आईचा जीव
चिमण्याला मी सोडून आले आज किती हो दुरी
मन वेडे माझे जाई माघारीं
हात चिमुकला हालवुनी मज निरोप देई मुदें
परि व्यथित होई मी त्या आनंदे
बरे जीवाला असेल त्याच्या! चिंता एकच मनीं
कां रडे सारखा मजला आठवूनी
आईचे जरि वेड तयाला मुळीच बाई नसे
आजीच्या हृदयमंदिरी बसे
परि जीव आईचा कळवळतो हा उगाच वेडापिसा
मायासागर खळबळतो हा कसा
गोड तयाचा पापा भारी सुखद किती ही स्मृति
गाल गोजिरें दृष्टीपुढें नाचती
(ऑगस्ट 1956 )
पहिलीच वेळ
”आलीस पहिल्याने, रहा चार दिस आतां
गोष्टी सांग गोड गोड तुझ्या नव्या संसाराच्या //
आलीस महिन्याने वाटतात किती दिस
तुझ्या वियोगाने होई जीव माझा कासावीस //
कर भाजी आवडीची मलाही ती आवडेल
तुझ्या हातचे जेवण जीव माझा तृप्तावेल //
आहेत ना पोरी! माझे नवे जावई प्रेमळ
संसाराच्या पटावर रंगला ना नवा खेळ //
नव्या आशा फुलताना दृष्टी तुझी पुढे लागे
पुढे जाताना परंतु पहा कधी कधी मागे //
किती झाले तरी आतां झालीस तू परक्याची
अधिकार सरे माझा, फक्त बोली ममतेची //
” बाबा नका असे बोलू कशी तुम्हा विसरेन
सावलीत सुखाच्या या पुन्हा पुन्हा परतेन //
सांगितले मी तयांना, येतील हो न्यावयाला
पहिलीच वेळ बाबा हवे मला जावयाला //
(डिसेंबर 1954)
मजपाशी काही उरले नाही
मोहीलेस तूं तुझ्या स्मीताने
भारिलेस तूं तव विनयाने
भालावरच्या ललाटरेषा
बघुनि चमकल्या मनात आशा
स्पर्शातील तुझ्या माधुरी
उठतील रोमांच्याच्या लहरी
डोळ्यानी तव बघसी अंतर
शान्त गंभीर परी हा सागर
तरंग नाही, खळबळ नाही
साद तुला मग कशी मिळावी
सर्वस्वहि मम दिले दुज्याला
या सर्वाहुनी प्रिय जो मजला
येऊं नको तूं पुन्हा कधीही
मजपाशी काही उरले नाही
( ऑगस्ट 1954)
***********
झाले सारे यथासांग
झाले सारे यथासांग, कन्यादान पुण्य पदरी
एक उणीव बोंचली / कडोसरीला सुपारी //
कन्या सासरी निघाली, सारे डोळे पाणावले
एक उणीव बोंचली / ममतेचे पाश विरले //
झाले सारे यथासांग, वर्हाडाने घर भरे
एक उणीव बोंचली / माणूस हवे होते खरे //
कन्या सासरी निघाली, ओटी भरा असोल्याची
एक उणीव बोंचली / जागा नाही ओलाव्याची //
झाले सारे यथासांग, झाला सारा थाटमाट
एक उणीव बोंचली / परी आंवळ्याची मोट //
कन्या सासरी निघाली, आशिर्वादे पोट भरे
एक उणीव बोंचली / कुशीतली उब झुरे //
***********
(ऑक्टोबर 1954)
पाळणा
बांधा ग सयानों रंगीत पाळणा
मखमली गादी उशी ही आणा
झोंपवा माझा राजस राणा
जो बाळा जो जो रे जो //
तीट काजळ घाला बाळलेणीं
शोभतो ग कृष्ण पिंपळपानीं
गालबोट लावा दृष्ट काढा कोणी
जो बाळा जो जो रे जो //
गोजिरें रूप हें बाळकृष्णाचे
पाहुनी मनात आनंद नाचे
वर्णाया शब्द ना येती तोलाचे
जो बाळा जो जो रे जो //
संसारी उद्यानीं फुललें फूल
