काकु ‘ज किचन

अक्षरधूळचे वाचक जगभर पसरलेले आहेत. त्यांच्यात अनुभवी गृहिणी आहेत, नव्याने संसार थाटलेल्या महिला आहेत. एकटे राहणारे व स्वत: स्वैपाक करणारे पुरुषही आहेत. या शिवाय खवय्ये असलेला पुरुषवर्ग तर आहेच आहे. या सर्वांसाठी अनुभवसिद्ध अशा काही पाककृती देण्याचा हा नवा उपक्रम मी सुरू करत आहे. यात अस्सल मराठमोळ्या, वर्‍हाडी, कोकणातल्या डिशेस या बरोबर परप्रांतीय आणि अगदी परदेशी डिशेसचा सुद्धा अंतर्भाव असणार आहे. पाककृतींची निवड करताना फक्त एकच निष्कर्ष डोळ्यासमोर ठेवला आहे तो म्हणजे त्या पदार्थाची लज्जत! वाचकांना हा उपक्रम आवडेल अशी आशा आहे. तुम्हाला काय वाटते ते जरूर कळवा.

कोबीगाजर चविष्ट भाजी

साहित्य

कोबी-2कप, गाजर-1कप, लाल मिरची– 1किंवा 2, कढि पत्ता– 7/8 पाने, उडीद डाळ– 2टी स्पून, हरबरा डाळ– 2टी स्पून, तीळ– 1/2टी स्पून, मीठचवीनुसार, साखरचिमूटभर, तेलफोडणीकरता 1टेबल स्पून, जिरे– 1टी स्पून, खवलेला नारळ– 2टेबल स्पून, चिरलेली कोथिंबीर– 1टेबल स्पून.

तयारी

1. कोबी बारीक पण लांब लांब चिरणे.

2. गाजर साल काढून चिरणे.

3. उडीद डाळ हरबरा डाळ भिजत घालणे.

4. नारळ खवून घेणे.

5. कोथिंबीर बारीक चिरून घेणे.

कृती

1. कढई गरम करून त्यात तेल घालावे.

2. तेल तापल्यावर जिरे, लाल मिरची, तीळ, कढिपत्त्याची पाने घालावी.

3. नंतर भिजलेली उडीद व हरबरा डाळ घालून थोडा वेळ परतावी.

4. किंचित लालसर दिसण्यास लागल्यानंतर त्यात कोबी व किसलेले गाजर घालावे.

5. लगेचच मीठ व साखर घालून परतत रहावे. गॅस मोठाच ठेवावा व झाकण ठेवू नये.

6. कोबी जरा बोटचेपा झाल्यावर गॅस बंद करावा.

7. त्यावर भरपूर नारळ व कोथिंबीर घालावी. परतून सर्व्ह करावे.भाजी जास्त शिजू देऊ नये.

(टिपही भाजी करण्यास अतिशय सोपी आहे. व चटकन तयार होते. )

**********

घडा भाजी

मूळ वैदर्भीय ओरिजिनची मसालेदार भाजी

(नावाप्रमाणेच ही भाजी पूर्वी खरे तर घड्यात शिजवत असत. शहरी संस्कृतीत ते शक्य नसल्याने, नाव जरी जुने असले तरी कृती मात्र आधुनिक काळातली आहे.)

4 व्यक्तींसाठी

साहित्य:-

छोटी वांगी– 7किंवा 8, छोटे बटाटे– 7 किंवा 8, फ्लॉवर गड्डा 1 (लहान आकाराचा), गाजरे 2, मेथी गड्डी-1, सर्व प्रकारची पापडी – 1/4 किलो, तेल– 3-4 टे. स्पून, हरबरा डाळ पीठ– 3-4 टे.स्पून, काळा (गोडा) मसाला– 4-5 टी स्पून, मीठ,तिखटचवीनुसार, मोठा नारळ 1, कोथिंबीर पाने– 2 टे. स्पून, मोठी केळी (अर्धवट पिकलेली) 4, साखर– 2 ते 4 टी स्पून, तीळ– 1टी स्पून, धन्याची पूड– 2 टी स्पून, गरम मसाला– 2 ते 3 टी स्पून, मोहरी, हिंग, हळद आवश्यकतेनुसार.

तयारी:-

1. वांगी भरण्यासाठी थोडे देठ ठेवून 4 काप करून घ्यावे व पाण्यात ठेवावी.

2. बटाट्यांची साले काढून मध्यभागी 1 खाप करून (2 तुकडे न होऊ देता) पाण्यात टाकावे.

3. फ्लॉवरची मोठी फुले काढून त्यावर खाचा घ्याव्या व ती पाण्यात टाकावी.

4. गाजराची साल काढून त्याचे जाड गोल तुकडे करावे.

5. पापडीच्या रेषा काढून तुकडे न करता निवडावी व 5-10 मिनिटे वाफवून घ्यावी.

6. मेथी निवडून, धुवून बारीक चिरून घ्यावी.

7. नारळ खरवडून घ्यावा.

8. कोथिंबीर चिरून घ्यावी.

9. चिरलेल्या मेथीत डाळीचे पीठ, चवीनुसार मीठ, तिखट व धन्याची पूड व थोडे पाणी घालून एकजीव घट्ट मिश्रण करावे.

कृती:-

1. 1 वाटी नारळाचा चव बाजूला काढून त्यात साखर घालावी.

2. उरलेल्या नारळात गोडा मसाला, मीठ, तिखट,धन्याची पूड, गरम मसाला, तीळ घालून चांगले मिश्रण करावे.

3. वांगी, बटाटा, फ्लॉवर यांना घेतलेल्या खांचा मध्ये हे तयार मिश्रण भरावे.

4. वाफवलेली पापडी थंड होऊ देऊन त्यातही हे मिश्रण भरावे.

5. केळ्याचे प्रत्येकी 3 तुकडे करावे. देठ काढून टाकून तुकड्यांना उभी चीर घ्यावी व त्यात नारळ व साखर एकत्र करून भरावे.

6. जड बुडाचे भांडे गॅसवर ठेवून त्यात तेल गरम करण्यास ठेवावे.

7. मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी.

8. मिश्रण भरलेली वांगी, बटाटे घालून हलक्या हाताने कालथ्याने हलवून घ्यावे व झाकण ठेवून 1 किंवा 2 वाफा येऊ द्याव्यात.

9. फ्लॉवर, गाजरे व भरलेली पापडी भाजीत घालावी व भाजी मोडणार नाही अशा प्रकारे हलवून घ्यावी व परत झाकण ठेवून 1-किंवा 2 वाफा येऊ द्याव्यात.

10. हे करत असतानाच एकीकडे मेथीच्या मिश्रणाचे लहान चपटे वडे थापून, तळून घ्यावेत.

तळलेले वडे भाजीत घालावेत.

11. भाजी चांगली शिजली की त्यावर भरलेली केळी ठेवावीत. झाकण ठेवून 1 वाफ येऊ द्यावी व नंतर गॅस बंद करावा. मात्र झाकण काढू नये म्हणजे केळी व्यवस्थित शिजतील.

12. बोल किंवा डिशमध्ये भाजी काढून घ्यावी. त्यावर कोथिंबीर, नारळ पेरावा व भाजी सर्व्ह करावी.

*************

भरलेल्या भोपळी मिरच्या

एक झटपट डिश ! ( अर्थात , पूर्वतयारी केलेली असल्यास )

( 4 व्यक्तींसाठी)

साहित्य :- भोपळी मिरच्या– 6 (मध्यम आकाराच्या), बटाटे -4 (मध्यम आकाराचे), तेल– 3 टेबल स्पून, लिंबू– 1 लहान, कोथिंबीर– 2 टेबल स्पून, हिरव्या मिरच्या – 2, किंवा लाल तिखट, मीठ, साखर– 1 टी स्पून, फोडणीचे साहित्यमोहरी, हिंग , हळद, लसणीच्या पाकळ्या– 4 ते 5 , टोमॅटो 1 किंवा 2 (मध्यम आकाराचे), कांदा – 1

तयारी :-1. भोपळी मिरच्या धुवून डेखासकट मध्यभागी चिरून त्यांचे दोन भाग करावे व आतील बियांचा भाग काढून टाकावा.

2. पातेल्यात पुरेसे पाणी घेऊन ते पातेले गॅसशेगडीवर उकळण्यास ठेवावे. त्यात चिमूटभर मीठ घालून पाण्याला उकळी आल्यावर, त्यात भोपळी मिरच्यांचे अर्धे केलेले भाग वाफवून घ्यावे. मिरच्यांचा हिरवा रंग बदलून किंचित पोपटी रंग आला की गॅस बंद करावा.

3. पातेल्यातील पाणी काढून टाकून मिरच्या रोवळीमध्ये उलट्या कराव्यात म्हणजे सर्व पाणी निथळून जाईल.

4. बटाटे उकडून त्यांच्या साली काढाव्यात व बारीक फोडी कराव्यात.

5. लसूण पाकळ्यांचे बारीक तुकडे करून घ्यावेत.

6. कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.

कृती :-

1. 2 टेबल स्पून तेल कढईत ठेवून, मोहरी, हिंग व हळद घालून फोडणी करावी.

2. बटाट्यांच्या फोडी, मीठ, साखर, तिखट, लसणीचे तुकडे घालून भाजीवर झाकण ठेवावे व 2/3 वेळा वाफ येऊ द्यावी. यानंतर गॅस बंद करावा.

3. भाजी थंड झाल्यावर त्यात कोथिंबीर व लिंबाचा रस घालून व्यवस्थित ढवळून घ्यावी.

उकडलेल्या भोपळी मिरच्यांच्या अर्ध्या भागांत, भाजी कडेपर्यंत भरून घ्यावी.

4. एक शॅलो फ्राइंग पॅन, गॅसवर ठेवून त्यात 1/2 टेबल स्पून तेल घालावे.

5. तेल गरम झाल्यावर भरलेल्या बटाट्याच्या बाजूने पॅन मध्ये मिरच्यांचे अर्धे भाग ठेवावेत. झाकण ठेवू नये.

6. भाजीला किंचित लालसर तपकिरी रंग आला की मिरच्या दुसर्‍या बाजूंनी अगदी थोडा वेल ( एखादे मिनिट) फक्त शेकून घ्याव्या.

7. गॅस बंद करून मिरच्यांचे अर्ध भाग सर्व्हिंग प्लेटमधे आकर्षक रितीने सजावट करून मांडावे. सजावट करण्यासाठी टोमॅटो व कांद्याच्या चकत्या करून त्या वापराव्या.

*************

 कोळातली कणसं

 फक्त चाखून बघा!

 (4 व्यक्तींसाठी)

साहित्य :-

अमेरिकन स्वीट कॉर्न कणसे– 2 , नारळ – 1 मध्यम आकाराचा ( किंवा तयार नारळाचे दूध 400 te 500 ग्रॅम) , चिंच लिंबाएवढी, मीठ, गूळ, तिखटचवीनुसार, तूप किंवा तेल– 2 टी स्पून, जिरे– 1/4 टी स्पून, हिंग -1/4 टी स्पून, लाल मिरची– 1, कढीपत्ता– 4किंवा 5 पाने, कोथिंबीर पाने– 1 टी स्पून

.तयारी:-

1. कणसे, वरील आवरण काढून धुवून घ्यावी.

2. प्रेशर पॅनमधील खालची जाळी काढून टाकावी व कणसे आत ठेवून ती बुडतील एवढे पाणी घालावे.

3. चिमूटभर मीठ घालून कणसे शिजवून घ्यावी. (प्रेशर पॅनच्या निदान 10 ते 12 शिट्या होऊ द्याव्यात म्हणजे कणसे छान शिजतील)

4. कुकर थंड झाल्यावर कणसे बाहेर काढून त्यांचे 1 इंच लांबीचे तुकडे करावे.

5. नारळ खरवडून खव मिक्सरच्या भांड्यात ठेवावे. त्यामधे खव बुडेल एवढे कोमट पाणी घालून 5 मिनिटे ठेवावे.

6. मिक्सर चालू करून नारळाचे दूध करून घ्यावे व ते गाळणीतून गाळून घ्यावे.

7. चिंच कोमट पाण्यात भिजवून त्याचा कोळ काढून घ्यावा.

कृती:-

1. नारळाच्या दुधात चिंचेचा कोळ, गूळ, मीठ व तिखट घालून एकजीव करून घ्यावे. फार घट्ट वाटल्यास थोडे पाणी घालावे.

2. कणसाचे तुकडे नारळाच्या दुधात घालावे.

3. मिश्रणाचे पातेले मंद आचेवर ठेवावे. नारळाचे दूध सतत ढवळणे आवश्यक आहे ,म्हणजे ते फाटणार नाही.

4. 1 किंवा 2 उकळ्या येऊ द्याव्या.

5. कढल्यात तेल किंवा तूप घेऊन तापल्यावर जिरे, हिंग, कढीपत्ता व लाल मिरची घालून खमंग फोडणी करावी.

6. फोडणी नारळाच्या दुधाच्या मिश्रणावर घालावी व एक उकळी येऊ द्यावी.

7. गॅस बंद करून मिश्रण सर्व्हिंग बोल मधे काढावे व वर कोथिंबीर पेरावी.

**********

टोमॅटो झुणका

एक लज्जतदार वर्‍हाडी तोंडीलावणे

(4 व्यक्तींसाठी)

साहित्य

मो आकाराचे 4 लाल टोमॅटो, 6 किंवा 7 लसणीच्या पाकळ्या, 1 हिरवी मिरची, कोथिंबीर – 3किंवा 4 काड्या, तेल– 2 टेबल स्पून, हरबरा डाळ पीठ– 3 टेबल स्पून, मीठलाल तिखट गूळ– (चवीनुसार), फोडणीचे साहित्यमोहरी, हिंग, हळद

तयारी

1. टोमॅटोच्या मोठ्या फोडी करून घ्याव्यात.

2. लसणीच्या पाकळ्यांचे तुकडे करून घ्यावेत.

3. हिरव्या मिरचीचे तुकडे करून घ्यावेत.

4. कोथिंबीर पाने खुडून घ्यावी

कृती

1. जाड बुडाच्या कढईत तेल तापत ठेवून फोडणी करून घ्यावी त्यात लसणीचे तुकडे घालावे.

2. टोमॅटोच्या फोडी, फोडणीत घालून ढवळून घ्याव्या. मीठ, गूळ, थोडे लाल तिखट घालावे.

कढईवर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी.

3. शिजलेल्या टोमॅटोवर हरबर्‍याच्या डाळीचे पीठ, सर्व फोडी झाकल्या जातील या पद्धतीने पेरावे. मिश्रण एकदा चांगले ढवळून कढईवर झाकण ठेवावे व परत एक वाफ येऊ द्यावी.

4. डाळीचे पीठ शिजले की ढवळून गॅस बंद करावा.

5. तयार झालेला झुणका सर्व्हिंग बोल मधे काढून त्यावर कोथिंबीर पाने पेरावी.

(टीप:- मिश्रण खाली लागण्याची शक्यता असल्याने मंद गॅसवरच शिजवावे.)

********

डाळतोंडलं

एक मस्त भाजी

 

साहित्य

लहान आकाराची तोंडली– ¼ किलो, तूर डाळ– 1/2 कप, भुईमूग दाणे– 1/4 कप, लाल तिखट 1 चहाचा चमचा, (तिखट चव आवडत असल्यास जास्त घेणे.) मेथी दाणे– 1/4 चमचा, मीठ, गूळ.

फोडणीचे साहित्य – 2 टेबल स्पून तेल, मोहरी, हिंग, हळद, 2ते 4 मेथी दाणे, 4 किंवा 5 लसूण पाकळ्या, कोथिंबीर पाने -1 चमचा, खवलेले ओले खोबरे.

तयारी

1. तोंडली उभी बारीक चिरून घ्यावी व पाण्यात घालून ठेवावी.

2. तूर डाळ आणि 1/4 चमचा मेथी दाणे एकत्र करून 1 ते 2 तास पाण्यात भिजत ठेवावे.

3. भुईमूग दाणे 1 तास पाण्यात भिजत ठेवावे.

कृती

1. चिरलेली तोंडली वाफवून किंवा कुकरमधे शिजवून गार होऊ द्यावीत.

2. भुईमूग दाणे कुकरमधे शिजवून घ्यावेत.

3. पातेल्यात 1 टेबल स्पून तेल गरम करून फोडणी करून घ्यावी.

4. भिजवलेली डाळ फोडणीस टाकून परतून घ्यावी.

5. परतलेली डाळ भिजेल इतके पाणी घालून डाळ शिजू द्यावी. गॅसची उष्णता कमी करून सिमर होईल अशी ठेवावी. डाळीवर घट्ट झाकण न ठेवता एखादा मोठा चमचा ठेवून मग झाकण ठेवावे. यामुळे वाफ जायला जागा राहते व डाळीचे पाणी उतू जात नाही.

6. डाळ जास्त शिजू देऊ नये. शिजलेली डाळ हाताने दाबून बघावी व ती दाबली जात असल्यास शिजवून गार केलेली तोंडली त्यात घालावी. तोंडल्यामधील खाली राहिलेले पाणी आवश्यक वाटल्यास डाळीत घालावे.

7. शिजवलेले भुईमूग दाणे पाणी काढून टाकून घालावे.

8. भाजीमध्ये चवीनुसार मीठ व तिखट घालून वाफ येऊ द्यावी. यावेळेस झाकणाखाली चमचा ठेवण्याची आवश्यकता नाही.

9. भाजीमधे चवीप्रमाणे गूळ घालून शिजू द्यावी. झाकण ठेवण्याची आवश्यकता नाही.

10. एका कढल्यामधे फोडणीसाठी तेल घालावे. तेल गरम झाल्यावर लसूण पाकळीचे मध्यम आकाराचे तुकडे करून घालावे. लसूण लालसर झाल्यावर मोहरी, हिंग व हळद घालावी.

11. गरम फोडणी भाजीवर घालावी. भाजीला एक वाफ देऊन गॅस बंद करावा.

12. भाजी सर्व्हिंग बोलमधे काढून त्यावर खोबरे व कोथिंबीर पसरावी.

*********

मुळ्याचा चटका

एक झणझणीत व चटकदार कोशिंबीर

साहित्य

 पांढरा मुळा 1 नग, हरबर्‍याची डाळ – 1/4 वाटी, हिरवी मिरची – 1 किंवा 2, अर्धे कापलेले लिंबू, तेल – 1 टेबल स्पून, मीठ, साखर, कोथिंबीर, खवलेला नारळ, फोडणीचे साहित्य जिरे, हिंग, लाल मिरची,

 तयारी

 1.पांढरा मुळा साल काढून बारीक किसून घ्यावा.

2.हरबर्‍याची डाळ कोमट पाण्यात चांगली मऊ हो ईल एवढी (अंदाजे 1.5 ते 2 तास) भिजवून घ्यावी.

 3.हिरवी मिरची बारीक वाटून घ्यावी.

4. अर्ध्या लिंबाचा रस काढून घ्यावा व त्यात बिया आल्या असल्यास काढून टाकाव्या.

