13 जुलै 2011
एक विषण्ण संध्याकाळ
काल संध्याकाळी माझ्या रोजच्या रिवाजाप्रमाणे काही मित्रमंडळींबरोबर गप्पागोष्टी करत बसलो असताना, एका मित्राचा फोन खणखणला. त्याच्या प्रतिसादांवरून पोटात धस्स झाले. व नंतर बातमी समजल्यावर आणखीनच मन विषण्ण झाले. दर सहा महिने किंवा वर्षाने मुंबईकरांनी हे अतिरेकी हल्ले का आणि कशासाठी सहन करायचे असा यक्षप्रश्न मनाला सतावत राहिला.
हे कोठेतरी संपले पाहिजे. ज्या अपराध्यांना फाशीची शिक्षा झाली आहे त्यांना शिक्षा सुद्धा देण्याची कुवत आमच्या शासनात राहिलेली नाही. अशा प्रकारच्या गुन्ह्यांची चौकशी, व खटले शीघ्र गतीने चालवून ज्यांचा अपराध सिद्ध झाला आहे त्यांना विनाविलंब शिक्षा झाली पाहिजे अशीच अपेक्षा सर्व साधारण नागरिकांची असते. मग तसे का घडत नाही? मुंबईकरांनी किंवा इतर लोकांनी सुद्धा या अतिरेकी कारवाया का सहन करायच्या असा प्रश्न मनाला सतावत राहिला आहे.
*********
25जुलै 2010
पुण्याच्या बोपोडी या उपनगरामधल्या डॉ. झाकिर हुसेन उर्दू माध्यमिक शाळेतील 117 मुलांना ‘ शालेय पोषण आहार’ या योजनेअंतर्गत दिल्या जाणार्या खाद्यपदार्थांमधून विषबाधा झाल्याचे वृत्त वाचले. दिवसभर डोक्यातून हा विषय गेला नाही. या मुलांना आहार देण्याचे काम ‘आदर्श डाकवा’ या बचत गटाकडे देण्यात आले होते. हाच बचत गट डॉ. सर्वपली राधाकृष्णन हायस्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनाही आहार देतो. या दोन्ही शाळांचा आहार एकदमच बनवला जातो. असे असताना फक्त एकाच शाळेतील मुलांना विषबाधा कशी झाली हे समजू शकलेले नाही. गरीब घरातील मुलांना शाळेकडे आकर्षित करण्यासाठी हा आहार अतिशय उपयुक्त ठरला आहे. या बचत गटाचे कर्मचारी किंवा अन्न पदार्थांचे वाटप करणारे कर्मचारी यापैकी कोणीतरी या अत्यंत पराकोटीच्या हलगर्जीपणाला जबाबदार आहे यात शंका नाही.
*******
CA चा अभ्यास करणार्या एका मुलाने अभ्यासाचा ताण सहन न झाल्यामुळे गळफास लावून आज आत्महत्या केली. या मुलाच्या मनावर या अभ्यासाचा जबरदस्त ताण आला असला पाहिजे. तो त्याचे आई-वडील, शिक्षक यांना कळला कसा नाही? हा अभ्यास क्रम असतो अत्यंत कठिण. माझ्याच मुलीने बारा तेरा वर्षांपूर्वी हा अभ्यासक्रम यशस्वी रितीने पूर्ण केला होता. त्यामुळे या अभ्यासाचे केवढे दडपण मुलांच्या मनावर असते त्याची मला कल्पना आहे. एखादा मुलगा किंवा मुलगी जेंव्हा एखादा अभ्यासक्रम निवडते तेंव्हा काय कारणासाठी तो निवडते हे महत्वाचे असते. पुष्कळजण मित्र या अभ्यासक्रमाला गेले म्हणून स्वत:चे नाव पण नोंदवतात. आपल्याला तो झेपेल का याचा विचारच करत नाहीत. आई-वडीलांच्या इच्छेखातर अनेक मुले एखादा विशिष्ट अभ्यासक्रम निवडतात. आई-वडीलांची स्वत:ची तो अभ्यासक्रम निवडण्याची इच्छा पूर्ण न झाल्यामुळे मुलांनी तरी ती पूर्ण करावी अशी त्यांची इच्छा असते. परंतु मुलाची बौद्धिक कुवत काय आहे याचा विचारच केला जात नाही. जर मुलाची बौद्धिक कुवत तो अभ्यासक्रम पूर्ण करता येईल अशी नसली तर मग असे दुर्दैवी प्रसंग घडतात. आपला पाल्य काय अभ्यासक्रम निवडतो व तो त्याने क निवडला आहे याकडे पालकांनी खूप लक्ष देणे गरजेचे आहे असे वाटते.
10 जानेवारी 2010
रोज सकाळचे वर्तमानपत्र उघडले की काही ना काही तरी अशी बातमी वाचायला मिळते की जी मग दिवसभर डोक्यात भुणभुणतच रहाते. अशा या माझ्या मनातल्या भुणभुणींना शब्दस्वरूप देण्यासाठीचे हे पृष्ठ. हे वाचल्यावर वाचकांच्या मनातही या भुणभुणी शिरतील व त्यावर ते विचार करू लागतील हा या पृष्ठामागचा उद्देश.
Agree. त्या साठिच परवा महेश मांजरेकरांचा सिनेमा पाहीला. तुमच्या भावनांचे प्रतिबिंब त
त्यात छान दाखवले आहे.
Posted by sudhir | फेब्रुवारी 26, 2010, 9:51 सकाळीThis is the best blog for the study.
Posted by rupali salvi | एप्रिल 20, 2010, 11:29 सकाळीpratekane wachavich ashi bhunbhun!!
Posted by suvarna | सप्टेंबर 19, 2010, 12:37 सकाळीआज पहिल्यांदाच ‘भुणभुण’हा तुझा ब्लॉग पाहण्यात आला आणि .वाचल्यावर खूप भावला सुद्धा !
मीही माझ्या ‘स्वच्छंद’ ह्या ब्लॉग साठी अशाच स्वरूपाचे बरेचसे वैचारिक लिखाण तयार करून तयार ठेवले आहे व सवडीने ते प्रकाशित करण्याचा माझा मानस आहे. बघू या केंव्हा योग येतो ते !
Posted by swacchand प्रमोद तांबे | एप्रिल 2, 2012, 2:25 pmप्रमोद -
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तुझे लेखन शक्य तितक्या लवकर प्रसिद्ध कर
Posted by chandrashekhara | एप्रिल 3, 2012, 7:25 सकाळी