदीर्घ कालापैकी, शेवटच्या पन्नास ते साठ कोटी वर्षांच्या (म्हणजेच मानवी इतिहासाला सर्वात जवळच्या) इतिहासाबद्दल काही तरी माहिती आपल्याला मिळू शकते व त्यावरून असे दिसते की हा इतिहास हळू हळू बदलत गेलेला नसून त्याला टप्पे किंवा युगे आहेत आणि प्रत्येक टप्याचा शेवट हा एक प्रलय होऊन झालेला आहे आणि हा प्रलय, निदान एका तरी महा विशाल आकारमानाच्या उल्कापाताशी निगडित आहे. आपल्या वैदिक धर्मग्रंथांतही युग आणि महायुग ही संकल्पना मांडलेली आहे. या संकल्पनेप्रमाणे 43 लक्ष वीस हजार वर्षांचे एक महायुग असते व अशी तीन महायुगे, ज्यांना सत्य, त्रेता व द्वापार असे संबोधले जाते ती संपून शेवटचे कली युग आता सुरू झाले आहे. यापैकी प्रत्येक युगान्ताच्या वेळी एक महा प्रलय होऊन सर्व जीव सृष्टी नष्ट झालेली आहे व नवीन युगात ती परत निर्माण झालेली आहे. हीच कल्पना बायबल मधील नोहा व त्याचे जहाज या गोष्टीतून सुध्दा सुचविली गेली आहे. आश्रर्याची गोष्ट अशी की पृथ्वीचा इतिहास अभ्यासताना सुध्दा 2.5 ते 3 कोटी वर्षांच्या कालखंडांची युगे किंवा टप्पे आपल्याला आढळून येतात. एका युगाच्या अंतर्गत, जीव जंतू, प्राणी व वनस्पती यांच्यामधे झालेली उत्क्रांती जवळपास संपूर्णपणे किंवा बहुतांशी त्या युगान्ताबरोबरच नष्ट झालेली आहे व नव्या युगात, उत्क्रांती परत पहिल्यापासून सुरू झालेली आहे. मानवी इतिहासाला सर्वात जवळचे असे टर्शरी‘ (TERTIARY) हे महायुग साडेसहा कोटी वर्षांपूर्वी , त्याच्या आधीच्या म्हणजे क्रेटेशस‘(CRETACEOUS) या युगाचा युगान्त झाल्यावर सुरू झाले. क्रेटेशसचा युगान्त तीन कारणांनी मानवाला महत्वाचा वाटतो. एकतर हा युगान्त आपल्या ज्ञात इतिहासाच्या सर्वात जवळचा आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या युगान्ताबरोबरच, ‘क्रेटेशसया महायुगात , सर्व पृथ्वीवर संचार करणारे, डायनॉसॉरस सारखे महाकाय व राक्षसी प्राणी संपूर्णपणे नष्ट झाले व मानवासारख्या सस्तन प्राण्यांची उत्क्रांती शक्य ठरली. तिसरी महत्वाची बाब म्हणजे या युगाच्या शेवटी टी-रेक्स सारखा बुध्दीमान, बलाढय व चपळ डायनॉसॉरस निर्माण झाला होता. या प्राण्याचे इतर डायनॉसॉरस हेच प्रमुख खाद्य होते. त्यामुळे पृथ्वीवरील खाद्य साखळी (Food-Chain) पूर्णपणे नियंत्रणात राहून जीव सृष्टीचा समतोल राहू शकत होता. असे असले तरी अकस्मात या युगाचा अंत झाला होता.

पृथ्वीच्या या प्रदीर्घ कालखंडाचा इतिहास अभ्यासणे सोपे नाही. कारण या कालखंडाच्या मानाने ,मानवी अस्तित्वाचा कालखंडच अत्यंत सूक्ष्म आहे व त्यामुळे हा इतिहास कोणी तरी व कोणत्या तरी प्रकारे लिहून ठेवलेला असला तरच तो अभ्यासणे शक्य आहे. अथवा हे एक स्वप्नरंजन ठरण्याचीच जास्त शक्यता आहे.. धर्मग्रंथांच्या मताप्रमाणे, हे जग परमेश्वराने निर्माण केलेले आहे व त्यामुळे असा इतिहास कोणी लिहून ठेवलेला असणे शक्यच नाही. प्रेषित हे परमेश्वराचेच अवतार आहेत व त्यामुळे ते या बाबतीत काय सांगतील तेच सत्य आहे. अर्थात प्रेषितांची मते, प्रयोग व निरिक्षणे यावर आधारलेली नसल्याने शास्त्रज्ञांना मान्य होणे शक्य नव्हते. व म्हणूनच क्रेटेशस युगान्ताच्या शोधाची, प्रयोग व निरिक्षणे यावर आधारलेली ही कहाणी मोठी मनोरंजक आहे.

के-टी परिसीमा

पृथ्वीच्या पृष्ठभागावर सतत घडामोडी होत असतात. पाउस व वितळणारा बर्फ यांनी सतत जमिनीची धूप होत असते तर उलट सुलट वाहणाऱ्या वाऱ्यांनी पृष्ठभागावरील धूळ सगळीकडे पसरत असते. पावसाचे पाणी नद्या नाल्यांमधून वहाते व नदी काठच्या सखल भागात वहात आणलेला चिखल पसरते. या पाण्याबरोबरच, वहात आलेली प्राण्यांची हाडे, दात किंवा काही वनस्पती याही पसरल्या जातात. जमिनीवरही असे अवशेष धूळीने झाकले जातात. समुद्रात असलेले असे अवशेष समुद्रतळावर साठतात व हळू हळू त्यावर मातीचे आवरण तयार होते. ही प्रक्रिया वर्षानुवर्षे चालूच राहते. लाखो वर्षानंतर या साठलेल्या धुळीचे कठिण असे दगड बनतात आणि प्राणी व वनस्पती यांचे अवशेष या दगडांचाच भाग बनून जातात. या दगडासारख्या अवशेषांना जीवाष्म (Fossiles) असे नाव आहे. कालांतराने या पैकी एखादा समुद्र तळ हिमालया सारखा किंवा मध्य अमेरिकेसारखा वर उचलला जातो. तर नद्यांमुळे ग्रॅन्ड कॅनियन सारखी खोल दरी तयार होते. भूकंपामुळेही कडे कोसळतात व एखादा दोन तीन मैल उंचीचा उभा कडा उभा रहातो. या सर्व घडामोडींमुळे पृथ्वीचा इतिहास ज्यावर उभा छेद घेऊन आलेखित केला आहे असे कडे पृथ्वीवर बऱ्याच ठिकाणी आढळतात. डेन्मार्क मधील स्टेन्स क्लिन्ट , फ्रान्स मधील सेंट व्हिक्टरी, मध्य इटली मधील गुबिओ या गावाजवळ, मेक्सिको मधील एल पेनॉन किंवा मिम्ब्राल या गावांजवळ असे उभे कडे आढळतात. भारतात सुध्दा कच्छ मधील अंजर गावाजवळ असे उभे कडे सापडले आहेत. या कडयांच्या तळापासून, एका कालखंडातील, पृथ्वीच्या इतिहासाचा आलेख मोठया अचूकपणे नोंदला जातो. 1 सें.मी. जाडीचा थर हा साधारणपणे 1 हजार वर्षांचा इतिहास असतो.

निरिक्षण केलेला एखादा थर हा किती कालापूर्वीचा आहे हे शोधण्यासाठी शास्त्रज्ञ ,युरेनियम सारख्या काही विशिष्ट मूल तत्वांच्या रेडिओ आयसोटोपचा वापर करतात. या प्रकारचे रेडिओ आयसोटोप हे एका विशिष्ट दराने नष्ट होऊन दुसऱ्या एका मूल तत्वाच्या रेडिओ आयसोटोपची निर्मिती करत असतात. या दोन्ही आयसोटोपचे त्या भूस्तरातील प्रमाण समजले की तो भूस्तर कधी तयार झाला असेल हे सांगता येते व एखाद्या भूस्तरात आढळणारे जीवाष्म, हे कोणत्या काळातले होते याचे अचूक निदान करता येते.

क्रेटेशस‘(CRETACEOUS) हे युग संपून टर्शरी‘ (TERTIARY) हे महायुग सुरू झाले त्या संक्रमण कालातील भूस्तर अभ्यासताना शास्त्रज्ञांना एक विलक्षण गोष्ट आढळून आली. क्रेटेशसयुगातील भूस्तरात त्या युगातील जीव जंतू, डायनॉसॉरस सारखे प्राणी व वनस्पती यांचे अवशेष सापडणारे खडक आढळत होते. त्याचप्रमाणे टर्शरीमहायुगाच्या भूस्तरातही त्या महायुगात आढळणारे जीवाष्म असलेले खडक सापडत होते. परंतु या दोन युगांच्या संक्रमण कालाचा निर्देशक असलेला, अदमासे 1 ते 2 सें.मी जाडीचा, मातीचा थर मात्र विलक्षणच होता. या थरात, अगदी प्राथमिक स्वरूपातल्या जीवसृष्टीसकट, कोणत्याही स्वरूपातल्या जीव सृष्टीच्या जीवाष्मांचा पूर्णपणे अभाव होता. व दुसरी मोठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा मातीचा थर डेन्मार्क पासून मेक्सिको ते न्यू झीलंड या सर्व ठिकाणी शोधलेल्या कडयांमधे तेवढयाच जाडीचा असलेला आढळत होता. या निरिक्षणांचा अर्थ अगदी सरळ होता. क्रेटेशसया महायुगातील सर्व जीवसृष्टी कोणत्यातरी भयानक रितीने एकदम नष्ट झाली होती. व त्या नंतर पुढची हजार दोन हजार वर्षे तरी पृथ्वीवर कोणत्याही स्वरूपातली जीवसृष्टी (Bio-sphere) अस्तित्वात राहिली नव्हती व सबंध पृथ्वी, या मातीच्या वादळाच्या आवरणाखाली झाकली गेली होती. क्रेटेशसमहायुगाची, हा मातीचा थर म्हणजे एक परिसीमाच होती. क्रेटेशसआणि टर्शरीया महायुगांचा संक्रमण काल हा मातीचा थर दाखवत असल्याने त्याला शास्त्रज्ञांनी के-टी परिसीमा असे नाव दिले.

के-टी परिसीमेच्या या शोधानंतर जगभरच्या भूगर्भशास्त्रज्ञांनी के-टी मातीचा अभ्यास करण्यास सुरवात केली व अनेक विलक्षण गोष्टी उजेडात येऊ लागल्या. इरिडियम हा धातू सहसा पृथ्वीच्या पृष्ठभागावर आढळत नाही. आढळला तरी त्याचे प्रमाण अत्यंत सूक्ष्म असते. क्रेटेशसआणि टर्शरीया दोन्ही युगांतील भूस्तरांच्यात हा धातू सर्वसाधारणपणे आढळतो तेवढाच आढळत होता. के-टी मातीमधे मात्र या धातूचे प्रमाण 30 ते 60 पट जास्त आढळत होते. शोध कार्य चालू असलेल्या सर्व ठिकाणी हा धातू अशाच जास्त प्रमाणात आढळत होता. यावरून असे दिसत होते की के-टी मातीच्या वादळाने जवळ जवळ 5 लक्ष टन इरिडियम धातू संपूर्ण पृथ्वीच्या पृष्ठभागावर पसरला होता. कोणत्याही ज्वालामुखीच्या उद्रेकात आतापर्यंत एवढया प्रमाणात इरिडियम बाहेर टाकला गेलेला नव्हता व पृथ्वीच्या पृष्ठभागावर पसरलेल्या या धातूचे एकूण वजन पाहता, तो पृथ्वीवरील कोणत्याही नैसर्गिक उद्रेकाने पसरला असणे संभवनीय नव्हते. शास्त्रज्ञ त्यामुळे या निष्कर्षाला आले होते की के-टी मातीमधे, पृथ्वीच्या बाहेरील उगमाकडून आलेली मूल द्रव्ये होती. आपल्या सूर्यमालेजवळच्या एखाद्या ताऱ्याचा स्फोट किंवा एखादा धूमकेतू किंवा उल्का यांचे पृथ्वीवर पतन असे दोनच उगम शास्त्रज्ञांना शक्य वाटत होते. के-टी मातीत, इरिडियम शिवाय प्लुटोनियम सारखी जड मूल द्रव्ये सापडत नव्हती त्यामुळे एखाद्या ताऱ्याच्या स्फोटामुळे के-टी मातीचे वादळ पृथ्वीवर पसरले असेल ही शक्यता शास्त्रज्ञांनी दूर सारली व के-टी माती ही धूमकेतू किंवा उल्कापातामुळेच निर्माण झाली असावी असे अनुमान काढण्यात आले.

