.
Uncategorized

पानगळीचे दिवस


कॅलिफोर्निया मधल्या घरातल्या माझ्या खोलीला , चांगली मोठी लांब व रूंद अशी एक खिडकी आहे. एवढी मोठी खिडकी असली तरी बाहेर नजर टाकल्यास फारसे काही दिसत नाही. एकतर शेजारच्या घराच्या कांपाउंडच्या लाकडी फळयाच बाहेरच्या दृष्याचा बराचसा भाग खाऊन टाकतात. व उरला सुरला भाग , एक मोठा वृक्षच आपल्या विस्ताराने अडवून धरतो. या वृक्षाची सतत खाली बघत रहाणारी पाने , वाऱ्याच्या झुळकीबरोबर हलत, डुलत रहातात. खिडकीपाशी उभे राहून, हलणाऱ्या पानांच्या या झरोक्यामधून बाहेर बघत रहाणे मला खूप आवडते. आकाश गर्द निळे असले आणि सूर्य महाराज ढगांआड नसले तर या झरोक्यांच्यातून बाहेरचे दिसणारे दृष्य मोठे विलोभनीय असते. संध्याकाळच्या तिरप्या उन्हात, समोरची घरे, झाडे, खेळणारी सोनेरी केसांची मुले वगैरे सर्व एखाद्या चित्रातल्यासारखी वाटतात. आणि तिथल्या नीरव शांततेला या खेळणाऱ्या मुलांचे आवाज पण एक जिवंतपणा आणतात. मध्यंतरी , काही ना काही कारणांनी खिडकीपाशी स्वस्थपणे उभे रहायला मला जमलेच नाही. आठ, पंधरा दिवसांनी जरा स्वस्थपणा मिळाला आणि मी सहज खिडकीपाशी गेलो. बाहेरचे नेहमी दिसणारे दृष्य तसेच असले तरी झाडाच्या पानांचा रंग बदलल्यासारखा वाटत होता. पानांची हिरवाई कमी झाल्यासारखी वाटत होती.झाडाच्या बुंध्यापाशी, वाळक्या पानांचा एक ढीग दिसत होता आणि मधून मधून एखादे पान गिरकी घेत झाडाच्या पायाशी लोळण घेताना दिसत होते. पानगळीचे दिवस सुरू झाले होते.

उत्तर अमेरिकेमधे, उन्हाळा आणि हिवाळा हे दोनच मुख्य ऋतू असले तरी, प्रशांत महासागरावरून येणारा, ‘ जेट स्ट्रीम नावाचा एक राक्षसी वारा, सहज रित्या ऋतूकाल बदलू शकतो. हा वारा मोठा चंचल असतो तो कधी दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहतो तर कधी उत्तरेकडून दक्षिणेकडे. त्याच्या चंचलतेने, भर उन्हाळयात तो तुम्हाला हुडहुडी भरवू शकतो तर कधी हिवाळयातसुध्दा तपमान नव्वदीच्या उंबरठयावर नेऊन ठेवण्यात यशस्वी होतो. असे जरी असले तरी ढोबळ मानाने हेच दोन ऋतू असतात असे म्हणता येते. आपल्याकडे असलेला पावसाळा हा ऋतूच येथे नसल्याने, कालीदासाला दिसल्या तशा, आषाढाच्या प्रथम दिवशी दिसणाऱ्या मेघमाला येथे दिसत नाहीत. किंवा बालकवींना दिसलेले श्रावण मासातले मखमालीचे हिरवे गालीचे व त्यावर खेळणारी फुलराणीही दिसत नाही. येथे उन्हाळयाचा दाह कमी होऊ लागतो आणि थेट अंगाला थंडीची शिरशिरीच भासू लागते. दोन ऋतूंच्या या संधीकालाला येथेही शरद किंवा ऑटम असे नाव आहे खरे, पण याला सर्वसाधारणपणे म्हणतात मात्र पानगळीचे दिवस किंवा फॉल‘. या दिवसांत, उत्तर अमेरिकेतील यच्चावत सर्व झाडे झुडपे, आपली पर्ण संपदा धरती मातेला दान करून टाकतात. आपल्याकडेही पानगळ असतेच पण ती एकाच ऋतूकाली होते असे नाही. सोनचाफ्याची पाने पावसाळा संपायला आला की गळतात तर बहावा, गुल-मोहोर किंवा ऍकेशिया यांची पानगळ नंतर बऱ्याच उशिरा म्हणजे शिशिरात होते. वेताळ टेकडीवरची धूपाची झाडे तर ऐन वसंतात सुध्दा पर्णहीनच असतात. आणि आंबा किंवा फणस यांची पानगळ तर वर्षभर चालूच राहते. अर्थात खरे बघायला गेले तर आपल्या येथली झाडे असे वागतात यात नवल असे काहीच नाही. आपण तरी काय निराळे आहोत. साधा नव-वर्ष दिन सुध्दा आपण एकाच विशिष्ट दिवशी मानत नाही. कोणी गुढी पाडव्याला नव-वर्ष दिन म्हणतात तर कोणी दिवाळीतल्या पाडव्याला. कोणी संक्रांतीला नव-वर्षाच्या शुभेच्छा देतात तर कोण्या ग्रेगरी नावाच्या पोपने ठरविलेला, 1 जानेवारी हाच तो दिवस आहे असे काहीजण मानतात. मुस्लीम, जैन, पारशी बंधूंच्या नवीन वर्षाची सुरुवात तर आणखीनच निराळया दिवशी होते. आणि सगळयात विनोद म्हणजे गुढी पाडवा किंवा चैत्र शुध्द प्रतिपदा ही सुध्दा दाते पंचांग, टिळक पंचांग अणि भारत सरकारचे पंचांग यांत निरनिराळया दिवशी येते. या उलट यच्चावत उत्तर अमेरिका एकाच दिवशी नाताळ साजरी करते ,एकाच दिवशी नव-वर्ष सुरू झाले म्हणून आनंदाने नाचते आणि एकाच दिवशी थॅन्क्स गिव्हिंगम्हणून आपल्या म्हाताऱ्या आई वडीलांकडे जेवायला जाते. त्यामुळे याच शिस्तीत,येथल्या सर्व झाडांची पानगळ एकाच ऋतूकालात झाली तर नवल वाटायला नको.

मी रोज सकाळी ज्या रस्त्याने फिरायला जातो त्या रस्त्याला दुतर्फा मेपल वृक्षाची झाडे लावलेली आहेत. उन्हाळाभर या झाडांची पंचकोनी पाने आणि त्यांचा हिरवागार रंग यामुळे ती मोठी खुलून दिसतात. या रस्त्याचे नाव येथल्या नगरपालिकेने मॅने( ट्)असे ठेवले आहे. कोणा प्रसिध्द फ्रेन्च चित्रकाराचे ते नाव आहे म्हणे. खरे बघायला गेले तर या रस्त्याला मेपल स्ट्रीट असे नाव जास्त शोभले असते. मेपल वृक्षाचे बहुतेक प्रकार या रस्त्यावर पहायला मिळतात. अगदी कुंपणावर लावलेल्या हेज मेपलपासून सिल्व्हर मेपल किंवा जॅपनीज मेपल सारखे विविध प्रकार येथे रस्त्याच्या दुतर्फा लवलेले दिसतात. हे सर्व मेपलचेच प्रकार असल्याने सर्व झाडाची पाने जरी पंचकोनी असली तरी त्यात खूपच वैचित्र्य दिसते. हेज मेपलची पाने रूंद तर जॅपनीज मेपलची पाने रूंद व टोकदार पंचकोन असलेली असतात. सिल्व्हर मेपलच्या पानांचे पंचकोन लांबट, टोकदार आणि दातेरे असलेले असतात तर रेड मेपलची पाने अगदीच निराळया आकाराची व लालसर दिसतात. या वैशिटयपूर्ण पानांमुळे हे वृक्ष नेहमीच मोठे रुबाबदार दिसतात. पण एकदा शरदाची चाहूल लागली की हे वृक्ष रंगांची जी उधळण सुरू करतात त्याला कुठे तोड असेल असे वाटत नाही. पोपटी, किरमिजी, सोनसळी, बहाव्याच्या फुलांसारखी पिवळी धमक किंवा गुल मोहोराच्या फुलांसारखी लालचुटुक पाने हे वृक्ष एकदा मिरवू लागले की एका नाटयगीतातील या नव नवल नयनोत्सवा या काव्यपंक्तींचीच आठवण झाल्याशिवाय रहात नाही. हा नयनोत्सव पुढे काही आठवडे तरी चालूच रहातो.मग हळूच एके दिवशी, पावसाची सर यावी तशी ही पाने खाली गळू लागतात व बघता बघता झाड निष्पर्ण होते. पुण्याला आमच्या घरी एक सोनचाफ्याचे मोठे झाड आहे. त्याची पाने पण या सुमारासच गळतात. पण हा रंगोत्सव काही आपल्याकडे बघायला मिळत नाही. सोनचाफ्याची हिरवी पाने एकदम वाळकीच दिसू लागतात.