तांबुस कांती किती कोमल
सौव्य कासारीं हांसे कमल
जो बाळा जो जो रे जो //
निर्मल सुमन शोभा येतसे
मनोहर जणूं रूप घेतसे
प्रीतिचे बिंब नयनात भासे
जो बाळा जो जो रे जो //
फुलापरी बाळा सदा तु हांस
रिझवी रे मातापिता मानस
उधळी संभोती सौम्य सुवास
जो बाळा जो जो रे जो //
गोविंद घ्या कुणि गोपाळ घ्यावा
कृष्णाच्या घ्या कोणि सहस्त्र नांवा
आनंद म्हणुनी पाळणी ठेवा
जो बाळा जो जो रे जो //
औक्षवंत हो मनरमणा
जीवनीं मिळवी सौख्यसाधना
मावशी देते आशिर्वचना
जो बाळा जो जो रे जो //
(ऑगस्ट 1953)
न्या हो आंता प्राण
देवा …………
न्या हो आंता प्राण //
सोसत नाहीं वेदना ही
अंगाची मम होते लाही
दु;खाला या सीमा नाहीं
नाहीं उरले त्राण //
या जन्मीं ना पाप चिंतिलें
गत जन्मींचे संचित सरले
हाल सोसणें भाळीं लिहिंलें
दैवाचें हें दान //
लेक जांवई घरी नांदले
नातू पणतू अंकि खेळले
आनंदाने घर मम भरलें
नाहीं कसली वाण //
असले आयु जर या पुढतीं
क्षणापळांची ना करी गणती
घाल तयांच्या सारें खातीं
माझी तुजला आण //
नाही उरली कसली आंस
लागे निशिदिनीं एकच ध्यास
मरणा घेई अपुला घांस
तुझेंच आतां ध्यान //
असशिल तेथुन घेई धांव
ठेवतील जन तुजला नांव
मम अंतरी परि भक्ति भाव
करुणेची तूं खाण //
(1952)
कसे जुळावें कर हें नकळे
कसे जुळावें कर हें नकळे //
व्यक्तित्वाचे माजति डोंगर
दिव्यत्वाचें भरविती सागर
अनुभवाचे किती अवडंबर
सत्यालाही न फुटे पाझर
महत्व नाही आंता उरले //
वेलीवरची सुंदर सुमन
सुवास उधळित नाचति मन्मन
प्रभुपदी पडतां करिती वंदन
दुज्या दिनि तें निर्माल्यचपण
गंगेमाजी सोडुनि दिधले //
चैत्रपालवी झाडावरली
वसंतशोभा किती वाढली
तरूलतांचे जीवन जगली
शिशिरामाजी वाळून गळली
पाचोळ्याला जळणें आलें //
कोर बीजेची लोभसवाणी
हतभाग्याची ती ओवाळणी
पूर्ण चंद्रमा जग वाखाणी
चतुर्दशीचा मनीं ज ध्यानीं
क्षणी चंद्राचे कौतुक कुठलें //
*********
\
‘ तोच स्वर्ग माझा ‘
तोच स्वर्ग माझा / जेथें माझे घर
प्रेमाचे तुषार / न्हाणीताती //
तोच स्वर्ग माझा / जिथे माझा राया
त्याचीच मी जाया / जन्मभरी //
तोच स्वर्ग माझा / आभाळ छाया
वडिलांची माया / लाभे जेथे //
तोच स्वर्ग माझा / चिमणी पांखरे
अमृताचे झरे / पाझरती //
तोच स्वर्ग माझा / बाळांचे ते बोल
आनंदाला मोल / नाहीं दुजें //
तोच स्वर्ग माझा / नको हिरे मोतीं
आसवांचे मोती / प्रेमापोटीं //
तोच स्वर्ग माझा / नको घर गाडी
छोटिशी झोंपडी / माझी जेथें //
तोच स्वर्ग माझा / साखरेंत तूप
होती एकरूप / जीव दोन्हीं //
तोच स्वर्ग माझा / विरे भाळीं आठी
हसूं फुटे ओठीं / आनंदानें //
तोच स्वर्ग माझा / प्रेम घ्यावें द्यावे
प्रेमात मरावे हीच आशा //
तोंच स्वर्ग माझा / माझें माझें सारें
