गंगा नदीला भारतीय संस्कृतीमधे अनन्यसाधारण महत्व आहे. गंगाजल हे अतिशय पवित्र मानले जाते. माणसाच्या अखेरच्या क्षणी, त्याच्या मुखामधे गंगाजलाचे थेंब टाकण्याची प्रथा आहे. गंगेमधे स्नान करण्याने माणसाची सर्व पापे धुवून निघतात असे म्हणतात. उत्तर भारतातील लोक तर गंगेला, गंगामैय्या म्हणजे आईच मानतात. कदाचित युगानुयुगे सर्वांची पापे धूत असताना, गंगामैय्याने बहुदा ती स्वत:कडेच ठेवली असावीत. आता मात्र तिला या पापांचा भार असह्य झालेला दिसतो आहे कारण गंगा नदीचे अस्तित्व राहणार आहे की नाही याचाच प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
वाराणसी शहरात, गंगेच्या घाटावर लोकांची क्रिया-कर्मे उरकणारे अनेक भटजी आहेत. हे लोक गंगेच्या होणार्या अध:पतनाला रोजचे साक्षीदार आहेत. त्यांच्यापैकी काही जण आता मानू लागले आहेत की गंगेचे पाणी आता स्नान करण्यास सुद्धा योग्य राहिलेले नाही. ‘स्वच्छ गंगा अभियान‘ यांची स्वत:ची प्रयोगशाळा आहे त्यात ते गंगेचे पाणी रोज तपासतात. या संस्थेत काम करणार्या शास्त्रज्ञांच्या मताप्रमाणे गंगेचे पाणी दिवसेंदिवस जास्त जास्त खराब होत चालले आहे. पाणी अस्वच्छ होण्याचे प्रमुख कारण हे आहे की मानवी सांडपाणी व मलमूत्र गंगेत काहीही प्रक्रिया न करता सोडले जात आहे. हे जर थांबले नाही तर थोड्याच कालात गंगा मृत नदी होईल व तिचे पाणी कोणाच्याच उपयोगाला येणार नाही.
1986मधे भारत सरकारने गंगा स्वच्छ करण्याची एक मोहिम हातात घेतली होती. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की या मोहिमेचा फारसा काहीच उपयोग न होता नदीचे पाणी जास्त जास्त खराबच होते आहे. हा प्रकल्प अतिशय वाईट पद्धतीने राबवला गेला आहे व सर्वदूर पसरलेल्या भ्रष्टाचाराने या प्रकल्पाचे अपयश नक्की केले आहे. आता परत, भारत सरकारने पुढच्या दहा वर्षात कोट्यावधी रुपये खर्च करून, 2020 पर्यंत गंगाजल शुद्धीकरणाची नवी योजना आखली आहे. यासाठी एक ‘राष्ट्रीय गंगा नदी व खोरे प्राधीकरण‘ स्थापन केले आहे.
गंगेच्या पात्रात, प्रक्रिया न केलेले, कोणतीही औद्योगिक सांडपाणी व मानवी सांडपाणी सोडण्यास आता परवानगी दिली जाणार नाही. पण अशी शक्यता वाटते की गंगेसाठी कदाचित ही शेवटचीच संधी असेल. गंगेचे पाणी जरी पवित्र मानले गेले असले तरी कोट्यावधी भारतीय ते पाणी घरगुती वापरासाठी, शेतीसाठी व मच्छीमारीसाठी सुद्धा वापरतात. या मच्छीमारांच्या मताने, गंगेचे पाणी कमी कमी होत चालले आहे. त्यात प्रदुषण फार आहे व मासे कमीच मिळू लागले आहेत. व त्यामुळे या मच्छीमारांना आपले उपजीविकेचे साधनच धोक्यात आल्यासारखे वाटते आहे.
नदीच्या पाण्याच्या होणार्या हानी बद्दल लोकांत जागरुकता यावी म्हणून पर्यावरण हा विषय वाराणसी मधल्या सर्व शाळांत आता कंपल्सरी शिकवला जातो. शाळेचे विद्यार्थी नदीच्या पात्राचा आता अभ्यास करतात. त्यांच्या मताने सुद्धा पाणी कमी होत चालले आहे. पात्रात दिसणार्या बेटांची संख्या वाढतच चालली आहे. पाण्यात राहणार्या प्रजातींची संख्याही कमी कमी होत चालली आहे.
गंगेचे पात्र असेच प्रदूषित होत राहिले तर वाराणसीमधे कठिण परिस्थिती येऊ शकते. गंगेचे पाणी भारतीय जनमानसाशी एवढे जुळलेले आहे की पुढच्या काळात जर गंगेत स्नान करता येणे शक्य झाले नाही तर प्रचंड जन प्रक्षोभ होण्याचीही शक्यता आहे.
गंगाजल शुद्धीकरणाचा प्रकल्प म्हणूनच महत्वाचा बनला आहे. जर गंगा नदी भारतीयांच्या उपयोगाची राहिली नाही तर हजारो वर्षे पूर्वीपासून चालत आलेली जीवनाची एक परंपराच नष्ट होईल यात शंकाच नाही.
25 नोव्हेंबर 2009







I share the same feelings.
Posted by harekrishnaji | नोव्हेंबर 26, 2009, 3:37 pm