रोज सकाळच्या माझ्या फिरण्याच्या मार्गावर, मध्यवर्ती सरकारच्या एका संस्थेच्या कर्मचार्यांसाठी बांधलेली एक निवासी वसाहत आहे. या वसाहतीत आठ ते दहा निवासी संकुले आहेत व या संकुलांमध्ये व चारी बाजूंना, मोकळी जागा सोडलेली आहे. या वसाहतीचे कुंपण म्हणून एक सहा फूट तरी ऊंच अशी एक भिंत बांधलेली आहे. त्यामुळे रस्त्यावरून आत काय चालले आहे हे कळत नाही. परवाच्या दिवशी काही बांधकाम किंवा दुरुस्ती यासाठी या भिंतीचा काही भाग पाडण्यात आलेला आहे हे मला दिसले. सहज आत नजर टाकली असता आश्चर्याने थक्क होण्याची माझ्यावर पाळी आली. या कुंपणाच्या आतल्या बाजूस भिंतीला लागून एक कचरा पेटी ठेवलेली असावी. या कचरा पेटीचा कोठे मागमूसही दिसणार नाही एवढा प्रचंड कचर्याचा ढीग तेथे साठलेला दिसला. प्लॅस्टिकचे डबेडुबे यापासून ते फेकून दिलेल्या खाद्यपदार्थांपर्यंत सर्व काही त्या कचर्यात होते. या शासकीय वसाहतीत अनारोग्य व रोगराई निर्माण करण्याचा एवढा मोठा स्त्रोत रस्त्याला लागूनच आहे व त्याबद्दल या वसाहतीतील लोक काहीही करत नाहीयेत हे बघून मी थक्क झालो व वाईटही वाटले. ही शासकीय वसाहत व पुणे महानगरपालिका यांच्यात नक्की काहीतरी वादविवाद चालू असावा व परिणामी हा कचर्याचा ढीग साठत असावा हे माझ्या लक्षात आले.कचरा मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ लागला की त्याचे काय करायचे? असा प्रश्न सगळ्यांना भेडसावत असतो. काही देशात तो गाडून टाकतात तर काही देश तो निर्यात करून दुसर्या देशांच्या अनारोग्यात भर टाकतात. मुंबईला पूर्वी कचरा जाळण्याची प्रथा होती. पण त्यामुळे एवढे प्रदुषण निर्माण होऊ लागले की त्या पेक्षा कचरा बरा असे म्हणण्याची वेळ आली. मोठ्या किंवा श्रीमंत देशांना असे काही उपाय करणे शक्य असते पण छोट्या व बेटांच्या स्वरूपात असलेल्या देशांना कचर्याची विल्हेवाट कशी लावायची हा एक ज्वलंत प्रश्न बनत चालला आहे.
हिंदी महासागरात असलेल्या मालदीव या नितांतसुंदर व रमणीय निसर्ग सौंदर्य असलेल्या देशाला कचर्याचा प्रश्न असाच भेडसावतो आहे. शांत निळा समुद्र व रूपेरी वाळूचे किनारे यासाठी हा देश प्रसिद्ध असल्याने येथे परदेशी पर्यटकांची प्रचंड ये-जा असते. या पर्यटकांच्या सोईसाठी या देशात अनेक आलिशान रिसॉर्ट्स बांधलेले आहेत. हे सर्व रिसॉर्ट्स मुख्यत्वे पाश्चिमात्य पर्यटकांचे स्वागत करत असल्याने पाश्चिमात्य राहणीप्रमाणे या रिसॉर्ट्स मधून निर्माण होणार्या कचर्याचे प्रमाण प्रचंड आहे. या कचर्याचे काय करायचे? हा प्रश्न मालदीव सरकारला नेहमीच भेडसावत असतो.
मालदीव हा देश 1192 बेटांचा मिळून बनलेला आहे व यापैकी 200 बेटांवर वस्ती आहे. यातली 26 बेटे Atoll ( समुद्राच्या पाण्याला वेष्टणारे बेट) प्रकारची आहेत व यावरच हे सगळे आलिशान रिसॉर्ट बांधलेले आहेत. मालदीव मधली बहुतेक बेटे कोरल किंवा प्रवाळ प्रकारच्या खडकांनी बनलेली आहेत व त्यामुळे येथे नवीन बेटे निर्माण होण्याची प्रक्रिया सतत चालू असते. मालदीवची राजधानी ‘माले’ यापासून साधारण 7 किलोमीटर अंतरावर ‘थायलाफुशि’ (Thilafushi) या नावाचे एक असेच छोटेसे कोरल किंवा प्रवाळ बेट आहे.
सुमारे 20 वर्षांपूर्वी या प्रवाळ खडकांच्यावर मातीची भर टाकून हे बेट मानवी उपयोगास योग्य केले गेले होते. येथे बोटी दुरुस्त करणे वगैरेसारखे काही व्यवसाय सुरू झाले होते. परंतु नंतर मालदीवमधल्या आलीशान रिसॉर्ट्सना हे बेट व तेथे बोटी किंवा बार्ज नेण्यासाठी असलेली जेट्टी किंवा धक्का उआ गोष्टींचा पत्ता लागला व तेंव्हापासून ही रिसॉर्ट्स आपल्या येथे निर्माण झालेला कचरा टाकण्यासाठी या बेटाचा उपयोग करू लागली. आता हा कचर्याचा ढीग एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे की तो हळूहळू समुद्राच्या पाण्यात पसरू लागला आहे. या बेटाचा आता मालदीवचे लोक, कचरा बेट (Garbage Island) या नावाने उल्लेख करू लागले आहेत. निळे पाणी आणि रुपेरी वाळूचे किनारे असलेल्या मालदीवच्या इतर निसर्गरम्य बेटांच्या पार्श्वभूमीवर हे कचरा बेट एखाद्या डागासारखे आता दिसू लागले आहे. सबंध देशातला कचरा आता येथे येत असल्याने सगळीकडे कचर्याचे ढीग, धूर व प्रदुषणच अनुभवता येते आहे. काही थोड्या फार प्रमाणात कचरा पुरून टाकण्यात येतो. काही लोकांनी बांगला देशी कामगाराना हा कचरा निवडण्याच्या कामावर नोकरीस ठेवलेले आहे. हे बांगला देशी या कचर्याचे ढीग़ उचकताना येथे दिसतात. काही कचरा पेटवून दिला जातो तर प्लॅस्टिक रीसायकल करण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे प्रदुषणात वाढच होते आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणात कचरा आता या कचरा बेटावर येऊ लागला आहे की कचर्याच्या बोटी रिकाम्या करण्यासाठी 7 तासाचा अवधी लागतो. एवढा वेळ थांबण्याची या बार्ज चालकांची नयारी नसाते व ते कचरा सरळ समुद्रात लोटून देऊ लागले आहेत. परिस्थिती या थराला गेल्यावर आता मालदीव सरकारने थायफुशि बेटावर कचरा नेऊन टाकण्यास अखेर तात्पुरती बंदी घातली आहे. परंतु मालदीवच्या पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाचे मुख्य इब्राहिम नईम यांच्या मताने या बेटावर कचरा टाकण्यास अजून भरपूर जागा आहे व विलंब तेथे असलेली व्यवस्था अपुरी असल्याने होतो आहे.
मालदीव मधले एक पर्यावरणवादी अहमद इक्रम म्हणतात की या कचर्यापासून जैविक इंधन बनवण्याचे सरकारने ठरवले होते पण त्यात काहीही प्रगती झालेली नाही व कचर्यातील विषारी पदार्थ समुद्राच्या पाण्यात मिसळल्याने आसमंतातील पर्यावरण धोक्यात येऊ लागले आहे.
मालदीवच्या या कचरा बेटाबद्दलची माहिती वाचली तेंव्हा माझ्या डोळ्यासमोर माझ्या घराजवळच्या शासकीय वसाहतीतील कचर्याचा ढीग उभा राहिला. कचर्याचा प्रश्न जगातील सर्व शहरांना भेडसावतो आहे. पुणे महानगरपालिकेचे या बाबतीतले प्रयत्न किती अपुरे पडत आहेत हे मला दिसतेच आहे.
या बाबतीत जागतिक स्तरावर काहीतरी मोठी पावले उचलली जाण्याची गरज आहे नाहीतर जगातील प्रत्येक नागरी वस्तीमध्ये कचर्याचे ढीग साठू लागतील व आरोग्याचा मोठाच प्रश्न सर्व लोकांसमोर उभा राहील.
8 डिसेंबर 2011








चर्चा
अद्याप प्रतिक्रिया नाहीत.