अनुभव Experiences

बेंगलुरूची गाढवे; Donkeys of Bengaluru

माझ्या लहानपणी पुण्यातले बरेच रस्ते डांबरीकरण न झालेलेच होते. या रस्त्याने जेंव्हा केंव्हा एखादे मोटर गाडी सारखे वाहन जात असे तेंव्हा ते भरपूर धुरळा अडवत जात असे. असे असले तरी मोटर गाडीने उडवलेला धुरळा काहीच नाही, असे म्हणण्याची कधी कधी वेळ येत असे. सायकलवरून जात असताना अचानक रस्त्यावर पुढे प्रचंड धुरळा उडलेला दिसू लागे. झ्याक, झ्याक असा पुकाराही ऐकू .येऊ लागे. अशा वेळी सायकलवरून उतरून बाजूला स्वस्थ उभे राहणे हेच मोठे शहाणपणाचे ठरत असे. एखाद्या मिनिटभरात तुमच्या समोरून पन्नास ते साठ गाढवे व त्यांच्या बरोबर धावणारी वडार पोरे दिसत असत. या गाढवांवर वाळू, विटा, किंवा खणून काढलेले डबर या पैकी काहीही लादलेले असे. बांधकाम उद्योगासाठी, गाढवे हीच त्या वेळी प्रमुख वाहतुक व्यवस्था होती. ट्रक किंवा टेंपो असले प्रकार तेंव्हा नसत. पुढे ही गाढवे सांभाळणे परवडेनासे झाले आणि मग ट्रक व टेंपो आले.

पुण्यातून गाढवे गायब झाली असली तरी बेंगलुरू मध्ये ती अजुनही आहेत हे परवा कोठेतरी वाचले आणि लहानपणच्या त्या गाढवांच्या तांड्यांची एकदम आठवण झाली. मात्र बेंगलुरू मधल्या आजच्या गाढवांना आता प्रमोशन मिळाले आहे. ती बांधकाम साहित्याची वाहतुक आता करत नाहीत. बेंगलुरू मधले धोबी आता धोबी घाटावरून कपड्यांची ने आण करण्यास या गाढवांचा वापर तर करतातच पण या शिवाय त्यांचा उपयोग आता दुसर्‍याही अनेक गोष्टींसाठी होऊ लागला आहे. बेंगलुरूच्या धोब्यांकडे 250 गाढवे तरी या कपड्यांची ने-आण करण्यासाठी आजमितीला आहेत.

गाढविणीचे दूध हे लहान मुलांचा खोकला व घशांचे विकार यावर गुणकारी असते असा समज आहे. या शिवाय काही स्त्रिया आपल्या प्रसाधनात या दुधाचा वापर करतात. इजिप्तची राणी क्लिओपात्रा गाढविणीच्या दुधात रोज आंघोळ करत असे म्हणतात. बेंगलुरू मधल्या आजच्या काही स्त्रिया अगदी स्नान जरी करत नसल्या तरी चेहरा मात्र या दुधाने धूत असतात. गाढवे पाळणारे धोबीच या गाढविणीच्या दुधाची विक्री करत असतात. मात्र या दुधाचा भाव ऐकला तर बहुतेकांच्या तोंडचे पाणीच पळेल. हे दूध 250 रुपयांना 100मि.ली. किंवा 2500 रुपये प्रति लिटर या भावाने विकले जाते. काही मंडळींना गाढवाचे मटन, यात असलेली कमी चरबी व जास्त प्रोटीन्स, यामुळे पसंत असते. काही गाढवे या उपयोगासाठीही पाळली जातात.
गाढवांचे आणखी एक/ दोन उपयोग, बेंगलुरूमध्ये लोकप्रिय आहेत. गाढवे चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी बर्‍याच वेळा वापरली जातात. गाढवांचा डेली रेट 2000 रुपयांच्या वर सध्या आहे. या शिवाय बेंगलुरूच्या विधान सौधावर राजकीय निदर्शने करताना गाढवांचा वापर करणे राजकीय पक्षांना बरेच आवडते असे दिसते कारण ही गाढवे मधून मधून विधान सौधासमोर दिसत असतात.
गाढवांचा एकूण वापर व मर्यादित संख्या यामुळे गाढवांच्या चोर्‍याही अलीकडे होऊ लागल्या आहेत. एका गाढवाची किंमत 15000 ते 20000 तरी असते. यामुळे या धोबी मंडळींना आपल्या गाढवांच्यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते.
महाराष्ट्रात आणि विशेषत: पुण्यात आता निवडणुकींची धामधुम आहे. बेंगलुरू वरून स्फुर्ती घेऊन कोणी पुण्यात परत गाढवे आणणार नाही अशी आशा आपण करूया.
10 जानेवारी 2012

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

3 प्रतिसाद to “बेंगलुरूची गाढवे; Donkeys of Bengaluru”

  1. >>महाराष्ट्रात आणि विशेषत: पुण्यात आता निवडणुकींची धामधुम आहे. बेंगलुरू वरून स्फुर्ती घेऊन कोणी पुण्यात परत गाढवे आणणार नाही अशी आशा आपण करूया. :D :D :D

    Posted by Prachi | जानेवारी 19, 2012, 2:50 pm
    • प्राची-
      प्रतिसादासाठी धन्यवाद

      Posted by chandrashekhara | जानेवारी 20, 2012, 6:52 सकाळी
  2. chan

    Posted by anil | जानेवारी 20, 2012, 11:11 सकाळी

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Blog Stats

  • 137,266 hits

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 85 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected
Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 85 other followers