चाहूल
चाहूल तुझी रे / लागतांच बाळा
आनंद सोहळा / जन्माचा हा
पोटि असे माझ्या / अवघा आनंद
जाणीवेत धुंद मन माझें
परसांत माझ्या / मोगरा लावीला
आज बहरला / कसा बाई
मनातले सौख्य / सांगु कुणा कोणा
घरांत पाहुणा / येणारसे
कसा पाहुणा ग / खरा अधिकारी
दिपक देव्हारिं / लागे आंता
दिसमास वाढे / नाहीं मला भार
फूल हातां वर / झेलते हें
वाट पाहे मीच / आतूर अंतरी
पहाया सत्वरीं / रूप तुझें
तुझा गोड स्पर्श / अंग मोहरतें
स्वपांत रंगते / तुझ्याच मी
पोटाशी धरूनी / चुंबीन तुजला
यायचि ही वेळा / कधी बाई
अंतरी सुखावें / अंतर माझे हे
चिंतनात राहे / मग्न सदा
(25 फ़ेब्रुवारी 1954)
किंचित काव्य
जे लोक
मनाच्या मोठेपणाच्या
गोष्टी सांगतात
उपदेश करतात
त्यांना एकच दिवस
फक्त चोवीस तासच
करावं
एका खाष्ट आणि द्वाड
सासूची सून
(नोव्हेंबर 1954)
आईचे अंतर
कधी शहाणा होईल बाई माझा हा चिमणा /
ही एकच चिंता मना //
खोड्या याच्या पाहुनि लाजे कृष्णसखा ग मनिं /
विटले गार्हाणीं ऐकूनी //
सुया टोचती असंख्य हृदया बाळाची निंदा /
जीव हा होई शरमिंदा //
कसें तयाला समजावूं मी काही कळेना परी /
होतसे उदासीन अंतरी //
कधिं कळेल त्याला आईचें अंतर /
प्रेमें जे फोडिल पथरास पाझर /
नयनांत उसलतो अश्रुंचा सागर //
कौतुक करण्या नाहींस बाळा अवतारी देव /
आपण क्षुद्र परी मानव //
(एप्रिल 1954)
तुझ्या माझ्या मिठीतूंन
तुझ्या माझ्या मिठीतूंन
तुझ्या हृदींचे स्पंदन
साथ कसे करी त्याला
मुकपणे माझे मन
तुझ्या माझ्या मिठीतूंन
अंतरीचें आक्रंदन
कळे तुझ्या अंतराला
भेटतांच कणकण
तुझ्या श्वासावर कसें
मन माझे हेलावते
प्रतिबिंब त्याचवेळी
नेत्री तुझ्या तरंगते
चित्ती माझ्या जेंव्हा जेव्हां
फुले मोहोर आनंदी
करि वृष्टि चित्त तुझें
मधुमादक सुगंधी
अबोली ही माझी भाषा
न बोलता तुला कळे
तुझ्या माझ्या मिठीतूंन
तुझें गुज मला मिळे
(14 फेब्रुवारी 1954)
घर
आली पहाटेला जाग / घड्याळाचा बदसूर
डोळे चोळीत ऐकतो / दूर हांक धारदार //
तसा उगीच लोळतो / घेतो दुलई ओढून
येईल ती उठवाया / आई थोडी रागावून
किती वेळ झाला आता / अजून ती नाही येत
घुश्यात मीच उठतो / मित्र दिसे तयारीत
स्वप्नींचे ते धन होते / कुठे घर कुठे आई
दूर माया कैक मैल / इथे भाग्याची कमाई
अन्नपाणी हवा सारी / मनाजोगी व्यवस्था ही
इथे पांथस्थ पाहुणा / घरगुती हात नाही
खिडकीतुन दिसे / एक घरटे पक्षाचे
दूरदूर घेई झेप / होई स्थान विसाव्याचे
गुरूगृही बारा वर्षे / कसे राहिले राहोत
मन होई सैरभर / धावे घराच्या कुशीत
दिसभर अभ्यासात / दिसे घरटे सारखे
हुरहुर मनी वाढे / घर झाले रे पारखे
ताप उन्हाचा लागता / स्मरे साऊली शीतल
वेंस ओलांडून जाता / घर मधाचे मोहाळ
पाठ लावितो गादीला / उभे डोळ्यांपुढे घर
हळुं आईच्या मायेनं / निद्रा घालते फुंकर
(ऑगस्ट 1963)
श्रावण