जागृतीत वीरे / स्वप्न माझें //
(1953)
‘दिर्घायू ‘
अनेक वर्षे कष्ट सोशिले अखंड शारिरिक /
परंतु लिहिले नव्हतें कधींच भोगसुख //
परहीतास्तव झिजतां सार्थक जन्माचे झालें /
परंतु आनंदहि ना स्वास्थ्यहि कधि मिळालेंलें //
उत्कर्षाचे ध्येय गांठण्या निबिड मार्ग क्रमिला /
परंतु ओठीं नाही आला समाधान पेला //
हांव न सरे संसारी ना मोह सुटे काय /
वलयजालिं कमलाच्या कां पडला पाय //
श्रमसाफल्यहि झाले देई दैव दो करानीं /
परंतु कर्महि घेऊन जाई सत्य ठरे वाणी //
बीज लाविले, पाणि घालुनि रोप वाढवले /
परंतु आस्वादिलेंच नाही फळे फुले भरले //
भाग्य उदेलें लक्ष्मि होई चरणाची दासी /
परंतु भाळीं नाही घेणे श्रीच्या सेवेसी //
नको नको हें दिर्घायु हा नको नको मोह /
अल्पतेंतहि समाधान हा तृप्त असे जीव //
(1948)
‘ लोक म्हणती ‘
(अवकाळी पावसास पाहून)
ऐकु येती आवाज बंदुकांचे /
लाठि काठी ही तशी नित्य नाचे /
म्हणुनि मति धडधडे तवहि छाती /
लोक म्हणती संगीत मेघ गाती //
अमानुषता ही जाळीते जिवाला /
बघुनि अन्याया क्रोध तुला आला /
नेत्रज्वाला अंतराळात जाई /
लोक म्हणति नाचते चपलता ही //
शिवाशिवाचा खेळ मरण खेळे /
बळी पडती निष्पाप तुझी बाळे /
म्हणुनि नयनातुनि गळति अश्रुधारा /
लोक म्हणति पडति या वर्ष धारा / /
आज मानवता दिसतसे पिडीत /
आदिमाये सहभागी तूंच त्यांत /
दाविसि सक्रिय सहानुभुती /
लोक म्हणती संकटे सर्व येती //
अन्नटंचाई परतंत्रता तशी हो /
तेढ जातिंची तशी रोगराई /
मनुंजनिर्मित मोक्षसाधने ही /
लोक म्हणती असति मृत्युदायी //
त्यांत ओला दुष्काळ अतां होय /
निसर्गाचा पांचवा हा उपाय /
घरहि फिरतां फिरतात सर्व वासे /
लोक म्हणति आज हे सार्थ भासे //
(1946)
‘ राहुं कैशी एकली ‘
सांग केंव्हा येशि राया / परतुनिया तूं घरा /
अधिर झाले मीलनाते / विरह आता हा पुरा / /
विरह होई एक रात्र / मनीं वाटे मत्सर /
काळजीने काळी होई / कां निशा ही सुंदर //
शशी खेळे लपंडाव / विरह विसरे कामिनी /
स्वागतातें सिद्ध होई / तत्पक्राशे नाहुनी //
रवी भेटे नभ:श्रीला / विरहरात्र संपली /
अरूण माझा येई केंव्हा / आंस एक लागली //
मंद डोले कमलिनी ती / जलतुषारीं नाहुनी /
भ्रमर येई चुंबण्याते / विकसते आनंदुनी //
पाखराचे दोन जीव / सौख्य सांडे भरुनिया /
चोंच चोंची घालताच / मने गेली मिळूनिया //
उषा होई अधिर मिलना / क्षितिज राया प्रिय सखा /
म्हणून लाली कपोली कां? / रंग कां हा प्रितीचा //
निघुनि राया जाई आंता / क्रोध आला कां मनी /
म्हणुनि कां तूं पश्चिमे ग / रक्तवदना जाहली //
भेटण्याते जाई सरिता / दुर जरि हा सागर /
मनहि येई तुझ्यामागे / तोडले हे अंतर //
जीव हा बेचैन आतां / धांव घे मेघ खाली /