या अनुमानाला सर्वमान्यता मिळण्यासाठी आणखी ठोस पुराव्यांची गरज होती. त्यामुळे निरनिराळया ठिकाणच्या के-टी मातीचे पृथ:करण केले गेले. या पृथ:करणात असे लक्षात आले की के-टी मातीत गोल किंवा पाण्याच्या थेंबाच्या आकाराचे आणि1 मि.मि. पर्यंत व्यास असलेले काचेचे मणी सापडत होते. असे मणी फक्त उल्कापात झालेल्या स्थानीच सापडतात. याशिवाय अगदी सूक्ष्म हिरे आणि निकेल धातूचे स्फटीक हे ही या मातीत आढळले. यांचे अस्तित्वही याच निष्कर्षाला नेत होते की के-टी माती ही पृथ्वीच्या बाहेरून आलेल्या उल्केचे, हवेतील ज्वलन व त्या उल्केचा पृथ्वीवरील आघात यामुळेच निर्माण झाली होती. या व्यतिरिक्त के-टी मातीत सूक्ष्म असे क्वाट्र्झचे स्फटिक सापडत होते. या स्फटिकांच्यावर , आजुबाजूला एखादा स्फोट झाल्यावर खिडक्यांच्या कांचाना जसे चरे जातात, त्याच पध्दतीचे चरे सापडत होते. भूगर्भशास्त्रज्ञांच्या परिभाषेत या स्फटिकांना, हादरलेले स्फटिक (Shocked quartz) असे नाव आहे. हादरलेल्या स्फटिकांचे के-टी मातीतले अस्तित्व हा, ही माती एखाद्या उल्कापातातूनच निर्माण झाली आहे, हे सिध्द करण्यास पुरेसा आणि ठोस पुरावा मानला गेला. यामुळे ही गोष्ट सिध्द झाली की क्रेटेशस चा युगान्त हा एका उल्कापातामुळेच झाला होता. हादरलेले स्फटिक जेंव्हा उल्कापात समुद्रतळावर होतो तेंव्हा सापडत नाहीत. त्यामुळे हे ही सिध्द होत होते की हा उल्कापात जमिनीवर झाला होता. के-टी मातीत या शिवाय ऍमिनो ऍसिड्स या प्रकारचे सेंद्रिय पदार्थही सापडले होते. ही ऍमिनो ऍसिड्स अनेक प्रकारची असू शकतात. के-टी मातीतील ऍमिनो ऍसिड्स , पृथ्वीवर न सापडणारी व फक्त धूमकेतूंच्या धूळीत सापडणारी, असल्याने क्रेटेशस चा युगान्त उल्कापातामुळे झालेला नसून एका धूमकेतूने पृथ्वीच्या पृष्ठभागावर साडेसहा कोटी वर्षांपूर्वी केलेल्या घणाघातामुळे झाला होता हे जगातल्या बहुतांशी शास्त्रज्ञांनी शेवटी मान्य केले. पृथ्वीवर पाठीवर पसरलेल्या एकूण के-टी मातीच्या थराचे वजन लक्षात घेऊन शास्त्रज्ञ या अनुमानाला आले होते की हा धूमकेतू 10 ते 12 कि.मी. व्यासाचा तरी होता.

धूमकेतू विवराच्या शोधात

क्रेटेशसयुगातल्या सर्व जीवसृष्टीचा कर्दनकाळ ठरलेल्या या धूमकेतूचा घणाघात पृथ्वीवर कोणत्या स्थानी झाला असेल हे शोधण्याचे प्रयत्न अनेक भूगर्भशास्त्रज्ञांनी सुरू केले. सर्व ठिकाणी सापडणारी के-टी माती ही साधारणपणे एकाच प्रकारची असल्याने त्या मातीच्या पृथ:करणातून या बाबतीत काहीही मदत मिळण्यासारखी नव्हती. एक गोष्ट सर्वमान्य होती की के-टी मातीचा थर हा साडेसहा कोटी वर्षांपूर्वीचा होता. त्यामुळे जगभरच्या माहिती असलेल्या उल्काविवरांचे वय शोधून काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. या शिवाय या धूमकेतूच्या एकूण आकाराच्या अनुमानाप्रमाणे, त्या धूमकेतूने पृथ्वीवर आघात केल्यावर जे विवर निर्माण केले असते ते निदान 200 कि.मी व्यासाचे तरी असणे आवश्यक होते. हा आकार व साडेसहा कोटी वर्षे वय या अटी लक्षात घेतल्यावर , आधी शक्यता वाटत असलेली, अमेरिकेतील मॅन्सन विवर किंवा रशिया मधील कारा विवर, या सारखी बरीच विवरे या शोधातून रद्दबातल झाली व जगभरातले भूगर्भशास्त्रज्ञ क्रेटेशसधूमकेतूचे विवर सापडत नसल्यामुळे मोठया बुचकळयात पडले.

काही भूगर्भशास्त्रज्ञ या मताचे होते की हे आघात विवर, समुद्र काठावर किंवा उथळ समुद्रात निर्माण झाले असले पाहिजे. त्यामुळे के-टी मातीत हादरलेले स्फटिक का मिळत होते त्याचे स्पष्टीकरण देता येत होते. समुद्र तळावर साठणारा गाळ आणि भूकंपामुळे होणारा समुद्र तळामधला बदल या कारणांमुळे हे विवर बहुदा आतापर्यंत बुजून गेले असण्याची शक्यता होती व म्हणूनच बहुदा हे विवर शोधता येत नव्हते. या शक्यतेमुळे शास्त्रज्ञांच्या विचारांना एक नवीन दिशा मिळाली. धूमकेतूचा घणाघात जरी उथळ समुद्र तळावर झाला असला तरी त्याने महाकाय अशा सुनामीलाटा निर्माण केल्या असत्या. व या विवरापासून दूर असलेल्या किनाऱ्यांच्यावर, या सुनामी लाटांनी केलेली हानी के-टी परिसीमेच्या जवळ दिसावयास हवी होती.

अमेरिकेतील टेक्सास राज्याच्या दक्षिणेस असलेल्या वेकोया शहराच्या दक्षिणेस ब्राझसही नदी वाहते. हे ठिकाण मेक्सिकोच्या आखाताच्या किनाऱ्यावर जवळ आहे. या नदीच्या पात्राच्या बाजूला असलेल्या उघडया बोडक्या खडकांचा अभ्यास,1985 मध्ये, डेनमार्क मधील एक शास्त्रज्ञ यान स्मिटयाने केला व हे खडक सुनामी लाटांनी निर्माण झाले असावेत असा विचार प्रथम मांडला. या नंतर जोन बोर्जेस व तिचे सहकारी यांनी या खडकांमधे उत्खनन करून हे शोधून काढले की या खडकांतील के-टी परिसीमेजवळ काही सें.मी. जाडीचा एक थर आहे. या थरात लाकडांचे अवशेष,माशांचे दात व के-टी मातीच्या आवरणात असलेली सॅन्डस्टोनची खडी त्यांना सापडली. या सगळयाचा विचार करून या शास्त्रज्ञांनी असा विचार मांडला की या स्थानी 1 मीटर उंचीच्या सुनामी लाटा तयार झाल्या असाव्यात. क्रेटेशसयुगान्ताच्या वेळी मध्य अमेरिकेचा टेक्सास पासून मॉन्टाना पर्यंतचा भाग एका समुद्राचा तळ होता व ब्राझसनदीचा परिसर अंदाजे 100 मीटर उंचीच्या पाण्याखाली होता. समुद्र तळावर निर्माण झालेली 1 मीटर सुनामीलाट ही पृष्ठभागावर 100 मीटर उंचीची असणार होती. यावरून शास्त्रज्ञांच्या या गटाने अंदाज बांधला की सुनामीच्या उगमस्थानी या लाटांची उंची 4000 ते 5000 मीटर असावी व हे स्थान ब्राझसपासून 5000 कि.मी, अंतरावर तरी असावे.

