पाहुणे लेखकांचे लेखन; Guest Writings

बर्‍याच वेळा अक्षरधूळचे वाचक स्वत:ची मते लेखाला प्रतिसाद देण्याच्या निमित्ताने मांडत असतात. तसेच काही जण ई-मेल च्या स्वरूपात आपले लेख किंवा विचार माझ्याकडे पाठवतात. वाचकांचे हे लिखाण प्रसिद्ध करण्यासाठी योग्य अशी जागा अक्षरधूळवर आतापर्यंत नव्हती. माझे पान या पृष्ठावर वाचकांनी लिहिलेले लेख किंवा विचार, व्यंग चित्रे, चित्रे ही  इतर वाचकांना वाचता  किंवा बघता येतील. तुम्हाला जर कोणत्याही विषयावरील तुमच्या मताला, व्यंगचित्राला, चित्राला अक्षरधूळ वरून प्रसिद्धी मिळावी असे वाटत असले तर संपर्क या पृष्ठावर दिलेल्या माझ्या ई-मेल पत्त्यावर तुमचे लिखाण माझ्याकडे पाठवा मी त्याला जरूर प्रसिद्धी देईन. मात्र लिखाण कोणत्याही वाचकाला  आक्षेपार्ह वाटू नये ही काळजी तुम्ही घ्यालच!

डॉ.श्रीकांत परळकर यांचा एक लेख

मुंबईचा विकास

मुंबई शहरास वर्तमान काळातील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे केंद्र म्हणून असलेले महत्त्व, या शहरास “भारताची आर्थिक राजधानी” हे विशेषण प्राप्त झाले यामागे जगन्नाथ शंकर शेठ, भाऊ दाजी लाड, टाटा परिवार यांच्यासह पाठारे प्रभू ज्ञातीतील अनेक व्यक्तींचे तसेच ब्रिटीश राजवटीतील काही अधिकाऱ्यांचेही महत्त्वाचे योगदान आहे. ‘सर जॉर्ज बर्डवुड. द प्रमोटर ऑफ गुडविल बिटवीन ईस्ट एन्ड’ या डॉ. विजया गुपचूप लिखित नुकत्याच प्रकशित झालेल्या ग्रंथावरून मुंबईच्या आखणीत महत्त्वाचा सहभाग असणाऱ्या सर जॉर्ज बर्डवुड या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या उत्कृष्ट वास्तुशिल्पकाराचा परिचय होऊ शकतो. डॉ. बर्डवुड यांचा जन्म १८३२ मध्ये त्यावेळी मुंबई प्रांतात असणाऱ्या बेळगाव (कर्नाटक) येथे झाला व तेथेच त्याचे बालपणी शिक्षण झाले. पुढे एडिनबर्ग विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून बर्डवुड भारतात परतले आणि ग्रांट मेडिकल संस्थेत वैद्यकीय प्राध्यापक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. काही काळ ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू पदावरही होते. जन्मतः अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे बर्डवुड उत्कृष्ट वास्तुशिल्पकारही होते.

museum in mumbai

आजही मुंबईचे लॅंड मार्क्स आणि पर्यटकांचे आकर्षण मानल्या गेलेल्या अनेक वास्तुंची मूळ संकल्पना सर बर्डवुड यांचीच. मुंबईच्या राणीच्या बागेतील लाड वस्तुसंग्रहालय (पूर्वीचे व्हिक्टोरिया एन्ड अल्बर्ट म्युझियम ) सध्याचे भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय, मुंबई विद्यापीठाचा गॉथिक बांधणी शैलीतील सेनेट हॉल, राजाबाई टॉवर ,एशियाटिक सोसायटीची भव्य इमारत असे सर बर्डवुड यांच्या वास्तुशिल्पाचे नमुने गेली अनेक वर्षे मुंबईची शान राखून आहेत. काही भव्य उद्यानेही त्यांच्याच कल्पनेतून साकारलेली आहेत. मुंबईसाठी रचनात्मक कामासाठी आवश्यक देणग्यांसाठी बर्डवुड कावसजी जहांगीर, प्रेमचंद रायचंद यांच्यासारख्या दानशूरांपुढे आपला शब्दही टाकत असत. मुंबईच्या सांस्कृतिक व सामाजिक जीवनाचा, सामाजिक घडामोडींचा
सखोल अभ्यासही त्यांनी केलेला होता हे विशेष.

ब्रिटीश राजवटीत असूनही मुंबईतील जीवनाशी खऱ्या अर्थाने समरस झालेले सर बर्डवुड खरे मुंबईकरच होते म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. मुंबईच्या प्रगतीतील त्यांचा वाटा किती मोलाचा होता आणि केवळ आर्थिक प्रगतीनेच शहराला महत्व प्राप्त होते असे नाही, हे सर बर्डवुड यांनी स्वतःच्या कृतीतून दाखवून दिले.
डॉ. श्रीकांत परळकर
५१ – अ, गोखले रोड (उत्तर)
दादर, मुंबई ४०००२८.

श्री. अंकुश आव्हाड यांची एक कविता

पुणे तिथे काय उणे!

शिक्षणाच्या माहेरघराचं माहेरपणच निघुन गेले

गल्लीगल्लीत डिग्र्या छापायचे कारखाने सुरु झाले..

पेशवाई पगडीचे दिमाखपण सम्पुष्ट होऊ लागले

जेली लावलेल्या पिसार्‍याचे डोके डिस्कोवर नाचू लागले..

पुणे तिथे काय उणे! मोबाईलच्या जमान्यात भावगीते झाली जुने !.

पुणे तिथे काय उणे!

पर्वती पायथ्याचे जेष्ठांचे जिवलग कट्टे गायब होत गेले

रस्त्यांच्या काठापर्यंत रिचार्ज अन पानाचे उद्योग येत गेले..

का. हलवाई, चितळ्यांचे चविष्ट पाक विरळ होऊन गेले

मॅकडोनाल्ड ,के.एफ.सी.च्या हडकांना पोर्‍हे येडे होऊ लागले..

पुणे तिथे काय उणे!

ईंटरनेटाच्या युगात पोस्टकार्डे झाली जुने !…

पुणे तिथे काय उणे!

शा.बापु,दा.फाळक्यांचे सामाजिक चित्रपट निघुन गेले ..

बॉलिवूड्च्या नक्कलेत आता मारपिटीचे सिनेमे येऊ लागले..

निळू,लागुंचे पिंजरा सामनाचे रीळ जुन्यात विसरुन गेले ..

मराठी आळणी म्हणत विग्रजी सिनेमे फितीत भ्ररुन आले..

पुणे तिथे काय उणे!

3-D च्या काळात क्रुष्णधवल चित्रे झाली जुने !…

पुणे तिथे काय उणे!

बालगंधर्व,भि.जोशींचे क्लासिक स्वर केव्हाच फिके झाले ..

किबोर्डा बरोबर किंचाळलेले गाणे पण अती प्रिय झाले..

शा.साबळ्यांच्या पोवाड्यांचे बोल केव्हाच नावडे झाले ..

मात्र चिकनी चमेलीचे वायफळ ताल चांगलेच आवडू लागले..

पुणे तिथे काय उणे!

रिमिक्सच्या लाटेत संगीत झाले जुने !…

पुणे तिथे काय उणे!

टिळकांच्या पेठातल्या बाप्पांचे गोतावळ कसे हो लुप्त झाले ..

झगमग विग्रजी कल्ह्याच्या स्टेटसमधे युवक मुग्ध झाले..

ज्ञानोबा,तुकोबांच्या पालखींचे निर्मळ भक्तीप्रेम जसे माळवु लागले

पालखींच्या सुट्टीत मल्टीप्लेक्सच्या गर्दीत प्रेम अधेड असे फुलू लागले..

पुणे तिथे काय उणे!

ग्लोबलायझेशनच्या नावे लोकलायझेशन झाले जुने !…

पुणे तिथे काय उणे!

पु.., अत्रे, नेने, जोशी ह्या दिग्गजांची आठवण येणे दुर्मिळ होत गेले..

सनी, मायकल, कॅट अश्याचीच स्वप्ने येणे साहजिक होऊन गेले..

बा.पुरंदरेच्या शिवचरित्राला इतिहासात जमा केले ..

जिस्म३ च्या पायरेटी व्हिडिओला पोर्‍हे कॉलेज सोडून गेले..

पुणे तिथे काय उणे!

कॉन्क्रीटच्या गर्दीत किल्ले झाले जुने !…

पुणे तिथे काय उणे!

संस्क्रुती विना सारे सुने..

संस्क्रुती विना सारे सुने सारे सुने

Ankush Avhad,Pune

श्री. रमेश आठवले यांचा एक अतिशय अभ्यासपूर्ण लेख

Use of Sarasvati Palaeo- Channels in Reclamation of Water- Logged areas of Punjab and Haryana-A Concept Note.

Introduction

The states of Punjab and Haryana occur in the Arid to Semi-arid Climate region, with average annual precipitation varying between 300 to 600mm. The natural steady state equilibrium of this region, between water input in the form of precipitation, river inflow and sub surface inflow on one side and surface and sub surface outflow, bare soil evaporation and evapotranspiration on the other side, is disturbed since the arrival of canal irrigation, more than 100 years ago. The irrigation development culminated with establishment of the vast command area of the Bhakra -Nangal project. While irrigation of this fertile plains region of India has benefitted the nation with timely and stupendous increase in food production, there have been inevitable side effects, in terms of secular degradation of the soil productivity, due to the exacerbating problem of water logging and salinisation of soils, which now affects thousands of hectares of agricultural land.

Multiple cropping is practiced in Punjab and Haryana. It is estimated that, in the case of paddy cultivation, approximately 50 percent of the applied irrigation water deep percolates through the soil. The estimate for other crops is about 33 percent of applied irrigation. In the absence of a commensurate natural capacity for sub surface drainage and outflow, this has resulted in rise of the water table. The water table rises up to the crop root level and causes reduction in crop yield. Some of the rising water evaporates and the salts dissolved in it are deposited in the soil, causing salinisation of the soil and further degradation of its productivity. These phenomena are not unique to Punjab and Haryana. About 10% of irrigated land worldwide suffers from water logging. However, as is described further, there might be a unique solution to our problem.

Magnitude of the Problem:

Various estimates of the extent of water logging and salinisation in Punjab and Haryana are available. I quote from the treatise ‘Unravelling Bhakra’, by Dharmadhikary (2005). According to a 1990-91 statistical data, the waterlogged and salt affected areas in Haryana amounted to 2, 49000 Ha and 1, 97000 Ha respectively. Corresponding figures for Punjab were 200,000 Ha and 490,000 Ha. The seriousness of the problem can be best highlighted by quoting the following two expert statements from the same treatise.

  1. According to Bhamrah, the yields of Paddy and Wheat were 41% and 56% lower in affected lands.
  2. As per Vinay kumar, vice chancellor of the CCS Agricultural University at Hissar, the current estimate of saline and water logged areas in the state of Haryana is around 400,000 Ha and if suitable measures are not taken , then the area with such problem is likely to be about 2,000,000 Ha in next two to three decades. This dire prognosis means that 70% of the irrigated area in Haryana will be affected.

Measures for reclamation of water logged and salinized areas:

Three different methods are practiced for draining out the sub soil water and reclaiming the affected area. These are: 1. Vertical drainage, 2. Surface drainage and 3. Sub surface drainage. Dharmadhikary (2005) has evaluated the efficacy of these three methods in the context of Punjab and Haryana, in a chapter devoted to ‘water logging and Salinisation’ in his treatise on the Bhakra project.

  1. Vertical Drainage: Vertical drainage comprises extraction of ground water, for use in conjunctive irrigation, with resultant lowering of the local water table. This is being practiced on a large scale. However, this solution is advisable only in areas where the ground water is of good quality. It should not be used in areas where the ground water is inherently brackish or saline, because of geological and paleoclimatic reasons. The Central Ground Water Board (Anonymous, 1997), has prepared a ground water quality map of the country. This map delineates such areas in Punjab and Haryana. Even in areas having good quality ground water, one should note that ground water is a replenishable but finite source and is not being naturally replenished at the same rate at which it is being extracted at present. Further the fraction of ground water (50 to 33 percent of the irrigation quantum) that percolates back has an increased content of total dissolved solids, because of evaporation effects. It seems therefore, that the vertical drainage measure can work only in some of the affected area and here also, it can not be a long term solution.
  2. Surface channels. These field drainage cuts, by definition, are not more than 1 to 2 meters deep. They can be used for collecting excess water accumulated on the surface and releasing it in a canal, for ultimate disposal outside the command area. Reluctance of the farmers to surrender land to allow the drains to pass through, and their apprehension about seepage of poor quality water in their farms are some of the difficulties encountered in this method of reclamation.
  3. Sub surface drainage. In this method, a network of vertical, inclined and near horizontal perforated pipes is buried underground to drain out the excess water in a sump and then disposed in another outlet. This method is extensively practiced in Netherlands and a pilot project, with assistance from Netherland, has been implemented in Haryana.

A common denominator in large scale application of any one or a combination of these methods is the problem of disposal of the drained water, outside the affected area. Solutions such as pressure injection of this water in deep boreholes or releasing it in large manmade pans, having impervious linings, have been suggested. However, most experts agree that construction of a long interstate canal, for its disposal in the Gulf of Kachchh, is a permanent, although expensive, solution of the problem.

The Sarasvati Solution:

The ancient Sarasvati originated in Himachal Pradesh, entered Haryana near Kalka, moved through Punjab and Haryana into Rajasthan, meandered and wound further downstream, till it debouched in the Gulf of Kachchh. The river is currently known as Ghaggar River in its upper reaches. The Ghaggar is an ephemeral stream. Several major and minor tributaries joined the Sarasvati over its course. The Sarasvati river system can be considered as a separate entity and not as a part of the Indus basin. It dried up a few thousand years back, due to tectonic movements, tributary diversions and climate changes. This thesis is now well documented and accepted by almost all, barring a few skeptics. The dry courses of the main river and its tributaries are at present covered with sand, loam and silt, deposited by wind over last few thousand years. They could be discerned only after the advent of remote sensing techniques. (Sankaran, A.V., 1999; Roy and Jakhar, 2001).

It is reported that the currently obscure Sarasvati was a mighty river, with bank to bank width varying from 6 to 10 Km and filled with pebbles, gravel, coarse sand and fine sand, like any other river bed (Kalyanaraman, S., Internet blog). The river channel should also be proportionately deep. All such river bed material constitutes a highly permeable medium, which should be present all along the river course, and have a natural down gradient. We thus have a subterranean channel(s) system with considerable capacity to store and transmit water.

The problem of disposal of the water drained out from the thousands of hectares of waterlogged, salinized and erstwhile fertile areas of Punjab and Haryana (and similarly affected irrigated parts of Rajasthan), is considered as the most difficult aspect of reclamation through man made sub surface drainage. It is suggested here that the presently dry and pristine sub surface beds of the Sarasvati and its tributaries in the desert area, can be used to dispose off the water collected through a network of sub surface drains. The quality of this water will be poor in the initial stages but will improve in course of time. This approach, prima facie, seems less expensive and faster than the alternative approach-suggested by some- of taking the drained water all the way South West, to the sea, though a lined canal.

It is proposed through this concept note that a study group for evaluating the technical feasibility, environmental impact, inter- state transfer issues, cost/benefit ratio and other relevant aspects, may be constituted and a pilot experiment may be undertaken, at a site in the palaeo channel of the Sarasvati. If the report of the study group is favorable and is followed by an action plan, then we might see a rejuvenation of the Sarasvati River, besides achieving reclamation of the affected agricultural lands.

————————————————————————–

References:

  1. Anonymous (1997), “Status of ground water quality including pollution aspects in India”, Central Ground Water Board, New Delhi, pp.1-68.
  2. Dharmadhikary, S. (2005), “Unravelling Bhakra: Assessing the temple of resurgent India”, Published by Manthan Adhyan Kendra, Badwani, M.P., PDF file, www.manthan-india.org .
  3. Kalyanaraman, S. http://sarasvati97.blogspot.com
  4. Roy, A.B. and Jakhar, S.R. (2001),” Late quaternary drainage disorganization and migration and extinction of Vedic Saraswati”, Current Science, Vol.81, Number9, pp.1188-95.
  5. Sankaran, A.V.,” Saraswati-the ancient river lost in the desert” Current Science, Vol. 77, No. 8, pp.1054-1060.

—————————————————————————————————-

Reference to this paper:

Proceedings of conference on ‘Vedic River Sarasvati and Hindu Civilization’, held at India International Center, New Delhi, October 24-26, 2008. Edited by S.Kalyanaraman, published by : Aryan Books International , New Delhi and Sarasvati Research and Education Trust, Chennai. ISBN: 978-81-7305-365-8. pp. 88-94.2008.

& http://www.scribd.com/doc/6065010/Athavale-Sarasvati-Manuscript at  http://sites.google.com/site/kalyan97/Nadi

By Mr. R.N. Athavale, Formerly Scientist, National Geophysical Research Institute, Hyderabad, And Emeritus Scientist, CSIR, India.

rathavale@gmail.com

————————————————————————————Tags: Water Logging and Salinisation, Reclamation, Sub surface drainage, disposal in palaeo channels, Rejuvenation of Sarasvati.

श्री. मंगेश नाबर यांच्या लेखमालेचा शेवटचा भाग

जोहान गुटेनबर्ग : आधुनिक मुद्रण तंत्राचा जनक
मंगेश नाबर
भाग सात 
लायब्ररी ऑफ काँग्रेस येथील गुटेनबर्गचे बायबल
फुस्टच्या खटल्याचा हा निकाल जोहानला मोठ्या पेचात पाडणारा होता. एक तर त्याची आर्थिक विवंचना त्याची पाठ सोडत नव्हती. जोहानकडे फुस्टला परत करण्यासाठी फुटकी कवडीही नव्हती. त्यामुळे करारानुसार जोहानला आपली सर्व टूल्स, सर्व छपाई यंत्रे आणि जवळपास छापून झालेले बायबल फुस्टला देणे भाग पडले.
मध्यंतरीच्या काळात जोहानचा कुशल सहकारी  शॉफर  याने एक मात्र साधून घेतले होते. त्याने फुस्टच्या मुलीशी सूत जमवले होते. मग  फुस्टने  त्याला  आपला भागीदार बनवले.  आणि नवे कोरे, बायबल, जगातील पहिले वहिले मुद्रित पुस्तक जेव्हा लोकांसमोर आले, तेव्हा ते फुस्ट आणि  शॉफर  यांच्या  कंपनीने  निर्माण केले, असे  लोकांना वाटले. नव्हे, तसे लोक पुढील कित्येक वर्षे समजत होते. जोहान गुटेनबर्ग हा खरा जनक अंधारात राहिला होता.
पुढे इतिहासाने, उशीरा का होईना, जोहान गुटेनबर्गला न्याय मिळाला. जगाच्या इतिहासात, पहिले छापलेले पुस्तक म्हणून जोहान गुटेनबर्गच्या बेचाळीस ओळींच्या बायबलची नोंद आहे. हे पहिले छापलेले बायबल फुस्टला हव्या असलेल्या लहान आकाराच्या खिळ्यांचे असल्यामुळे जागेत बरीच बचत झाली आहे. याच्या प्रत्येक पानावर दोन कॉलम्स असून प्रत्येकात बेचाळीस ओळींचा मजकूर आहे, म्हणून त्याला म्हणतात बेचाळीस ओळींचे बायबल.
१४५५ किंवा १४५६ मध्ये जेव्हा बायबल पूर्णतया छापून तयार झाले, तेव्हा कुठे लोकांना गुटेनबर्गच्या महान शोधाची  महती पटली. जोहानने मात्र  आपल्या या  हलत्या स्वरूपाच्या मुद्रण तंत्राने सारे जग बदलून जाईल, हे भाकीत केव्हाच केले होते.  या वेळी जोहानला आपली फसवणूक झाल्याची खंत होती. आपण किती  परिश्रमांनी हे सारे घडवून आणले, त्यावर आपले काहीच नियंत्रण राहिले नाही. या सा-या खटाटोपातून आपल्याला प्रचंड धनलाभ मिळेल,  ही त्याची आशा  धुळीला मिळाली. तरीही जोहानने हार मानली नाही. त्या वेळी सबंध जगात मुद्रणाचे ज्ञान जोहान गुटेनबर्गशिवाय  अन्य कुणाकडेही नव्हते.
१४५७ मध्ये जोहानने कॉनरॉड ह्युमेरीकडून कर्ज घेऊन पुनः कार्यशाळा आपल्या घरात उभारली. छोटी पुस्तके, पत्रके, दिनदर्शिका, छापणे त्याने चालू ठेवले. काही काळ तो मेंझपासून  दूर गेलाही असेल. १४५९ मध्ये बायबलची दुसरी आवृत्ती बाजारात आली. मोठ्या आकाराचे खिळे वापरून छापलेल्या या बायबलला छत्तीस ओळींचे बायबल म्हणतात. जरी जोहान गुटेनबर्गने आपले नाव कुठल्याही मुद्रणावर छापले नाही, तरी   इतिहासकारांनी या बायबलचे श्रेय जोहान गुटेनबर्गलाच दिले आहे.
असेही म्हणतात, की १४६० मध्ये जोहानने   क्याथोलिक्यान नावाचा एक प्रचंड ल्याटिन शब्दकोश व विश्वकोश हा एक शेवटचा ग्रंथ छापला. या ग्रंथाच्या शेवटी अनामिक मुद्रकाने आपली भलामण केली आहे, की हे पुस्तक कोणत्याही चकत्या, पिना, किंवा लेखणीच्या मदतीशिवाय, नवलाईच्या कराराने, प्रमाण बद्ध पद्धतीने आणि पंच व टाईप यांच्या मिलाफाने निर्माण केले आहे.
हळूहळू जोहान गुटेनबर्गच्या महान शोधाची बातमी कर्णोपकर्णी सबंध युरोपभर पसरली. हे पुस्तक पाहणारे लहानग्या जोहानसारखे आनंदित झाले, असे मात्र झाले नाही, हे वाचून आश्चर्य वाटले ना ? ग्रंथांचा संग्रह करणा-या एका पुस्तकप्रेमी  इटालीयन उमरावाने म्हणे असे छापलेले एकही पुस्तक आपल्या संग्रहात ठेवण्यास नकार दिला. हातांनी बनवलेल्या पुस्तकाचा स्पर्श व त्याचे रूप त्याला अधिक पसंत होते. आता असंख्य लेखनिक या नव्या धर्तीच्या पुस्तकांच्या आगमनाने नाराज झाले, हे साहजिक होते. त्यांच्या आणि अन्य लोकांच्या  व्यवसायावर गदा आली, हे सांगणे नकोच.
या नव्या धर्तीने बनवलेल्या पुस्तकांच्या आगमनाने जगात नवीन युग आले. युरोपात सर्वत्र छापलेल्या पुस्तकांना प्रचंड मागणी आली. तरुण कारागीर हे नवे मुद्रण तंत्र शिकण्यासाठी मेंझ शहरी येऊ लागले.  १४७० पर्यंत हे नवे लोण युरोपच्या जवळपास चवदा शहरात पोचले. त्या मागोमाग मुद्रण तंत्रात सतत सुधारणा होऊ लागल्या. १४६२ मध्ये मेंझ शहरावर आक्रमण होऊन गुटेनबर्ग वाड्याची जाळपोळ झाली. फुस्टचा छापखाना आणि इतर अनेक व्यवसायांची नासधूस झाली. बरेच लोक मेंझ शहर सोडून गेले. मुद्रण तंत्राच्या आद्य जनकाच्या नगरात आज मुद्रण हा महत्वाचा व्यवसाय मानला जात नाही.
जोहान गुटेनबर्गचे पुढे काय झाले ? त्याचे मुद्रण तंत्र सर्वत्र स्वीकारले गेले, पण त्याचा मानसन्मान झाला का नाही ? १७ जानेवारी  १४६५ रोजी मेंझ नगराच्या आर्चबिशपनी आपल्या व्यक्तिगत सहका-यात जोहानची खास नेमणूक केली. त्याला आता कोणतेही काम करावे लागणार नव्हते. ही नियुक्ती  म्हणजेच  त्याचा मोठा सन्मान होता. त्याबरोबर निवृत्ती वेतन जोहानला त्याच्या आयुष्याच्या अखेरीपर्यंत मिळाले.
उशीराने का होईना, पण जोहानचा गौरव करण्यात आला. त्याच्या आयुष्याची अखेरची तीन वर्षे सुखात गेली. वयाच्या सत्तराव्या वर्षी त्याचे निधन झाले. त्याच्या अनेक गोष्टींप्रमाणे त्याच्या मृत्यूची नेमकी तारीख आजही कळलेली नाही. तूर्त ३ फेब्रुवारी १४६८ ही त्याची पुण्यतिथी मानली जाते.
त्यानंतर तब्बल सदतीस वर्षांनी, १५०५ मध्ये जोहान शॉफर, जोहान फुस्टचा नातू व पीटर शॉफरचा मुलगा याने जोहान गुटेनबर्गच्या आयुष्यभराच्या  महान कार्याची गौरवपूर्वक नोंद केली. त्याने एका पुस्तकात लिहिले :- ,
“printed at Mainz, the town in which the admirable art of typography was invented, in the year 1450, by Johann Gutenberg…”
लेखमाला समाप्त )
जोहान गुटेनबर्गच्या स्मरणार्थ उभारलेले शिल्प – Modern Book Printing
लेखमालेचा संदर्भ :-
1.Fine Print by Joann Johansen Burch
2. Gutenberg by Leonard Everett Fisher
3. A Short Hostory of Printed World by Chappel, Warren (New York, 1970)
4. Johann Gutenberg and His Bible by Ing, Janet (New York, The Typophiles, 1988)
5. Johann Gutenberg: The Inventor of Printing by Scholderer, Victor , London (Yhe Trustees of British Nuseum, 1963)
6. The First Book of Printing by Epstein, Sam & Beryl, New York (Franklin Watts, 1975)
7. Johann Gutenberg and the Invention of Printing by Brayton Harris, New York (Franklin Watts,    1972)
8. Wings of Words by McMurtrie, Douglas C. New York (Rand McNally, 1940)
9. Printing by Ryder, John London (The Bodley Head 1960)
मंगेश नाबर.
७ कृष्ण बिल्डींग क्र. १, गोखले सोसायटी लेन, परळ, मुंबई ४०० ०१२.
दूरभाष : (०२२) २४१३ ५७५५, स्थिरभाष : ९७५७३९३५९८.
mangeshnabar@gmail.com
श्री. मंगेश नाबर यांच्या लेखमालेचा पुढील भाग

जोहान गुटेनबर्ग : आधुनिक मुद्रण तंत्राचा जनक

मंगेश नाबर

भाग ६ 
बर्मुडा येथील  फेदरबेड प्रिंटशॉप संग्रहालयातील  
गुटेनबर्गच्या कार्यशाळेची प्रतिकृती.
जोहान मेंझला परतला. त्याला आपल्या वारसा हक्काचे पैसे मिळाले आणि त्याने तेथे मुद्रणाचे एक दुकान थाटले. पण आपले पुस्तक छपाईच्या संशोधनाचे  स्वप्न तो अजिबात  विसरला नव्हता. त्यातही नवीन काही प्रयोग करून परिपूर्णता आणण्याची त्याची खटपट चालू होती.
स्ट्रासबोर्गमध्ये असतांना त्याने शिसे हा धातू वापरून आपला सारा टाईप बनवला होता. परंतु शिसपेन्सिलीचे टोक जसे झिजते, तसे शिशाचे टाईप लवकरच  झिजत असत, फार काळ टिकत नसत. आता जोहानने म्हणून शिशात दुसरा धातू मिसळून  प्रयोग  करण्याचे ठरवले. धातू खरीदण्यास  बरेच पैसे लागत, हे काय सांगायला हवे ? वारसा हक्काने मिळणारे सर्व पैसे निरनिराळ्या  प्रकारचे धातू खरीदण्यात संपून जात.  १४४८ मध्ये त्याने आणखी एक कर्ज घेतले.
शिशाबरोबर त्याने कथील (Tin) मिसळून पाहिले. पण तरीही अक्षरे खूप मऊ बनायची. लोखंड (iron) व जस्त (zinc) हे अधिक कठीण धातू वापरण्याचा प्रयत्न केला, तर ते वितळण्यास खूप वेळ लागे. इतर धातू थंड झाल्यावर अक्षरे  आखूड व्हायची. सरते शेवटी जोहानपुढे विज्ञानाने हार खाल्ली. शिसे व एनटीमनी (antimony) या धातूंचे मिश्रण जोहानला हवे तसे टाईप मिळवून देण्यात यशस्वी ठरले.
१४५० मध्ये जोहान आपल्या तब्बत तीस वर्षांच्या अथक परिश्रमानंतर आता मुद्रण करायला तयार होता. आता काय छापावे, याचा निर्णय त्याने केव्हाच घेतला होता.बायबल या पवित्र धर्मग्रंथाचे  मुद्रण हे त्याचे स्वप्न होते. पण या महान प्रकल्पासाठी त्याच्याकडे पुरेसा पैसा कुठे होता ? त्यासाठी मेंझच्या काना कोप-यात कोण आर्थिक गुंतवणूक करणार, याचा   धांडोळा जोहान घेऊ लागला.
मेंझमध्ये जेम्स फुस्ट नावाचा एक सुवर्णकार जोहानच्या परिचयाचा होता. त्याचा भाऊ जोहान फुस्ट हा एक श्रीमंत  व्यावसायिक आणि पेशाने वकील होता. या जोहान फुस्टकडे  जोहान गुटेनबर्गप्रमाणे वारसाहक्काने पैसा चालत आला नव्हता. त्याने तो आपल्या वकिली व्यवसायात कमावला होता. जोहानने या  फुस्ट  वकीलसाहेबांना भेटून आपल्या नव्या शोधासाठी आर्थिक गुंतवणूक करण्यात किती लाभ आहे, हे पटवून दिले. आपले प्रस्तावित यंत्र आणि धातूच्या अक्षरातून पुस्तकाच्या शेकडो काय, हजारो प्रती अल्पावधीत तयार होऊ शकतात, यावर जोहान पोटतिडीकेने बोलला.
सारे शांतपणे ऐकून फुस्टने जोहानला या सबंध कामासाठी आठशे गुल्डेनचे कर्ज पुरेल काय, असा नेमका सवाल केला. त्यातून प्रेस तयार करणे आणि बायबल छापण्यासाठी धातूंचे खिळे ( टाईप) बनवायचे होते. या रकमेतून बायबलच्या दोनशे प्रती तयार होऊ शकतील, असे जोहानचे म्हणणे होते. असे छापलेले बायबल आजवर कधीही वाचनात न आलेले सुंदर अलौकिक असे बायबल असेल, कोणताही  लेखनिक असे परिपूर्ण स्वरूपाचे बायबल लिहू शकणार नाही, असा साहजिकच जोहानचा दावा होता.
आठशे गुल्डेन ही रक्कम म्हणजे खूप मोठी बाब होती. त्या काळात यातून शंभर धष्टपुष्ट बैल, एवढेच नव्हे तर कित्येक मोठे शेतमळे विकत घेता आले असते. फुस्ट हा एक सावधगिरीने वागणारा माणूस होता. त्याने हा सौदा विचारपूर्वक केला.  त्याने जोहान गुटेनबर्गला एका करारावर सही करायला भाग पाडले. करारानुसार जर जोहान गुटेनबर्गने हे कर्ज व्याजासह पुढील पाच वर्षात परत केले नाही, तर छपाईची सर्व यंत्रे, सर्व टूल्स, आणि माल धनको फुस्टच्या ताब्यात जाणार होते. या अटी खूप कडक असल्या तरी मुद्रणाचे स्वप्न उरी बाळगणा-या जोहानला त्या मान्य करण्याशिवाय  आपला  शोध  पूर्णत्वास  नेण्याचा दुसरा मार्ग उरला नव्हता.
जोहानची पुढील दोन वर्षे कार्यशाळा उभी करण्यात आणि बायबलच्या छपाईची सर्व व्यवस्था करण्यात गेली. त्याने आता  पीटर शॉफर  नावाचा एक कुशल  सहकारी नियुक्त केला. या  शॉफरने यापूर्वी हस्तलिखितांचे काम लेखनिक म्हणून केले होते. जोहानप्रमाणे तोही एखादे अंगावर घेतलेले काम परिपूर्ण करणारा होता. जोहानच्या प्रशिक्षणातून शॉफरने अल्पावधीत टाईप बनविण्याचे कौशल्य आत्मसात केले. फुस्टला बायबलच्या एकेका पानावर अधिकाधिक शब्द हवे होते. म्हणून शॉफरने नव्या छोट्या आकाराचे टाईप शोधून काढण्याच्या व बनवण्याच्या कामात जोहानला मदत केली. फुस्ट हा सतत  आपल्या  पैशाचे  काय  होते, ही काळजी घेत असे. या छोट्या आकाराच्या टाईपद्वारे  बनविण्यात येणा-या बायबलमधून एक तृतीयांश बचत होईल, असा त्याचा अंदाज  होता.
शॉफरने  कार्यशाळेतील कामगारांना धातूचे खिळे कसे बनवावेत, याचे पद्धतशीर शिक्षण दिले. जोहान तोवर अनेक  प्रेसेस  उभारत  होता. त्या प्रेसवर टाईप भरलेली बायबलची पाने कशी  विशिष्ट प्रकारे व  कौशल्याने ठेवावीत, हे जोहानने सर्व कामगारांना शिकवले. तसेच अक्षरे कशी घासावी, शाईचे मिश्रण कसे करावे, याची इत्यंभूत तांत्रिक माहिती जोहान त्यांना देत होता. तो त्याच्या शोधाचा आणखी एक भाग होता. शाई सर्वत्र समप्रमाणात आणि पुरेशी ओलसर कशी राहील, याची जोहान पुरेपूर खात्री करून घेत होता. त्या खिळ्यांवर शाई पसरवण्यासाठी त्याने कातडी आवरण असलेल्या छोट्या बॉल्सचा मोठ्या कुशलतेने उपयोग केला. ही शाई त्याने, लीनसीड तेल व  दिव्याच्या ज्योतीपासून निघालेल्या, अतिशय बारीक कण असलेली काजळी यापासून बनवलेली  होती.
१४५२ साल उजाडले. जोहानच्या वयाची पन्नाशी केव्हाच उलटून गेली होती, त्याला चोपन्नावे वर्ष लागले होते आणि आता कुठे  तो मुद्रणाला प्रारंभ करणार  होता. गेली तीस  वर्षे  त्याने ज्या कामात घालवली, ते त्याचे संशोधन आता, फुस्टकडून घेतलेल्या कर्जाच्या पैशातून का होईना, पण, जगाच्या समोर येणार होते. आता छपाईला सुरुवात  करणार, तोच पुनः पैशाची चणचण जाणवू लागली.
फुस्टने आणखी आठशे गुल्डेन  देऊ केले. पण जोहानला, करारात स्वतःला भागीदार करण्याची अट घालायला लावले.  जोहानच्या  मनात फुस्टला भागीदार करायचे मुळीच नव्हते.  पण काय करणार ? पैशाची निकड भागवण्याचा तोच एक मार्ग होता. नकोसा  वाटणारा भागीदार, तात्पुरता का  होईना,  पण स्वीकारावा, असे जोहानने ठरवले. एकदा का नफा मिळू लागला, की फुस्टच्या भागीदारीचे जोखड झुगारून द्यावे, असा विचार त्याने केला.
पण जोहानला एवढा पैसा का बरे लागत होता ? वाचक मित्रहो, बायबल हा मुळात एक अतिभव्य प्रकल्प होता. कामगारांच्या  पगाराबरोबर, जोहानने जे  प्रेसेस उभारले होते, त्यासाठी त्याला पैसे मोजावे लागत होते. टाईपसाठी लागणारा धातू आणि  बायबलच्या पहिल्या १८०, होय, एकशे ऐंशी प्रतींसाठी विशेष  प्रतीचे चर्मपत्र (vellum) खरेदी करण्यासाठी त्यांना बराच खर्च येत होता. प्रारंभीच्या तीस प्रती व्हेलमवर आणि बाकीच्या स्वस्त दराच्या  कागदावर  तो  छापणार होता.
जोहानचे कागदाचे बिल पाहिले तर त्याला फुस्टकडून मिळणारा पैसा कसा कसा खर्च होत होता, हे कळत होते. उत्कृष्ट  प्रतीच्या  कागदाच्या पाचशे  तावान्ना एक गुल्डेन असा दर होता. प्रत्येक बायबलच्या प्रतीला ३१० ताव लागत होते. मग  व्हेलमच्या  प्रतीसाठी जोहानला पाण्यासारखा पैसा खर्चावा  लागला, यात  नवल ते कसले ?  जोहानने व्हेलमचे एकूण पाच हजार ताव वापरले होते.
एव्हाना दोन वर्षे केव्हाच निघून गेली होती. बायबल अद्याप पूर्ण झाले नव्हते. त्यात जोहान आपले संशोधन सतत सुधारण्याच्या प्रयत्नात असे. एक अक्षर जरी अस्पष्ट छापले गेले, तरी जोहान ते अख्खे पान फेकून द्यायचा आणि नवा खिळा जोडून ते पान पुनः बनवण्याच्या मागे असे. प्रत्येक पानन पान स्पष्ट आणि अचूक आलेच पाहिजे, अन्यथा त्याचा बायबलसाठी उपयोग करायचा नाही, हा जोहानचा निर्धार असे.
याशिवाय, जोहान आपला वेळ फुस्टला हव्या असलेल्या पुढच्या पुस्तकासाठी लागणा-या खिळ्यांच्या नव्या संचाच्या निर्मितीसाठी खर्च करत होता. जोहानने  भविष्यातील आपल्या स्वतःच्या छापखान्याची तयारी चालवली होती. हे फुस्टला  ठाऊक  नव्हते. मुद्रणाचे छोटे मोठे जॉब घेऊन जो पैसा मिळेल, त्यावर  जोहान बायबल पूर्ण होईपर्यंतच्या  काळात आपले पोट भरत होता.
फुस्टकडून पहिले कर्ज घेतल्यावर पाच वर्षे कधी निघून गेली ते कळले नाही. मग फुस्टने ते पैसे आणि त्यावरील  व्याज  मिळून  दोन हजार सव्वीसशे गुल्डेन या रकमेसाठी जोहानवर न्यायालयात दावा दाखल केला. बायबल पूर्ण होत आले असतांना, काही थोडेच महिने उरले असतांना, फुस्टने हा दावा का केला, ते कळत नाही. कदाचित त्याला, जोहानने  गुपचूपपणे  चालवलेल्या दुस-या छापखान्याच्या तयारीची कुणकूण  लागली असावी. आणि वाटले असावे, की जोहान आपल्याला फसवू पाहत आहे. अथवा फुस्टला अशी जाणीव झाली असेल, की एकदा का बायबल पूर्ण छापून झाले, की जोहान भागीदारी संपुष्टात आणणार. त्यामुळे त्याने असे पाहिले, की पहिल्या छापलेल्या बायबलवर येईल तो पैसा व कीर्ती, जोहान किंवा  आपण आपल्या पदरात पाडून घेणार हे नक्की. तेव्हा जोहानवर खटला भरून आपणच जेता व्हावे. थोडक्यात, हा एकमेकांवरच्या अविश्वासाचा परिणाम होता.
६ नोव्हेंबर १४५५ रोजी फुस्टच्या दाव्याची सुनावणी पूर्ण झाली. न्यायाधीशांनी फुस्टच्या बाजूने निकाल दिला. जोहानला आता मूळ कर्जाची  रक्कम,  त्यावरील व्याज आणि दुस-या कर्जाचा काही अंश, जो जोहानने आपल्या छापखान्यावर खर्च केला,  ते सारे देणे भाग होते.  ( पुढील भागात लेखमाला समाप्त. )
मंगेश नाबर
७ कृष्ण बिल्डींग क्र. १, गोखले सोसायटी लेन, परळ, मुंबई ४०० ०१२.
दूरध्वनी क्र. (०२२) २४१३ ५७५५, ९७५७३९३५९८.
mangeshnabar@gmail.com
श्री. मंगेश नाबर यांच्या लेखमालेचा पुढील भाग

जोहान गुटेनबर्ग : आधुनिक मुद्रण तंत्राचा जनक 


मंगेश नाबर


भाग ५ 

गुटेनबर्ग याने  मुद्रणासाठी वापरलेले धातूचे शिक्के व पट्ट्या
     जोहानने ड्रीटझेन आणि हाईलमन यांना बोलावून आपली योजना उघड केली. मेंझमध्ये काय अख्या युरोपमध्ये सर्व लेखानिकांची टीम  मिळून एखादे हस्तलिखित  आपल्या सबंध आयुष्यभर खपून पूर्ण करू शकतात, त्याहून कितीतरी अधिक प्रती अतिशय थोड्या दिवसात निर्माण करण्याचा त्याचा हा शोध आता पूर्णत्वाला जाण्याच्या बेतात होता आणि ते खरोखर घडून आले तर, अगणित संपत्ती मिळण्याचा संभव होता. जो कुणी या प्रकल्पात भांडवल गुंतवेल,  तोदेखील या संपत्तीचा भागीदार होऊ शकत होता.
जोहानने त्या दोघांना सांगितले, की त्याला अद्यापही काही कच्च्या मालासाठी पैशाची जरुरी आहे. ज्या काही किरकोळ अडचणी आहेत, त्या सोडवायला एखाद दुसरे वर्ष लागेल, असे त्याला वाटत होते. एकदा का त्यांची सोडवणूक झाली, की धातूंची अक्षरे व प्रेस यांच्या मदतीने, यंत्रावर, हाताशिवाय पुस्तकेच पुस्तके बनवता येणार होती.
त्याच्या भागीदारांना त्याचे हे संशोधन आणि संभाव्य संपत्तीतील आपला वाटा याबद्दल रस उत्पन्न  झाला. ड्रीटझेन आणि हाईलमन हे आणखी  दोनशे  पन्नास गुल्डेनची गुंतवणूक  करण्यास राजी झाले. म्हणजे एकूण चारशे दहा  गुल्डेन जमत होते. जोहानने त्यांना ताबडतोब पन्नास  गुल्डेन रोखीने देण्यास आणि उर्वरीत रक्कम पुढील काही वर्षात देण्यास सुचवले. हे सारे अत्यंत गुप्त राखण्याचे वचन जोहानने त्यांच्याकडून घेतले. शिवाय त्याने एक करारपत्र तयार  केले.  त्यात असे नमूद केले होते, की सन १४४३  पूर्वी या करारातील कोणीही भागीदार निधन पावला, नवीन भागीदार सामील होऊ शकणार नाही.
हाईलमनच्या भावाने मान्य केलेले पन्नास गुल्डेन चुकते केले, तरी ड्रीटझेनची मजल जेमतेम  चाळीस गुल्डेनपर्यंत जाऊ शकली. त्यासाठी त्याला आपल्या पित्याच्या वारसाहक्काने मिळालेल्या शेतजमिनीवर कर्ज काढावे लागले. त्याने तेथे कूळ म्हणून राहाणा-या शेतक-याला आलेले पीक विकायला सांगितले. पण त्याला फारच कमी भाव मिळाला. तरी त्याने त्यातून आपली रक्कम कशीबशी उभी केली.
जोहानने ड्रीटझेनला  दहा गुल्डेनसाठी थोड्या दिवसांची मोकळीक दिली. कारण तो स्वतः एक कुशल कारागीर होता आणि त्याला जोहानच्या या अभिनव  संशोधनाबद्दल एवढी खात्री होती, की पुढील पैसे देण्याची वेळ येण्यापूर्वी यशाची प्राप्ती होईल आणि त्याचे कर्ज फिटून जाईल.
जोहानने आपल्या भागीदारांना सुवर्णकारांचे धातू वितळविण्याचे मूलभूत तंत्र शिकवले. जोहान जशी मातीच्या साच्यातून अक्षरे बनवीत होता, तसे ते करणार नव्हते. ते, जोहानने अलीकडील काळात परिपूर्ण केलेली तीन टूल्स – पंच, म्याट्रीक्स आणि मोल्ड (punch, matrix & mould) – वापरणार होते.
पंच बनवण्यासाठी जोहानने एका पोलादाच्या बारीक पट्टीपासून एकेक अक्षर कापून बनवले. ते कानशीने पुनः पुन्हा घासून त्याला व्यवस्थित आकार दिला. जोहानचे हे पंच हे पूर्वी पुस्तक  बांधणी  करणा-यांच्या पितळी अक्षरांसारखे दिसत होते. ते अक्षर चामड्याच्या पुस्तकाच्या आवरणावर  दाबण्याऐवजी जोहानने ते ज्योतीवर  असे धरले, की त्याच्या काजळीचा थर जमा व्हावा. मग त्याने हे काजळीने माखलेले एकेक अक्षर एका कागदाच्या तुकड्यावर दाबून पाहिले. कागदावर उमटलेले अक्षर छापलेल्या अक्षरासारखे निर्दोष आले होते.
म्याट्रीक्स बनवण्यासाठी जोहानने तांब्याची किंवा पितळेची एक पट्टी गरम केली. इथे त्याचे धातूवर काम करण्याचे तंत्रज्ञान कसाला लागले होते. मग आधी बनवलेल्या पंचला त्या पट्टीवर हातोडीच्या सहाय्याने टोकले. पंच दूर केल्यावर पाहिले तर त्या पट्टीवर पंचचा म्हणजे अक्षराच्या आकाराचा ठसा  उमटला होता.  आता ही पट्टी म्हणजे अक्षराची प्रतिकृती तयार झाली होती, किंवा म्याट्रीक्स बनली होती.
यानंतर, जोहानने म्याट्रीक्सला एका छोट्या लाकडी पेटीच्या तळाशी बसवले. हा झाला मोल्ड. मग त्याने तप्त धातूचा द्रवरूप रस त्या मोल्डमध्ये ओतला. खूप हलवून तप्त रस मोल्डच्या आतील सर्व कानाकोप-यात पोचल्याची खात्री करून घेतली. त्या मोल्डला थंड होऊ दिले. तो पूर्णपणे  घन स्वरूपात आल्यावर त्याने मोल्ड उघडला आणि आतील धातूचे अक्षर बाहेर काढून  तपासले. आता ते धातूचे अक्षर म्हणजे काही इंच लांबीचा एक टाईपचा तुकडा तयार झाला होता. एक प्रकारे ते उंचावलेले अक्षर झाले होते. ही तयार झालेली धातूची अक्षरे असलेली धातूची दांडी प्रेसमध्ये दाबणे, ही जोहानची कल्पना खरोखरच अभिनव व क्रांतिकारक होती. या अक्षरांचे शब्द, शब्दांची वाक्ये, वाक्यांचे परिच्छेद, आणि या प्रकारे, शेवटी सबंध पान तयार होऊ लागले. यासाठी जोहानला आता अनेक टाईपची आवश्यकता होती.
ड्रीटझेन आणि हाईलमन यांनी पंच, म्याट्रीक्स आणि मोल्ड वापरून इंग्रजीतील सर्व अकार विल्हे अक्षरांचे टाईप तयार केले. इंग्रजीतील आय आणि एल (I, i and L, l) ही बारीक अक्षरे आणि एम, डब्ल्यू (M, m and W, w ) ही जाडसर अक्षरे मोल्डमध्ये कशी बसवावीत,हे जोहानने त्यांना दाखवले.यापूर्वीच त्याला कळून आले  होते, की जर अक्षरांची मांडणी नीट केली नाही, तर ती अक्षरे सुटी राहतील. उदा. I  i  k  e  t  h  i  s .
ड्रीटझेन आणि हाईलमन यांनी  असे अनेक टाईप तयार केले. कारण एकेक पान बनवतांना  जोहानला एक अक्षर अनेक वेळा लागत असे. त्याला अजूनही टाईप बसवतांना, ते घसरणे, वेडी वाकडी छपाई येणे, या अडचणी येत होत्या. अक्षरे नीट ओळीने बसवणे आणि छपाई होतांना ती एक सारखी येत राहणें, याची गरज होती.
जोहानने  मग कॉनरॉड साह्स्पाच नावाच्या एका कुशल प्रतीच्या सुताराला पाचारण केले. त्याच्याकडून हे सारे टाईप ठेवण्याच्या अधिक चांगल्या चौकटी बनवून घेतल्या. त्यालाच जोहानने आपल्या कल्पनेनुसार प्रेस बनविण्यास सांगितले. या प्रेसमधील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे एक लांब ह्यांडल लावलेला भला थोरला लाकडी स्क्रू होय. जुळणी कामात तरबेज असलेल्या सुताराकडे  अशा प्रकारचा स्क्रू बनवण्याचे कौशल्य असते.
ड्रीटझेनच्या शहरातील घरात जोहानला हवा तसा हा प्रेस बसवण्यात आला. त्या मागचा हेतू हा होता, की कुणाही बाहेरच्या  ति-हाईताला छपाईची संपूर्ण प्रक्रिया एकाच स्थळी  पाहायला मिळू नये. अशा प्रकारे  ड्रीटझेनचे सेंट आर्बोगास्टमध्ये जोहानबरोबर काम करतांना सतत  दिवसामागून  दिवस जात होते. रात्री तो आपल्या घरात हे प्रयोग पुढे चालू ठेवत होता. त्यात खंड पडू देत नव्हता. प्रेसवर बनवलेल्या टाईपची चाचणी घेत होता.
त्याचे हे काम सतत रात्रंदिवस चालू असल्याचे त्याची शेजारीण बार्बारा हिच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नाही. एकदा ती तर ड्रीटझेनच्या घरात घुसली.
” काय रे बाबा, रात्रीदेखील झोपत नाहीस ? ” तिची शंका रास्त होती.
” मला हे तातडीनं पुरं केलंच पाहिजे, ” ड्रीटझेनने प्रेसवर टाईपची जुळवाजुळव करत करत उत्तर दिले.
बार्बाराचा पुढचा प्रश्न तयार होता. तिने तो नेमके काय करतोय याची चौकशी आरंभली. आपण आचेनच्या जत्रेसाठी आरसे तयार करत असल्याची त्याने  बतावणी केली. जर कुणी आपल्या गुप्त कामाची चौकशी करायला येऊन ठेपलाच, तर सर्वांनी एकच  उत्तर द्यायचे हे जोहानने पढवून ठेवले  होते.
पण बार्बाराची बडबड चालूच राहिली. ” अरे वा, या कामासाठी तुला बरेच पैसे मोजावे लागले असणार  तर !  कमीत कमी दहा गुल्डेन तरी पडले असणार.”
आधीच ड्रीटझेन कामावरून थकून भागून घरी आला होता. त्यात बार्बाराच्या न संपणा-या टकळीने  पुरा कातावला आणि तिच्यावर खेकसला, ” हे पहा, तुला काय कळणार याचं गणित ? ऐक, मला यासाठी तीनशे गुल्डेनही लागले असतील. तुला ते तुझ्या आयुष्याभरही पुरतील. मी यासाठी मजजवळची सारी रोकड  आणि वारसा हक्काची जमीनही पणाला लावलीय. काय समजलीस ? ”
” पण.. पण हे खराब निघाले तर ? मग काय करशील तू ? ”
” ते खराब होणारच नाहीत मुळी. वर्षभरात हे सारं पुरं होईल. मग माझे सारे पैसे परत मिळतील. ”
अति कामामुळे आधीच ड्रीटझेनची तब्येत खालावली होती. नाताळ येण्याआधी त्याने अंथरूण धरले. मग जोहानने आपल्या नोकराला ड्रीटझेनच्या घरून टाईप परत आणायला पाठवले.
१४३८ च्या डिसेंबरमध्ये  ड्रीटझेनचे कफल्लक अवस्थेत  निधन झाले.
ड्रीटझेनच्या अकाली निधनानंतर जोहानने जे काही  केले, यावर तुमचा विश्वास बसणार नाही. त्याने सर्वप्रथम आजवर जो काही टाईप बनवला होता, तो साराचा सारा टाईप  वितळवून टाकला. जो टाईप, ड्रीटझेनच्या घरी होता, त्याच्यावर ड्रीटझेनच्या नातलगांनी आपला मालकी हक्क दाखवायला मागेपुढे पाहिले नाही. जोहानची कोणताही धोका पत्करण्याची तयारी नव्हती. आपले गुपित दुस-याला कळण्यापेक्षा, ते सारे शून्यापासून पुनः सुरू करणे त्याला अधिक पसंत होते.
जेव्हा हाईलमनला ड्रीटझेन गचकल्याचे कळले, तेव्हा तो कॉनरॉडच्या घरी गेला. तो म्हणाला, ” कॉनरॉड,  आता ड्रीटझेन गेला, तू हे प्रेस तयार केले आहेस. तुला हे गुप्त ठेवण्यासाठी एक केलंच पाहिजे. आताच्या आता, ड्रीटझेनच्या घरी जा आणि तिथला सारा प्रेस मोडून टाक. ”
कॉनरॉड त्याप्रमाणे तिथे गेला, तर त्याला प्रेस मोडून टाकलेला आढळला. जोहान त्याच्या आधीच पोचला होता.
ड्रीटझेनचा थोरला भाऊ जॉर्जने जोहानकडे मागणी केली, की त्याला व त्याचा धाकटा भाऊ निकोलस याला ड्रीटझेनच्या जागी भागीदार म्हणून घ्यावे. जॉर्ज हा  तेथील एक कनिष्ठ अधिकारी असून त्याचा तापट स्वभाव  सर्वपरिचित  होता. जोहानने त्याला सांगितले, की करारानुसार आता कुणालाही भागीदारीत घेता येणार नाही. जॉर्जला ड्रीटझेनने गुंतवलेले सारे पैसे परत हवे होते आणि त्यासाठी तो न्यायालयात गेला. पण करारपत्रातील कलमाप्रमाणे जोहानची सुटका झाली.  करारात ड्रीटझेनच्या वारसासाठी फारच थोडे पैसे ठेवले होते. पण ड्रीटझेन इतका विसरभोळा होता, की करारपत्र त्याच्यापाशी असतांना  करारावर त्याने सहीच केली नव्हती.
झाले, १४३९ मध्ये जोहानला पुनः कोर्टाची पायरी चढावी लागली. त्याला सारखी काळजी असे, की कोर्टात सुनावणीच्या प्रसंगी आपले गुपित बाहेर येईल. पण सुदैवाने त्याच्या भागीदारांनी त्याच्या कामाविषयी चकार शब्द काढला नाही. खटला वर्षभर चालला. तोपर्यंत जोहानचे सारे काम थंडावले होते.
अखेर निकाल त्याच्या बाजूने लागला. पण तोपर्यंत भागीदारीतला सारा पैसा संपून गेला.  उरलेले भागीदार एकही गुल्डेन द्यायला राजी होईनात. जोहानने चर्चकडून थोडे कर्ज घेतले. ते संपल्यावर कोणीही त्याला दारावर उभा करत नव्हते.
हताश झालेल्या जोहानने भागीदारांकडे पुनः याचना करून पाहिली. पण त्यातून  काहीही निष्पन्न  झाले नाही. आता मेंझला परत जाण्याशिवाय  आणि मालमत्तेतील आपल्या वारसाहक्काचे पैसे घेतल्याशिवाय जोहानकडे दुसरा मार्ग उरला नव्हता.  ( क्रमशः )
– मंगेश नाबर
७ कृष्ण बिल्डींग क्र. १, गोखले सोसायटी लेन, परळ, मुंबई ४०००१२.
दूरध्वनी क्र. (०२२) २४१३ ५७५५, सेल क्र. ९७५७३९३५९८
इंटरनेट : mangeshnabar@gmail.कॉम
लेखाची पूर्व प्रसिद्धी – दै. नवप्रभा, पणजी, गोवा.
श्री. मंगेश नाबर यांच्या लेखमालिकेतील पुढचा भाग