आला श्रावण श्रावण रिमझिम हळू सांगे
ऊन पावसाचा खेळ सप्तरंगी गोफ़ रंगे
आला श्रावण श्रावण ओल्या मेंदीला आठवे
उंबर्याशी रेंगाळले लाल नाजुक तळवे
आला श्रावण श्रावण गंध झाला सैरभैर
पारिजात जाई जुई ओली हळवी लकेर
आला श्रावण श्रावण गौर हिरव्यांची हंसे
हिरव्या या रेशमाला कांठ केतकीचा दिसे
आला श्रावण श्रावण पाळण्यात बाळकृष्ण
झोंपतो ग योगे युगे जागवितो मन मन
आला श्रावण श्रावण वायू बोलतो कानांत
झोका ऊंच ऊंच चढे जाई माहेरी धावत
(ऑगस्ट 1963)
गा मना आनंदे
स्वप्नफूल उमलले माझे
गा मना आनंदे //
इंद्रधनूने रंग दिले
मीच तुला रंगविले
नीळाईंत न्हाऊनी त्या
विहर तूंच स्वच्छंदे //
प्राशुनिया मधुमरंद
मधूप मी हाच छंद
देहभान विसरूनी तूं
धुंद होई मधुगंधे //
(जानेवारी 1959)
पहिला अर्ध्य
क्षितीजावरती आली होती एक ज्वलंत पहांट
क्षणभरा भेदुन जाई कशी ती तेजोमय लाट //
गुलामगिरीच्या राखेखालीं निद्रीत जो अग्नि
फुंकर एकच ठिणगी पडली धडाडला वन्हि //
खड्ग चमकती ती विषवल्ली तोडाया समूळ
स्वातंत्र्यास्तव अश्व दौडले ती उधळे धूळ //
त्या धूळीनें धूसर दिसते ती सौवर्ण पहाट
रक्त सड्याने रंजित झाली कीं ही मंगल वाट //
धूसर अंधारी खड्गाची लखलखती पाती
चहूं दिशांना आग भडकली किति जळल्या ज्योती //
त्या वीरांच्या पुढे एक ती महिषासुर मथिनी
दिपे फिरंगी मनीं, आगळे तेज तिचे बघुनी //
नव्हे पोटचा बाळ अंकिचा, पाठी घेऊन त्यास
वंश लाडका, झांशी प्यारी, लावी प्राण पणास //
निजतेजाने स्फूर्ति द्यावया चमकति जे तारे
आत्माहुतीनें वीर बैसले अढळपदीं सारे //
शुक्रतारका एक त्यातली तेजाची राशी
युगायुगांना स्फूर्ति देण्या येई आकाशीं //
बंड नव्हे तो, स्वातंत्र्याचा संगर तो साचा
विफलीत हो, परि उन्मेषच तो श्रीशिवशक्तीचा //
पहांटेस त्या ज्योत पेटली मनिच्या गाभ्यांत
समर संपले, विझली नच, नव अंबर उधळीत //
शतवर्षांनी पहांट गर्भातुन उगवे सूर्य
पहांटेस त्या, सूर्याला त्या हा पहिला अर्ध्य //
(मार्च 1957 )
चोराच्या पावली
हळूं चोराच्या पावली
सांज उतरली खाली
निळ्या डोंगर माथ्याला
क्षण एक विसावली //
काळी मृदूल रेशमी
मुखी ओढणी ओढीत
यते लाजत मुर्कत
जाळे पसरी तलमी //
हळू चोराच्या पावली
येई पाठीशी थांबून
झांकी नयन मागूते
छाया अंतरी दाटली //
सवें घेऊन येई ती
सखी उदास उणीव
तुझी वियोगी जाणीव
वाटे अंधाराची भिती //
(15फेब्रुवारी 1957)
इवल्या मूर्तीत
इवल्या हातांचा विळखा गळ्याला
अमृतधारांची रूची ये जिव्हेला
बोलक्या डोळ्यांत भविष्य हांसते
मंद त्या सुवासें मन मोहरते
लाडीक बोलांची मधू पखरण
मधानें नहाते होऊनी उन्मन
पदरव गोड बाळपावलांचा
ओंजळ भरली सडा प्राजक्ताचा
कल्पनेचा खेळ तशा बाळलिला
गंधर्व गायन सुखद श्रुतीला
इवल्या मूर्तींत सांठविलं सारं
जगातींल सत्य शिव नी सुंदर
(जानेवारी 1957)
वचन
चार या चिमण्या उडाल्या दिगंत
सोनेरी पंख हे ऐटीने मिरवीत
तुकडे तोडीले माझ्या अंतराचे
तोडीले धागे हे चिवट मायेचे
सोबत तयांना जीवन साथींची
समृद्ध सुखाची खूण ओळखिची
गेलीस टाकून खांद्यावर भार
एकटा चालता शिणलो ग फार
बंधन जीवाला चार चौकड्यांचे
घातलेस होते जीवंत मायेचे
तुझ्या वचनाची आज झाली पूर्ति
मुक्त मी जहालो समाधान चित्ती
समाधाने त्याच विश्वास टाकाया
आतां मोकळा मी तुझ्याकडे याया
थांबली आहेस जीव घोटाळला
जोडीने चालूया मार्ग हा पुढला
(अक्टोबर 1956)
आई
आभाळाची छाया / जशी जगावरी
माऊलीची माया / तशी पिलावरी
लुळे पांगे पोटीं / कसें असे जरी
मायेची कसोटी / होई तेथे पुरी
राग येई मनीं / कठोरता येते
नवनीत क्षणीं / कसें वितळते
जागृत पहारा / संरक्षक भींती
मायेच्या नजरा / बाळाला रक्षिती
आईचे स्मरण / बकुळीची रास
ठेवितां जपून / मधूर सुवास
स्पर्श हा बाळाचा / अंग सुखावते
आई कुशीसांठीं / मन आसुसते
(हनुमान जयंती)
7एप्रिल 1955
उघड पावसा
उघड पावसा ऊन पडूं दे
अंगणांत मज सुखें खेळूं दे //
भरदिवसा अंधार होतसे
कंटाळा मग मला येतसे
खेळायला जरा मिळूं दे //
गवताची ही इवली पाती
वार्यांसंगे नाच नाचती
नाच तयांचा जरा पाहूं दे //
प्राजक्ताच्या झाडाखालीं
सडा रुपेरी बघ हा घाली
ओंजळभर तरी फुले वेंचू दे //
जाईचा बघ मांडव लवला
जुईचा झाला चोळामोळा
थांब जरासा वास घेऊं दे //
हिरवळ सुंदर ही मखमाली
मऊ ओलसर पसरे खालीं
गालिच्यावर मला चालूं दे //
थेंब टपोरे पानावरती
उन्हांत चमचमतील हे मोती
त्या मोत्यांनी मला न्हांऊ दे
इंद्रधनुची कमान दिसते
दोरी त्याची कुठे पोचते
त्या दोरीची लांबी मोजू दे //
थारोळ्यातुन पाणी चमकते
इंद्रधनू भूमीवर पडते
त्या रंगांच्या छटा निरखूं दे //
नाव माझी ही तयार झाली
आतां तरी तू थांब क्षणभरी
पाण्यातुन ही नाव चालू दे //
येऊ सारखा नकोस ऐसा
थांबलास तर देईन पैसा
देव तयाचा खाऊ देऊ दे //
सप्टेंबर 1956
बरा टोणगा जाहलो
उपेक्षित ओंगळसा / प्राणी जगात विचित्र
ज्ञानेशाच्या कृपयेने / आज जाहलो पवित्र //
वेदशास्त्र पारायणी / नरोत्तम असा कोणी
परि माझ्या सम मीच / अमर हो माझी वाणी //
म्हणा मज निर्बुद्ध वा / मुखदुर्बळ वैखरी //
जन्मीं एकदा बोलला / कोण करी बरोबरी //
द्विजोत्तम होऊनीच / वदे अमंगळ वच
बरा टोणगा जाहलो / वेद मुखे मी बोललो //
(जानेवारी 1956)
बाल पसायदान
आता बालब्रह्मे देवे / येथे सदैव तोषावे
तोषोनी आम्हा द्यावे / पसायदान हे
अज्ञान तिमिर जावो / ज्ञानसूर्य अखंड राहो
बालक वांछिल ते लाहो / सर्वकाळ
येथ समता वर्तावी / विश्वबंधुता साकारावी
परस्परे मैत्री जडावी / सर्वांभुती
बाळांचा चौमेरी विकास / हाच हृदी जया ध्यास
त्यांचा घडावा नित सहवास / या बालराज्यी
हे शहरी हे ग्रामाणी / हे गरीब हे धनवान
हे अपंग हे बलवान / भेदाभेद नसो दे
हे भविष्याचे हसरे गाव / मूर्त चैतन्य याचे नाव
हेच अमृताचे लाघव / बाळरूपी
हेच चंद्रमे कलंकवीण / हेच मार्तंड तापहीन
कल्पसुमांचे हेच उद्यान / प्रिय व्हावे सर्वा
अवघ्या हृदयी प्रेम उपजावे / बालहित हे ध्येय असावे
बालकार्यी रत व्हावे / अखंडीत
बालब्रह्माचे करीता पूजन / प्रसन्न होईल नारायण
सुखसमृद्धीला ना वाण / प्रसाद पावेल
(1980)
आईचा जीव
चिमण्याला मी सोडून आले आज किती हो दुरी
मन वेडे माझे जाई माघारीं
हात चिमुकला हालवुनी मज निरोप देई मुदें
परि व्यथित होई मी त्या आनंदे
बरे जीवाला असेल त्याच्या! चिंता एकच मनीं
कां रडे सारखा मजला आठवूनी
आईचे जरि वेड तयाला मुळीच बाई नसे
आजीच्या हृदयमंदिरी बसे
परि जीव आईचा कळवळतो हा उगाच वेडापिसा
मायासागर खळबळतो हा कसा
गोड तयाचा पापा भारी सुखद किती ही स्मृति
गाल गोजिरें दृष्टीपुढें नाचती
(ऑगस्ट 1956 )
पहिलीच वेळ
“आलीस पहिल्याने, रहा चार दिस आतां
गोष्टी सांग गोड गोड तुझ्या नव्या संसाराच्या //
आलीस महिन्याने वाटतात किती दिस
तुझ्या वियोगाने होई जीव माझा कासावीस //
कर भाजी आवडीची मलाही ती आवडेल
तुझ्या हातचे जेवण जीव माझा तृप्तावेल //
आहेत ना पोरी! माझे नवे जावई प्रेमळ
संसाराच्या पटावर रंगला ना नवा खेळ //
नव्या आशा फुलताना दृष्टी तुझी पुढे लागे
पुढे जाताना परंतु पहा कधी कधी मागे //
किती झाले तरी आतां झालीस तू परक्याची
अधिकार सरे माझा, फक्त बोली ममतेची //
” बाबा नका असे बोलू कशी तुम्हा विसरेन
सावलीत सुखाच्या या पुन्हा पुन्हा परतेन //
सांगितले मी तयांना, येतील हो न्यावयाला
पहिलीच वेळ बाबा हवे मला जावयाला //
(डिसेंबर 1954)
मजपाशी काही उरले नाही
मोहीलेस तूं तुझ्या स्मीताने
भारिलेस तूं तव विनयाने
भालावरच्या ललाटरेषा
बघुनि चमकल्या मनात आशा
स्पर्शातील तुझ्या माधुरी
उठतील रोमांच्याच्या लहरी
डोळ्यानी तव बघसी अंतर
शान्त गंभीर परी हा सागर
तरंग नाही, खळबळ नाही
साद तुला मग कशी मिळावी
सर्वस्वहि मम दिले दुज्याला
या सर्वाहुनी प्रिय जो मजला
येऊं नको तूं पुन्हा कधीही
मजपाशी काही उरले नाही
( ऑगस्ट 1954)
***********
झाले सारे यथासांग
झाले सारे यथासांग, कन्यादान पुण्य पदरी
एक उणीव बोंचली / कडोसरीला सुपारी //
कन्या सासरी निघाली, सारे डोळे पाणावले
एक उणीव बोंचली / ममतेचे पाश विरले //
झाले सारे यथासांग, वर्हाडाने घर भरे
एक उणीव बोंचली / माणूस हवे होते खरे //
कन्या सासरी निघाली, ओटी भरा असोल्याची
एक उणीव बोंचली / जागा नाही ओलाव्याची //
झाले सारे यथासांग, झाला सारा थाटमाट
एक उणीव बोंचली / परी आंवळ्याची मोट //
कन्या सासरी निघाली, आशिर्वादे पोट भरे
एक उणीव बोंचली / कुशीतली उब झुरे //
***********
(ऑक्टोबर 1954)
पाळणा
बांधा ग सयानों रंगीत पाळणा
मखमली गादी उशी ही आणा
झोंपवा माझा राजस राणा
जो बाळा जो जो रे जो //
तीट काजळ घाला बाळलेणीं
शोभतो ग कृष्ण पिंपळपानीं
गालबोट लावा दृष्ट काढा कोणी
जो बाळा जो जो रे जो //
गोजिरें रूप हें बाळकृष्णाचे
पाहुनी मनात आनंद नाचे
वर्णाया शब्द ना येती तोलाचे
जो बाळा जो जो रे जो //
संसारी उद्यानीं फुललें फूल
तांबुस कांती किती कोमल
सौव्य कासारीं हांसे कमल
जो बाळा जो जो रे जो //
निर्मल सुमन शोभा येतसे
मनोहर जणूं रूप घेतसे
प्रीतिचे बिंब नयनात भासे
जो बाळा जो जो रे जो //
फुलापरी बाळा सदा तु हांस
रिझवी रे मातापिता मानस
उधळी संभोती सौम्य सुवास
जो बाळा जो जो रे जो //
गोविंद घ्या कुणि गोपाळ घ्यावा
कृष्णाच्या घ्या कोणि सहस्त्र नांवा
आनंद म्हणुनी पाळणी ठेवा
जो बाळा जो जो रे जो //
औक्षवंत हो मनरमणा
जीवनीं मिळवी सौख्यसाधना
मावशी देते आशिर्वचना
जो बाळा जो जो रे जो //
(ऑगस्ट 1953)
न्या हो आंता प्राण
देवा …………
न्या हो आंता प्राण //
सोसत नाहीं वेदना ही
अंगाची मम होते लाही
दु;खाला या सीमा नाहीं
नाहीं उरले त्राण //
या जन्मीं ना पाप चिंतिलें
गत जन्मींचे संचित सरले
हाल सोसणें भाळीं लिहिंलें
दैवाचें हें दान //
लेक जांवई घरी नांदले
नातू पणतू अंकि खेळले
आनंदाने घर मम भरलें
नाहीं कसली वाण //
असले आयु जर या पुढतीं
क्षणापळांची ना करी गणती
घाल तयांच्या सारें खातीं
माझी तुजला आण //
नाही उरली कसली आंस
लागे निशिदिनीं एकच ध्यास
मरणा घेई अपुला घांस
तुझेंच आतां ध्यान //
असशिल तेथुन घेई धांव
ठेवतील जन तुजला नांव
मम अंतरी परि भक्ति भाव
करुणेची तूं खाण //
(1952)
कसे जुळावें कर हें नकळे
कसे जुळावें कर हें नकळे //
व्यक्तित्वाचे माजति डोंगर
दिव्यत्वाचें भरविती सागर
अनुभवाचे किती अवडंबर
सत्यालाही न फुटे पाझर
महत्व नाही आंता उरले //
वेलीवरची सुंदर सुमन
सुवास उधळित नाचति मन्मन
प्रभुपदी पडतां करिती वंदन
दुज्या दिनि तें निर्माल्यचपण
गंगेमाजी सोडुनि दिधले //
चैत्रपालवी झाडावरली
वसंतशोभा किती वाढली
तरूलतांचे जीवन जगली
शिशिरामाजी वाळून गळली
पाचोळ्याला जळणें आलें //
कोर बीजेची लोभसवाणी
हतभाग्याची ती ओवाळणी
पूर्ण चंद्रमा जग वाखाणी
चतुर्दशीचा मनीं ज ध्यानीं
क्षणी चंद्राचे कौतुक कुठलें //
*********
‘ तोच स्वर्ग माझा ‘
तोच स्वर्ग माझा / जेथें माझे घर
प्रेमाचे तुषार / न्हाणीताती //
तोच स्वर्ग माझा / जिथे माझा राया
त्याचीच मी जाया / जन्मभरी //
तोच स्वर्ग माझा / आभाळ छाया
वडिलांची माया / लाभे जेथे //
तोच स्वर्ग माझा / चिमणी पांखरे
अमृताचे झरे / पाझरती //
तोच स्वर्ग माझा / बाळांचे ते बोल
आनंदाला मोल / नाहीं दुजें //
तोच स्वर्ग माझा / नको हिरे मोतीं
आसवांचे मोती / प्रेमापोटीं //
तोच स्वर्ग माझा / नको घर गाडी
छोटिशी झोंपडी / माझी जेथें //
तोच स्वर्ग माझा / साखरेंत तूप
होती एकरूप / जीव दोन्हीं //
तोच स्वर्ग माझा / विरे भाळीं आठी
हसूं फुटे ओठीं / आनंदानें //
तोच स्वर्ग माझा / प्रेम घ्यावें द्यावे
प्रेमात मरावे हीच आशा //
तोंच स्वर्ग माझा / माझें माझें सारें
जागृतीत वीरे / स्वप्न माझें //
(1953)
‘दिर्घायू ‘
अनेक वर्षे कष्ट सोशिले अखंड शारिरिक /
परंतु लिहिले नव्हतें कधींच भोगसुख //
परहीतास्तव झिजतां सार्थक जन्माचे झालें /
परंतु आनंदहि ना स्वास्थ्यहि कधि मिळालेंलें //
उत्कर्षाचे ध्येय गांठण्या निबिड मार्ग क्रमिला /
परंतु ओठीं नाही आला समाधान पेला //
हांव न सरे संसारी ना मोह सुटे काय /
वलयजालिं कमलाच्या कां पडला पाय //
श्रमसाफल्यहि झाले देई दैव दो करानीं /
परंतु कर्महि घेऊन जाई सत्य ठरे वाणी //
बीज लाविले, पाणि घालुनि रोप वाढवले /
परंतु आस्वादिलेंच नाही फळे फुले भरले //
भाग्य उदेलें लक्ष्मि होई चरणाची दासी /
परंतु भाळीं नाही घेणे श्रीच्या सेवेसी //
नको नको हें दिर्घायु हा नको नको मोह /
अल्पतेंतहि समाधान हा तृप्त असे जीव //
(1948)
‘ लोक म्हणती ‘
(अवकाळी पावसास पाहून)
ऐकु येती आवाज बंदुकांचे /
लाठि काठी ही तशी नित्य नाचे /
म्हणुनि मति धडधडे तवहि छाती /
लोक म्हणती संगीत मेघ गाती //
अमानुषता ही जाळीते जिवाला /
बघुनि अन्याया क्रोध तुला आला /
नेत्रज्वाला अंतराळात जाई /
लोक म्हणति नाचते चपलता ही //
शिवाशिवाचा खेळ मरण खेळे /
बळी पडती निष्पाप तुझी बाळे /
म्हणुनि नयनातुनि गळति अश्रुधारा /
लोक म्हणति पडति या वर्ष धारा / /
आज मानवता दिसतसे पिडीत /
आदिमाये सहभागी तूंच त्यांत /
दाविसि सक्रिय सहानुभुती /
लोक म्हणती संकटे सर्व येती //
अन्नटंचाई परतंत्रता तशी हो /
तेढ जातिंची तशी रोगराई /
मनुंजनिर्मित मोक्षसाधने ही /
लोक म्हणती असति मृत्युदायी //
त्यांत ओला दुष्काळ अतां होय /
निसर्गाचा पांचवा हा उपाय /
घरहि फिरतां फिरतात सर्व वासे /
लोक म्हणति आज हे सार्थ भासे //
(1946)
‘ राहुं कैशी एकली ‘
सांग केंव्हा येशि राया / परतुनिया तूं घरा /
अधिर झाले मीलनाते / विरह आता हा पुरा / /
विरह होई एक रात्र / मनीं वाटे मत्सर /
काळजीने काळी होई / कां निशा ही सुंदर //
शशी खेळे लपंडाव / विरह विसरे कामिनी /
स्वागतातें सिद्ध होई / तत्पक्राशे नाहुनी //
रवी भेटे नभ:श्रीला / विरहरात्र संपली /
अरूण माझा येई केंव्हा / आंस एक लागली //
मंद डोले कमलिनी ती / जलतुषारीं नाहुनी /
भ्रमर येई चुंबण्याते / विकसते आनंदुनी //
पाखराचे दोन जीव / सौख्य सांडे भरुनिया /
चोंच चोंची घालताच / मने गेली मिळूनिया //
उषा होई अधिर मिलना / क्षितिज राया प्रिय सखा /
म्हणून लाली कपोली कां? / रंग कां हा प्रितीचा //
निघुनि राया जाई आंता / क्रोध आला कां मनी /
म्हणुनि कां तूं पश्चिमे ग / रक्तवदना जाहली //
भेटण्याते जाई सरिता / दुर जरि हा सागर /
मनहि येई तुझ्यामागे / तोडले हे अंतर //
जीव हा बेचैन आतां / धांव घे मेघ खाली /
नाहुं घाली जलप्रेमी / धरादेवी सुंदरी //
सृष्टी खेळे प्रणयक्रिडा / निसर्गाशीं भोवताली /
पुजविना मी सांग राया / रांहु कैशी एकली //
(1946)
प्रेमाची ऊब
चित्रविचित्र अशि ठिगळांची
गोधडी इथेंहि वाळते कुणाची
धुतली धुतली पाटाच्या पाण्यात
बाभुळिवरहि घातली वाळत
फाटला पदर जुन्या लुगड्याचा
जोडीला धडपा एक टापशिचा
अंगड्याचे रंगीबेरंगी तुकडे
नक्षीला जोडले एका पुढे पुढे
रंगामधे आहे अज्ञानाचि छटा
टांक्याटांक्यातुन कष्टांचाच सांठा
रूपांत भरल दारिद्र्य केवढे
काटकसरीचें नाव जगापुढे
संध्यारंग आणि फुलांचा गालिचा
रंगसंगतिचा काठ कशिद्याचा
सौंदर्य विश्वातिल इथे सामावलें
अंतरंग खरे त्यात उमटलें
रांकट हातानी अंगी पडली
प्रेमाच्या उबेंत झोंप सुखावली //
6 जानेवारी 1949
स्वातंत्र्य दिन
मंगल दिन हा आज पातला ही मंगल वेला
स्वातंत्र्याचा सूर्य आज हा येई उदयाला //
दास्याची ही महाभयंकर काळरात्र गेली
तेजोमय ही नवी शलाका येई उदयांचली //
पहांट तारे मिचकाउनियां नयन हांसतात
त्या रात्रीला शेवटचा हा निरोप देतात //
सडा अंगणी मंगलमय हा मेघराज घालीं
रविरश्मिंची रंग वल्लिका रेंखीव या कालीं //
दास्य श्रुंखला तुटल्या तटतट मिळता ही मुक्ती
आनंदोत्सव करण्यात्सव कां वाद्ये दुमदुमती //
मेघचौघडा गरजे वायु वाजवितो सनई
विद्युत तोरण बांधियले जणुं निसर्ग नवलाई //
पहांट होता पक्षी उडाले गीत गांत गांत
ध्वजा गगनिं या, ऐंकू येई स्वतंत्रेचे गीत //
निजलेल्या या कळ्या उमलल्या आनंदित झाल्या
स्वागतसमयी सुवाससिंचन करण्यास्तव आल्या //
मंगलसमयी कुंकुमतीलक लावियला कोणी
उषा नव्हे कां? तीच तीच ही सुवासिनी राणी //
परी दिसेना कुठे कशी ही मंगलमय अरती
ओंवाळुनिया पंचप्राणा केली असे पूर्ती //
ज्यांनी दिधले देहमोल ते आज तृप्त झाले
आनंदाश्रु-पुष्पवृष्टि ही स्वर्गातुन चाले //
सौभाग्याचा दिवस आज येई भारताला
जगत जननि ही आशिर्वचना देई या काला //
तिरंगी ध्वज हा नभी फडकला नवीन राष्ट्राचा
अभिमान हा जागृत ठेवील गत इतिहासाचा //
सुखशांती ही तशी सधनता येवो ही आंस
भविष्य़काल उज्वल दिसतो प्रथम जरी त्रास //
[15 ऑगस्ट 1947 (मध्यरात्र)]
कविता छान आहेत , आशयगर्भ आहेत . अजून काही कविता असतील तर ब्लॉग वर टाका ,
संदीप
संदीप-
माझ्या आईने केलेल्या कवितांची संख्या मोठी आहे. त्यातल्या काही निवडक कविता ब्लॉगवर प्रसिद्ध करण्याचा माझा मानस आहे. हळूहळू तुम्हाला त्या वाचायला मिळतीलच.
‘सूर्यवंशी उत्तानपाद राया’ या दिण्डी-छन्दामधल्या प्रसिद्ध काव्यांत खूपच छन्दशैथिल्य आहे. सराईत कवींइतका छन्दशुद्धतेचा आग्रह न धरताही, ‘ऐकु येती आवाज बंदुकांचे’ या दिंडीत काही ओळी म्हणायला त्रास होतो.
म्हणुनि मति धडधडे तवहि छाती — १७ मात्रा (दिंडीतल्या ओळीत १९ मात्रा हव्यात, इथे अतिलघुत्व छन्दाची हानी करतं, हे माझं मत)
अमानुषता ही जाळीते जिवाला — २० मात्रा (ळि र्हस्व केला तर हा दोष दूर होतो)
शिवाशिवाचा खेळ मरण खेळे – ‘शिवाशिवा’ अशी सुरवात दिंडीत बसतच नाही. सगळे गुरु असल्यास त्यातल्या एकाचा उच्चार चोरटा करून गाडी चालवता येते. उदा: त्या(चा) माझा सहवास घडो स्वामी – कंसातला ‘चा’ झटकन म्हणावा लागतो, तरच दिंडीच्या ओळीतले उपविभागांचे मात्रानियम पाळले ज़ातील.
दाविसि सक्रिय सहानुभुती — फक्त १५ मात्रा
मनुंजनिर्मित मोक्षसाधने ही — फक्त १७ मात्रा
लोक म्हणती असति मृत्युदायी — इथेही दोन मात्रा कमी
तरी बहुतांश कविता या वृत्ताचे नियम पाळते.
– नानिवडेकर
या कविता पुस्तकरूपात आणायचा तुमचा विचार असल्यास तेंव्हा शब्दांची फेरफार करावी का, हा प्रश्न कठीण आहे. आवश्यक तिथे फेरफार करावी, कारण त्यामार्गे रचनादोष दूर करता येतात. कवी हयात असेल आणि त्याला सुचवलेला बदल मान्य असेल तर प्रश्नच नाही. पण ते शक्य नसल्यास कवीचे मूळ शब्द तसेच ठेवण्यालाही महत्त्व आहेच.
उदा. ‘देहे/तनू’ हे दोन्ही शब्द एका प्रसिद्ध ओळीत वाचायला मिळतात. माझा अन्दाज़ आहे की रामदासांनी ‘देहे त्यागिता मूर्ती मागे उरावी’ असे शब्द लिहिले असावेत. ‘दे’-चा संक्षिप्त उचार करून ही ओळ भुजंगप्रयातात म्हणता येते, आणि असे संक्षिप्त उच्चार असलेली रचना रामदासांपूर्वी एकनाथ करतही. पण पुढे कोणीतरी ती ओळ भुजंगप्रयातात बसवायला ‘तनू त्यागिता’ असा बदल केला असावा. ‘तनू’ शब्द अशुद्ध आहे, पण अशी ओढताण रामदास खूप करत. तरी त्यांनी ‘तनू’ शब्द लिहिला असता, तर पुढे इतर कोणी तिथे बदल करून ‘देहे’ शब्द घुसडण्याचा संभव कमी आहे. म्हणून मूळ शब्द ‘देहे’ असावा असा माझा अन्दाज़ आहे.
– डी एन
नानिवडेकर –
तुमचे दोन्ही प्रतिसाद वाचून खूपच आनंद वाटला. एवढ्या बारकाईने तुम्ही माझ्या आईच्या एका कवितेतील छंद मात्रांचे विश्लेषण केलेत या बाबत मनापासून आभार. माझी या बाबतीतील अडचण अशी आहे की माझ्या आईने लिहून ठेवलेल्या कवितांच्या वहीतील काही पाने अतिशय जीर्ण झाल्याने तिने स्वत: तिच्या वृद्धापकाळात, अशा जीर्ण पानांवरच्या कविता कोणाकडून तरी दुसर्या कागदावर लिहून घेऊन आपल्या मूळ वहीत डकवल्या आहेत. या कविता परत लिहिताना त्या व्यक्तीने शुद्धलेखनाच्या किंवा छंदमात्रेच्या काय चुका केल्या आहेत हे मला शोधून काढणे अशक्य आहे. त्यामुळे मी या कविता प्रकाशित करताना आईच्या वहीनुसारच घेतल्या आहेत. त्यात तिने मूळ काय लिहिले होते ते सांगणे कठिण आहे. जर कोणाला ही कविता गाण्याची इच्छा असेल तर गाताना त्यात काय अडचण येईल त्या प्रमाणे बदल करणे शक्य आहे. मात्र प्रकाशित करताना त्या मूळ वहीप्रमाणेच करणे आवश्यक आहे असे मला वाटते.
kavita chaan aahe sir………………….
गीता-
धन्यवाद दोन्ही प्रतिसादांबद्दल
ALL are best..I like it so much. keep posted such poem. Really great!!! and thank you so much for sharing. God bless you sir.
Vai-
Thanks for your response. I would be sharing more such poems in future
Khupach chhan kavita.. Agadi manala sparshun jatat.
गौरी –
प्रतिसादासाठी धन्यवाद.