हैतीबेट हे मेक्सिकोच्या आखाताच्या दक्षिणेस आहे. या बेटाच्या दक्षिण टोकावर मॅसिफ द ला सेलेया नावाची एक डोंगरांची रांग आहे. या डोंगर उतारावर , ‘मॉरसीया हैतीच्या भूगर्भशास्त्रज्ञाला ,मोठे विलक्षण दिसणारे असे खडक प्रथम सापडले. या शोधाची बातमी समजल्यावर एक तरूण अमेरिकन भूगर्भशास्त्रज्ञ हिल्डब्रॅन्डहा तिथे गेला. या खडकांच्यात, के-टी परिसीमेवर सुमारे अर्ध्या मीटर जाडीचा एक मळकट हिरवा थर दिसत होता. हा थर त्याच्या खालच्या पिवळट रंगाच्या चुनखडीच्या खडकांच्या विरोधात उठून दिसत होता. या थरात हिल्डब्रॅन्डला विपुल प्रमाणात उल्का आघातात तयार झालेले काचेचे मणी, हादरलेले स्फटिक तर सापडलेच पण इरिडियम धातू असलेल्या के-टी मातीच्या आवरणात असलेली सॅन्डस्टोनची खडीही सापडली. हिल्डब्रॅन्डने यावरून असे मत मांडले की हा थर आघातानंतर जमिनीतून बाहेर फेकल्या गेलेल्या मातीचा आहे व त्या थराच्या जाडीवरून आघात स्थान हैतीपासून 1000 कि.मी अंतरावर असावे.

या माहितीच्या आधारे, हिल्डब्रॅन्डने हैती हा मध्य धरून कल्पिलेल्या एका 1000 कि.मी. त्रिज्येच्या वर्तुळात धूमकेतू विवर शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. कोलम्बिया देशाच्या जवळ असणाऱ्या एक निम वर्तुळाकार भू-वैशिष्टय्ाचा त्याने प्रथम अभ्यास केला पण हे आघात विवर नसावे हे लवकरच त्याच्या लक्षात आले. मेक्सिको देशाच्या पूर्वेस युकॅटन हा समुद्र किनारा आहे. कॅनकुनशहराच्या पश्चिमेस, या किनाऱ्याजवळील मेरिडाशहराभोवती असलेल्या दुसऱ्या एका भू-वैशिष्टय्ाकडे हिल्डब्रॅन्डचे लक्ष वेधले गेले. युकॅटनचा हा किनारा मेक्सिकोच्या आखाताच्या दक्षिणेस येतो.

चिक्षूल्यूब

युकॅटन किनाऱ्यावरील वर्तुळाकार भू-वैशिष्टय हे 1950 सालापासूनच मेक्सिको मधील पेमेक्सया खनिज तेल शोधणाऱ्या कंपनीला माहिती होते. याचा अर्धा भाग युकॅटनच्या किनाऱ्यावर होता व अर्धा समुद्रात बुडलेला होता. किनाऱ्यावर असलेल्या अर्धवर्तुळाच्या परिघावर दगडामधे आपोआप निर्माण झलेली अशी असंख्य गोल कुंडे होती. मेक्सिकोमधील माया जमातीचे लोक या कुंडांतील पाणी पिण्यासाठी वापरत असत. या पध्दतीचे भू-वैशिष्टय बहुदा विझलेल्या ज्वालामुखी मुखाजवळ असते व त्यात खनिज तेल सापडण्याची बरीच शक्यता असते. पेमेक्सकंपनीने तेल शोधण्यासाठी या ठिकाणी 1950 च्या दशकात व नंतर 1978 मधे प्रायोगिक तेल विहिरी खणून बघितल्या होत्या. या पैकी काही या अर्धवर्तुळाच्या परिघाच्या बाहेर व काही आत होत्या. या विहिरींच्यात 1500 मीटर खोलीपर्यंत चुनखडीचा दगड व समुद्र तळावरील गाळ होता व त्याच्या खाली स्फटिक स्वरूपातील खडक लागला होता. विमानातून चुंबकीय क्षेत्रमापनाचा कार्यक्रम ही या कंपनीने या ठिकाणी केला होता. त्यात त्यांना या अर्धवर्तुळाच्या मध्यभागी 60 कि.मी व्यासाचे एक कडे दिसले होते. या कडयात चुंबकीय क्षेत्र तीव्र होते व या कडयाच्या बाहेर 180 कि.मी परिघापर्यंत चुंबकीय क्षेत्र कमी परिणामी होते. गुरुत्वाकर्षणाचे बलही याच प्रकारे मधल्या भागात वाढत असून बाहेर कमी होत होते. तेल सापडण्याची शक्यता नसल्याने पेमेक्सने येथील काम थांबवले होते.