जोहान गुटेनबर्ग : आधुनिक मुद्रण तंत्राचा जनक

मंगेश नाबर

भाग ४  


     जोहान ज्या स्त्रीवर भाळला होता, तिचे  नाव होते, एनेलीन. ती एक बुद्धीमान, बराच प्रवास केलेली आणि मुख्य म्हणजे खानदानी घराण्यातली होती. जोहानप्रमाणे स्ट्रासबोर्गमधील अनेकांना तिच्याबद्दल आदरभाव होता. तिचे सौंदर्य व बुद्धीमत्ता यावर भाळून जोहानने तिला लग्नाची मागणी घातली आणि तिने आपला होकार कळवला.
परंतु अचानक माशी कुठे शिंकली, कोण जाणे,  जोहानने आपला विचार बदलला आणि विवाह न करण्याचा निर्णय घेतला. जोहानने असे का केले, याबाबत इतिहासात कुठेच नोंद नाही. कदाचित या वेळेपर्यंत त्याचे वय अडतीस झाले होते, त्यामुळे आता विवाहबंधनात पडायला उशीर झाला आहे, असे त्याच्या मनाने घेतले असावे. आणखी एक कारण असेही असावे. जोहानने आपल्या संशोधनासाठी आता वेळ कमी करून आपल्याकडे लक्ष द्यावे, अशी एनेलीनची इच्छा होती. काहीही असले, तरी एनेलीन जोहानच्या नकारामुळे संतापली आणि तिने जोहानवर आपल्याला दिलेले वचन मोडल्याबद्दल १४३६ मध्ये खटला भरला.
त्या काळात सर्वसाधारणपणे असे खटले होत असले तरी कोर्टाची पायरी चढण्याची जोहानची ही पहिली वेळ होती. भविष्यात, अशा अनेक  खटल्यांना  जोहानला तोंड द्यावे लागणार होते. स्ट्रासबोर्ग शहर न्यायालयात हा खटला चालला. बहुतेक   साक्षीदारांनी   जोहानविषयी चांगले मत दिले आणि आदर व्यक्त केला. त्याच्याबरोबर आर्थिक व्यवहार करणा-यांनी ही त्याच्या सच्चेपणाची ग्वाही दिली. परंतु एका साक्षीदाराने प्रतिकूल मत दिले. तो होता, एनेलीनचा चांभार. त्याच्या या साक्षीवरून जोहान इतका संतप्त झाला, की भर न्यायालयात त्याने, हा चांभार एक फालतू माणूस असून  फसवणूक   व  खोटेपणावर  आपले पोट भरतो, असे उद्गार काढले.
न्यायाधीशांनी एनेलीनच्या खटल्यात जोहानच्या बाजूने निकाल दिला. एनेलीनने नुकसान भरपाईपोटी मागितलेली रक्कम जोहानला भरण्याची पाळी आली नाही. परंतु त्या चांभाराने जोहानवर अब्रूनुकसानीचा खटला भरला आणि त्यात जोहानला दोषी ठरवण्यात येऊन त्याला पंधरा गुल्डेनचा जबर दंड भरावा लागला. जोहानच्या ओढगस्तीच्या काळात हे पंधरा गुल्डेन म्हणजे खूप होते. या सर्व कटकटीचा जोहानला बराच मनस्ताप झाला, हे सांगायला नकोच. पण हे पैसे कसे परत मिळवावे, याचा विचार त्याने करून ठेवला.
१४३९ या वर्षी स्ट्रासबोर्गपासून जवळच्या आचेनमध्ये एक मोठी जत्रा भरणार होती.  या जत्रेचे वैशिष्ट्य असे, की दर सात वर्षांनी  या जत्रेत येशू ख्रिस्ताचे  पवित्र अवशेष भाविकांच्या दर्शनासाठी ठेवले जात असत. येशू जन्माला आल्यानंतर, त्याला जे कपडे घातले होते, ते कपडे, तसेच त्याच्या मातेने म्हणजे मेरीने, तो जन्माला येण्याच्या वेळी जे कपडे वापरले होते, ते सारे कपडे प्रदर्शनार्थ ठेवलेले असत. या पवित्र वस्तूंच्या दर्शनासाठी युरोपातून आचेनमध्ये असंख्य  लोकांची गर्दी उसळे. हे यात्रेकरू तेथे आल्यावर आपल्यावर भगवान येशूची कृपा व्हावी म्हणून, किंवा एखादा आजार बरा व्हावा म्हणून, किंवा एखाद्या पापातून  प्रभूने क्षमा करावी म्हणून, काही खास वस्तू ते प्रभूकडे मागत.
यावर जोहानने डोके लढवून या यात्रेकरुंसाठी बिल्ले विकण्याची एक शक्कल काढली. यात्रेकरुंना आचेनला जाऊन आल्यावर यात्रेची काही तरी एक खूण म्हणून आपल्या सगेसोय-यांना दाखवता यावी, असा त्यामागचा हेतू होता.  जोहानने  स्ट्रासबोर्गची एक महनीय व्यक्ती,  हान्स राईफ याला या योजनेत एक भागीदार  होण्यास सुचवले. राईफ या बिल्ल्यांसाठी लागणा-या कच्च्या मालासाठी पैसे मोजणार होता आणि या सौद्यातून होणा-या नफ्याचा एक तृतीयांश हिस्सा त्याला मिळणार होता.   जोहान अर्थातच, हे बिल्ले बनवणार होता आणि आपण या नफ्यातला दोन तृतीयांश वाटा घेणार होता.
ऎनड्र्यूझ ड्रीटझेनला जोहानच्या या नव्या योजनेचा सुगावा लागला आणि त्यानेही आपल्याला भागीदार करण्याची विनंती केली. शिवाय, ऐन्थनी हाईलमन या धर्मगुरूला हे कळल्यावर, त्यानेही आपला भाऊ ऎनड्र्यूझला सहभागी करावे अशी जोहानला गळ घातली. फादरने आपल्या भावाला हे काम शिकवण्यासाठी जोहानला काही पैसेही देऊ केले. यात्रेकरुंच्या बिल्ल्यांच्या या व्यवहारात आणखी पैसे मिळवण्याचा हा एक मार्ग बरा होता. दोघा ऎनड्र्यूझनी जोहानला प्रत्येकी ऐंशी गुल्डेन देऊ केले. जोहानने मग एक रितसर करारपत्र तयार केले. सबंध नफ्यातला पन्नास टक्के वाटा तो  आपल्याकडे   राखणार  होता, हान्स राईफला पंचवीस  टक्के तर  ऎनड्र्यूझ ड्रीटझेन व ऎनड्र्यूझ हाईलमन या दोघात  उरलेले  पंचवीस टक्के  सम प्रमाणात  विभागून   मिळणार  होते.
हे चौघे मिळून बिल्ले बनवण्यासाठी खूप कष्ट करू लागले आणि त्यातून पुष्कळ धनलाभ होईल, अशी मनोराज्ये करू लागले. हे बिल्ले म्हणजे धातूच्या चौकटीत बसवलेले आकर्षक आरसे होते. युरोपात असे आरसे नवीनच होते. त्यात जोहानने टिन अथवा शिसे वितळवून त्याचा मुलामा दिलेली काच त्यावर बसवलेली होती. यात्रेकरू हे बिल्ले आपल्या कोटावर लावतील आणि त्यात पवित्र अवशेषांचे प्रतिबिंब पडेल, या विचारामागे अशी  श्रद्धा होती, की पडणारे प्रतिबिंबही पवित्र असून ते यात्रेकरुंना जीवनाच्या अंतापर्यंत सोबत करणार.
जोहान इतरांना, हे बिल्ले कसे बनवावेत, खड्यांना पॉलिश कसे करावे, हे शिकवत होता. मात्र या खटाटोपात त्याने, जलद गतीने छपाई करून पुस्तके  बनवण्याची आपली मूळ योजना मुळीच सोडून दिलेली नव्हती. उलट, या सा-या व्यवहारातून होणा-या नफ्याचा कसा उपयोग करावा, याबाबतचे त्याचे बेत तयार होते. आपल्या संशोधनातून अनेक अडथळे पार करत करत त्याने प्रगती साधली होती, परंतु तो स्वतः मुळात परिपूर्णतावादी असल्यामुळे मिळणा-या तात्पुरत्या यशावर तो समाधान मानणारा नव्हता.
तेव्हढ्यात अचानक पुनः विघ्न आले. एक अत्यंत दुःखद व धक्कादायक अशी बातमी त्यांच्या कानावर आली. आचेनची जत्रा एका वर्षासाठी पुढे ढकलली  गेली  होती. जोहान कमालीचा निराश झाला. त्याच्या भागीदारांनाही वाईट वाटले.  त्यांच्या कामातून वसूल होणा-या पैशाची आता त्यांना आणखी एक वर्षभर वाट पाहावी लागणार होती. जोहानच्या मुद्रण तंत्राच्या संशोधनाचे सारे भविष्य ज्यावर अवलंबून होते, त्यावरही  पाणी पडले होते.
भागीदारांनी मग सेंट आर्बोगास्टच्या कार्यशाळेत शोधाशोध केली. बिल्ल्यांसाठीची टूल्स आणि मटेरीयल्स यांचा  शोध घेतला. पण त्यांच्या हाती  काहीही  लागले नाही. जोहान त्यांच्यापासून काही तरी लपवीत होता, हे त्यांना कळून चुकले. त्यांनी जोहानला ठासून सांगितले, की तेदेखील या व्यवहाराचे भागीदार आहेत. त्यांच्यापासून काहीही गुपित राहू नये. त्यांना सर्व तंत्र  शिकवण्याचे  ज्ञान  जोहानकडून हवे होते. मग जोहानने थोडी माघार घेतली आणि यावर विचार करीन असे आश्वासन दिले.
ते गेल्यानंतर जोहानने स्वतःशी आपल्या भविष्याचा ताळेबंद मांडला. त्याच्या मनात विचारांचे थैमान माजले होते. आपण मेंझला परत जावे का ? तेथे गेल्यावर त्याला पैसे मिळणार होते. मग त्याने स्ट्रासबोर्गमध्ये राहावे आणि आपल्या  संशोधनावर पाणी सोडावे ? जोहानाची नजर आजवर बनवलेल्या धातूच्या अक्षरांवर गेली. त्यांना तो “टाईप” म्हणत असे. त्याने पूर्णपणे बनवलेल्या अक्षरांचा धांडोळा घेतला, ती सारी अकारविल्हे एका पेटीत मांडली.  त्याच्या कल्पनेला आता मूर्त स्वरूप आले होते.
जोहानला आपल्या कामाचा अभिमान वाटला. ते अत्युत्तम असल्याची पडताळणी त्याने केली, तेव्हा त्याचे मन सांगू लागले, की हे एक विशेष संशोधन आहे. यशाच्या इतक्या निकट आल्यावर आता सेंट आर्बोगास्ट सोडणे कितपत योग्य होते ? मग त्याने निर्णय घेतला, की आपल्या भागीदारांना या रहस्याचा काही अंश का होईना, उघडपणे सांगून टाकावा…… परंतु भरपूर पैशाच्या मोबदल्यातच. त्यांना सारे काही शंभर टक्के सांगून टाकायची त्याची तयारी नव्हती.  (क्रमशः )
– मंगेश नाबर
७ कृष्ण बिल्डींग क्र. १, गोखले सोसायटी लेन, परळ, मुंबई ४०००१२.
दूरध्वनी क्र. (०२२) २४१३ ५७५५, सेल क्र. ९७५७३९३५९८
इंटरनेट : mangeshnabar@gmail.कॉम
लेखाची पूर्वप्रसिद्धी – दै. नवप्रभा, पणजी, गोवा.
श्री.यशवंत कर्णिक यांचा नवीन लेख

 जिसणे लाहौर नही देख्या…

यशवंत कर्णिक

संध्याकाळी उन्हं कलल्यावर जवळच्या एका बागेत जाऊन थोडी सैर करण्याचा नि थोडं बाकावर बसून मित्रमंडळींशी गप्पा मारण्याचा काही वर्षंमाझा शिरस्ता आहे. त्यात खंड पडतो तो पावसाळ्यात.

मित्रमंडळी विविध प्रांतांतून आलेली, भिन्न भाषांची, धर्मांची आणि विचारांचीही. निरनिराळ्या विषयांवर चर्चा चालतात. सगळी बहुधा ज्येष्ठ नागरिक ह्या सदराखाली मोडणारी असल्यामुळं

स्मरणरंजन मोठया प्रमाणात चालतं. ते कधी रंजक असतं तर कधी कंटाळवाणं. बोअरिंग. उत्तर भारतीय बरेच आहेत. तेव्हां दिल्ली, चंदीगड, अमृतसर, या शहरांत चक्कर होतेच. कनॉट प्लेस, बंगाली मार्केट, गली प्राठेवाली , ढाबा काकेदा, सेक्टर सतरा, सुवर्ण मंदिर वगैरे ठिकाणची सैर होते. अनुभव पुन्हापुन्हा ऐकावे लागतात.

दलजीतसिंग नावाचा सरदारजी येतो. तो पंजाबी नि उर्दू शायरी ऐकवतो. त्याला  म्हणे वयाच्या दहाव्या वर्षी आईवडिलांबरोबर लहोर सोडून हिंदुस्थानात यावं

लागलं. त्यामुळं त्याची स्मरणगाथा हप्त्याहप्त्यानं ऐकावी

लागते. त्याच्या मते लाहोरसारखं सुंदर शहर जगाच्या पाठीवर

दुसरं नसेल. तो सर्वाना आळीपाळीनं विचारतो ” आपने देखा? “, ” तुसी देख्या? ” ” तुम्ही पाह्यलंय? “. मी सोडून इतरांनी ‘नाही’ म्हणत माना डोलावल्या की आपल्या सफेद झालेल्या दाढीमिश्यांवरून  हात फिरवीत पंजाबीत गर्जना

करतो,

” फिर क्या देख्या जी? जिसणे लाहौर नही देख्या उसणे जिंदगी में कुछ भी नही देख्या ! “.

सगळे हसतात. दलजितसिंगाचं लाहोर पुराण काही त्यांनी पहिल्यांदाच ऐकलेलं नसतं. कुणीतरी माझ्या कानांत कुजबुजतं,

” बारा तो कबके बज गये थे “.

बारा वाजता सरदारजींचा मेंदू काही काळासाठी काम द्यायचा थांबतो हा विनोद आता खूप शिळा झालाय.

मी हसत नाही. मला दलजीतसिंगच्या उद्गारात अतिशयोक्ती दिसत नाही. मी  लाहोर पाहिलंय आणि  माझी खात्री पटलीय की इतकं सुंदर ऐतिहासिक शहर निदान आपल्या देशात तरी नाही. मी तीन चार महिनेच तिथं होतो. दलजीतसिंग दहा वर्षं होता. आयुष्याची पहिली दहा वर्षं.   बालपणीचा काळ मजेचा.  त्या वयातल्या आठवणी माणसाला व्याकुळ करतात.

अश्याच  एका संध्याकाळी   मी आठवणींत रमतरमत पासष्ट  वर्षं मागं गेलो.

वायुदलात प्रवेश केल्यावर प्रशिक्षणासाठी लाहोरला रवानगी झाली होती. एका मध्यरात्री फ्रंटियर मेलनं लाहोर स्टेशनवर उतरलो पाच-सहा सहका-यांसमवेत.

स्टेशन एखाद्या बोगद्यासारखं. त्यात गुडूप अंधारात. कारण दुस-या महायुद्धाचे दिवस होते आणि मोठया शहरांत ब्ल्याकआउट असे. स्टेशन मास्तर च्या खोलीत

प्रभाकर कंदील. खाण्यापिण्याच्या स्टोल्स वर मिणमिणते दिवे. तिथं उर्दू नि हिंदीत पाट्या.  ‘ हिंदू पानी’, ‘मुसलमान पानी’, ‘हिंदू चाय’, ‘मुसलमान चाय’, ‘हिंदू पुरी’, ‘मुसलमान पुरी’. आमच्यात पण  फाळणी झाली. पांगिरे मुसलमान होता. तो थाटात ‘मुसलमान पानी’ पिऊन  आला. लोखंडे ख्रिश्चन. त्याला कुठलं पाणी प्यावं कळेना. मग तो  दोन्हीकडचं थोडंथोडं प्यायला. आम्ही घाबरत घाबरत चोरून हिंदू पाणी प्यायलो कारण आम्हाला लाहोरला जाताना कुणीतरी सांगितलं  होतं की पंजाबातले  मुसलमान फार कट्टर असतात. ते अचानक हिंदूंवर हल्ला करून त्यांचा अफझलखान करून टाकतात, म्हणजे  कोथळे बाहेर काढतात. मनात भीति ही की अश्या मध्यरात्री आपण हिंदू आहोत हे कुणाला कळलं तर?  असे आम्ही शूर, एअर फोर्स जॉईन करायला निघालेलो !

स्टेशन मास्तर मात्र कुणी लाला होता. त्यानं सरळ सरळ कपाळावर गंध लावलेलं. तो म्हणाला, रात्र इथच काढा. सकाळी फोन करतो. गाडी पाठवतात तेनवीन रिक्रुटाना  न्यायला.

तिस-या वर्गाची वेटिंग रूम भयानक  अस्वच्छ  होती. म्हणून स्टेशनच्या बाहेर फरशीवर पथा-या टाकल्या. थकलो होतो. झोप लागते न लागते तोच मोठ्याने ‘मारो मारो’ अश्या आरोळ्या ऐकू आल्या. सगळे उठलो नि काळोखात वाट दिसेल तिकडे धावत सुटलो. मी तर असा धावलो असा धावलो की जणू ऑलिम्पिक स्पर्धेतच धावतोय. जे रस्ते, गल्ल्या, बोळ नजरेत येतील त्या पार करीत  गेलो. काळोखात कुठे  कुठे कुलंगी कुत्री भुंकतायत आणि मी धावतोय.  शेवटी अगदी पाय पुरे थकले, धावता येईना तेव्हां थांबलो. कुठे काही आवाज नाहीत. मग परत फिरलो तर पूर्व कुठली नि पश्चिम कुठली काही कळेनाच. स्टेशन कुठल्या दिशेला आहे समजेना. शोधत  राहिलो. अर्ध्या तासानंतर अखेर ते मिळालं. माझे सहकारी काळजी करीत उभे होते. ते म्हणाले,

” उगाच कुठं गेला होतास? एवढं कशाला भ्यायचं?  काहीही नव्हतं. हमाल लोक दारू पिऊन भांडत होते. एकदम डरपोक दिसतोयस तू. ”

जणू काही ते ‘मारो मारो’ च्या आरोळ्या आल्यावर उठून पळालेच  नव्हते. पण मी त्यांच्याशी वाद घातला नाही. निमूट अंथरुणावर पडलो.

सकाळी आम्हाला न्यायला गाडी आली. वाटेत जे नजरेत आलं त्यावरूनच अंदाज काढला की हे काही वेगळंच शहर आहे. शेकडो वर्षं जुनं तरीही जुनं न वाटणारं.

आम्हाला कौतुक मुंबईचं नि पुण्याचं. आमच्या  रस्त्यांसारखे रस्ते देशात कुठंही नसतील अशी कल्पना. उंचउंच इमारती, ट्राम्स,  आणि बसिस यांचा अभिमान. पण हे शहर काही वेगळंच होतं. साडेतीनशे वर्षांपूर्वी अकबर बादशाहनं रावी नदीच्या किनारी वसवलेलं. आखीव. त्याच्या सुनेनं – नूरजहाननं -काश्मीरहून गुलाब आणले. त्यांना  लाहोरची माती मानवली.

ते  इतके फोफावले इतके फोफावले की शहराला त्यांनी ‘गुलाबका शेहेर’ असं नामाभिधान बहाल केलं. अजस्त्र वृक्ष  प्राचीन काळापासून होतेच. त्यांनीरस्त्यांना सावली तर दिलीच पण नीरव शांतताही दिली.

हवेत गारवा  नि ऊब  यांचं सुरख मिश्रण. वसंतऋतूचं आगमन

झालं होतं. रस्त्याकडेचे विविध रंगांचे आणि जातींचे गुलाब बहरले होते. एवढे गुलाब मी आयुष्यात पाहिले नव्हते. आम्ही कुंडीत गुलाबाचं रोप लावून त्याला एक कळी आली की आनंदाने नाचणारे लोक. गुलाबाचे ताटवेच काय वेलही असतात हे मी लाहोरलाच पाहत होतो.

उंच इमारती काही थोडयाच. त्या किती मजल्याच्या तर तीन किंवा फारफार तर चार. बाकी सगळे छोटे छोटे टुमदार बंगलेच. बंग्ल्यांभोवती पाट्या. हा कोण तर खान बहादूर अमुक,  खानसाहेब तमुक.   तसेच लालासाहेब, रायसाहेब, पंडित, कर्नल, विंग कमांडर, आयसीएस कलेक्टर आणि फलाणा हा आणि तो.पंजाब सरकारचा सेक्रेटरी किंवा आणि कुणीतरी.

जॉईन झाल्यावर पहिल्याच रविवारी भटकायला बाहेर पडलो. किल्ला पाहिला. काश्मीरच्या  धर्तीवर नूरजहाननं फुलवलेली शालीमार बाग पाहिली. लाहोरला

‘द सिटी ऑफ गार्डन्स ‘ म्हणतात. आपल्याकडं बंगळुरूला

म्हणतात तसं. पण तिथं बागा तर अगणित. प्रत्येक बंगल्याची एक वेगळी बागच. फुलांनी बहरलेली. फुलपांखरानी भरलेली. दिसली नाहीत ती फक्त मानवीफुलपांखरं. ती काळ्या बुरख्यांत लपलेली. झरोक्यांतून  बाहेरच्या जगाकडे कुतूहलानं पाहणारी.

आमच्यातला कुणीतरी देवभक्त एकदम आठवण झाल्यासारखा म्हणाला,

” सगळं पाहतोय खरं पण नव्या शहरात आलोय तर ग्रामदेवतेचं दर्शन घ्यायला नको? ”

ग्रामदेवता कोणती? एक शहाणा म्हणाला, ” इथली ग्रामदेवता मशिदीत असते. चला मशिदीला भेट देऊ.” पांगिरे एका पायावर तयार झाला. त्याला मशिदीकडे पाठवून देऊन देउळ शोधू लागलो. ते वोलटन उपनगरात मिळालं. दुर्गेचं छोटसच पण नीटनेटकं,

तुकतुकीत गो-यापान  पुजा-यानं  पंजाबी  संस्कृतात

प्रार्थना केली आणि गुलाबांच्या पाकळ्या आम्हाला प्रसाद म्हणून दिल्या. आम्ही प्रत्येकानं एक एक रुपया थाळीत टाकला तेव्हां तो खूष होऊन म्हणाला,

” भगवान आपको खूश रखे और आपकी रक्षा करे. सम्हलके रेहना. अंधेरा होनेके पहले  घर पोहोचणा.”

मी का कोण जाणे मनात थोडा धास्तावलो. रेल्वे स्टेशनवर झालेल्या प्रकारानं त्या दिवसापासून थोडा अस्वस्थच होतो.

हॉटेलं छान होती. तब्येत खूष होऊन गेली. सिनेमाला जायची लहर आली. ‘किस्मत’ लागला होता. बरंच ऐकलं होतं त्याबद्दल. रेडिओवर गाणी लागायची. सिनेमात एक अकरा-बारा वर्षांची मुलगी होती. तिच्या सौंदर्यानं अक्षरशः दिपून गेलो. ती कळी पुढं उमलली तेव्हां लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण तिच्या प्रेमात पडले. तिचं नाव होतं मधुबाला.

वोलटन उपनगर लाहोर मधलं सौंदर्यस्थळ. असे रस्ते, असे बंगले, अश्या बागा केवळ भूल घालणा-या. अजून डोळ्यांसमोर येतात. मला वाटलं देवानं मला एखादा लालासाहेब नाहीतर रायसाहेब का केला नाही? अश्या उपनगरात राहायला फार मोठी पूर्वपुण्याई लागत असावी. ती असती तर एअर फोर्स ची बराक का नशिबी आली असती?

दलजितसिंगानं लाहोर पाहिलं होतं ते बालकाच्या निरागस दृष्टीनं .  मी पाहिलं ते रोमांटिक दृष्टीनं. कोण कशा  डोळ्यांनी पाहतं कोण कशा.  मला वाटतंकोणत्याही गावाचं वा शहराचं सौंदर्य  त्यांतील रस्त्यांत, इमारतींत, वा ऐतिहासिक स्थळांत

सामावलेलं नसतं. ते संपूर्णपणे  निसर्गात सामावलेलं असतं. सावल्या देणारे प्रचंड प्राचीन वृक्ष आणि रंगीबेरंगी

गुलाबांचे ताटवे नसते तर लाहोर सुंदर वाटलं असतं का?

मनाला एक निरव शांती देणारं वातावरण नसतं, इतर शहरांत असते तशी वर्दळ असती, आवाज असते तर हे शहर आपल्याला आवडलं असतं का?

पण संध्याकाळच्या अस्वस्थ वेळी  कॅंप मध्ये परत जाताना माझ्या अंतर्मनाला कुठेतरी एक जाणीव होत होती की हे सौंदर्य आणि ही शांतता फसवी आहे. रेल्वे स्टेशनवरच्या  त्या आरोळ्या हे इथलं सत्य आहे. ते लपून राहिलं  आहे.  कोणत्याही क्षणी उफाळून वर येऊ शकेल.

स्वप्नातही आलं नाही की आणखी तीन चार वर्षांत गुलाबांच्या ह्या सुंदर ताटव्यांतून  ‘मारो मारो’ चे ध्वनी उमटणार आहेत नि   ह्या गुळ्गुळीत आखीवरस्त्यांवरून निरपराध हिंदू आणि शिखांच्या रक्ताचे पाट वाहणार आहेत.

श्री मंगेश नाबर यांच्या लेखमालेचा तिसरा भाग.

जोहान गुटेनबर्ग : आधुनिक मुद्रण तंत्राचा जनक

मंगेश नाबर 
  भाग ३ 
 
जोहान गुटेनबर्गचे सोळाव्या शतकातील एक रेखाचित्र 
धातूची वेगवेगळी अक्षरे बनवणे आणि त्यांची शब्दात मांडणी करणे, ही जोहानची मूळ कल्पना होती. अशा प्रकारे एकेक सबंध पान तयार केले, की त्याच्या हव्या तेवढ्या प्रती बनवता येतील.  जोहानने मग प्रयोगाला सुरुवात केली. सर्व प्रथम तो ज्या प्रकारे मातीच्या साच्यातून दागिन्यांचे भाग बनवत होता, त्याच धर्तीवर त्याने मातीचे साचे बनवून धातूची अक्षरे बनवली. तो एखाद्या दागिन्यासाठी हुबेहूब मेणाचे मॉडेल बनवत असे. तशीच त्याने अत्यंत बारीक ओलसर माती घेऊन ती साच्याच्या पेटीत भरली. अर्ध्या भागात त्याने ते अक्षराचे मेणाचे मॉडेल ठेवले. पेटी बंद केली आणि उघडली. मॉडेल बाहेर काढले. आणि पहिले, तो त्या मॉडेलचा आकार मातीत उमटला होता. पेटी पुन्हा बंद करून त्याने तप्त असा धातूचा वितळवलेला रस मॉडेलच्या रिकाम्या जागेत ओतला. थोड्या वेळाने धातू थंड झाल्यावर त्याने पाहिले, अक्षराच्या मॉडेलची हुबेहूब प्रतिकृती तयार झाली होती.
मातीचे साचे वापरून बनवलेली ही धातूची अक्षरे तेवढी मनासारखी सुबक झाली नव्हती. जोहानाने मग दागिन्यांप्रमाणे सर्व प्रक्रिया पुनः केल्या. परंतु जेव्हा धातू थंड झाला, आणि अक्षरे मातीतून बाहेर काढली, ती इतकी ओबडधोबड आली होती, की जोहानला चाकू व कानस हातात घेऊन ती घासून घासून नीट करावी लागली.
या अक्षरांची शब्द तयार करण्यासाठी त्याने जेव्हा मांडणी केली, त्यांच्यावर त्याने शाई  समप्रमाणात पसरवली. मग एका चर्मपत्रावर जोरात दाब घेऊन त्याने त्यांचा ठसा घेतला. परंतु त्याने कितीही काळजी घेतली, तरी अक्षरे पानावर वेडीवाकडी येत. एवढेच नव्हे तर एखाद्या अक्षरावर शाई थोडी जरी कमी पडली, तर ते अक्षर इतर अक्षरांपेक्षा फिकट दिसत असे. काही वेळा एकाच अक्षराचे ठसे एकसारखे येत नव्हते. आपली कल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी आता जोहानला काही तरी वेगळा व चांगला मार्ग शोधावा लागणार होता. जोहानचे हे संशोधन चालू रहाणार होते.
१४१९ मध्ये जोहानच्या पित्याचे निधन झाले. जोहान तोवर फक्त एकवीस वर्षांचा होता. त्याला पित्याच्या मालकीच्या इस्टेटीचे भाडे काही प्रमाणात मिळू  लागले, तरी  त्याने टांकसाळीत काम करण्याचे सोडले नाही. फावल्या वेळात त्याने आपल्या मुद्रण तंत्राचे प्रयोग चालू ठेवले.
या सुमारास मेंझमध्ये एक कागद निर्मितीचे दुकान उघडले गेले. जोहान त्याला भेट देणार नाही, असे कसे झाले असते ? त्या काळी म्हणजे सहाशे वर्षांपूर्वी कापडाच्या चिंध्यांपासून हातकागद बनवला जात असे. कागद बनवणारे चिंध्या एका लांबोड्या पिंपातील पाण्यात बुडवून ठेवत.त्याचा लगदा होई. मग जाळी लावलेल्या साच्यातून तो लगदा बाहेर काढत. प्रत्येक वेळा पिंपातून बाहेर काढल्यावर कागदाची जाड शीट जाड कापडावर ठेवली जाई. जाड  कापड व कागद यांची एकावर एक अशी चवड तयार होई. त्यातील पाण्याचा ओलसरपणा लाकडी स्क्रूच्या साह्याने दाबून काढला जाई.
कागदाच्या या प्रेसवरून जोहानला अक्षरांची कल्पना सुचली असावी. अशाच प्रकारे आपण कागदावर धातूची अक्षरे दाबून पाहिली तर ? जर अक्षरांवर शाई टाकली आणि प्रेसचा दाब दिला, तर कागदावर अक्षरे उमटतील का ? मग हातांनी चर्मपत्रांवर अक्षरे दाबण्याची गरजच काय ? उलट हा लाकडी प्रेस वेगाने चालवता येईल की ! मग छपाई एकसारखी करता येईल. हे प्रत्यक्षात कसे बरे आणता येईल ?
जोहान आपल्या या नवीन कल्पनेचा  पयोग करून पाहणार, तोच माशी शिंकली. नगरपरिषदेत खानदानी वर्ग व गिल्ड यांच्यात एका नव्या भांडणाची काडी पडली. १९२८ मध्ये गिल्डने पुनः नगरपरिषदेवर बळाने सत्ता काबीज केली. अनेक खानदानी घराण्यांना मेंझमधील आपल्या मालमत्तेवर पाणी सोडावे लागले. काहींवर तर शहर सोडून अन्यत्र जाण्याची पाळी  आली. ज्याना शहर सोडावे लागत होते, त्यात खुद्द जोहान होता. गिल्डच्या सतत होणा-या बंडखोरीमुळे तोही वैतागला होता. जोहानने मेंझ शहर सोडण्याचा निर्णय घेतला. -हाईन नदीच्या तीरावर शंभर मैल दूर असलेल्या स्ट्रासबोर्ग  या  शहरात जाण्याचे त्याने पक्के केले. जोहानच्या पित्याने जो काही पैसाअडका शिल्लक ठेवला होता, त्याच्या जोरावर जोहानचे मुद्रण तंत्रावरील संशोधन पुढे चालू रहाणार होते.
या शहरात जाण्याचे आणखी एक कारण असे होते, की जोहानला मिळालेल्या माहितीनुसार तेथील नागरिक ग्रंथमित्र होते. तेथे एक मोठे चर्च होते आणि त्यातील ग्रंथालयात असंख्य उत्तमोत्तम पुस्तके होती. पुस्तकांना आपलेसे करणा-या या शहरात जोहानला आपले मुद्रणाचे प्रयोग करण्यासाठी जागा नक्कीच मिळणार असे मनोमन वाटत होते.
तीन दिवसांच्या निबिड अरण्यातील घोडदौडीनंतर जोहानला  स्ट्रासबोर्ग  शहराची तटबंदी दिसू लागली. तटावरील द्वारपालाने  जोहानकडील प्रवासाचे आणि अन्य कागदपत्र तपासून मगच त्याला शहरात प्रवेश करू दिला. जोहानला शहराच्या या शिस्तीचे नवल वाटले. शहरातील रस्ते त्याला पक्के फरसबंदीचे दिसले. त्या वेळी रस्त्यावरून व्यापारी, कारकून असे पुरुष आणि काही कामकरी मुली चालत जाताना दिसल्या. शहराच्या केंद्रभागी असलेल्या   कॅथेड्रलच्या  इमारतीवर कामगार उंच परातीवर चढून इमारतीला नवा कळस लावण्याचे काम करत होते.
जोहानने एका हॉटेलच्या खोलीत आपले बस्तान मांडले आणि  स्ट्रासबोर्ग  शहराचा एक फेरफटका मारला. जोहानचे  गेन्सफ़्लाईश घराणे मेंझ शहराबाहेर  नामांकित असल्यामुळे जोहानला शहरातील लोकांना भेटणे सोपे होते. परंतु त्याला खूप काही मित्र जोडण्यात रस नव्हता. त्याचा रोख होता, तो आपल्या  संशोधनासाठी एखादी योग्य अशी कार्यशाळा शोधण्याचा. त्याला आपले प्रयोग शक्य तितक्या लवकर सुरू करायचे होते.
जेव्हा जोहानला  तेथील सेंट आर्बोगास्ट जुन्या चर्चच्या सभोवारचा  प्रदेश दिसला, तेव्हाच त्याला कळून चुकले, की  आपल्यासाठी ही जागा अगदी योग्य आहे. कारण हे चर्च शहराच्या तटबंदीबाहेर शांत अशा वस्तीत  होते. इथे जोहान आपले मुद्रणाचे सारे प्रयोग गुप्त रित्या करू शकत होता.
त्या काळी जो तो व्यावसायिक आपापल्या व्यवसायातील गुपिते आणि तंत्रे आपल्यापाशी राखण्याची पराकाष्ठेची  काळजी   घेत असे. बेकरीवाले आपल्या सर्वच पाकक्रिया दुस-याला कळू देत नसत. जवाहिरे आपली तांत्रिक रहस्ये आपल्यापाशीच गुप्त ठेवीत. सुवर्णकार धातू कसे वितळवीत, त्यांना कसे आकार देत, हे अनोळखी  परक्याकडे कधीही उघड करत नसत. परंतु जोहानला सुवर्णकारांची  सर्व गुपिते मेंझच्या टांकसाळीत  खडानखडा माहित झाली होती. त्या आधारावर त्याला ठाम विश्वास होता, की पुस्तकांची निर्मिती हाताने करण्याऐवजी धातूंची अक्षरे आणि प्रेस यांच्या मदतीने आपण हे काम सहज करू शकू.
सेंट आर्बोगास्टच्या परिसरातील एका इमारतीत जोहानने आपली कार्यशाळा थाटली. तो एकटाच आपले काम करूं लागला. अगदी आवश्यकता लागली  तरच मदत मागण्याचे त्याने ठरवले. आता प्रयोगासाठी त्याला धातूची, आणि तीही  मोठ्या  प्रमाणात त्याला गरज होती. हे तर गिल्डच्या सभासदाशिवाय  कोणाकडूनही  तो मिळवू शकत नव्हता. म्हणून त्याने तेथील हान्स ड्यूने नावाच्या सुवर्णकाराकडे  मदतीची  याचना केली. त्याने जोहानला शंभर गुल्डेन ( त्या काळचे स्थानिक चलन ) धातुसाठी दिले. एवढ्या पैशातून जोहान शहरातले एखादे राहते घर किंवा शेत खरेदी करू शकत होता. आपल्या मनातील कल्पना  मूर्त  स्वरूपात आणण्यासाठी जोहान कितीही पैसा मोजण्यास तयार होता.
जोहान आपल्या प्रयोगात मग्न असताना तीन वर्षे कशी गेली, हे कळले नाही. आणि त्या सुमारास मेंझहून संदेश घेऊन एक दूत तेथे पोचला. त्याने जोहानला निरोप दिला, की मेंझचे नवे सरकार त्याला आता तेथे येऊ देण्यास राजी झाले आहे. तथापि  जोहानला तेथे परतण्याची इच्छा नव्हती.  त्यासाठी त्याला आपली इथली कार्यशाळा हलवावी लागली असती आणि मुख्य म्हणजे सेंट आर्बोगास्टच्या निवांत अशा वातावरणात जोहानने खूप प्रगती केली होती.
पण १४३३ मध्ये पाच वर्षांच्या परदेशी वास्तव्यानंतर जोहान मेंझला परतला. तसा तो मध्ये एकदा आपल्या मातेच्या  अंत्यविधीच्या वेळी तात्पुरता गेला होता पण लागलीच  स्ट्रासबोर्गला परतला होता. आता त्याला पूर्वी जी काही प्राप्ती होत होती, त्यात मातेच्या वारसा हक्कामुळे काही भर पडली होती. आता तो पुरेसा धातू खरेदी करू शकणार होता, निदान तसे त्याला वाटले होते.
पण त्या  संदेशातून  आणखी एक गोष्ट उघड होत होती, की तो जर मेंझला परतला नाही तर कुटुंबवारसा हक्कापोटी मिळालेल्या हिश्याचा त्याला काहीही लाभ होणार नव्हता. कारण त्या दोन शहरांचे संबंध बिघडलेले होते आणि मेंझ शहरवासीयांना आपला पैसा स्ट्रासबोर्गला जाऊ देणे पसंत नव्हते.  त्यामुळे जोहानचे मेंझकडून येणा-या पैशात आडकाठी येऊ लागली होती.
जोहान कमालीचा अस्वस्थ झाला. वारसा हक्काने मिळणा-या पैश्याशिवाय  तो प्रयोगासाठी लागणारे धातू, शाई, चर्मपत्रे आणि कागद कसा काय खरेदी करणार होता ?  त्याला काही करून मेंझला परत जायचे नव्हते. वेळ पडली, तर तो स्वतः इथे कष्ट करून कमाई करणार होता. मग प्रयोगासाठी थोडा कमी वेळ मिळाला तरी चालले असते. हान्स ड्यूने त्याला आपल्या सुवर्णकारीच्या दुकानात काम करू देण्यास राजी  होता. जोहानचे हिरे-रत्ने कापण्याचे   व   त्यांना पैलू  पाडण्याचे  कसब  आता एव्हाना स्ट्रासबोर्गमध्ये सर्वत्र माहित झाले  होते.  श्रीमंत लोक आपल्याकडील रत्ने जोहानकडे त्यांना हवा तसा आकार देण्यासाठी  आणि पोलिश करण्यासाठी  आणू लागले होते.
एके दिवशी  स्ट्रासबोर्गमधील ऎनड्र्यूझ ड्रीटझेन नावाच्या एका उच्चपदस्थाने जोहानला आपल्याला हिरे व रत्नांचे काम शिकवण्याची विनंती  केली. प्रथम  जोहानला त्याला सरळ सरळ नकार द्यावा, असे मनात आले. कारण तसे कबूल केले,  तर   त्याच्या संशोधनाच्या वेळात घट होणार होती. पण नंतर त्याने  आपला होकार कळवला. या शिकवण्यासाठी जोहान ड्रीत्झेनकडून  जी फी आकारणार होता,  ते पैसे जोहानला छपाईसाठी लागणा-या मालासाठी  उपयोगी  पडणार होते. आता जोहानला आपल्या प्रयोगांसाठी अधिकाधिक मालाची गरज होती आणि  येणारा पैसा कमीच पडत होता. मेंझकडून पैसे वेळेवर येत  नव्हते, जवळजवळ  बंद झाले होते. जोहान पेचात पडला होता.
१४३४ मध्ये जोहानला अचानक एक बातमी कळली, की  मेंझ नगरपालिकेचा निकोलस नावाचा एक कारकून स्ट्रासबोर्गमध्ये येतो आहे.  जोहानने ही संधी साधून आपल्या बंद झालेल्या वारसाहक्काच्या पैशाच्या रागापोटी या कारकुनाला अटक करवली.  त्या वेळच्या मध्ययुगीन कायद्यानुसार आपली थकबाकी मिळवण्याचा हा एक कायदेशीर मार्ग होता. मेंझकडून जोहानला  तीनशे  दहा गुल्डेन येणे आहेत, असे जोहानने निकोलसला सांगितले. मेंझच्या  सत्ताधीशांनी  हे पैसे  परत देण्यास कबूल करेपर्यंत निकोलसला  सोडून देण्यास जोहान तयार नव्हता.
पण स्ट्रासबोर्गचे अधिकारी पेचात सापडले. त्यांना मेंझबरोबरचे संबंध जोहानच्या या आक्षेपावरून  अधिक बिघडवणे पसंत नव्हते. त्यांनी जोहानला आपले निकोलसवरचे आरोप मागे घेण्यास सांगितले. पण आपले येणे वसूल होईपर्यंत आरोप मागे घेण्यास जोहानने नकार दिला. अखेर निकोलसने जोहानाच्या पैशाची हमी दिली आणि आपली सुटका करून घेतली. तो मेंझला परतला. पण जोहानला प्रत्यक्षात फारच थोडे पैसे हातात पडले. मेंझ नगर परिषदेने त्याला कळवले, की बाकीचे पैसे परत हवे असतील, तर त्याला आपल्या शहरी परत येणे जरूरीचे आहे. तरी जोहान ताबडतोब  मेंझला गेला नाही. एक म्हणजे तो आपल्या येथील कार्यशाळेवर समाधानी होता आणि दुसरे महत्वाचे कारण म्हणजे तो  स्ट्रासबोर्गमधील एका स्त्रीच्या प्रेमात पडला होता. ( क्रमशः)
मंगेश नाबर
७ कृष्ण बिल्डींग क्र. १, गोखले सोसायटी लेन, परळ, मुंबई ४०००१२.
दूरध्वनी क्र. (०२२) २४१३ ५७५५, सेल क्र. ९७५७३९३५९८
इंटरनेट : mangeshnabar@gmail.com
(लेखाची पूर्वप्रसिद्धी – दै. नवप्रभा, पणजी, गोवा.)

श्री. मंगेश नाबर यांच्या गुटेनबर्ग वरील लेखमालेचा दुसरा भाग

जोहान गुटेनबर्ग : आधुनिक मुद्रण तंत्राचा जनक

मंगेश नाबर
भाग २ 

हे सारे चालले असताना जोहानच्या मागे त्याची शाळा, खेळ, सण, इतर काही कामे असत. त्याच्या वडिलांनी ठरवले  होते, की त्याच्या भावाला आणि त्याला उत्तम शिक्षण मिळाले पाहिजे. त्या काळात जोहानसारखी मुले  कॅथोलिक  चर्चने चालवलेल्या शाळात जात. तिथे धर्मगुरु त्यांना सर्वात कठीण असा ल्याटिन हा विषय शिकवत. शाळेच्या वेळात शिक्षक व मुले त्याच भाषातून वाचत व बोलत. एखाद्या परकीय भाषेतून व्याकरण, भूगोल, अंकगणित शिकणे म्हणजे सोपे नव्हते.
शाळेत जोहानने जोहान गुटेनबर्ग (Johann Gutenberg) हे नाव धारण केले. त्याचा भाऊ  व इतर कुटुंबीय मात्र गेन्सफ़्लाईश  (Gensfleisch) हे नाव लावत असत. गेन्सफ़्लाईश हे मोठे कुटुंब होते आणि मेंझमधील अनेक व्यक्तींनी त्या वेळी जोहान ग्लेनफ़्लाईश हे नाव लावले होते. म्हणून कदाचित जोहानने गुटेनबर्ग (Good Hill – चांगली टेकडी ) हे नाव धारण केले असावे.  ( गेन्सफ़्लाईश  याचा अर्थ Goose flesh – हंसाचे मांस असाही होतो.)
मध्ययुगीन काळात  मेंझ शहरातील घरांची रचना म्हणजे मध्यभागी आवार आणि सभोवार खोल्या असत. हिवाळ्यात वादळी हिमवर्षाव होत असे. त्या पासून बचाव करण्यासाठी कित्येक घरांच्या खिडक्यांना काचा लावलेल्या असतच असे नसे. तसेच प्रकाशासाठी  मेणबत्या सर्वांना परवडत नसत. याचा परिणाम असा होई, की घराच्या अंतर्भागात काळोख व धुराचे राज्य असे. दिवसा जो काही प्रकाश छोट्या खिडक्यातून आलाच, तर तो खिडक्यांवरच्या  तेल लावलेल्या कापडामुळे अडत असे. रात्रौ आणि अतिथंड तापमान असताना लाकडी तावदानामुळे  दिवसा, नैसर्गिक प्रकाश हा कधीच घरात येत नसे. मेणबत्त्या महाग असल्याने घरात उबदारपणासाठी पेटवलेली शेकोटी हाच काय तो प्रकाशाचा मार्ग होता. स्त्रियांचा स्वयंपाक हा शेकोटीपाशी चाले आणि घरात सर्वत्र साचलेल्या धुरामुळे श्वास घेणे कठीण होउन  बसे.
गुटेनबर्गच्या वाड्यात एक गोष्ट इतर सर्व घरांप्रमाणे होती. ती म्हणजे  घरातील स्नानघर वाड्यात नसून ते वाड्याच्या  मागील बाजूस असलेल्या खोलीत होते. सर्व मंडळी स्नानासाठी त्या खोलीचा वापर करीत. फक्त  अतिथंड दिवसात आणि रात्रीच्या वेळी घरात एक मोठे घंगाळ ठेवले जाई. त्या काळात गावात सर्वजनिक स्नानगृहे होती. घरोघर रोजच्या रोज स्नानाची तितकीशी कुणाला सवय  नसे.
गावातील रस्ते अरुंद व नागमोडी असत. शाळेत जाताना जोहान रस्त्याने चालत जात असे. रस्त्यावर दुतर्फा ओळीने घरे असून तळमजल्यावर  दुकाने असत. तीन चार मजल्यांच्या इमारती उंच असल्या तरी त्या प्रशस्त नव्हत्या. त्यांचे वरचे मजले रस्त्यावर पुढे झुकलेले असत. जोहान रस्त्यावरून चालत जाताना त्याला जी अनेक दुकाने दिसत ती सारी कारागीर व व्यापा-यांच्या संघाची असत. या संघांना गिल्ड (guild) असे  म्हणत. सुवर्णकारांचे, विणकरांचे, सुतारांचे संघ असत. व्यापा-यांचे संघ त्या त्या क्षेत्रातील कारागीरांना कच्चा माल पुरवीत. उदा. जडजवाहीर बनवणा-यांना सोने चांदी, विणकरांना कापड इ. व्यापा-यांच्या संघाकडूनच विकत घ्यावे लागे.
जोहानचे कुटुंबीय मात्र कुठल्याही संघाचे सभासद नव्हते. ते खानदानी घराण्यातले असल्यामुळे त्यांच्यापाशी वडिलोपार्जित पैसा आणि स्थावरजमिनी होत्या. त्यांना पोटापाण्यासाठी काम करण्याची आवश्यकता नव्हती. तरी त्यांच्यापैकी अनेक लोक शहराच्या कारभारात काम पाहत. जोहानच्या कुटुंबाची गणना उच्च स्तरावरील लोकांमध्ये होत असे. त्यांचे कुटंब मेंझमध्ये कित्येक पिढ्यान पिढ्या असल्याने त्यांच्याकडे शहराच्या व्यवहारासाठी लागणा-या चलनातली नाणी बनवणा-या टांकसाळीची व्यवस्था होती. शहराचे व्यवस्थापन जे लोकांकडून करवसुली करत असे, त्याची जबाबदारी टांकसाळीकडे सोपवलेली होती.
त्या काळीही करवसुलीचे काम करणा-याविषयी जनतेत अप्रियता असे. इ.स. १४१० मधील हिवाळ्यात या खानदानी घराण्याच्या लोकांविषयी सर्व संघात असंतोष निर्माण झाला. कारण एकच होते, करवसुलीची सक्ती. जोहानचे पिता हे मेंझ नगरपरिषदेचे एक सदस्य होते. संघाचे प्रतिनिधी या नगरपरिषदेवर असूनही खानदानी घराण्याच्या मताधिक्यामुळे मेंझची सत्ता त्यांच्याकडे होती. परिषदेने बीअर, मद्य व धान्यावर कर बसवल्यामुळे संघाचे प्रतिनिधी संतापले. त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण करणे दुरापास्त होत होते.
१४११ च्या प्रारंभी मेंझच्या नागरिकांची परिस्थिती  खूपच खालावली. हिवाळा लांबल्याने लोकांना आपले पोट भरणे कठीण होउन बसले होते. त्यातच नगरपरिषदेने करवाढीचा प्रस्ताव मांडला. अगोदर रुष्ट असलेल्या संघाच्या प्रतिनिधींनी परिषदेवरची खानदानी उच्चस्तरीय लोकांची सत्ता हिसकावून घेतली. जोहानचा पिता काळजीत पडला. मेंझचे काय होणार याची त्याला भीती वाटत होती. कारण गिल्डच्या सभासदांना कामकाजाची तितकीशी माहिती नव्हती. त्यांच्यातील अनेक तर निरक्षर होते.
या सत्ताबदलामुळे खानदानी घराण्यातील लोकांबरोबर जोहानच्या पित्याची टांकसाळीतली नोकरी गेली.  रस्त्यातून जाता येतांना लोकांकडून त्याच्या कुटुंबीयांची अवहेलना होउ लागली. जोहानचे वय त्या वेळी अवघे तेरा असूनही त्याची या लोकांच्या टवाळीतून  सुटका झाली नाही. या कारणामुळे जोहानच्या कुटुंबीयांनी  मेंझ सोडून देशात अन्यत्र स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. एल्टविले  (Eltville) या मेंझपासून साडेसात मैलांवर असलेल्या गावी त्यांचे आपले असे आणखी एक घर होते, तेथे ते सारे राहण्यास गेले.
मेंझच्या गढूळलेल्या वातावरणापासुन दूर अशा एल्टविले येथे  जोहानने तीन वर्षे काढली. १४१४ मध्ये गिल्ड व खानदानी लोकांमध्ये समेट झाला. गेन्सफ़्लाईश कुटुंब पुनः गुटेनबर्ग वाड्यात परतले. जोहानचा पिता आता पुनः आपल्या इस्टेटीचे भाडे गोळा करू शकत होता.  मोठ्या मुश्किलीने त्याला टांकसाळीची नोकरी मिळाली. पण परिषदेचे त्याचे सदस्यत्व मात्र गेले ते गेले.
आता जोहान सोळा वर्षांचा झाला  होता. त्याचे शालेय शिक्षण पूर्ण होउन  तो आपल्या पित्याबरोबर काम करू लागला होता. तो टांकसाळीत खूप वेळ घालवत असल्यामुळे त्याला टांकसाळीतील  कामात रस उत्पन्न झाला. तेथे मेंझसाठी नाणी बनवण्याबरोबर सरकारी शिक्के, सोन्याचांदीचे दागिने आणि चित्रांच्या चौकटी यांचे काम चालत असे. टांकसाळीतील सुवर्णकार व जवाहिरे यांच्याकडून जोहानने तेथील कामाचे तंत्र शिकून घेतले.
सुवर्णकार मंडळी ही त्या काळातील शहरातली महत्वाच्या कारागीर संघापैकी  मानली जात असत. ते काम शिकण्यासाठी खूप उमेदवारी करावी लागे. शिकाउ उमेदवार हे मुख्य कारागीराच्या घरी राहत असत. व्यवसायाच्या खाचाखोचा शिकत असताना त्याना बरीच वर्षे कोणतेही वेतन असे मिळत नसे. जोहानला मात्र तो खानदानी घराण्यातला असल्यामुळे त्याला उमेदवारी करावी लागली नाही. तसे पाहता खानदानी लोक हे गिल्डचे सभासद कधीच नव्हते.
नाणी पाडण्याच्या कामासह जोहान सोन्याचांदीचे दागिने बनवण्याच्या तंत्रात वाकबगार झाला. त्यात मौल्यवान रत्ने कशी कापावी व त्यांना पैलू कसे पाडावेत, हा महत्वाचा भाग असतो. उत्तमरित्या पैलू पाडलेला हिरा, मणी हा आकर्षकपणे चमकतो. जोहानला या कामात उत्तम सराव होण्यासाठी आपल्या कुटुंबाचे  जडजवाहीर असलेली रत्ने, माणके मिळाली होती.
नाणे व दागिन्यांचे काम करत असताना जोहानच्या मनात अचानक एक कल्पना चमकली. पुस्तकाची बांधणी करणारे कारागीर ग्रंथांच्या कव्हरवर  शीर्षकाची अक्षरे उमटवण्यासाठी छोटी  पितळी अक्षरे वापरत असत. साच्यातून बनवलेली ही धातूची अक्षरे पाहून जोहानला वाटले, की हेच  तंत्र वापरून जलद गतीने पुस्तके का  बनवू नयेत ? मग पुस्तके पुष्कळ संख्येने निर्माण होउ शकतील. ज्याचे स्वप्न जोहान लहानपणापासून पहात आला होता, त्याचे भविष्य त्याच्या डोळ्यांसमोर उभे राहिले. यातून आपल्याला अगणित पैसेही  मिळतील. जोहानने ही कल्पना प्रत्यक्षात आणण्याचे मनावर घेतले.( क्रमशः )

मंगेश नाबर.
७ कृष्ण बिल्डींग क्र. १, गोखले सोसायटी लेन, परळ, मुंबई, ४०० ०१२.
दूरध्वनी क्र. (०२२) २४१३ ५७५५, सेल क्र. ९७५७३९३५९८.
इंटरनेट : mangeshnabar@gmail.com
(लेखमालेची पूर्वप्रसिद्धी : दै. नवप्रभा, पणजी, गोवा.)
[ चरित्रनायकाचे रेखाचित्र विकिपीडियावरून साभार.

श्री. यशवंत कर्णिक यांचा नवीन लेख

लटकी न्यायालये

यशवंत कर्णिक
          आपल्या देशाची राज्यघटना अंमलात आल्यानंतर काही काळातच प्रशासन व न्यायसंस्था यांचे विभक्तीकरण करण्यात आले. एकमेकांच्या कारभारात ढवळाढवळ करायची नाही हा संकेत सर्वमान्य झाला नि तो, मधली आणिबाणीची तीन वर्षे सोडली तर, आजतागायत अबाधित सुरू आहे. आपली न्यायप्रणाली जगातील एक अत्यंत निकोप व निष्पक्ष न्यायव्यवस्था आहे यात काहीच शंका नाही. जोपर्यंत आरोप पुराव्यानिशी सिद्ध होत नाही तोपर्यंत आरोपी निर्दोष व निष्पाप असतो ह्या मूलभूत  व मौलिक तत्वावर ही व्यवस्था आधारलेली आहे. सव्वीस-अकराचे मुंबईतील हत्याकांड झाल्यावर जिवंत पकडल्या गेलेल्या कसाब ह्या पाकिस्तानी खुन्यास “ताबडतोब ताजसमोरील चौकात फासावर लटकवा” ही काही राजकीय पक्षांनी व जाणत्या लोकांनीही केलेली मागणी ही  त्यावेळच्या संतापाच्या उद्रेकाची परिणती होती. त्याहून त्याला अधिक महत्व नव्हतं. तसं आपल्या सरकारनं केलं असतं तर आपला देश इराण, सौदी अरेबिया, येमेन वगैरे देशांच्या पंक्तीत जाऊन बसला असता.
न्यायव्यवस्था हे आपल्या देशाचं बलस्थान आहे हे  आपल्या न्यायसंस्थांनी – विशेषतः उच्च व सर्वोच्च न्यायालयानी –  निर्विवाद सिद्ध केलं आहे. आजच्या काळात जेव्हा राजकारण्यानी देशभर धुमाकूळ घातला आहे नि भ्रष्टाचार गगनाला जाऊन भिडला आहे, तेव्हां उच्च न्यायव्यवस्था हाच आपला एकमेव आधार उरला आहे यात शंका नाही. इथं योग्य तो न्याय मिळणारच, कुणा फिर्यादीवर किंवा आरोपीवर अन्याय होणार नाही याची खात्री देशवासियांना पटलेली आहे. देशात घडलेली एखादी गंभीर घटना न्यायप्रविष्ट असेल तर तिच्या निकालाची प्रतीक्षा लोक अत्यंत उत्सुकतेने  करीत असतात. तो जाहीर झाल्यावा त्यांना हर्ष किंवा खेद वाटत असला तरी त्याच्या निष्पक्षतेबद्दल त्यांच्या मनात काडीमात्रही शंका नसते. हे आपल्या न्यायव्यवस्थेचं यश आहे.
न्यायदानाबद्दल लोकांच्या काही अपेक्षा मात्र जरूर असतात. त्यातली मुख्य म्हणजे न्यायदान विनाविलंब त्वरित व्हावं. ती अनाठाई निश्चित नाही. एखादी केस एकाच न्यायालयात वर्षानुवर्षे पडून असली तर तिच्याशी काडीचाही  संबंध नसलेली माणसेही प्रचंड अस्वस्थ होतात मग फिर्यादी  नि आरोपी यांचं  काय होत असेल? ते तर खवळतच असतील. दिरंगाई हा आपल्या न्यायसंस्थांचा स्थायीभाव होऊन बसला  आहे. ” जस्टीस डीलेड इज जस्टीस डिनाईड ” ही उक्ती न्यायालयांना  माहीत तरी नसावी किंवा मान्य तरी नसावी. दिरंगाईला  कारणे अनेक असतात. केसीसची अफाट संख्या, न्यायाधीशांची कमतरता, वकिलांचा लोभीपणा ही प्रमुख कारणे. एखाद्या गंभीर खटल्याचा निकाल पाच-सहा वर्षांत लागला तर तो लौकर लागला असं आता लोक समजू लागले आहेत. काही केसीस न्यायालयांत अनेक दशके पडून आहेत. लोक त्या विसरून गेले आहेत. कदाचित फिर्यादी नि जामिनावर सुटलेले आरोपीही विसरून गेले असू शकतात  ! अश्यावेळी काहीजण शरियतच्या दंडसंहितेची भलावण करू लागले तर नवल नाही.  चोरी केली ? तोडा हात. बुरखा वर केला ? फोडा डोळे. प्रेम केलं ? मारा पंचवीस फटके. व्यभिचार केला ? घाला  गोळी. तिथल्या तिथे न्याय !
दिरंगाई हा भारतीय न्यायव्यवस्थेतील सर्वात मोठा दोष आहे. आपली न्यायव्यवस्था प्रामुख्यानं तीन कायद्यांनुसार चालवली जाते. इंडियन पीनल कोड(आय.पी.सी.) , क्रिमिनल प्रोसीजर कोड, आणि एव्हिडन्स आक्ट. आय.पी.सी. मध्ये गुन्ह्यांना क्रमांक दिले आहेत व त्याखाली  जास्तीत जास्ती किती शिक्षा दिली जाऊ शकते हे नमूद केले  आहे. कमीत  कमी शिक्षा  म्हणजे ‘कोर्ट उठेपर्यंत कैद’. जास्तीत जास्ती म्हणजे ‘मरेपर्यंत फाशी’. अमेरिकेप्रमाणे भारतातही देहदंड ही सर्वोच्च शिक्षा दंडसंहितेत सांगितलेली आहे. इंग्लंड व काही युरोपीय देशांत देहदंडाची शिक्षा नाही. तिथे ‘जन्मठेप’ ही सर्वांत कडक शिक्षा आहे पण ती अक्षरशः मरेपर्यंत कैद ह्या स्वरूपात असते. आपल्याकडे ‘जन्मठेप’ म्हणजे जास्तीत जास्ती चौदा वर्षे.  गुन्हेगाराचे कैदेत असतानाचे वर्तन समाधानकारक असले तर तो नऊ वर्षांतच सुटून जातो. दुर्मिळाहून दुर्मिळ ( रेअरेस्ट ऑफ द रेअर ) गुन्हा असेल तरच फाशी होते, नाहीतर जन्मठेप (म्हणजे चौदा वर्षे). त्यानंतरही देशाच्या राष्ट्रपतीना ती मानवतावादी दृष्टीकोणातून कमी करता येते. ‘ शंभर गुन्हेगार सुटून गेले तरी चालतील पण एकाही निरपराध्यास शिक्षा होता कामा नये’ या तत्वावर आपल्या देशाची न्यायप्रणाली  आधारलेली आहे, व ती काही चुकीची  नाही. पण केव्हा केव्हा तिचा अतिरेक होतो आणि गुन्हेगारापेक्षा फिर्यादीच आयुष्यभर मानसिक  शिक्षा  भोगत राहतो.
दंडसंहितेत कोणत्या गुन्ह्यास कोणती  शिक्षा सांगितली आहे याचं ज्ञान सामान्य नागरिकास नसतं. तेव्हां तो साधी चोरी केलेला (कलम ३७९) चोर आता कायमचा कोठडीत जाऊन  पडणार असे गृहीत धरतो आणि तो आरोपी दुस-या दिवशी जामिनावर सुटला की त्याला दंडाधिका-यांनी  किंवा पोलिसांनी पैसे खाऊन  सोडला असा संशय येऊ लागतो. भरधाव मोटर चालवून पादचा-याचा प्राण घेणारा वाहन चालक खुनी आहे असे त्याला वाटते व त्याला फाशीची शिक्षा कधी होते याची तो वाट बघू लागतो. पण शेवटी गुन्हेगाराला  काही थोडयाच  वर्षांच्या कैदेची शिक्षा झाली की न्यायाधीश भ्रष्टाचारी असावा असा ग्रह तो करून घेतो. त्याला हे माहीत नसते की दंडसंहितेत तेवढीच जास्तीत  जास्त शिक्षा सांगितलेली आहे व न्यायालयास त्याहून अधिक शिक्षा देण्याचा अधिकार नाही. आपल्या कायद्यांचे जुजबी ज्ञान प्रत्येक नागरिकास असणे त्याकरिता आवश्यक  आहे. शालेय अभ्यासक्रमात त्याचा समावेश जरूर झाला पाहिजे. कायद्यांबद्दल आपल्या लोकांत प्रचंड अज्ञान आहे.
न्यायदानात जी दिरंगाई होते ती अक्षम्य आहे. ती टाळण्याची किंवा कमी करण्याची काहीच योजना न्यायसंस्थेकडे नसावी याचे वैषम्य वाटते. गुन्ह्यांची अफाट संख्या आणि न्यायालयांची निर्मिती यांचा मेळ बसत नसावा. पण हे किती दिवस चालणार? एक पाऊल पुढे आणि दोन पावले मागे असा हा प्रकार सुरू आहे. दिवसात पाच खटल्यांचा निकाल लागला तर दहा नवे खटले दाखल झालेले असतात. संख्या फुगतच जाते. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढायला ना सरकार उत्सुक दिसत ना न्यायसंस्था.
न्यायप्रक्रियेत अंगभूत असलेली असंवेदनशीलता व दिरंगाई याचे परिणाम किती भयंकर होतात याचं वर्णन मी ‘साधना’ साप्ताहिकाच्या तीस ऑक्टोबर २०१०  च्या अंकातील के.डी. शिंदे यांच्या ‘ मनोहरच्या वारसांना न्याय मिळणार की त्यांचा निकाल लागणार ? ‘ ह्या लेखात वाचलं. माझा प्रस्तुत लेख वाचणा-या वाचकांनी तो शिंदे यांचा लेख जरूर वाचावा. प्रस्थापित शासनयंत्रणेबद्दलच नव्हे तर न्याययंत्रणेबद्दलही त्यांच्या मनात वैषम्य निर्माण होईल. आपल्या देशात न्यायालये व न्यायाधीश यांच्या विषयी माणसांच्या मनात  आदराबरोबर थोडी भीतीही वास करीत असते. कोर्टाचा अपमान होऊन आपल्यावर काही बलामत तर ओढवणार नाही ना ही ती सुप्त भीति असते. हे एका लोकशाही देशाला शोभणारे नाही. सर्वोच्च न्यायालयाने ह्या बाबतीत लोकाभिमुख भूमिका घ्यावी असे नम्रपणे सुचवतो.
अश्या ह्या  परिस्थितीत  दोन लटक्या न्यायसंस्था आपल्या देशात निर्माण झाल्यायत. त्यातून अर्थातच  न्याय मिळत  नाही. करमणूक होते.  हेही  नसे थोडके !
पहिली न्यायसंस्था आपण मोठया पडद्यावर सिनेमातून पाहतो.  भारतीय न्यायप्रणालीचं ते घोर विडंबन पाहून हसावं की रडावं हेच  समजत नाही. ह्या लटक्या न्यायालयातील न्यायमूर्ती फक्त दोनच गोष्टी जाणतात. एक म्हणजे टेबलावरचा हातोडा (गाव्हेल) दोन तीन वेळा टेबलावर आपटणे आणि त्यानंतर ‘आद्दर आद्दर ‘ असे ओरडणे. बाकी तो न्यायमूर्तींचे सोंग घेतलेला ‘एक्स्ट्रा’ नट आणखी काय करू शकणार ?  ( त्यांचा अभिनय पाहून मला नाटकांत ‘पत्र’ असे ओरडून नायकाच्या किंवा नायिकेच्या हातात पत्र देऊन रंगभूमीवरून सेकंदात अदृष्य होणारा पोस्टमन
आठवतो. )  ह्या न्यायमूर्तींच्या डोईचे  काही केस व मिशांचे सर्व  केस पिकलेले म्हणजे पांढरे झालेले असतात. न्यायालयात आरोपीच्या पिंज-यात खलनायकाऐवजी बहुदा नायक अथवा नायिका उभे असतात व काळा गाऊन घातलेले वकीलमहाशय घसा खरवडून ओरडत असतात. साधा चोरीचा मामला असला नि कोर्ट तालुक्याचे असले तरी थाट सर्वोच्च न्यायालयाचा असतो. अखेर न्यायदेवता आरोपीला ‘हिरो’ किंवा ‘हिरोईन’ असल्यामुळे ‘बरी’ करते म्हणजे सोडून देते,  आणि  व्हिलनला त्याच्यावर दुसरा खटला वगैरे  भरण्याच्या   भानगडीत न पडता तिथल्या तिथे  शिक्षा देऊन मोकळी होते.  सिनेमातली न्यायालये अजून ‘युअर लॉर्डशिप’ च्या ब्रिटीश जमान्यातच आहेत. तपासणी, उलटतपासणी, फेरतपासणी , अपील वगैरे गोष्टींचा पटकथाकाराला  पत्ता नसतो. कोणत्या गुन्ह्याला किती शिक्षा देता येते हे माहीत नसतं . अर्थात सिनेमा बघणा-या बहुतेक लोकांनाही त्याचं  ज्ञान नसतं  ही गोष्ट तितकीच  खरी. त्यांनी जर अर्ल  स्टान्ले गार्डनर वा जॉन ग्रिशाम यांच्या
कादंब -या  वाचण्याचे कष्ट घेतले तर त्यांना मला वाटतं न्यायदान सिनेमात थोडं वास्तव करता येईल. पण त्यासाठी इंग्रजी यायला पाहिजे आणि वाचण्याचे कष्ट घ्यायची तयारी पाहिजे. तेवढं कोण करतो? इंग्रजी  सिनेमाच्या कथा  चोरताना त्यातील न्यायदानाचीही  माहिती चोरावी हे  त्यांच्या ध्यानातच येत नाही.  वास्तवता हा भारतीय चित्रपटांचा कधीच स्थायीभाव नव्हता. यापुढे असेल अशी अपेक्षा करण्यात अर्थ नाही.
दुसरी ‘लटकी न्यायसंस्था’ हास्यास्पद नाही पण भयंकर आहे. ती न्यायसंस्थेला आडवं मारून स्वतःच न्यायदान करून टाकते. ‘झट मंगनी पट ब्याह’ सारखं.  सध्या ती  छोटया पडद्यावर ‘ब्रेकिंग न्यूज’ च्या स्वरूपात पाहायला मिळते. कोणतीही जरा गंभीर घटना घडो, तिच्या प्रणेत्याला आरोपीच्या पिंज-यात उभं करून दोषी वा निर्दोषी ठरवलं जातं. त्यासाठी त्या घटनेचा चावून चोथा करण्यात येतो.ठराविक माणसं  गोळा करून चर्चेचं गु-हाळ घातलं जातं, निष्कर्ष काढण्यात येतो. आणि तेवढयात दुसरी एखादी गंभीर घटना घडली तर ह्या घटनेला सोयीस्कर रजा दिली जाते. उदाहरणार्थ राष्ट्रकुल खेळ स्पर्धा , मुंबईच्या आदर्श सोसायटी इमारतीचा घोटाळा, मग बराक ओबामांची भारत भेट. एक संपलं नाही तर दुसरं. मागचं विसरून जायचं. पण तोपर्यंत कुणाला तरी दोषी ठरवून, बदनाम करूनच. घोटाळ्यांचे खटले न्यायप्रविष्ट होईपर्यंत हा धुमाकूळ चालूच असतो. घोटाळ्यात  सापडलेला माणूस म्हणतो की मला एकवेळ शरियत कायदा लावून सुळावर चढवा पण हा ‘ब्रेकिंग न्यूज’ न्याय नको.
ह्या लटक्या न्यायालयांपासून देव आपले रक्षण करो !
***    ***    ***
यशवंत कर्णिक 
९०२, ग्लेन ईगल, गं. दे. आंबेकर मार्ग, परळ गाव, परळ, मुंबई ४०० ०१२.
सेल क्र. ९७६९६५२९११
इंटरनेट – karnikyeshwant@gmail.com
पूर्वप्रसिद्धी : दै. नवप्रभा, पणजी, गोवा.
श्री. मंगेश नाबर यांची नवीन लेख मालिका

जोहान गुटेनबर्ग :  आधुनिक मुद्रण तंत्राचा जनक 

मंगेश नाबर
भाग १
सतत पुढे जाणा-या या आधुनिक संगणकीय जगात आणि आंतरजाल व आय-पॅड यांच्या माध्यमात  छापील पुस्तके, वृत्तपत्रे  यांचे स्थान काहीसे  कमी झाल्यासारखे वाटले तरी आपल्या दैनंदिन जीवनात ती अजूनही अस्तित्वात आहेत. पुस्तकांच्या आणि वृत्तपत्रांच्या इ-आवृत्त्या आल्या तरी पुस्तकांचे मुद्रण पूर्वीसारखे चालू आहे.  सर्वसामान्य माणूस आजही छापलेले पुस्तक आणि वृत्तपत्र हातात धरत आहे.
     परंतु कल्पना करा, की आजचे मुद्रण तंत्र जन्मास येण्यापूर्वी  काय परिस्थिती होती ? पुस्तक ही एक अत्यंत महागडी व हाताने बनवण्याची  बाब   असल्यामुळे ती एक दुर्मिळ आणि तरीही सर्वांना हवीहवीशी वाटणारी चीज होती. मुद्रण तंत्रच अस्तित्वात नव्हते. म्हणून हातांनी लिहिलेल्या अक्षरांची पुस्तके बनवणे आणि मागाहून ती नकलून घेणे देशोदेशात होत असे. आपल्याकडे जे जे प्राचीन ग्रंथ, पोथ्या व पुराणे होती, ती सारी हस्तलिखिते होती. या अशा हाताने लिहिलेल्या पुस्तकांच्या प्रतींची संख्या कितीशी असणार ? त्या अगदीच हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत असत आणि त्यांचे जतन जीवापाड हि-या मोत्यांच्या मोलाने केले जात असे. ते इतिहासात उल्लेख आहेत. भारतात सर्व धार्मिक ग्रंथ हातानेच केले जात आणि त्यासाठी लागणारा कागदही कुठे उपलब्द्ध असे ? लिहिण्यासाठी ताडपत्रांचा उपयोग केला जात असे. प्राचीन काळी भूर्जपत्रे वापरली जायची.
त्याहीपूर्वीची  पुस्तके कशी असत बरे ? मध्य आशियातील प्राचीन राजवटीत ओल्या विटांवर अक्षरे कोरून मग त्या भाजून विहिरीभोवती ओळीने लावून ठेवल्या जात असत, असे नमूद केलेले आहे. इजिप्तची संस्कृती फार प्राचीन. त्या वेळची पुस्तके तर जुन्या  पिरामिडसमधून प्रत्यक्ष पाहायला मिळाली आहेत. ती झाडांच्या सालीच्या लांबलचक पट्ट्यावर लिहिलेली आहेत. त्यांना पापीरस असे नाव होते. नुसती कल्पना करून बघा. एकेक पान नव्वद ते शंभर फूट लांब एका काठीसारख्या हाडाभोवती गुंडाळलेले उलगडत जायचे, वाचीत जायचे आणि दुस-या हाडाभोवती मिटत जायचे. ही पुस्तके अर्थातच प्रचंड लाकडी पेटयात ठेवली जात. आणि पुस्तकाचे कव्हर ? ते चामड्याचे असे. बक-याच्या नाहीतर कोकराच्या पातळ चामडीचे हे आवरण असे. प्राचीन मठातले भिक्षु पुस्तकाच्या प्रती नकलून काढायचे. अशा एकेका प्रतीला सात सात आठ आठ महिने लागत असत. अशा आहेत प्राचीन हस्तलिखित पुस्तकांच्या गोष्टी.
थोडक्यात ज्या काळात पुस्तकांचे दुर्भिक्ष असायचे, त्या काळात बुद्धी व अलौकिक चिकाटी यांच्या जोरावर ज्याने मुद्रणाचे तंत्र शोधून काढले आणि जगातील पहिले छापलेले पुस्तक निर्माण केले, त्या जर्मनीच्या जोहान गुटेनबर्ग (Johann Gutenberg) या महापुरुषाला आपण विसरू शकत नाही. आजच्या आधुनिक मुद्रण तंत्राचा तो आद्य जनक मानला जातो. दुर्दैवाने आज गुटेनबर्गविषयी फार थोडी माहिती उपलब्द्ध आहे. त्याचे व्यक्तिमत्व म्हणजे एक गूढ आहे. त्याचे असे चित्र त्याच्या सबंध आयुष्यात काढलेले नाही. नैऋत्य जर्मनीत  -हाईन नदीच्या काठावर वसलेल्या मेंझ (Mainz) या गावात गुटेनबर्ग जन्माला आला. त्याची नेमकी जन्मतारीख अद्यापही अज्ञात आहे. इ.स. १३९४ ते १३९९ या काळात तो जन्मला असावा. मूळात गुटेनबर्ग हे त्याचे आडनाव नाही. त्याचे गेन्सफ़्लाईश कुटुंब हे मेंझ गावातील खानदानी घराण्यातील होते. ते ज्या वाड्यात रहात होते, त्याचा उल्लेख डोंगरावरील घर – गुटेनबर्ग हॉफ – असा होत असे, त्यावरून त्याला जोहान गुटेनबर्ग असे नाव पडले असावे. अर्थातच ज्याची व्यक्तीशः  माहिती आपल्याला फार थोडी ठाउक असली, तरी त्याची महान कामगिरी आपल्याला ज्ञात झालेली आहे. आजच्या मुद्रण तंत्राचा तोच खरा जन्मदाता आहे.
इ.स. १४०० च्या सुरुवातीस पुस्तके अजिबात नव्हती, असे नव्हे, ती दुर्मिळ असत आणि ती मिळवायला खूप वेळ व पैसा खर्चावा लागे. तेव्हाचे प्रत्येक पुस्तक हे हातांनी बनवलेले असे. अक्षरन अक्षर लिहून काढलेले असे. १४१०-११ च्या हिवाळ्यात दहा बारा वर्षे वयाचा जोहान खूप अस्वस्थ होता. बाहेर हिम वादळाने थैमान घातले होते. त्यामुळे जोहान बाहेर जाउन खेळू शकत नव्हता. जवळच्या जंगलातही फिरायला जाणे मुश्कील झाले होते. कधी कधी  सर्व रस्ते बर्फाच्छादित झाल्यामुळे त्याची शाळा बंद होती. सुदैवाने घरात थोडी पुस्तके होती आणि जोहान ती वाचू शकत होता. घरातली सर्व पुस्तके वाचून झाल्यावर तो मित्रांकडून पुस्तके आणत असे. जवळच्या चर्चमधली पुस्तकेही त्याला वाचायला मिळत असत. पण काही मौल्यवान पुस्तके तेथील टेबलांना साखळीने बांधून ठेवलेली असत. त्या काळातली सर्व पुस्तके धर्म, तत्वज्ञान, कायदा आणि अन्य विषयांना वाहिलेली असत. छोट्या मुलांसाठी पुस्तके तर विरळाच. या दिवसात जोहानचा थोरला भाऊ  घरात बुद्धीबळाचा पट मांडून बसत असे, तर बहिण विणकामात मग्न असे. जोहानला वडलांच्या संग्रहातली पुस्तके, मग ते इतिहासावरचे ग्रंथ असो, की महत्वाच्या घटनांची नोंद असलेल्या बखरी असो, त्या चाळण्याशिवाय गत्यंतर नसे. या ग्रंथातून मात्र त्याला  भूतकाळातील घटना, थोर लोकांची वचने, त्यांच्या त्यांच्या कामगिरीची माहिती होत असे.
जर्मनीतील हे मेंझ शहर तत्कालीन रोमन साम्राज्याचा एक भाग होता. जर्मनीपासून उत्तर इटलीतील अनेक छोटी छोटी राज्ये व शहरे या साम्राज्यात सहभागी होती. -हाईन नदीवरील मेंझ हे शहर त्या काळी एक महत्वाचे औद्योगिक केंद्र होते. युरोप व बाहेरच्या प्रांतातील व्यापारी तेथे येऊन सौदे करत. जोहानचे कुटुंबीय त्यांच्याकडून अनेक महागड्या चीजा, उदा. इटलीच्या काचा, चीनमधून आणलेले कागद, हिंदुस्थानातून आयात केलेले मसाले, युरोपातील इतर देशातून आलेली उत्तमोत्तम सुंदर पुस्तके खरेदी करत.
हे सर्व ग्रंथ म्हणजे ल्याटिन भाषेतील धार्मिक ग्रथ असायचे. ते शाईत लिहिलेले असत. हे अत्यंत सुबक अक्षरात लिहिलेले ग्रंथ पूर्ण होण्यास काही महिने लागत आणि अर्थातच ते खूप महाग असत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण सहाशे वर्षांपूर्वीच्या उत्तम पुस्तकाची किंमत चक्क एखाद्या  ब-यापैकी शेतजमिनीइतकी असे. त्याशिवाय जोहानचे पिताश्री स्थानिक लेखनिकांना पैसे मोजून काहे ग्रंथांच्या नकला करून घेत. हे नकला केलेले सुटे कागद मग नीटस व सुंदर अशा शीर्षकांनी नटलेल्या आवरणात काळजीपूर्वक ठेवले जात.
कागदाचा शोध लागण्यापूर्वी बकरे, मेंढ्यांच्या कातडीपासून बनवलेल्या चर्मपत्रांवर हे लेखन केलेले असे. ही कातडी व्यवस्थितरित्या कमवून हवी तशी ताणली जात आणि त्यांचा पृष्ठभाग गुळगुळीत केला जाई. असे हे चर्मपत्रांचे पुस्तक पूर्ण होण्यापूर्वी त्यावर अनेक कारागीर काम करत असत. जोहानला आपल्या घरातील प्रत्येक पुस्तक वाचण्याची उत्कंठा निर्माण झाली. ते कसे कसे तयार झाले, त्याच्या हरएक प्रक्रियांचे त्याने बारीक  निरीक्षण केले. ही लिहून झालेली सुटी चर्मपत्रे एका लेखनिकाकडून दुस-या लेखानिकाकडे सोपवली जात. तो त्यावर प्रत्येक प्रकरणाचे शीर्षक, मथळे, उपमथळे लाल रंगाच्या शाईच्या अक्षरात लिहित असे. ही लाल रंगातील अक्षरे काळ्या अक्षरांहून उठून दिसत. काही वेळा हे लेखनिक लाल रंगाच्या शाईने पहिल्या ओळीतील अक्षर अधोरेखित करत. या चर्मपत्राच्या शेवटी थोडी जरी जागा शिल्लक राहिली तरी लेखनिक आपले पुढील प्रकरण अगोदरच्या प्रकरणानंतर लगेच सुरू करत असे. एकूण काय, चर्मपत्रावरील इंच न इंच जागेचा उपयोग केला जाई. यासाठी हे  लेखनिक आपले लेखन कौशल्य पणाला लावीत. यानंतर ही चर्मपत्रे सजावटकाराला दिली जात. तो पत्रांवरील समासात छोटी छोटी चित्रे, भूमितीच्या आकृत्या, पानाफुलांच्या सीमारेषा रेखाटून चर्मपत्रे सुशोभित करत असे. आकर्षक रंगीत चित्रे व प्रत्येक प्रकरणाच्या प्रारंभीचे मोठे अक्षर काढण्यासाठी जादा आकार द्यावा लागे. पुस्तक अधिक आकर्षक दिसण्यासाठी पातळ असे सोनेरी आवरण घालण्यात येई. मग हे पुस्तक बांधणीसाठी दिले जाई. तो कारागीर सर्व चर्मपत्रे एकत्र करून काळजीपूर्वक एकात एक  शिवून दोन पातळ लाकडी तुकड्यांमध्ये बांधत असे. या तुकड्यांवर कापडी, चामड्याचे अथवा अगदी सोनेरी, रुपेरी एवढेच नव्हे तर हस्तिदंती कोरीव काम केलेले आवरण घालण्यात येई. काही पुस्तकांच्या सजवलेल्या आवरणावर पुस्तकाचे शीर्षक पितळी अक्षरात बसवले जाई. अशा प्रकारे बनवलेली ही पुस्तके इतकी महाग असत, की  ती हाताळताना पुष्कळ काळजी घ्यावी लागे. ती कशीही हाताळणे परवडणारे नव्हते.
अशी ही पुस्तकाची निर्मिती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जोहान वाट पाहत बसे. शेवटी शेवटी  तर तो अगदी उतावीळ झालेला असे. कधी हे पुस्तक पूर्ण होते, याची त्याला घाई झालेली असे. पुस्तकाच्या प्रती नकलून देणारे लोक ते पुस्तक काही आठवड्यात देत असले, तरी सजावटकार पुस्तक पूर्ण करून द्यायला काही महिने तरी लावत असत. या सगळ्या लांबच लांब लागणा-या प्रक्रियेवर काही तरी उपाय असला पाहिजे, असे जोहानला राहून राहून वाटत असे. आणि एके दिवशी तो उपाय तोच शोधून काढणार होता. (  क्रमशः )
संदर्भ आणि मुक्त रूपान्तर :-
1.Fine Print by Joann Johansen Burch
2. Gutenberg by Leonard Everett Fisher
3. A Short Hostory of Printed World by Chappel, Warren (New York, 1970)
4. Johann Gutenberg and His Bible by Ing, Janet (New York, The Typophiles, 1988)
5. Johann Gutenberg: The Inventor of Printing by Scholderer, Victor , London (Yhe Trustees of British Nuseum, 1963)
6. The First Book of Printing by Epstein, Sam & Beryl, New York (Franklin Watts, 1975)
7. Johann Gutenberg and the Invention of Printing by Brayton Harris, New York (Franklin Watts,    1972)
8. Wings of Words by McMurtrie, Douglas C. New York (Rand McNally, 1940)
9. Printing by Ryder, John London (The Bodley Head 1960)
 मंगेश नाबर
७ कृष्ण बिल्डींग क्र.१, गोखले सोसायटी लेन, परळ, मुंबई ४०००१२.
दूरध्वनी क्र. (०२२) २४१३ ५७५५, सेल क्र. ९७५७३९३५९८
पूर्वप्रसिद्धी : दै. नवप्रभा, पणजी, गोवा
श्री. यशवंत कर्णिक यांचा नवीन लेख

दहशत

यशवंत कर्णिक
        दहशत हा एक भयंकर शब्द आहे. काळीज थरथरवणारा, अंगावर काटा उभा करणारा. एका विशिष्ट प्रवृत्तीच्या लोकांमुळं केवळ भारतालाच नव्हे तर जगातील अनेक  राष्ट्राना त्यानं ग्रासून टाकलंय.
धर्मग्रंथ – जो मूलतः त्या त्या धर्माचं दर्शनशास्त्र निरनिराळ्या संकल्पनांतून साकार करतो – हा कधी स्पष्ट असतो तर कधी गूढ. त्याचा अर्थ लावणं नि त्यातील संकल्पनांचे  नि आदेशांचे योग्य रीतीने पालन करणं  हे ते  तो धर्म  पाळतात त्यांचं  आद्य कर्तव्य असतं.  कोणताही धर्मग्रंथ मानवाला अयोग्य मार्गानं वाटचाल करायचा आदेश देत नाही. प्रेम, ऋजुता, करुणा, याचाच अंगिकार करा नि सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांना सुखाची अनुभूती द्या असाच संदेश या धर्मग्रंथांतून मानवाला दिलेला असतो.
पण ईश्वरानं प्रवृत्ती नावाची एक भावना मानवासह सर्व प्राणीमात्रांना बहाल केलेली आहे. ती कधी सुष्ट असते तर कधी दुष्ट. कधीकधी ती दोहींच्या सीमारेषेवर वास्तव्य करून कधी इकडे झुकते तर कधी तिकडे. ह्या प्रवृत्तीला मग धर्मग्रंथातून विपरीत अर्थ काढून त्यायोगे इतर धर्मियांना त्रास देण्याची – किंबहुना नष्ट करून टाकण्याची – प्रेरणा होते. अशी ही प्रवृत्ती आज चौदाशे वर्षे झाली शांतताप्रिय माणसांच्या मागे हात धुऊन लागली आहे. आपला ग्रंथ तोच फक्त ईश्वरप्रणित नि ईश्वरास मान्य असलेला ग्रंथ आहे, इतर आहेत ते खोटे आहेत, त्यांना मानणा-यांनी ते सोडावेत नि आपला जो धर्मग्रंथ आहे तो मानावा, अन्यथा त्यांना नष्ट केले जाईल कारण ते उपरे आहेत, अश्रद्ध आहेत. अश्या ह्या प्रवृत्तीनं आज जगात जो हिंसेचा धुमाकूळ घातला आहे तो कधी काळी बंद होईल असं दिसत नाही. त्याला जोड म्हणूनच की काय विषमतेतून निर्माण झालेली हिंसा समाजाला विभाजित करीत आहे. पण ती सीमित आहे नि तिचं उच्चाटन व्हावं याचे प्रयत्नही मानव करून राहिला आहे.
उपरोल्लेखित भयंकर प्रवृत्तीला लगाम घालण्याचा प्रयत्न काही राष्ट्रे निकराने करीत आहेत. आपल्या देशातही ते प्रयत्न होतायेत पण राजकारण्यांच्या बोटचेपेमुळे ते यशस्वी होण्याची चिन्हे नाहीत. आपल्या तर एका राज्यात ती प्रवृत्ती एकोणीसशे नव्वदच्या दशका पासून इतकी धुमाकूळ घालत आहे की एक निष्पाप, सज्जन व सुसंस्कृत  समाज त्यामुळं बेघर झाला आहे. केवळ विस्थापितच नव्हे तर देशोधडीला लागला आहे.
नुकतच एका इंग्रजी पुस्तकाचं ( अंडर द शाडो ऑफ मिलीटन्सी : द डायरी ऑफ अन अननोन काश्मिरी ) मराठी भाषांतर ‘दहशतीच्या छायेत’  माझ्या वाचनात आलं. तेज धर ह्या एका विस्थापित काश्मिरी पंडितानं ते लिहिलं आहे. अत्यंत करुण शब्दांत त्यानं आपल्या निवेदनाची सुरवात केली आहे :
” मेलेल्या काश्मिरी पंडिताची कुणाला फिकीर नाही ; रोज कणाकणांनी मरणा-या पंडिताना ह्या भारत देशात कुणी वाली नाही. ”
हे शब्द मी वाचले नि एक अपराधी जाणीव माझ्या मनाला टोचून गेली. होय, मी सुद्धा काश्मिरी पंडितांना विसरलो होतो कारण माझ्या उबदार घरट्यात मी सुरक्षित होतो नि बेघर होऊन दरदर भटकणा-या पंडितांची दखल माझ्या डोळ्यानीच काय पण मनानंही घेतली नव्हती. पालीस्टेनियनांच्या परिस्थितीवर अश्रू ढाळणारं आमच्या  ‘गठ्ठामत’ प्रेमी सरकारला तर ही जाणीवच नव्हती की आपल्या घरचे पालिस्टीनी –  काश्मिरी पंडित –  गेली वीस वर्षं न्यायासाठी आक्रोश करताहेत .
भारताला स्वातंत्र्य बहाल करताना ब्रिटीश सरकारनं मोठया धूर्तपणे शेकडो लहान मोठया संस्थानानाही स्वातंत्र्य  देऊन टाकलं होतं. बहुतेक सर्व संस्थानीकानी आपापली संस्थानं शहाणपणानं भारत किंवा पाकिस्तानला  संलग्न करून टाकली होती. जुनागढ, हैद्राबाद, आणि काश्मीर यांनी खळखळ केली. जुनागढच्या जनतेनं स्वबळावर सामळदास गांधींच्या नेतृत्वाखाली जुनागढ स्वतंत्र केलं. तिथला नवाब पाकिस्तानला पळून गेला. हैदराबादच्या निजामानं इत्तेहादुल-ए-मुसलमीन’ ह्या दहशतवादी संघटणेमार्फत स्वतंत्र देश स्थापण्याचा प्रयत्न केला, पण एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये भारतीय लष्कराने ‘पोलीस कारवाई’ करून त्याचं कंबरड मोडलं नि पुढं भारत सरकारनं  त्या राज्याचे तीन तुकडे केले नि तीन राज्यांमध्ये वाटले. काश्मीरचे संस्थानिक हिंदू होते. त्यानांही काश्मीर स्वतंत्र राष्ट्र व्हावं नि आपण त्याचे प्रमुख व्हावं ह्या महत्वाकांक्षेनं ग्रासलं पण   सरदार पटेलांनी दमदाटी केल्यावर तेही संस्थान भारताशी संलग्न करायला तयार झाले. पण तेवढयात पाकिस्तानी लष्करानं टोळीवाल्यांच्या वेषात काश्मीरवर हल्ला केला. भारतीय लष्करानं त्यांना मागे हटवलं. आता उरलेला भाग मुक्त होणार इतक्यात राजकारणनिपुणता नसलेल्या व आपलं ‘लोकशाहीपण’ जगाला दाखवण्याचा हव्यास असलेल्या भारतीय पंतप्रधानांनी यू.एन.ओ. कडे धाव घेतली. तिथे देश फसला नि निष्कारण वादात अडकला. यू.एन.ओ. नं जैसे थे (स्टेटस कॉ) चा निवाडा दिला. लढाई थांबली नि काश्मीरचा एक मोठा तुकडा मात्र पाकिस्तानकडे राहिला. पाकिस्तानी राज्यकर्त्यानी दूरदर्शी योजना तयार केली असली पाहिजे. मुस्लिमांची बहुसंख्या असलेला भारताकडील काश्मीरचा प्रदेश कधी न कधी तरी उठाव करून पाकिस्तानकडे येईल अशी त्यांना खात्री वाटत असली पाहिजे. नाहीतरी त्यावेळी पाकिस्तानात एक घोषणा वारंवार होत असेच की : “हसके लिया पाकिस्तान, लढके लेंगे हिंदुस्तान”. ते शक्य झाले नाही नि यापुढे  तर होणारच नाही. पण काश्मीर भारताकडे राहू नये यासाठी ते आता काश्मिरी लोकांचाच उठाव करू लागले आहेत. भारताचे कणाहीन नेते हताश झालेले दिसू लागले आहेत. लष्कराचे अधिकार कमी करायला सुद्धा ते राजी झाले आहेत. अश्या परिस्थितीत सामान्य भारतीयाला काश्मीरची चिंता छळू लागली आहे.
उपरोल्लेखित पाकिस्तानी योजनेचा एक भाग म्हणजे तिथे असलेला हिंदू उखडून बाहेर फेकून तरी द्यायचा किंवा ठार तरी मारून टाकायचा. ते सत्र एकोणीसशे नव्वदीत सुरू झाले व आता काश्मीर खो-यात एकही हिंदू उरलेला नसल्यामुळे थांबले आहे. हिंदू पंडित जम्मू, दिल्ली वगैरे ठिकाणी शिबिरांत अत्यंत हालअपेष्टांत  दिवस कंठत आहेत. त्यांचे घरे गेली, जमिनी गेल्या, सर्व काही मुसलमानानी  लाटले. हिंदूंचे इतके हाल बाबराच्या वेळी तरी झाले असतील की नाही याची  शंका वाटते. आमचे सरकार डोळ्यांवर कातडे ओढून गप्प बसले. कारण काय तर ‘एकगठ्ठा’ मते. कुठून तरी निवडून यायचे नि लुटायचे. बस्स.  काश्मिरी पंडित जगले काय मेले काय कुणाला पर्वा आहे !
आता पाकिस्तानी योजनेचं अखेरचं पर्व सुरू झालं आहे. ‘आजादी’ ची मागणी करून, हिंसेन ते  साध्य करून घेऊन , काश्मीर खोरं पाकिस्तानला जोडायचं. पाकिस्तानप्रेमी लोक काश्मीरच्या निरनिराळ्या शहरांत रस्त्यांवर उतरले आहेत. निमलष्करी दलांवर दगडफेक करीत आहेत. दहशतवादी बॉम्बस्फोट करताहेत. लष्करी ठाण्यांवर चालून जाताहेत. एका अनुनभवी तरुण माणसाकडं राज्याची धुरा आहे. तो गोंधळलेला आहे.  काहीही वक्तव्यं करतो. अडचणीत येतो. अश्या कठीण वेळी भारत सरकार नेहमीप्रमाणं जगाला दाखवण्यासाठी लोकशाहीचे फुसके प्रयोग करीत बसेल तर काश्मीर निश्चितच हातातून निसटून जाईल यात शंका नाही.
तेज धर यांनी एका अनामिकाची दैनंदिनीतून पंडितांच्या दुर्दैवाचे जे चित्र उभे केले आहे ते अस्वस्थ करून सोडणारे आहे. एकोणीसशे नव्वद मध्ये पंडितांचे आदरणीय नेते सदानंद प्रेमी व त्यांच्या तरुण पुत्राची निर्घृण हत्या करण्यात आली त्यावेळीच भारत सरकारने इस्लामिक मूलतत्ववाद्यांवर कडक कारवाई केली असती तर पुढे जी हिंसक घटनांची मालिका सुरू झाली तिला आळा बसला असता. पण केंद्रीय सरकारचे गृह खाते उदासीन राहिले. कदाचित त्या घटनेकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले गेले असण्याची शक्यता आहे कारण केंद्रीय गृहमंत्री होते आज काश्मीरची ‘आजादी’ मागणारे मुफ्ती महम्मद सईद.
ह्या धूर्त मुफ्तींची एक मुलगी मेडिकल कॉलेजात शिकत होती. तिचं अपहरण झालं. तिच्या बदल्यात  अपहरणकर्त्यांनी सहा दहशतवाद्यांच्या सुटकेची मागणी केली होती. संशयाला भरपूर जागा आहे की ते अपहरण नसून मुफ्तीनीच घडवून आणलेला एक बनाव होता. सहा दहशतवाद्यांना  सोडले गेले आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची कन्या सुखरूप घरी परत आली. तिच्या केसालाही धक्का लागलेला नव्हता. एक तरुण सुंदर मुलगी आठ दिवस गुंडांच्या ताब्यात राहते नि सुखरूप परत येते ! विश्वास बसतो त्यावर ? तिच्या ठिकाणी एखादी हिंदू पंडिताची तरुण मुलगी असती तर ती धडपणे परत मिळाली असती ? अगदी तिचे वडील महामंत्री असते तरी ?
नसतीच मिळाली.  अनेक पंडितांच्या बायका नि मुली काश्मीरमधल्या दहशतवाद्यांनी पळवून नेल्या, भ्रष्ट केल्या, ठार सुद्धा मारून टाकल्या. त्याचा हिशोब भारत सरकारजवळ आहे? तेज धर यांनी आपल्या पुस्तकात पंडित जागरनाथांच्या शीला ह्या निरागस मुलीची हकिगत दिली आहे ती हृदय विदीर्ण करून टाकणारी आहे. ती मुळातच वाचावी :
” त्या तीन बंदूकधा-यांनी जागरनाथांच्या कपाळावर बंदूक रोखली आणि त्यांच्या समोर ते शीलाला ओढत घेऊन गेले. ” तिच्या पोटात आम्ही आमचं मूल घालणार आहोत”, ते उन्मत्त हास्य करीत म्हणाले. तिला मग जुन्या-नव्या सर्व दहशतवाद्यांनी हवी तशी वापरली. ती संपूर्ण शुष्क होऊन अखेर वेडी झाली. वेदना, यातना यांचं मूर्तिमंत प्रतिक बनली. आता श्रीनगरच्या रस्त्यातून भिकारीण होऊन हिंडते. धावते. पोरे तिला दगड मारतात. ”
एककल्ली बुद्धिवंत, तथाकथित मानवी हक्कवाले, विकले गेलेले पत्रकार, एकगठ्ठा मतांना लालचावलेले राजकारणी यांच्या नगा-यापुढे पंडितांच्या किंकाळ्यान्चे आवाज बहिरेपणाचे सोंग पांघरलेल्या लोकांना कसे  ऐकू येणार?
काश्मिरी पंडितांना भारत सरकार आता ‘विस्थापित’ म्हणत नाही. ‘स्थलांतरित’ म्हणतं. त्या दुर्दैवी माणसांना रोजीरोटी मिळते की नाही याची चिंता सरकारला नाही, मानवतावादी म्हणवून घेतात त्यांना नाही आणि जनतेलाही नाही. ईदच्या दिवशी कसाबला बिर्याणी दिली होती की नाही याची चिंता करणा-या आमच्या ग्रेट पत्रकाराना नि टीव्ही वाल्यांना विस्थापित पंडितांची लहान पोरे जेवली की उपाशी आहेत याची चौकशीही करावीशी वाटत नाही.
‘दहशतीच्या छायेखाली’ ही अनामिकाची दैनंदिनी वाचताना मला अनी फ्रांक ह्या डच ज्यू मुलीच्या डायरीची आठवण झाली. ज्यूना अखेर न्याय मिळाला, स्वतःचा देश मिळाला, काश्मिरी पंडितांना काय मिळणार आहे? त्यांची घरंदारं, जमिनी, सर्व काही लाटलं गेलं आहे. आमचे केंद्रीय मंत्री दगडफेक करताना पोलिसांच्या गोळीबारात मेलेल्या लोकांच्या आप्ताना भेटायला नि लाखो रुपयांची मदत करायला श्रीनगरला जातात पण जम्मू, दिल्ली वगैरे ठिकाणी शिबिरांत विपन्नावस्थेत जीवन कंठणा-या पंडितांना भेट द्यायला त्यांना सवड नाही. नव्हे त्याची गरजच त्यांना वाटत नाही. पंडितांची मते ती किती असणार ?
काश्मीर म्हणे निसर्गाने नटलेला भूप्रदेश आहे. पृथ्वीवरचा स्वर्ग वगैरे आहे. आमचा गोवा, कोंकण, केरळ काय उजाड आहेत? कोणताही प्रदेश सुंदर दिसतो , हवाहवासा वाटतो तो तिथल्या झाडाझुडपांपेक्षा ऋजू, शांतताप्रिय, सुसंस्कृत लोकांमुळे. मी एकदाच काश्मीरला गेलो होतो. लाल चौक – जो आता ‘आजादी’ चळवळीचं केंद्र आहे –  तिथे एका हॉटेलात उतरलो होतो. अंगात ढगळ ‘फेरन’ , त्याखाली धगधगती ‘कांगडी’, डोळ्यांत लांडग्याच्या नजरेची क्रूर चमक, आणि अविरत घोगरी बडबड करीत हिंडणारे काश्मिरी लोक पाहून माझा भ्रमनिरास झाला. काश्मिरी संस्कुतीचे गोडवे गायले गेलेत त्यात समावेश होणारे लोक ते हेच काय असा प्रश्न माझ्या मनाला पडला. तो तर धर्मवेड्या, उन्मत्त, असंस्कृत माणसांचा देश मला वाटला.
तेज धर यांनी वैतागून म्हटलंय :
” काश्मिरी पंडितांच्या दुःखाकडे अक्षम्य दुर्लक्ष झालंय. राज्य व केंद्र सरकार तर ह्याला जबाबदार आहेच पण इतर भारतीय  समाजाची उदासीनताही तितकीच कारणीभूत आहे. मानवी यातनांची ज्यांना दूरान्वयेही झळ लागत नाही अश्यांच्या स्वार्थमूलक, बौद्धिक कसरतीखाली  सर्व समाज असतो त्यामुळं काश्मिरी पंडितांची दुःखं खोल गाडली गेली आहेत. ”
पंडितांची तर वाट लागलेलीच आहे. काश्मीर तरी आपल्यापाशी उरतो का हे जवळचा काल ठरवील. आपले सरकार तर मला हताश झाल्यासारखे दिसते आहे.
***             ***          ***
यशवंत कर्णिक
९०२ ग्लेन ईगल, परळ गाव, परळ, मुंबई ४०० ०१२.
सेल क्र. ९७६९६५२९११
इमेल – karnikyeshwant@gmail.com
पूर्व प्रसिद्धी – दै. नवप्रभा, पणजी, गोवा.
श्री. यशवंत कर्णिक यांचा नवीन लेख
माणसाचा जानी दोस्त

यशवंत कर्णिक

मी आता खूप म्हातारा झालोय. ‘एकटा’ नाही पण ‘एकाकी’ आहे कारण सहचारिणी एकतीस वर्षांपूर्वीच गोव्यात असताना अचानक देवाघरी निघून गेली. वाचन-लेखनानं आधार दिला. सोबत दिली. स्वतःसाठी एखादं झोपडं बांधावं असं काही सुचलं नाही. अक्कल नव्हती म्हणा, शक्यता नव्हती म्हणा, आज दोन मुलांकडे आळीपाळीनं राहतो. ब-यावाईट आठवणी साथीला असतातच. त्यांत पहाटेचे रंग शोधतो. पण ते रंगही आता धूसर होऊ लागलेत. पण त्यानं मनाला थोडीफार उभारी येतेच. माझे गोमंतकीय कविमित्र मनोहर   सावळाराम नाईक  उर्फ ‘नाना’ आपल्या ‘ऋतू बरसून गेला’ ह्या सुंदर कवितेत शेवटी म्हणतात,

” दिस ढळला म्हणावा तर घाटमाथ्यावर

फिरून हे झुलतात कसे  सोन्याचे झुंबर

बु-या काळी घडे असा काही भल्याचाही संग

सांज होता आकाशात पुन्हा पहाटेचे रंग “.

विपरीत परिस्थितीला धैर्यानं सामोरं जाणा-या नि अंधा-या क्षितिजावर नवे रंग  शोधणा-या व्यक्तिमत्वाचं हे मनोगत आहे. तसं मला होता आलं असतं तर काय बहार झाली असती ! वार्धक्याच्या एकाकीपणात मी स्वतःचाच सोबती झालो असतो नि नानांच्याच शब्दांत म्हटलं असतं,

” आतुन तरू रसवंत राहता पतझडीची का खंत?

शिशिर असो वा वसंत त्याला ऋतू सगळेच पसंत ”

      पण माझा पिंड वेगळा. मी नानांसारखा सर्व ऋतूंत सारखाच रममाण झालो नाही. एकाकीपणातच सुख शोधत राहिलो. वाचणार किती अन लिहिणार किती ? सर्जनालाही मर्यादा असतेच ना ? संध्याकाळी बागेत फिरायला जातो. तिथ माझ्याइतके नव्हे पण ब-यापैकी वयानं ज्येष्ठ झालेले लोक बाकांवर येऊन बसलेले असतात. कुणाला कशाचं वेड असतं तर कुणाला कशाचं.
      गंजीफांचे प्रेमी फक्त घरांत, क्लबांत, किंवा रेल्वेच्या डब्यांतच पत्ते  खेळतात असं नाही. बागेतही खेळतात. कुणी बडबड करत बसतात. कुणी चेहरे बघत बसतात. कुणी क्षितिजात हरवलेले. कुणी पार्क मध्ये खेळणा-या छोटया बालकांत  गुंतलेले. एक पंजाबी गृहस्थ साखळी बांधलेला कुत्रा घेऊन येतात. त्याच्याशी खेळतात. तो दूर गेला की त्याला प्रेमानं हाक मारतात. आपल्या देशात कुत्र्यांची नावं कधीच इंडियन असत नाहीत. ती टोमी तरी असतात नाहीतर जॉनी, बॉबी वगैरे काहीतरी. पण ह्या गृहस्थाच्या छोटया पपीचं नाव चक्क हरबन्स आहे. ते हरबन्स सिंग असावं असा माझा कयास  आहे. आता ते त्यांनी  प्रेमानं दिलंय की कुणातरी सरदारजीवर राग काढण्यासाठी दिलंय हे मला कळायला मार्ग नाही. मी एकदा त्या गृहस्थाला विचारलं की ह्या वयात तुम्ही कुत्र्याची उस्तवार कशी करता? तर तो पंजाबीच, तेव्हां  छाती दीड वीत फुगवून म्हणाला, ” कैसे नही करू जी? मेरा जानी दोस्त जो पडा.  उस्के बगैर मैं जी भी नही सकता. “
       मला त्या गृहस्थाचं विशेष  आश्चर्य  वगैरे काही वाटलं नाही. हे ‘जानी दोस्त’, ‘बेस्ट फ्रेंड’ वगैरे ‘क्लिशे’ मी जन्मभर ऐकत आलोय. पण जेव्हा त्या गृहस्थान  त्या हरबन्सचं तोंडाला तोंड लावून चक्क चुंबन घेतलं तेव्हां मी पाठ फिरवून एकदम चालायलाच लागलो.
       मला कुत्र्यामांजरांच काही प्रेम नाही, मी त्यांचा राग करतो असं नव्हे, पण त्यांना पाळायचं, त्यांच्या उस्तवा-या करायच्या, लाड करायचे, नि ते चावले बिवले तर डोक्टराकडे जाऊन इंजेक्शनं टोचून घ्यायची मला हौस नाही. आम्ही गोव्यात असताना माझ्या मुलीनी चांगली चार मांजरं पाळली होती. त्यांच्या खाण्यापिण्याची आबाळ व्हायचा  प्रश्न नव्हता. रोज घरात मासे यायचे. चांगली गुब्दुल झाली होती. पण एकदा त्यातलं अचानक मेलं. तेव्हां घरात रडारड. एक पोरगी तर दोन दिवस जेवली नाही. मग एक दिवशी एन.आय.ओ. मधले एक शास्त्रज्ञ ओळखीचे होते ते घरी आले. म्हणाले ही ‘पेट्स’ कधी पाळू नयेत. त्यांची आयुष्यं फारफार तर चौदा पंधरा वर्षं असतात. ती मरून गेली की आपल्याला घरातलं कुणी माणूस गेल्याचं दुःख होतं. तेव्हांपासून कोणताही प्राणी पाळायचा नाही असा मी निश्चय केला होता. माझ्यापुरता तो मी पाळला. मुलं माझ्या घरात राहात होती तोपर्यंत त्यांना पाळायला भाग पाडलं. पण आता मी मुलांच्या घरात राहायला लागल्यावर  माझी सत्ता ती काय असणार?
         माझ्या धाकट्या मुलाला कुत्र्यांची फार आवड आहे. पाच सहा वर्षांपूर्वी त्यानं डॉबरमन  जातीचं कुत्रं विकत आणलं. आणलं तेव्हां ते लहान होतं. गोड दिसत होतं. पण पुढं जेव्हा ते एका वेळेला किलो किलो मटण फस्त करू लागलं तेव्हां त्याचा आकार प्रचंड झाला. ते उंचच्या उंच झालं. खुशाल मालक-मालकिणीच्या पलंगावर चढून झोपू लागलं. माझी त्या गोष्टीला काही हरकत नव्हती. पण जेव्हा त्या ‘गोर्गन’ नावाच्या डॉबरमनचा मला उपद्रव होऊ लागला तेव्हां मी चिडायला लागलो.
         त्यावेळी आमच्याकडे एकच टीव्ही होता नि तो मुलाच्या शयनगृहात. मला बातम्या ऐकायच्या (की पाहायच्या?) असल्या की मी थोडा वेळ तिथे जाऊन बसत असे. त्यावेळी तो ‘गोर्गन’ (त्याला कुत्रा म्हटलेले माझ्या मुलास आवडत नसे) माझ्यावर भयंकर चिडायचा. थैमान घालायचा. त्याच्या हिशेबी ती खोली फक्त माझा मुलगा, त्याची बायको, मुले व तो स्वतः यांचीच  फक्त होती. मी त्या कुटुंबातला घटक नव्हतो. मी ‘भायला’ होतो !
         एक दिवशी मी तिथे  जाऊन टीव्ही बघू लागलो. तर गोर्गनसाहेब चवताळले. त्यांनी माझ्यावर सरळसरळ हल्लाबोल केला. त्याचे लक्ष्य माझा गळा हे होते. मला तो खोलीच्या बाहेरही जाऊ देईना. मी “काका काका मला वाचवा ” च्या चालीवर आक्रोश करू लागलो. सून धावत आली.  तो आवरेना, तेव्हां ती बाल्कनीत जाऊन वॉचमनला हाका  मारू लागली. अश्यावेळी कुठला वॉचमन जागेवर हजर असतो? आपल्याला गरज असते तेव्हां पोलीस रस्त्यावर कुठे दिसतो का? तर मला वाटलं की माझी अखेर जवळ आली. मी ओरडायचा थांबलो. गळ्यावर हात घट्ट दाबून ठेवले. तेवढयात माझी शाळेत जाणारी नात आणि नातू आले. त्यांनी मला मिठी मारली. त्यांना चावण्याची त्या राक्षसाला इच्छा नव्हती. तो बाजूला झाला. तसं माझ्या त्या नातवंडानी मला खोलीबाहेर  काढलं नि सुरक्षित जागी म्हणजे माझ्या खोलीत नेऊन पोचवलं. गोर्गन साहेब फुसफुसत आणि भुंकत राहिले. मग सूनबाईनी मला रिक्षात घालून डॉक्टरकडे नेलं नि इंजेक्शन देववलं.
        दुस-याच दिवशी मी माझा मुक्काम हलवला नि मोठया  मुलाकडे राहायला गेलो. तर पुढं काय झालं, माझ्या त्या श्वानप्रेमी मुलाकडे कुणी महत्वाचे पाहुणे येणार होते. त्यांना कुत्र्याचं अतिशय भय वाटत होतं. (जणु काही मला वाटत नव्हतच ! ). तेव्हां मुलानं त्या आपल्या लाडक्या गोर्गनला (कुत्रा म्हणायचं नाही हं) कुणाला तरी देऊन टाकला. कदाचित  तोही (म्हणजे माझा मुलगा )  त्याला कंटाळला  असावा.
       ह्या वर्षी मे महिन्यात मी ब-याच दिवसांनी माझ्या ह्या मुलाकडे राहायला आलो. आणि अवघ्या काही दिवसांतच मुलानं फ्रेंच जातीचं एक छोटंसं कुत्रं खास पारिसहून मागवलं. ते व्हाया बेंगळूरू आमच्या घरी येऊन दाखल झालं. ते गोर्गन साहेबासारखं मोठं होणार नाही, लहानच राहाणार, ही फार प्रेमळ जात असते, वगैरे मला सांगण्यात आलं. फ्रेंच असल्यामुळंत्याचं नाव इंग्लिश ठेवून चालणार नव्हतं. माझा मुलगा आर्टीस्ट. त्यानं कुत्र्याला प्रख्यात फ्रेंच आर्टीस्ट मोन्शियार तुलूस याचं नाव दिलं. तुलूस अंगानं लहान खरा पण भलताच खादाड निघाला. त्याच्या महागड्या खाद्याखेरीज तो कागद, पेनं, मोजे, झाडू, ब्रश, चपला, टूथपेस्टची ट्यूब वगैरे जे जे मिळेल ते ते चघळू लागला. मी हा लेख लिहीत  असताना  तो  एका राष्ट्रीय  इंग्रजी वृत्तपत्राचा अग्रलेख खातोय.
       सुरवातीला मला त्याचा तसा काही त्रास नव्हता. मलाही आता माझ्या खोलीत वेगळा टीव्ही असल्यामुळं मुलाच्या टीव्हीवर  बातम्या ऐकाव्या लागत नाहीत. माझी नातवंडे – ती आता कॉलेजात जातात – तुलूसचं सर्व काही करतात. त्याला कुरवाळतात, त्याचे पापे घेतात, त्याला भरवतात. इतकंच काय आमच्या घरी कामाला असलेली पिंकी नावाची मुलगी त्याच्यावर इतकं प्रेम करते की तो रोज सकाळी ८ वाजता तिची यायची वेळ झाली की बाल्कनीत तिची वाट बघत शांत बसून राहतो. त्याचे लाड करायचे, त्याला कुरवाळायचं म्हणजे खाली बसावं लागतं. ते मला आता ह्या वयात जमत नाही. मी खुर्चीवर बसूनच त्याच्या पाठीवरून हात फिरवतो.
       सगळं काही ठीक चाललं होतं. पण एक दिवशी माझा शस्त्रक्रिया झालेला पाय फार दुखू लागला. पिंकीनं तो तेल लावून चोळून दिला. ते त्या ‘प्रेमळ’ तुलूसनं पाहिलं. मला वाटतं त्यालाही माझी सेवा करायची उबळ आली. तो माझ्या पायावरून आपला हात (की पाय?) प्रेमानं फिरवू लागला. तो डॉबरमन, अल्सेशियन वगैरे काही नसला तरी त्याची नखं तशी तीक्ष्णच आहेत. मी त्याला दूर पिटाळू लागलो. तशी त्यानं दुसरी युक्ती काढली. तो चक्क माझा पाय चाटू लागला. चाटताना त्याचे डोळे तांबूस होऊ लागले. तेव्हां मला भीति वाटली की केव्हातरी त्याला माझे अतिशयच प्रेम आले आणि त्यानं माझा आंगठा तोडून गिळून टाकला तर काय करायचं? तर हा फ्रेंच जातीचा, ‘तुलूस’ ह्या महान चित्रकाराच नाव मिरवणारा,  ‘माणसाचा जानी दोस्त’ म्हणवणारा  माझा वैरी होऊन बसलाय त्याला उपाय काय?
       सध्या मी कुत्र्यांचं भय असणा-या एखाद्या महत्वाच्या पाहुण्यानं आमच्याकडे राहायला यावं असा देवाचा धावा करतोय.  नाहीतर  मला मागच्या खेपेसारखं  इथून पळून जावं लागेल.
       श्वानमित्रांनो, तुमच्या भावना तर मी दुखवत नाही ना? गैरसमज नसावा.
***           ***          ***
यशवंत कर्णिक
ग्लेन ईगल, परळ गाव, परळ मुंबई ४०० ०१२
मोबाईल क्र. ९७६९६५२९११, इमेल : karnikyeshwant@gmail.कॉम
( लेखाची पूर्वप्रसिद्धी – दै. नवप्रभा, पणजी, गोवा. )
श्री. यशवंत कर्णिक यांचा नवीन लेख

प्रतिभेचे रंग

यशवंत कर्णिक

       मी १९६२ च्या मे महिन्यात प्रथम गोव्यात आलो तेव्हा दोन माणसांना बघायची – आणि शक्य झाल्यास भेटायची – इच्छा माझ्या  मनात होती. ते होते कवी बाळकृष्ण भगवंत बोरकर आणि स्वातंत्र्यसेनानी हृदयनाथ सरदेसाई. बोरकरांची नादमधुर कविता माझ्या ओठांवर सतत खेळत असे. बालकवी ठोंबरे, भा.रा. तांबे, अनिल, ना.घ.देशपांडे, कुसुमाग्रज, आणि बोरकर यांच्या काव्याचा मी अक्षरशः वेडा होतो. मर्ढेकर नि त्यांच्या पठडीत तयार झालेले कवी माझ्या त्याकाळी हिशेबी नव्हते कारण एकतर त्यांची कविता नादलयीत बसत नव्हती आणि दुसरे नि महत्वाचे कारण म्हणजे मला ती समजतही नव्हती. हा अर्थात त्यांचा दोष नव्हे. गोवा म्हणजे बोरकर आणि बोरकर म्हणजे गोवा अशी काहीतरी माझ्या मनाची धारणा  झालेली होती. हृदयनाथ सरदेसाई हे प्रकरण वेगळे आणि नवीन होते. गोव्यास पोर्तुगीज जोखडातून मुक्त करण्यासाठी भारत सरकार लौकरच हैद्राबादसारखी ‘ police action ‘ घेणार आहे अशी हवा पसरली होती. त्याचवेळी रेडिओवर आणि वर्तमानपत्रांत त्यापूर्वी कधीच न ऐकलेले एक नाव आले. गोव्याच्या मुक्तीलढयात उतरलेला हा तरुण पोर्तुगीज सैनिकांशी दोन हात करताना जखमी झाला आहे, अशी वार्ता आली तेव्हा आम्ही थरारून गेलो होतो. बोरकरांहून अगदीच वेगळ्या क्षेत्रात वावरणारा तो तेजस्वी गोवेकरही पाहावा असे माझ्या मनाने घेतले होते.
     गोव्यात आल्यावर ते दोघेही मला वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणी भेटले, दोघांशी थोडाफार स्नेहही झाला, आणि दोघेही मनाला चुटपूट लागेल अशा आठवणी मागे ठेवून काळाआड निघून गेले. पुण्याच्या ‘अंतर्नाद’ मासिकाच्या जुलै, २००० च्या अंकात माझा ‘ गॉय मज्या मनांतले ‘ हा लेख प्रसिध्द झाला. त्या लेखात मी या दोघांच्या काही हृद्य आठवणी सांगितल्या होत्या. त्या लेखाला आता १० वर्षे होत आलीयत. वाचक विसरूनही गेले असतील. त्यांची उजळणी करण्याचा माझा बिलकुल हेतू नाही. पण जे त्या लेखात नव्हते ते मात्र इथे नमूद करतो. हृदयनाथ सरदेसाई यांचे शौर्य मनःचक्षूपुढे ठेवून मी माझी कादंबरी ‘निळा डोह’ १९७३ मध्ये लिहिली होती, आणि १९७४ मध्ये लिहिलेल्या माझ्या ‘सूर्यास्त’ ह्या कथेचे बीज एका सायंकाळी बोरकरांच्या भेटीने माझ्या मनात रुजले होते.
      मी लिहिणार आहे ते फक्त त्या सायंकाळी बोरकरांनी कळत न कळत माझ्यातील सर्जनाला दिलेल्या चेतनेबद्दल. बोरकरांच्या जन्मशताब्दीचे वर्ष सुरू झाले आहे. त्यांना पाहिलेल्या, भेटलेल्या, त्यांच्याशी स्नेह असलेल्या अनेक सज्जनांच्या मनांत आठवणींचे कल्लोळ उठले असतील. बोरकरांचे एक निकटवर्ती मित्र (आणि शिष्यही) ज्येष्ठ गोमंतकीय कवी मनोहर नाईक बोरकराना ‘ रसलंपट गोसावी ‘ म्हणतात. ” आलिंगन चुंबनाविना हे मीलन आपुले झाले ग / पाहा पाहा परसात हरीच्या रुमडाला सुम आले ग ” अश्या ओळी लिहिणारा कवी ‘रसलंपट गोसावी’ च असला पाहिजे. बोरकर स्वतःही, ” रसलंपट मी तरी  मज अवचित गोसावीपण भेटे ” असं म्हणून गेले आहेत. एक भावार्थानेच नव्हे तर वृत्तीनेही romantic  पुरूष असल्यामुळे स्त्री ही त्यांच्या प्रतिभेत नेहमीच केंद्रस्थानी राहिली. त्यांच्या निसर्गप्रतिमा स्त्रीरूप घेउनच आल्या. त्यांचा श्रावणातला समुद्र  शांत, तृप्त, आणि लावण्यमयी असतो, ( ” समुद्र बिलोरी ऐना सृष्टीला पाचवा म्हैना ” ) कारण सृष्टी गर्भारशी आहे नि  तिला पाचवा महिना लागला आहे ना !
      असा हा अमर होऊन बसलेला श्रेष्ठ कवी माझ्यासारख्या एका छोटया लेखकाच्या अंगावर स्नेहाचे चार सुगंधी थेंब शिंपडून गेला याचा मला अभिमान वाटतो. मला वाटतं १९७४ सालचा मार्च किंवा एप्रिल महिना असावा. एका सायंकाळी मी एकटाच कंपालच्या बाजूने भटकत निघालो होतो, तर बोरकर आणि त्यांच्या सौभाग्यवती अवचित समोर भेटले. मला बघून ते थांबले आणि एक लेखक किंवा कवी दुस-या लेखक किंवा कवीला पहिला प्रश्न जो करतात तो त्यांनी मला केला,
      ” काय, कर्णिक, सध्या काय लिहिताहात?”
      ” अमुक लिहितोय, तमुक लिहितोय, कादंबरी तयार आहे, कथासंग्रहाची जुळणी चाललीय ” वगैरे फटाफट सांगू शकणारा मी काही बहुप्रसवी लेखक नव्हतो, तेव्हा मी थोडा गडबडलोच. मला सावरून घेण्यासाठी असावं, बोरकर लगेच म्हणाले, ” लिहा हो भरपूर. तुम्ही छान लिहिता. गेल्या महिन्याच्या सत्यकथेतली ती तुमची कथा कोणती, सुंदर होती ती. “
      ” गॉन विथ द विंड “,  मी  म्हणालो.
      ” तीच, ”  ते म्हणाले. ” मला आज चार कविता सुचल्यायत. अजून वर्क करतोय मी त्यांच्यावर. उद्यापर्यंत तयार होतील. तुम्हाला वेळ आहे ना ? ऐकवतो, या इकडं “.
      मला त्यांनी खांद्यावर हात ठेवून फूटपाथवर घेतलं नि ते कविता म्हणू लागले. बोरकरांचं वैशिष्ठ्य म्हणजे त्यांनी लिहिलेल्या कविता त्यांना जवळजवळ सगळ्या पाठ असत. नवीन लिहिलेल्या तर असतच कारण आपली कविता अर्थगर्भ नि श्रुतिमधुर कशी होईल याच्या चिंतनात ते अष्टोप्रहर डुंबलेले असत. छंदांत त्यांची कविता आपोपाप बसे, असं छंदशास्त्राचा विशेष अभ्यास असलेले त्यांचे शिष्य कवी मनोहर नाईक म्हणतात.
      बोरकर कविता ‘म्हणत’ म्हणजे ती सानुनासिक सुरात ‘गात’. रविकिरण मंडळातील कवींचं ते वैशिष्ठ्य होतं. पण बोरकर रविकिरण मंडळातील कवी नव्हते. ते त्यापुढील पिढीतले ‘नवकवी’ होते. श्रुतिमाधुर्याची वाट चोखाळताना त्यांनी आत्मप्रत्ययाशी  नाळ तोडली नव्हती. थोडयावेळानं त्यांच्या लक्षात आलं की आपली बायको बिचारी बाजूला निमूटपणे उभी आहे. तेव्हा ते त्यांना म्हणाले, ” तू घरा वच. किदेतरी खावपाक करून दवर. हांव सूर्यास्त पळौन कर्णीकाक घेऊन येता. “
       त्या बिचा-या आज्ञाधारकपणे घराच्या दिशेने निघून गेल्या तेव्हा मला थोडं वाईट वाटलं, पण त्यांच्याविषयी आदरही वाटला. त्या सौम्य व्यक्तिमत्वाच्या ‘टिपिकल’ कर्तव्यदक्ष हिंदू गृहिणी होत्या. मग कविता गुणगुणत आणि गात बोरकर मला कंपालच्या समुद्रकिना-यावर  घेऊन गेले. तिथे वाळूत बसत म्हणाले, “कर्णिक, मी रोज  इथून किंवा मिरामार किना-यावरून सूर्यास्त पाहतो. कित्येक वर्षांचा परिपाठ आहे. त्यातून मला विलक्षण आनंद तर मिळतोच पण ह्या लाटा माझ्यातील creativity  ला सळसळतं तारुण्य देऊन जातात.   माझ्या अनेक कविता मला ह्या वाळूत सुचल्या आहेत. “
       मग ते टक लावून सूर्यास्त पाहू लागले. सूर्य जसा समुद्रात बुडू लागला तसे ते म्हणाले, ” Beautiful ! बघा बघा, अस्ताला जातानासुद्धा कसा दिमाखात जातोय तो. “
       सूर्यास्त झाल्यानंतर आम्ही बोरकरांच्या घरी गेलो. वाटेत सातीनेझमधल्या एका दुकानातून त्यांनी व्हिस्कीची एक अर्धी बाटली विकत घेतली. घरी त्यांच्या धाकटया मुलीनं (मला वाटतं तिचं नाव मुक्ता होतं, आता नीट आठवत नाही. बोरकरांच्या एकाच मुलीला मी त्यावेळी ओळखत होतो. गीताताई. त्या माझे मित्र श्रीराम पांडुरंग कामत यांच्या पत्नी होत्या. अलिकडे एका  वर्षाच्या अंतराने दोघेही कालवश झाले आहेत ) खाण्यासाठी पदार्थ करून ठेवले होते. ड्रिंक घेताघेता बोरकरांनी आणखी काही कविता म्हटल्या. नऊ  वाजता मैफल संपली. मला निरोप द्यायला बोरकर जिना उतरून खाली आले. पुन्हा म्हणाले,
       “खूप लिहा हो, कर्णिक. नोकरी तर आपण पोटासाठी करतोच. प्राथमिकता साहित्यनिर्मितीला. चांगलं लिहा “.
       त्यानंतर बोरकर मला २-३ वेळा भेटले, पण समुद्रकिना-यावर जाणं झालं नाही की कविता गायनाची मैफल जमली नाही. बोरकर गोवा रेडिओमधून निवृत्त झाले, बोरीला राहायला गेले. शेवटचे भेटले ते पर्वरीला त्यांचे जावई श्रीराम कामत यांच्या घरी. मला सूर्यास्त पाहण्याचा परिपाठ ठेवता आला नाही. पण बोरकरांचे ते शब्द अजून माझ्या कानांत गुंजतात : ” पाहा पाहा, अस्ताला जाताना सुद्धा कसा दिमाखात जातो तो. “
       त्या उद्गारातून माझ्या ‘सूर्यास्त’ ह्या कथेचा जन्म झाला आहे.
       कोणताही अनुभव आला की त्यावर ताबडतोब लिहिणं  मला जमत नाही. विषयाचं incubation  मनात व्हावं लागतं.  पण बोरकरांच्या त्या एका वाक्यानं मी इतका झपाटून गेलो की महिन्याच्या आत माझी कथा लिहून झाली. मी ती माझे मित्र व शेजारी, कविवर्य शंकर रामाणी यांना दाखवली. ते  माझ्या कथांचे चाहते होते. त्यांना ती आवडली पण ते म्हणाले, “सत्यकथेला पाठवू नका; नुकतीच तुमची एक कथा त्यांनी प्रसिद्ध केलीय. ही त्यांच्याकडे पडून राहील “. त्याचवेळी अचानक माझे पुण्याचे मित्र बापू वाटवे माझ्याकडे आले. ते ‘कथालक्ष्मी’ नावाचं मासिक काढायचे. त्यांनी कथा माझ्याकडून मागून घेतली आणि आपल्या मासिकाच्या ऑगस्ट १९७४ च्या अंकात छापली. तिचा फारसा बोलबाला झाला नाही म्हणून मी थोडा नाराजच झालो. कारण माझी  स्वतःची ती एक आवडती कथा आहे.
      ‘सूर्यास्त’ चा नायक एक निवृत्त आय.सी.एस. अधिकारी आहे. खूप वृध्द झालाय. मुंबईत राहतोय. त्याची नात आय.ए.एस. अधिकारी आहे. म्हाता-याला सूर्यास्ताचे आकर्षण आहे. एक दिवशी त्याची नात त्याला कारने चौपाटीवर आणून सोडते. म्हातारा ज्या बाकावर बसतो तिथे एक तरुण येऊन बसलेला असतो. तो उठू लागतो, पण म्हातारा त्याला बसून राहायला सांगतो. दोघांत थोडया वेळाने संवाद सुरू होतो. तरुण ए.जी.च्या कचेरीत कारकून असतो. तो अवघडतोच  पण म्हातारा त्याला आश्वस्त करतो. तरुण विचारतो, ” सर, काय असतं एवढं सूर्यास्तात? “
      तेव्हा म्हातारा म्हणतो, ” संपतेवेळचा दिमाख ! उतरणीला लागल्यानंतर इतकं ग्रेसफुली निघून जाणं सोपं नसतं. सूर्यालाच ते जमतं ” . चौपाटीवरच्या पुतळ्याकडे हातातल्या काठीने निर्देश करीत तो पुढे म्हणतो, ” तो… तो माणूस… an  intellectual giant … असाच एक दिवशी दिमाखात अस्तंगत झाला. मी स्वतः पाहिला ना ह्या डोळ्यांनी. डेप्युटी कमिशनर होतो मी त्यावेळी … कलेक्टर… सूर्यास्त पाहताना त्याची आठवण होते… ” .
       कथा सत्यकथेत आली असती तर कदाचित गाजली असती. ती कितीजणांनी वाचली, तिची गुणवत्ता त्यांना जाणवली तरी की नाही याबद्दल मी अनभिज्ञच राहिलो. २००५ साली ती जेव्हा ‘डोलकाठी’ ह्या माझ्या कथासंग्रहात समाविष्ट झाली तेव्हा ती जाणकाराना  भावली. अनेकांनी नावाजली. सुप्रसिद्ध लेखक वि.ग.कानिटकरानी आपल्या पत्रात लिहिलं, ” सूर्यास्त मधील तरलता वाचकाला स्पर्श करते. एखाद्या छान कवितेसारखी ही कथा आहे”.
       त्यांना अर्थातच कल्पना नसेल की समुद्रकिनारी एका मोठया कवीच्याच  मुखातून निघालेल्या उद्गारातून ह्या कथेचा जन्म झालेला आहे तेव्हा तिला काव्यस्वरूप येणं स्वाभाविकच होतं. बोरकरांच्या स्मृतीला मी ही कथा केव्हांच अर्पण करून टाकली आहे.
       बोरकर जेमतेम ७४ वर्षं जगले. आजच्या युगात पंचाहत्तरीपूर्वी जाणं म्हणजे अकालीच म्हटलं जातं. बोरकरांनी म्हणे मृत्युशय्येवर असताना सुनीता देशपांडेना ‘समुद्र बिलोरी ऐना’ ही कविता म्हणायला सांगितली होती. ती कविता सुरेखच आहे. कदाचित बोरकरांची स्वतःची ती आवडती कविता असेल. पण बोरकर त्यावेळी ज्या मनोवस्थेत असतील त्याची अभिव्यक्ती त्यांनी चारच वर्षे अगोदर लिहिलेल्या कवितेत स्पष्ट झाली होती :

” विझवून दीप सारे मी चाललो निजाया

आता अशाश्वताची नुरली मुळीच माया “.

पण कदाचित तो त्यांचा पिंड नसेल. एखाद्या वळणावर माणूस अंतर्मुख होतो, जीवनाचा शोध घेऊ लागतो, उसासतो. पण त्याची जगण्याची नि सर्जनाची ऊर्मी जागृतच असते. त्या स्थितीचे वर्णन त्यांचे पट्टशिष्य मनोहर नाईक यांनी आपल्या ‘ऋतू बरसून गेला’ ह्या कवितेत फार सुरेख केले आहे.

” दिस ढळला म्हणावा तर घाटमाथ्यावर

फिरून हे झुलतात कसे सोन्याचे झुंबर

बु-या काळी घडे असा काही भल्याचाही संग

सांज होता आकाशात, पुन्हा पहाटेचे रंग ! ”

सूर्य अस्ताला जाताना दिमाखातच जातो. प्रतिभेचे रंग मिरवीत. आपल्या मस्तीतच गातो. बोरकरांसारखा !

यशवंत कर्णिक
९०२, ग्लेन ईगल, ९ वा मजला, जी.डी.आंबेकर मार्ग, परळ गाव, परळ, मुंबई – ४०००१२.
दूरध्वनी : 9769652911.  ईमेल ” karnikyeshwant@gmail.com
[ लेखाची पूर्वप्रसिद्धी – दै. नवप्रभा ( ४ एप्रिल २०१०) ]
श्री. मंगेश नाबर यांचा नवीन लेख

घर कागदाचे !

 मंगेश नाबर
     बालपणीच्या चिऊकाऊच्या गोष्टीत आपण ऐकलेले असते, की चिऊचे मेणाचे घर असते आणि काऊचे असते शेणाचे घर. कागदाचे घर कधी कुणी प्रत्यक्षात बांधलेले आणि ते प्रदीर्घ काळ टिकून राहिलेले आहे, असे तुम्ही ऐकले नसेल कदाचित. आपल्या एका मराठी बालगीतात तर कै. राजा मंगळवेढेकर यांचा कल्पनेतील चवदार व  सुंदर चॉकलेटचा बंगलाही आहे. पण मित्रांनो, आहे हं, असे एक कागदाचे घर. खरोखर कागदाचे, तेदेखील वर्तमानपत्राच्या कागदापासून निर्माण केलेले ! तुम्ही माझ्याकडे जसे डोळे विस्फारून बघत आहात, त्यावरून तुम्हाला माझी ही लोणकढी थाप वाटत असेल. तर मग पाहा हे कागदाचे घर.
      हे कागदाचे घर अमेरिकेच्या म्यास्याच्युसेट्स राज्यातील बॉस्टनच्या उत्तर विभागात रॉकपोर्ट येथे आहे. एलीस एफ. स्टेनमन नामक एका मेकॅननिकल  अभियंत्याने हे घर १९२२ च्या उन्हाळ्यात चक्क एक छंद म्हणून बांधायला घेतले. कागदाच्या क्लिप बनवणा-या यंत्रांचे डिझाईन करणारा हा अभियंता होता. एक उत्तम उष्णतेचा निरोधक म्हणून कागद वापरण्याचा त्याचा हेतू होता. आणि तेवढ्यावर तो थांबला नाही. या घरातील सारे फर्निचर आणि काही विलोभनीय अशा चीजाही त्याने कागदापासून बनवल्या.
 
 
      हा वर जो भिंतीचा एक भाग दिसतोय ना, तो कागदाचा आहे बरे का. त्यावर वार्निशचा पातळसा थर दिलेला आहे. जिथे जिथे ते वार्निश फाटलेले आहे, त्या जागेवर निरखून पाहिले तर त्यावेळचे एका विभागातले वर्तमानपत्र आढळते.
      हा खाली दिसतोय तो पियानो. तो कागदाचा नसला तरी त्याचे सुशोभित आवरण कागदाचे आहे.
     आणि हे खाली सुरेख दिसणारे डेस्क आणि खुर्ची. यांच्या निर्मितीसाठी कागद वापरला होता.
     या अभूतपूर्व घराविषयी माहिती गोळा करतांना केप आन सन या वृत्तपत्रात १९९६ मधील आलेली एक मुलाखत उपयोगी पडते. आज एडना ब्युडोईन ( Edna Beaudoin  ) ही  स्टेनमनसाहेबांची नात आपल्या आईच्या मागे हे कागदाचे घर सांभाळत आहे. तिचे कुटुंब या कागदी घराशेजारी असलेल्या दुस-या साध्या घरात राहाते. स्टेनमन हे तिचे चुलतआजोबा होते. तिच्याबरोबर झालेल्या या संभाषणातून हे घर कसे घडले ते ऐकुया.
     ” हे कागदाचं घर कसं काय निर्माण झालं आहे ? “
     ” त्याचं असं झालं. माझ्या एलीस आजोबांनी उन्हाळ्यात राहण्याच्या उद्देशाने ते दोन खणी घर  बांधायला ठरवलं. या घराचा आराखडा पाहिला, तर अमेरिकेतल्या सर्व घरांसारखं त्याचं फ्रेमवर्क हे लाकडाचंच आहे. या घरातली जमीन आणि छत नेहमीप्रमाणे वापरल्या जाणा-या लाकडाचं आहे. भिंतींसाठी मात्र एक इंच जाडीचा दाबून बसवलेला कागद वापरला आहे. तो वापरण्याचं कारण, कागद हा उष्णता निरोधक, हे असावं. एकावर एक असे वर्तमानपत्राच्या कागदाचे सुमारे २१५  थर खळीने चिकटवले आणि त्यावर सर्वात वरच्या थरावर वार्निश चोपडले आहे. त्यामुळे या भिंती खरोखरच पाण्याला दाद न देणा-या अशा झालेल्या (water proof) आहेत. १९२२ मध्ये सुरू केलेलं हे काम १९२४ मध्ये पूर्ण झालं आणि माझे आजोबा या घरात उन्हाळ्याच्या हंगामात १९३० पर्यंत राहायला जात असत. त्यांनी खरं म्हटलं, तर बाहेरून पुठ्ठ्यासारखं काही तरी असं जाड आवरण करायला हवं होतं. पण तसं त्यांनी केलं नाहीये. त्यातली गंमत अशी असावी, की  त्यांना जबरदस्त कुतूहल होतं, आपलं हे घर असंच टिकेल की नाही, हे बघुया. आणि पहा, आजही हे घर जवळपास ८० वर्षांनतर ठणठणीत राहिलेलं आहे.”
     ” काय हो, मध्यंतरीच्या काळात तुम्ही वार्निशचे थरावर थर दिले असतील, नाही का ? “
     ” हो तर. या कागदी भिंतींवर किती तरी वार्निश लावण्यात आलं आहे. आणखी एक भर घातली आहे. हे घर मुळात जेव्हा बांधलं गेलं, तेव्हा त्याला पोर्च असं काहीही नव्हतं. ते केव्हातरी १९३० साली बांधलं आहे. आणि म्हणून त्या पोर्चच्या छपरामुळेच की काय, या कागदी घराच्या भिंतींचा जमिनीलगतचा भाग एक प्रकारे सुरक्षित राहिला आहे.  या शिवाय छताचा पुढे आलेला भाग (shingle) असतो, त्यामुळे भिंतीवरच्या कागदावर बाहेरील हवेचा म्हणावा तसा दुष्परिणाम झालेला नाही. घरावर पावसाचा मारा होत असतो, ते पाणी काहीसे आत येत असते, कधी कधी हिमवर्षाव झाला तर त्याचाही प्रादुर्भाव होतोच. तरीही घर तग धरून राहिलंय. एक मात्र सांगते, आम्ही अद्याप आतून भिंतींवर वार्निशचे थर  दिलेले नाहीत. कारण जेवढे वार्निश तुम्ही चोपडाल, तेवढा आत अंधार वाढत जातो. आणि म्हणून आम्ही  तसंच राहू दिलंय. बघा ना, तुम्ही अजून ती वर्तमानपत्र – त्यावरचे शब्द वाचू शकता.
कागदाच्या भिंती झाल्या आणि या घरात आजोबा जसे जसे राहून लागले, तस तसे, त्यांना काही नवीन सुचत गेलं. त्यातून हे सारं फर्निचर बनत गेलं. ते फर्निचर कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या ठोकळ्यापासून केलेलं आहे. कागदाच्या सुरळ्या करून त्यांचे अर्ध्या इंच जाडीचे तुकडे केले आणि मग सुरीने ते वेगवेगळ्या आकाराचे कापले गेले. शेवटी सारे उत्तम प्रतीच्या खळीने चिकटवले गेले किंवा खिळे ठोकून फर्निचर उभं झालं. “
     ” हे एलीस स्टेनमन काय करत होते ? “
     ” ते माझे चुलत आजोबा होते. म्हणजे माझ्या आईचे काका. श्रीयुत  व श्रीमती स्टेनमन केंब्रीज येथे  राहात असत. ते उत्तम अभियंते होते. ते यंत्रांचे डीझाईन करत असत. परंतु  हे असं कागदाचं घर बनवण्याचं कसं काय त्यांच्या डोक्यात आलं, कोण जाणे !  ते जात्याच तसे हरहुन्नरी होते. काही तरी नवीन करत राहाण्याचा, प्रयोग करण्याचा त्यांना नाद होता. त्यांनी एकदा वाफेवर चालणारी इस्त्री १९२० मध्ये बनवली होती. जेव्हा हे घर बांधायचं मनात घेतलं, तेव्हा सुरुवातीस, त्यांनी स्वतः बनवलेली खळ कागदाला चिकटवून पाहिली होती. खळ म्हणजे पाणी आणि पीठ यांचं मिश्रण असणार, हे कुणीही म्हणेल. तथापि,  आजोबांनी त्यात सफरचंदाच्या सालीची भुकटी घातली होती. त्यामुळे चिकटपणा वाढला असेल आणि हे आजवर टिकून राहिलंय. हे फर्निचरसुद्धा शोभेचं नाही हं. वजनदार आहे. पियानोचं आवरण कागदाचं आहे.  शिवाय या फायरप्लेसचं कव्हर बघा, तेही कागदाचं आहे. फायरप्लेस मात्र विटांनी बांधलेली आहे आणि ती अद्यापही वापरण्याजोगी आहे.
आणखी एक रोचक चीज. हे आहे आजोबांचं घड्याळ. त्यासाठी  त्या वेळच्या  ४८ राज्यातून, त्यांच्या राजधानीतील प्रत्येक वर्तमानपत्राचा कागद आणून वापरलेला आहे. त्या काळी म्हणजे १९३० मध्ये अलास्का आणि हवाई ही दोन राज्ये अस्तित्वात नव्हती. ती सोडली तर एकेका राज्याच्या राजधानीत प्रसिद्ध झालेल्या वर्तमानपत्राचे कागद आहेत बरं का. “
Grandfather Clock.
      ” या घरात वीज केव्हा आली ? “
      ” अहो, हे घरच विजेच्या मदतीने बांधलं गेलंय. विजेचं काय विचारता, आजोबा जेव्हा राहात होते, तेव्हा या घरात खेळतं पाणी असायचं. उन्हाळ्यात पाण्याचे पाईप सर्वत्र सोडलेले असत. एक मात्र सांगते, तेव्हा  घरात बाथरूम नव्हत्या. बाथरूमसाठी बाहेर जावं लागे. “
     ” आणखी एक प्रश्न. हे घर तुमच्याकडे कसं काय आलं ? “
      ” त्याचं असं झालं, स्टेनमन जोडप्याने माझ्या आईला वाढवलं. ती लहान असतांना तिचे आईवडील  वारले होते. ही दोघं जणू तिचे आईबाप होते. मी मात्र आजोबांना  पाहिलेलं नाही. ते गेले, तेव्हा मी अगदी लहान होते. पण मी श्रीमती स्टेनमनआजींना पाहिलंय. “
     ” हे घर संग्रहालय म्हणून कधी खुलं झालं ? “
     ” बहुधा १९३० च्या सुमारास. आजोबा-आजी जेव्हा समरमध्ये राहायला येत असत, तेव्हा लोक हे बघायला यायचे. आणि अशा प्रकारे सर्वत्र मौखिक जाहिरात झाली. किती झालं तरी हे छोटंसं गाव. सगळीकडे बातमी पसरली, की अमुक अमुक  माणसाने कागदाचं घर बांधलंय. त्या काळात  म्हणजे १९२० च्या सुमारास असा प्रकार म्हणजे अजबच. परंतु १९४२ पर्यंत म्हणजे श्री. स्टेनमन यांचं निधन होईपर्यंत हे घर लोकांना पहायला कसलंही शुल्क आकारलं जात नव्हतं. मला वाटतं, की तेव्हापासून हे खरोखरचं म्युझियम झालं. त्या काळी १० सेंट द्यावे लागत होते.”
     ” आता, किती द्यावे लागतात ? “
     ” आता दीड डॉलर आहे. म्हणजे प्रौढ व्यक्तीला दीड डॉलर आणि ६ ते १४ वयाच्या मुलांना १ डॉलर.” ( सध्या हे शुल्क अनुक्रमे दोन डॉलर्स व एक डॉलर असे झाले आहे.)
     ” हे सारं सांभाळून ठेवणं म्हणजे मोठी जबाबदारी आहे, नाही  का ? “
     ” खरं आहे. माझ्या दृष्टीने ती एक जबाबदारी आहे, पण त्याची मी तितकीशी काळजी करत नाही. हे घर आता १९२४ पासून उभे आहे. वादळवा-यातही ते टिकून राहिले  आहे, तेव्हा ते असंच टिकेल की. भविष्यात काय होईल, याची काळजी आपण का करावी  बरं ? जमेल तितकी त्याची निगा राखली की बस्स झालं. “
     ” आता एक शेवटचा प्रश्न. या कागदाच्या घराविषयी नेहमी विचारला जाणारा असा प्रश्न कोणता असेल बरे ? “
     ” मला वाटतं, हे असं का घडवलं गेलं ? “
     ” मग, काय उत्तर देता ? “
     ” नाही. मला खरोखर उत्तर माहित नाहीये.  आजोबा म्हणजे सतत उद्योगात राहणारा माणूस. त्यांना असं काही आगळंवेगळं करायचा छंद होता. आणि त्या काळी वर्तमानपत्र म्हणजे सर्वात स्वस्त गोष्ट. यासाठी त्यांना ते कागद कोणीही दिले असतील. ते मिळवायची फारशी अडचण आली नसेल. “
( छायाचित्रे व माहिती आंतरजालावरून मुक्त अनुवाद. )
मंगेश नाबर
७ कृष्ण बिल्डींग क्र. १, गोखले सोसायटी लेन. परळ, मुंबई ४०० ०१२
दूरध्वनी क्र. (०२२) २४१३ ५७५५
इंटरनेट : mangeshnabar@gmail.com
श्री. यशवंत कर्णिक यांचा नवा लेख

