.
ऋतुरंग

ग्रीष्मरंग


वर्षामधला कोणता ऋतु तुम्हाला सर्वात आवडतो ? असा प्रश्न जर चारचौघांना विचारला तर नक्कीच निरनिराळी उत्तरे मिळतील. धो धो पाउस पडतो आहे . आकाश निळया जांभळया रंगाने झाकोळले आहे. हवेत एक ओला गारठा जाणवतो आहे आणि नजर फिरवावी तिकडे हिरवाई दिसते आहे. असे दृष्य डोळयासमोर आणून कोणी आपल्याला वर्षा ऋतु सर्वात पसंत असल्याचे सांगेल. तर कोणाला बालकवींनी वर्णन केलेले हिरवे हिरवे गार गालीचे व झुळू झुळू वाहणारे निर्झर आठवतील, ऊन पाऊस आठवेल व ते श्रावणाला आपली पसंती देतील. एखाद्याला ,शरदाच्या रात्रीचे शुभ्र चांदणे व थंडीची चाहुल लागेल इतपतच जाणवणारा सुखद गारवाच सर्वात प्रिय असेल. तर पानगळीच्या शिशिरात रात्रीच्या वेळी शेकोटी पेटवून , त्याच्या बाजूला पांघरुणात गुरफटत , गप्पा मारत बसण्याचेही , कदाचित कोणाचे स्वप्न असेल. वसंतात फुललेल्या ,फुलांच्या बहराची तुलना दुसऱ्या कशाशीच होणार नाही असेही मत काही निसर्ग प्रेमी देतील. पण एक गोष्ट मात्र नक्की की ,आम्हाला ग्रीष्मऋतु आवडतो असे सांगणारे महाभाग भारतवर्षात तरी सापडणे कटीणच.

ग्रीष्माचे नुसते नाव काढले तरी तेंव्हा होणारी अंगाची लाही लाही, घशाला पडणारी कोरड, घामाच्या धारांचा चिकचिकाट व रात्री असह्य गरमीमुळे झोपेच्या अभावी होणारी तळमळ आठवते . ग्रीष्माइतका अप्रिय असा दुसरा ऋतु नाही. माझा एक मित्र तर आता सव्वीस दिवस झाले म्हणजे चौतीस उरले.असे ग्रीष्माचे दिवस अक्षरश: मोजतो. हे मात्र खरे की बहुतेकांची ग्रीष्माबद्दलची प्रतिक्रिया एवढया टोकाची जरी नसली तरी आषाढाच्या प्रथम दिनी आकाशात जमा होणाऱ्या मेघमाला , त्यांनाही , कालीदासाच्या यक्षाला होत्या तेवढयाच , प्रिय असतात.

गंमतीची गोष्ट म्हणजे हाच प्रश्न जर आपण उत्तर अमेरिकेत राहणाऱ्या कोणाला विचारला तर उत्तर अगदी उलट येईल. किंबहुना हा प्रश्न विचारणारा जरासा अल्पबुध्दीचा वगैरे तर नाही ना ! असाही काहीसा भाव त्यांच्या डोळयात तरळून जाईल व शंभरातले नव्वद लोक तरी ग्रीष्म ऋतुलाच आपली प्रथम पसंती देतील. एक अशी आख्यायिका आहे की बिरबलाला एकदा , अकबर बादशहाने , सत्तावीस वजा नऊ म्हणजे किती ? असा प्रश्न विचारला होता. बिरबलाने ,वर्षाच्या सत्तावीस नक्षत्रांपैकी , पावसाची नऊ नक्षत्रे काढून टाकली तर बाकी काहीच महत्वाचे उरत नसल्याने, या प्रश्नाचे उत्तर शून्य असे दिले होते . याच धर्तीवर उत्तर अमेरिकावासियांच्या वर्षातला ग्रीष्मऋतु काढून टाकला तर बाकी काही उरतच नाही. ग्रीष्मऋतुच्या महिन्यांच्यात या लोकांच्या उत्साहाला अक्षरश: उधाण येते. सहली, रानावनातील भटकंती, जलक्रीडा, समुद्र किनाऱ्यावरची सुट्टी, गाण्याबजावण्याचे मोकळया हवेतील जलसे , कल्पनाच करता येणार नाही एवढया प्रमाणात ,ही मंडळी या कालात मौजमजा करतात. खरे म्हणजे एखाद्या देशाच्या रहिवाश्यांना, कोणता ऋतुकाल कसा भावतो ? हे त्या देशाच्या भूगोलावर बरेचसे अवलंबून असते. अगदी लहान मुलांच्या बडबड गीतातून सुध्दा हा फरक जाणवतो. आपल्या दृष्टीने पाऊस हा नेहमीच हवाहवासा असतो. म्हणूनच आपण येरे येरे पावसा तुला देईन पैसा असे म्हणतो. उत्तरेकडे राहणारी ही मंडळी Rain Rain go away असे म्हणत रहातात.त्यामुळेच आपल्याला नकोसा वाटणारा ग्रीष्म, उत्तरेकडच्या या लोकांना हवा हवासा वाटतो यात आश्चर्य काहीच नाही.

जगाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या म्हणजे दक्षिण पूर्व अशिया मधल्या, विषुव वृत्तीय प्रदेशात राहणाऱ्या लोकांना सुध्दा जर आपण हाच प्रश्न विचारला तर त्यांचे उत्तर आणखीनच निराळे असेल. अशीही शक्यता आहे की , ही मंडळी कदाचित ऋतुकाल म्हणजे काय असते बुवा ? ” अशी मूलभूत शंकाच प्रदर्शित करतील. वर्षातले बारा महिने चोवीस काल एकाच प्रकारचे म्हणजे उन्हाळी हवामान अनुभवणाऱ्या या लोकांना फक्त ग्रीष्मच माहिती असतो. थोडे कमी जास्त एवढाच काय तो फरक.

ग्रीष्म ऋतु म्हणजे एक अप्रिय विषय, त्याच्याबद्दल काय बोलायचे असेच काही आपल्याला म्हणता येणार नाही. या ऋतुलाही छटा आहेत , रंग आहेत. माझ्या , ग्रीष्म ऋतुबद्दलच्या , लहानपणीच्या आठवणी सुट्टीशीच जोडलेल्या असल्याने , नक्कीच अप्रिय नाहीत. आणि त्या वयात असलेल्या खेळण्याच्या नादात , उकाडा , घाम वगैरे फालतु गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ कोणाला होता आणि दिवसभर हुंदडल्यावर, झोप तर मेल्यासारखी लागत असल्याने तीही अडचण नव्हती. हे सगळे त्रास मोठेपणी सुरू झाले. उन्हाळा म्हटले की माझ्या डोळयासमोर प्रथम उभी राहते ती आमच्या घरासमोरची फुलांनी लगडलेली ,ऍकेशिया, जॅकरंडा , बहावा व स्पॅथोडिया वृक्षांची रांग. प्रख्यात लेखिका श्रीमती. इरावतीबाई कर्वे त्यावेळी आमच्या समोर रहात. त्यांना बागबगीच्याची बरीच आवड असल्याने , घराच्या शेजारी त्यांनी लावलेले हे वृक्ष उन्हाळयात नुसते बहरून जात. ऍकेशियाचे पांढरट गुलाबी , बहावाचे जर्द पिवळे, जॅकरंडाचे जांभळे व स्पॅथोडियाचे लालचुटुक दिसणारे फुलांचे घोस एक इंद्रधनुष्यच तयार करत.या सुमारास संध्याकाळी हमखास वादळवारे सुटे. व सकाळी उठून बघितले की रस्त्यावर एक सप्तरंगी सडाच पडलेला दिसे. स्पॅथोडियाच्या शेंगाही याच कालात तडकत. व रस्त्यावर पडलेले ,एखाद्या नावेसारखे दिसणारे हे शेंगाचे अर्धभाग ,फुलांच्या गालिच्यावर मोठे खुलून दिसत. पुढे म्युन्सिपालिटीच्या कोणी अती हुशार, रस्ता कामगाराने या झाडांच्या खाली डांबराची पिपे वितळवण्याचा कार्यक्रम सुरू केला व या सुंदर झाडांची मृत्युघंटाच वाजवली. मी नंतर बहावा आणि गुलमोहर यांचे वृक्ष लावून परिस्थिती थोडीफार पूर्ववत करण्याचा एक प्रयत्न करून बघितला पण ती जुनी मजा काही परत दिसली नाही.

पुण्याला जर ग्रीष्माची खरी मजा बघायची असली, तर सकाळी लवकर उठून , वेताळ टेकडीवर फिरायला जावे. पूर्णपणे निष्पर्ण अवस्थेत असलेल्या ,धूप व इतर वृक्षांच्या रांगा ,पहाटेच्या धूसर उजेडात एखाद्या महाशिल्पासारख्या दिसतात. आणि त्याच वेळी सूर्याचा लालभडक गोळा पूर्व दिशेला डोकावू लागला की एखाद्या सम्राटाच्या दरबारात तर आपण शिरलो नाहीना असे क्षण भर मनाला वाटून जाते. अर्थात हाच गोळा काही मिनिटातच, तप्त सुवर्णासारखा दिसू लागतो व फिरण्याची हौस आटोपती घेऊन घराकडेच परत फिरावे लागते.

पुण्याचा किंवा भारत देशातला ग्रीष्म कसा दमदार असतो. एखाद्या ख्याल गायकाने खर्जात स्वर लावावा तसा तो सुरवात करतो. प्रथम दुपारीच थोडा वेळ, तो तुम्हाला आपण आल्याची जाणीव करून देतो. मग हळू हळू त्याची आलापी व ताना सुरू होतात. सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंत तो तुम्हाला काहीच सुचू देत नाही. आणि शेवटी तराणा गावा तसा ढगांचा गडगडाट व विजांचा चमचमाट करून तो नाहीसा होतो. ही सर्व पेशकश पूर्ण होण्यासाठी सहज दोन महिन्याचा काल उलटावा लागतो. उत्तर अमेरिकेतला ग्रीष्म याच्या उलट , म्हणजे अगदी फुसफुशीत व उथळ वाटतो. संगीतातीलच उपमा द्यायची तर एखाद्या चित्रपट गीतासारखा तो वाटतो. आदल्या रात्री थंडगार असते. अगदी दुलई घेऊन झोपावे लागते. सकाळी बघावे तर बाहेर चांगलेच तापलेले असते. बाहेर बघू सुध्दा नये असे वाटत रहाते. हळू हळू तपमान वाढत जाते. संध्याकाळी चार , पाच च्या सुमारास ते शतक सुध्दा ओलांडते. रात्री मनस्वी उकाडयामुळे झोप सुध्दा नीट येत नाही. असे दोन तीन दिवस चालते आणि मग एक दिवशी दुपारी तपमान वरच जात नाही. रात्र पडल्यावर परत अंगात काहीतरी उबदार घालावेसे वाटते आणि झोपताना दुलईची परत आठवण येऊ लागते. चित्रपट गीताची रेकॉर्ड संपल्यासारखा, इथला ग्रीष्म थोडया दिवसांसाठी मग एकदम गायबच होतो. दक्षिण-पूर्व एशिया मधला उन्हाळा तर या दोन्हीपेक्षा अगदीच निराळा वाटतो. . परत संगीताच्याच तुलनेतच बोलायचे तर एखाद्या मैफिलीच्या आधी, उतरलेला तंबोरा जुळवणे चालू असावे. तबलजी तबल्यावर ठाक-ठुक करत असावा. प्रेक्षकांच्यात दबलेली कुजबुज चालू असावी. तेवढयात तंबोरा जुळवा. गायकाने खुशीने मान डोलवावी. आणि डोळे मिटून तो षडज लावणार एवढयात वीज प्रवाह खंडित होऊन मायक्रोफोन व प्रकाश योजना बंद पडावी. असेच काहीसे या इथल्या उन्हाळयात वाटते. सकाळी जाग यावी तर बाहेर कडक ऊन पडलेले असते. घराच्या बाहेर हात जरी काढला तरी चटके बसतात. थोडयाच वेळात असह्य उकडू लागते व घामाच्या धारा वाहू लागतात. वातानुकुलित खोलीच्या बाहेर पडावे असे सुध्दा वाटत नाही. थोडया वेळाने बाहेर डोकवावे तर अचानकच कुठुन तरी काळे कुट्ट ढग जमा झालेले दिसतात. लगेच जबरदस्त पाऊस पडू लागतो. तास दोन तास बदा बद पाऊस पडतो व हवा एकदम आल्हादकारकच होऊन जाते. थंड वारा वाहू लागतो. काही तासांपूर्वी मनस्वी उकडत होते याची नामानिशाणी सुध्दा रहात नाही.

दक्षिण पूर्व एशिया मधला हा उन्हाळा, तिथल्या माणसांना किती भावतो हे सांगता येणार नाही पण तिथल्या झाडा झुडपांना मात्र तो अतिशय भावतो. आपल्या येथे एकदा पावसाळा उलटला की झाडे झुडपे अगदी केविलवाणी दिसू लागतात. धुळीने माखलेली, मरगळलेली झाडे बघितली की ती पण पुढच्या पावसाची वाट पहात आहेत असे वाटते. या उलट दक्षिण पूर्व एशिया मधली झाडे झुडपे सतत चालणाऱ्या ऊन पावसाच्या खेळामुळे नेहमीच कशी ताजी तवानी वाटतात .त्यात बकुळ, सोनचाफा किंवा चंपक यासारखी फुलझाडे असली तर सुगंध असा दरवळत राहतो की रस्त्याने जाता येताना सुध्दा तो मनात भरभरून घेता येतो. रस्त्याच्या कडेला कुठे ओसाड ,पडके रान असे दिसतच नाही. सगळीकडे हिरवी गार हिरवळ आणी घन दाट वृक्षराई फोफावलेली दिसते. छान सुरेख व गुळगुळीत अशा रस्त्यावर प्रवास करताना ,नजर पोहोचेल तेथपर्यंत फोफावलेली , ही वृक्षराई बघत राहण्यासारखे दुसरे आल्हादकारक दृष्य नसेल.

त्या मानाने उत्तर अमेरिकेतील वृक्षांना ,पानांची ही वस्त्रे किंवा आभूषणे मिरवण्यासाठी तसा वेळही थोडाच मिळतो. जेमतेम सात आठ महिने ही पाने झाडांच्यावर टिकून राहतात. एकदा का शरद ऋतूची चाहूल लागली की वेड लागल्यासारखी पानगळ चालू होते. त्यामुळेच बहुदा येथे शरद ऋतूला फॉल किंवा पानगळीचा ऋतूच म्हणले जाते. त्यामुळेच उन्हाळयाच्या महिन्यांच्यात म्हणजे जुलै ,ऑगस्ट मधे हे सर्व वृक्ष कमालीचे दिमाखदार दिसतात. मेपल, ओक, पाईन ,चेरी , विलो वगैरे वृक्ष तर नजरेत भरतातच पण आपल्याकडे दिसणारा शिरिषही त्याच्या नाजुक फुलांनी नटलेला दिसतो. चेरी वृक्ष आपल्या लालसर पानांच्यामुळे अगदी निराळे वाटतात. मात्र सर्वात लोभसवाणे दिसतात ते मेपल वृक्ष. या वृक्षाचे पंचकोनी आकाराचे पान आपल्या वेगळेपणाने अगदी उठून दिसते. म्हणूनच बहुदा कॅनडा देशाने आपल्या राष्ट्रध्वजावर या पानाला स्थान दिलेले असावे. या वृक्षाच्या कमीत कमी पंधरा वीस तरी जाती दिसतात. सर्व प्रकारच्या मेपल वृक्षांची पाने जरी पंचकोनी असली तरी त्यांच्यात प्रचंड विविधता दिसते .गर्द हिरवी, पोपटी, हाताच्या पंजाहून मोठी , अगदी लहान , टोकदार असे मेपलच्या पानांचेच नमुने दिसतात. आणि एकदा शरदाची चाहूल लागली की हीच पाने अक्षरश: रंगाची उधळण करतात. पांढऱ्या सालीचे विलो वृक्ष मात्र केविलवाणे दिसतात आणि त्यातल्या त्यात जर तो वीपिंग विलो म्हणजे रडणारा विलो असला तर विचारायलाच नको. मला तर या वृक्षाकडे बघितले की नेहमी दिवसभर कामाचा रगाडा उपसून संध्याकाळी लोकल ट्रेनच्या गर्दीतून जाणारे मुंबईचे लोक आठवतात.

उन्हाळा आला की उत्तर अमेरिकेमधील लोकांना सुट्टीबरोबरच घराच्या दुरुस्तीची पण आठवण होते. रस्त्याने जात असताना दर दोन तीन घरांमागे एका घराची तरी दुरुस्ती चालू असलेली दिसते. कुठे छप्पर शाकारणे चालू असते तरे कुठे खिडक्या दारे बदलणे चालू असते. अर्थात बहुतेक घरे लाकूड आणि तत्सम गोष्टी वापरून बनवलेली असल्याने ही दुरुस्ती सहज शक्य होते. याच बरोबर घराच्या बाहेर ,मोकळया हवेत कोळशाच्या शेगडीवर स्वयंपाक करण्याची आपली आवडही अनेक लोक पुरवून घेताना दिसतात. थंडीच्या दिवसात सतत कपडयांचे ओझे अंगावर बाळगायला लागत असल्यामुळे बहुदा , उन्हाळा आला की अमेरिकन माणूस अर्ध्या चड्डीत दिसू लागतो. आणि फॅशन करणाऱ्या तरूणी तर इतके तोकडे कपडे घालू लागतात की त्यांनी आपल्या लहानपणीचे कपडे परत वापरायला काढले आहेत की काय असे वाटते.

थंडीचे दिवस आता सरतच आले आहेत. पुन्हा ऊन्ह चटके देऊ लागले आहे. थोडयाच दिवसात परत रखरखीत उन्हाळा चालू होईल. अशा वेळी जगात इतरत्र , ग्रीष्म कितीही रंगतदार वाटत असला तरी आपल्याला मात्र तो कधी एकदा सरतो असेच वाटणार आहे. माझा मित्र परत दिवस मोजणे चालू करणार आहे.


Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 thoughts on “ग्रीष्मरंग

  1. अरे मस्त लिहितो आहे हल्ली.. किप इट अप…

    Posted by Mahendra Kulkarni | फेब्रुवारी 13, 2009, 11:41 सकाळी
  2. श्री आठवले यांनी उत्तर अमेरिकेतल्या ग्रीष्म ऋतूविषयी जे लिहिले आहे ते मी प्रत्यक्ष अनुभवले आहे . तेथील फॉल या पानगळीच्या हंगामाबद्दल सुद्धा आठवले लिहितात ते खरे आहे . किंबहुना आपल्या आवारातील ही गळून पडलेली पाने गोळा करून कशी टाकून द्यायची हा मोठा प्रश्न असतो . त्यावर अमेरिकन मुले चांगलीच कमाई करतात . उन्हाळ्यात आपल्या लॉनला पाणी घालण्याचे काम अमेरिकन माणसाने स्प्रिंकलर बसवून कसे सोपे केले आहे, तेसुद्धा पाहून मौज वाटते . आपल्या घरसभोवार असलेली हिरवळ कशी हिरवीगार राहील याची जो तो अमेरिकन काळजी घेत असतो . आपल्या या लेखामुळे त्या आठवणी जाग्या झाल्या . धन्यवाद .
    मंगेश नाबर

    Posted by Mangesh Nabar | मार्च 20, 2013, 3:58 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: