संध्याकाळी काय करायचे? हा जगभरच्या ज्येष्ठ नागरिकांना नेहमी सतावणारा प्रश्न पुण्यातल्या ज्येष्ठ नागरिकांना कधीच पडत नाही. पुण्यात बारा महिने चोवीस काळ, सदोदित कसल्या ना कसल्या तरी सभा प्रत्येक संध्याकाळी आयोजित केलेल्या असतातच. सकाळच्या वर्तमानपत्रात या सभांची माहिती दिलेलीच असते. त्यामुळे सभेची फक्त वेळ बघायची आणि तिथे जाऊन हजर व्हायचे एवढेच करावे लागते. उर्वरित संध्याकाळी वेळ छान जातो.
काही दिवसांपूर्वी अशाच एका सभेला माझ्या एका मित्राच्या आग्रहावरून गेलो होतो. एकूण रागरंगावरून सभ थोडीफार कंटाळवाणी व बोअर होणार असे मला वाटत होते. तिथे गेल्यावर कोणीतरी मला त्या दिवशीच्या मुख्य वक्त्याची ओळख करून दिली. प्रथम दर्शनी तरी माझे मत फारसे अनुकूल झाले नाही. हे गृहस्थ अगदी बारकुडे आणि बुटके होते व त्यांचा आवाज सुद्धा जाडाभरडा वाटला. औचित्य राखण्यासाठी मी त्यांना अभिवादन केले आणि पुढच्या कंटाळवाण्या कालाची वाट पहात माझ्या जागेवर स्वस्थ बसून राहिलो.
सुरवातीच्या औपचारिक ओळखी पाळखींनंतर मायक्रोफोन मुख्य वक्त्यांकडे देण्यात आला. त्यांची पहिली काही वाक्ये ऐकल्याबरोबरच, माझ्यासह तिथे जमलेल्या सर्वांच्या हे लक्षात आले की ही असामी सर्व सामान्यांसारखी नसून काहीतरी निराळीच आहे. या व्यक्तीच्या आयुष्यात घडून गेलेल्या एका अतिशय दुख:द घटनेतून या व्यक्तीने स्वत:ला सावरून घेऊन त्या नंतर समाजातील आजूबाजूच्या इतर लोकांना अतिशय हवी असलेली एक सेवा, अत्यंत निरपेक्षपणे व कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता अव्याहत देण्याचे व्रत घेतले आहे.
आपल्या सर्वांनाच हा अनुभव आलेला असेल की ज्या वेळी आपल्या कोणत्याही जवळच्या नातलगाला इस्पितळात दाखल करण्याची गरज भासते त्यावेळी आपली मनस्थिती कशी होते? आपल्याला अतिशय ताणतणावातून जावे लागते. आणि त्या हॉस्पिटलमधला कर्मचारी वर्ग आपल्या नातलगाकडे पाहिजे त्या सहृदयतेने व काळजीने बघत नाहीये हे लक्षात आल्यावर एक प्रकारची असहाय्यता व भिती वाटू लागते. याचा परिणाम म्हणून आपण त्या सगळ्यांच्यावर चिडतो व वैतागतो.
स्वत: अशाच एका भयानक अनुभवामधून गेल्यामुळे श्री. कोंडूजकरांनी (मुख्य वक्ते) रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकांना वाटणार्या या असहाय्यतेचा चांगलाच अनुभव घेतला होता. त्यामुळे याबद्दल त्यांनी स्वत:च काहीतरी करायचे ठरवले. ते रोज पुण्यातील सर्व प्रमुख रुग्णालयामधून एक फेरी मारतात. नवीन कोण रुग्ण ऍडमिट झाले आहेत ते बघतात व अशा रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना भेटून त्यांच्या काय अडचणी आहेत? त्यांना काय हवे आहे? याची विचारपूस करतात. व त्यांना शक्य तेवढी मदतही करतात. या अशा रुग्णांना व त्यांच्या एकाकी नातेवाईकांना श्री. कोंडूजकर एखाद्या देवदूतासारखे भासले तर नवल नाही.
छाया ही एक झोपडपट्टी मधे रहाणारी बारा वर्षाची मुलगी, रक्ताच्या कर्करोगाच्या विकारामुळे रुग्णालयात आली होती. आई-वडील कष्ट करत असल्याने ही मुलगी आपल्या खाटेवर एकटीच पडून असायची. श्री.कोंडूजकर तिच्याशी रोज गप्पा मारत. त्यातून त्यांना समजले की तिला छान चित्रे काढता येतात. छायाला कागद पेन्सिल वगैरे साहित्य श्री. कोंडूजकरांनी आणून दिले. तिने पन्नास किंवा साठ अतिशय सुंदर चित्रे तयार केली. श्री. कोंडूजकरांच्या ओळखीच्या एका संपादकांनी ही चित्रे आपल्या मासिकात छापण्याचे मान्य केले. दुर्दैवाने ही चित्रे प्रसिद्ध होण्याआधीच छाया हे जग सोडून गेली. पण या मुलीचे शेवटचे काही आठवडे अत्यंत सुखा समाधानात गेले हे बक्षीस श्री. कोंडूजकरांना आत्यंतिक समाधान देऊन गेले.
दुसर्या एका केसमधे 86 वर्षाचे एक म्हातारे गृहस्थ खुब्याचे हाड मोडल्याने रुग्णालयात ऍडमिट झाले होते. ऍडमिट करताना या म्हातार्या गृहस्थांच्या मुलाने एक मोठी रक्कम सर्व खर्चासाठी म्हणून भरली होती. या म्हातार्या गृहस्थांवर शल्यक्रिया करण्यात आली व दोन आठवड्यानंतर त्यांची तब्येत बरीच सुधारली. श्री. कोंडूजकर त्यांना रोज भेटून त्यांची हालहवाल विचारत असत व त्यांचा एकाकीपणा कमी करण्याचा प्रयत्न करत. या गृहस्थांनी श्री. कोंडूजकरांना आपल्या मुलाला फोन करण्याची व बोलावण्याची विनंती केली. तसा फोन केल्यावर या गृहस्थांचे चिरंजीव अतिशय रागावलेले वाटले परंतु संध्याकाळी इस्पितळात येण्याचे मान्य करून आले. इस्पितळात आल्यावर या चिरंजीवांनी आपले वडील व श्री. कोंडूजकर यांच्यावर बरेच तोंडसुख घेतले. त्याच्या मताने त्याने वडीलांच्या इस्पितळातल्या खर्चाचे सर्व पैसे भरून आपले कर्तव्य पार पाडले होते. तो व त्याची बायको आणि मुले यांचा वेळ इस्पितळात येऊन निष्कारण त्याला घालवायचा नव्हता. परत त्याला न बोलावण्याबद्दल सांगून तो निघून गेला. श्री. कोंडूजकरांना या माणसाबद्दल अतिशय घृणा व संताप वाटला नसता तर आश्चर्यच होते. तरीही आपला राग गिळून त्या म्हातार्या गृहस्थांचे त्यांनी सांत्वन केले. त्यांना इस्पितळातून डिसचार्ज मिळेपर्यंत श्री. कोंडूजकरांशिवाय त्यांना कोणीच भेटायला आले नाही.
या सारखी अनेक उदाहरणे श्री. कोंडूजकरांनी आपल्या भाषणात दिली. सध्याच्या काळातल्या एकूण सामाजिक परिस्थितीमुळे ज्येष्ठ नागरिक व मुले यांना इस्पितळात ठेवण्याची वेळ आली तर घरातल्या तरूण वर्गाला त्यांच्या कामाच्या वेळा सांभाळून सारखे इस्पितळात येणे खूप कठिण जाते. त्यामुळे हे रुग्ण अगदी एकाकी व असहाय्य होतात. निदान पुण्यातल्या अशा रुग्णांचा एकाकीपणा व असहाय्यता थोड्याफार प्रमाणात या माणसाच्या निरलस सेवेमुळे कमी होतो आहे हे नक्की.
22 मार्च 2010
.





चर्चा
अद्याप प्रतिक्रिया नाहीत.