हिल्डब्रॅन्डने या सर्व गोष्टींचा अभ्यास केला व त्याला असे वाटू लागले की तो शोधत असलेले आघात विवर हेच असावे. पेमेक्सकंपनीने खणलेल्या तेल विहिरीतील खनिज नमुने तपासल्यावर त्याच्या लक्षात आले की अर्धवर्तुळाच्या बाहेरील खनिज नमुन्यांच्यात 1500 मीटर खोलीवर तुटक्या फुटक्या दगडांच्यात 1 सें.मी. आकारापर्यंत हादरलेले स्फ़टिक सापडत होते. तर अर्धवर्तुळाच्या आतील विहिरींतून काढलेल्या खनिजात 1200 ते 1300 मीटर खोलीवर गोल व पाण्याच्या थेंबाच्या आकाराचे काचेचे मणी व हादरलेले स्फटिक हे दोन्ही मिळत होते. हे खनिज नमुने तपासल्यावर हिल्डब्रॅन्डया निष्क़र्षावर आला की क्रेटेशसयुगान्त करणाऱ्या धूमकेतूचे पृथ्वीचरील आघात स्थल हेच विवर होते. या वर्तुळाच्या मध्यावर असलेल्या चिक्षूल्यूबया गावाचे नाव त्याने या विवराला दिले व आपला शोधनिबंध नेचरया मासिकाकडे पाठवून दिला. या मासिकाने हा लेख छापण्याचे नाकारल्याने हिल्डब्रॅन्डने हा लेख जिऑलॉजीया दुसऱ्या शास्त्रीय मासिकाकडे पाठवला व त्यांनी तो सप्टेंबर 1991 च्या अंकात छापला. एका विद्यार्थ्याने लावलेला हा शोध बऱ्याच ज्येष्ठ भूगर्भशास्त्रज्ञांना प्रथम मान्य झाला नाही पण या नंतर अनेक शास्त्रज्ञांच्या गटांनी खनिज नमुने तपासून व परत पहाण्या करून हिल्डब्रॅन्डच्या शोधाला मान्यता दिली. आता बहुतांशी शास्त्रज्ञ चिक्षूल्यूब विवर हेच क्रेटेशसयुगान्ताचे कारण ठरलेल्या धूमकेतूचे आघात स्थल आहे हे मान्य करतात.

क्रेटेशसचा युगान्त करणारे आघात विवर सापडल्यावर साहजिकच शास्तज्ञांचे लक्ष साडेसहा कोटी वर्षांपूर्वी झालेल्या या धूमकेतू आघाताच्या परिणामांकडे वळले. या धूमकेतूने चिक्षूल्यूबवर घणाघात घातल्यावर पृथ्वीवर काय घडले असावे याची कल्पना आता आपल्याला आली आहे. पृथ्वीच्या पाठीवर पसरलेल्या के-टी मातीमधील इरिडियम धातूच्या एकूण वजनावरून हा धूमकेतू 10000 कोटी टन वजनाचा होता व तो साधारणपणे 20 कि.मी प्रती सेकंद या पेक्षा जास्त गतीने पृथ्वीकडे आला होता असे वाटते. या गतीने पृथ्वीकडे येताना त्याने आपल्या मार्गावर एक निर्वात पोकळी तयार केली होती. चिक्षूल्यूबत्यावेळी 100 ते 150 फूट पाण्याखाली होते. या पाण्याचे सेकंदाच्या एक शतांश एवढया कालात बाष्पीभवन होऊन धूमकेतू जमिनीत 10 कोटी अणू बॉम्ब्सच्या शक्तीसह घुसला होता. हवेत निर्माण झालेल्या या पोकळीमुळे तासाला 1000 कि.मी या वेगाचे वारे सुटून तेवढयाच अंतरावरील सर्व गोष्टी या वादळाने संपूर्ण जमीनदोस्त केल्या होत्या. तसेच समुद्रावर सुनामी लाटा तयार होऊन त्यांनी अमेरिका, आफ्रिका व युरोपच्या किनाऱ्यावर हाहाकार केला होता. या लाटांनी असंख्य प्राणी व वनस्पतींना नष्ट केले होते.

जमिनीत घुसलेल्या धूमकेतूने एवढी उष्णता निर्माण केली की धूमकेतू आणि आघात स्थलाची जमीन वितळून एक संपृक्त द्रव तयार झाला . हा द्रव पृष्ठभागावर येऊन, आधीच निर्माण झालेल्या निर्वात पोकळीत वेगाने वर खेचला गेला. धूमकेतू सरळ पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे न येता तिरपा म्हणजेच एक कोन करून आला. यामुळे हा द्रव बऱ्याच जास्त प्रमाणात हवेत फेकला गेला. द्रवाचे एकूण वस्तूमान, धूमकेतूच्या वजनाच्या 300 पट तरी होते. काही हजार सेल्सियस तपमान असलेल्या या द्रवाने थोडयाच कालात पृथ्वीभोवती एक आवरण तयार केले. द्रवातील घन पदार्थ जसजसे खाली येऊ लागले तसे त्यांनी सगळीकडे प्रचंड आगी लावण्यास सुरवात केली. यामुळे खालच्या जमिनीचे तपमान 400 डिग्री सेल्सस एवढे वाढून पृथ्वीवरील सर्व जीव सृष्टी भाजली जाऊन काळी ठिक्कर पडली . के-टी माती, सूक्ष्म दर्शक यंत्राखाली बघितल्यास कार्बन कण दिसतात. ते बहुदा याच जीव सृष्टीचे अवशेष असावेत. तसेच या मातीत जे काचेचे मणी दिसतात ते याच द्रवाला वरची हवा लगल्याने त्याचे जे घनीकरण झाले त्यामुळे निर्माण झाले. अनेक रासायनिक प्रक्रिया होऊन या द्रवात नत्राम्ल, सल्फ्युरिक़ आम्ल, तसेच निकेल, क्रोमियम, कोबाल्ट धातूंची विषारी संयुगे तयार झाली . या संयुगांनी विषारी पावसाचा भडिमार पृथ्वीवर केला. आणि सर्वात महत्वाचा परिणाम म्हणजे सूर्याचे पृथ्वीवर पडणारे किरण निदान दोन वर्षे तरी पूर्णपणे अडवले. यामुळे वनस्पतींची फोटो सिन्थेसिसची प्रक्रिया पूर्ण थांबून सर्व वनस्पती नष्ट झाल्या. परिणामी पृथ्वीवरील खाद्य-साखळी नष्ट होऊन सर्व जीव जंतू व प्राणीही नष्ट झाले . त्याच प्रमाणे सूर्य प्रकाश अडविला गेल्याने पृथ्वी एखाद्या प्रचंड शीत गृहाप्रमाणे होऊन तपमान –20 सेल्सस झाले.

या नंतर तपमान परत वाढून ते हजारो वर्षे तसेच राहिले. जीव सृष्टीची उत्क्रांती परत सुरू झाल्यावर हळू हळू पृथ्वीवरची परिस्थिती सर्वसामान्य होण्यास आणखी लाख वर्षे तरी लागली.

क्रेटेशस युगान्ताचे हे चित्र मोठे भयानक आणि विदारक आहे. परंतू सृष्टीचा संहार याच पध्दतीने झाला किंवा नाही या बाबतीत शास्त्रज्ञांच्यात अजून मतभेद आहेत. चिक्षूल्यूबधूमकेतूच्या आघात विवरासंबंधी जरी सर्वसाधारण एक वाक्यता असली तरी या आघातानेच पृथ्वीवरील जीव सृष्टी नष्ट झाली नसावी असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे. महाराष्ट्रात ज्वालमुखीचा उद्रेक होऊन दख:नचे पठार याच कालात निर्माण झाले होते. जीव सृष्ती नष्ट होण्याचे ते एक कारण असावे असे काही शास्त्रज्ञांना वाटते. तर काहींच्या मते डायनॉसॉरस ची खाद्य साखळी आधीच कमकुवत झाल्याने ते नष्ट होण्याचाच मार्गावरच या वेळेस होते.

सत्य काय आहे हे त्या काळरात्री आभाळाकडे दृष्टी लावून बसलेला एखादा टी-रेक्स डायनॉसॉरसच आपल्याला सांगू शकेल. पण ते शक्य नसल्यामुळे निरिक्षणावर आधारलेले अंदाज करणे एवढेच आपल्या हातात आहे.

21 फेब्रुवारी 2005

eys061eys07eys05

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

One thought on “एका युगान्ताच्या शोधात

  1. विकिपीडिया ला पुरून उरेल असा सॉलिड ब्लॉग आहे तुमचा..छान..

    माझ्या ब्लॉग वर छोटीशी नवी एंट्री केलीय..
    gnachiket.wordpress.com

    Posted by ngadre | फेब्रुवारी 17, 2009, 9:09 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: