.
Uncategorized

वाचनाचे वेड



एकोणिसशे पासष्टचा संपूर्ण उन्हाळा, काश्मीर खोऱ्यामधे घालविण्याची एक मोठी नामी संधी मला मिळाली. सैनिकी गणवेश न घातलेल्या भारतीय नागरिकांना जेथपर्यंत त्या काळात जाता येत असे त्या ,श्रीनगरच्या अगदी उत्तरेला असलेल्या, बारामुल्लापासून दक्षिणेकडे असलेल्या अनंतनागपर्यंत व पश्चिमेच्या खिलनमर्गपासून जोझिला खिंडी जवळ असलेल्या सोनमर्ग पर्यंत मनमुराद भटकंती आम्ही या काळात केली. बारामुल्ला गांवाजवळ, झेलम नदीच्या पात्राकडे पहाताना, ही नदी पुढे ज्या प्रदेशात वहात जाते तो मुझफ्फराबाद जवळचा भाग , गुलमर्ग , खिलनमर्गमधे पश्चिमेला दिसणारा टेकडयांचा भाग किंवा सोनमर्ग , कारगिलच्या उत्तरेला असलेले स्कार्डू. गिलगिट व हुंझा हे भाग अजूनही शत्रूच्या ताब्यात आहेत, ही गोष्ट आमचे वाटाडे वारंवार सांगत असत. लहानपणी केलेल्या वाचनात, अखंड भारताच्या सीमा ,दक्षिणेला सागरतीर, पश्चिमेला गांधार किंवा अफगाणिस्तान, उत्तरेला हिमालय आणि पूर्वेला सयाम देशापर्यंत असल्याचे वाचून मोठा अभिमान वाटत असे. त्या पार्श्वभूमीवर हे भू भाग आता शत्रूच्या ताब्यात आहेत या बद्दल एक मोठा विषाद त्या वेळी माझ्या मनाला वाटला होता. शिवाजी महाराजांच्या रोमहर्षक इतिहासावर पोसलेल्या माझ्या मनाला, हे सीमेपलीकडे राहणारे माझे देशबांधव, भारताची मदत घेऊन आपल्या खांद्यावरचे हे परकीय जोखड फेकून का देत नाहीत याचे आश्चर्यही वाटत राहिले होते.

असाच काहीसा अनुभव मला शिमल्या जवळच्या कुफरी या स्थानी पण आला होता. हे स्थान तसे बऱ्याच उंचीवर असल्याने येथून शेकडो मैलापर्यंत पसरलेल्या हिमालयाच्या पर्वत मालिकांवर दृष्टीक्षेप टाकता येतो. येथून ईशान्य दिशेकडे नजर टाकली तर नजर पोहोचेल तेथपर्यंत हिमालयाची उत्तुंग शिखरेच नजरेला येतात. येथेही आमच्या वाटाडयाने या दिशेला, आपली नजर पोचते त्याच्या पलीकडे, चीनने बळकविलेला भारताचा भू भाग येतो ही गोष्ट मुदाम सांगितली होती. येथेही ही गोष्ट मला मोठी विषादपूर्ण वाटली होती व भारत आपल्या सार्वभौमत्वावरचा हा घाला कसा सहन करू शकतो? हेही कळले नव्हते. भारताच्या उत्तरेला किंवा ईशान्येला असलेल्या या भू भागांबद्दल काहीतरी गूढ आकर्षण या वेळेपासून माझ्या मनात निर्माण झाले होते. आपली मराठी किंवा इंग्रजी वर्तमानपत्रे, नियतकालिके, यांत अधून मधून प्रसिध्द होणाऱ्या लेखांनी या अर्धवट ज्ञानाला चांगलेच खतपाणी घातले होते. हा सर्व भू भाग , शतकानुशतके भारताचाच अविभाज्य भाग होता व आपल्या शेजारी राष्ट्रांनी व ब्रिटिश लोकांनी संगनमत करून तो भारतापासून तोडून बळकावला आहे अशी माझी प्रामाणिक समजूत झाली होती.

कांही वर्षांपूर्वी, बी.बी.सी या दूरदर्शवाहिनीने, गिलगिट व हुंजा या पाकिस्तानच्या उत्तरेला असलेल्या भागांबद्दल तयार केलेला एक माहितीपट माझ्या पहाण्यात आला व गेली चाळीस वर्षे तरी मनात बाळगलेल्या या गूढ आकर्षणाला पहिला धक्का बसला. या माहितीपटात दाखविलेले हे प्रदेश पूर्णपणे दुसऱ्या कोणत्या तरी देशाचेच भाग वाटत होते. भारताच्या किंवा पाकिस्तानच्या इतर कोणत्याही प्रदेशांमधील माणसे, रितीरिवाज यांच्याशी मला त्यांचे सुतराम साम्य वाटले नाही. मध्य एशिया किंवा पूर्वीच्या रशियन संघराज्यांमधील लोकांशी या लोकांचे जास्त साम्य वाटत होते. संधी मिळाली की या भागांबद्दल जास्त माहिती मिळवायची असे मी ठरविले.

माझ्या लहानपणी पुणे एक महत्वाचे शैक्षणिक केंद्र होते. विविध शाखांमधील उच्च शिक्षण देणारी अनेक कॉलेजे पुण्यात होती व ती सर्व पुण्याची भूषणे मानली जात. यामुळे पुण्यात उत्तमोत्तम व विविध विषयांवरील पुस्तके सहजपणे उपलब्ध होत असत.जिमखान्यावरील इंटरनॅशनल किंवा डेक्कन बूक स्टॉल ही मोठी प्रसिध्द मानली जात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रुपया व डॉलर किंवा पौंड यांच्यातील विनिमयाचा दर चार रुपयाला डॉलर व दहा ते बारा रुपयाला पौंड एवढा मर्यादितच होता. त्यामुळे परदेशातून येणाऱ्या नवीन व उत्तमोत्तम पुस्तकांची किंमत खिशाला परवडणारी असे. समाजवादाच्या व अलिप्तपणाच्या पांघरूणात गुरफटत चाललेल्या या देशासाठी, जगात उघडणारी ही एकमेव खिडकी त्या वेळी होती. पानशेतच्या पुरानंतर या प्रसिध्द दुकानांची रयाच गेली. व नंतर समाजवादाच्या नादाला लागलेल्या राज्यकर्त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेचे पूर्ण दिवाळे वाजवले व रुपयाची किंमत एवढी घसरली की सर्व सामान्य माणसाला साधी पेपरबॅक पुस्तकेही विकत घेणे अशक्य झाले. त्यामुळे वर्तमानपत्रे व नियतकालिके यांशिवाय इतर काही वाचन करणेही अशक्य प्राय झाले. पुस्तकांची ही जगात उघडणारी खिडकी बंद झाल्याने भारताबाहेर काय चालले आहे याची, सर्व सामान्यांना माहिती होणेही कठिण झाले. काही वर्षांपूर्वी आकाश व तारे दर्शनासंबंधी कांही पुस्तक मिळते आहे का यासाठी मी पुण्यातल्या मेन स्ट्रीट पासून डेक्कन ते अप्पा बळवंत चौक या परिसरातील दुकाने पालथी घातली होती. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढी पुस्तके सुध्दा मला सापडली नव्हती. व यापैकी माझ्या खिशाला परवडणारी पुस्तके अत्यंत रद्दी गुणवत्तेची होती. अशा परिस्थितीत, पुण्यामधे मला ज्या विषयांत रस वाटतो त्या विषयासंबंधी काही वाचन करता येईल अशी आशा करणे सुध्दा व्यर्थ होते.

पुढच्या परदेश वारीला, स्थिरस्थावर झाल्याबरोबर मी तिथल्या वाचनालयाचा दौरा केला व अफगाणिस्तान, मध्य एशिया , रशियन साम्राज्यवाद, आणि ब्रिटिश -रशियन संबंध यांची पुस्तके घरी आणून वाचण्याचा सपाटाच लावला. PETER HOPKIRK या लेखकाचे ‘THE GREAT GAME’ हे पुस्तक मी एका सपाटयात वाचून काढले. या सर्व वाचना नंतर या सर्व प्रदेशांचा भूगोल व इतिहास या संबंधीचे आपले ज्ञान किती अपुरे व अर्धवट होते किंवा आपले अज्ञान किती पूर्ण होते याची जाणीव मला झाली.

ब्रिटिश राज्यकर्त्यांना, रशियन साम्राज्याच्या भारतातील संभाव्य आक्रमणाची, अक्षरश: वेडयासारखी दहशत होती व भारताची उत्तर सीमा, त्यांनी ही एकच भिती मनात ठेवून, आखली होती. ही उत्तर सीमा आरेखताना त्यांनी त्या प्रदेशांचा इतिहास व भूगोल याचा काहीही विचार केला नव्हता. राणीच्या मुगुटामधले सर्वोत्तम रत्न असलेल्या भारतात रशियन साम्राज्य येऊ नये या एकाच कारणांसाठी त्यांनी या दोन साम्राज्यांच्या मधे एक BUFFER STATE पाहिजे म्हणून दोन वेळा प्रचंड हानी सोसून अफगाणिस्तान मध्ये युध्द केले होते व ताजिकी, उझबेक आणि इराणी या सारख्या पूर्णपणे भिन्न वंशाच्या लोकांची एकत्र मोट बांधून त्या देशाची निर्मिती करून घेतली होती. ब्रिटिश साम्राज्याचे, रशियन साम्राज्यवादापासून सैनिकी संरक्षण करता यावे याच हेतूने या सीमा रेखा आखल्याने भारत व रशिया यांच्यामधे वाखन कॉरिडॉर नावाचा, दहा ते चाळीस मैल रूंद व दोनशे ते तीनशे मैल लांब असा एक विचित्र पट्टा निर्माण केला गेला होता. या प्रदेशातल्या लोकांचा वंश, प्रादेशिक एकजिनसीपणा वगैरे गोष्टी विचारात घेण्याची ब्रिटिशांना कधी गरजच पडली नव्हती. याच सीमा रेषा नंतर स्वतंत्र भारताच्या झाल्या होत्या व त्यांचे संरक्षण करणे म्हणूनच आपल्याला एवढे कठिण जात होते. श्रीनगरच्या उत्तरेला असलेल्या गिलगीट किंवा हुंझा या प्रदेशातल्या किंवा उत्तर पूर्वेला असलेल्या यारकंड, शिनजिआंग या भागातल्या लोकांचे भारतातील लोकांशी कुठलेच साधर्म्य कधीच नव्हते.व म्हणूनच भारतापासून फारकत झाल्याचे फारसे दुख: त्यांना कधी वाटले नसावे.

भारताच्या सीमा किंवा त्यांचा इतिहास हा काही या लेखाचा विषय नाही पण पुण्यासारख्या सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या शहरात रहाणाऱ्याला सुध्दा कोणतीही खरी माहिती मिळवणे किती कठिण आहे व लहानपणी केलेल्या वाचनातून खऱ्या परिस्थितीचे आकलन न होता मनात काहीतरी चुकीचे संदर्भ कसे रहातात व या संदर्भावरून केलेल्या कल्पना प्रत्यक्ष परिस्थितीपेक्षा किती निराळया असतात याचे हे एक उदाहरण आहे.

कोणत्याही प्रगत राष्ट्र्ामधे, माहिती मिळविण्याचा हक्क हा अत्यंत महत्वाचा मानला जातो. राज्यकर्ते हा हक्क दडपण्याचा प्रयत्न करत नाहीत ना याकडे त्या राष्ट्र्ातले सर्व सुजाण नागरिक व वर्तमान पत्रे यांचे बारीक लक्ष असते. भारताच्या राज्यघटनेने सुध्दा हा हक्क भारतीय नागरिकांना प्रदान केलेला आहे. परंतु भारतात या हक्काचे स्वरूप, मुख्यत: सरकार कडून हवी ती माहिती मिळवणे एवढयापुरतेच मर्यादित राहिलेले आहे. आपल्या देशांतील नागरिकांना, देशांतर्गत व देशाबाहेर घडलेल्या कोणत्याही घटनेबद्दल संपूर्ण व निष्पक्षपाती माहिती मिळावी यासाठी हे प्रगत देश खूपच प्रयत्न करतात. अशी माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचा एक महत्वाचा मार्ग म्हणजे सर्व विषयांवरची, निरनिराळया देशांतील लोकांनी, लिहिलेली पुस्तके नागरिकांना वाचनासाठी उपलब्ध करून देणे हा आहे. यासाठी हे प्रगत देश खूपच प्रयत्न करतात असे दिसते.

