मला सहसा राजकारण, राजकीय पक्ष आणि त्यांची ध्येयधोरणे, यांच्याबद्दल काही लिहावे असे कधी फारसे वाटत नाही. सत्ता प्राप्तीसाठी त्यांचे चाललेले प्रयत्न व सत्ता हातात आल्यावर ती कशी राबवायची या बद्दलची त्यांची धोरणे याबद्दल मला एक तर फारसे कळतही नाही व त्याबद्दल लिहिण्याची माझी पात्रता आहे असे मला वाटत नाही. तरी सुद्धा एखादे वेळेस हे पक्ष अशा काहीतरी घोषणा करतात किंवा निर्णय घेतात की मला आत कुठेतरी खूप वाईट वाटते.
एकोणिसशे पन्नास व साठ च्या दशकांच्यात, भारतात पंडित जवाहरलाल नेहरूंचे जे मंत्रीमंडळ होते त्यात बाळकृष्ण केसकर म्हणून एक सदगृहस्थ, नभोवाणी मंत्री म्हणून बरीच वर्षे होते. हे पद त्यांना का देण्यात आले होते किंवा या पदासाठी त्यांची पात्रता होती की नाही हे सांगणे मला कठिण आहे. या सदगृहस्थांनी असा एक निर्णय घेतला होता की त्याची कार्यकारणपरंपरा सांगणे शक्य नाही. हार्मोनियम किंवा बाजाची पेटी या वाद्याला, या सदगृहस्थांनी, ऑल इंडिया रेडियोवर संपूर्ण बंदी घातली होती. त्या काळात शास्त्रीय संगीताच्या रेडियोवरून होणार्या कोणत्याही कार्यक्रमाला फक्त दिलरुब्या सारख्या तंतुवाद्याची साथ संगत असे. वार्यावरची वरात या कार्यक्रमात, ‘पु.लं.’ नी वाजवलेली पेटी ज्यांनी ऐकली असेल त्यांना या काळातले रेडिओवरचे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम किती नीरस होत असतील याची कल्पना करता येईल. पण हार्मोनियम बंदी हे त्या वेळच्या मंत्रीमंडळाचे धोरण होते. संगीतप्रेमींना ते रुचते किंवा नाही याचे त्यांना सोयरसुतकच नसावे.
या महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमधे, भारतातल्या तीन राज्यांमधे निवडणूका होणार आहेत. हरयाणा या राज्यातल्या निवडणुकीसाठी सध्या प्रचारधुमाळी चालू आहे. हरयाणामधल्या एका पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने केलेल्या भाषणात, अशीच एक औरंगजेबी घोषणा केली आहे. या घोषणेनुसार, पाश्चात्य संगीत व अश्लीलता हे दोन्ही भारतीय संस्कृतीच्या विरोधी असल्याने त्यांचा पक्ष सत्तेवर आल्यास या दोन्ही गोष्टींना बंदी घालण्यात येईल. या नेत्याच्या या निवेदनाचे वृत्त वाचून, मला अतिशय वाईट वाटले. पाश्चात्य संगीत आणि अश्लीलता याना एकाच तराजूने तोलण्याचा हा प्रकार अजबच आहे. या महोदयांना बहुदा पाश्चात्य संगीत म्हणजे काय याचे संपूर्ण अज्ञान असावे नाहीतर अश्लीलता आणि पाश्चात्य संगीत यांना एकाच रांगेत बसवण्याचा प्रयोग त्यांनी केला नसता.
भारतीय अभिजात संगीताएवढेच, पाश्चात्य अभिजात संगीत, प्राचीन व अत्यंत समृद्ध आहे. बीथोवेन, बाख, स्ट्राउस, मोझार्ट यांच्यासारख्या संगीतकारांनी निर्माण केलेल्या आपल्या अजरामजर रचनांनी ते कल्पनेच्याबाहेर श्रीमंत केलेले आहे. भीमसेन जोशींचा षड्ज कानावर पडला की जसे संपूर्ण अंगावर, रोमांच उभे रहातात त्याचप्रमाणे बीथोवेनच्या फिफ्थ सिम्फनीचे स्वर कानावर पडले की होते. किंवा त्याचीच, ‘चांदण्या रात्रीचे गाणे’ (Moonlight Sonata) ही रचना ऐकून कोण वेडे होणार नाही. मोझार्टची 40 नंबरची सिम्फनी अशीच एक अजरामर रचना आहे.
लंडन, बर्लिन किंवा न्यूयॉर्क फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्रा सारखा एखादा वाद्यवृंद, आपल्या पूर्ण शक्तीनुसार, एखाद्या भव्य कक्षात, जेंव्हा या रचना सादर करतो तेंव्हा मन अक्षरश: वेडे होते. पन्नास, साठ व्हायोलिन्स किंवा क्लॅरिओनेट्स कडून एकसंध निर्माण झालेले या रचनांचे सूर कानावर पडतात तेंव्हा समोर एखादे संगीतशिल्प उभे असल्यासारखे वाटते. नव्या पिढीतले ‘यानी’ सारखे संगीतकारही उत्कृष्ट दर्जाचेच आहेत. काही वर्षांपूर्वी आग्र्याला ताज महालाच्या साक्षीने या संगीतकाराने आपला एक जलसा केला होता. दूरदर्शनने तो संपूर्ण लाईव्ह दाखवला होता. हा कार्यक्रम ज्यांनी बघितला होता त्यांना फार दुर्मिळ असे काहीतरी बघायला मिळाले होते.
मागच्या निवडणुकीत एका दुसर्या पक्षाने याच प्रकाराने निवडून आल्यास संगणकांवर बंदी आणण्याची घोषणा केली होती. भारतात बॅंकांचे जेंव्हा प्रथम संगणकीकरण झाले तेंव्हा अशाच एका राजकीय पक्षाने संगणकांवर बंदी आणण्याची मागणी केली होती. हरयाणामधल्या या नेत्याचे वक्तव्य असेच करंटे आणि ह्रस्व दृष्टीचे वाटते.
या घोषणेच्या वृत्ताच्या एका वाचकाने, यावर दिलेला आपला प्रतिसाद मला फार रूचला. तो म्हणतो की “या पक्षाने तालिबान किंवा त्यांचा नेता मुल्ला उमर याला आपला सल्लागार नेमले आहे की काय?” तालिबानच्या लोकांनी अफगाणिस्तानमधे केलेल्या विचित्रपणासारखीच या हरयाणाच्या नेत्याची ही घोषणा आहे.
संगीताला दैवी देणगी समजतात. ही देणगी स्थळ, काळ किंवा देश, या सर्वांचे बंधन तोडून त्याच्यापलीकडे जाते. संगीतात चांगले, वाईट असे काही नसते. सर्व संगीत चांगलेच असते. कमी-जास्ती असतात गायक आणि कलाकार. आपण एवढीच आशा करूया की हरयाणामधल्या या नेतेमहोदयांना त्यांच्या अज्ञानाची जाणीव लवकरच होईल.
3 ऑक्टोबर 2009





आकाशवाणीने हार्मोनियमवर बंदी आणण्याचे कारण हार्मोनियम गायकाच्या आवाजातले गुणदोष अक्षरशः पुरून टाकतो हे असावे. जुने गायक याकारणाने साथीला सारंगी घेत असत. दोष झाकण्याची त्यांची पद्धत वेगळी होती.
Posted by मनोहर | ऑक्टोबर 5, 2009, 1:12 सकाळीमाझ्या माहितीप्रमाणे हार्मोनियमवर मिंड येत नसल्याने त्यावर आकाशवाणीने बंदी घातली होती. जाणकार अधिक सांगू शकतील.
Posted by अमोल | ऑक्टोबर 6, 2009, 7:51 pm