गावकुसाबाहेरचं जग  

यशवंत कर्णिक

          आम्ही राहायचो त्या वसाहतीकडे जाणारी वाट एका झोपडपट्टीतून गेली होती. तो भाग एकेकाळी गावकुसाबाहेरचा म्हणून समजला जायचा. पण एकोणीसशे तिशीच्या मध्यावर पलीकडच्या सपाट माळावर हळूहळू वस्ती झाली, दगड विटांची घरं नि बंगले उठू लागले, तसा हा भाग मध्यभागी आला, नि नव्या वस्तीतल्या अभिजनांच्या नजरेला खुपू लागला. झोपड्या काहीतरी करून उठवाव्यात नि आपली वसाहत वाढवावी असे प्रतिष्ठिताना वाटू लागले. प्रयत्न सुरू झाले पण यश येईना. सत्ता नि पैसा काहीही करू शकतो. आज ना उद्या ते शक्य होईल याची खात्री त्यांना वाटत होती. गरिबांच्या तोंडावर चार पैसे फेकले की ते निमूटपणे  उठून कुठेही जायला तयार होतात  हे त्यांना माहीत होतं. वहिवाटीचा कायदा झुगारून देणं तसं काही फार अशक्य नव्हतं. प्रश्न काळ किती लागतो याचाच फक्त होता. योजना तयार होती.  चिकाटीही होती. संधीची वाट बघण्याइतका पेशन्सही होता.
          सरकारनं आणि नगरपालिकेनं पलीकडच्या माळरानावर आमची नवी कॉलनी उभारली, आखीव रस्ते नि पोटरस्ते बांधले, चाळी नि बंगले बांधणा-यांना पलोंट्स दिले, रस्त्याच्या कडेना झाडं लावली, पाण्याच्या पाईप्स टाकल्या, विजेचे खांब उभे केले, त्यावेळी त्यांना दोन उच्च वस्तींमध्ये उरलेली दलितांची वस्ती दिसलीच नाही. तिथं रस्तेच काय पायवाटाही नव्हत्या. कुडाच्या नि मातीच्या झोपड्या, पत्र्याची छपरं , संडास नाहीत, गटारं वाहतायत, कधीकाळी एक विहीर खोदलेली, त्यातलं पाणी उपसायला बायकापोरींची   झुंबड, वचावचा भांडणे, मारामा-या, झोंबाझोंबी, एकमेकींच्या झिंज्या ओढणे, अर्वाच्य शिव्या देणं, सगळं  दिवसभर चाललेलं. पुरूष माणसं शहरात कामाला गेलेली. पोरं उघडीवागडी  हिंडतायत , धावतायत, पळतायत, विटीदांडू  खेळतायत, भांडतायत,  शाळा नावाची गोष्ट माहीत नाहीच, काही माणसं गटारातली माती  नि वाळू चाळणीत घेऊन काहीतरी शोधतायत.  जवान बायका तिथंच दगडावर बसून अंगावरची अर्धवस्त्रं सावरीत अंघोळी करतायत, आजारी म्हातारेकोतारे विड्या ओढत, खोकत, थुंकत, कुडाला टेकून बसलेयत, झोपड्यांच्या धुराड्यांतून चुलींचा धूर उसळतोय, त्यानं अवघी वस्ती धुरकट होऊन गेलीय. पाऊस पडून गेला असला तर सगळीकडे  चिखलच चिखल झालाय. डासांचे थवे संध्याकाळी अंगावर चाल करून येतायत.  कुलंगी कुत्री अमाप माजलीयत. माणसांना खायला नाही तर त्यांना कुठून असणार? ती मग पिसाळ्तात. दिवसात एखादं  कुणालातरी  चावा घेतंच. जवळच पांजरपोळ आहे. तिथं पोटात चौदा इंजेक्शनं घ्यायची सोय मायबाप सरकारनं केलीय. नाहीतर जलसंत्रासानं –  हायड्रोफोबियानं – भुंकतभुंकत मरायचं नशिबात  आहेच. रात्री कामाला गेलेले पुरूष ढेर होऊन परत येतात. बायकाना मारहाण करतात. कालवा उठतो. मग अर्धपोटी सगळे झोपी जातात. झोपड्यातून चिमण्या पेटल्या असतील तेवढाच उजेड. बाकी सगळीकडे अंधारच अंधार. आम्ही तिथूनच आमच्या घरांकडे जायचो. कुत्र्यांना चुकवीत,  जीव मुठीत धरून.  खरं म्हणजे एक चांगली डांबरी सडक आमच्या  कॉलनीकडे जायची. पण ती ह्या झोपडपट्टीला वळसा घालून. मोटारी नि सायकली असणा-यांचं  ठीक होतं. पण आम्हां पायपीट करणा-यांचं काय? आम्हांला  शोर्टकट पाहिजे म्हणून आम्ही ह्या वस्तीतूनच जायचो. अंधार पडल्यावरसुद्धा.
         वस्तीचं नाव होतं मांगवाडा. ‘दलित’ हा शब्द त्या काळी जन्माला यायचा  होता. पण मांग लोकांखेरीज इतर दलितही तिथं राहायचे. शहरवासीयांची सगळी हलकी कामं करायला माणसांची फौज इथूनच उपलब्ध व्हायची. तेवढ्यापुरतं इथल्या लोकांचं अस्तित्व अभिजनाना मान्य होतं. लांबची पायपीट टाळायला ह्या वस्तीचा उपयोग करून घ्यायची त्यांची तयारी होती. त्यावेळी त्या वस्तीची कुरूपता त्यांच्या डोळ्यांना खुपत नव्हती. दारुण गरिबी नजरेला दिसली तरी काळजाला भिडत नव्हती. आपल्यासारखेच  सगळे अवयव असणारी नि  आपल्याच देवानं जन्माला घातलेली माणसं तिथं राहतायत याचं भान नव्हतं. लाज वाटते आज सांगायला की त्यावेळी मीही त्या असंवेदनशील अभिजनांपैकीच एक होतो.
          आमच्या गल्लीच्या मांगवाड्याकडील  टोकाला एका साम्यवादी नेत्याचा दुमजली बंगला होता. त्याच्यापुढं  सुंदर बाग. त्यात रंगीबेरंगी फुलांचे ताटवे. बंगल्याचा दर्शनी दरवाजा खुला असायचा. त्यातून भिंतीवर टांगलेली छान छान पेंटींग्ज दिसायची. काही स्वतः नेतेमहाशयानी रेखाटलेली. नेतेमहाशय केव्हाकेव्हा बागेत आराम खुर्ची टाकून बसलेले. त्यांचे चमचे त्यांच्याभोवती उभे. एखादं शिष्टमंडळ लाल बावटा घेऊन आलेलं.  कामगार दिनी बंगल्यावर रोषणाई  व्हायची. आमचं जाऊद्या. आम्ही कुठलेच वादी नव्हतो. समतेबिमतेची नजरच आम्हाला नव्हती. आम्ही आमच्या गरिबीला कुरवाळण्यातच मग्न होतो. पण नेतेमहाशयाना आपल्या शेजारीच दारिद्र्यात जगणारी आणि रात्री अर्धपोटी निजणारी माणसं राहतायत याचा पत्ता नसावा ?
          माझ्या ओळखीचे एक सोनार होते. त्यांचं दागदागिने घडवण्याचं छोटंसं दुकान होतं.  सकाळी कामावर जाताना मी केव्हाकेव्हा तिथं थांबून चहा घेऊन पुढं जायचा. त्यावेळी दुकान झाडायला मांग वाड्यातला एक माणूस  यायचा. तो झाडणीनं कचरा काढायचा नि कागदात भरून घ्यायचा. जाताना सोनारबुवांना तीन रुपये  द्यायचा. ” कचरा काढायचे पैसे  तुम्ही त्याला  द्यायच्याऐवजी तो तुम्हाला देतो  हे कसं काय?” अशी मी एकदा चौकशी केली, तेव्हां सोनारबुवा म्हणाले, ” अहो, या कच-यातून त्याला आमचे काम करताना उडालेले सोन्याचे कण   मिळतात. ते तो कचरा गाळून वेगळे करतो. दहा रुपयांची तरी प्राप्ती होते त्याला. जास्तीच. ” तेव्हां मी म्हणालो, ” गरीब आहे हो तो. त्याच्याकडून कच-याचे पैसे घेऊन तुम्ही काही श्रीमंत होणार नाही. त्यात तो नुसतेच तुमचे सोन्याचे कण घेऊन जात नाही ना? दुकान झाडून साफ करतो ना? ” तर सोनारबुवा माझ्यावर खप्पा झाले. ” तुम्हाला कळणार नाही”, ते म्हणाले. ” हा धंदा आहे. आमचा तसा त्याचाही. सगळे सोनार हेच करतात. मी कचरा  फुकट द्यायला लागलो तर उद्या इथं दहा मांगांची लाईन लागेल”. शोषण कोणकोणत्या प्रकारे होतं याची पहिली जाणीव मला त्यावेळी झाली. गरिबाना  एवढंही फुकट द्यायचं नाही? पण मी आणखी पुढं बोललो नाही. बोललो तेवढं खूप झालं. साम्यवादी नेत्याच्या मानसिकतेची कातडी गेंड्याची होती ; आमची काही कमी जाड नव्हती.
          मांगवाड्यातून रात्री हलगी नि डफाचं बदसूर संगीत ऐकायला यायचं.  मोनोटोनस.  कंटाळवाणं. असल्या सुरांतून त्या माणसांना कसला आनंद मिळत असेल असा प्रश्न मला पडायचा.  आवाज कधी थांबतोय याची वाट पाहत आम्ही बिछान्यावर तळमळायचो. पण मध्यरात्रीपर्यंत ते सुरूच असायचं. आमच्या काही लोकांची मजल पोलिसांकडे तक्रार करण्यापर्यंत गेली. पण पोलीस दम भरण्याखेरीज काही करू शकले नाहीत. पोलीस काही बंगल्यांत राहणारे नव्हते.  काहीजण तर असल्या वस्त्यांतच पैदा  झालेले होते.  पुढं माझ्या मानसिकतेची कातडी जशी पातळ होत गेली नि दलितांच्या दुःखाचं मला भान आलं  तेव्हां त्या एकसुरी संगीताचा अर्थ माझ्या ध्यानात येऊ लागला. त्या दुर्दैवी लोकांचं जीवन हलगी-डफातून ते जो ध्वनी काढत होते तसंच बदसूर नव्हतं का? ते त्यांच्या दारिद्र्याचं नि उपासमारीचं प्रतिक नव्हतं का? त्या संगीताला कारुण्याची झालर नव्हती का? दोष त्या संगीताचा नाही. आपल्या श्रवणाचा आहे. हे सगळं आकलन व्हायला मला आयुष्याची निम्मी अधिक वर्षं मागे टाकावी लागली.
          दिवाळीच्या दिवशी मी नि माझी भावंडं पहाटे पहाटे अभ्यंगस्नान करून सूर्योदयापूर्वीच फराळ करायचो आई नि बहिणीनी आठवडाभर कष्ट करून अनेक गोडधोड पदार्थ केलेले असायचे. त्यावर तुटून पडायचो. पोटं तुडुंब झाल्यावर गल्लीत फटाके उडवत भटकायचो. आठ नऊ वाजल्यापासून मांगवाड्यातल्या बायका ‘ववाळणी’ मागायला एकापाठीमागून एक येऊ लागायच्या. त्यातल्या त्यात बरी लुगडी नेसून. कपाळाला भंडारा लावून. आमच्या घरात थोडं – किंचित थोडं – पुरोगामी वातावरण होतं. त्या साम्यवादी नेत्यापेक्षा आमचे वडील कितीतरी अधिक उदारमनस्क होते. आई तर अधिकच उदार नि प्रेमळ. तिनं आणेल्या जमा करून ठेवलेल्या असायच्या. एक आणेली म्हणजे रुपयाच्या सोळावा भाग. त्या काळचे चार पैसे. आजचे सहा. एका आण्याला त्याकाळी जी किंमत होती ती आज रुपायालाही  नाही. तर आई प्रत्येकीच्या ताम्हणात एक आणेली नि एक कानवला टाकायची. त्या दिवशी तरी कुणी आमच्या दारातून विन्मुख जायचा नाही. केव्हाकेव्हा एखादी बाई हळू आवाजात आईला म्हणायची, ” माय, एकांदं जुनेरं नायतर चोळी काढून ठिवा; हे एकुच धडुतं हाय बगा अंग झाकाय.” आईकडे  असायचं एखादं, पण ते बोहारणीला देऊन त्यावर एखादं भगुणं घ्यायचं तिनं ठरवलेलं असायचं. मग ती थोडा वेळ विचार करायची नि म्हणायची, ” बघीन. पुढच्या आठवडयात ये. ” मग ती बाई आली की तेच लुगडं नाहीतर पोलकं तिला देऊन टाकायची.
          आज मला वाटतं तो देवमाणूस अवतरला नसता तर देशाला स्वातंत्र्य मिळूनही मांग-महारांच जीवन असंच जनावरांसारखं राहिलं असतं की नाही? त्यानं आपल्या बांधवांना नवा संदेश दिला. बळ दिलं. वेगळा धर्म दिला. अस्मिता दिली. मी त्याला जगात विसाव्या शतकात जन्मलेला सर्वात थोर मनुष्य मानतो. माझं मत कुणाला पटो अगर न पटो.
          मी खूप वर्षांत तो मांगवाडा पाहिलेला नाही. तो आता कदाचित सुधारला असेल. झोपडपट्टीच्या जागी दगडविटांची घरं  झाली असतील. रस्ते- पोट रस्ते झाले असतील. कदाचित सीमारेषा पुसली जाऊन त्याला आता गावकुसाबाहेरची वस्ती म्हणत नसतील. ‘इंदिरा नगर’, किंवा  ‘रमाबाई नगर’ असं काहीतरी त्याचं नामकरण झालं असेल. सोनारबुवा आता कचरा काढण्याचे तीन रुपये घेत नसतील.  माणसं गटारातल्या पाण्यात माती नि वाळू गाळून दहा रुपयांचे सोन्याचे कण जमा करीत नसतील. त्यांना नोक-या असतील, धंदे असतील. दोन वेळचं जेवण मिळत असेल. आणि हलगी-डफाच्या संगीताला सूर गवसला असेल.
          पण अभिजनांच्या मानसिकतेत बदल घडून आला असेल का? तो जोपर्यंत घडून येत नाही तोपर्यंत वरवरच्या सुधारणेला काय अर्थ आहे ?
          माझे तरुण लेखक मित्र प्रशांत खुंटे यांचे काळजाला हात घालणारे लेख मी वाचतो तेव्हां उदासी मला घेरून टाकते. वाटतं अजून खूप वाट चालून जायची आहे. एकविसाव्या शतकात ते होईल का?
  ***                   ***                 ***
यशवंत कर्णिक
ग्लेन ईगल, परळ गाव, परळ, मुंबई ४०० ०१२.
इमेल : karnikyeshwant@gmail.com
( लेखाची पूर्वप्रसिद्धी – दै. नवप्रभा, पणजी, गोवा )
श्री. मंगेश नाबर यांचा नवीन लेख
डॉ. जोसेफ जुरान ( २४ डिसेंबर १९०४  – २८ फेब्रुवारी २००८)
     आज आपण अशा एका महान व्यक्तिमत्वाचा मागोवा घेणार आहोत, की ज्यांची या जगातील यात्रा  शंभर वर्षांहून अधिक काल होती.  दोन महायुद्धे व अनेक छोट्या मोठ्या लष्करी कारवाया, अगणित संशोधनांचा उदय-अस्त, मानवाचे पहिले वहिले अवकाशातील पाउल आणि अमेरिकेच्या थोड्यान थोड्या नव्हे तब्बल सतरा राष्ट्राध्यक्षांची कारकीर्द, या महत्वाच्या जागतिक घटना  जुरान यांनी नुसत्या पाहिल्या होत्या, असे नव्हे, त्यांचे ते डोळस साक्षीदार होते. आपल्या शंभर वर्षांच्या प्रदीर्घ आयुष्यात त्यांनी जगातील सा-या मानवजातीवर अत्यंत खोल असा ठसा उमटवला. उद्योग, समाज व  गुणवत्ता  या क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीमुळे ते जगभरात गाजले. गुणवत्ता चळवळीचे अग्रगण्य नेते बनले.
     डॉ. जुरान यांचा जन्म २४ डिसेंबर १९०४ रोजी ब्रेला, रुमानिया देशातील एका सामान्य ज्यू कुटुंबात झाला. गरीबीवर मात करण्यासाठी आणि ज्यू  लोकांवर  होणा-या हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी १९१२ मध्ये अमेरिकेतील मिनीआ पोलीस राज्यातील मिनेसोटा  येथे स्थलांतर केले. दुर्दैवाने  क्षयामुळे त्यांच्या आईचा मृत्यू १९२० साली झाला. अमेरिकेत  आल्यापासून  आपल्या कुटुंबाची  आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्या भावंडांबरोबर त्यांनी मिळतील ती कामे केली. वर्तमानपत्र घरोघर टाकण्यापासून ते किराणामाल दुकानात हिशोबनीस, छपाई कामगार, रेल्वे बोर्डात  लेखनिक अशी बारा वर्षांच्या काळात सोळा प्रकारची कामे त्यांनी पत्करली. बालवयात पोटासाठी करावी लागलेली ही कामे म्हणजे आपल्याला मिळालेले एक वरदानच होते, असा त्यांचा दृष्टीकोन होता. याचा फायदा आपल्या व्यक्तिमत्वाच्या  जडण घडणीत झाला असा त्यांचा विश्वास होता. शालेय शिक्षणात ते एक बुद्धिमान  विद्यार्थी असून गणिताकडे त्यांचा अधिक कल होता. सुरूवातीपासून ते बुद्धीबळ हा खेळ  उत्तम खेळत आणि क्वचितच हार पत्करत. पुढे वेस्टर्न  इलेक्ट्रिक कंपनीत त्यांनी कामाबरोबर आपल्या या प्रावीण्याची चुणूक दाखवली होती.
     जुरान यांचे वैशिष्ट्य म्हणजे कामाच्या रामरगाड्याताही त्यांनी आपले शालेय व विश्वविद्यालयीन शिक्षण अतिशय निष्ठेने चालू  ठेवले. कोणत्याही परिस्थितीत आपल्या सर्व मुलांनी आपले शिक्षण चालूच ठेवावे अशी त्यांच्या मात्यापित्याची इच्छा होती. आपल्या शालेय व माध्यमिक शिक्षणाच्या काळात गणित या विषयात जुरण यांनी विशेष नैपुण्य संपादन केले होते. त्या विषयात ते आपल्या वर्गातील मुलांपेक्षा सतत दोन वर्षे पुढेच असायचे. कालांतराने त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ब-यापैकी सुधारली. आपल्या उत्पन्नातून काही भाग ते उच्च शिक्षणासाठी बाजूला ठेवत होते. १९२० मध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण करून त्यांनी इलेकट्रीकल इन्जिनीअरिन्ग च्या शिक्षणासाठी मीनेसोटा विद्यापीठात प्रवेश मिळवला. अशाप्रकारे विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणारे ते आपल्या कुटुंबातील पहिले व्यक्ती ठरले. विद्यालयात उत्तम गुण मिळवणा-या या गुणी मुलाला विद्यापीठात साधे पास होण्यासही खूप परिश्रम पडत असत. शिक्षणात त्यांचा जो बुद्धीबळाशी संबंध आला आणि तो आयुष्यात कायम टिकला. इलेकट्रीकल इन्जिनीअरिन्ग ची पदवी घेतल्यावर त्यांना अनेक चांगल्या कंपन्यातून नोकरीसाठी निमंत्रणे आली. वेस्टर्न इलेकट्रीक  या ख्यातनाम कंपनीत त्यांनी आठवड्याला सत्तावीस डॉलर्स या पगारावर नोकरी स्वीकारली.
     सत्तर वर्षे टिकलेल्या जुरान यांच्या नेत्रदीपक कारकिर्दीचा आरंभ विसाव्या वर्षी झाला. सुरुवातीला हा दीर्घ  प्रवास  गुणवत्तेसाठी असणार याची पुसट कल्पनादेखील जुरान यांना नसावी. आठवड्याच्या परीचयात्मक  प्रशिक्षणानंतर कदाचित योगायोगाने त्यांची  नियुक्ती ह्यावथोर्न (Hawthorne)  शाखेतील इन्स्पेक्शन विभागात झाली. गुणवत्तेसाठी काम करणा-या या आपल्या सुरूवातीनंतर त्यांचा  प्रगतीचा वारू दौडताच राहिला. चौवीसाव्या वर्षीच त्यांची व्यवस्थापक म्हणून बढती झाली. औद्योगिक मंदीच्या काळात त्यांनी कायद्याची पदवी संपदान केली. दुस-या महायुद्धात  सैनिकी कामासाठी लागणा-या मालाच्या गुणवत्ता नियंत्रणात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
     न्यूयॉर्क विद्यापीठात इंडस्ट्रीयल  इन्जिनीअरिन्गचे प्राध्यापक आणि त्या विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पहिले. प्रथम व्यवस्थापक, गुणवत्ता व्यवस्थापक, सल्लागार, व्याख्याता, लेखक आणि गुणवत्तेचे आंतरराष्ट्रीय नेते असा दैदिप्यमान प्रवास त्यांनी केला. आपले कार्य प्रभावीपणे चालू ठेवण्यासाठी दि जुरान इनस्टीटयूट  आणि दि जुरान फौंडेशन या रौप्यमहोत्सव साज-या करणा-या जागतिक कीर्तीच्या संस्था त्यांनी प्रस्थापित केल्या.
     डॉ. जुरान आपल्या पत्नीबरोबर आनंदाने संसार करत होते. सर्व जगातच शांतता नांदत होती. जीवन आणि भोवतालचे जग भले व उपकारक असे वाटत होते. माणसांचे जीवन समृद्ध करणारे उत्साहवर्धक असे वैद्न्यानिक शोध त्या काळात लागत होते. डॉ. जुरानदेखील प्रगतीच्या अनेक पाय-या चढत होते. अर्थातच ही वादळापूर्वीची  शांतता होती. कारण त्यानंतर दुसरे महायुद्ध आणि जागतिक मंदी या दोन महाकाय व गंभीर समस्यांचा सामना सर्व जगाला करावा लागला. सर्वसामान्य निरुपद्रवी माणसे मात्र त्यात भरडली जात होती. या परिस्थितीतही डॉ. जुरान आपल्या परीने योगदान देत होते. आपला अनुभव, संख्याशास्त्र आणि यांत्रिकी शास्त्र यातील ज्ञानाचा उपयोग करून अमेरिकेत अनेक कारखाने आणि सरकारचे सर्व साधारण व्यवस्थापन सुधारण्याचा यशस्वी प्रयत्न ते करू लागले. महायुद्धानंतर त्यांनी आपल्या कामाची दिशा बदलली. व्यवस्थापानानंतर ते प्रशिक्षणाकडे वळले. कारखान्यांना आणि विद्यार्थ्यांना मदत करून अमेरिकेत झालेल्या प्रचंड प्रगतीचा सामना करण्यासाठी त्यांना तयार करावे हे डॉ. जुरान यांनी ठरवले. याचा फायदा अमेरिकेतील अर्थव्यवस्थेलाही झाला. पुढे आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा फायदा त्यांनी अमेरिकेबाहेरील देशांना विशेषतः दुस-या  महायुद्धानंतरच्या परिस्थितीचा सामना करणा-या जपान या देशाला देण्याचे ठरवले. जपानने जुरान यांना १९५२ मध्ये खास निमंत्रण दिले आणि जुरान यांचे  जपान पर्व  १९५४  साली सुरू झाले.  तेथील शोवा-डेनको , निप्पोन यांसारख्या जवळ जवळ दहा उद्योजक कंपन्यांना जुरान यांनी भेट दिली. अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्याने दिली. त्यांचे हे जपान पर्व १९९० पर्यंत चालू असताना त्यांनी या देशाला दहा वेळा भेट दिली होती. जुरान यांची गुणवत्ता प्रणाली जपानने प्रत्यक्षात आचरणात आणल्यानंतर फळे दिसून येण्यास वीस वर्षे लागली. १९७० सालानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये उत्तम दर्जा या निकषावर जपानी उत्पादनांना मागणी येण्यास प्रारंभ झाला. आज आपल्या दृष्टीने हा इतिहास झाला आहे.
     सार्वजनिक क्षेत्रातील मोठ्या कंपन्या सोडून वैयक्तिक विश्वात येण्याचा हा महत्वाचा निर्णय तसा अवघडच होता. आतापर्यंत च्या कामात त्यांनी आपले अधिकारी आणि सहकारी यांना आपल्या तीक्ष्ण ज्ञानाने व तांत्रिक कौशल्याने खूपच प्रभावित केले होते. परंतु त्याचबरोबर आपली तिखट जीभ व इतरांच्या गरजा समजावून न घेण्याच्या स्वभावामुळे अनेक समस्या निर्माण होत असत. यातून त्यांनी निष्कर्ष काढला असावा, की आपण मोठ्या कारखान्यांमध्ये काम करण्यास योग्य नाही, कारण आपण मोठ्या गटात उत्तम काम करू शकत नाही. त्यातूनच पुढे तांत्रिक कौशल्याशिवाय लागणा-या गुणवत्ता व्यवस्थापन या संकल्पनेचा विकास करून त्यास तांत्रिक कौशल्याबरोबर लागणा-या सर्व महत्वाच्या मानवी कौशल्याची जोड डॉ. जुरान यांनी दिली.
      गुणवत्तेसाठी मानवी कौशल्याची दिलेली जोड ही चांगलीच मोठी निवड होती. याबद्दल जगातून डॉ. जुरान यांची प्रशंसा झाली. परंतु यासाठी  अनेकांचा हातभार लागला आहे, असे त्यांचे मत होते. डॉ. जुरान यांना आपल्या कारकिर्दीत स्वतःच्याच नव्हे तर इतरांच्या अनेक मानवी समस्यांना सामोरे जावे लागले. या सर्व समस्यांचे मूळ मानवाचा बदलास होणारा विरोध आहे. डॉ. जुरान याला सांस्कृतिक विरोध असे म्हणत.
       आपल्या ग्राहक संस्थामध्ये उत्तम कामगिरीसाठी झगडत असतांना व्यवस्थापक आणि कामगार यांच्यातील तीच तीच भांडणे बघत असताना अचानक त्यांना त्यांचे स्पष्टीकरण मिळाले. एकोणीसशे छप्पन साली त्यांनी मार्गारेट भीड यांचे कल्चरल प्याटर्न्स अंड टेक्निकल चेंज हे पुस्तक वाचले. त्यात प्रगती पथावरील राष्ट्रांना त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी मदत करणा-या अमेरिकन गटांना सहन कराव्या लागलेल्या विरोधाचे उत्तम वर्णन होते. मार्गारेट यांनी त्याचे वर्णन ” दोन संस्कृतीमधील चकमक” असे केले होते. डॉ. जुरान यांनी उद्योग धंद्यातील व्यवस्थापन आणि कामगार यांच्या  चकमकीतील हाच सारखेपणा ओळखला. यातून डॉ. जुरान यांना आपल्या ग्राहकांनी आपण सुचवलेल्या उत्तम कल्पना कोणतेही  कारण न देता का नाकारल्या  जातात,  ते कळले.  त्यावर त्यांनी आपल्या अनुभवावर आणि संशोधनावरच आधारित ‘ म्यानेजेरीयल ब्रेकथ्रू ‘ (managerial breaktrhough) हे पुस्तक प्रसिद्ध केले. परंतु, आपण काही मूलभूत संशोधन केले नाही, तर ही तत्वे आपण गुणवत्तेशी प्रथमच जोडली अशी त्यांची विनम्र धारणा होती.
        गुणवत्तेशी मानवतेच्या मुल्यांची सांगड घालणे हीच एक विशेष संस्मरणीय कामगिरी आहे. या शिवाय गुणवत्तेला जागतिक परिमाण देणा-या अनेक कल्पना डॉ. जुरान यांच्या खात्यात जमा झालेल्या आहेत. त्या अशा :-
      विल्फ्रेड प्यारीटो  या अर्थ शास्त्रद्न्याने एकोणीसाव्या शतकात मांडलेली  ८० : २० ही संकल्पना डॉ. जुरान  यांनी गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रथमच वापरली. तिचा वापर संख्याशास्त्रातही केला. ८० टक्के समस्या या २० टक्के कारणातून निर्माण होत असतात. आणि या वीस टक्के महत्वाच्या कारणांवरच व्यवस्थापनाने आपले लक्ष केंद्रित करावे हा त्यांचा शोध होता. त्यामुळे व्यवस्थापकांचे काम जास्त उत्पादनशील आणि प्रभावी झाले. पुढे त्यांचा हाच सिद्धांत अनेक क्षेत्रात उपयुक्त ठरला.
      डॉ. जुरान यांची महत्वाची कामगिरी अशी :-
 (१) गुणवत्ता व्यवस्थापनात त्यांनी दिलेली त्रिसूत्री म्हणजेच योजना, नियंत्रण आणि सुधारणा.
(२) जुरान क्वालिटी ह्यांडबुक  – हा त्यांचा संदर्भ ग्रंथ अनेक पुस्तकाना जन्म देणारा ठरला. त्यांच्या हयातीत निघालेल्या त्याच्या चौथ्या आवृत्तीची किंमत होती ५१० डॉलर्स आणि त्याच्या दोन लाख तीस हजार प्रती हातोहात खपल्या.
(३) गुणवत्तेसंबंधी त्यांचे शेकडो लेख, निबंध आणि भाषणे खूपच मार्गदर्शक ठरली. त्यांनी साधारणतः तीस पुस्तके लिहिली. ती बारा भाषांमध्ये अनुवादित झाली. त्यांनी अनेक सेवाभावी संस्थांमध्ये व्याख्याने देऊन आपली सामाजिक कार्याची बांधिलकी व्यक्त केली. एका मुलाखतीत त्यांना, आपली सर्वात मोठी उपलाब्द्धी कोणती, हा प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देतांना ते म्हणाले होते, ” मी गुणवत्तेसाठी व्यवस्थापन या नवीन शास्त्राचा शोध लावून त्यासाठी काम केले, हे जरी माझ्या सर्वसाधारण व्यवस्थापनाचे अपत्य असले, तरी स्वतःचे अस्तित्व असणारे हे स्वतंत्र शास्त्र  आहे. यांचा जनक म्हणून जग मला माझ्या मृत्यूनंतर ओळखणार आहे. “
(४) विलक्षण गोष्ट म्हणजे वयाच्या ९९व्या वर्षी त्यांनी आपल्या एका नातवाच्या सहकार्याने एक पुस्तक लिहायला घेतले होते. त्यात त्यांनी गुणवत्ता व्यवस्थापनाच्या नेतृत्व गुणांसंबंधी विचार मांडले. हे पुस्तक गुणवत्तेला एक वेगळे वळण देणारे आहे.
     डॉ. जुरान हे गुणवत्ता व्यवस्थापनातील नावाजलेले व्याख्याते होते. त्यांना जगातील बाराहून अधिक देशांनी पदके, फेलोशिप्स, आणि सन्माननीय सभासदत्व बहाल केली होती. डॉ. जुरान यांना जपानच्या शासकीय प्रमुखाकडून म्हणजे सम्राटाच्या हस्ते  जपानच्या  बाहेरील व्यक्तीला क्वचितच दिला जाणारा असा सर्वोच्च मनाचा किताब, “Second Class of order of the sacred” प्रदान केला गेला. डॉ. जुरान यांच्या जपानमधील गुणवत्ता नियंत्रणातील असामान्य योगदान तसेच जपान व अमेरिका यांचे मैत्रीचे संबंध भक्कम करण्यासाठी घेतलेल्या पुढाकारासाठी हा सन्मान देण्यात आला होता.
     डॉ. जुरान यांचे वयाच्या १०३ व्या वर्षी २८ फेब्रुवारी २००८ रोजी निधन झाले. गुणवत्ता व्यवस्थापनाचा यशस्वी अंगीकार करण्यासाठी डॉ. जोसेफ जुरान यांचे चरित्र भारतीयांनाही प्रेरणा देणारे ठरेल.
 ( संदर्भ – विकिपीडिया आणि  श्री. जयप्रकाश झेंडे यांच्या  महाराष्ट्र टाईम्समधील मूळ लेखावरून साभार. पूर्वप्रसिद्धी – दै. नवप्रभा, गोवा )
मंगेश नाबर
७ कृष्ण बिल्डींग क्र. १, गोखले सोसायटी लेन, परळ,मुंबई ४०० ०१२.
दूरध्वनी क्र. (०२२) २४१३ ५७५५.
इमेल : mangeshnabar@gmail.com
21डिसेंबर 2011; श्री मंगेश नाबर यांच्या लेखमालेचा 4था भाग
अंटार्क्टिकाच्या साहसकथा – ४

अंटार्क्टिका आणि भारत : नातेसंबंध व दिवस- रात्र
    मंगेश नाबर     आपल्या सर्व पुराणकथा पाहिल्या तर त्या सर्वांमध्ये – विष्णू पुराण, शिव पुराण, श्रीमद भागवत व वेद – आपल्या विश्वाचे सात खंड असल्याचे सांगितले गेले आहे. हे सारे साहित्य ३००० ते ५००० वर्षांपूर्वी लिहिले गेले असावे. पण हा सात खंडांचा उल्लेख मात्र सर्वत्र सातत्याने दिसून येतो. तथापि माझ्या शाळकरी काळात आम्ही पुस्तकात वाचले, तसेच आम्हाला आमच्या शिक्षकांनी शिकवले, की ही पृथ्वी पाच खंडांत विभागली आहे.  अखेरीस आता कुठे जगाला कळून आले, की पृथ्वीवर सात खंडे आहेत. त्यातील अमेरिका ही दोन भागात – दक्षिण व उत्तर – विभागली आहे. आणि अंटार्क्टिका  हे सातवे खंड आहे. म्हणजे आपल्या भारतीय ऋषी मुनींनी त्या प्राचीन काळात जे अनुमान केले होते, ते खरे आहेत की.  मित्रांनो, तुम्ही रामायणात वाचले असेल, की लंकाधीश रावणाचा भाउ, कुंभकर्ण हा जो एक बलाढ्य लढवय्या होता, तो वर्षाचे सहा महिने झोपत असे आणि पुढील सहा महिने जागा असे.मला एक शंका येते, की हा कुंभकर्ण राहत असेल  किंवा त्याची सत्ता जेथे असावी, तो प्रदेश अंटार्क्टिका तर नसेल ?
अंटार्क्टिकामध्ये विविध प्रकारचे हिम आणि  बर्फ आढळते. काहींचे नामकरण झाले आहे. त्यापैकी एकाचे नाव आहे ससृगी  (‘sastrugi’).  या प्रदेशात, वाळवंटात जशी वाळूची टेकाडे असतात, तशी या प्रकारच्या हिमाच्या टेकड्या तयार झालेल्या असतात. या हिमटेकड्या १० मीटर्स उंचीच्या असतात.
श्री. अनिल चतुर्वेदी हे जिओग्राफिकल सर्वे ऑफ इंडियाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत. ते अंटार्क्टिका : रोचक आणि रोमान्तिक हे पुस्तक लिहित आहेत. त्यात त्यांनी या नावाचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला आहे. या संदर्भात एका ब्रिटीश नाविकाची त्यांची गाठ पडली. तो गेली वीस वर्षे अंटार्क्टिकावर संशोधन करत आहे. अनेक भाषात या नावाचे मूळ आहे काय हे शोधताना त्याने एस्कीमोंची भाषाही सोडली नाही. या नावाशी समानार्थी शब्द, आपल्या भारतीय भाषांमध्ये  आहे काय याची त्याला शंका आहे. चतुर्वेदी यांना आपल्या पुराणातील सहस्रतुंग हा शब्द आठवला. सहस्र म्हणजे हजार आणि तुंग म्हणजे शिखर. या दोन्ही शब्दांचा मिलाफ होउन हे ससृगी हे नाव झाले असावे. भारत आणि अंटार्क्टिका यांच्यामध्ये आणखीही जवळचे संबंध आहेत.
२० कोटी वर्षांपूर्वी अंटार्क्टिका हा ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, भारत व न्युझीलंड यांच्याशी  जोडलेला होता. त्या खंडाला गोंडवनभूमी असे म्हणत असत. त्यानंतरच्या दहा कोटी वर्षात हळू हळू या प्रदेशाचे तुकडे होत जाउन आजची भौगोलिक परिस्थिती निर्माण झाली. या गोंडवनभूमीचा संबंध मध्यभारतातील गोंड जमातीशी जोडला जातो. भारतातील आंध्र प्रदेश व महाराष्ट्र यांच्यातील गोदावरीच्या खो-यातील काही  परिस्थिती ही अंटार्क्टिकाशी काही प्रमाणात मिळतीजुळती आहे, असे तज्ञांचे म्हणणे आहे.
अलीकडील काळात अंटार्क्टिकाशी संबंध जोडण्याचे श्रेय आपल्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना द्यावे लागेल. त्यांनी १९८१ मध्ये महासागर विकास हे खाते निर्माण करून अंटार्क्टिका मोहीम ऑपरेशन गंगोत्री या नावाने सुरू केली. डिसेंबर १९८१ मध्ये आपला एकवीस जनाचा पहिला चमू गोव्याहून निघाला आणि ९ जानेवारी १९८२ रोजी अंटार्क्टिकामध्ये पोचला. १९८३ मध्ये आपण पहिला तळ तेथे दक्षिण गंगोत्री य नावाने स्थापन केला. त्याच्या मदतीने आपले तज्ञ  सबंध वर्षभराच्या काळात संशोधन करण्यास जाऊ लागले. तथापि हा तळ कालांतारणे खचला. मग १९८८ मध्ये आपण Schirmachor Hills या ठिकाणी नवा तळ “मैत्री” या नावाने उभारला. हा तळ आजही भारताच्या संशोधन कार्यात वापरला जात आहे.
आपल्याला सर्वांना माहित आहे, की पृथ्वीवर ध्रुव प्रदेशात इतरत्र असते तसे दिवस व रात्रीचे चौवीस तासांचे चक्र नसते. दक्षिण आणि उत्तर ध्रुव प्रदेशात दिवस हा सहा महिन्यांचा असतो, तसेच रात्रीचे असते. मी जेव्हा या गोष्टीची मानसिक तयारी   करत होतो, तेव्हा सहज विचार मनात आला होता, की सूर्य आपल्या डोक्यावर  असेल आणि तो पुढचे चार महिने तसाच तळपत राहील. मग तो हळूहळू खाली उतरू लागेल आणि वर्षाच्या अखेरीस तो पश्चिम दिशेकडे  अस्ताला जाईल. पण इथे आल्यानंतर तो माझा वेडेपणा होता हे कळून चुकले. मी इथे ‘मैत्री’मध्ये राहत असताना सूर्य दररोज पश्चिमेला मावळतो आणि पुनः पश्चिमेकडून उगवतो.  इथे आम्ही भारतीय प्रमाण वेळ ( IST ) पाळत नाही. आम्ही GMT म्हणजे ग्रीनविच प्रमाण वेळ पाळतो. ती आय. एस. टी.च्या  साडेपाच तास मागे असते. त्यानुसार संध्याकाळी  सहा वाजता सूर्य पश्चिमेस मावळतो, सात वाजता एकदम अदृश्य होतो. पण आश्चर्याची बाब अशी, की आकाशात अंधार नसतो. आपल्याकडे संध्याकाळी सात-साडेसातच्या सुमारास जसा संधी प्रकाश असतो, तसा उजेड असतो. मग पहाटे दोनच्या सुमारास सूर्य पुनः दिसू लागतो. त्याचा प्रकाश आता स्वच्छ असतो.
नेमक्या दक्षिण ध्रुवावर मे महिना ते ऑगस्ट महिना असे चार महिने रात्र असते आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी असे चार महिने सूर्यदर्शन होत असते. या महिन्यांमधील काळात  दिवस व रात्र यांच्या वेळेचे प्रमाण वाढत राहते. दक्षिण ध्रुवापासून २५०० किलो मीटर्स अंतरावर असलेल्या आपल्या तळावर डिसेंबर-जानेवारी हे दोन महिने म्हणजे २४ तासांचा दिवस असतो. जानेवारीच्या अखेरीस सूर्य पहिल्यांदा मावळतो पण किती वेळ ? फक्त चार मिनिटे. मग  रात्रीचा काल दर दिवसाला आठ मिनिटांनी वाढू लागतो. असे होता होता मार्चमध्ये  दिवस व रात्र बारा तासांची होते. मे ते जुलै हा काळ संपूर्ण रात्रीचा असतो. सूर्य त्यानंतर एकदाचा उगवतो. आणि मित्रहो, हा आपला सूर्यनारायण नेहमीसारखा पूर्वेकडून उगवत नाही, तो उत्तरेकडून येतो ! त्याचा पहिला दिवस असतो फक्त चार मिनिटांचा. मग तो पुन्हा उत्तरेस मावळतो. परत सप्टेंबरमध्ये दिवस व रात्र यांचे प्रमाण १२-१२ तासांचे होते.पुन्हा दिवसाची वेळ वाढत वाढत ती नोव्हेंबरमध्ये चौवीस तासांची होते. आता लक्षात आली असेल, येथील दिवस आणि रात्र कशी असते ती ? ( या लेखाबरोबर ही चार लेखांची लेखमाला समाप्त होत आहे. )

(संदर्भ : डॉ. सुधीर खंडेलवाल यांच्या अनुदिनीवरून मुक्त रुपांतर )
मंगेश नाबर
७, कृष्ण बिल्डींग क्र. १, गोखले सोसायटी लेन, परळ, मुंबई ४०००१२.
दूरध्वनी क्र. (०२२) २४१३५७५५
इमेल : mangeshnabar@gmail.com
18 डिसेंबर 2011;  श्री यशवंत कर्णिक यांचा नवीन लेख

मानवी  भावबंध आणि विसंगती 

यशवंत कर्णिक             

      नुकतंच कमलाकर सारंग ह्या  सुप्रसिद्ध  नाट्य  दिग्दर्शक व  नाट्य अभिनेत्याचे एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये प्रकाशित झलेले आत्मकथन वाचायला मिळालं. ‘बेटर लेट दयान नेव्हर’ अशी एक  इंग्रजीत म्हण आहे. ती आठवली. पंचवीस वर्षं उशीरा का होईना हे सुंदर पुस्तक वाचायला मिळालं याचं समाधान वाटतंय. सारंगानी अनेक रोचक आठवणी सुरेख भाषेत रंगवून सांगितल्यायत. त्यातील एक आठवण मोठी हृद्य आहे, ती त्यांच्याच शब्दांत उदधृत  करतो :

      ” वेळ घालवण्यासाठी मी एका कोर्टात जाऊन कामकाज बघत बसत असे. एकदा एक घटस्फोटाची केस ऐकायला मिळाली. नवरा-बायको दोघेही एकमेकांवर बेछूट आरोप करत होते. एकमेकांची बिंगं बाहेर काढत होते. मी प्रत्येक तारखेस  नेमाने जाऊन ही केस ऐकत बसायला लागलो. काही दिवसांनी केसचा निकाल  लागला. घटस्फोट मिळाला. बाईला भरगच्च पोटगी मंजूर झाली. कोर्ट उठलं. सर्वजण बाहेर आले. बाई प्रथम बाहेर आली. पुरूष कुणाशी तरी बोलत आत रेंगाळला. बाहेर आल्यावर त्यानं बाईकडे पाहिलं  आणि तो तोंडातल्या तोंडात ‘गुड बाय’ असं काहीतरी पुटपुटला. त्याबरोबर ती बाई आवेगानं त्या आपल्या (आता घटस्फोटीत) नव-याच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडू लागली. सर्वजण अवाक झाले. मला कळेना की असे कसे झाले. थोडयाच वेळापूर्वी दोघेजण कोर्टासमोर एकमेकाना शिव्या देत होते. तिला पश्चात्ताप झाला की काय? मनात नसताना काही विशिष्ट परिस्थितीनं तिला घटस्फोट घ्यावा लागला असेल काय? कोण जाणे! “

      साहजिकच कुणाही वाचकाच्या मनात प्रश्न निर्माण होईल की पुढं काय झालं? त्यांच्यात समेट झाला असेल काय? त्यांनी घटस्फोटाची केस मागे घेतली असेल काय? मला तर वाटतं, असे प्रश्न ज्याच्या मनात निर्माण होतात ती माणसं तद्दन भाबडी असतात. ती बाई घटस्फोट मिळाल्यावर खिन्न होऊन रडली, तो क्षणिक आवेग होता. थोडयाच अवधीत ती सावरली असेल, तिथून निघून  गेली असेल, घटस्फोट मिळाल्यावर जो मार्ग चोखाळायचं  तिनं ठरवलं असेल त्याच मार्गानं ती गेली असेल. ते तिचं वागणं याचं निदर्शक असावं की त्या नव-यावरील प्रेमाचा एक अगदी छोटा अंश तिच्या मनाच्या कोप-यात कुठेतरी उरून गेला असेल  नि आता हा सहजीवनाचा अंत आहे या विचारानं क्षणभर व्यथित होऊन ती रडली असेल. तो भावनाविष्कार अधिक काळ टिकणं शक्य नव्हतं, कारण त्याआधी पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं असेल. 
     प्रेम ही मानवी भावभावनांमधील सर्वात श्रेष्ठ नि मनोज्ञ संवेदना आहे. स्त्रीपुरुष प्रेमात त्या भावनेला शारीरिक आकर्षणाचा  एक अटळ स्तर लाभलेला असतो. मानसिक आणि शारीरिक आकर्षणाचे हे दोन स्तर एकमेकाना समांतर चाललेले असतात. कधी एक तुल्यबळ होतो तर कधी दुसरा. अशी ही जुगलबंदी सहजीवनाचा बराच काळ व्यापून उरते आणि अखेर बहुतेकवेळा मानसिक स्तरांवर स्थिर होते. तोपर्यंत त्याला समर्पण, सेवा, त्याग हे प्रवाह येऊन मिळालेले असतात. संस्कृती कोणतीही असो, संस्कार काहीही असोत, जगातले स्त्रीपुरुष भावसबंध ह्याच वाटेने निघालेले दिसतात. त्यात क्वचित अवरोध  येतो, नाही असं नाही, फाटे फुटतात, विस्कळीतपणा येतो. बंध तुटतातही, पण प्रेम ही भावना एवढी प्रबळ आहे, की त्याचा किंचित तरी अंश मनाच्या कोप-यात कुठेतरी धुगधुगत  उरून जातो नि सारंगानी कथन केलेल्या अनुभवात दिसला तसा त्याचा स्फोट होण्याची शक्यता असते. कधीकधी तो वेगळ्या त-हेने अभिव्यक्त होतो. 
      आपल्या संस्कृतीत पती-पत्नी संबंध उदात्त मानले गेले  आहेत. पुरुषप्रधान समाज व्यवस्थेत ही उदात्तता अबाधित ठेवण्याचं उत्तरदायित्व स्त्रीवरच येऊन पडलेलं  आहे. सोशिकपणाचं  बाळकडू मिळालेली स्त्री ते निभावून नेतेही. त्यामुळं आशियायी देशांतील लग्नसंस्था जेवढी टिकावू झाली आहे तेवढी पाश्च्यात्य देशांतील नाही. ती मोडकळीस आली आहे असा जर कुणाचा समज असेल तर तो निखालस चुकीचा आहे. स्त्री-पुरूष सहजीवन हा तर मानवी संस्कृतीचा मूलाधार आहे. त्याला प्रेम ह्या संवेदनेचा भक्कम आधार आहे. ही संवेदना देशपरत्वे भिन्न असूच शकत नाही.  लैला- मजनू, शिरी- फरहाद हे आशियायी  असले तर रोमियो-ज्युलीयेट किंवा ‘द वदरिंग हाईट्स’ मधील हीथक्लिफ-क्याथेराईन हे पाश्चात्यच होते. प्रेमाविष्कारात स्थलकाल देशपरदेश असे कप्पे असूच शकत नाहीत. चर्चमध्ये विवाहवेदीवर वधूवर ‘अंटु डेथ डू असं अपार्ट’ एकमेकाना साथ देऊ अशी  शपथ घेतात. आपल्या विवाह मंत्रांत तेच सांगतले जाते. हे बंधन शिथिल होत चालले आहे ही गोष्ट खरी पण त्याचा प्रेमभावनेशी संबंध  नसतो.
      खूप वर्षांपूर्वी जेव्हा मी कोवळ्या मनाचा एक किशोर होतो तेव्हां एक तारुण्य ओलांडून मध्यम वयाकडे वाटचाल करू लागलेलं जोडपं मी पाहिलं होतं. पुरुषाला अर्धांगवायू झाला होता. त्याची अजून तशी तरुणच  दिसणारी बायको त्याची अत्यंत मनोभावे सेवा करीत होती. त्यांना मुले होती की नाही मला माहीत नाही. असली तर लहान असावीत. सबंध दिवस ती स्त्री आपल्या अपंग पतीच्या सेवेतच मग्न असायची. वेगळ्या रक्ताच्या त्या पुरुषाशी ती लग्नाच्या वेदीवर उच्चांरल्या गेलेल्या  दोनचार मंत्रांच्यामुळे मानसिकरीत्या  इतकी कशी जोडली गेली होती, इतकी कशी त्याच्यावर प्रेम करीत होती की आपले स्वतःचे सुख तिला दुय्यम वाटत होते, याचा उलगडा मला त्यावेळीही झाला नाही व अजूनही होत नाहीय. केव्हाकेव्हा मला असं वाटतं की ते संबंध बिनरक्ताचे  होते म्हणूनच एवढे घट्ट होते. रक्ताचे संबंध दुरावतात, तुटून जातात हे आपण पाहतोच आहोत. भाऊ  बहिणीना विचारत नाहीत, मुले जन्मदात्यांना ठोकरतात, आई आपले नवजात अर्भक नदी-नाल्यात फेकून देते ह्या घटना हेच दर्शवतात की रक्ताचा नि प्रेमाचा तसा फारसा संबंध नाही.
      ह्या विसंगतीचा मी शोध घ्यायचा माझ्या परीनं प्रयत्न केला आहे. त्यातून काही लेखनही साकारलंय. ब्रह्मकमळ’ ह्या माझ्या संग्रहातील कथा ‘ बंध : रक्ताचे बिनरक्ताचे ‘
त्या विषयावरच आहे. प्रेम ह्या संकल्पनेला कमी लेखणारी, त्याची खिल्ली उडवणारी किंवा हेटाळणी करणारी माणसं आपल्यात काही कमी नाहीत. प्रेम हा विषय त्यांना अस्पृश्य वाटतो. स्त्री-पुरूष प्रेमाला ते अश्लीलतेचा रंग द्यायलाही कमी करत नाहीत. त्यातूनच ‘खप’ सारख्या विकृत संस्था निर्माण होतात. काही दिवसांपर्यंत आपल्याला कल्पनाही नव्हती की आजच्या नव्या युगात आपल्या देशात अश्या काही कालबाह्य धर्मकल्पनांना कवटाळून बसलेली माणसे फतवे जाहीर करताहेत, प्रेम ह्या पवित्र  नैसर्गिक भावनेच्या जाणूनबुजून आड येताहेत, तरुण पिढीचा छळ करताहेत, खूनखराबा करताहेत, आणि त्याला खतपाणी कोण  घालत आहे तर ते भारतीय संविधानाची शपथ घेतलेले आपले काही राजकारणी. मतांच्या जोगव्यावर निवडून येऊन राज्य करणारे सरकार त्याकडे काणाडोळा करत आहे. ‘करून करून भागले नि देवपूजेला लागले’ अशी माणसे यात असली तर एकवेळेस आश्चर्य वाटत नाही पण काही तरुण नि सुशिक्षित माणसेही ह्या विकृतीचे समर्थन करतात तेव्हां चीड आल्यावाचून राहत नाही. मला तर शंका वाटते की आपला समाज ह्या सहस्त्रकात तरी  ह्या  मानसिकतेत परिवर्तन करणार आहे की नाही? मध्ययुगीन विचारांनी प्रभावित असलेले इस्लामीस्ट, स्त्रियांना बुरख्याखाली रहायला भाग पाडतात किंवा शरीयाच्या कायद्यान्वये हातपाय तोडण्याची किंवा दगड मारून ठार मारण्याची शिक्षा फर्मावतात, तेव्हां आपण त्यांच्यावर त्वेषाने तुटून पडतो. पण आपल्याच देशात धर्माच्या नावाखाली आपणच असले अत्याचार करू लागलो तर इस्लामीस्टाना सुनावण्याचा अधिकार आपल्याला पोचतो का, हा आत्मशोध आपण घेतला पाहिजे. प्रेम ही उदात्त संकल्पना ठोकरणारे हे भुजंग आपण नाहीसे केले नाहीत तर आपला समाज आणि देश कोणतीही प्रगती साधू शकणार नाही असे मला प्रामाणिकपणे वाटते.
      मी ज्या पिढीत लहानाचा मोठा झालो ती पिढी ‘प्रेम’ ह्या शब्दाचा भयंकर धसका घेतलेली पिढी होती. त्यानंतर अर्ध्याहून अधिक शतक होऊन गेले आहे तरी आपल्या मानसिकतेत काही बदल झाला आहे का ह्याचा विचार सर्वानीच करावा. आजही एखाद्या मुलानं वा मुलीनं प्रेमविवाह करायची मनीषा जाहीर केली की पहिली प्रतिक्रिया तिला विरोध करण्याचीच असते. हे विरोध करणारे फक्त आईवडीलच असतात असे नाही तर, भाऊ, बहिणी, काक्ये, माम्ये, शेजारीपाजारी कुणीही असू शकते. एखादा कुणी प्रेमिकांच्या बाजूने उभं राहिलाच तर तो शिव्याशापांचा धनी होतो. हताश होऊन दूर निघून जातो.
       काल बदलला म्हणायचं ते एवढयासाठीच की सहशिक्षण नि नोक-या यांच्यामुळं स्त्रीपुरुष एकत्र येऊ लागले आहेत, त्यांच्यात मनमोकळेपणा वाढू लागला आहे आणि त्याची परिणती सहजीवनाच्या स्वप्नांत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपला निर्णय आपण स्वतः घ्यायचे स्वातंत्र्य अजूनही तरुण पिढीला मिळत नाही त्यामुळे दिरंगाई होते, गैरसमज होतात, वैफल्य आणि अखेर प्रक्षोभ यांची निर्मिती झाल्याने विपरित  प्रकार घडू लागतात. पुरूष नैसर्गिकतःच उतावळा असतो. प्रेम ह्या संकल्पनेमागची उदात्तता जाणण्याचं त्याचं वय  नसतं, मनाची परिपक्वता नसते. प्रेम कसं असावं याचं वर्णन बा.भ.बोरकरांनी आपल्या एका कवितेत फार सुंदर केलं आहे :
      ” प्रीत वहावी संथ ध्वनीविण या तटिनीसारखी
         नकळत बहरावी या हिरव्या तृणसटिनीसारखी
         स्पर्शकुशल झुळकेसम असुनी कधी न दिसावी कुणा
         तिला असावा या घंटेचा सूचक शीतळपणा
         तिने फिरावे या खारीसम सहजपणे सावध
         ऊनसावलीमधून चुकवीत डोळ्यांची पारध. “
पण प्रेमासारख्या नाजूक भावनेला धसमुसळेपणानं हाताळण्याचा मूर्खपणा तरुणांकडून तर घडतोच पण जाणत्यांकडूनही घडतो नि त्याची परिणती दुःखात होऊन जाते. संवेदनशीलतेचा अभावच त्याला कारणीभूत असतो यात शंका नाही.
      कमलाकर सारंगांच्या पुस्तकासारखं दुसरं एक सुंदर आत्मकथन असंच उशीरा माझ्या वाचनात आलं. सुविख्यात मराठी अभिनेत्री सुलोचना (लाटकर-चव्हाण) यांची सुविद्य कन्या कांचनमाला (घाणेकर) यांच  ते पुस्तक वाचून मी भारावून गेलो. कांचन घाणेकरांच प्रेम जगावेगळं   होतं. डॉ. काशीनाथ घाणेकर विवाहित होते. प्रथम पत्नीवर त्यांचं प्रेम होतं. कायदाही आडवा येत होता. कांचननी प्रेमाखातर आपल्या सर्व सुखाचा त्याग केला. तारुण्य ओसरलं. पण नियती अखेर त्यांच्यावर प्रसन्न झाली. त्यांचा प्रियकर त्यांना अखेर लाभला. पण तो फारच थोडया काळासाठी. काही दिवसांतच घाणेकर अचानक दिवंगत झाले. शोकांतिका अखेर टळली नाही ती नाहीच.
      अश्या काही घटना कानांवर येतात, वाचायला मिळतात तेव्हां मी खिन्न होऊन जातो. एकाकीपण गडद होतं.
यशवंत कर्णिक
ग्लेन ईगल, परळ गाव, परळ, मुंबई ४०० ०१२.
इमेल पत्ता  :- karnikyeshwant@gmail.co
श्री मंगेश नाबर यांच्या लेखमालेचा तिसरा भाग

अंटार्क्टिकाच्या साहसकथा – ३

दोन भारतीय महिलांचे विश्वविक्रम :
एक खंडाच्या सर्वोच्च शिखरावर आणि दुसरी धरतीच्या  तळपायाशी
मंगेश नाबर
     २००९ हे वर्ष भारतीय स्त्रियांच्या दृष्टीने अनेक नवनवीन विक्रमांची नोंद ठेवणारे होते यात शंका नाही. या वर्षी महाराष्ट्राची कृष्णा पाटील ही पहिली भारतीय तसेच पहिली भारतीय महिला होती, की जिने अंटार्क्टिकामधील  सर्वोच्च्च शिखर यशस्वीपणे सर करण्याचा पराक्रम केला तर रीना कौशल धर्मशक्तू ही पहिली भारतीय महिला निघाली, की जिने दक्षिण ध्रुवाचा जवळजवळ सारा प्रदेश स्कीईंग करून पिंजून काढला.
कृष्णा या अवघ्या विशीतील जिगरबाज तरुणीने २२ डिसेंबर २००९ रोजी अंटार्क्टिकामधील  माउंट विन्सेंट मासीफ हे सर्वोच्च शिखर  सर केले असून त्याची उंची आहे ४८९७ मीटर्स ( १६,०७७ फूट). यापूर्वी  कृष्णाने वयाच्या एकोणीसाव्या वर्षी मे २००९ मध्ये पृथ्वीवरील सर्वात उंचीवरील शिखर, हिमालयातील माउंट एव्हरेस्ट केव्हाच जिंकले होते.  कृष्णाने आफ्रिकेतील किलीमांजारो हे प्रसिद्ध शिखर केव्हाच पादाक्रांत केले आहे आणि आता तिची पृथ्वीवरील सर्व खंडातील सात शिखरे सर करण्याची मनीषा आहे. ती आहेत युरोपातील माउंट एल्ड्रास  (Mt Eldrus  ५६४२ मी.), ऑस्ट्रेलियामधील  माउंट कोशिस्झ्को ( Mt Kosciuszko – २२२८मी.) , दक्षिण अमेरिकेतील Mt Aconcagua  व अलास्कामधीलMt Mckinley  (६१९४ मी.).
कृष्णाने अंटार्क्टिकाला जाण्यासाठी तिच्या टीमला चिलीमध्ये गाठले आणि ते प्याट्रीऑट हिल्स येथे गेले. तेथून एका तासाच्या विमान प्रवासानंतर त्यांना बेसक्यांप लागला.  शिखरापर्यंत पोचण्यासाठी त्यांना २-३ बेसक्यांप करणे आवश्यक होते. वाटेत सर्वत्र बर्फाच्छादित प्रदेश, हिम वादळे, यांना तोंड देत देत त्यांना  शून्याखाली पन्नास अंश सेन्तीग्रेड तापमानाशी सामना करावा लागला. विन्सन मासीफ हे शिखर दक्षिण ध्रुवापासून १२०० कि. मीटर्सवर असून त्याचे स्थान नकाशावर दक्षिणेस78°31´31˝  आणि  पश्चिमेस 85° 37´ 73˝  असे नोंदवले आहे.
रीना कौशल धर्मशक्तू  या दिल्लीच्या  साहसी वीरांगनेने  २००९ या वर्षातील आणखी एका  विक्रमाची आनंददायी बातमी सर्वांना दिली.  दक्षिण धृवावरील प्रदेशात स्कीइंग  करत प्रवास करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. त्यांच्या या मोहिमेसाठी आठ राष्ट्रकुल देशांच्या महिला सहभागी झाल्या होत्या. त्या सायप्रस, घाना, भारत, सिंगापूर, ब्रुनी, न्यूझीलंड, जमैका आणि ब्रिटन या देशातील  असून त्यांनी शून्याखाली तीस अंश सेंटीग्रेड तापमान असताना भौगोलिक  दक्षिण ध्रुवाच्या टोकावरील प्रदेशात अदमासे ९०० किलोमीटर्स अंतर स्कीइंग करून काटले. ही मोहीम राष्ट्रकुलाच्या साठाव्या वर्धापन
दिनानिमित्त जगातील महिलांनी केलेल्या प्रगतीचे द्योतक म्हणून आयोजित केलेली होती. जगभरातील सुमारे शंभर महिलातून रीनाची निवड झाली होती. या मोहिमेत त्यांनी दर रोज आठ ते दहा तास स्कीइंग करत चाळीस दिवसात ९१५ किलोमीटर्स पार केले. घोंगावणारे हिमवादळी वारे, शून्य अंशाखालील तापमान आणि निर्जन अशा  अंटार्क्टिका प्रदेशातून   जाताना त्यांच्या पाठीवर सतत ८० किलोग्राम वजनाचे ओझे असायचे.  ३० डिसेंबरची मध्यरात्र जवळ येत असताना  रीना एका अशा विशिष्ट स्थळी येउन  ठेपली, ज्याला  भौगोलिक दक्षिण धृवाचे टोक म्हणून समजले जाते.
या मोहिमेतून अत्याधुनिक उपकरणाचा दक्षिण ध्रुवासारख्या   सदैव प्रतिकूल हवामान असलेल्या प्रदेशात कसा करावा हे शिकायला मिळाले.  प्रत्येकाने आपला ध्वनीमुद्रित संदेश  (voice message) पौडकास्टच्या (podcast) माध्यमातून पाठवला. रीनाने पाठवलेला संदेश पुढील प्रमाणे होता :-
‘Although I have not really skied before, I felt it very much in myelement, totally happy’
Reena from India.
      प्रथमच स्कीइंग करणा-या  जमैकाच्या किमने असे म्हटले, की इथे इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे  हिम पाहायला मिळाले, की आम्हाला आमच्या पायाचा उपयोग करणे अवघड होत  होते.
” सूर्य जसा वर येतसे, तेव्हा त्या शांत आणि शीत अशा पठारावरील वितळत चाललेल्या  पाण्यावरून जाताना आम्ही एक प्रकारची लय जुळवत पुढे पुढे जात असू. मध्येच स्कीइंग करताना हिम डोळ्यांवर उडत असे आणि आमची ती लय बिघडत असे, काही क्षण पुढचे काहीही दिसत नसे….आम्ही तसे नव्याने  स्कीईंग करणारे होतो… अधूनमधून अडखळत होतो… पण हळूहळू वेग वाढवत वाढवत पुढे जात राहिलो…” हा संदेश होता, सिंगापूरच्या प्रथमच स्कीईंग करणा-या लीनाचा.
” प्रसाधनगृहाचा आम्हाला आलेला अनुभव सर्वस्वी अनोखा होता. हेच मला इथे येण्यापूर्वी एक आठवडा अगोदर कुणी विचारले असते, तर मी त्याला वेड्यात काढले असते,” शून्यसदृश तापमानातील वातावरणात  राहण्याच्या संदर्भात सायप्रसच्या अथीनाचा संदेश होता.
” कोणत्याही प्रकारचा भरवसा देता येणार नाही, असे हवामान. मग त्याला शिव्या द्या, त्याच्यावर प्रेम  करा, की त्याच्या कलाने वागा, हे आम्ही हळूहळू शिकलो. जसे  तुम्ही उंच पर्वताच्या माथ्यावर चढत आहा, ती चढण कशीही बिकट असो, तुम्ही तेव्हा कशी स्वतःची काळजी घेत पुढेपुढे सरकता, तसे. आणि मग उतरणीवर खाली उतरताना, पुनः तशीच काळजी घेत घेत तुम्ही खाली येता. तसाच काहीसा हा स्कीईंगचा प्रवास असायचा. पण तो सर्वस्वी भन्नाट असा होता, हे मान्य करावेच लागेल. रात्रौ आम्ही गरमागरम सूप, पास्ता, आणि एखादे गरम पेय यांनी स्वतःला सतत जपले. नेहमी आमच्या स्टोव्हभोवती मी असायची. त्याची संगत कधी सोडली नाही. एखाद्या बर्फाळ पठारावरून स्कीईंग करत जाताना, जी  निसर्गरम्य दृश्ये नजरेस पडत, त्यांची साठवण आमच्या क्यामे-यात केलेली आहे. त्यासाठी अंमळ थांबावे लागत असे. ” हा संदेश होता ब्रुनीच्या अनिझाचा.
अडतीस वर्षे वयाच्या  रीनासाठी हा अनुभव म्हणजे काही सोपी बाब नव्हती. या मोहिमेसाठी सुरुवातीस आर्थिक पाठबळ नसताना तिने या मोहेमेवर  जाण्याचा निर्णय घेतला. सरकार आणि बँक यापैकी कुणीही मदत करण्यास उत्सुक नव्हते. मग कुटुंबातील सर्वांनी धीर दिला आणि बँकेचे कर्ज घ्यावे लागले. यामागे रीनाचे पती यांचा आधार होता. ते स्वतः माउंट एव्हरेस्ट तीनदा चढले आहेत.
मग आहे की नाही आमच्या दोन भारतीय महिलांचा दैदिप्यमान असा विश्वविक्रम ?
वर दिलेली दोन छायाचित्रे : पहिले कृष्णा पाटील हिचे असून त्याखालील छायाचित्र, रीना कौशल धर्मशक्तूचे आहे. तिसरे खालील छायाचित्र दक्षिण ध्रुवाच्या मोहिमेतील आहे.]
पुढील लेखात  : अंटार्क्टिका आणि भारत : नातेसंबंध व दिवस- रात्र 
(संदर्भ व मुक्त अनुवाद  : डॉ. सुधीर खंडेलवाल यांच्या  अनुदिनीवरून साभार.)

मंगेश नाबर
७ कृष्ण बिल्डींग क्र. १, गोखले सोसायटी लेन, परळ, मुंबई ४०००१२.
दूरध्वनी क्र. (०२२) २४१३ ५७५५, इ-मेल : mangeshnabar@gmail.com

श्री. यशवंत कर्णिक यांचा एक सुंदर लेख
खासबाग
 यशवंत कर्णिक
      वयाच्या तिस-या वर्षापासून पस्तीसाव्व्या वर्षापर्यंतचा काल मी कोल्हापुरात काढला. मधली तीन चार वर्षे नोकरीनिमित्ताने बाहेर गेली. ती सोडली तर तीस एक वर्षे मी कोल्हापुरातच राहिलो. बालपण तिथंच गेलं. शिक्षण तिथंच झालं. नोकरीची पंधरा वर्षं तिथंच निघाली. मग एकोणीसशे बासष्ट साली कोल्हापूर सोडलं ते आजतागायत. जवळ जवळ अर्ध्या शतकातली ‘बेस्ट इयर्स ऑफ माय लाईफ’ गेली गोमंतकात. त्यानंतर  निवृत्त होऊन मुंबईत आलो तो  इथंच दिवस ढकलतोय स्मरणरंजन करीत.
       जवळजवळ सगळं आयुष्य निगडीत राहिलं ते कोल्हापूर, पणजी नि मुंबईशी. कोल्हापूर नि पणजी विशेष प्रेमाचे. मुंबईत स्थिरावलोय ते निरुपाय म्हणून. मन लागत नाही. जीव घुसमटतो. कोल्हापूर नि गोव्यातल्या आठवणी जागवतो. व्याकुळ होतो.
       ” बालपणीचा काळ सुखाचा” म्हणतात तो नोस्टाल्जियामुळं  ही गोष्ट खरी. माझं बालपण असं काही सुखसमृद्धीत गेलं नाही. नारायण सुर्वेंच्या शब्दांत म्हणायचं तर
                 ” दोन  दिवस  वाट  पाहण्यात गेले दोन  दुःखात गेले
                    हिशोब करतो आहे आता  किती उरलेत डोईवर उन्हाळे “
      पण जुनी दुःखं उगाळत बसण्यापेक्षा सुखाचे क्षण वेचण्यात नि नजरेखालून गेलेल्या प्रदेशांच्या, नद्यांच्या, ओढे-नाल्यांच्या,  झाडा झुडपांच्या आठवणी काढण्यात किती आनंद असतो नाही?
      राजारामपुरीत राहायचो. शहराच्या अगदी पूर्व दिशेच्या टोकाला. त्यापुढे  वस्तीच नव्हती त्या काळी पार टेंबलाई टेकडीपर्यंत. आता मधल्या खणी बुजल्यात नि  त्यावर ह्या मोठमोठाल्या इमारती  उठ्ल्यात. मैदान नष्ट झालीयेत. तशी ती उजाडच होती म्हणा. धुळीनं भरलेली. नाही म्हणायला तिथं कुठल्यातरी मुसलमान फकिराची मझार होती. वर्षाला उरूस भरायचा. मझार कुणाचं भक्तीस्थान आहे  यावर दोन जमातींत वाद होता. काल्पनिक दंगल घडवून आणवून  मी त्यावर एक कथा लिहिली होती. ती माझ्या ‘उरूस आणि इतर कथा’ ह्या पहिल्या  संग्रहात समाविष्ट आहे. तिथल्या धुळीत आम्ही खेळायचो कधीतरी, नाही असं नाही, पण आम्हाला जावसं वाटायचं ते अडीच-तीन मैलांवरच्या मोठया मैदानाकडे. त्याचं नाव होतं ‘खासबाग’.
      खास ‘बाग’ म्हणजे काही फुलझाडांचं  उद्यान  बिद्यान नव्हतं काही. तेही एक मैदानच होतं मोठ्ठच्या मोठ्ठं. अजूनही  मैदानच आहे. म्हणजे असावं. पन्नास वर्षांत तिकडं गेलेलो नाही. पण स्वप्नांत येतं केव्हाकेव्हा. केवढा खेळलोय-हुंदडलोय तिथं, सुमारच नाही.
      खासबाग काही खेळापुरतंच सीमित नाही. खरं म्हणजे त्या सगळ्या भागालाच खासबाग म्हणतात. बिंदूचौकाकडून दक्षिणेकडे जाणा-या रस्त्याला लागलं की खासबाग सुरू होतं ते संपतं पार मंगळवार पेठेपाशी. वाटेत कोल्हापूरच्या संस्कृतीची अनेक रूपं पाहायला मिळतात. कुस्तीपासून क्रिकेटपर्यंत आणि संगीत नि नाटकापासून हत्तींच्या साठमारी पर्यंत सगळं काही खासबागेत खांद्याला खांदा लावून वावरतं. निदान मी तरी पाह्यलंय. आता त्यात काही बदल झाला असेल तर कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाईच जाणे !
      कोल्हापुरात कुस्तीचं प्रस्थ भारी. राजश्री शाहू महाराज नि त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र राजाराम महाराज यांनी कुस्तीच्या खेळाला जे  अमाप प्रोत्साहन दिलं त्याला तोड नाही. त्यामुळं कोल्हापुरात कुस्त्यांच्या तालमी फोफावल्या नि अचाट ताकदीचे कुस्तीगीर  तयार झाले. शाहूपुरीतली अंबाबाई तालीम नि महाद्वारापासची बाबूजमाल तालीम त्यात आघाडीवर. आज सचिन तेंडूलकर, सुनील गावसकर, धोणी, सेहवाग यांच्या नावांभोवती जसं  एक वलय आहे तसं त्याकाळी कोल्हापूरच्या मल्लापा तडाखे, शिवगोंडा मुतनाळे, व्यंकप्पा बुरूड, आणि त्यानंतरच्या महम्मद हनीफ नि हिन्दकेसरी मारुती माने या कुस्तीगीरांच्या  नावांभोवती होतं. त्यांच्या कुस्त्यांचे फड मी पाहिलेत. पंजाबहून गामा, गुंगा, नि गामाचा देखणा मुलगा सादिक यायचे नि फड जिंकून जायचे. त्यांनाही बिदागी देण्यात महाराज हात आखडता घ्यायचे नाहीत. असे ते गुणग्राहक राजे. पुन्हा व्हायचे नाहीत. खासबागेच्या पश्चिमेला कुस्त्यांचं प्रचंड मोठं गोलाकार  मैदान. त्यात हजारो लोकांची बसण्याची  सोय. महत्वाचा फड असला की कोल्हापूर शहरात चैतन्य उफाळून  यायचं. मैदान तर खचाखच भरायचच पण बाहेरही हजारो लोक उभे असायचे. कोल्हापूरचा मल्ल जिंकला की जल्लोषाला उधाण यायचं. आतषबाजी व्हायची. घरोघर दिवाळीसारख्या पणत्या लागायच्या. महाराजांची स्वारी खुद्द फड बघायला यायची , कधीकधी महाराणी साहेबा सुद्धा पडदा लावलेल्या बग्गीतून यायच्या. त्यांच्या बरोबर त्यांचा दासीगण असे. त्यांना  ‘जनाना स्वारी’    म्हणत.
      मी तसा लहानपणी काडीपैलवानच. पण कुस्तीचं मनस्वी वेड. अंबाबाईच्या तालमीत तांबड्या मातीत खूप लोळ्लोय. दंडातल्या बेटकुळ्या फुगवीत पैजा मारल्यात. दोस्तांशी कुस्ती खेळलोय. बहुतेक वेळा चीतपट झालोय. मल्लाप्पा तडाखे ‘आमच्या’ तालमीचेच पहिलवान. हातात पितळी लोटा घेऊन रस्त्यानं डुलत निघाले की आम्ही  त्यांच्या पाठीमाग जायचो. ते एखादा शब्द आमच्याशी बोलले की धन्य धन्य व्हायचो.
     कुस्तीसारखाच नाट्य आणि संगीताशी खासबागेचा अतूट संबंध. कुस्ती-मैदानाला लागूनच कोल्हापूरच  प्रख्यात नाट्यगृह – प्यालेस थिएटर. ज्या केशवराव भोसलेनी त्या मंचावर आपल्या स्वर्गीय आवाजानं नि अभिनयानं रसिकांना दिपवून टाकलं त्यांचंच नाव पुढं त्या  थिएटरलां दिलं गेलं.  तिथं प्रेक्षकानी बालगंधर्वाना पाहिलं नि ऐकलं. मराठी रंगभूमीवरील अनेक दिग्गज तिथं आपल्या अभिनयानं प्रेक्षकाना दिपवून गेले.
     जयपूर-अत्रौली संगीत घराण्याचे संस्थापक गानसम्राट उस्ताद खांसाहेब अल्लादिया खां खासबागेतच आपले गुणी पुत्र उस्ताद भुर्जीखां नि उस्ताद मंजीखां यांचे समवेत  राहात. तिघेही रोज जुन्या राजवाड्यातल्या भवानी मंडपात आपली गानकला सादर करीत. त्यांच्या निवासस्थानीच  केसरबाई केरकर, मोगूबाई कुर्डीकर नि धोंडूताई कुलकर्णी  या पुढे हिंदुस्तानी संगीतातल्या महान गायिका बनलेल्या त्यांच्या शिष्यांनी त्यांच्याकडून संगीत शिक्षण घेतले. ते स्वर्गीय सूर खासबागेत अजून रात्रीच्या निवांत समयी  गुंजत  असतील.
खासबागेच्या हमरस्त्यावर  चौकात  खांसाहेब अल्लादियाखांसाहेबांचा  पुतळा सर्वांना आठवण करून देतो की ह्या महान संगीतज्ञाच्या वास्तव्याने ही कोल्हापूरची भूमी पावन झालीय , हे खासबाग पावन झालंय.
      त्याच रस्त्यावर खासबागेतच देवल क्लबची लहानशी इमारत नि सभागृह उभे आहेत. तिथे शास्त्रीय संगीताच्या अगणित मैफिली साज-या होऊन गेल्यात. किराणा घराण्याचे थोर गायक खांसाहेब अब्दुल करीम  खां, त्यांचा शिष्यगण – हिराबाई बडोदेकर, सरस्वती राणे, भीमसेन जोशी – तसेच सवाई गंधर्व, कुमार गंधर्व, गंगूबाई हंगल नि अगणित दिग्गज गायक तिथे गाऊन गेलेत. ते स्वर त्या काळी अवघ्या खासबागेत घुमले असतील.
      हे सगळे खासबागेच्या परिघातले, पण खासबाग हे अखेर खेळासाठीच. मैदानाला लागूनच दक्षिणेला साठमारी. तिथे हत्तींचे खेळ चालत. ते केव्हा बंद झाले माहीत नाही. मी लहानपणी तिथं खेळायला जायचो तेव्हां ते चालू होते असं काही आठवत नाही. कदाचित राजाराम महाराजांनीच ते बंद केले असावेत. तेवढे हत्ती  कदाचित संस्थानात उरले नसावेत. दोन हत्ती जुन्या राजवाड्याच्या  प्रवेशद्वारापाशी  दोन बाजूना डुलत उभे असायचे. तेवढेच मी पाहिलेत. साठमारीच्या सभोवताली चिंचेची झाडं होती. कुणीतरी माझ्या मनात भरवून दिला होतं की चिंचेच्या झाडाखाली भुतं असतात.  मला खेळताना त्याची आठवण व्हायची. मग मी तिथून धूम ठोकायचो.
      खासबाग मैदान कशाकशासाठी वापरलं गेलं नाहीये ! मुंबई प्रांतातल्या महाविद्यालयीन ‘नॉर्थकोट’ शील्ड  क्रिकेट सामने तिथे दर वर्षी व्हायचे. पुण्याचं वाडिया नि कोल्हापूरचं राजाराम कॉलेज यांच्या मध्ये अंतिम सामना ठरलेला. वाडियाकडून भाजेकर नि दलाया खेळायचे. ते राजारामच्या गोलंदाजाना जाम दाद द्यायचे नाहीत. परिणामी वाडिया दर वर्षी ढाल घेऊन जायचं. राजारामचा कप्तान पोवार आमच्या शेजारी राहायचा. त्यामुळं आमची गल्ली तीन दिवस सुतकात. रणजी सामनेही व्हायचे केव्हाकेव्हा. विजय हजारे, विजय मर्चंट, निंबाळकर बंधू,  गुजरातचा दीपक शोधन, आमच्या कोल्हापूरचा अक्रम शेख, किर्लोस्करवाडीचा संभू चाबुकस्वार, असे कित्येक दिग्गज क्रिकेटवीर खासबागेत खेळताना पाहिलेत.
      फुटबॉल सामनेही होत. कोल्हापूरची टीम सुमार खेळायची. एकदा मुंबईच्या एका फालतू टीमनं कोल्हापूरच्या टीमवर अकरा गोल चढवले. माझा  मित्र मनोहर घोरपडे सामना बघायला गेला होता. तो म्हणाला, ” आपल्या एकाही खेळाडूच्या पायांना फुटबॉलचा चुकूनही स्पर्श झाला नाही. सगळे नुसते बॉलमागे धावत होते. “
       अधूनमधून  खासबागेत  राजकीय पक्षांच्या सभा   व्हायच्या. काही सभा नाथ पै, आचार्य अत्रे  यांच्या सारखे दिग्गज वक्ते गाजवून जायचे. अफाट गर्दी उसळायची. अमर शेख, शाहीर गव्हाणकर, अण्णा  भाऊ  साठे  आपल्या बुलंद आवाजांनी  खासबाग दणाणून टाकायचे. ” मुंबई कुनाची? ”  अमर शेख खणखणीत आवाजात विचारायचे. हजारो लोकांच्या मुखातून उत्तर यायचं ,
” मराठी मान्सांची ! ” मग मुंबई प्रांताच्या गुजराथी मुख्यमंत्र्यांचा  उद्धार. अवघी सभा प्रक्षोभित व्हायची.  ते आवाज अजूनही रात्रीचे उमटत असतील  खासबागेच्या परिसरात.
    मधूनच कधीतरी प्रो. छत्र्यांच्या सर्कशीचा तंबू पडायचा. एकदा  ‘थ्री रिंग’  सर्कस आली होती. हा प्रचंड तंबू. एकावेळी  एकाच तंबूखाली तीन ठिकाणी सर्कशीचे प्रयोग. एकाच तिकिटात कुठंही बसून बघा. धाकटया भावाबहिणीना घेऊन जायचो.  आता सर्कशी गेल्या. सगळी मजा हरवली. अनेक नव्या गंमतीजमती निघाल्यात, पण सर्कस ती सर्कस.
      दिवाळी-दस-याला नि सव्व्हीस जानेवारीला खासबागेत  आतषबाजी व्हायची. बघायला सगळं कोल्हापूर जमा व्हायचं. पोरांच्या उत्साहाला उधाण यायचं.
     जेव्हा असं काही नसेल तेव्हां खासबाग मोकळं मोकळं नि शांत असायचं. लोक गटागटानं हिंडत असायचे. लहान पोरं खेळत  असायची. संध्याकाळच्या  वेळी कोल्हापूरची हवा विलक्षण सुंदर असते. हवेत गारवा पसरू लागलेला असतो. नगरपालिकेचे  बंब  पाण्याचा शिडकावा करून गेलेले असतात. कुठंकुठं हिरवळही
उगवलेली असते. अंधार होऊ लागला की प्रेमी युगुलं हिरवळीवर येऊन बसतात. त्यांच्या कुजनानं खासबाग रोमांचित होऊन  जात असेल.
      खासबागेची आठवण झाली की माझं मन हुरहुरतं. ह्या आयुष्याच्या संध्याकाळी तिथं जाऊन निवांत बसावं असं वाटतं. कुस्त्यांच्या मैदानातील जल्लोष कानावर पडावा, देवल  क्लबमधून बाहेर झिरपणारे सुरेल संगीताचे स्वर मनाला  शांत करून जावेत, कोमल आठवणीना धुमारे फुटावेत अशी खूप खूप इच्छा होते. नि वाटतं, कोल्हापूरला एकदा जाऊन आलं पाहिजे !
                  ***          ***        ***
यशवंत कर्णिक,
परळ गाव, परळ, मुंबई-४०००१२.
दूरध्वनी क्र.  9769652911
श्री. मंगेश नाबर यांचा नवीन लेख
अंटार्क्टिकाच्या साहसकथा – २
अजूनी टिकून आहे, स्कॉटची झोपडी !
      मंगेश नाबर
       दक्षिण धृवावरील अंटार्क्टिका मोहिमेवरील साहसी वीरांचा जेव्हा जेव्हा उल्लेख केला जातो, तेव्हा रॉबर्ट फाल्कन स्कॉट या वीराचे नाव घेतल्यावाचून ती यादी पूर्ण होत नाही. हाच तो धाडशी माणूस, की ज्याने विसाव्या शतकाच्या सुरुवातीस युरोपियनांच्या  दक्षिण धृवावर पाय ठेवण्याच्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणून दाखवले. स्कॉट हा ब्रिटनच्या शाही   नाविक दलाचा अधिकारी होता आणि  त्याने अंटार्क्टिका प्रदेशातील दोन मोहिमांचे नेतृत्व केले होते. पहिली, शोध मोहीम (Discovery Expedition) १९०१-०४  आणि दुसरी दुर्दैवी तेरा नोवा (Terra Nova) मोहीम ( १९१०-१४ ). या दुस-या मोहीमेवर स्कॉट पाच सहका-यांना बरोबर घेऊन तिथे म्हणजे दक्षिण ध्रुवावर पोचला, ती तारीख होती, १७ जानेवारी १९१२. पण या दक्षिण ध्रुव गाठण्याच्या शर्यतीत त्यांच्याअगोदर रोल्ड अमुंडसनच्या नेतृत्वाखाली नॉर्वेजीयन चमू  पोचला होता आणि तो सुद्धा थोडेन थोडके नव्हे तर तब्बल पाच आठवडे अगोदर. स्कॉटला यामुळे जो मनस्ताप झाला, तो त्याच्या डायरीमध्ये उघड झाला आहे.:- ” अनर्थ ओढवला. आमचे सारे दिवा स्वप्न उध्वस्त झाले. हाय रे दैवा ! हे ठिकाणदेखील भयानक आहे….आता आमचा परतीचा प्रवास खूपच भारी आणि एकसुरी होणार असे दिसतेय.” पोचल्यावर दुस-या दिवशी स्कॉटने  हे लिहिले आहे. अत्यंत खेदजनक अशी गोष्ट की, स्कॉट व त्याचे चार सहकारी परततांना कमालीचे शीत तापमान, उपासमार, आणि थकवा यांच्यामुळे मृत्युमुखी पडले.
     आज स्कॉटची झोपडी आपल्याला दिसून येते, ती अंटार्क्टिकामधील रॉस बेटावरील केप इव्हान्सच्या उत्तरेकडील किना-यावर. ती उभारली १९११ मध्ये ब्रिटीश अंटार्क्टिका (१९१०-१३ ) मोहिमेवरील वीरांनी. या मोहिमेला तेरा नोव्हा असे नाव दिले होते आणि याही मोहिमेचा नेता होता रॉबर्ट फाल्कन स्कॉट. येथून पुढे स्कॉट व त्याचे चार सहकारी  त्यांच्या शेवटच्या दक्षिण ध्रुवाच्या पदभ्रमणाला निघाले. ही झोपडी १९१३ मध्ये सोडून दिली, तरी अतिशीत तापमानामुळे ती व तिच्यातील सारी चीजवस्तू  जशी होती, तशीच टिकून  राहिली आहे.
१९१०-१३ च्या मोहिमेच्या वेळी या झोपडीचा पुनः उपयोग न करण्याचा निर्णय स्कॉटने घेतला होता. त्याने ती आपल्या या पूर्वीच्या मोहिमेत म्हणजे १९०१-०४ च्या शोध मोहिमेत बांधली होती. केप इव्हान्सच्या  दक्षिणेस वीस किलोमीटर  अंतरावरील हट पोइन्ट (Hut Point) या स्थळी बांधलेल्या त्या झोपडीला नाव दिले होते, शोध कुटी (Discovery Hut). हट पोइन्ट येथील सामुद्रिक हिम वर्षावामुळे ती झोपडी गाडली गेली होती. हा  संभाव्य  विचार करून स्कॉटच्या मनात तसली  झोपडी त्याच्या पुढील उत्तरेकडील तळावर बांधायची होती. तसे पाहिले तर स्कॉटची ही शोधकुटी त्याच्या शोध मोहिमेच्या काळात फारशी वापरली गेली नाही. कारण बहुतेक सहका-यांनी बर्फाळ मार्गातून वाट काढणा-या आपल्या बोटीवर राहणे अधिक पसंत केले होते. पुढे  तेरानोव्हा मोहिमेच्या सभासदांना ती दहा वर्षांनी हिम आणि बर्फाच्छादित अशा परिस्थितीत सापडली. आश्चर्य म्हणजे त्यातील सर्व खाण्याच्या चीजा १९०३ सालापासून तशाच पडून होत्या. मग ही शोधकुटी स्वछ  केली गेली आणि तेरा नोव्हा मोहिमेच्या लोकांनी तिचा उपयोग १९११ व १९१२ या दोन वर्षात, एक मधला थांबा व संकेत स्थळ म्हणून केला. तेथून ते दक्षिण ध्रुवाच्या अगदी टोकाला जाण्यास निघाले होते.
आज  स्कॉटची झोपडी आहे कशी ?  आयताकृती आकाराची ही झोपडी पन्नास फूट लांब व पंचवीस फूट रुंद आहे. अतिशीत तापमानापासून बचाव करण्या साठी या झोपडीत आतील बाजूंवर समुद्राच्या खडकांवर वाढणा-या  शेवाळाचे आवरण आहे. ते आतील व बाहेरील भिंतीमध्ये भरलेले आहे. झोपडीचे बांधकाम करतांना अंतर्भागातील  उष्णता टिकवण्याचे आटोकाट प्रयत्न केलेले दिसतात. एवढेच नव्हे तर झोपडीतील स्टोव्ह व हीटर यांच्या उष्णतेचा ही उपयोग करण्यात आलेला आहे. तेरा नोव्हा मोहिमेच्या सदस्यांनी या झोपडीची एक छानशी शेकोटी म्हणून निवड केली होती. १९११ च्या हिवाळ्यात या झोपडीत पंचवीस सदस्य राहिले होते.
या स्कॉटच्या झोपडीची सर्वतोपरी निगा राखण्याची जबाबदारी न्यूझीलंड व ब्रिटन यांनी आपल्या अंगावर घेतली आहे. या शंभर वर्षांपूर्वीच्या इमारतीना सांभाळून ठेवण्याचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. खरे पाहिले, तर त्या बांधतांना त्या फार फार तर पाचेक वर्षे टिकतील असे योजले  होते. आज त्या सुदैवाने शाबूत राहिल्या आहेत. परंतु त्यांची काळजी घेण्याचे प्रयत्न सातत्याने केले गेले नाहीत, तर त्या यापुढे कुठवर टिकतील याची शंकाच आहे. अंटार्क्टिकामधील या अशा झोपड्या फार थोड्या   लोकांना ठाउक आहेत.आणि ज्यांना त्या माहित आहेत, त्यांची अशी समजूत असते, की त्या अंटार्क्टिकाच्या अतिशीत तापमानात खूप छान टिकून राहतील. पण त्यांचीही एक प्रकारे झीज होत असते. कारणे अनेक आहेत, जैविक, रासायनिक आणि पर्यावरणाशी संबंधित अशी. कधी कधी नव्हे ब-याच वेळा वादळी हवामानाला तोंड द्यावे लागते. हां, या झोपडीत येणारे पाहुणे संख्येने खूप थोडके आणि झोपडीच्या एकूण परिस्थितीत ढवळाढवळ न करणारे असले, तरी संबंधितांना काळजी घ्यावी लागते, हे सांगणे नकोच.तरी मंडळी, अजून टिकून आहे स्कॉटची झोपडी !
(  डॉ. सुधीर खंडेलवाल यांच्या अनुदिनीवरून मुक्त रुपांतर  )
मंगेश नाबर
७ कृष्ण बिल्डींग क्र. १, गोखले सोसायटी लेन, परळ, मुंबई ४०००१२.
दूरध्वनी क्र. (०२२) २४१३ ५७५५,
इ-मेल : mangeshnabar@gmail.com
श्री. नरेंद्र गोळे यांनी एक लेख पाठवला आहे.

मराठी उच्च शिक्षण समिती (मुशिस) – नरेंद्र गोळे

पार्श्वभूमी

 देशाला स्वातंत्र्य मिळून सुमारे ६४ वर्षे झाली, तरीही महाराष्ट्रात मराठीमध्ये, विज्ञान व तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण उपलब्ध नाही ही वस्तुस्थिती आहे. ते तसे उपलब्ध असावे असे मला प्रकर्षाने वाटते आहे. इतरही अनेकांना वाटत असेल. मात्र आज कुणीही पुढाकार घेतांना दिसत नाही. मी आता पुढाकार घ्यायचा असे ठरवले आहे. चीन, जपान व कित्येक युरोपिअन देशांत सर्व प्रकारचे उच्च शिक्षण त्यांच्या त्यांच्या भाषांतून उपलब्ध आहे. त्या अनेक देशांच्या त्या त्या भाषा बोलणार्‍या लोकांहूनही मराठी बोलणार्‍यांची संख्या खूप जास्त आहे. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यावर इतकी वर्षे उलटूनही आपले उच्च शिक्षण इंग्रजीच्या दावणीलाच बांधलेले आहे.

ज्या देशांत त्यांच्या स्वभाषेत उच्च शिक्षण उपलब्ध असते, त्यांच्या भाषेचा त्यामुळे विकास होत राहतो. ते लोक इंग्रजी न शिकताही आपापला विकास करून घेऊ शकतात. त्यामुळे इंग्रजी शिक्षणात जे मनुष्यबळ आपण वाया घालवतो आहोत, ते त्यांच्या देशात त्यांच्याच विकासाकरता उपयोगात येते. त्यामुळे त्यांचा विकास झपाट्याने होत आहे. तिथे, इतर देशांशी ज्यांची गाठ पडते अशा १०-१५% टक्के लोकांखेरीज जनसामान्यांना अनिवार्यपणे इंग्रजी शिकावी लागत नाही. आपल्याला अनिवार्यपणे इंग्रजी शिकावी लागायची कारण इंग्रजांचे आपल्यावर राज्य होते. आता ते राहिलेले नाही. तरीही आपली मनोवृत्ती गुलामगिरीस इतकी धार्जिणी झालेली आहे की, आपल्या भाषेचा, विभागाचा विकास हे मुख्य ध्येय राहिले नसून, इंग्रजी भाषा प्रथम अनिवार्यपणे शिकून घेऊन मग विश्वाच्या प्रांगणात उच्च शिक्षणाचा शोध आपण घेऊ लागतो. मातृभाषेत ते उपलब्ध नाही याची आपल्याला ना खंत असत, ना खेद.

शालांत परीक्षेपर्यंत अनिवार्यपणे इंग्रजी शिकावी लागत असल्याने काय बिघडते? शिकावी की आणखी एक भाषा, आपल्यालाच उपयोगी पडेल. असे लोक बोलतात. हो. शिकावी. पण परकी भाषा अनिवार्यपणे का शिकावी? तिला शेकडो इतर पर्याय का उपलब्ध नसावेत. निदान आपल्याच भारतातल्या १४ मान्यताप्राप्त भाषा, इंग्रजीला पर्यायी का नसाव्यात? ह्याचा विचार होण्याची गरज आहे. इंग्रजी हवी त्यास ती शिकण्याचा पर्याय अवश्य असावा, मात्र हल्लीप्रमाणे ती अनिवार्य नसावी हे निश्चित.

कारणे अनेक आहेत. दहावी, बारावीचा उत्तीर्णता-दर आपण दरसालच्या परीक्षांत पाहतो. तो सुमारे ५०% च्या आसपास असतो. त्यातील बव्हंशी विद्यार्थी इंग्रजीत नापास होतात. त्यातील कित्येकांना पुढे शिक्षणच घेता येत नाही. तदनंतर उर्वरित आयुष्यात इंग्रजीचा वापर करणेही त्यांना अनिवार्य नसते. किंबहुना तिचा त्यांना फारसा उपयोग तर होत नाहीच, मात्र तिचा दुस्वास मात्र वाटू लागलेला असतो. प्रगत “इंडिया” आणि “नापास” भारतातील ही तफावत आपण हकनाकच वाढवत आहोत. हे शैक्षणिक धोरण मुळातच चुकीचे आहे. इंग्रजी शिक्षण उपलध असावे. मात्र ते अनिवार्य नसावे.

मराठीत उच्च शिक्षण का उपलब्ध नाही?

मुंबई विद्यापीठाने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या अभ्यासक्रमांकरता नियुक्त केलेल्या पुस्तकांवर आणि त्यांच्या लेखकांवर नजर टाकली तरीही एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते, ती ही की त्यातील बव्हंशी लेखक मराठी आहेत. ते इंग्रजीत पुस्तके लिहीतात. इंग्रजीतून आपल्याच विद्यापीठांतून ती शिकवतात. मराठीच विद्यार्थी ती इंग्रजीतून शिकतात. आणि माझे काही मित्र, विज्ञान व तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण मराठीतून उपलब्ध नाही म्हणून, आपापल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमात घालतात. म्हणजे विज्ञान व तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण मराठीतून उपलब्ध नाही म्हणून पाल्यांना इंग्रजी माध्यमात घालायचे, आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतल्याने इंग्रजी उच्च शिक्षणालाच काय ते विद्यार्थी मिळायचे. मराठीतून उच्च शिक्षण उपलब्ध करून दिले तरीही ते कुणी खरोखरच घेईल काय? अशी परिस्थिती! त्यामुळे इथे अंडे आधी की कोंबडी आधी असा प्रकारच दिसून येतो.

मात्र राष्ट्रीय योजना आयोगाने ह्याचा विचार करायला हवा आहे की, आपण आपल्या उपलब्ध मनुष्यबळापैकी किती टक्के मनुष्यबळ, अनिवार्य इंग्रजीच्या उपासनेत वाया घालवतच राहणार आहोत. आपल्याच मायबोलीत उच्च शिक्षण मिळू लागेल, तर हे मनुष्यबळ कायमस्वरूपी मुक्त होईल. इंग्रजीत नापासाचा शिक्का बसून आयुष्यभराकरता नाउमेद होण्याची पाळी, आपल्या लोकसंख्येतील एका मोठ्या हिश्श्यावर येणार नाही. पण आजवर कुठल्याही योजना आयोगाने इतका मूलभूत विचार केलेला दिसत नाही. मराठीत उच्च शिक्षण का उपलब्ध नाही? ह्याचे हे एक प्रमुख कारण आहे.

दुसरे एक कारण आहे, ते म्हणजे पुस्तकच नाहीत हो मराठीत. ती इंग्रजीतून अनुवादित करायला हवी आहेत. आता उच्च शिक्षण नाही म्हणून पुस्तके नाहीत की पुस्तके नाहीत म्हणून उच्च शिक्षण नाही, हा एक तसलाच न सुटणारा प्रश्न आहे. मुळात स्वतःच्या, स्वभाषेच्या, देशाच्या विकासाशी आपण प्रामाणिकच नाही. हे खरे आहे.

काय करायला हवे आहे?

मराठी विचारवंतांनी आपल्या मायबोलीच्या लेकरांच्या विकासाकरता, मायबोलीच्या विकासाकरता, हे एकदा आणि नेहमीकरता नक्की करण्याची गरज आहे की मायबोलीतून उच्च शिक्षण उपलब्ध होणे गरजेचे आहे. आधुनिक शास्त्र हे मान्यच करते की असे झाल्यास व्यक्तींचा विकास झपाट्याने होईल. मात्र हे साधावे कसे?

याकरता एक “मराठी उच्च शिक्षण समिती-मुशिस” असावी. तिने पाच-दहा वर्षांच्या सुनिश्चित कालावधित महाराष्ट्रात, विज्ञान व तंत्रज्ञानाचे उच्च शिक्षण उपलब्ध होईल अशाप्रकारचे नियोजन, कार्यान्वयन करावे आणि शिक्षणसंस्थांनी, शिक्षणमहर्षींनी, राज्यकर्त्यांनी त्यात आपापल्या अधिकारास, क्षमतेस साजेशी भूमिका प्रामाणिकपणे निभावावी. तरच हे साध्य होण्यासारखे आहे.

संकल्पना अशी आहे की जे प्राध्यापक स्वतःच लिहिलेली विज्ञान व तंत्रज्ञानाची इंग्रजी पुस्तके, इंग्रजीतून विद्यार्थ्यांस शिकवत आहेत, त्यांनीच त्या पुस्तकांचे मराठीत अनुवाद करावेत. त्यांनीच ते मराठीतून शिकवावेत. त्याकरता इंग्रजीत नापास होणार्‍या विद्यार्थ्यांनी पुढे यावे आणि जे इंग्रजीने दिले नाही ते मायबोलीकडून हक्काने मागून घ्यावे.

मी काय करू शकतो?

७ डिसेंबर २००४ रोजी माझी अँजिओप्लास्टी झाली. लोकं “गेट वेल सून” म्हणायला येत. कसे? ते मात्र मला माहीत नव्हते. ते शोधून काढण्याच्या प्रयत्नात “डॉ. डीन ऑर्निशस प्रोग्रॉम फॉर रिव्हंर्सिंग हार्ट डीसीज”, डॉ. डीन ऑर्निश, पृष्ठसंख्या: ६७१, बॅलंटाईन बुक्स, १९९०, हे पुस्तक माझ्या वाचनात आले. मी ह्या पुस्तकाच्या प्रेमात पडलो. स्वतःस ते शब्द-न्‌-शब्द समजावे म्हणून मी त्याचा मराठीत अनुवाद केला. त्या पुस्तकातील सल्ल्याबरहुकूम जीवनशैली परिवर्तने घडवत घडवत मी माझ्या हृदयविकाराची माघार घडवली. आज किमान औषधे घेऊनही माझा रक्तचाप १००/७० मिलीमीटर पारा, असा राहत आहे. मग ह्याच संबंधात मी “बायपासिंग बायपास सर्जरी”, डॉ.प्रतीक्षा रीग डेब, एम.बी.बी.स., एम.डी.(मुंबई) व डॉ.एल्मर म.क्रँटन, एम.डी.(अमेरिका), पृष्ठसंख्या:२६७, प्रतिबंधक हृदयोपचार संस्था प्रतिष्ठान, २००७ ह्या पुस्तकाचाही मराठीत अनुवाद केला. त्यानंतर मला वैज्ञानिक पुस्तकांचा मराठीत अनुवाद करण्याचा छंदच लागला. रुची आणि गतीही प्राप्त झाली. त्यानंतरही मी आणखी तीन पुस्तकांचा मराठीत अनुवाद केलेला आहे.

विज्ञान व तंत्रज्ञानातील किमान ५० पुस्तकांचा मराठी अनुवाद उपलब्ध झाल्याखेरीज कुठलाही अर्थपूर्ण, उच्च शिक्षण अभ्यासक्रम सुरू होऊच शकत नाही. ह्यासंदर्भात अशाप्रकारचे अनुवाद करणे मला वरील पार्श्वभूमीमुळे शक्य झालेले आहे. हे जेव्हा माझ्या लक्षात आले तेव्हा मी ह्यात जे काय करू शकतो, ते करायचे असा निर्णय घेतला आहे.

मी स्वतः अनुवाद करू शकतो, इतरांना मदत करू शकतो, “मुशिस” च्या कार्यात मोलाचा वाटा उचलू शकतो. इतर कोण कोण, काय काय करू शकतात हे त्यांच्याजवळ ही संकल्पना मांडून समजून घेऊ शकतो आणि एकूणच ह्या संकल्पास सशक्त आधार देऊ शकतो. तो देण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. मान्यवर, तुमचा काय विचार आहे. तुम्हालाही असेच वाटते का? तुम्ही ह्याकरता काय करू शकता?

 पूर्वप्रकाशन: http://www.maayboli.com/node/29526

अनुदिनीः http://nvgole.blogspot.com/, Email: narendra.v.gole@gmail.com

माझे इतर लेखन:

http://www.manogat.com/node/5150हृदयविकार

http://www.manogat.com/node/12676पातंजल योगसूत्रे व भाष्ये

http://www.manogat.com/node/9460 ऊर्जेचे अंतरंग

श्री. मंगेश नाबर यांचा नवा लेख
अंटार्क्टिकाच्या साहसकथा – १
भारतीय  अंटार्क्टिका मोहिमेचा २८वा वाढदिवस

मंगेश नाबर

२७ जानेवारी २०१० रोजी भारताच्या अंटार्क्टिका मोहिमेचा २८ वा वाढदिवस होता. याच दिवशी २८ वर्षांपूर्वी  एम.व्ही. पोलर  सर्कल या बोटीने पहिल्या वहिल्या भारतीय अंटार्क्टिक संघाच्या सदस्यांना अंटार्क्टिका खंडाच्या किना-यावर आणले होते. त्या पहिल्या मोहिमेत एकूण एकवीस सदस्य होते. त्यात १३ वैद्न्यानिक आणि बाकीचे सहाय्यक कर्मचारी होते. या साहसी मोहिमेवर येण्यापूर्वी सर्वांनी हिमालयातील उत्तुंग पातळीवरील हिम व बर्फाच्छादित  वातावरणाचे प्रशिक्षण घेतले होते. त्या मोहिमेचे नेतृत्व केले होते, डॉ. एस.झेड.कासीम या पर्यावरण खात्यातील एका मान्यवर संशोधकाने. त्या तुकडीने ६ डिसेंबर १९८१ रोजी गोव्याहून प्रस्थान ठेवले. प्रवासासाठी एम.व्ही. पोलर सर्कल ही बर्फ फोडणारी नॉर्वेजियन बोट घेण्यात आली होती. अंटार्क्टिकाच्या बर्फ़ाच्छादित अशा अकरा हजार किलोमीटर्सच्या दूरस्थ स्थळी पोचण्यास ३३ दिवस लागले होते.  या पहिल्या मोहिमेची उद्दिष्टे काय होती ? अंटार्क्टिकामध्ये  एक भारतीय तळ (base camp) प्रस्थापित करणे, अंटार्क्टिकाच्या विविध क्षेत्रात शास्त्रीय अभ्यासाची सुरुवात करणे आणि भविष्यातील भारताच्या मोहिमांसाठी लागणा-या गरजांचा – वाहतूक, निवास, वैद्न्यानिक संशोधन इत्यादी – अंदाज घेणे. तिथे पोचल्यावर या मंडळींनी बेस क्याम्पची यशस्वीपणे प्रतिष्ठापना केली आणि मग आपला भारताचा तिरंगी ध्वज उभारला. भूगर्भशास्त्र, भूगर्भ पदार्थविज्ञान, सूक्ष्मजैवविद्याशास्त्र, हवामानशास्त्र आणि रसायनशास्त्र यामधील कामाला प्रारंभ झाला. अंटार्क्टिकाच्या शुमाकर ओयासिस (Schimacher Oasis) या प्रदेशात एका मानवरहित स्वयंचलित हवामानतळाची (Automatic Weather Station AWS) स्थापना केली. आपले उद्दिष्ट यशस्वीरीत्या पूर्ण करून पहिल्या तुकडीचे सदस्य  २१ फेब्रुवारी १९८२ रोजी भारतात परतले. या सर्व कार्यात भारतीयांचा राष्ट्राभिमान दिसून येत होता. भारताच्या या पहिल्याच प्रयत्नाची जगभरात प्रशंसा होउन एक लक्षणीय कामगिरी म्हणून नोंद झाली.

याचे श्रेय भारताच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींना दिले जाते. त्यांनी अंटार्क्टिका मोहिमेच्या नियोजनाला   दिशा दिली होती. आपल्या अनेक राजकीय व सामाजिक व्यवधानातही इंदिरा गांधींनी वेळ देउन अशी इच्छा व्यक्त केली होती, की भारताला एक प्रतिष्ठित दर्जा , मग तो प्रगतीशील देशातच नव्हे तर, सबंध जगातून  मिळावा. असे म्हणतात, की या पहिल्या भारतीय मोहिमेचे नियोजन हे अत्यंत जाणीवपूर्वक राखलेले  असे गुपित (Top secret) होते. जेव्हा महासागरी विकास खात्याकडून या मोहिमेसाठी बर्फ फोडणा-या बोटीचा शोध घेण्यास सुरुवात झाली, तेव्हा कुठे जगाला आणि खुद्द सामान्य भारतीयांना देशाची ही महत्वाकांक्षा कळून आली. इंदिरा गांधींनी अंटार्क्टिकावर ही मोहीम धाडण्याचा निर्णय घेतला तेव्हा असे सूचित होत होते, की भारत या आंतरराष्ट्रीय करारात सहभागी होण्याचा संभव आहे. त्या वेळी आपण संमती दिली नव्हती. तरी १९८१ मधील अंटार्क्टिका मोहीम  म्हणजे  भारताने कराराच्या चौकटीबाहेर टाकलेले ते पहिले पाउल होते. त्यातून बरेच काही मिळवले असे आज म्हणता येईल. तरीही ही मोहीम निव्वळ शास्त्रीय आहे, भारताला अंटार्क्टिकामध्ये कोणतीही प्रादेशिक अभिलाषा नाही आणि कराराच्या तत्वांना भारत बांधील   आहे,  हे सांगितले गेले होते. परंतु जेव्हा ही मोहीम संपली तेव्हा भारताने विकसनशील देशांना या मोहिमेच्या लाभांची माहिती दिली. त्यामागे भारताचा हेतू, विकसनशील देशांचा काल चाचपून पाहण्याचा होता. करारातील भारताला मिळालेले सल्लागार म्हणून स्थान आणि अंटार्क्टिकामधील शास्त्रज्ञांचे वास्तव्य या गोष्टी  भारतासारख्या त्या काळातील देशाला एक प्रतिष्ठेचे स्थान मिळवून गेल्या.

डिसेंबर १९८३ मध्ये तिसरी मोहीम पार पडली आणि भारताने आपल्या अंटार्क्टिकामधील कायम स्वरूपी तळाची यशस्वीपणे प्रतिष्ठापना केली. या तळाचे दक्षिण गंगोत्री असे नामकरण केले. याबरोबर भारताला अंटार्क्टिका करार या महत्वपूर्ण आंतरराष्ट्रीय गटाचे सदस्यत्व मिळाले. तथापि हा तळ बर्फात खचून जाऊ लागला आणि तो सोडून द्यावा लागला. मग १९८७-८८ मध्ये भारताच्या दुस-या तळाचे काम शिम्याकर ओयासिस या प्रदेशात सुरू झाले. नोव्हेंबर १९८९ मध्ये भारताच्या नवव्या तुकडीने त्याची उभारणी केली. मैत्री या नावाचा हा हिवाळी तळ पूर्णतया सुसज्ज असा आहे. भारताने आपल्या भारती या तिस-या तळाचे  काम अंटार्क्टिकामधील  लार्समान हिल या प्रदेशात सुरू केले आहे.

गेल्या सत्तावीस वर्षात भारताने या मोहिमांतून काय काय केले ? हे कार्य म्हणजे प्रमुख शास्त्रीय संशोधनाच्या कामांची सुरुवात करणे, अंटार्क्टिकात हिवाळी तसेच उन्हाळी हंगामात मुक्काम करणा-या सदस्यांसाठी अधिकाधिक सुविधा पुरवणे, या संदर्भात खूप यश संपादन झाले आहे. तेथे अशी निवासस्थाने बांधली आहेत, की त्यात अंतर्गत खेळवली गेलेली चौवीस  तास उर्जा तसेच थंड व गरम पाणी उपलब्द्ध आहे. विविध क्षेत्रातील शास्त्रीय  संशोधनाच्या प्रयोगशाळा असून तेथे बाराही महिने काम अखंड  चालू राहते. तळावरील संदेशवहनात अलीकडच्या काळात कमालीची सुधारणा झाली आहे. आता तर उपग्रहांच्या सुविधांच्या मदतीने जगभरातील कोणीही ‘मैत्री’ शी वर्षातील  दिवसा किंवा रात्री केव्हाही संपर्क करू शकतो.

सत्ताविसाव्या भारतीय अंटार्क्टिका मोहिमेचा मी सदस्य होतो आणि या मोहिमेकडे एक महत्वाची कामगिरी दिलेली होती. ती अशी, की ‘मैत्री’ची  इंटरनेटच्या माध्यमातून सर्व काळ  चालू राहणारी जोडणी  करणारा एक पृथ्वी तळ ( earth station ) उभारणे. मी तिथे जाईपर्यंत या पृथ्वी तळाचे बांधकाम पुरे झाले होते. या कामासाठी अवजड बांधकामाचे साहित्य वाहून नेण्याचे  कष्ट आम्ही घेतले होते. जेव्हा उपग्रहाशी संपर्क करण्यात यश मिळाले, ‘मैत्री’मध्ये सर्व काळ  इंटरनेट व दूरचित्रवाणी यांच्या जोडण्या जेव्हा प्रस्थापित झाल्या, तेव्हा आमच्या सा-या कष्टाचे चीज झाले असे वाटले. आता सदस्य तुम्हाआम्हासारखे नेट सर्फिंग करू शकतात. दैनिकातील बातम्या तसेच दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम, हो, आपल्या आवडत्या मालिका पाहू शकतात.

आता  अंटार्क्टिका  पूर्वीसारखे निर्जन ठिकाण राहिलेले नाही. आजतागायत अंटार्क्टिकापर्यंत पोचण्याचा सागरी मार्ग हाच एकमेव मार्ग असायचा. आता तसे राहिलेले नाही. केपटाउन, चिली किंवा अर्जेन्टिना  येथून अंटार्क्टिकाकडे येणा-या नियमित हवाई  फे-या आहेत. भारतीय तुकड्यांचे सदस्यसुद्धा आता नियमितपणे हवाई मार्गाचा उपयोग करू लागले आहेत. तरी हे दोन्ही मार्ग अंटार्क्टिकातील उन्हाळ्यातच चालू असतात. आता अमेरिकनांचे प्रयत्न चालू आहेत, की अंटार्क्टिकातील बर्फाळ हिवाळ्यात रात्रौ हर्क्युलस  सी- १३० विमाने तेथे उतरवावीत.

आता अधिकाधिक साहसी लोक आपल्या विविध मोहिमांसाठी अंटार्क्टिका हे ठिकाण निवडू लागले आहेत. उदा. दक्षिण धृवापर्यंत स्कीईंग करत पोचावे , किंवा तेथे पोचण्यासाठी प्रचंड आकाराचे पतंग वापरावेत. कुशल जलतरणपटू तसेच लांब अंतरावर पोहणारे आता अंटार्क्टिकामधील थंडीने गोठणा-या पाण्यात उतरत आहेत. तुम्ही जर तिथे १ मैल वा १.६ किलो मीटर पोहू शकलात, तर तुम्हाला अंटार्क्टिक जलतरणपटू म्हणून मानाचे स्थान मिळू लागले आहे. अनेक पर्यटन संस्था अंटार्क्टिकाच्या सहली नियमितपणे आयोजित करत आहेत. नजीकच्या भविष्य काळात अंटार्क्टिका हे पर्यटकांचे सुटीतील आनंद देणारे व सर्व सुविधा असलेले स्थळ असेल यावर लोकांचा विश्वास  बसला आहे.

टोयोटा कंपनीने अंटार्क्टिकामधील बर्फाळ पृष्ठभाग, शिखरे व खळगे याना तोंड देउ शकणा-या सुधारित मोटारगाड्या बाजारात आणल्या आहेत. आकट्रिक कंपनीने या गाड्या वापरण्यात समाधानकारक असे यश संपादन केले आहे. एकूण अंटार्क्टिकाच्या प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार हे नक्की.

(डॉ. सुधीर खंडेलवाल हे दिल्लीस्थित मनोविकारतज्ञ आहेत. साहसी मोहिमा आणि जगभरातील संस्कृती यात त्यांना विशेष रस आहे. नोव्हेंबर २००७ मध्ये डॉ. सुधीर यांना अंटार्क्टिकातील एका संशोधन प्रकल्पावर काम करण्याची संधी चालून आली. त्याचे रोमांचकारक अनुभव शब्दांक्त करणारे त्यांचे असे पहिले भारतीय ब्लॉग संकेतस्थळ आहे. अंटार्क्टिकाच्या नवलाईच्या प्रदेशाचे अनुभव त्यांनी आपल्या खास शैलीत लिहिलेले वाचून माझी आणि डॉ. सुधीर खंडेलवाल यांची वेबवर भेट घडली. त्यांचे हे लेखन मराठीतून अनुवादित करण्याची त्यांनी मोठ्या आनंदाने परवानगी दिली. आज ते जरी अंटार्क्टिकामधून परत आलेले असले,  त्यांचे हे लेखन  वाचण्यासारखे आहे.)

खंडेलवाल यांच्या अनुदिनीचा पत्ता असा आहे :- http://himalayanadventurer.blogspot.com/

मंगेश नाबर

७ कृष्ण बिल्डींग क्र. १, गोखले सोसायटी लेन, परळ, मुंबई ४०००१२.

दूरध्वनी  क्र. (०२२) २४१३५७५५
इमेल : mangeshnabar@gmail.com
श्री. मंगेश नाबर यांनी पाठवलेली 3 भागातील लेखमालिका
टायफॉईड मेरी
मंगेश नाबर
– १ –
     तो दिवस होता २७ ऑगस्ट १९०६. उन्हाळी सुटीचा आणि मौजमजेचा हंगाम. न्यूयॉर्क शहराजवळच्या आयस्टर बे नावाच्या बेटावरील भाड्याच्या घरात सुटीच्या दिवसात मौजमजा करायला आलेल्या चार्ल्स वॉरेन यांच्या कुटुंबातली  एक तरुण मुलगी अचानक तापाने आजारी पडली आणि निदान झाले विषमज्वराचे. त्या आठवड्यात घरात आणखी पाच जणांना तशीच लक्षणे दिसून आली. वॉरेन यांची पत्नी, दुसरी कन्या, दोन मोलकरणी  आणि माळी. वास्तविक पाहता आयस्टर बे हा विभाग उच्चभ्रू लोकांचा, तेथे विषमज्वराची लागण झाल्याचे कधीच ऐकिवात नव्हते. हे बेट तसे म्हटले तर न्यूयॉर्क शहरातील श्रीमंत लोकांचे सुटी मनपसंत घालवण्याचे आवडते स्थळ. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट यांचे तेथे उन्हाळी सुटीचे निवासस्थान म्हणून हे बेट प्रसिद्ध आहे. सदरहू वॉरेन महाशय तर धनवान बँकर. सुखवस्तू राहाणीमान असलेले कुटुंब असून नोकरचाकर दिमतीला होते. त्यांनी हे स्थळ समोरची खाडी व आरोग्यदायी आसमंत हे पाहून पसंत केले होते.
विषमज्वर होणा-या लोकात वॉरेन यांचे कुटुंब मोडणारे नव्हते. या आजाराची लागण साधारणपणे गरिबी व अस्वच्छता असलेल्या ठिकाणी होत असे. चार्ल्स वॉरेन तर लिंकन बँकेचे अध्यक्ष. आयस्टर बेसारख्या ठिकाणी उन्हाळी हंगामात एक मोठे घर भाड्याने घेणे आणि पदरचे नोकर चाकर, स्वयंपाकी, माळी तेथे घेऊन येणे , या गोष्टी त्यांच्यासारख्या प्रतिष्ठीत लोकांनाच परवडणा-या होत्या. अशा श्रीमंतांना विषमज्वर होणे आणि तोसुद्धा आयस्टर बे येथे होणे म्हणजे असंभव.
या घटनेने घरमालक काळजीत पडला. कारण आता आजाराने पछाडलेल्या या घरात न्यूयॉर्कमधले कोण श्रीमंत पर्यटक राहायला येणार ? मालकाची आणखी चार घरे अशी होती. त्यातील एक जरी या कारणामुळे  रिकामे राहिले तरी संकट म्हणायचे. म्हणून त्याने तज्द्न्यांना  पाचारण केले. या संसर्गजन्य आजारामागे काय कारण असेल बरे ? तज्ञांनी पिण्याचे पाणी तपासले. घरातील संडास, मैला-मूत्र जमा होण्याची टाकी, घराबाहेरची कुटी, कचरा टाकण्याची जागा, सर्व ठिकाणी कसून शोध घेतला गेला. कुठेही संसर्गाचा उगम असल्याचे आढळले नाही. दुग्धजन्य पदार्थांची चाचणी घेण्यात आली. बेटावरील किना-यावर राहणा-या एका वृद्ध महिलेवर संशय घेतला गेला. कारण काय, तर ती या परिसरातील लोकांना शिंपल्यातले  मासे विकत असे. तथापि हे मासे खाणा-या इतर लोकांपैकी कोणीही आजारी पडल्याचे दिसले नाही.
स्थानिक आरोग्य खात्याचे अधिकारी व हे आमंत्रित तज्ज्ञ यांच्या एकत्रित अहवालावरून काहीही निष्पन्न झाले नाही. घरमालकाचे समाधान होईना. त्याने न्यूयॉर्क शहरातील आपल्या मित्रमंडळीकडे चौकशी करून कोणी तरी जाणकार पाठवा असा तगादा लावला.
या समस्येतून कोण व कशी सोडवणूक करणार या विवंचनेत घरमालक असतांना डॉ. जॉर्ज सोपर यांचे घटनास्थळी आगमन झाले. तसे पाहिले तर सोपर हे काही वैद्यकीय शाखेचे तज्ज्ञ किंवा डॉक्टर नव्हते. ते होते आरोग्य खात्याचे एक sanitary इंजिनीअर. एका वृत्तपत्रात त्यांचा उल्लेख A doctor to sick cities असा करण्यात आला होता.
डॉ. सोपर तडक कामाला लागले.त्यांनी प्रथम आपल्या अगोदर आलेल्या मंडळींचा अहवाल, पिण्याचे पाणी, कचरा, सांडपाणी यांच्या घेतलेल्या चाचण्यांचे तपशील नजरेखाली घातले. पण सुरुवात केली ती घरातील मंडळींच्या चौकशीपासून. त्यांनी दहा वर्षांपासून आलेल्या गेलेल्या पाहुण्यांची यादी केली. शक्य असेल तेथे या सर्व लोकांचा वैद्यकीय अहवाल तपासून पाहिला. अखेरीस त्यांनी या कुणाचाही संबंध नसल्याचा निष्कर्ष काढला.
यामुळे सारे बुचकळ्यात पडले. या प्रकरणाची पाळेमुळे कुठेतरी गेलेली असणार, हे उघड होते. पाणी जिथून पुरवले जाते, त्यात विष्ठा मिसळली गेली की काय, येथे येणारे दूध दूषित आहे काय, एखादा आजारी पाहुणा आला की काय, असे बारीक सारीक दुवे तपासले गेले. त्यातही काही सापडेना. मग डॉ. सोपर यांनी उलट्या मार्गाने जाण्याचे ठरवले.
त्या काळी म्हणजे शंभर वर्षांपूर्वी, विषमज्वराची लागण होण्याचा कालावधी दहा ते चौदा दिवसांचा असतो, असे समजले जात असे. म्हणून डॉ. सोपर यांनी २० ऑगस्ट किंवा त्या पूर्वीच्या दहा बारा  दिवसांवर आपले लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले. आणि ….. त्यांना या कोड्यात टाकणा-या घटनेमागे कोण असावे, याचा सुगावा लागला. ४ ऑगस्ट रोजी वॉरेन कुटुंबातील एक स्वयंपाकी बदलला होता. वैशिष्ठ्याची गोष्ट अशी, की नवीन रुजू झालेली स्वयंपाकीण बाई आता गायब होती. हा गंभीर आजार सुरू झाल्यानंतरच्या तीन एक आठवड्यात तिने कोणतीही सूचना अथवा स्पष्टीकरण न देता हे काम सोडून दिले होते. ती अचानक कुठे तरी गायब झालेली होती. तिचे नाव होते मेरी मेलॉन (Mary Mallon).
बेपत्ता स्वयंपाकीण बाई. या प्रकरणाच्या तपासातील एकुलता एक दुवा होता. या कोड्याची उकल होउ शकेल का ? वाचकहो, असे पाहा, एखाद्या घरात, कार्यालयात एखादा गंभीर स्वरूपाचा गुन्हा, चक्क खून झाला आहे, आणि  कुणीतरी एक व्यक्ती जी त्यावेळी तिथे असायला पाहिजे, तीच अचानक जाग्यावर नाही, मग तिचा प्रथम तातडीने तपास करायला पाहिजे, हे वेगळे सांगायला नकोच. असा परिस्थितीजन्य पुरावा मिळणे हे सोपर यांच्या दृष्टीने महत्वाचे होते. त्यावरून कदाचित काही सिद्ध होणार नसेलही, पण ती एक नक्की संशयास्पद बाब होती.
या संबंधात सोपर यांना जी माहिती मिळाली, त्यावर त्यांनी बारकाईने विचार केला, आणि त्यांना एक गोष्ट दिसून आली, की या विभागात या पूर्वी कधीही विषमज्वराची लागण झाल्याची नोंद नव्हती. प्रस्तुत घर हे स्वच्छ आणि अंतर्बाह्य निर्मळ होते. संसर्ग होण्यासारख्या ज्या ज्या बाबी वाटल्या, त्यांची  तपासणी केल्यानंतर त्यात काहीही दोष आढळला नव्हता. त्या निवासस्थानात एकमेव आगंतुक व्यक्ती दिसली, ती म्हणजे ती स्वयंपाकीण बाई. तिने स्वयंपाक करतांना अन्न हाताळले होते, या प्रकरणात त्रास झालेल्या कुटुंबातील सर्वजणांनी ते खाल्ले होते. मग अचानक आजार उद्भवला आणि ती बाई निघून गेली. तिचे असे अचानक गायब होणे कोणत्या अशा वेगळ्या परिस्थितीमुळे झाले असावे ? उदा. एखादा हि-याचा कंठा गायब होणे …..या संदर्भात पोलीस किंवा अन्य कोणी चौकशी करणा-यांनी तिचा शोध घेणे जरूरीचे होते.
सोपरना या महिलेचे वर्णन देण्यात आले होते, वय अदमासे चाळीस, उंच, गबदुल शरीरयष्टी, काळेभोर केस, निळसर डोळे, भक्कम तोंड, जबडा. एक अत्यंत महत्वाचा शेरा  तिच्याविषयी मिळाला, की ती उत्तम स्वयंपाक करत असे. काहींच्याकडून असेही कळले, की तिच्या काम करण्याच्या सवयी अस्वच्छ होत्या. तसेच तिच्याशी बोलणे, संभाषण करणे कठीण असायचे. थोडी काय, ती बरीचशी गरम माथ्याची होती.
सोपर यांनी मग न्यूयॉर्कमधील रोजगार देणा-या संस्थांकडून, दलालांकडून  काही माहिती गोळा केली. या बेपत्ता स्वयन्पाकीणीने यापूर्वी नोकरी केलेली ठिकाणे, ज्या ज्या लोकांकडे तिने काम केले, त्यांचा शोध घेतला. असे मागे जाताजाता त्यांनी जवळपास दहा वर्षांचा इतिहास गोळा केला. आणि त्यांना असे गवसले, की तिने ज्या ज्या घरात काम केले होते, त्या त्या घरात विषमज्वराचा उद्रेक झाला होता. एक लक्षात आले, की एकही अपवाद मिळाला नव्हता.
आता सोपर यांच्या समोर प्रश्न उभा राहिला, की ही बया गेली असेल कुठे ?
तिचा मागोवा घेत असताना दोन वर्षांपूर्वी म्हणजे १९०४ मध्ये असे आढळले, की मेरीने लाँग आयलंडमधील  एका ठिकाणी काम केले होते. तिथे सात नोकरांपैकी चौघांना अचानक हा आजार झाला होता. त्या मागे जाताना १९०२ मध्ये मेन प्रांतातील डार्क हार्बरमध्ये एका उन्हाळी सुटीच्या निवासस्थानात मेरी काम करत असताना तेथील नउ माणसांपैकी सात जणांना विषमज्वराची बाधा झाली होती. एवढेच नव्हे तर तेथील एक प्रशिक्षित परिचारिका व तेथे पाहुण्या म्हणून आलेल्या एका महिलेची सुटका झाली नव्हती. १९०१ साली न्यूयॉर्क शहरात या तापाची लागण झाल्याची नोंद मिळाली पण तेथे ही बया होती की काय, याचा पुरावा मिळाला नाही. शहराच्या आरोग्य खात्याने त्या वेळी अस्वच्छ राहणी आणि कचरा हे निदान करून ते प्रकरण निकालात काढले होते.
मेरी आणि सोपर हे सामोरासमोर येईपर्यंत काही महिने गेले. मध्यंतरी सोपर यांचा शोध रोजगार विनिमय केंद्राच्या माध्यमातून चालू होता. त्यांच्या मुलाखती स्थानिक वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्या होत्या आणि नेहेमीप्रमाणे लोकांनी त्या वाचल्या होत्या आणि ते लवकरच विसरून गेले होते. वॉरेन कुटुंबीय आपली सुटी संपवून आपल्या घरी परतले होते. हवामान थंड झाले होते आणि घरही रिकामे पडले होते.
परंतु डॉ. जॉर्ज सोपर यांनी या प्रकरणाची फाईल बंद केली नव्हती. मेरीची भेट मिळाली तर त्याचा छडा लागेल अशी अंधुकशी आशा त्यांना होती. अंधुक म्हणण्याचे कारण सांगतो. त्या काळात हा आजार काही विशिष्ट सूक्ष्म संसर्गजन्य जंतूंच्या प्रादुर्भावामुळे होतो, असे नुकतेच एका संशोधनावरून कळले होते. तरी त्याची साथ पसरण्याचा संबंध केवळ अस्वच्छ राहणीमान, आणि ते गरीब लोकांचे दाटीवाटीने व अनारोग्य स्थितीत राहणे, याच्याशी लावला जात होता. उच्च वैद्न्यानिक शिक्षण घेतलेल्या लोकांचाही असाच समज होता. सांडपाण्यातून उद्भवणा-या वायुमुळे हा ताप येतो, असे संशोधन नुकतेच प्रसिद्ध झाले होते. समाजात यावरून सुधारणा होउ लागून स्वच्छ व निर्मळ पिण्याचे  पाणी, काळजी पूर्वक बनवलेले दुग्ध्दजन्य पदार्थ, सांडपाणी व कच-याची अधिक परिणामकारक विल्हेवाट आणि स्वयंपाक गृहातील सुधारित रचना तसेच उपकरणाच्या माध्यमातून खाद्यपदार्थ हाताळणे सुरू झाले होते. १९०६ मध्ये अमेरिकन काँग्रेसने शुद्ध अन्न व औषधांचा एक कायदा जारी केला होता. केलॉग यासारख्या उद्योजकांनी आपल्या खाद्य पदार्थांतील शुद्धता हा एक महत्वाचा घटक मान्य केला होता. आजारी लोक आणि ज्यांना हा आजार होण्याचा संभव असतो, असे स्थलांतरित लोक यांना संसर्ग टाळण्यासाठी परस्परांपासून वेगळे ठेवण्यात यावे हे मान्य होउन तशी व्यवस्था होत होती. मेरी मेलोनच्या बाबतीतील ही घटना काहीशी नवीन व वेगळी दिशा दाखवणारी होती. वॉरेन कुटुंब काय किंवा अन्य लोकांना या तापाची लागण त्याअगोदर झालेली नव्हती, तसेच त्यांच्यापैकी कुणीही हा ताप आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेला नव्हता, हे सोपर यांच्या लक्षात आले होते. मग एखाद्या निरोगी पण आजाराची ‘ वाहक ‘  असलेल्या व्यक्तीमुळे हा आजार तर उद्भवलेला नसेल ना, अशी सोपर यांच्या मनात डोकावली होती.
चटकन फैलावणा-या रोगांच्या साथीविषयक (epidemiology) नवीन अभ्यासात वाहक ही अत्यंत महत्वाची संकल्पना होती. पण हा सिद्धांत अमेरिकेत त्यावेळी सिद्ध  झाला नव्हता. जर्मनीमध्ये मात्र डॉ. रोबर्ट कोच यांनी एका बेकरीच्या ग्राहकांना वारंवार होणा-या विषमज्वराचे निदान करण्याचा प्रयत्न केला होता. बेकरी स्वच्छ होती. तिला होणारा पाणीपुरवठाही दुषित नव्हता. तरीही ग्राहकांना हा आजार का होत होता ?  डॉ.कोच यांनी बेकरीच्या मालकिणीला विचारले असता, तिने आपल्याला विषमज्वर काही वर्षांपूर्वी झाल्याचे आणि आपण त्यातून पूर्णपणे  बरे झाल्याचे सांगितले होते. तिची तपासणी केल्यावर डॉ. कोच यांना असे आढळले होते, की तिच्या या आजाराची लक्षणे दिसत नसली आणि ती बाह्यतः काम करण्यास सक्षम भासत असली, तरी तिच्या शरीरात विषमज्वराचे जंतू अजूनही आहेत आणि ती ते गुदद्वाराच्या  वाटेने  बाहेर टाकत असते. तसेच आपल्या अस्वच्छ हातांच्याद्वारा त्यांचा प्रसार होत असतो. हा एक क्रांतीकारक शोध होता. ही बातमी अमेरिकेत न्यूयॉर्कपर्यंत पोचण्यास फार वेळ लागला नाही. वैद्यकीय जगात साहजिकच चर्चा होत होती. डॉ. सोपर यांच्या वाचनात डॉ. कोच यांनी यासंबंधात केलेल्या भाषणाचा मसुदा आला होता. त्यावरून सोपर यांना एक धागा सापडला होता, की आयस्टर बे येथील मूळच्या स्वच्छ व सुनियोजित घरात कुणा मेरी मेलॉनच्या आगमना नंतर विषमज्वर पोचला होता. डॉ.कोच यांच्या बेकरी मालकिणीसारखा विषमज्वराचा   कोणीही मानवी वाहक अद्याप अमेरिकेत सापडला नव्हता. आता डॉ. सोपर यांना मेरी मेलॉनचे गूढ  उकलण्याची निकड भासू लागली. कुठे असेल बरे ती ?
त्या वेळी एक प्रकारचे धामधुमीचे वातावरण होते. सन १९०० साली शिकागो शहरात जागतिक जत्रा भरली होती. त्यामुळे युरोपियन सत्ताधीशांच्या दृष्टीने अमेरिकेचे स्थान एक बलाढ्य शक्ती म्हणून उंचावले होते. लोकांचे इकडे तिकडे जाणेयेणे वाढले होते. साथींच्या रोगाशी टक्कर देण्यात मोठी मजल मारली जाउन रोगाची साथ ही शहरवासियांना लाजीरवाणी वाटू लागली होती. या गोष्टी जुन्या जगातील ओंगळ सवयी व परिस्थितीमुळे होत असून आता सुधारलेल्या  महानगरात असे घडले तर ते आरोग्य खात्याचे अधिकारी चालू देणार नव्हते.
डॉ. सोपर यांचे दैनंदिन काम एखाद्या गुप्तहेरासारखे चाललेले होते. मेरीबाबतची त्यांची धारणा जसजशी तीव्र होउ लागली, तसे त्यांना वाटू लागले, की यात आपल्याला काहीतरी घबाड मिळणार.
तरी सोपर आणि मेरी यांची गाठभेट होण्यास आणखी काही महिने लागले. अखेरीस मार्च १९०७ मध्ये ते दोघे समोरासमोर आले. त्याचे असे झाले, की न्यूयॉर्क शहरातील पार्क अवेन्यू भागात एका कुटुंबात विषमज्वराची लागण झाल्याची बातमी सोपर यांच्या कानावर आली. सुरुवातीला दोन व्यक्तींना ताप आला. एक मोलकरीण व घरमालकाची विशीतील सुंदर कन्यका तापाने फणफणून अंथरुणाला खिळल्या होत्या. दोन तीन दिवसात मुलीचे निधन झाले. आणि लवकरच तिची सुश्रुषा करणारी तिची परिचारिका तापाला बळी पडली. घरावर दुःखाचा डोंगर कोसळला.
या घटनेचे सोपर यांच्याकडे पोचलेले वृत्त दुःखद होते. तथापि हे ऐकल्यावर सोपर यांच्यातला शेरलॉक होम्स जागा झाला. आणखी विशेष म्हणजे या बातमीतील नवीन स्वयंपाकिणीचे वर्णन तर मेरी मेलॉनच्या वर्णनाशी मिळतेजुळते होते.
सोपर यांच्यातील शोधक उफाळून आला. ते तडक तिथे पोचले. या बाबतीतील वादग्रस्त स्वयंपाकीण खरोखरच मेरी मेलॉन होती. तिला या परोपकारी स्वभावाच्या डॉक्टरच्या कळकळीचे काही कौतुक नव्हते.  ती काम करत असतानाच सोपर तिच्यासमोर उभे ठाकले. आणि त्यांनी तिला सर्वांसमक्ष तीच विषमज्वराच्या प्रसाराचे मूळ असल्याचे सांगून टाकले. मेरीने त्यांच्या या आरोपाला काडीचीही किंमत न देता नाराजी दाखवली. यापेक्षा काहीही न बोलण्यास तिने नकार दिला. डॉ. सोपर यांना मेरी मेलॉन  नुसती भेटली होती. आता तिच्या बाबतीत त्यांना जे काही करायचे होते, ते करण्यास पुढे किती काळ लागला आणि त्यात त्यांना किती कटकटीना   तोंड द्यावे लागले, ते पुढील प्रकरणात पाहू.
– भाग २ –
एकोणीसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत विषमज्वर म्हणजे काय हे समजलेले नव्हते. असंख्य लोकांचा त्यापायी बळी जात होता. त्या काळी लोकांना यमसदनाला धाडणारे अनेक रोग व आजार होते. टायफस ( एक वेगळा आजार – माशा व उवा यांच्या द्वारा याचा प्रसार होतो.) , कॉलरा, पिवळा ताप, देवी, गोवर, घसा सुजणे, फ्ल्यू, स्कारलेट फिवर आणि विषमज्वर – हे एकाहून एक भिन्न असे ओळखले जाणारे आजार होते. क्वचित स्नान करणा-या, कुपोषण पाचवीला पुजलेल्या आणि गरीबीचे जीणे जगणा-या लोकांच्या घरात यापैकी एखादा तरी पाहुणा हमखास असायचा. सतत येणा-या रोगांच्या साथी, दुष्काळ, प्लेग, अत्यंत खालावलेली परिस्थिती आणि प्राथमिक आरोग्य सेवेचा अभाव यात विषमज्वरासारख्या एका आजाराची भर पडली काय, नि नाही काय, सारखेच म्हणा.
१८८० मध्ये म्हणजे मेरी मेलॉन आयस्टर बेमध्ये कामाला लागण्यापूर्वी फक्त सव्वीस वर्षांपूर्वी , कार्ल हेरबर्थ नावाच्या संशोधकाने विषमज्वराशी संबंधित अशा विशिष्ट सूक्ष्म जंतूंना वेगळे काढून विषमज्वर आणि इतर तापाचे  सूक्ष्म जंतू यातील फरक दाखवून दिला होता. तरीही त्यावर उपाय सापडला नव्हता. त्यातून अगदी सैन्याचीही सुटका झाली नव्हती. द. आफ्रिकेविरुद्धच्या युद्धात ब्रिटीशांच्या सैन्यातील तेरा हजार सैनिकांचा या तापाने मृत्यू झाला होता. प्रत्यक्ष रणभूमीवर आठ हजार सैनिक मरण पावले. अगदी अलीकडे १९४८ सालापर्यंत कोणताही डॉक्टर विषमज्वरावर कसलाही वेगळा इलाज करत नव्हता. रुग्णाला अंथरुणावर पडून ईश्वराचे नाव घेण्याशिवाय दुसरा उपाय नसे. नंतर ती  प्रतिबंधक लस आली. तरी अनेक डॉक्टर त्या लशीचा कितपत प्रभाव होईल की नाही या विषयी साशंक असायचे. तोवर प्रतिजैविक औषधांचा शोध लागला नव्हता.  १८६५ व १८८५ मध्ये या आजाराचा मोठा उद्रेक झाला. अमेरिकेतील प्रमुख शहरातील असंख्य नागरिकांचे बळी गेले. केवळ न्यूयॉर्क शहरात १९०६ साली विषमज्वराच्या ३००० केसीसची नोंद झाली. ६०० कुटुंबांना याची बाधा झाली.
विषमज्वर हा संसर्गजन्य आजार साल्मोनेला टायफी (salmonella typhi)  या सूक्ष्म जंतूंमुळे होतो. सर्वसामान्यपणे पाहता, ज्या अन्न व पाण्यात माणसाची विष्ठा व मूत्र मिसळले गेले आहे, ते पोटात गेल्यावर हा ताप येतो. दूषित पाणी हे अशा संसर्गाचे मूळ आहे. टोयलेटमधील व घराबाहेरील पाणी जेव्हा स्नानासाठी व पिण्यासाठी वापरले जाते, तेथे विषमज्वराची लागण झाल्याचे आढळून येते. खाडीतील दूषित पाण्यातील शिंपल्यातले मासे, कालवे खाल्ल्याने तो होउ शकतो. तसेच दुग्धजन्य पदार्थ तयार करताना त्या वेळी त्यांचा मैल्याशी संबंध आला तरी, ते घातक होउन ज्वराचा प्रसार होतो.
या शिवाय ज्या लोकांच्या शरीरात या तापाचे जंतू ठाण मांडून बसलेले असतात, तोवर ते तुम्हाला हा ताप देऊ शकतात. काही रोगी (सुमारे दहा टक्के )  आपल्या विष्ठेतून ताप आल्यावर पुढील तीन महिने तापाचे जंतू बाहेर टाकत असतात. काही ( सुमारे दोन ते तीन टक्के) विषमज्वराचे कायम वाहक बनतात, त्यांच्या शरीरातील पित्ताशय (gallbladder) व पचन नलिकांमध्ये हे जंतू एखाद्या भाडेकरू पेन्शनरांसारखे ठाण मांडून राहतात. आजच्या आपल्या कहाणीतील मेरी मेलॉन ही अशा आयुष्यभराच्या वाहकांपैकी एक होती.
त्य काळात स्वच्छतेची, आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याची जाणीव निर्माण झाली नव्हती. गृहांतर्गत मैला, सांडपाणी वाहून नेण्याची नीट व्यवस्था झालेली नव्हती. एवढेच काय , नियमाने  आंघोळ करणे हा देखील नवा प्रघात येत होता. अमेरिकेत पूर्वीचे कित्येक लोक मोठ्या गर्वाने आपण वर्षातून एकदा आंघोळ करतो, असे सांगत. त्यांच्या म्हणजे अमेरिकन व युरोपीयनांच्या पुष्कळ अस्वच्छ  सवयी त्यांच्या पुढील पिढ्यात कायम राहिल्या. ( फ्रेन्च लोकांनी सुवासिक अत्तरे, तेले बनवण्यात आघाडी मारली, तर त्यात आश्चर्य कसले ?) कपड्याच्या उंच गळपट्ट्या, चेह-याची रंगरंगोटी, केसांचे टोप, फ्याशनच्या अनेक रिती त्या काळी विकसित झाल्या. यांचे कारण शरीरावरील अस्वच्छतेच्या खुणा, चेह-यावरील त्वचेच्या रोगाचे चट्टे, घाणीचा दुर्गंध हे सारे लपवण्यासाठी होते. मेरीच्या काळापूर्वी, काहीच वर्षे, केवळ बढाई मारण्यासाठी रविवारच्या स्नानाचा रिवाज पडला असावा. सततच्या थंड हवामानामुळे की काय, त्यांना पाण्याशी संबंध नकोसा वाटत असावा. पाणी हे सर्व आजारांचे मूळ आहे असा समज होता. त्यातूनच विषमज्वर, कॉलरा, असे सर्व आजार होतात  असे मानले जाई. त्यापेक्षा सर्वांगावर तेल चोपडणे, थंडीत लांब पायघोळ पोशाख वापरणे अशी प्रतिष्टीत लोकांची राहणी होती. थोडक्यात, या चुकीच्या राहणी मानामुळे विषमज्वराला कायमचे आमंत्रण मिळाले.
विषमज्वराचा प्रतिबंध करण्यासाठी आणखी एक उपाय म्हणजे, जे लोक अन्न बनवतात, त्यांनी आपले हात सदोदित,  विशेषतः मलःनिस्सारणानंतर कसोशीने साफ करणे , हे आवश्यक आहे. आपल्या शरीरात विषमज्वराचे जंतू चुळबुळ करत असतील, तर ती एक बाब आहे. पण ते जंतू एका माणसा कडून दुस-याकडे नेणे ही गंभीर बाब आहे. आपल्या हातांच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले गेले नाही, तर ते सहज शक्य होते. त्याच हातांनी न शिजवले जाणारे पदार्थ – सलाड, आईसक्रीम – बनवणे म्हणजे तर हद्दच झाली. न्यूयॉर्कमध्ये असे विनोदाने म्हटले जाई, की स्वच्छता गृहातून बाहेर आलेल्या माणसाने आपले हात शंभर टक्के धुतले आहेत, असा माणूस शोधून दाखवा.
ज्या महिलेचा आपण गेले काही महिने शोध घेत आहोत, तिच्यासमोर आज आपण खरोखर उभे आहोत, यावर क्षणभर डॉ. सोपर यांचा विश्वास बसत नव्हता. पण त्यांचा उत्साह, कामातील चिकाटी, आणि कळकळ उपयोगात आली नाही.
डॉ. सोपर यांच्याच शब्दात पुढील नाट्यमय प्रसंग पाहा :
” माझं मेरीबरोबरचं पहिलं संभाषण त्या घरातील स्वयंपाकगृहात झालं. या मुलाखतीची रीत काही वेगळी होती. मी शक्यतो  मुत्सद्देगिरीने बोलायचा प्रयत्न करत होतो. लोकांना आजारी पाडण्यात तिचा हात असल्याचा मला संशय येतोय आणि तिच्या मूत्र, विष्ठा व मल यांचे नमुने मला हवे आहेत, हे मला तिला सांगण  भाग पडलं. ”
इथे सोपर यांना पुढे जाणे शक्य व्हावे म्हणून त्यांनी काही सबबी सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या मनात पक्के ठसले होते, की मेरी हीच खुनी आहे. तेव्हा स्पष्ट बोलण्याशिवाय दुसरा मार्ग त्यांना दिसला नाही. पण मग मेरी काही कमी नव्हती. ती कुठली  वैद्यकीय चाचणीला राजी होणार ? तिने सरळ तिथलीच मासे कापायची लांब सुरी हाती घेतली आणि सोपर यांच्या दिशेने ती उगारली. सोपर यांनी त्या अरुंद खोलीतून तत्काळ पळ काढला, हे वेगळे  सांगायला हवे काय ?
आपण देऊ केलेल्या विनामूल्य वैद्यकीय चाचणीला मेरीने साफ धुडकावून लावल्याचे सोपर यांना वाईट वाटले. काहे दिवसांनी त्यांनी तिला भेटण्याचा पुनः प्रयत्न करून पाहिला. पण व्यर्थ. मेरी अजिबात राजी नव्हती. ती पार्क अवेन्यूमधील आपले काम करत राहिली. विशेष म्हणजे तिच्या मालकानेही तिला काढून टाकले नाही. हा तिच्या पाक कौशल्याचा भाग होता, हे नक्की.
मग मात्र सोपर महाशयांनी आपली ही डिटेकटीव्हची भूमिका सोडून दिली आणि त्यांनी या प्रकरणाचे पिल्लू शहराच्या अधिका-यांकडे सोपवले. त्यांनी न्यूयॉर्क शहराच्या आरोग्य खात्याकडे निर्वाणीचे पत्र धाडले आणि अशी शिफारीश केली, की मेरी मेलॉनला ताबडतोब त्याब्यात घ्यावे.
आरोग्य खात्याने पार्क अवेन्यूच्या त्या घराजवळ एक रुग्णवाहिका पाठवली, तीन पोलिसांनी घराला गराडा घातला, शक्य ते सारे सुटकेचे मार्ग बंद केले आणि डॉ. बेकर या महिला डॉक्टरनी चौथ्या पोलिसाला घेऊन दारावरची घंटा वाजवली. खुद्द मेरीने दार उघडले आणि हे लोक पाहून दार बंद करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसाने पाय दाबून तिचा प्रयत्न हाणून टाकला. मेरीने आत पळ काढला. ती किचनमध्ये जाउन कुठे तरी लपून बसली. जवळपास तीन तासांच्या शोधानंतर मेरीला पकडण्यात यश आले.  पाच बलवान पोलीस व डॉ. बेकर यांनी अखेर तिला रुग्णवाहिकेत बसवले. रुग्णालयाच्या वाटेवर डॉ. बेकर या मेरीच्या अंगावर बसून राहिल्या होत्या.
मेरीला आता न्यूयॉर्क आरोग्य खात्याच्या सूक्ष्मजीवाणूशास्त्राच्या प्रयोगशाळेच्या ताब्यात देण्यात आले. त्यांना जे नमुने हवे होते, ते मेरीला द्यावे लागले.  तिच्या विष्ठेच्या पहिल्याच नमुन्यात विषमज्वराचे जंतू असल्याचे आढळले होते. जणू मधमाशांचे पोळे वाटावे. तिच्या मूत्रात मात्र विषमज्वराचे जंतू सापडले नाहीत. प्राथमिक  चाचणीचा   अहवाल हाती आल्यावर तिची सखोल चाचणी करण्यात आली. त्यात असे आढळले, की तिच्या पित्ताशयात विषमज्वराच्या जंतूंचे आगर आहे. मेरीने आपला पित्ताशय  काढून टाकण्याच्या सोपर यांच्या सूचनेस जोरदार विरोध केला.
अखेरीस १९०७ मध्ये असा निर्णय घेण्यात आला, की तिने न्यूयॉर्कजवळील नॉर्थ ब्रदर बेटावरील रिव्हर साईड रुग्णालयातील प्रांगणात एका वेगळ्या घरात राहावे. त्यात राहण्याच्या सर्व सुविधा होत्या. हे तिचे असे जगापासून विभक्त राहणे किती दिवस असेल, हे ठरलेले नव्हते. मेरीवर कोणताही गुन्हा केल्याचा आरोप ठेवला नव्हता. कसलाही खटला चालवला गेला नाही, किंवा तिला कोणतीही सजा देण्यात आली नाही. एका चित्रकाराने रुग्णालयात येउन तिचे चित्र काढले व ते वृत्तपत्रात  प्रसिद्ध झाले. सा-या पत्रकारांनी तिचे टायफॉईड मेरी असे नामकरण केले
मेरी मेलॉन एखाद्या कैद्याप्रमाणे नॉर्थ ब्रदर बेटावर राहत होती. तिला कदाचित असे आयुष्यभर राहावे लागणार होते. या अभागी महिलेवर आरोग्य खात्याच्या अधिका-यांनी अनेक उपचार केले. तिचे ते विष्ठेतून विषमज्वराचे जंतू बाहेर जाणे बंद होतील, असेही प्रयत्न केले गेले. असाही एक प्रयत्न करण्यात आला, की तिच्या शरीरातील विषमज्वराच्या जंतूंची निर्मितीच बंद व्हावी, पण यश मिळाले नाही. मेरी मेलॉन अखेरपर्यंत विषमज्वराची जिवंत बखर बनून राहिली. या आजाराच्या इतिहासातील तो एक नवीन चमत्कार होता. अनेक डॉक्टर तिला बघायला येत होते, नवीन उपाय सुचवत होते. हे डॉक्टर्स , नर्सेस जे काही बोलत, ते मेरी सारे ऐकत असे. पण तिने आपला पित्तकोश काढून टाकण्यास सक्त नकार दिला. या समस्येवर तोच एक उपाय होता, की नाही, यावर कुणी खात्री देत नव्हता. ती एक चांगली कल्पना होती, एवढेच. मेरीच्या बाबतीत कसलीही सहानुभूती नसलेल्या शल्यविशारद जेलर लोकांकडे तो एक पर्याय होता. असे म्हणतात, की ती तेथील रुग्णांमध्ये तितकीशी लोकप्रिय नव्हती. शेवटी ती एक मामुली स्वयंपाकीण बाई  होती.
या सा-या प्रकरणात जॉर्ज फ्रान्सिस ओनील हा वकील कसा काय आला, हे मला सांगता येणार नाही. राज्याच्या विधीमंडळाच्या जागेसाठी तो दोनदा उभा राहीला होता. आयरिश लोकांच्या प्रकरणात तो प्रामुख्याने भाग घेत असे. राज्याच्या आरोग्यविषयक बाबीत तो काहीसा माहितगार होता. मेरी मेलॉनला काही मदत व्हावी आणि आपल्यालाही प्रसिद्धी मिळावी, असा त्याचा छुपा प्रयत्न असावा.
दोन वर्षे नॉर्थ ब्रदर बेटावर एक प्रकारच्या बंदीवासात घालवल्यावर मेरी मेलॉनने या जॉर्ज ओनीलच्या मदतीने न्यायालयात असा दावा केला, की तिला असे पकडून ठेवण्याचा कसल्याही प्रकारचा कायदा नाहीये. तोपर्यंत म्हणजे २९ जून १९०७ पर्यंत काही घडामोडी झाल्या त्या मेरीच्या पथ्यावर पडल्या. एकट्या न्यूयॉर्क राज्यात विषमज्वराचे वाहक म्हणून पन्नासावर व्यक्ती सापडल्या आणि त्यांच्यापैकी कुणालाही नॉर्थ ब्रदर बेटावर अथवा अन्यत्र कुठेही तुरुंगात ठेवेलेले नव्हते. दोनच वर्षांपूर्वी मेरीमुळे उद्भवलेला अनर्थ लोकांच्या स्मरणातून काहीसा दूर झाला होता. तिला बंदीवासात ठेवावे असे म्हणणारी तज्ज्ञ मंडळी आता तिच्याविषयी सहानुभूतीने वागू लागली. मेरीच्या कहाणीला एक वेगळे वळण लागत होते.
– भाग ३ –
१२ एप्रिल १९०९ रोजी न्यायालयात मेरी मेलॉन अका टायफॉईड मेरीने आपले हस्तलिखित प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात तिने लिहिले होते,
” मला विषमज्वराच्या रुग्णांबरोबर वेगळे ठेवलेले नाही…. इ बेटावर कोणताही विषमज्वराचा रुग्ण नाही…. या बेटावर राहण्यासाठी मला काही  पैसे देणे किंवा कोणत्याही वैद्यकीय मदतीची आवश्यकता नसताना एखाद्या कैद्यासारखे वेगळे ठेवणे यापलीकडे बोर्ड अधिका-यांनी काहीही केलेले नाही…. मी प्रथम येथे आले, तेव्हा त्यांनी माझ्या रक्ताचे व विष्ठेचे दोन दोन नमुने घेतले. ( त्यानंतर ) जूननंतर आठवड्यातून तीनदा सोमवार,
बुधवार, शुक्रवार, असे रक्ताचे नमुने घेत होते, त्यात विष्ठेचे आठवड्यातून दर बुधवारी घेत होते…..”
मध्यंतरी मेरी आपल्या विष्ठेचे नमुने खासगी प्रयोगशाळेत पाठवून आरोग्य खात्याच्या चुका दाखवण्याचा प्रयत्न करत होती. काही वेळा त्यात विसंगती दिसत होती. या प्रयोगशाळेच्या निकालात विषमज्वराचा पत्ता नव्हता.
मेरीने आपल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या डोळ्याच्या आजाराविषयी तक्रार नोंदवली. त्याबाबतीत तिच्याकडे आरोग्य खात्याने दुर्लक्ष केले असे तिचे म्हणणे होते. तसेच विषमज्वराचे जंतू काढून टाकण्यासाठी आपल्याला युट्रोपिनसारखी काही औषधे दिली असे तिने सांगितले. या व  अशा औषधाच्या सतत वापरामुळे आपल्या मुत्रपिंडावर काही दुष्परिणाम तर झाला नसेल ना, अशी तिने भीती व्यक्त केली. मेरी रुग्णालयातील परिचारिकांचे बोलणे ऐकत होती, ते  डॉक्टरांनी सांगीतलेल्याशी पडताळून पहात होती आणि उपचाराविषयी आपले स्वतःचे असे मत बनवत होती.
मेरीची ब्याद न्यूयॉर्क राज्यातून दुस-या कुठल्या तरी राज्यात जावी, असे प्रयत्न राज्याचे आरोग्याधिकारी करत असल्याचा आरोप मेरीने करून तसे होउ न देण्याची तिने  न्यायालयाला विनंती केली. मेरीच्या वकिलांनी तिची बाजू मांडताना तिला स्वातंत्र्य द्यावे अशी विनंती केली. तिची प्रकृती उत्तम असताना तिला कोणत्याही कायद्याच्या आधाराशिवाय असे एकाकी अवस्थेत ठेवणे आणि तिला तिचा मुलाचा स्वयंपाकाचा पेशा करू न देणे म्हणजे तिच्या मानवाधिकाराचा भंग होतो आहे असे त्यांनी मांडले. ती ज्या घरात काम करत होती, तिथे विषमज्वराचा उद्भव होणे हा केवळ तेथील परिस्थितीचा परिणाम असून आपली अशील दुर्दैवी परिस्थितीचा निष्कारण बळी गेली असल्याचा दावा त्यांनी केला.
न्यायालयात आरोग्य खात्याचे डॉ. सोपर व रिव्हर साईड रुग्णालयाचे डॉ. वेस्ट मोरलंड  यांनी आपापली प्रतिज्ञापत्रे सादर केली आणि मेरी मेलॉन ही खरोखरच विषमज्वराच्या जंतूंचा संसर्ग झालेली असून आणि आठ वर्षांच्या काळातील सव्वीस तापाच्या साथीच्या प्रकरणात जबाबदार असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. तिला अटक करतांना झालेल्या झटापटीचा उल्लेख त्यांनी केला.
न्यायाधीशांनी असा निकाल दिला, की मेरी मेलॉनला बेटावर ठेवण्यात आरोग्य खात्याने योग्य तेच केले आहे. मेरीच्या तेथील राहण्याच्या व्यवस्थेची पाहणी करावी आणि त्यात योग्य ती सुधारणा करावी.
याप्रमाणे मेरीला नॉर्थ ब्रदर बेटावर परत धाडण्यात आले. संतप्त व निराश झालेली मेरी बेटावरील आपल्या घरात परतली.
तरी तिला एक मददगार भेटला. रुबेन ग्रे या मिशिगनमधील नागरिकाने आरोग्य आयुक्तांना पत्र लिहून तिला मिशिगनमध्ये गुपचूप पाठवण्याची विनंती केली. या ग्रेमहाशयांना मेरीशी विवाह करण्याची इच्छा होती. बंदीवासात ठेवलेल्या मेरीविषयी त्याला अनुकंपा निर्माण झाली होती. पण आयुक्तांनी ही मागणी असंभाव्य ठरवून फेटाळली.
या सर्व न्यायालयीन प्रकरणातून मेरीला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. वृत्तपत्रांनी तिच्यावर सहानुभूतीचा वर्षाव केला. मेरीचे मानवी हक्क त्यांना महत्वाचे वाटले होते. तिची एका वृत्तपत्रात मुलाखतही आली होती. जर का तो परमेश्वर स्वर्गात असेल, तर मला कसाही होईना न्याय मिळाल्यावाचून राहणार नाही, असे तिने म्हटल्याचे प्रसिद्ध झाले. आपल्याला एका महारोग्यासारखे ठेवले आहे, आपल्या सोबतीला फक्त एक कुत्रा आहे, असे तिने पत्रकारांना सांगितले होते. तिने असेही म्हटले होते, की मीच या विषमज्वराच्या जंतूंचा प्रसार करते, हा दावा निखालस खोटा आहे.मी एक निर्दोष स्त्री आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. तरी मला एखाद्या गुन्हेगार बंडखोरासाराखी वागणूक दिली जात आहे. हा अन्याय आहे. ख्रिश्चन समाजात एका निरपराध व निराधार महिलेला असे वागवले जात आहे.
न्यायालयीन सुनावणीचा वृत्तांत वृत्तपत्रात देताना पत्रकारांची सहानुभूतीची भूमिका दिसत होती. पण न्यायालयाच्या निकालावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही.
तरीही १९१० मध्ये नवीन आलेल्या आरोग्यआयुक्तांनी दबावाखाली आणि  मेरीच्या एकंदर व्यवस्थेला कंटाळून मेरीच्या मुक्ततेचा आदेश दिला. या  आदेशात त्यांनी, तिने स्वच्छता पाळावी आणि लोकांसाठी अन्न बनविण्याच्या कामापासून तिने दूर राहिले पाहिजे, असे म्हटले होते. ती एक स्वतः उत्तम स्वयंपाकी आहे आणि तिच्या पेशावर बंदी आणल्यावर तिने काय करावे, हे मला कळत नाही. तिने मला नियमित भेटण्याचे आणि पुनः स्वयंपाकी म्हणून काम न करण्याचे आश्वासन दिले असून, मी तिला जमेल तशी मदत करणार आहे, असे आयुक्तांनी लिहिले होते.
मेरी आपला पेशा बदलणार होती आणि आयुक्तांना नियमाने आपली माहिती देणार होती. एका पत्रकाराने मेरी आता काय करणार आहे, हे विचारल्यावर, आयुक्त म्हणाले, की मला माहित नाही… मी तिला काही अन्य स्थान  देण्याचा प्रयत्न करत आहे. तिला एक संधी दिलीच पाहिजे. तिचा काहीही दोष नसताना तिचा खूप छळ झालेला आहे, असे मला वाटते. जनतेच्या भल्यासाठी तिला तुरुंगवास भोगावा लागला आता जनतेने तिची काळजी घेतली पाहिजे. या प्रकरणात काहीतरी देवाणघेवाण झाली पाहिजे.
याचा अर्थ असा होता, की आयुक्तांनी मेरीचे भवितव्य जनतेवर सोडून दिले होते. प्रत्यक्षात  मेरीला एखाद्या हार्डवेअर दुकानातही नोकरी देण्यास पुढे आले नाही. अगोदर स्त्रियांसाठी नोक-या कमी होत्या. आयुक्तसाहेबांच्या मनात जी काही देवाणघेवाण अथवा जनतेने काही केले पाहिजे   इ. होते, ते तसेच राहिले. असे म्हणतात, की आरोग्य खात्याने मेरीसाठी एक धोब्याची नोकरी आणली होती. पण मेरीला ती आपल्या पात्रतेहून कमी दर्जाची वाटली.
१९११ च्या डिसेंबरमध्ये मेरीने आपल्या वकिलांमार्फत अशी घोषणा केली, की ती शहर, डॉक्टर्स पार्क, सोपर, आरोग्यआयुक्त  इत्यादी संबंधीतांविरुद्ध पन्नास हजार डॉलर्स नुकसानभरपाईचा दावा करणार आहे. कारण त्यांच्यापायी ती आपला स्वयन्पाकिणीचा पेशा करू शकत नाही. तिची आपला उदरनिर्वाह करण्याची संधी कमी झाली आहे. पण हा दावा न्यायालयीन सुनावणीपर्यंत पुढे आलाच नाही.
मेरीने हळूहळू आरोग्य खात्याला आपली माहिती देणे बंद केले. ती गायब झाली. तिने पुनः आपल्याला ज्यात गती आहे, ज्यातून पै पैसा मिळतो, ते आपले स्वयंपाकाचे काम करण्यास सुरुवात केली. पण ते इतके सहज सोपे नव्हते. न्यूयॉर्कमधील बहुतेक साधन कुटुंबे आपले नोकर दोन तीन  एजन्सीकडून मिळवत असत. आणि सोपर यांच्यामुळे सर्व संस्थांना मेरीचा चेहरा परिचयाचा झाला होता. तिचे आडनाव मेलॉन हेसुद्धा वापरून चालणार नव्हते. मग तिने खोटे नाव धारण केले आणि श्रीमंतांच्या  घरी न जाता, जिथे मिळेल त्या पगारावर काम पत्करले. एकामागून एका ठिकाणी ती नोक-या बदलत राहिली. कधी हॉटेलमध्ये, कधी विश्रांतीधाममध्ये , तर कधी जे कोणी तिच्या नावाची वा पूर्वायुष्याची चौकशी करत नव्हते, त्यांच्याकडे ती काम करत राहिली. अशा प्रकारे मेरी न्यूयॉर्क आणि परिसरात कोणत्याही अडथळ्याविना पाच वर्षे काम करत होती. ब्राऊन, ब्रेहौफ आणि इतर अनेक खोट्यानाट्या नावांनी मेरी मेलॉन १९१५ पर्यंत नोकरी करून आपले पोट भरत होती.
मार्च १९१५ मध्ये म्यानहटन येथील स्लोन हॉस्पिटल या स्त्रियांच्या रुग्णालयात अचानक विषमज्वराचे संकट ओढवले. थोडेन थोडके नव्हे तर वीस पंचवीस लोक, त्यात डॉक्टर्स, नर्सेस होत्या, तापाने आजारी पडले आणि दोघा जणांचा तर बळी गेला. यानंतरचे वृत्त आपण डॉ. सोपर यांच्या शब्दात वाचूया.
” एके दिवशी मला स्लोन हॉस्पिटलच्या प्रमुख डॉक्टरांचा दूरध्वनी  आला. त्यांनी मला रुग्णालयात काही तातडीच्या कामासाठी बोलावले होते. मी जेव्हा तिथे पोचलो, तेव्हा ते म्हणाले, की त्यांच्याकडे विषमज्वराच्या विसाहून अधिक केसेस झाल्या आहेत. नोकरवर्गाने चेष्टेने एका स्वयन्पाकिणीचे नाव टायफॉईड मेरी असे ठेवले आहे. नेमकी ती त्या सुमारास कुठे बाहेर गेली होती. पण तिच्या हस्ताक्षरावरून ती तीच स्त्री आहे काय, असे विचारत त्यांनी माझ्या हातात एक पत्र ठेवले. मी लागलीच ते हस्ताक्षर ओळखले. त्यांनी केलेल्या वर्णावरून ती तीच असल्याचे ताडले. मी त्यांना आरोग्य खात्याला कळवायला सांगितले आणि मेरी पुनः चतुर्भुज झाली. तिची रवानगी परत नॉर्थ ब्रदर बेटावर करण्यात आली. ”
डॉ. सोपर आणि मेरी पुनः प्रकाशात आले. विषमज्वराची वाहक ही संकल्पना आता जुनी झाली होती. अशा केसीसचा पत्ता लावणे, रक्त, मूत्र, विष्ठा यांचे नमुने तपासणे, ही सर्वसामान्य रीत झाली होती.
वृत्तपत्रांनी ही बातमी देताना सोपर यांच्या अंदाजाला तितकेसे महत्व दिले नव्हते.  तापाच्या साथीचा जोर वाढल्यावर आरोग्य खात्याने रुग्णालयाच्या सर्व नोकरवर्गाच्या विष्ठेचे नमुने घेतले. त्यात इतरांबरोबर मेरीनेही ( आता ती तेथे काम करत होती.) आपला नमुना दिला. सर्व निकाल हाती आले, तेव्हा तिच्या नमुन्यात विषमज्वराचे जंतू सापडले होते आणि मेरी बेपत्ता झाली होती.
पुनः पोलिसांना पाचारण करण्यात आले. सर्वांना गुंगारा देउन पळालेली मेरी अखेरीस एका ठिकाणी सापडली. या वेळी तिने प्रतिकार केला नाही. ती पोलिसांच्या स्वाधीन झाली. मेरीच्या आजवरच्या नाटकाचा तो अखेरचा अंक होता.
आता ती थकली होती. तिचे वय उतरणीला लागले होते. सुरुवातीच्या तीन वर्षातला बंदिवास, चाचण्या, खाण्यास सांगतील तेव्हा खाणे, झोपायला सांगतील तेव्हा झोपणे, अनेकांची तिच्यावरची पाळत, यानंतरची पाच वर्षे तिची महानगराबाहेरच्या कोप-यातल्या किचनमध्ये गेली होती. विनवण्या करून तिला खालच्या स्तरावरच्या लोकांकडून कामे मिळवावी लागली होती. या छोट्या छोट्या घरात कामे करतांना तिला पूर्वीचा आनंद मिळत नव्हता. कधी कधी स्वयंपाक करताना साफसफाई, कपडे धुणे, भांडी घासणे अशी कामे करावी लागत होती. आता लाभलेले मालक तिला मुक्त हस्ते खाणेपिणे देत नव्हते. अन्नही तितकेसे चांगले नसायचे. या सा-या प्रकाराचा नि मुख्य म्हणजे सततच्या लपंडावाचा तिला वीट आला होता.
त्या मानाने तिला आता नॉर्थ ब्रदर बेटावरचे वातावरण बरे वाटले. तिच्याकडून जे काही अजाणतेपणे झाले होते, ते तिला कळले होते. या पुढची तेवीस वर्षे मेरी तेथेच राहिली. या वेळी पकडताना तिने कोणताही विरोध केला नव्हता. ती आपल्या एका खोलीच्या कुटीत परतली. बाह्य जगापुढे तिने जणू शरणागती पत्करली होती. मेरीला त्या रुग्णालयातील प्रयोग शाळेत तांत्रिक सहाय्यकाची नोकरी देण्यात आली. अखेरपर्यंत तिने आपण विषमज्वराच्या साथीचे कारण होतो, हे कबूल करण्यास नकार दिला. त्यावर तिने ना कधी कुणाशी चर्चा केली, किंवा आपल्या समक्ष  ना कुणाला त्यासंबंधात बोलू दिले. अगदी आपल्या मित्रमंडळीतही तिने आपला भूतकाळ, आपले खासगी आयुष्य यावर चकार शब्द उच्चारला नाही. नशीबावर हवाला टाकल्याचे भासवीत तिने आपले अखेरचे आयुष्य विणकाम, शिवणकाम करण्यात घालवले. नाही म्हणायला कधी कधी तिने केक बनवून बेटावरच्या स्त्रियांना विकले. आपल्या मर्जीतल्या सहका-यांना ती चहा बनवून देत असे.
१९३२ च्या नाताळात मेरीला हृदयविकाराचा झटका आला. ती हळूहळू अंथरुणाला खिळली. तोपर्यंत न्यूयॉर्क शहरात विषमज्वराचे २९० वाहक असल्याची माहिती मिळाली होती. या ऐतिहासिक यादीत मेरीचे नाव अकारविल्हे छात्तीसावे असले तरी ती प्रथम सापडलेली वाहक होती. मेरी मेलॉनच्या नावावर विषमज्वराच्या त्रेपन्न केसीस व तीन मृत्यू नोंदले गेले आहेत. तरी अजाणता तिच्यामुळे असंख्य बळी गेले असतील.
मेरीचे निधन ११ नोव्हेंबर १९३८ रोजी झाले. मेरीला शांतपणे मृत्यू आला. तिच्या अंत्यसंस्काराच्या वेळी मोजून नउ व्यक्ती हजर होत्या. न्यूयॉर्कच्या आरोग्य खात्यातून कोणीही आले नव्हते. कदाचित त्यांना अजूनही या आगळ्यावेगळ्या व्यक्तीमत्वाची भीती वाटत असावी.
संदर्भ व मुक्त रुपांतर :- (1) An Alarming History of Famous & Difficult Patients  by Dr. Richard Gordon,
(2) Typhoid Mary : An Urban Historical  by Anthony Bourdain)
मंगेश नाबर
७ कृष्ण बिल्डींग क्र. १, गोखले सोसायटी लेन, परळ, मुंबई ४०० ०१२

प्रमोद तांबे यांनी एक पाककृती पाठवली आहे.

पाणीपुरी,दहिपुरी,शेवपुरी,रगडापुरी


साहित्य व प्रमाण : पुदिना १ ते २ जुडया.कोथिंबीर १ जुडी,हिरव्या मिरच्या ४ ते ५,आले एक तुकडा,कढीपत्ता ५/६ पाने,खजूर २५० ग्राम,चिंच  २५० ग्राम,गूळ २५० ग्राम, छोले/काबुली चणे २५० ग्राम,पांढरा वाटाणा २५० ग्राम,धने व जिरे पावडर (प्रत्येकी १ मोठा कोशिंबीरीचा चमचाभर),शेंदेलोण व पादेलोण (प्रत्येकी १ चमचा),पाणीपुरी तयार मसाला १०० ग्राम,चाट मसाला १०० ग्राम,काळे मिरे २/३,लाल तिखट १ चमचा, मीठ १ चमचा,साखर २ मोठे चमचे, बारीक शेव ५०० ग्राम,मध्यम आकाराचे बटाटे ७/८,गोड दही ५०० ग्राम,फुगलेल्या व कडक चपट्या पाणीपुरी व रगडापुरीच्या तयार पुर्‍या (सरसकट माणशी १५ नग प्रमाणे)    
पाणीपुरीचे पाणी तयार करण्याची कृती : चिंच व खजूर (बिया काढून)आणि गूळ किमान ५ ते ६ तास पाण्यात भिजत घालून ठेवावेत व नंतर मिक्सर मधून फिरवून व गाळून घ्यावे. पांढरा वाटाणा व छोले/काबुली चणे ४ / ५ तास पाण्यात भिजत घालून नंतर ते शिजवून व बटाटे उकडून घ्यावेत.पुदिना निवडून व स्वच्छ धुवून घ्यावा व मिक्सर मधून फिरवून व पाणी घालून गाळून घ्यावा. एका मोठ्या पातेल्यात मिक्सरमधून फिरवून व नंतर गाळून घेतलेले चिंच,खजूर,गूळ व पुदिना ह्याचे पाणी एकत्र करावे व त्यात चवीप्रमाणे वाटलेले आले,हिरवी मिरची,पाणीपुरी मसाला,चाट मसाला,मिरेपूड,जिरे व धने पावडर,लाल तिखट,शेंदेलोण,पादेलोण,मीठ,बारीक चिरलेली कोथिंबीर,बारीक चिरलेला कढीपत्ता,साखर (चवीसाठी) इ. घालून मिश्रण चांगले ढवळत राहावे.

प्रमोद तांबे 

श्रीमती मनीषा कदम यांचे हे एक पत्र

Namaskar Shekhar Kaka, Tumache lekh mala manapasun aavadatat aani informative vatatat……… asech lihit ja. Tumhi khup chan, realistic lihita. Ladakh cha lekh vachatana asa vatatay ki swataha tikade aahe…… bass maze dole kunitari ribbon ne band kele aahet….. Kaku chya kitchen madhale kahi recipes mi try kelya……. Must vatale…. Ha chand asacha jopasa ……. Mhanaje aamhala ajun mahiti milat jael.. Kaku na namaskar Sanga. Regards,Manisha Kadamप्रमोद तांबे यांनी पाठवलेली ही पदवी फारच रोचक आहे.
Dear al

We may be too old for re-equipping ourselves, but please pass it on to the aspiring younger generation
National Corruption Institute Of India ( N C I I )
Affiliated To Both Houses Of Indian Parliament
Listed on the World Corruption Index as the World’s Best C-School
Invites Applications for 3 Years Undergraduate Bachelors Degree in Corruption. (BDC)
Earn your BDC from the World’s Most Reputed Institute for Corruption Studies
OUR COMPREHENSIVE SYLLABUS INCLUDES:
Financial Theory and Practice
  • Transfer of funds through HAWAALA for creation of MASS GHOTALA
  • FINANCIAL NETWORKING -Movement of money through well engineered networks between State Party Units and Central Party Unit.
  • Solicitation methods to increase donations towards Party Fund.
  • Theory and application of Popular BRIBE concepts and methods like Chai Pani, Parcel, Change, Gift Box , Color TV, Foreign Trip and the ever popular Children’s School Fees
Public Relations (PR) and Media Management
  • Learn how to be MISQUOTED BY THE MEDIA.
  • Learn to say the right things to be QUOTED OUT OF CONTEXT.
  • Excellent training in PARTY SPOKESMANOLOGY .Learn how to argue on TV with other Party people on TV like Professor Manish Tewari and Professor Ravi Shankar Prasad.
  • Develop public gestures like NAMASTE and HAND WAVING.
  • Learn the art of proving all allegations as“BASELESS AND POLITICALLY MOTIVATED
  • Effectively refute STING OPERATIONS. Advanced course in proving that VIDEO FOOTAGE IS FALSE AND MANIPULATED.
Law and Order Module:
In this module you will learn how to:
Commit MURDER and RAPE
Bring LOCAL POLICE under your control
Get BAIL super fast if you are ever arrested.
 Apply and get speedy ANTICIPATORY BAIL so you don’t get arrested in the first place!
FIGHT ELECTIONS FROM JAIL! Special lectures by visiting Professors Shahbuddin and Pappu Yadav!
Advanced Riotology
 Methods to build your own storage houses for HOCKEY STICKS AND WEAPONS to engineer riots.
 Identify and develop your own fuel depots for easy and widespread dispersal of RIOT FRIENDLY PETROL TANKERS
Form effective partnerships with local liquor stores for easy procurement of DESI DARU to get rioters high and ensure awesome rioting!
Full study in CONTEMPORARY BUS BURNING. New age exciting methods for INSTANTANEOUS BUS COMBUSTION.
 Introductory Kashmir method of inciting riots through STONE THROWING.
Actual rioting demonstrations under the expert tutelage of Professor Pravin Togadia.
Gain Extensive Knowledge From Our Faculty Of
World class Professors.
Special Courses In:
  • “2G SPECTRUM” “ A Telecommunications Perspective” By Professor Andimuthu Raja
  • ”Flat Taking From Army Jawan” By Professor Ashok Chavan
  • ”The Correct Standard of Clean” By Professor Lalit Bhanot
  • ”Sports Medal or No Medal, In Corruption Always Get Gold Medal” By Professor Suresh Kalmadi
  • “Application of Corruption on Non Human Species “ Stealing Money for Cattle Fodder” By Professor Laloo Prasad Yadav
  • “Building A Corridor For The Taj Mahal Can Cost More Money Than Building The Taj Mahal Itself” By Professor Mayawati Kumari.
…And Many Many More..!!
SO FORGET ALL B-SCHOOLS, BE COOL, JOIN
THE C-SCHOOL…
NCII IS THE BEST.

Warm Regards, 

Pramod Tambe 

न्यू जर्सीहून आनंद म्हसकर लिहितात

शेखर,तुझ्या  how embarassing ब्लॉगमधे लिहीलेली परिस्थिती इथे पण आहे.  फक्त एकूणच वयाच्या बारा तेरा वर्षांपासून मुले आपल्या पालकांबरोबर फार कमी वेळ घालवतात.  जरी कौटुंबिक संमेलन असले तरी मुले मोठ्या माणसांपासून दूरच रहातात.  अठराव्या वर्षी कधी एकदा कॉलेजच्या निमित्ताने घराबाहेत जातो असे होते मुलांना. त्यामुळे एक होते, त्यांना स्वावलंबी, स्वतंत्र जीवन जगण्याची सवय लागते, स्वतःचे निर्णय स्वतः घेणे, वेळप्रसंगी श्रीमंत बापाचा मुलगा सुद्धा वेटरची नोकरी करून पैसे मिळवेल पण स्वतंत्र राहील.
‘गेस हू इज कमिंग टू डिनर’ या एका अत्यंत जुन्या सिनेमातला बाप मुलाचा एक संवाद माझ्या मनावर मोठा परिणाम करून गेला – मुलगा काळा, त्याची होऊ घातलेली बायको गोरी! सहाजिकच मुलात नि बापात मतभेद. बाप सांगतो, तुझ्या साठी मी यंव केले नि त्यंव केले नि असा स्वार्थत्याग केला वगैरे. मुलगा सांगतो, हे पहा, मी लहान होतो.  मी तुम्हाला सांगितले का काय करा?  तुम्हाला जे करावेसे वाटले ते तुम्ही केले.  माझा फायदा झाला, मी ऋणी आहे, पण त्याचा बदला म्हणून आता माझ्या आयुष्यात मी काय करावे यात माझ्यावर दबाव आणू नका!

असो.  लिहीत रहा.

मला स्वतःला लिहिण्यासारखे धीर गंभीर, विचारयुक्त असे काही नाही! म्हणून मी ब्लॉग वगैरे लिहीत नाही.
 माझ्या ‘जबाबदार्‍या’ संपल्या, आता इतरांच्या चौकश्या, त्यांना काही सांगणे, स्वतःच्या मनातले विचार  किती थोर आहेत याची जाहिरात करणे वगैरे करण्यात स्वारस्य नाही. म्हणून सोशल नेटवर्कवर जान्यात स्वारस्य नाही.  कधी जमलो तर चार दोन गप्पा गोष्टी कराव्या, हसत खेळत वेळ घालवावा की झाले.
कळावे, लोभ असावा. ल. आ. मो. न.
आनंद

चर्चा

42 thoughts on “पाहुणे लेखकांचे लेखन; Guest Writings

  1. kaka tumche blogs nehmi ch chhan ani abhyas purn astat..wishesh karun tumchi pravas warnane mala awadtat ! Please keep going as per “Always young at heart”..keep sharing such good stuff with us 🙂

    Posted by sagar | नोव्हेंबर 24, 2011, 1:05 pm
  2. श्री. मंगेश नाबर यांचा हा लेख अभ्यासपूर्ण आहे. विषमज्वराविषयी आपल्या समाजात किती गैरसमज होते आणि त्याचे निराकरण डॉ. सोपर यांनी मोठ्या चिकाटीने केलेले वाचून इतिहासात त्याची नोंद नसावी, याचे आश्चर्य वाटते. श्री. नाबर यांचा हा अनुवाद सरस झाला असून त्यांनी असे आणखी लिहावे अशी अपेक्षा या लेखाच्या समग्र वाचनातून व्यक्त करावेशी वाटते.

    Posted by nikhil shaligram | डिसेंबर 7, 2011, 2:49 सकाळी
    • Nikhil Shaligram
      श्री. मंगेश नाबर यांचा आणखी एक लेख थोड्याच दिवसांत तुम्हाला ‘माझे पान’ या पृष्ठावर वाचन्यास मिळेल. थोडी प्रतिक्षा करा.

      Posted by chandrashekhara | डिसेंबर 7, 2011, 7:17 सकाळी
  3. Mangesh Nabar’s article ‘Typhoid Mary’ shows that he is fast becoming a front line author on scientific subjects in Marathi. I have had the good fortune to read this article before and had admired it then only. I am eagerly looking forward to reading Shri Nabar’s next article on this page.
    Buck up, Mangesh !
    Bhai (Yeshwant Karnik)

    Posted by Yeshwant Karnik. | डिसेंबर 9, 2011, 10:40 सकाळी
  4. नाबर साहेब, आणखी एक सुंदर, माहितीपूर्ण लेख. ह्याकरता जागा उपलब्ध करून दिल्याखातर आठवले साहेबांचेही मनःपूर्वक धन्यवाद!

    माझे ज्येष्ठ सहकारी डॉ.अरूण साठे, ठाणे हेही एका अंटार्टिका सफरीचे अधिकृत प्रवासी होते. त्यांनी तेथे पृष्ठभूमी किरणोत्सार मापनाचे महत्त्वपूर्ण काम केलेले होते.

    ही सर्वच माहिती अत्यंत रोचक आणि सुरस आहे. तुम्ही लिहीत आहात त्याखातर मनःपूर्वक धन्यवाद. पुढील लेखनार्थ हार्दिक शुभेच्छा!

    Posted by नरेंद्र गोळे | डिसेंबर 9, 2011, 6:33 pm
    • नरेंद्रजी

      बर्‍याच दिवसांनंतर अक्षरधूळवर तुमचा प्रतिसाद बघून बरे वाटले. ‘माझे पान’ हे पृष्ठ मी इतर लेखकांनी लिहिलेले चांगले लेख अक्षरधूळवर वाचता यावेत म्हणूनच आयोजले आहे. कोणीही वाचक या सुविधेचा फायदा घेऊ शकतो. आपला लेख माझ्याकडे इ-मेलने पाठवल्यास मी तो प्रसिद्ध करू शकतो. माझा इ-मेल पत्ता वर दिलेल्या ‘संपर्क साधा’ या टॅब वर क्लिक केल्यास मिळू शकेल.

      Posted by chandrashekhara | डिसेंबर 10, 2011, 9:38 सकाळी
  5. Dear Shri Chandrashekhar and Shri Mangesh Nabar,
    The first visit of scientists from the National Institute of Oceanography proceeded to Antarctica , I recall, in the early eiighties . The Lt. Governor Mr. S.K.Banerji (earlier Union Foreign Secretary and Ambassador to Germany and Japan) saw them off. I was then the Personal Secretary of Mr. Banerji. My daughter Vaijayanti and son-in-law Vidyadhar Date
    were working in the N.I.O. then , Vaijayanti as Laboratory Assistant and Vidyadhar as
    a junior scientist. They have since retired from service. I have had a long association with the N.I.O. My daughter has written a book in Marathi on Antarctica. She and her husband have settled down in Talegao Dabhade near Pune.
    Regards.
    Yeshwant Karnik.

    Posted by Yeshwant Karnik. | डिसेंबर 10, 2011, 10:22 सकाळी
  6. श्री नरेंद्र गोळे यांचा ‘मराठी उच्च शिक्षण समिती’ हा लेख म्हणजे अत्यंत कळकळीने केलेले कार्य व त्याची नोंद आहे. मी, गोळेसाहेब यांची अनुदिनी नियमाने वाचतो. त्यांचे बहुविध लेखन आणि विचार मला प्रभावित करत असतात. आपल्या MY PAGE वर असेच लेख प्रसिद्ध होवोत आणि ही अनुदिनी बहरून जावी, ही शुभेच्छा.

    मंगेश नाबर.

    Posted by Mangesh Nabar | डिसेंबर 10, 2011, 6:39 pm
  7. श्री. नाबर यांचा स्कॉटच्या झोपडीवरील लेख व छायाचित्रे आवडला. त्यांच्या पुढील लेखांची वाट पाहात आहे.

    निखिल शाळीग्राम

    Posted by Nikhil Shaligram | डिसेंबर 13, 2011, 3:52 सकाळी
  8. The Articles of Shri Mangesh Nabar and Shri Gole are well-written and quite knowledgeable.
    I have read Dean Ornish’s book on reversing heart disease. It was very useful when I had a mild heart attack 10 years ago. I was 76 then. Ornish has depended a great deal on Indian health science, especially Yoga.
    Thanks.
    Yeshwant Karnik.

    Posted by Yeshwant Karnik. | डिसेंबर 13, 2011, 11:25 सकाळी
  9. नाबरसाहेब आणि कर्णिकसाहेब प्रतिसादाखातर धन्यवाद.

    कर्णिकसाहेब, डॉक्टर ऑर्निश यांच्या पुस्तकातून आयुर्वेदाचे खरे ज्ञान प्राप्त होते, हा भारतीय आयुर्वेदाचे दृष्टीने चिंतेचा विषय आहे. इथे हे उल्लेखनीय आहे की, माझ्या हृदयविकाराच्या सुरूवातीस सुमारे एक वर्षपर्यंत आयुर्वेदिक डॉक्टरकडे जात राहून आणि त्यांची सगळी पथ्ये निकराने पाळूनही माझा रक्तदाब कमी होत नव्हता म्हणूनच माझी हृदयधमनीरुंदीकरण शस्त्रक्रिया करावी लागलेली होती.

    Posted by नरेंद्र गोळे | डिसेंबर 13, 2011, 5:49 pm
  10. On Shri Gole’s comments :
    I was in Nanavati Hospital, Vile parle where after doing angiography, the doctors advised me to have angioplasty or bypass surgery. I refused to have both on 2 grounds. I was over 75 and had lived my life. The cost was also prohibitive. Moreover, having lost my life partner in 1979, I was unwilling to burden my children with unnecessary filial duties. They have their own lives and family responsibilities. I decided to follow Dean Ornish’s advice and followed disciplined lifestyle thereafter. Limited light food, some yoga breathing exercises and walking, good sleep , and regular medication have kept me going in this 87th year. I don’t know how long I will live (my elder brother is 91); I am not worried or afraid of death, but I want my remaining years (or months or days) to be meaningful. I spend my whole day in reading and writing. Don’t worry, Mr. Gole; you will be fine for many years.
    Yeshwant Karnik.

    Posted by Yeshwant Karnik. | डिसेंबर 16, 2011, 10:01 सकाळी
    • धन्यवाद कर्णिकसाहेब!

      अनुभवातून आलेल्या उपजत शहाणपणाचा आशीर्वाद मिळाल्यावर, अर्थपूर्ण आयुष्य जगण्याची माझी उमेद आपसूकच वाढली आहे. त्याखातर पुन्हा एकदा धन्यवाद.

      Posted by नरेंद्र गोळे | डिसेंबर 16, 2011, 3:15 pm
  11. I am fascinated to read your posts in both the bolgs of yours. Recently I happened to open “My Page” and went on reading the posts one after another. Please convey my regards to Shri. Narendra Gole, Shri. mangesh Nabar and Shri. Yeshvant karnik for their fluid styles. Let more and more people join your blog with variety of subjects.

    Posted by Vibhakar Mundkoor | डिसेंबर 18, 2011, 12:53 सकाळी
  12. आपली अक्षरधूळ ही मुख्य अनुदिनी व माझे पान ही उपअनुदिनी दोन्ही माझ्या वाचनात अलीकडे आल्या. आपण स्वतःला ललित लेखनाची आवड नसल्याचे नमूद करता. पण आपले अनेक लेख वाचतांना त्यातील भावनाविष्कार आणि सामाजिक भान जाणवते. गेले काही दिवस मला श्री. नरेन्द्र गोले, श्री. मंगेश नाबर, श्री. यशवंत कर्णिक या वाचकांचे लेख दिसत आहेत. श्री. गोले यांची स्वतःची अनुदिनी आहे. तरीही त्यांनी तेथे मांडलेला एक महत्वाचा विचार आपल्या व्यासपीठावरून पुनः आणला आहे. त्यावर चर्चेहून कृती झाली पाहिजे. श्री. नाबर यांचे दोन मालिकातून एक वेगळ्या प्रकारचे लेखन वाचण्यास मिळाले. संशोधन क्षेत्रातील इतिहासातून त्यानी विषमज्वरावरील अमेरिकेतील गैरसमज कसे दूर झाले याचे ओघवत्या भाषेत चित्रण केले आहे. दक्षिण ध्रुवावर जे साहसवीर पोचले, त्यात स्कॉट हा दूसरा पण अभागी गिर्यारोहक होता. त्याच्या झोपडीवरील लेख आवडला. त्यानंतर आलेले बुजुर्ग लेखक श्री. यशवंत कर्णिक यांचे एकेक लेख म्हणजे ललित लेखनाचा सुरेख नमूना आहे. या दोन्ही तिन्ही लेखकांचे लेख वरचेवर यावेत. अशाच अभ्यागतांनी हजेरी लावावी.

    विनायक पर्वतकर.

    Posted by Vinayak Parvatkar | जानेवारी 2, 2012, 3:55 सकाळी
    • श्री. विनायक पर्वतकर –

      आपल्या सविस्तर प्रतिसादासाठी प्रथम तुम्हाला धन्यवाद. मला ललित लेखनाची आवड नाही हे मी केलेले विधान जरा जास्त प्रमाणात सर्वव्यापी आहे हे खरे आहे. मला कथा कादंबर्‍या लिहिण्याची आवड नाही असे मला खरे तर म्हणायचे आहे. मी करत असलेले लेखन मुख्यत्वे लघु निबंध या प्रकारचे असते. त्यात कधी कधी भावनाविष्कार येतो हे मला मान्य आहे. ‘माझे पान’ हे पृष्ठ चालू करताना माझ्या मनातला हेतू असा होता की माझ्या ब्लॉगला रोज मिळणार्‍या दोनशे किंवा तीनशे वाचकभेटींचा फायदा इतर लेखकांनाही मिळावा. या पत्रव्यवहारातून तुमची मते श्री. गोळे, श्री. नाबर व श्री. कर्णिक यांना पोहोचतीलच आणि ते आपले आणखी नवे लेख येथे प्रसिद्ध करतील अशी आशा मला वाटते.

      Posted by chandrashekhara | जानेवारी 2, 2012, 7:48 सकाळी
  13. आपल्या या अनुदिनीचे अन्तरंग अधिकच विस्तृत होत आहे. श्री. मंगेश नाबर यांचे हे ‘ कागदाचे घर ‘ मला आवडले बुवा ! सध्या ते अमेरिकेत आहेत, असे मला नुकतेच समजले. त्यांनी या घराला भेट देऊन हा लेख लिहिला की काय ? हे असे कागदाचे घर गेली ऐंशी वर्षे तग धरून आहे, याची भारतातील वास्तुशिल्पतज्द्न्यान्नी दखल घ्यावी.

    Posted by Nikhil Shaligram | जानेवारी 2, 2012, 9:13 pm
  14. श्री. यशवंत उर्फ भाई कर्णिक यांनी “घर कागदाचे ” या लेखावरील अभिप्राय माझ्याकडे ( मंगेश नाबर ) पाठवला. तो खाली देत आहे. :-

    ‘कागदाचे घर’ हा तुमचा लेख वाचला. त्याखाली प्रतिसाद कसा नोंदवावा हे कळेना म्हणून तुमच्या ह्या ईमेलखाली नोंदवीत आहे.
    लेख खरोखरीच खूप सुंदर आणि माहितीपूर्ण आहे. तो तुम्ही छायाचित्रांनी सजवलायही सुरेख. असे काहीतरी ‘अफलातून’ करणारी माणसे हाडाची सर्जनशील ( creative ) असतात. ज्यावेळी हे घर ‘बांधले’ गेले तेव्हां त्या गृहस्थास कल्पनाही नसेल की ते ८० हून अधिक वर्षे टिकेल. दगडमातीची घरेही इतक्या वर्षांनी पडझडीला येतात. पाण्याने कागदाचा लगदा होतो. पाऊस व बर्फवृष्टी यातूनही हे घर टिकून राहिले आहे हा ईश्वरी चमत्कारच आहे असे मी म्हणेन. हे वाचकांच्या नजरेस आणले याबद्दल तुमचे कौतुक करावेसे वाटते. तुम्ही हा लेख ‘लोकसत्ता’ ला पाठवावा असे सुचवतो.
    भाई.

    Posted by Mangesh Nabar | जानेवारी 3, 2012, 5:05 pm
  15. श्री. मंगेश नाबर यांची ही नवी चरित्रमाला उत्कंठा वाढवणारी आहे, असे मी म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. या महान संशोधकाचे छाया चित्र अद्याप नसले तरी त्याचे एखादे रेखाचित्र असेल पाहिजे. पुढील लेखाची वाट पाहातो.

    Posted by Nikhil Shaligram | जानेवारी 24, 2012, 6:44 pm
  16. जोहान गुटेनबर्ग : आधुनिक मुद्रण तंत्राचा जनक >>>>> नाबर साहेब, उत्तम विषय घेतला आहेत. त्याखातर आपले अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा! गुटेनबर्ग यांचा शोध अद्वितीय खराच. त्याचे नावाने ई-बुक्स तयार करण्याचा जो प्रकल्प सुरू झालेला आहे तोही अद्वितीयच आहे.

    मात्र, भारतीय मौखिक परंपरेने जे ज्ञान हजारो वर्षे जपले त्याची सर पुस्तकांना नाही. म्हणून ही लेखमाला संपवतांना मौखिक परंपरेने जपलेल्या ग्रंथांची यादी अवश्य जमा करा ही विनंती!

    Posted by नरेंद्र गोळे | जानेवारी 24, 2012, 7:15 pm
  17. जोहान गुटेनबर्ग या महान जर्मन मुद्रकाच्या चरित्राचे पहिले प्रकरण श्री. आठवले यांच्या अनुदिनीवर आज प्रसिद्ध होताच श्री. निखील शाळिग्राम व श्री. नरेंद्र गोळे यांच्या ताबडतोब प्रतिक्रिया आल्या याचा आनंद वाटला. या माझ्या दोन्ही परम मित्रांचे आभार मानतो. हे पहिले प्रकरण म्हणजे गुटेनबर्गच्या चरित्राची प्रस्तावना होती. म्हणून त्याचे उपलब्द्ध असलेले रेखाचित्र त्यात दिले नाही. आता दुस-या प्रकरणात ते सादर करत आहे. या संबधातील आणखी काही चित्रे व छायाचित्रे जमल्यास पुढील भागात देण्याचा विचार आहे. श्री. गोळेसाहेब यांनी सुचवलेली यादी सादर करण्याचा प्रयत्न करीन. जोहानचे एकूण आयष्य या त्याच्या प्रकल्पात खर्ची पडले. शेवटी त्याच्या हाती काय लागले, त्याचा किती मानसन्मान झाला, याची गोळाबेरीज पुढील भागात वाचण्यासारखी आहे. आजच्या इपुस्तकांच्या जगात जोहान गुटेनबर्गचे महत्व कमी लेखून चालणार नाही, एवढेच.
    मंगेश नाबर.

    Posted by Mangesh Nabar | जानेवारी 25, 2012, 1:01 pm
  18. माझ्यासारख्या सामान्य वाचकाच्या विनंतीला मान देवून आपण जोहान गुटेनबर्ग या आदय मुद्रण संशोधकाचे चरित्र प्रसिद्ध करत आहात, हे वाचून अतिशय आनंद झाला. मी हे चरित्र पूर्णतया वाचलेले नव्हते. गोव्याला एकदा गेलो असता दैनिक नवप्रभाचा अंक पाहिला असतांना त्याचे एक प्रकरण माझ्या पाहण्यात आले होते. त्याचा धागा पकडून मी तशी विनंती केली होती. आभार.

    Posted by Vinayak Parvatkar | जानेवारी 25, 2012, 3:09 pm
  19. मंगेश नाबर यांचा नवा लेख अत्यंत सुंदर आहे. नाबर हे सिद्ध्हस्त लेखक आहेत यात शंका नाही.

    Posted by Yeshwant Karnik | जानेवारी 28, 2012, 6:24 pm
  20. अमेरिकेतील एक मित्र श्री. सतीश इंगळे यांनी ‘माझे पान” वरील जोहान गुटेनबर्ग या चरित्राचा प्रसिद्ध झालेला पहिला भाग वाचून पाठवलेली बोलकी प्रतिक्रिया खाली देत आहे :-
    I read all articles and was very impressed. All of them are very informative and the language is very appealing. Most of such articles tend to be very verbose and boring but yours have simple lasnguage and they keep a reader interested. Keep on sending them.
    Thanks,
    Satish

    Posted by Mangesh Nabar | जानेवारी 29, 2012, 11:03 सकाळी
  21. नाबर साहेब,
    गुटेनबर्गवरचे लेखन आता अधिक सुरस होऊ लागलेले आहे. आवडते आहे.

    खरे तर कुठल्याही शोधाची कथा सुरस असतेच. त्यातही गर्भश्रीमंत लोक जेव्हा फुरसतीने एखाद्या तत्त्वाचा गांभिर्याने शोध घेतात तेव्हा अलौकिक गोष्टच निष्पन्न होत असते. ही कथाही नक्कीच सुरस ठरणार असे वाटते आहे. पुढील लेखन आणखीही रोचक होवो हीच शुभेच्छा!

    Posted by नरेंद्र गोळे | जानेवारी 31, 2012, 1:25 pm
  22. मंगेश नाबर यांचा नवा लेख खूपच छान आणि माहितीपूर्ण आहे. अभिनंदन.
    यशवंत कर्णिक.

    Posted by Yeshwant Karnik | जानेवारी 31, 2012, 6:55 pm
  23. प्रिय गोळेसाहेब आणि भाई यांस,
    आपण सुरूवातीपासून जोहान गुटेनबर्गच्या चरित्रात इतका रस घेत आहात, याचे मला नवल वाटत नाही. जोहानविषयी विविध पुस्तकातून त्याचे अलौकिक चरित्र वाचताना मीसुद्धा गुंग होऊन जात होतो. या माणसाने आपले ध्येय गाठण्यासाठी इतकी जीवाची बाजी लावली होती, की त्याच्या मार्गात असंख्य अडथळे आले तरी त्याने त्याची पर्वा केली नाही. पुढील भागात आपण ते वाचालच. आपल्या दोघांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.
    मंगेश नाबर.

    Posted by Mangesh Nabar | जानेवारी 31, 2012, 8:50 pm
  24. मंगेश नाबर यांचे सर्वच लेख इतके माहितीपूर्ण आणि सुंदर आहेत की त्याचे पुस्तक निघाले पाहिजे. गुटेनबर्ग वरील ५ लेख + यानंतर येणारा ६ वा लेख यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले तर ते अभ्यासकांस खूप उपयुक्त ठरेल असे मला वाटते.
    यशवंत कर्णिक.

    Posted by Yeshwant Karnik | फेब्रुवारी 22, 2012, 10:54 सकाळी
  25. मुद्रण तंत्र, मन्त्र आणि कलेचा एकमेव जनक असा जोहान गटेनबर्ग याचे चरित्र श्री. मंगेश नाबर आपल्या परीने रसपूर्ण करत आहेत. आमची उत्कंठा अधिक न लांबवता या लेखमालेचा शेवट पुढील भागात असणार आहे, असे वाचनात आले. गटेनबर्गचे अखेर काय झाले ? त्याचे ते बायबल कसे होते, त्याचा यथोचित मान सन्मान पुढे कसा काय झाला हे मला वाचायचे आहे. माझ्याप्रमाणे अन्य वाचकांना तसे वाटत असावे.

    Posted by Nikhil Shaligram | मार्च 9, 2012, 11:36 सकाळी
  26. आपल्या ब्लॉगवरील श्री. मंगेश नाबर लिहित असलेली जोहान गुटेनबर्ग याच्या खडतर जीवनावरील चरित्रमाला समाप्त झाली. मुद्रण कलेचे जनकत्व ज्या माणसाला दिले जाते, त्याच्या शोधाची ही कहाणी पुस्तक रुपाने यावी. किमान इ-पुस्तक म्हणून ते प्रकाशित झाले तर आनंद वाटेल. आता पुढील लेखाची अपेक्षा आहे. श्री. मंगेशराव आणि आपल्याला धन्यवाद.
    निखिल

    Posted by Nikhil Shaligram | एप्रिल 3, 2012, 10:47 सकाळी
  27. Great to see the poem “पुणे तिथे काय उणे.. ” inspiring too. Thanks Ankush.
    ~~
    Yes, we are really going away from our ancient culture, and gaining nothing great as such to be proud of Punekar 😦
    It’s our dharma to keep the roots alive. Jai Ho. 🙂

    Posted by Ek Punekar | डिसेंबर 13, 2012, 10:56 सकाळी
  28. Ankush Avhad yanni marmik shabdad sadyasthiti chi janeev karun dili aahe “pune tithe kai Une” ya kavite madhun.
    Yogya dakhale dilyamule tyanna kai mhanaiche aahe chatkini kalate.
    Dhanyawaad Ankush Avhad

    Posted by yogesh kulkarni | डिसेंबर 13, 2012, 11:50 सकाळी

Leave a reply to chandrashekhara उत्तर रद्द करा.