काही वर्षांपूर्वी आपल्या देशाने पोखरणमधे अणू स्फोट चाचण्या केल्या. देशाच्या दृष्टीने असलेल्या या अत्यंत महत्वाच्या घटनेबद्दल, माझ्या सारख्या सर्व सामान्यांना, जर जास्त माहिती करून घ्यावीशी वाटली तर त्यांनी ती कशी करून घ्यावी? मी या प्रश्नावर बराच विचार केला व माझ्या असे लक्षात आले की अशी माहिती करून घेणे फारच अवघड आहे. सरकारने कदाचित काही माहिती प्रसिध्द केली असण्याची शक्यता आहे. पण सर्व सामान्य नागरिकाला ही माहिती मिळवायची म्हणजे हे प्रकाशन विकत घेण्याशिवय दुसरा पर्याय दिसत नाही. जरी हे प्रकाशन मी विकत घेण्याचे ठरविले तरी ते कोठून मिळवावे ? हे तरी मला कुठे माहिती आहे! मग दुसरा मार्ग म्हणजे वर्तमान पत्रे किंवा नियतकालिके यांत प्रसिध्द झालेली या विषयाची माहिती मिळविणे. यासाठी या पत्रांचे जुने अंक बघावयास मिळायला पाहीजेत व विषयवार असलेली संदर्भ सूची उपलब्ध पाहीजे. पुण्यातील नागरिकांसाठी अशी माहिती कुठे उपलब्ध असेल अशी चौकशी मी बऱ्याच लोकांकडे केली. काही जणांनी पुणे नगर वाचन मंदिरात ही माहिती मिळेल असे मत दिले.पण या संस्थेची एकंदर दुर्दशा पाहताना या संस्थेची फारशी मदत होईल अशी आशा वाटली नाही. गंमतीची गोष्ट म्हणजे अमेरिकेतील एका छोटया गावामधील सार्वजनीक वाचनालयात मला या विषयावर दोन ग्रंथ सापडले. यापैकी एक ग्रंथ बावीसशे पृष्ठांचा होता व त्यात भारतीय शास्त्रज्ञांनी प्रसिध्द केलेली शास्त्रीय माहिती होतीच पण या शिवाय, भारतीय शास्त्रज्ञांनी केलेले दावे कितपत सत्य असावेत या बद्दल इतर देशातले शास्त्रज्ञ व राजकारणी यांनी दिलेली मतेही मोठी वाचनीय वाटली. अशी अनेक उदाहरणे देणे शक्य आहे. पण स्वत:ला अत्यंत प्रगत राज्य असे म्हणवून घेणाऱ्या, महाराष्ट्राच्या सांस्कृतीक राजधानीत रहाणाऱ्याची जर ही अवस्था असली तर छोटी गावे , खेडेगावे, यामधे काय परिस्थिती असेल याची कल्पना सुध्दा न केलेली बरी. सर्व सामान्य नागरिकाला जेथे प्रवेश मिळेल अशा वाचनालयांचा संपूर्ण अभाव हे या परिस्थितीचे मूळ कारण आहे. पुण्यासारख्या चाळीस ते पन्नास लाख लोकसंख्येच्या शहरात एक ब्रिटिश कौन्सिलचे वाचनालय सोडले तर दुसरे कोणतेही चांगले वाचनालय नाही यावर विश्वास बसणेही कठिण आहे. पण ही वस्तुस्थिती आहे.

अगदी बालवयातच मला वाचनाचे जबरदस्त वेड लागले. याचे प्रमुख कारण म्हणजे माझी आई. ती कोठेही बाहेर गेली व तिला एखादे चांगले पुस्तक दिसले तर ती ते माझ्या साठी खरेदी करी. माझा वाचनाचा वेग चांगलाच असल्याने त्या पुस्तकाचा फडशा पडण्यास फारसा अवधी लागत नसे. शिवाजीच्या गोष्टी, टारझन, भा.रा भागवतांनी केलेली बाल वाड़मयाची भाषांतरे अशी अनेक पुस्तके आईने माझ्यासाठी आणली होती. सुशील परभृत या नावाने लेखन करणाऱ्या एका लेखकाने उत्तमोत्तम इंग्रजी कादंबऱ्यांचे व कथांचे मोठे सुरस अनुवाद केले आहेत. आता ही पुस्तके उपलब्ध आहेत की नाहीत ते माहित नाही, पण या अनुवादांमुळे अभिजात इंग्रजी साहित्याशी माझी चांगलीच तोंडओळख झाली .थोडा मोठा झाल्यावर, माझ्या सुदैवाने बाल वयात मला एक चांगले वाचनालय उपलब्ध झाले. या वाचनालयात मी विपुल वाचन केले. मराठी शाळेत असताना उन्हाळयाच्या सुट्टीमधे मी हिंगण्याला जाऊन रहात असे. तिथे असलेल्या शाळेचे वाचनालय हे माझे सुट्टीमधले प्रमुख आकर्षण होते. या वाचनालयात मी खूप मराठी पुस्तके वाचली. नाथमाधव व ह्.ना. आपटे यांच्या कादंबऱ्यांपासून अभिजात इंग्रजी वाड़मयाची कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी केलेली भाषांतरे मी वाचली. आयव्हॅनो . टॉम सॉयर किंवा रॉबिन हूड च्या साहस कथा वाचल्या. पुढे इंजिनियरिंग कॉलेजात गेल्यावर आमच्या बंगळूरच्या इन्स्टिटयूटची जिमखाना लायब्ररी हे माझे आवडते स्थान होते. या वाचनालयात मी सबंध वुडहाऊस वाचला. हाऊ ग्रीन वॉज माय व्हॅली, अंकल टॉम्स केबिन किंवा मारी करेलीचे व्हेन्डेट्टा, दॅफने दु मारी च्या कादंबऱ्या ,ऍगाथा ख्रिस्तीच्या भितीकथा, कितीतरी नावे घेता येतील. अशी अनेक अभिजात इंग्रजी पुस्तके वाचण्याची संधी मला मिळाली. पण पुढे शिक्षण संपल्यावर कामाच्या रामरगाडयात पुस्तके वाचायला फारसा वेळ मिळाला नाही ही गोष्ट खरी आणि मुख्य अडचण म्हणजे किंमती अशक्य पातळीला भिडल्याने पुस्तके विकत घेण्याची आर्थिक कुवतच उरली नव्हती.

माझ्या आधीच्या पिढीत स्वत:चा वैयक्तिक पुस्तक संग्रह खूप लोक करीत. प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ श्री. धनंजयराव गाडगीळ, इरावतीबाई कर्वे यांची स्वत:ची वाचनालये त्यांच्या घरी असत. माझ्या आजोबांनीही खूप मोठा ग्रंथ संग्रह केला होता. खूप आवड होती तरीही स्वत:चा ग्रंथ संग्रह करणे मात्र मला आर्थिक कारणांनी कधीच जमले नाही.आता पुस्तके वाचण्यासाठी माझ्याजवळ भरपूर वेळ आहे आणि थोडी फार काम होईना आर्थिक कुवतही आहे. पण दुर्दैव असे की मला ज्या विषयांच्यात रस आहे त्या विषयांची पुस्तकेच पुण्यात उपलब्ध नाहीत. परदेशात गेले की पुण्यातली ही उणीव फारच जाणवते. असे म्हणतात की पुणे विद्यापीठाचे वाचनालय खूपच चांगले आहे पण सर्व सामान्य नागरिकाला तिथे मुक्तद्वार नाही.

उत्तर अमेरिकेमधल्या कोणत्याही लहान मोठया गावात सार्वजनिक वाचनालय हे असतेच. या देशाच्या सांस्कृतिक व शैक्षणिक जडण घडणीत या वाचनालयांचा मोठा वाटा आहे. आपल्या गावातील रहिवाश्यांना उत्तमोत्तम अशी जगभरची पुस्तके उपलब्ध व्हावीत या साठी या गावांची टाऊन कौन्सिल्स किंवा शहरांच्या नगरपालिका खूपच जागरूक असतात. तुम्ही त्या गावचे रहिवाशी किंवा त्यांच्याकडे आलेले पाहुणे आहात एवढी ओळख पटवून, एकदा या वाचनालयाचे सभासद झालात की हे ग्रंथ भांडार तुमच्या साठी खुले होते. ही पुस्तके तुम्ही वाचनालयातही वाचू शकता किंवा घरी ही नेऊ शकता. त्यासाठी वेगळी अनामत रक्कम भरा वगैरे कटकटी येथे नसतात. माझ्या सारख्या वाचन वेडयाला तर या वाचनालयात जाणे म्हणजे एक पर्वणीच वाटे. पुस्तकांच्या व विषयांच्या निवडीला येथे एवढा प्रचंड वाव असे की प्रथम काय वाचावे याबद्दलच माझ्या मनात संभ्रम निर्माण होई. पांच सहा तासांचा निवांत वेळ ठेवून मी या वाचनालयांत जात असे. पन्नास लाख लोकसंख्या असलेल्या पुणे शहरात सबंध शहर ढुंढाळून मला खगोलशास्त्रावर, हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच पुस्तके दिसली होती. पण या लहानश्या गावातल्या सार्वजनिक वाचनालयात या विषयावर दोन कपाटे भरून पुस्तके आहेत हे बघितल्यावर मला वेड लागल्यासारखेच झाले. मग मी एक युक्ती योजली. वाचनालयात फेरफटका मारत रहायचे. एखादे पुस्तक वाचावेसे वाटले तर ते बघायचे. व मग तशीच आणखी पुस्तके शोधायची. एका परदेशवारीत मी गॅलिलिओ पासून सुरवात करून न्यूटन, मदाम क्यूरी ते शेवटी फेनमन पर्यंतच्या शास्त्रज्ञांची चरित्रेच वाचून काढली. पृथ्वीतलावर मानववंश कसा पसरत गेला या विषयावरची खूप पुस्तके मी एकदा एका पाठोपाठ वाचून काढली. सूक्ष्म कण भौतिकी (Particle Physics) , वैश्विक भौतिकी (Cosmic Physics) या विषयावरची पुस्तके वाचली. पाकिस्तानची निर्मिती, भारताची फाळणी वगैरे विषय तर वाचनात असतच.

या वाचनालयांचे स्वरूप मोठे लोभसवाणे असते. आत शिरल्या बरोबर तुमचे प्रथम लक्ष वेधून घेते ती संदर्भ सूची अंतर्भूत करून ठेवलेल्या संगणकांची रांग. या शिवाय मायक्रो फिल्म रीडर्स, झेरॉक्स यंत्रे वगैरे दिमतीला असतातच. ही यंत्रे असली तरी तुम्हाला वैयक्तीक रित्या हव्या असलेल्या पुस्तकांबद्दल किंवा संदर्भाबद्दल चौकशी करायची असली तर वाचनालयाचा सेवक वर्ग तुमच्या मदतीला हजर असतोच. तुम्हाला सुखद रित्या वाचन करता यावे म्हणून आसन व्यवस्था तर अतिशय आरामदायी असतेच पण आतील वातावरणही वातानुकुल यंत्रणेने मोठे सुखकर राखले जाते. मोठया माणसांच्यापेक्षा जास्त बडदास्त राखली जाते ती बाल गोपाल वाचकांची. छोटया उंचीची बूक शेल्फ, छोटया छोटया खर्ुच्या या बाल-वाचकांसाठी तयार असतात. माझी साडे तीन वर्षे वयाची नात सुध्दा तिला हवी असलेली गोष्टींची पुस्तके बूक शेल्फ मधून निवडून आपल्या वडिलांकडे देत असे. पुस्तके वाचण्याचा तुम्हाला कंटाळा आला असला तर दुसऱ्या विभागात जाऊन तुम्ही संगीत किंवा दुसऱ्या अनेक प्रकारच्या सी.डी निवडू शकता किंवा चित्रफिती किंवा चित्र तबकडयाही निवडू शकता.

एखाद्या विशिष्ट व्यक्ती किंवा विषयाबद्दल तुम्हाला संदर्भ हवा असेल तर वाचनालयाचा संदर्भ विभाग तयार असतोच. या बाबतीतला माझा एक अनुभव मोठा सांगण्यासारखा आहे. माझी पणजी , श्रीमती पार्वतीबाई आठवले या 1918 साली अमेरिकेला, गुरूवर्य अण्णासाहेब कर्वे यांच्या सूचनेवरून, गेल्या होत्या. त्यांचा हा प्रवास, इंग्रजीतून सभाचातुर्य मिळविणे व संस्थेसाठी धन गोळा करणे यासाठी आयोजित केला होता. त्यांच्या अमेरिकेतील वास्तव्यात, श्री ओरायली नावाच्या एक विदुषी त्यांना भेटल्या. पार्वतीबाईंच्या मनावर , अण्णासाहेब कर्व्यांच्या खालोखाल या ओरायली बाईंच्या विचारांचा परिणाम झाला होता. असे असले तरी त्यांच्या आत्मवृत्तात, श्रीमती ओरायली बद्दलचा मजकूर मला फारच त्रोटक वाटला होता. अमेरिकेतील वाचनालयात या श्रीमती ओरायली बद्दल काही माहिती मिळते का? हे बघण्याचे मी ठरविले. The Great American Women नावाच्या संदर्भ ग्रंथांची मालिका त्या वाचनालयात मला आढळली. त्या संदर्भ ग्रंथात सापडलेल्या, श्रीमती लिओनारा ओरायली या बाईंचे एकूण कार्य ,वसती स्थान वगैरे मला माझ्या पणजीच्या अत्मचरित्रातील ओरायली बाईंशी जुळते असे वाटले.

म्हणून मी या लिओनाराबाईंच्या चरित्राबद्दल असलेले आणखी संदर्भ शोधण्यास सुरवात केली. एका संदर्भग्रंथात मला श्रीमती ओरायली यांचे त्रोटक चरित्र सापडले. या चरित्रात ओरायली बाईंच्या शिष्या म्हणून मी माझ्या पणजीचे नाव जेंव्हा बघितले तेंव्हा मात्र मी खरोखरच आश्रर्यचकीत झालो. याच चरित्रात माझी पणजी लिओनाराबाईंबरोबर त्यांच्या घरी किती वर्षे राहिली ? कुठे राहिली? वगैरे गोष्टी पण नमूद करून ठेवलेल्या मी बघितल्या. बोस्टन या शहरात श्लेजेंजर लायब्ररी म्हणून एक वाचनालय आहे. तिथे लिओनारा बाईंचे सर्व कागदपत्र जपून ठेवले आहेत हेही समजले. हे कागदपत्र काय आहेत यांची सूची बघताना त्यात माझ्या पणजीचा लिओनाराबाईंबरोबरचा पत्रव्यवहारही जतन करून ठेवला आहे हे समजल्यावर मला आश्रर्याने तोंडात बोट घालावेसेच वाटले. अमेरिकन लोकांच्या संदर्भ जपून ठेवण्याच्या वृत्तीला कुठे तोड असेल असे वाटत नाही.

अमेरिकेतील वाचनालयात पुस्तकांच्या बरोबरच जगभरची नियतकालिके व वर्तमानपत्रे यांचा पण संग्रह असतो. भारतातील, बिझिनेस इंडिया, इंडिया टुडे य शिवाय टाइम्स ऑफ इंडियाचे अंकही मी वाचत असे. माझ्या विद्यार्थीदशेत, माझे आजोबा नियमितपणे वाचत असल्याने आमच्या घरी येणारे व माझ्याही नजरेखालून जाणारे,Sky & Telescope d Scientific American चे अंक मला खूप वर्षांनंतर बघायला मिळाले व एखादा जुना मित्र भेटल्यासारखे वाटले.

अमेरिकेतील वाचनालये एवढी संपन्न असण्याचे श्रेय, त्या देशाची श्रीमंती व गेल्या दोन तीन शतकांचा सांस्कृतिक वारसा यांना कदाचित देता येईल. पण सिंगापूरसारख्या गेल्या चाळीस वर्षांत नावारूपाला आलेल्या देशाने वाचनालयाचे जे जाळे उभारले आहे त्याचे श्रेय कशाला द्यावयाचे? जेमतेम चाळीस मैल लांबी रुंदी असलेल्या या देशाने तीन मोठी विभागीय वाचनालये व प्रत्येक पेठेचे स्वतंत्र वाचनालय असे जाळेच उभारले आहे. कोणीही नागरिक कुठल्याही वाचनालयात जाऊ शकतो. पुस्तके घरी घेऊन जाऊ शकतो आणि दुसऱ्याच कोणत्याही वाचनालयात ती परत करू शकतो. अफगाणिस्तान, मध्य एशिया बद्दल खूप वाचन मी या वाचनालयात केले. अनेक नव नवीन विषय बघायला मिळाले. भूगर्भशास्त्र, जीवाष्मशास्त्र या सारख्या विषयांबद्दल पुस्तके मला या वाचनालयातच सापडली.

ही वाचनालये बघितली की पुण्यासारख्या मोठया शहरात सुध्दा, सर्व सामान्यांसाठी एकही वाचनालय असू नये याचे फार वाईट वाटते. अलीकडे गल्ली बोळांच्या कोपऱ्यावर वाचनालय असे नाव दिलेल्या केशरी रंगाच्या टपऱ्या महानगरपालिकेने उभारल्या आहेत. पण त्यात वाचन करताना काही कोणी दिसत नाही. फेरीवाले व रिकामटेकडे यांना दिवसा टाइम पास करण्याची जागा व भिकाऱ्यांना रात्र घालविण्याची जागा एवढाच त्याचा उपयोग दिसतो. ही काही मला अभिप्रेत असलेली वाचनालये नव्हेत. कारण या टपऱ्यांत वाचन करण्यासाठी पुस्तकेच नाहीत आणि भर रहदारीत, रस्त्यावर बसून कोणी वाचन कसे करू शकेल? त्याला मनाला शान्ती वाटेल अशी जागा नको का?. पुण्याच्या पुस्तक प्रकाशनाच्या धंद्यात असलेले एक परिचित एकदा मला म्हणाले होते की पुण्यातल्या पुस्तकांच्या धंद्यापैकी नव्वद टक्के धंदा हा शालेय पुस्तके व मार्गदर्शक (Guides) यांचा आहे. त्यामुळे बाकीच्या पुस्तकांना कोण विचारतो? या कारणामुळे पुण्यात पुस्तके विकतही मिळत नाहीत. मिळाली तर परवडत नाहीत. आणि वाचनालये नसल्याने वाचायलाही मिळत नाहीत. याचा परिणाम नव्या पिढीवर जरूरच होत असला पाहिजे. आपल्या श्रध्दास्थाना बद्दल एखाद्या अभ्यासकाने त्याचे उलट सुलट विचार मांडले तर पुरावे देऊन त्या विचारांचे खंडन करण्याऐवजी आम्ही गुंडागर्दी करून मोड तोड , जाळ पोळ अशा स्वरूपाचे उत्तर देतो. अत्यंत संकुचित असलेल्या स्वत:च्या दृष्टीकोनामुळे, नवीन विचारांची सुध्दा मग भिती वाटू लागते. वाचनालयांचे जाळे उभारण्यास खरे म्हणजे पर्यायच नाही.

25 जून 2005

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “वाचनाचे वेड

  1. एकदम मान्य. पुण्यात असताना पुमग्र आणि ब्रिटीश कौन्सिल चा सभासद होतो ५-६ वर्षे. दोघांमधला फरक तर सांगायची खरंच गरज नाही. पुणे सोडण्यापूर्वी काही नामांकित प्रकाशकांच्या सान्निध्यात होतो १-२ वर्षे.. त्या चर्चांमधून जे जाणवले ते अतिशय निराशावादी आहे. काही बुजुर्ग आणि मोठे लेखक पण परिचयाचे झाले होते. त्यांच्याशी चर्चा करताना तर अजूनच काळ्या बाजू समोर आल्या. एकुणात चित्र चांगले नाही. अमेरिकेत आल्यावर ज्या ठिकाणी सध्या राहत आहे ते तर छोटेसे खेडेगावाच आहे पण तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणेच अतिशय उत्कृष्ट अशी व्यवस्था आहे. अजून एक प्रश्न मनात येतो तो म्हणजे जालावरचे मराठीचे अस्तित्व. आजकाल अनेक उत्तमोत्तम इंग्रजी पुस्तके आणि संदर्भ ग्रंथ पटापट मिळतात पण मराठी साहित्याचे अस्तित्व नाममात्र आहे. जरा एक्स्ट्रापोलेट करायचे म्हटले तर तशीच स्थिती सार्वजनिक मैदाने आणि बागांविषयीही आहे.

    Posted by Nikhil Sheth | जून 30, 2010, 9:54 pm
    • निखिल

      हा लेख खरे म्हणजे मी 7-8 वर्षांपूर्वी लिहिला होता. त्या वेळी अमेरिकेत वास्तव्य असल्याने मला तेथील ग्रंथालयांचे कामकाज अगदी जवळून बघता आले होते. अर्थात आजही पुण्यातली पुस्तकांच्या बाबतीतली परिस्थिती तशीच आहे. सर्व सामान्य वाचकांना पुस्तके वाचायला मिळू शकतील असे एकच ग्रंथालय, ब्रिटिश कौ न्सिलचे , अजुनही आहे. जालावरची परिस्थिती मात्र बरीच सुधारली आहे. Digital Library of India मुळे बरीच जुनी जुनी मराठी पुस्तके उपलब्ध झाली आहेत. सार्वजनिक बागा आणि उद्याने म्हणाल तर आता पुण्यात बरीच झाली आहेत. परंतु आपल्याकडे लोकांची सार्वजनिक जागा कचरा टाकून घाण करण्याची जी सवय आहे ती गेल्याशिवाय या जागांचा उपरोग करणे शक्यच नाही. प्रतिसादाबद्दल आभार.

      Posted by chandrashekhara | जुलै 1, 2010, 9:00 सकाळी

यावर आपले मत नोंदवा

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 396 other subscribers
MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात