कवी कुसुमाग्रज किंवा वि.वा. शिरवाडकर यांची एक कविता आहे ‘प्रेम कोणावरही करावे‘ म्हणून. या कवितेतील मधवर्ती कल्पना अशी आहे की आपल्याला या जीवनातील जी जी गोष्ट आवडते त्याच्यावर आपण खूप प्रेम करावे. कुसुमाग्रजांच्या या कवितेचे एक चालते बोलते रूप चेन्नईमधे आहे. ते आहेत चेन्नई मधले एक व्यावसायिक, श्री. आर. चंद्रसेकरन.
श्री. आर. चंद्रसेकरन यांचा व्यवसाय आहे ग्रॅनाईट दगडाच्या निर्यातीचा. R.C.Golden Granites या नावाने ते ही निर्यात करतात. पण चंद्रसेकरन यांचे मन काही या दगडांच्यात रमत नाही त्यांचे खरे खुरे प्रेम, किंवा भक्तीच म्हणा, आहे ती अमेरिकन पॉप गायक मायकेल जॅक्सन याच्यावर. चंद्रसेकरन यांना मायकेल जॅक्सन याच्या संगीताचे वेड लागले त्यांच्या मुलामुळे. त्यांचा मुलगा मायकेलचा एकदम फॅन. त्याच्याबरोबर चंद्रसेकरन पण मायकेलची गाणी ऐकू लागले. काही कालानंतर चंद्रसेकरनच्या मुलाची मायकेलच्या संगीतामधली रुची कमी झाली व तो दुसर्या ग्रूप्सची गाणी ऐकू लागला. मात्र चंद्रसेकरन यांची मायकेलनिष्ठा अजिबात कमी न होता वाढतच गेली.
मायकेल जॅक्सनच्या आकस्मिक निधनामुळे चंद्रसेकरन यांना प्रचंड नैराश्य आले. या मधून बाहेर पडण्यासाठी या आपल्या हीरोचे काहीतरी मोठे स्मारक आपण बनवावे असे त्यांना वाटू लागले. ग्रॅनाईटच्या एका मोठ्या पाषाणखंडातून मायकेल जॅक्सनचा एक भव्य पुतळा बनवावा असे त्यांनी ठरवले. उत्तर प्रदेशातील राजकारण्यांकडून ही स्फूर्ती त्यांनी घेतली की काय कोण जाणे? काहीही असले तरी एका ग्रॅनाईटच्या पाषाणखंडातून पुतळा कोरणे हे मोठे कठीण काम होते कारण ग्रॅनाईट हा अतिशय नाजूक पाषाण आहे. जरा छिन्नी वेडीवाकडी चालली तर सर्व प्रयत्न वाया जाणार. असा पाषाण खंड मिळवण्यासाठी आणि त्यातून हा पुतळा कोरण्यासाठी चंद्रसेकरन यांना अमाप खर्च आला आहे. त्यांचे 6 शिल्पकार हा पुतळा कोरण्यासाठी अनेक आठ्वडे परिश्रम करत होते. हा पुतळा आता पूर्ण झाला असून त्याची उंची 12 फूट आहे तर वजन साडेतीन टन.
चंद्रसेकरन यांनी हा पुतळा बंगलुरू शहरात लोकांना बघण्यासाठी ठेवला आहे. मायकेल जॅक्सनचे चहाते हा पुतळा पहाण्यासाठी व त्याला स्पर्श करण्यासाठी रोज गर्दी करत आहेत. चंद्रसेकरन यांच्या मते या पुतळ्याचा बोलका चेहरा आणि डोळे इतके हुबेहुब वठले आहेत की दर्शकांना प्रत्यक्ष मायकेललाच भेटल्यासारखे वाटते.
चंद्रसेकरन आता हा पुतळा परत एकदा लाखो रुपये खर्च करून, चेन्नईपासून अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सॅन्टा बार्बारा येथील मायकेल जॅक्सन यांच्या Neverland Ranch ला पाठवण्याच्या मागे आहेत. मायकेलच्या नातेवाईकांना पत्र लिहून आपण आपल्याला मायकेलबद्दल वाटणार्या प्रेमामुळे हा पुतळा बनवला आहे असे सांगितले आहे.
हा पुतळा आपण सॅन्टा बार्बारा कडे मायकेलच्या भारतातल्या सर्व चाहत्यांच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून पाठवणारच अशी खात्री चंद्रसेकरन यांनी दिली आहे.
19 फेब्रुवारी 2010





चर्चा
अद्याप प्रतिक्रिया नाहीत.