नाहुं घाली जलप्रेमी / धरादेवी सुंदरी //
सृष्टी खेळे प्रणयक्रिडा / निसर्गाशीं भोवताली /
पुजविना मी सांग राया / रांहु कैशी एकली //
(1946)
स्वातंत्र्य दिन
मंगल दिन हा आज पातला ही मंगल वेला
स्वातंत्र्याचा सूर्य आज हा येई उदयाला //
दास्याची ही महाभयंकर काळरात्र गेली
तेजोमय ही नवी शलाका येई उदयांचली //
पहांट तारे मिचकाउनियां नयन हांसतात
त्या रात्रीला शेवटचा हा निरोप देतात //
सडा अंगणी मंगलमय हा मेघराज घालीं
रविरश्मिंची रंग वल्लिका रेंखीव या कालीं //
दास्य श्रुंखला तुटल्या तटतट मिळता ही मुक्ती
आनंदोत्सव करण्यात्सव कां वाद्ये दुमदुमती //
मेघचौघडा गरजे वायु वाजवितो सनई
विद्युत तोरण बांधियले जणुं निसर्ग नवलाई //
पहांट होता पक्षी उडाले गीत गांत गांत
ध्वजा गगनिं या, ऐंकू येई स्वतंत्रेचे गीत //
निजलेल्या या कळ्या उमलल्या आनंदित झाल्या
स्वागतसमयी सुवाससिंचन करण्यास्तव आल्या //
मंगलसमयी कुंकुमतीलक लावियला कोणी
उषा नव्हे कां? तीच तीच ही सुवासिनी राणी //
परी दिसेना कुठे कशी ही मंगलमय अरती
ओंवाळुनिया पंचप्राणा केली असे पूर्ती //
ज्यांनी दिधले देहमोल ते आज तृप्त झाले
आनंदाश्रु-पुष्पवृष्टि ही स्वर्गातुन चाले //
सौभाग्याचा दिवस आज येई भारताला
जगत जननि ही आशिर्वचना देई या काला //
तिरंगी ध्वज हा नभी फडकला नवीन राष्ट्राचा
अभिमान हा जागृत ठेवील गत इतिहासाचा //
सुखशांती ही तशी सधनता येवो ही आंस
भविष्य़काल उज्वल दिसतो प्रथम जरी त्रास //
[15 ऑगस्ट 1947 (मध्यरात्र)]
कविता छान आहेत , आशयगर्भ आहेत . अजून काही कविता असतील तर ब्लॉग वर टाका ,
संदीप
Posted by sandeep deokar | ऑगस्ट 20, 2011, 4:37 pmसंदीप-
माझ्या आईने केलेल्या कवितांची संख्या मोठी आहे. त्यातल्या काही निवडक कविता ब्लॉगवर प्रसिद्ध करण्याचा माझा मानस आहे. हळूहळू तुम्हाला त्या वाचायला मिळतीलच.
Posted by chandrashekhara | ऑगस्ट 21, 2011, 8:29 सकाळी‘सूर्यवंशी उत्तानपाद राया’ या दिण्डी-छन्दामधल्या प्रसिद्ध काव्यांत खूपच छन्दशैथिल्य आहे. सराईत कवींइतका छन्दशुद्धतेचा आग्रह न धरताही, ‘ऐकु येती आवाज बंदुकांचे’ या दिंडीत काही ओळी म्हणायला त्रास होतो.
म्हणुनि मति धडधडे तवहि छाती — १७ मात्रा (दिंडीतल्या ओळीत १९ मात्रा हव्यात, इथे अतिलघुत्व छन्दाची हानी करतं, हे माझं मत)
अमानुषता ही जाळीते जिवाला — २० मात्रा (ळि र्हस्व केला तर हा दोष दूर होतो)
शिवाशिवाचा खेळ मरण खेळे – ‘शिवाशिवा’ अशी सुरवात दिंडीत बसतच नाही. सगळे गुरु असल्यास त्यातल्या एकाचा उच्चार चोरटा करून गाडी चालवता येते. उदा: त्या(चा) माझा सहवास घडो स्वामी – कंसातला ‘चा’ झटकन म्हणावा लागतो, तरच दिंडीच्या ओळीतले उपविभागांचे मात्रानियम पाळले ज़ातील.
दाविसि सक्रिय सहानुभुती — फक्त १५ मात्रा
मनुंजनिर्मित मोक्षसाधने ही — फक्त १७ मात्रा
लोक म्हणती असति मृत्युदायी — इथेही दोन मात्रा कमी
तरी बहुतांश कविता या वृत्ताचे नियम पाळते.
– नानिवडेकर
Posted by Anonymous | ऑगस्ट 28, 2011, 11:27 pmया कविता पुस्तकरूपात आणायचा तुमचा विचार असल्यास तेंव्हा शब्दांची फेरफार करावी का, हा प्रश्न कठीण आहे. आवश्यक तिथे फेरफार करावी, कारण त्यामार्गे रचनादोष दूर करता येतात. कवी हयात असेल आणि त्याला सुचवलेला बदल मान्य असेल तर प्रश्नच नाही. पण ते शक्य नसल्यास कवीचे मूळ शब्द तसेच ठेवण्यालाही महत्त्व आहेच.
उदा. ‘देहे/तनू’ हे दोन्ही शब्द एका प्रसिद्ध ओळीत वाचायला मिळतात. माझा अन्दाज़ आहे की रामदासांनी ‘देहे त्यागिता मूर्ती मागे उरावी’ असे शब्द लिहिले असावेत. ‘दे’-चा संक्षिप्त उचार करून ही ओळ भुजंगप्रयातात म्हणता येते, आणि असे संक्षिप्त उच्चार असलेली रचना रामदासांपूर्वी एकनाथ करतही. पण पुढे कोणीतरी ती ओळ भुजंगप्रयातात बसवायला ‘तनू त्यागिता’ असा बदल केला असावा. ‘तनू’ शब्द अशुद्ध आहे, पण अशी ओढताण रामदास खूप करत. तरी त्यांनी ‘तनू’ शब्द लिहिला असता, तर पुढे इतर कोणी तिथे बदल करून ‘देहे’ शब्द घुसडण्याचा संभव कमी आहे. म्हणून मूळ शब्द ‘देहे’ असावा असा माझा अन्दाज़ आहे.
- डी एन
Posted by Anonymous | ऑगस्ट 29, 2011, 3:26 सकाळीनानिवडेकर -
तुमचे दोन्ही प्रतिसाद वाचून खूपच आनंद वाटला. एवढ्या बारकाईने तुम्ही माझ्या आईच्या एका कवितेतील छंद मात्रांचे विश्लेषण केलेत या बाबत मनापासून आभार. माझी या बाबतीतील अडचण अशी आहे की माझ्या आईने लिहून ठेवलेल्या कवितांच्या वहीतील काही पाने अतिशय जीर्ण झाल्याने तिने स्वत: तिच्या वृद्धापकाळात, अशा जीर्ण पानांवरच्या कविता कोणाकडून तरी दुसर्या कागदावर लिहून घेऊन आपल्या मूळ वहीत डकवल्या आहेत. या कविता परत लिहिताना त्या व्यक्तीने शुद्धलेखनाच्या किंवा छंदमात्रेच्या काय चुका केल्या आहेत हे मला शोधून काढणे अशक्य आहे. त्यामुळे मी या कविता प्रकाशित करताना आईच्या वहीनुसारच घेतल्या आहेत. त्यात तिने मूळ काय लिहिले होते ते सांगणे कठिण आहे. जर कोणाला ही कविता गाण्याची इच्छा असेल तर गाताना त्यात काय अडचण येईल त्या प्रमाणे बदल करणे शक्य आहे. मात्र प्रकाशित करताना त्या मूळ वहीप्रमाणेच करणे आवश्यक आहे असे मला वाटते.
Posted by chandrashekhara | ऑगस्ट 29, 2011, 9:06 सकाळीkavita chaan aahe sir………………….
Posted by geeta | ऑक्टोबर 30, 2011, 4:21 pmगीता-
धन्यवाद दोन्ही प्रतिसादांबद्दल
Posted by chandrashekhara | नोव्हेंबर 1, 2011, 4:11 pmALL are best..I like it so much. keep posted such poem. Really great!!! and thank you so much for sharing. God bless you sir.
Posted by vai | डिसेंबर 27, 2011, 1:25 सकाळीVai-
Thanks for your response. I would be sharing more such poems in future
Posted by chandrashekhara | डिसेंबर 27, 2011, 7:52 सकाळी