पानगळीची खरी मजा बघायची असली तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील व्हर्जिनिया राज्यात शॅननडो म्हणून एक अभयारण्य आहे तिथे जायला पाहिजे. हे अभयारण्य एका विस्तीर्ण पर्वतराजीचे मिळून बनलेले आहे. मध्यवर्ती असलेल्या पर्वतावर गाडी घेऊन जाता येईल अशी व्यवस्था केलेली आहे. या पर्वताच्या माथ्यावर आजूबाजूला दृष्टीक्षेप टाकता यावा म्हणून अनेक व्हिस्टा पॉइंट्स ठेवलेले आहेत. या पॉइंट्स वरून चहूबाजूंना नजर टाकली तर पन्नास शंभर मैलाचा परिसर सहज नजरेत भरतो.उन्हाळयात येथे जाऊन बघितले तर चहूबाजूंना नजर पोचेल तेथपर्यंत घनदाट , हिरवीगार व मैलोगणती पसरलेली अशी वृक्षराईच आपल्या नजरेत येते. पण ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवडयापासून पुढचे काही आठवडे ह्ा परिसर एखादी जादूची कांडी फिरवावी तसा बदलतो. आधी हिरवागार दिसणारा हा परिसर एकदम सप्तरंगी दिसू लागतो. एखाद्या नव चित्र कलाकाराने एखाद्या प्रचंड मोठया कॅनव्हासवर सप्तरंगांची उधळण केल्यावर जसे चित्र तयार होईल तसे काहिसे हे चित्र दिसते. रंग वर्णपटा वरील तांबडयापासून जांभळयापर्यंतच्या सर्व रंगाचे पुंजके येथे विखुरलेले पहायला मिळतात. हा परिसर एवढा प्रसिध्द आहे की फॉल कलर्स बघायला पर्यटकांची प्रचंड गर्दी या दिवसात असते.

पानगळीची ही मजा सोडली तर या ऋतूकालामधे येथे मनाला उल्हास वाटेल असे काही नसते. सतत कुंद व पावसाळी हवा, बोचणारे थंड वारे व थंडी याने एक प्रकारची उदासीनता वातावरणात भरून येते. माझ्या सारख्या उष्ण कटीबंधात रहाणाऱ्याला तर खरे म्हणजे ही थंडी पेलत नाही व येथून पळ काढावा असे वाटू लागते. व हे सर्व कमी की काय म्हणून अनेक जातीचे व प्रकारचे इनफ्ल्यूएंझा विषाणू या हवेत धुमाकूळ घालायला सुरवात करतात. स्टमक फ्ल्यू ‘, सर्दी, खोकला, एशियन फ्ल्यू व साधा फ्ल्यू यांनी प्रत्येक घरटी कोणी ना कोणी तरी आजारी असलेले या ऋतूकालात सापडतेच. एकदा दुपारचे तीन वाजले की संध्याछाया हळू हळू पसरू लागतात व पाच वाजले की चक्क काळोख होतो. बरे सकाळी कुठे जावे म्हटले तरी नऊ दहा वाजेपर्यंत सूर्य महाराज वर येत नाहीत. यामुळे या काळात बहुतेक अमेरिकावासीयांना बंद घरातच काल व्यतीत करावा लागतो. घरातून गाडीमधे व गाडीमधून कामाला व तसेच परत , असाच बहुतेकांचा दिनक्रम असतो. त्यामुळे व्यायामापासून सर्व सोई घरातच करून घ्याव्या लागतात. गाडी पण जवळ जवळ घरातच आणून उभी करावी लागते. सर्वात हाल होतात ते बाल गोपालांचे. सारखे घरात, घरात रहायला लागल्याने ही मंडळी मोठी कंटाळून जातात. बाहेर खेळायला जाण्यासाठी एकमेव जागा म्हणजे शॉपिंग मॉल्स. यांत हवाही गरम ठेवतात व मुलांना खेळण्यासाठी जागा व मुबलक साधनेही उपलब्ध असतत.

याच्या अगदी उलट परिस्थिती आपल्याकडे असते असे म्हटले तरी चालेल. अनंत चतुर्दशीला गणपतींना पोचवल्यापासूनच शरद ऋतूची चाहूल लागते. पण या नंतरचा पंधरवडा आपल्याकडे अशुभ मानला जातो. पितरांना जेवायला घालण्याची एक खुळचट रूढी याच दिवसात पाळली जाते. चिनी लोक पण ही रूढी पाळतात हे कळल्यावर मात्र मी थक्क झालो. चिनी लोक पितरांना जेवायला तर घालतातच पण या शिवाय पितरांचे परलोकात रहाणे सुखकर व्हावे म्हणून मोनॉपली किंवा व्यापार या खेळात वापरतात त्या प्रकारच्या डॉलरच्या नोटा, मोबाइल फोन, मोटर गाडया, फर्निचर, घरात काम करायला मोलकरणी वगैरे ही पुरवतात. सगळयात गमतीची गोष्ट म्हणजे नरक बॅन्क किंवा Bank of Hell ची क्रेडिट कार्डे ही ते पितरांना पाठवितात. आता ते स्वर्गाच्या बॅन्केची कार्डे का पाठवत नाहीत हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. कदाचित स्वर्गात बॅन्क कशी असेल ? असे त्यांचे मत असेल किंवा आपले पितर स्वर्गात असणे शक्यच नाही अशी त्यांची खात्रीच असेल्. मात्र चिनी लोक या बाबतीत आपल्यापेक्षा फार हुषार हे कबूल करावेच लागेल. पितरांसाठी जेवण बनवणे मग भटजींना ते जेऊ घालणे हे सगळे फार कष्टाचे व खर्चाचे त्यांना वाटते. त्यामुळे या सगळया गोष्टींची चित्रे छापलेले कागद किंवा पुठयाची मॉडेल्स ते बाजारातून आणतात व एका लोखंडी भांडयात विस्तव पेटवून ही चित्रे त्यात टाकतात व अग्निज्वालांमार्फत पितरांना पोचवितात. अर्थात निसर्गाला या सगळयाशी काही देणे-घेणे नसते. तो शुभ अशुभ वगैरे काही मानत नाही. व यामुळेच या दिवसातील हवा मोठी शुभद आणि सुखद असते. मधूनच पडणारे ऊन आणि अधून मधून पडणारी पावसाची एखादी सर यामुळे वातावरण आल्हादकारक बनते. पण नंतर एखाद्या दिवशी एकदम उकडू व गदमदू लागते. दुपारी दक्षिणेकडून काळीकुट्ट झाकोळ येते व बघता बघता तुफान पाऊस सुरू होतो. हत्तीच्या पावलासारखा पडणारा हा पाऊस हस्त नक्षत्राच्या आगमनाचे शिंग वाजवतो. हस्त भरपूर पडले की पुढच्या पावसाळयापर्यंत पाऊस पडला नाही तरी चालते. एकदा का हस्ताचा पाऊस सुरू झाला की पुढच्या आठ पंधरा दिवसांची निश्चिंती असते. दिवसभर उकडहंडी आणि संध्याकाळी बदाबदा पाऊस या चक्रातून सुटका कधी होणार असे वाटू लागते. मग एकदम एके दिवशी सकाळी उठले की बाहेर सगळे धुरकट दिसू लागते. सगळे पुणे धुक्याच्या दुलईत गुरफुटुन गेलेले असते. पावसाळा संपून शरद ऋतू सुरू झाल्याची ती खूणगाठ असते. आकाश दोन तीन दिवसात निरभ्र होते व दिवसा जरी थोडेसे गरम वाटले तरी रात्री मोठया आल्हादकारक होतात. नुकताच पावसाळा संपल्याने हवेतील धुळीचे प्रमाण खूपच कमी असते. व यामुळे हे निरभ्र आकाश दिवसा मोठे निळेशार व छान दिसते.

शरद ऋतूमधील पोर्णिमेचा चंद्र आणि चांदणे प्रसिध्दच आहे पण याच दिवसात येणाऱ्या कृष्ण पक्षांतील रात्री मला जास्त देखण्या वाटतात. काही वर्षांपूर्वी मी कामानिमित्त नाशिकला गेलो होतो. परत येताना रात्र झाली. सिन्नरच्या पुढे चंदनापुरी किंवा तत्सम नावाचा जो एक घाट लागतो तो पार करून आम्ही घाटमाथ्यावर आलो. चौफेर काळोखाचे साम्राज्य होते. नजर पोहोचेल तोपर्यंत कुठेही मिणमिणता दिवा सुध्दा दिसत नव्हता. सहज माझे लक्ष आकाशाकडे गेले. आकाश तेजाने नुसते लखलखत होते. गाडी थांबवून मी खाली उतरलो. आभाळात लक्ष लक्ष दीप पेटविले आहेत की काय असे वाटत होते. इतके तेजोमय आकाश मी आधी कधीच बघितले नव्हते. अशा आभाळाचे वर्णन एका कवीने आपल्या एका गीतात नक्षत्रांचा निळा चांदवा असे मोठे समर्पकपणे केले आहे. अर्थात पुण्यामधे आता तारेच इतके अंधूक दिसतात की त्यांचे निळे चांदणे वगैरे दिसणे जवळपास अशक्यप्रायच आहे. त्यातून काही कल्पक नगर पित्यांनी आता ठिकठिकाणी सहस्त्रावधी कॅन्डल पॉवर शक्तीचे नवीन प्रकारचे दिवे बसविण्यास सुरवात केली आहे. या दिव्यांचे वैशिष्टय असे आहे की रस्त्यावर हे दिवे जेवढा प्रकाश झोत टाकतात त्याच्यापेक्षा जास्त प्रकाशझोत ते आकाशाकडे फेकतात. अर्थात या अशा रचनेवे प्रायोजन काय असा प्रश्न विचारण्यात फरसे काही ह्ंशील आहे असे वाटत नाही. आमच्या पुण्यातल्या घराजवळ असाच एक दिवा बसविण्यात आला आहे. त्यामुळे ताऱ्यांचे दर्शन सुध्दा दुर्लभच झाले आहे.

उन्हाळयात रात्री आकाशाकडे नजर टाकली तर हंस नक्षत्रातला डेनॅब, श्रवण आणि अभिजित या सारखे दोन तीन तेजस्वी तारे सोडले तर बाकी सर्व आकाश मंद प्रतीच्या ताऱ्यांनीच भरलेले असते. त्यामुळे खगोल शास्त्रज्ञ सोडले तर सर्व सामान्यांना त्यात प्रेक्षणीय असे काही फारसे वाटत नाही. पण शरदात मात्र एकाहून एक अशा तेजस्वी ताऱ्यांची मालिकाच आपल्या नजरेसमोरून जात रहाते. पूर्व रात्री, उन्हाळयातले तारे तर दिसतातच पण नंतर उत्तर रात्री, कृत्तिकांचा तारका समूह, वृषभ राशीतला रोहिणीचा तारा ,मृग नक्षत्रामधला बेटेलज्यूस , थोडा उत्तरेकडे दिसणारा ब्रम्हहृदय व दक्षिणेकडे दिसणारे व्याध, फोमलहाऊट किंवा अगदी दक्षिण क्षितिजावर दिसणारी ,सेंटॉरस नक्षत्रातील मित्र व मित्रक या ताऱ्यांची जोडी हे तेजस्वी तारे गच्चीवर आरामखुर्चीत बसून बघत रहाण्याची मजा औरच आहे. अर्थात ही मजा अनुभवायची असली तर कुठेतरी बाहेरगावी गेले पाहिजे. पुण्यात आता ते शक्य नाही. पुण्यात आता फक्त दूरदर्शनच्या पडद्यावर प्रत्येक सासू ही कधीतरी सून होतीच किंवा वादळ वाट ‘ ( म्हणजे काय ते मला तरी अजून समजलेले नाही !) हेच आपण बघू शकतो.

या दिवसात वेळात वेळ काढून पहाटे वेताळ टेकडीवर फिरायला जावे. धुक्यात गुरफटलेली हिरवीगार वनराई व ओलसर जमिनीवर अजून हिरवे असलेले तृणांकूर यामधे अधून मधून डोकावणाऱ्या खडकावर बसून उगवणारा सूर्य पहाणे म्हणजे एक पर्वणीच असते. निसर्गाची हीच तर गंमत आहे. तो न चुकता, ठरल्या वेळी अनंत करांनी सौंदर्याची उधळण करत राहतो. मग तो पानगळीचा नयनोत्सव असो किंवा शरदातील रात्रींचा तेजोत्सव असो. तो अनुभवयाचा का नाही ते आपण ठरवायचे असते. त्यातून शरद ऋतू म्हणजे तर वर्षातील सर्वोत्तम काल. भगवद्गीतेत सुध्दा प्रत्यक्ष भगवंतांनी मासानाम मार्गशीर्षस्य असे प्रशस्तिपत्रक या ऋतूला देऊन टाकले आहे. म्हणून तर आपले महत्वाचे सर्व सण याच कालात येतात. आता हे सण शोभेच्या दारूच्या धुरात , फटाक्यांच्या कडकडाटात व तेलकट तुपकट पदार्थांच्या सेवनात घालवायचे की सुट्टी काढून व कुठेतरी दूर जाउन निसर्गाच्या सहवासात घालवायचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. निसर्गाला त्याचे काहीच सोयर सुतक नसते.

————–

Advertisements

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 thoughts on “पानगळीचे दिवस

  1. Reblogged this on अक्षरधूळ.

    Posted by chandrashekhara | मार्च 7, 2013, 10:23 सकाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 386 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected

माझे नवीन इ-पुस्तक

एका साम्राज्याच्या शोधात

Advertisements
%d bloggers like this: