नेपाळमधल्या त्रिशूली नदीचे नाव मी आतापर्यंत तरी कधी ऐकलेले नव्हते. नेपाळला भेट देणार्या पाश्चिमात्य प्रवाशांमधे ही नदी म्हणे बरीच लोकप्रिय आहे. या नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी अतिशय वेगवान असे प्रवाह (River Rapids) असल्यामुळे रॅफ्टिंग (White water Rafting) या खेळासाठी ही नदी प्रसिद्ध आहे. ही नदी नेपाळची राजधानी खाटमांडूच्या उत्तरेला उत्तर-दक्षिण अशी वहात जाते व नंतर काली किंवा बूढी गंडकी या नदीला जाऊन मिळते.
भारतीय उपखंडातल्या अनेक नद्यांप्रमाणे ही नदी सुद्धा तिबेटमधे उगम पावते. तिबेटमधे या नदीला कायरोंग किंवा जायरोंग (Kyirong or Gyirong) असे नाव आहे. तिबेटमधून ही नदी, रेसुओ या तिबेट-नेपाळ सीमेवरील चेक-पोस्टजवळ, नेपाळमधे प्रवेश करते. या ठिकाणी एका लोखंडी दोरखंडांनी बनवलेल्या पुलावरून आता चीनमधे प्रवेश करता येतो. नेपाळमधे प्रवेश केल्यावर सीमेपासून साधारण सतरा किलोमीटरवर स्याब्रुबेसी (Syabrubesi) हे पहिले खेडेगाव लागते.
पूर्वीच्या काली तिबेट आणि नेपाळ यांच्यात बरेच युद्धप्रसंग आले आहेत. या युद्धात त्रिशूली नदीच्या अरूंद खोर्यातून तिबेटी आक्रमकांना नेपाळमधे येण्यासाठी सुलभ मार्ग होता. यामुळे ही सीमा नेहमीच संरक्षित होती. रेसुओ चेक-पोस्टच्या जवळ रसुआ गढी म्हणून एक जुना किल्ला आहे. नेपाळी नागरिक सोडून बाकी कोणालाच या सीमेजवळ प्रवास करू दिला जात नाही.
त्रिशूली नदीच्या खोर्याची, परदेशी प्रवाशांचे आवडते पर्यटणस्थळ अशी ख्याती आता टिकणे कठिणच दिसते आहे. सीमेवरील रेसुओ चेक-पोस्ट पासून स्याब्रुबेसी गावापर्यंत एक मोठ्या राजरस्त्याचे बांधकाम सुरू झाले आहे. चीन व नेपाळ मधे हा रस्ता बांधण्याचा करार झाल्यावर चिनी सरकारने नेपाळी हद्दीत हा सतरा किलोमीटर लांबीचा रस्ता बांधण्याचे काम सुरू केले आहे. हा रस्ता अतिशय दुर्गम अशा प्रदेशातून जात असल्याने फक्त सतरा किलोमीटर लांबीच्या या रस्त्याला तब्बल 20 मिलियन अमेरिकन डॉलर्स एवढा खर्च अपेक्षित आहे व तो चिनी सरकार करणार आहे. चिनी रस्ता बांधणी मजूर व अभियंते यांना हा रस्ता, सुरूंग लावून व खडक फोडूनच करावा लागणार आहे. तिबेटमधे हा रस्ता जायरोंग या गावापर्यंत जाणार आहे. या गावापासून ल्हासाला जाणारा या आधीच तयार आहे. त्याच प्रमाणे स्याब्रुबेसी पासून खाटमांडू हा रस्ताही तयार आहे. त्यामुळे जायरोंग ते स्याब्रुबेसी रस्ता तयार झाला की ल्हासा व खाटमांडू हे या रस्त्याने सरळ जोडले जातील.
या रस्त्यामुळे या दुर्गम प्रदेशाची प्रगती होईल व्यापार उद्यम वाढेल वगैरे अनेक गोष्टी सांगण्यात येत आहेत व त्या बहुतांशी खर्याही आहेत. परंतु या रस्त्याचे खरे महत्व निराळेच आहे. चीनमधील चिंघाई प्रांतापासून ल्हासापर्यंतचा रस्ता आता वापरात आला आहे. त्यामुळे या नव्या रस्त्याने, चिनी व्यापारी माल नेपाळमधे तर पोचेलच पण तो भारतातही सुलभ रित्या येऊ शकेल. चीन व भारत यांच्यामधला व्यापार खूपच मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. या व्यापाराला या नव्या रस्त्यामुळे चांगलेच पाठबळ मिळणार आहे.
कोणत्याही रस्त्याने जसा व्यापारी माल सुलभपणे येऊ जाऊ शकतो तसेच सैनिक किंवा चिलखती वाहनेही येऊ जाऊ शकतात. शतकानुशतके मध्य एशियामधील आक्रमकांपासून, भारतीय उपखंडाचे संरक्षण, हिमालयाची पर्वतराजी करत आलेला आहे. हे संरक्षक कवच आता भेदले जाणार आहे हे नक्की. या बाबत भारताला योग्य ती पूर्व-तयारी करावीच लागेल.
या नवीन रस्त्याचा भारताला फायदा होणार आहे की यामुळे अनेक नव्या समस्या व कटकटी निर्माण होणार आहेत हे आता सांगणे तरी कठिण दिसते.
30 जानेवारी 2010










चर्चा
Trackbacks/Pingbacks
Pingback: Tweets that mention एन्टर द ड्रॅगन « अक्षरधूळ(Akshardhool) -- Topsy.com - फेब्रुवारी 1, 2010