.
Musings-विचार

जनरेशन गॅप; Generation Gap


सध्या पुण्यामध्ये लग्नांचा मौसम अगदी जोरात चालू आहे. पूर्वी मे महिन्यात जशी हजारोंनी लग्ने लावली जात तशी आता डिसेंबरमध्ये लावली जातात. थंडीच्या मोसमात कपडे, दागिने घालून जसे बायकांना मिरवत येते तसेच पुरुषांना सुद्धा सूट बूट घालून फिरता येते. थंडीमध्ये लग्न समारंभ जास्त एनजॉय करता येतात हे खरेच आहे. परवा अशाच एका लग्नाचे मला बोलावणे आले होते. पत्रिकाच मुळी एवढी जबरदस्त होती की ज्या कुटुंबांमधे हा समारंभ होता त्यांच्या आर्थिक स्थितीची चांगलीच कल्पना यावी. पत्रिका दोन तीन भागात होती. सीमान्त पूजन समारंभाची एक पत्रिका, मुख्य लग्न समारंभाची एक पत्रिका, मेंदी समारंभाची एक पत्रिका या तीन पत्रिका मी बघितल्या. या शिवाय आणखी एक पत्रिका पण होती. ही कसली आहे म्हणून जरा कुतुहल वाटले व म्हणून ती नीट बघितली. ज्या मुलाचे व मुलीचे लग्न होते त्या दोघांनी मिळून केलेले ते निमंत्रण होते. आणि हे निमंत्रण होते एका कॉकटेल पार्टीचे, म्हणजे हे होणारे नवरा-बायको, लग्नाआधी आयोजित केलेल्या एका पार्टीमध्ये आपल्या नातेवाईकांना, परिचितांना व मित्र मैत्रिणींना मद्य प्यायला व नाचायला बोलावत होते. आता या दोन्ही गोष्टींमध्ये मला रस नसल्याने मी तेथे जाण्याचा प्रश्नच नव्हता. पण ते निमंत्रण माझ्या लक्षात मात्र राहिलेच.
या संदर्भात साठ वर्षांपूर्वी घडलेला एक प्रसंग मला आठवतो आहे. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचे पुत्र दिनकरराव कर्वे यांच्या घरी घडलेला हा प्रसंग आहे. काहीतरी लग्नसमारंभासाठी अण्णासाहेबांचे मोठे चिरंजीव शंकरराव कर्वे आफ्रिकेहून पुण्यास आले होते. ते दिनकरराव कर्वे यांचे कडे उतरले होते. घरातील मोठ्या हॉल मध्ये बसून मंडळी गप्पा मारत होती. आम्ही दोन चार मुले कोपर्‍यात बसून काय चालले आहे ते बघत होतो. शंकरराव काहीतरी सांगत होते व एकीकडे त्यांचे धूम्रपानही चालू होते. साठ पासष्टीच्या वयाच्या शंकररावांनी अचानक तोंडातली सिगरेट विझवून पटकन पलीकडच्या रक्षापात्रात टाकून दिली. कोणीतरी त्यांना असे करण्याबद्दल विचारले तेंव्हा त्यांनी त्या व्यक्तीचे लक्ष पलीकडे वेधले. काठी टेकत नव्वदीच्या घरात असलेले अण्णा त्या खोलीत येत होते.
आपल्या नव्वद वर्षाच्या वडीलांच्यासमोर आपण सिगरेट ओढणे योग्य दिसणार नाही म्हणून ती विझवून टाकणारे शंकरराव व पंचवीस वर्षाचा हा लग्न होणारा तरूण व बावीस वर्ष वयाची त्याची वधू यांचे आपल्या नातेवाईकांना, परिचितांना व मित्र मैत्रिणींना मद्य पिण्यासाठीचे आमंत्रण, ही दोन चित्रे म्हणजे केवढा विरोधाभास आहे? आपल्या सामाजिक जाणीवा किंवा पद्धती केवढ्या बदलत चालल्या आहेत याचेच ते निदर्शक आहे असे मला वाटले. पण नंतर असे वाटले की जनरेशन गॅप म्हणतात ती हीच.
वडिलधार्‍यांसमोर सिगरेट विझवणे म्हणजे आदर दाखवणे का? हा जसा एक प्रश्न आहे तसाच वडीलधार्‍यांना मद्य पिण्यास बोलावणे म्हणजे त्यांचा अनादर केला आहे असे का म्हणावे? हाही एक प्रश्नच आहे. यापैकी एक कृत्य योग्य व दुसरे अयोग्य हे कोण ठरवणार?. प्रत्येक गोष्टीत पारदर्शकता हवी असणारी सध्याची पिढी असेही म्हणू शकते की सिगरेट विझवण्याचे कृत्य याला एक प्रकारची हिपोक्रॉसी किंवा दांभिकता असे का म्हणू नये? त्याच प्रमाणे मद्य पिणे आणि नाच करणे या गोष्टींनी जर आनंद वाटत असला तर त्या लपून छपून का करायच्या? त्यात वडीलधार्‍यांना सहभागी का करून घेऊ नये?
या दृष्टीकोनात मला तर काही फारसे गैर आहे असे वाटत नाही. पण जुन्या पिढीच्या लोकांना तो पटेलच असे खात्रीने म्हणताही येत नाही. प्रत्येक दोन पिढ्यांमध्ये जनरेशन गॅप ही असतेच. पुढच्या पिढीच्या गोष्टी मागच्या पिढीला खटकतातच. त्यातलाच हाही एक मामला.
असे हे चालायचेच. प्रत्येक दोन पिढ्यांमधे असेच घडते एवढेच फार तर म्हणता येईल.
18 डिसेंबर 2011

About chandrashekhara

I am a retired electronics engineer. I am interested in writing, reading books. Other hobbies include Paper models, wooden fret work and social networking.

चर्चा

2 प्रतिसाद to “जनरेशन गॅप; Generation Gap”

  1. चंद्रशेखरजी ,

    कॉकटेल पार्टी चा लेख वाचून मला तरी दु:खच झाले . हे आपल्या संस्कृतीला शोभणारे नाही . पण आपल्या समाजात भरमसाठ सुधारणा झाली आहे . लोक आधुनिक विचारांचे झाले आहेत . त्यांची सगळी सुधारणा ही पाश्चात्यांच अनुकरण आहे . तिकडे जश्या कॉकटेल पार्ट्या , बॅचलर पार्ट्या होतात तसं आपल्या कडे करण्याचा सुशिक्षित समाजाचा कल वाढतो आहे . तसं नाही केलं तर आपल्याला मॉडर्न कोण म्हणेल
    आमच्या कडे खेडेगावात आदिवासी भिल्ल जमातीचे लोक राहतात त्यांच्यात जेव्हा लग्नकार्य असतं तेव्हा
    आलेल्या पाहुण्यांसाठी अन परिचितांसाठी गावठी दारूचा हंडा भरून ठेवलेला असतो ज्याला जितकी वाटेल त्याने तितकी प्यावी कोणाची मनाई नसते . तुमच्या कडील दारूची पार्टी पाहून मला ह्या अनाडी लोकांच्या रिवाजाची आठवण झाली आपण सुशिक्षित लोक त्यांना अशा प्रकाराबद्द्ल गावंढळ , अनाडी म्हणतो मागासलेले म्हणतो ,
    आता ह्या पुण्या मुंबै च्या सुशिक्षितांना काय म्हणावं . दोघंही एकाच पातळीवर आलेत एवढंच म्हणजे गाढवाची पातळी .एक खेड्यातलं तर दुसरं शहरातलं . शेवटी ते उकीरड्यावर लोळण थोडीच सोडणार आहे.
    पुण्या मुंबै ची पोरं शिक्षण वा व्यवसायानिमित्त युरोप अमेरिकेत जातात . अन तिकडचे फाल्तु गोष्टी इकडे घेउन येतात अन ,
    त्यांना पाहुन आमच्या कडचे पागल अजून पागल होतात . आपला हिंदु समाज फार बिघडत चाललाय
    काही वेळा वाटतं आपल्या पेक्षा मुसलमान बरे

    संदीप

    Posted by sandeep | डिसेंबर 29, 2011, 7:33 pm
    • संदीप-

      तुम्हाला जी कॉकटेल पार्टी खटकते आहे ती नवीन पिढीला अगदी आवश्यक व रूटीन गोष्ट वाट शकते. यालाच तर जनरेशन गॅप म्हणायचे. आणि हजारो वर्षाच्या परंपरेनुसार अदिवासी जर लग्नात मद्य प्राशन करत असले आणि आज नव्या पिढीने तेच केले तर त्यांना दोष देणारी जुनी पिढी बरोबर कशावरून?

      Posted by chandrashekhara | डिसेंबर 30, 2011, 8:37 सकाळी

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Blog Stats

  • 151,315 hits

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 95 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected
Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 95 other followers