कृती

1. भिजवलेल्या डाळीमधील पाणी काढून टाकून ती मिक्सरमधून भरड वाटून घ्यावी.

 2. एका बोल मध्ये वाटलेली डाळ, किसलेला मुळा, वाटलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ व साखर आणि काढलेला लिंबाचा रस हे घालून हे मिश्रण चांगले एकत्रित करावे.

3. मिश्रणावर झणझणीत फोडणी घालावी व परत मिश्रण ढवळावे.

4. तयार झालेल्या चटक्यावर थोडी कोथिंबीर व खवलेले नारळाचे खोबरे पसरावे.

मुळ्याचा उग्रपणा जाऊन तयार झालेली ही चटकदार कोशिंबीर सर्वांना आवडतेच.

***********

पतियाळी बैंगन

एक चटकदार व लज्जतदार भाजी

साहित्य

वांगी छोटी (शक्यतो कमी बिया असलेली) – 1/2 किलो, टोमॅटो (मध्यम आकाराचे) – 2 किंवा 3 नग

कांदे – 2 नग, भोपळी मिरची – 1 नग, हिरवी मिरची (मध्यम लांबीची) – 1 नग, आल्याची पेस्ट -1 चहाचा चमचा, लसूण पेस्ट – 1/2 चहाचा चमचा. तेल

फोडणीचे साहित्य कांदा बी, मोहरी, मेथीदाणे, बडीशेप, जिरे, रगडलेले धने

 तयारी

वांग्याचे पातळ काप (पाव इंचापेक्षा कमी जाड) करून पाण्यात टाकावे. जरा वेळाने काप बाहेर काढून पेपर टॉवेलवर ठेवून कोरडे करावे. टोमॅटो व भोपळी मिरची यांचे अर्धा इंच लांबीचे तुकडे करावे. कांदा बारीक (पाव इंच जाडीचे तुकडे) चिरून घ्यावा. हिरव्या मिरचीला लांबीच्या दिशेने अर्धा छेद घेऊन आतील बिया काढून टाकाव्या.

कृती

 1. कढईत 2 वाट्या तेल गरम करून त्यात वांग्याचे काप, हलका ब्राऊन रंग येईपर्यंत, मंद आंचेवर तळून घ्यावेत.

 2. दुसर्‍या कढईत 1 टेबल स्पून तेल घेऊन फोडणी करावी. फोडणी करताना सढळ हाताने फोडणीचे साहित्य घालावे.

3. फोडणीमध्ये, चिरलेला कांदा, हिरवी मिरची, आले, लसूण पेस्ट घालून कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावा. नंतर चिरलेले टोमॅटो व भोपळी मिरची टाकून, परत परतून घ्यावे. मीठ व थोडी साखर चवीनुसार घालावी

4. थोडी हळद व आवश्यकतेनुसार तिखट घालून कढईवर झाकण ठेवावे आणि एक किंवा दोन वाफा येऊ द्याव्यात.

5. तयार झालेल्या भाजीत, वांग्याचे तळलेले काप घालावेत व हलक्या हाताने भाजी ढवळावी. कढईवर परत एकदा झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी.

6. तयार भाजी बोल मध्ये काढून वर कोथिंबीर पेरावी. भाजी गरमागरम सर्व्ह करावी.

************

Advertisements

चर्चा

7 thoughts on “काकु ‘ज किचन

 1. Thanks for providing patapat-chatpatit dishes!!!

  Posted by Tej | जून 19, 2012, 5:41 pm
 2. khup chan ani dhanyawad

  Posted by shubhangki kulkarni | मार्च 21, 2013, 2:47 pm
 3. mast receipies. zakas.

  Posted by sdgorhe | एप्रिल 17, 2013, 4:03 pm
 4. mast pakkruti ahet. zakas

  Posted by sdgorhe | एप्रिल 17, 2013, 4:05 pm

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: