दीपक रहेजा आणि श्यामसुंदर अगरवाल हे दोन भारतीय तरूण, येमेनी मालक असलेल्या एका व्यवसायात कामाला होते. चीनमधील झेजियांग प्रांतातल्या यिवु शहरात असलेल्या ऑफिसमधे हे दोघे काम करत असत. चिनी माल खरेदी करून तो निर्यात करायचा असे साधारण यांच्या व्यापाराचे स्वरूप होते. हे दोघे काम करत असलेल्या फर्मची, स्थानिक लोकल व्यापार्यांना असलेली देणी बरीच वाढली होती व त्या बाबतीत तेथील चिनी व्यापारी तगादा लावत होते. एकूण देणी 15.8 लाख अमेरिकन डॉलर्स किंवा 1 कोटी युआन एवढी झाली आहेत हे बघितल्यावर या कंपनीच्या येमेनी मालकाने, चीन मधून अचानक पोबारा केला आणि चिनी देणेकर्यांना तोंड देण्यास रहेजा व अगरवाल फक्त मागे राहिले. फर्मचा मालक पळून गेला आहे हे लक्षात आल्याबरोबर चिनी देणेकरी व्यापारी अतिशय खवळले व त्यांनी या दोघा तरूणांचे चक्क अपहरण केले. या दोघांना सोडवण्यासाठी शांघाय मधील भारतीय कॉन्सुलेटचे एक अधिकारी बालचंद्रन हे गेले. चिनी व्यापार्यांच्या बरोबर चालू असलेल्या वाटाघाटी इतका काळ चालल्या व त्या दरम्यान कोणतेही अन्न पाणी बालचंद्रन यांना न मिळाल्यामुळे त्ते शेवटी मूर्च्छा येऊन पडले. या नंतर भारतीय कॉन्सुलेटने दिल्लीशी संपर्क साधला व भारत सरकारने चिनी राजदूतांना बोलावून दम भरल्यावर शेवटी या दोन्ही तरूणांची या अपहरणाच्या नाट्यातून सुटका झाली.
दक्षिण चीनमध्ये असलेल्या व पर्ल नदीच्या मुखप्रदेशातील यिवु किंवा शाओशिंग सारख्या व्यापारी केंद्रात घडलेली अपहरणाची ही काही पहिलीच घटना नाही. शाओशिंग शहरात एका भारतीय व्यापार्याला चिनी व्यापार्यांनी एक महिनाभर पकडून ठेवले होते. शांघाय मधल्या भारतीय कॉन्सुलेटला गेल्या काही वर्षांत झेंजियांग व ग्वॅन्गडॉन्ग प्रांतातील यिवु व शाओशिंग या सारख्या शहरांतून कमीत कमी सहा तरी असहाय्य स्थितीत असलेल्या भारतीय व्यापार्यांचे कॉल आलेले आहेत.
हिर्यांची तस्करी केल्याच्या आरोपाखाली 2 वर्षे शेनझेन मधे स्थानबद्ध असलेल्या 12 भारतीय व्यापार्यांना चिनी सरकारने नुकतेच सोडून दिले आहे. परंतु त्यांचे प्रकरण व यिवू मधले अपहरणाचे प्रकरण यात मूलभूत फरक आहे. या हिर्याच्या व्यापार्यांनी कर चुकवण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांच्यावर होता व त्यांना चिनी सरकारने स्थानबद्ध केले होते. त्यामुळे त्यांच्याशी या अपहरणातील तरूणांचा संबंध जोडता येणार नाही.
यिवू व शाओशिंग मधले बहुतेक विवाद, पैसे चुकते केले की संपुष्टात येतात असा अनुभव आहे. परंतु या खेपेस फर्मचा मालक गायब झाल्याने त्याच्या दोन कर्मचार्यांनाच चिनी व्यापार्यांनी पकडून ठेवण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी. अशा प्रकारच्या पैशांच्या विवादात स्थानिक पोलिस सहसा पडत नाहीत. पळवून नेलेल्या तरूणांपैकी एक तरूण दीपक रहेजा हा एका वर्षापूर्वीच यिवुला आला होता. तो आला तेंव्हाच त्याला इतर भारतीयांनी चिनी लोक पैसे न दिल्यास काय करतात याची कल्पना दिली होती. तरी आपल्यावर वर्षभरातच अशा प्रसंगांना तोंड द्यायची वेळ येईल असे त्याला स्वप्नातही वाटले नसेल. दीपक रहेजा म्हणतो की या चिनी व्यापार्यांनी आम्हा दोघांना मारहाण करण्यासाठी व आमचा छळ करण्यासाठी भाडोत्री गुंड बोलावले होते. हेइ शेहुइ किंवा ब्लॅक सोसायटी या नावाने हे गुंड ओळखले जातात. पोलिस या व्यापार्यांच्या विवादात व भानगडीत न पडत असल्याने व्यापारी या भाडोत्री गुंडांचे सहाय्य आता घेत आहेत. गेल्या दोन वर्षातील जागतिक मंदीमुळे चीन मधील बाजारपेठांत अतिशय अस्थिर असे आर्थिक वातावरण आहे. व त्यामुळे देणी बुडवली जाण्याच्या बर्याच घटना घडू लागल्याने व्यापारी अतिशय सावध आहेत.
या प्रकरणावर मल्लीनाथी करताना चिनी सरकारचे मुखपत्र ‘ग्लोबल टाईम्स’ म्हणते की भारतीय व्यापार्यांनी नियम पाळले पाहिजेत. त्यांनी जर पैसे बुडवण्याची त्यांची सवय सोडून दिली नाही तर चिनी व इतर व्यापारी त्यांच्यापासून दूर राहतील. भारत सरकारने घेतलेल्या भूमिकेबद्दल टीका करताना हे वृत्तपत्र म्हणते की भारत सरकार संकुचित राष्ट्रवादाने वागत आहे (?). यिवु मधला विवाद हा यिवु बाजारपेठेतील नियम व हा संकुचित राष्ट्रवाद या मधील झगडा आहे (?)
भारत सरकारने जरी भारतीय व्यापार्यांना यिवु पासून दूर राहण्याचा सल्ला दिला असला तरी प्रत्यक्षात यिवु बाजारपेठ अतिशय भरभराटीत असलेली बाजारपेठ आहे. येथे व्यापार करून फायदा मिळवण्याच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने भारतीय व्यापारी सरकारच्या या सल्ल्याचा कितपत मान ठेवतील हे सांगणे कठिण आहे.
9 जानेवारी 2012






चर्चा
अद्याप प्रतिक्रिया नाहीत.